Source
जलसंवाद, नोव्हेंबर 2017
यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात लांब असलेली उपनदी आहे. हिचा उगम यमुनोत्री बर्फरांगातून झाला असून त्याची उंची ६३८७ मीटर एवढी आहे. या नदीचे खोरे ३६६२२३ चौरस किलोमीटर पर्यंत पसरले आहे. या नदीची लांबी १३७६ किलोमीटर असून ती गंगा नदीला अलाहाबाद येथे मिळते. याच ठिकाणी सरस्वती नदीही गुप्त स्वरुपात असून या ठिकाणी या तीन नद्यांचा संगम झाला असे मानले जाते. या त्रिवेणी संगमाला मोठे धार्मिक महत्व असून या ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. ही नदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली या राज्यातून वाहते. वाहात आलेल्या सुपीक मातीमुळे गंगा व यमुना नदीमधील पट्ट्यात जे ६०५०० चौरस किलोमीटरचे दोआब तयार झाले आहे ते देशाचचे एक मोठे धान्याचे कोठार समजले जाते. ५७ दशलक्ष लोक हे यमुना नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. दिल्लीला मिळणारा ७० टक्के पाणी पुरवठा यमुना नदीपासून होत असतो. पावित्र्याच्या दृष्टीकोनातून ही नदी गंगा नदीइतकीच पवित्र समजली जाते.
उगमापासून वजीराबाद पर्यंतचा तिचा प्रवाह अत्यंत शुद्ध पाण्याचा असून नंतर मात्र ओखला बॅरेजनंतर तिला मिळणा-या १५ सांडपाण्याच्या प्रवाहांपासून यमुना नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झालेले आढळते. नगरपालिकांचे सांडपाणी, शेतीतीन विसर्जित झालेली कीटकनाशके व खतांचे अंश व कारखान्यांचे रसायनमिश्र दूषित पाणी या तीन स्त्रोतांपासून हे प्रदूषण होतांना दिसते.
या नदीलाही स्वतःच्या उपनद्या आहेत. डाव्या बाजूने हिंदोन, शारदा, गिरी, राशीगंगा, हनुमान गंगा, सरुर व खदेरी तर उजव्या बाजूने चंबल, बेटवा, केन, सिंध आणि तोन्स या नद्या यमुना नदीला येवून मिळतात. यमुनानगर, दिल्ली, मथुरा, आग्रा, इटावाह, काल्पी आणि अलाहाबाद ही महत्वाची शहरे या नदी काठी वसली आहेत. या नदीचे काठी अन्नधान्याची उपज मोठ्या प्रमाणात होते. त्यातल्या त्यात बासमती तांदूळ उत्पादन हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य समजले जाते. ओखल्यापर्यंत येणा-या पाण्याचे वाटप योग्य पद्धतीने व्हावे यासाठी पाच राज्यांनी आपसात एक सामंजस्य करार केला असून त्या कराराप्रमामे नदीच्या पाण्याचे वाटप करण्यात येते.
दिल्ली शहर दररोज १९०० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार करते. त्यापैकी बरेचसे पाणी शुद्ध न करताच यमुना नदीत सोडले जाते. या ठिकाणी असलेले सांडपाणी शुद्ध करणारे प्रकल्प हे क्षमतेपेक्षा कमी क्षमतेन कार्य करीत असल्यामुळे नदीचे पाणी शुद्ध ठेवणे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकारने या नदीच्या शुद्धीकरणासाठी ५०० दशलक्ष डॉलर खर्च करुन सुद्धा म्हाणावा परिणाम जाणवला नाही या वरुन प्रदूषणाची तीव्रता लक्षात येईल. जपान सरकारच्या मदतीने या नदीच्या काठावरील २१ शहरांपैकी १५ शहरागत जपान बँक फॉर इटरनॅशनल कोऑपरेशन च्या मदतीने ७०० कोटी रुपयांचे एक मृदू कर्ज मिळवले असून शुद्धीकरणाचे कार्य आहे. बाकीच्या ५ शहरात भारत सरकार हा कार्यक्रम राबवित आहे. लोकसभेत यमुना अॅक्शन प्लॅन यशस्वी होवू शकला नाही याची कबुली सरकारने दिली आहे.
या नदीच्या पात्रात कालव्यांचे जाळे निर्माण करुन जल वाहतुकीला प्राधान्य द्यावयाचे सरकारचे धोरण आहे. यमुना सतलज या नद्या कालव्याद्वारे जोडून भारताचा पूर्व किनारा पश्चिम किनार्याला जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे जर यशस्वी झाले तर वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होवू शकेल.