Source
जलसंवाद, जून 2012
जोरदार पावसाचे रूपांतर पुरात होते, त्यामुळे पूर येणार याची पूर्वसूचना देता येते. लोकांना स्थलांतर करायला वेळ मिळू शकतो. पुरेशी पूर्वसूचना दिली गेली तर जिवीतहानी वाचते. मात्र समुद्री तुफानाची व उधाणारी इतकी पूर्वसूचना मिळत नाही. (आज परिस्थिती थोडीशी बदलली आहे. उपग्रहीय माहिती, छायाचित्रे व संगणकीय विश्लेषण ह्यामुळे त्याचाही पूर्व अंदाज येतो.) त्यामुळे समुद्रीय जलसंकट हे त्यांना मोठे वाटले. हॉलंड ! युरोपातला देश, जगातील सगळ्यात जास्त नागरीकरण असलेला, अत्यंत दाट लोकसंख्या असलेला, आकडेवारीतच बोलावयाचे झाले तर प्रति चौ.मी क्षेत्रात एक हजार लोक रहातात असा ! भारतात, प्रति चौ.कि.मी. क्षेत्रात तीनशेपंधरा लोक रहातात. सुमारे 42500 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव मिळून होणार्या खानदेश पेक्षाही थोडा लहान !
ह्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे 41500 चौ.कि.मी क्षेत्रफळापैकी सुमारे 18 टक्के म्हणजेच 7600 चौ.कि.मी क्षेत्र हे पाण्याखाली आहे. तर उरलेला 33500 चौ.कि.मी एवढे क्षेत्र हेच जमिनीच्या स्वरूपात आहे. त्यापैकी 25 टक्के क्षेत्रफळ असलेला प्रदेश म्हणजे सुमारे 8400 चौ.कि.मी एवढा भाग हा समुद्रसपाटीपेक्षा खालच्या पातळीवर आहे आणि 50 टक्के क्षेत्रफळ हे सपाट क्षेत्र असून ते समुद्रसपाटीपेक्षा 1.00 मीटर अथवा त्यापेक्षाही कमी उंचीवर आहे. ह्या विभागात देशातील 21 टक्के लोक रहातात.
पाऊस सर्वसाधारणत: भारतासारखाच. सरासरी 780 मि.मी एवढा. पण वर्षभर पडत रहाणारा. हवामान दमट, उबदार, सौम्य हिवाळा असलेले, परंतु पाऊस हा बेभरवशाचा ! कधी मुसळधार कोसळणार, कितीही प्रमाणात पडणार असा. आतापर्यंत वर्षभरात 555 इंच म्हणजे 14000 मि.मी. एवढा प्रचंड पाऊस !
ह्या क्षेत्रातून अनेक नद्या वहातात. पैकी र्हाईन (Rhine), मोसे / मासे (Mause) आणि स्केल्ट / स्केल्ड (Schelst / Schelde) ह्या तीन महत्वाच्या. अनेक नद्या त्यांना येऊन मिळतात. त्यांचा त्रिभुज प्रदेश म्हणजे समुद्राला मिळतात तो प्रदेश हा वर उल्लेखलेला विभाग होय. तोच विकसित नागरी क्षेत्र असलेला प्रदेश. हा देश म्हणजे मूळचा नेदरलँड! आजही हॉलंडच्या डच माणसाला आपल्या देशाला नेदरलँड म्हटलेले आवडते, जरा जास्त पाऊस पडला की नद्यांना पूर येतात. नदीचे पाणीही आजूबाजूच्या क्षेत्रात पसरते आणि जमीन पादाक्रांत करते.
असा पाणी हा ज्या देशाला धोका आहे असा हा देश ! पाणी नसण्यामुळे ज्या देशांमध्ये मानवी जीवनच धोक्यात आले आहे असेही अनेक देश आहेत. काही आपण देशोदेशीचे पाणी ह्या मालिकेत वाचलेही आहेत. परंतु आपल्या भौगोलिक स्थितीमुळे देशातला काही भाग (सुमारे 18 टक्के) आसाच पाण्याखाली असलेला आणि उर्वरित भागापैकी 50 टक्के भाग हा केव्हाही पाण्याखाली जाऊ शकेल असा असलेला हा जगातला वेगळा आगळा प्रदेश !
आता तापमानवाढीमुळे हा धोका अधिक मोठ्या प्रमाणावर वाढलेला, उत्तरेला नॉर्थ सी हा समुद्र, त्याचे पाणी कधीही किनारपट्टी (सुमारे 450 कि.मी) ही आपल्या पोटात घेईल असा !
परंतु देवानेच पदरात टाकले हे संकट म्हणून हातावर हात ठेवून शांत न बसलेला, आणि त्यामुळेच आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी 13 व्या शतकापासून कामाला लागलेला. त्यातून डेल्टावर्क म्हणून विकसित केलेला ! त्या त्यांच्या लोकसहकार्याला जगातील अशीच स्थिती काही प्रमाणात बांगलादेशात आहे. मॉरीशस आणि मालदिव हे दोन देश तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर समुद्राच्या पोटात जातील अशी परिस्थिती आहे. आणखीही काही बेटे अशा स्थितीत असू शकतील. परंतु समुद्राच्या पाण्यामुळे जमीन पाण्याखाली जाणे आणि नद्यांच्या पुरामुळे पाण्याखाली जाणे अशा दुहेरी धोक्याला धीटपणे तोंड देऊन त्यावर यशस्वीपणे मात करण्याची त्या देशाच्या अथक प्रयत्नांची ही एक यशोगाथा ! सगळ्या जगातील राष्ट्रांनी आणि राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक समजावून घ्यावी अशी लक्षात ठेवावी अशी ! त्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्या देशाला भेडसावणार्या प्रश्नावर कशी मात करावी ह्याचा एक वस्तुपाठ निर्माण करून देणारी ! तिचाच परिचय करून घेऊ या !
हा आपली जमीन वाचविण्याचा त्या देशाचा प्रयत्न सुमारे पंधराव्या शतकात सुरू झाला. त्याचा खूप तपशील उपलब्ध नाही. मात्र जो उपलब्ध आहे त्यावरूनही हा माग काढता येतो. ह्या प्रारंभिक प्रयत्नांना पोल्डर ( Polder) ह्या नावाने ओळखले जाते. पोल्डर म्हणजे खोलगट भाग पाण्यापासून वाचविण्यासाठी सभोवती कृत्रिम रित्या तटबंदी (संरक्षक भिंती) उभारून जी जमीन निर्माण केली जाते तो भाग ! (आठवा.... मुंबईचा नरीमन पॉइंट हा रिक्लेम केलेला भाग) ह्या संरक्षक तटबंदीला डाईक (Dyke) असे म्हणतात.
त्यांच्या ह्या कामाचे तीन भाग करून अभ्यासणे शक्य आहे -
1. संरक्षक भिंती बांधून रिक्लेम केलेली जमीन
2. समुद्राच्या तसेच नदीच्या पुरामुळे पाण्यात बुडण्यापासून वाचविलेली जमीन
3. दलदलीच्या व खारफुटीच्या संरक्षित केलेल्या जागा. त्यासाठी उभारलेल्या संरक्षक भिंती
ह्या पध्दतीने पोल्डर काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी एक संख्याशास्त्रीय अभ्यासही केला. कारण संपूर्ण देशात किनारपट्टीवर (North Sea ची बाजू) आणि नदी काठांवर संपूर्ण बांधकाम करणे हे खर्चाचे दृष्टीने अतिप्रचंड स्वरूपातले काम होते आणि एवढा पैसा उभारणे अशक्य होते. त्यामुळे जे काय काम करावयाचे त्याचे प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी त्यांनी त्याची तीन विभागात वाटणी केली.
अ. उत्तर व दक्षिण विभागातील पुराचा धोका असलेली क्षेत्रे - 10000 वर्षातून एकदा
ब. समुद्राचे पाणी भरून बुडून जाऊ शकणारी क्षेत्रे - 4000 वर्षातून एकदा
क. दक्षिणेचा उंच प्रदेश (Zee land) आणि उत्तरेला सखल - 2000 वर्षातून एकदा
(प्रदेश ह्याचे मधला संक्रमण पहा (Transitionland)
ह्याचाच दुसरा मला समजलेला अर्थ असा की दहा हजार वर्षात एकदा असे संकट येऊ शकते. इतकी आकडेवारी त्या लोकांनी गोळा केली, त्याचे विश्लेषण केले, त्याचा अभ्यास केला. तो सातत्याने सुरू ठेवला. त्यातूनच त्यांनी नदीखोर्यांचा अभ्यास केला. त्यातूनच -
क्ष. दक्षिण हॉलंड भागातील नदीच्या पुराचा धोका असलेली क्षेत्रे - 1250 वर्षातून एकदा
य. इतर भागातील नद्यांच्या पुराचा धोका असलेली क्षेत्रे - 250 वर्षातून एकदा
देशातील बरीच लोकसंख्या ह्या भागात रहात असल्याने त्यांनी एक वेगळा विचार त्या निमित्ताने अंमलात आणला .
जोरदार पावसाचे रूपांतर पुरात होते, त्यामुळे पूर येणार याची पूर्वसूचना देता येते. लोकांना स्थलांतर करायला वेळ मिळू शकतो. पुरेशी पूर्वसूचना दिली गेली तर जिवीतहानी वाचते. मात्र समुद्री तुफानाची व उधाणारी इतकी पूर्वसूचना मिळत नाही. (आज परिस्थिती थोडीशी बदलली आहे. उपग्रहीय माहिती, छायाचित्रे व संगणकीय विश्लेषण ह्यामुळे त्याचाही पूर्व अंदाज येतो.) त्यामुळे समुद्रीय जलसंकट हे त्यांना मोठे वाटले. त्या दृष्टीकोनातून त्यांनी अनेक कायदेही केले. कारण चार कोटी लोक त्या क्षेत्रात रहातात.
कोणत्या कामाला अधिक प्राधान्य द्यावयाचे हे ठरविण्यासाठी त्यांनी काही नियमावली बनविली. त्यानुसार -
1. मालमत्ता व साधनसामग्रीचे नुकसान
2. उत्पादन बंद पडणे आणि त्यापासून होणारे नुकसान
3. जिवीत हानी आणि त्यानंतर द्यावी लागणारी नुकसान भरपाई - ती वाचविणे (सन 2008 मध्ये 22 लाख पौंड (डच पौंड) एवढी ती निश्चित केलेली होती.)
ह्या तीनही गोष्टींवर जो खर्च होतो तो विकास कामांवर केला आणि हा पाण्याचा प्रश्न थांबविला तर देश प्रगतीपथावर घोडदौड करू शकतो. हा त्या देशाचा मूलभूत विचार होता. त्यातूनच आज अस्तित्वात असलेला 2008 चा नवा जलकायदा (Water Act - Dec 2008) अंमलात आला आहे. त्यामुळेच नवी कामे हातात घेतांना खालील बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले -
1. वादळी वारे आणि समुद्रीय लाटा व त्यांचा होऊ शकणारा संभव्य परिणाम ह्याची प्रमाणबध्द मॉडेल्स बनवून त्याचा त्यांनी तपशीलवार अभ्यास केला. (आपणही आपल्या देशात CWPRS ह्या संस्थेमार्फत पुणे येथे असा अभ्यास करतो.) त्यातूनच कृत्रिमरित्या उभारलेल्या संरक्षक भिंतींनी सुरक्षित केलेले क्षेत्र असे त्यांना निर्माण करता आले.
मी खूप तपशीलात शिरणार नाही. तो ह्या लेखाचा उद्देश नाही आणि तेवढा वेळ व तेवढी जागाही नाही. परंतु मला ह्या वरील गोष्टींची नोंद घेणे गरजेचे वाटले. कारण दरवर्षी महापुराने होणारे नुकसान जीवित हानी आणि त्यावर द्यावी लागणारी भरपाई ही पूर्वतयारी व पूर्वनियोजनातून काम करून व तो पैसा सत्कारणी लावून आपण वाचवू शकणार नाही का ? तीच गोष्ट पाण्याच्या अभावाची - मग टँकरने पाणी पुरविण्याची !
एखादी गोष्ट करायची आहे हे मनावर घेतले तर कशा पध्दतीने काम करावे लागते, करता येते हा पट समोर उघडून मागोवा म्हणूनच हा लेखनप्रपंच आहे. अन्यथा ज्यांनी काम केले ह्याचे आपल्याला फारसे सोईरसुतक असायचे कारण नव्हते. अर्थात ही गोष्ट कुणी एखाददुसरी व्यक्ती करू शकत नाही. पण अशी जी एखादी दुसरी व्यक्ती असते ती विचार देऊ शकते. लोकांच्या मनात ती ठिणगी पेरू शकते, पेटवू शकते. समाजमनात ह्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात होईल, सारी मने अशा विचाराने फुलतील, प्रज्वलित होतील असा विचार करू शकते आणि समोर मांडूही शकते. पुष्कळदा ज्याचे लगेच परिणाम दिसत नाहीत. कशासाठी केला हा अट्टाहास असा प्रश्न निर्माण होतो. पण चांगले तेच घडेल असे समजून सतत अशा द्रष्ट्याला कार्यरत रहावे लागते तेच त्याच्या आयुष्याचे विहीत कार्य असते आणि विधिलिखीतही ! त्यातूनच मने प्रज्वलित होतात.
लोकमानसाचा एक हुंकार उमटतो. तो जनरेटा प्रभावी ठरू शकतो. वैचारिक क्रांती सुरू होते ती इथे ! असो. आपण हॉलंडने घडविलेल्या पोल्डरची तोंड ओळख करून घेतलीच आहे. ह्या कामाची अनेक प्रगत रूपे तिथेच अवतरली झुईडेझी (Zuidezee) ह्या नावाने ही कामे ओळखली जाऊ लागली. अत्यंत लहान प्रमाणावर 15 - 16 व्या शतकात केलेली ही जलसंरक्षक कामे लगून (Lagoon) ह्या स्थानिक नावाने ओळखली जात असत.
विसाव्या शतकाच्या सुरूवातीला हॉलंडच्या राजवटीला ही समुद्राच्या अतिक्रमणापासून आपला देश वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे करण्याची गरज जाणवली. त्यावर काही मूलभूत संशोधन करण्याची गरजही जाणवली. त्यातूनच मालमत्तेचे व सजीवांचे संरक्षण म्हणजे देशाचा विकास हा नवा विचारही विकसित झाला आणि त्यांनी राष्ट्राचे विकास कार्यक्रमात त्याचा समावेश केला.
झुईडेझी :
ही कामे हाती घेण्याआधी त्यांनी एक अगदी छोट्या... सुमारे 2 चौ.कि.मी जागेत ... क्षेत्रात हा प्रयोग केला. त्याचे परिणाम व अपेक्षित रिझल्ट् तपासून पाहिले. आणि मग मोठ्या प्रमाणावर कामे करावयाला घेतली. झुईडेझी म्हणजे मानवनिर्मित संरक्षणात्मक कामे. धरणे, जमीन रिक्लेम करणे, पाणी निचरा होण्यासाठी करावयाची कामे अशा तिन्ही प्रकारच्या कामांचा त्याच समावेश होतो. त्यामध्ये जे मोठे धरण बांधतात त्याला (a fslut dijk) अफल्सुटडिंज्क असे म्हणतात. ही सगळी झुईडेझी खाली केलेली कामे म्हणजे उस्सेलमीर (Usselmeer).
धरण म्हणजे संरक्षक भिंत. पूर्वीच्या काळी अशा ज्या भिंती समुद्रात उभारीत त्यांना कोस्टल ड्यून ( Costal dunes) असे म्हणत. वाळू आणि चिकणमाती (alluvina) ह्यांचे सहाय्याने ते उभारीत. त्यामुळे जो भाग संरक्षित केला जाई त्या भागाला एर्गज (Ergs) असे म्हणत. समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे कामे उभारणे हे अत्यंत गरजेचे होते.
आता मोठ्या प्रमाणावर अशी कामे करावयाची आणि ती किफायतशीर पध्दतीने करावयाची तर स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार्या वस्तूंचा जास्तीतजास्त वापर करणे हे अत्यंत गरजेचे होते. प्रदीर्घ संशोधनातून त्यांना टिल (Till) हे मटेरियल वापरण्याचे निश्चित केले. अभियांत्रिकी तपशीलात जावयाचे ठरविले तर टिल म्हणजे जाड वाळू किंवा लहान गोटे आणि चिकणमाती ह्यांचे ठराविक प्रमाणातले मिश्रण. पैकी जाड वाळू / गोटे हे समुद्रातच उपलब्ध होते.
मोठ्या प्रमाणावरचे हे पहिले काम 1926 - 27 मध्ये हाती घेण्यात आले. त्या संरक्षक भिंतीची लांबी ही 38 कि.मी होती. उथळ पाणथळ भागात चारही बाजूंनी अशी संरक्षक भिंत उभारावयाची हा त्या कामाचा पहिला भाग.
एकदा अशी भिंत बांधून झाली की मधल्या भागात जे पाणी कोंडले जाई ते उपसून बाहेर फेकणे हा त्या कामातला दुसरा भाग. मूळातच ह्या भागातला जमिनीचा तळ हा समुद्रसपाटीपेक्षा खाली असल्याने हे काम तसे कठीणच ! दोन दोन डिझेल इंजिने लावूनही ह्या पहिल्या कामातील पाणी उपसायला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. तरीही थोडे पाणी उरलेच.
मग छोट्या चार्या काढून त्यातून ते पाणी मोठ्या चारीला, मोठ्या चारीचे पाणी कालव्यात, कालव्याचे पाणी खोल विहिरीत आणि विहीरीचे पाणी उपसून बाहेर अशी व्यवस्था करण्यात आली. खालच्या तयार झालेल्या जमिनीवर आधी गवत लावले. गवतामुळे जमिनीतील माती मुळांनी एकत्र घट्ट बांधून ठेवली. मग गवत उपटून इतर प्रकारची लागवड / इतर प्रकारच्या जमिनीचा वापर सुरू झाला.
धरणवजा संरक्षक भिंतीची उंची समुद्रसपाटीपेक्षा 7.50 मी. एवढी जास्त ठेवलेली होती. तिला दोन्ही बाजूला 25 टक्के उतार देण्यात आला होता. बासाल्ट पध्दतीच्या दगडांचे पिचिंगकरून त्या धरणाच्या दोन्ही उतारांचे संरक्षण करण्यात आले होते. तर वरच्या बाजूला संरक्षणासाठी गवत लावले होते.
ह्या धरणवजा भिंतीची रूंदी 90 मी. इतकी होती. दोन्ही बाजूला टिल ह्या सहाय्याने बांधलेली भिंत आणि मध्ये वाळू भरणे अशा रीतीने ही 90 मि.रूंदी असलेली जमीन पायाजवळ तयार झाली होती. ह्या भिंतीच्या सहाय्याने किंवा भिंतींना संरक्षण म्हणून या फार तर पीटस् (Peats) ह्या संरक्षित वनस्पती क्षेत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. आपल्याकडे खारफुटी वनस्पती ह्याच प्रकारे किनार्याच्या प्रदेशाचे संरक्षण करीत असत. त्याहीपलीकडे जावून त्या वनस्पती कुजून तिथेच साठतात व त्याचा आपोआप एक संरक्षक तट तयार होतो. त्याची अनेक वेगवेगळी रूपे तिथे आढळतात. मुळात त्यांच्या भाषेतच ते लिहून ठेवतो. Wet land bags, moors, muskegs, pocosins, mires, stamp forest ही ह्या पीटस्ची विविध रूपे.
1926 - 27 मध्ये सुरू झालेल्या ह्या कामाला त्यानंतर गती आली. खालील तक्त्यात दिल्यानुसार ह्यातली मोठी कामे हातात घेण्यात आली. त्यातून सुमारे 1650 चौ.कि.मी जमीन ही नव्याने समुद्रातून बाहेर आली.तिचा उपयोग -
1. नागरी वस्तीसाठी - 1 ते 8 टक्के
2. पायाभूत सुविधांसाठी - 6 ते 9 टक्के
3.नैसर्गिक बागबगीचे व वनस्पतीजन्य लागवड -3 ते 8 टक्के
4. औद्योगिक -15 ते 25 टक्के असा करण्यात आला.
अशा प्रकारे सुमारे 60 ते 70 वर्षे (दुसर्या महायुध्दाचा काळ सोडून) ही कामे सुरू होती. ह्यातून समुद्राचे पाणी शिरून त्याचे जमिनीवरचे आक्रमण थोपविण्यात ह्या देशाला चांगले यश मिळाले. जगाला ह्या प्रकाराचा अभ्यास करता आला. एक जगातील सात आश्चर्ये ह्यामध्ये त्याचा समावेश झाला. जगभरातून हे पहायला येणारे प्रवासी पर्यटक हा देशातला एक महत्वाचा घटक ठरला.
ह्या झुईझेडी कामांना एकत्रितरित्या डेल्टावर्क (Delta work) अशा नावाने ओळखले जावू लागले. मोठमोठी जहाजे ह्या दोन पोल्टरमधल्या शांत समुद्रातून बंदरांपर्यंत ये जा करू लागली.
तापमानवाढ ही फार मोठी समस्या जगासमोर गेल्या 10 -15 वर्षात प्रकर्षाने उभी ठाकली आहे. म्हणजे सुरूवात बरीच आधी झाली पण त्याची सामान्य माणसाला माहिती मिळाली ती ह्या पंधरा वर्षातच.
तज्ज्ञ मंडळी म्हणतात, समुद्राची पातळी ह्या तापमानवाढीमुळे किमान 50 सें.मी तरी वाढेल. अशा वेळी तुफानी लाटांचा जेव्हा हल्ला होईल तेव्हा आताच्या संरक्षक भिंतीची उंची अपुरी पडू शकेल. त्यामुळे त्यांची उंची व रूंदी कशी आणि किती वाढवायची ह्यावर एक विचार तेथे आजपासूनच सुरू झाला आहे.
पर्यावरणप्रेमी मंडळी ह्या सगळ्या प्रकारांना कायमच विरोध करते. ही कामे निसर्गाच्या विरोधात आहेत असे म्हणते. त्यामुळेच वर लिहिलेला शेवटचा म्हणजे मेकरवॉर्ड पोल्डर हा शासनाला अपुरा ठेवावा लागला. शासनाने नंतर तेथे विद्युतनिर्मिती केंद्र व अपारंपारिक उर्जा निर्मिती केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यालाही प्रचंड विरोध झाला. शेवटी तो आहे त्या अपूर्ण अवस्थेतच सोडून द्यावा लागला.
विकास विरूध्द पर्यावरण किंवा उलटे म्हणूया पर्यावरण विरूध्द सुरक्षित व सुखी जीवनासाठी विकास ह्या दोन्ही विरूध्द पैलूंवर त्या त्या पक्षाचे लोक हिरीरीने आपापली हबाजू मांडतात. विरूध्द बाजूला टोकाचा विरोध करतात. सुखाचा मार्ग हा दोघांचे समन्वयातून आहे. दोघे खरे तर एकमेकांना विरोधी भूमिकेत नाहीतच. फक्त प्रथमदर्शनी ते विरूध्द आहेत असे भासते. माणसाला निसर्ग हवा, पर्यावरण हवे, त्याचे संरक्षण व्हायला हवे, विकासही झालाच पाहिजे. पण तो पर्यावरणाला सोबत घेऊनच. हा मंत्र काही प्रमाणात तरी हॉलंडने जपायचा प्रयत्न केला.
मला तो प्रयत्न भावला, मन भरून गेले, वाटले स्वत:च्या देशबांधवांसाठी काय काय करता येऊ शकते, हातात असलेली सत्ता कशी छान वापरता येते ह्याचा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे.
लेखात सुरूवातीला उल्लेखल्याप्रमाणे बांगलादेशात ह्याला समांतर अशी परिस्थिती आहे. तापमानवाढीने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर किमान 25 टक्के भाग जलमय होईल अशी भीती आहे. मालदीव पूर्णत: पाण्यात जावू शकते. मॉरीशसच्या किनारपट्टीचा काही कि.मी. रूंदीचा भाग पाण्यात जाईल. समुद्रकिनार्यावर असणार्या इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया आदी राष्ट्रांनाही हा धोका आहे. प्रचंड मोठी सागरी किनारपट्टी असलेला भारत हा ही ह्या भीतीपासून मुक्त नाही.
मात्र करत कुणीच नाही. काहीही करीत नाही. फक्त शब्दांचे फुलोरे फुलवितो. भीतीचा बागुलबुवा उभा करतो. सामान्य जनतेला घाबरवतो. बस्. इतकेच !
अशा ह्या विपरीत जागतिक परिस्थितीत हा छोटासा हॉलंड परिस्थितीशी झगडत राहिला आणि संकटावर त्यांनी मात केली ती वरील पध्दतीने. म्हणूनच त्याची यशोगाथा ही लिहायची - वाचायची - बघायची - सांगायची - अनुसरायची त्यांच्या यशात आपल्या उद्याच्या उज्वल यशाचे प्रतिबिंब बघायचे.
त्यापासून स्फूर्ती घेऊन कामाला लागायचे. जे त्यांना जमले ते आपल्याला का जमणार नाही ? जमणारच. फक्त तीव्र इच्छाशक्ती असो, प्रश्न सोडविण्याची वृत्ती हवी. अत्याधुनिक तंत्रज्ञान स्विकारण्याची मानसिक स्थिती हवी. बाकी सगळे आपोआप येईल.
रविंद्रनाथ एकदा म्हणाले होते - त्या उक्तीवर नंतर गालीबने शेरही लिहिली - हम तो अकेलेही निकल पडे थे अपनी सफर पर । लोग आते गये... कारवाँ बनता गया ॥
ह्या उज्वल यशाची पताका झळकवणार्या हॉलंडची ही यशोगाथा !
श्री. मुकुंद धाराशिवकर, धुळे - (दू : 02562 236987)