खानदेशातील अभिनव फड सिंचन पद्धत

Submitted by Hindi on Tue, 03/06/2018 - 17:50
Source
जलसंवाद, स्मरणिका, जानेवारी 2018

आपल्या पूर्वजांनी शोधलेली, आपसात सहकार्य वृध्दींगत करणारी, पाण्याचे योग्य व न्याय्य वाटप करणारी ही आदर्शवत फड पध्दत पुनर्जिवित करून ती टिकविण्यासाठी अर्थात आपले राष्ट्रहित जोपासण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.

खानदेशाला इतिहास नाही, पंरपरा नाही, संस्कृती नाही असे नकारात्मक म्हटले जाते. पण येथील ऐतिहासिक संदर्भ पाहिल्यावर असे लक्षात येते की, महाराष्ट्रात खानदेशला स्वतंत्र अशी संस्कृती असून त्या संस्कृतीला हजार वर्षांची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. इतिहासाच्या विविध कालखंडातील पाऊलखुणा आजही ताठ मानेने इतिहासाची साक्ष देत संशोधकांना खुणवित आहेत.

महाराष्ट्रात खानदेशला एक वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा अभ्यास केल्यास तिला जलसंस्कृती म्हटल्यास वावगे होणार नाही. खानदेश हा प्रदेश तापी, नर्मदा या दोन नद्यांच्या खोर्‍यात वसला आहे. तसेच हिमालयापेक्षाही जुना सातपुडा पर्वत ह्याच भूमीत आहे. या भौगोलिकतेमुळे या प्रदेशात मानवी वस्ती व प्रथम शेतकर्‍यांच्या वसाहती वसल्यात असे पुरातत्वीय संशोधनाने सिध्द झाले आहे.

भारतातील ऐतिहासिक काळातील जल व्यवस्थेची जीर्ण व्यवस्था आजही दिसून येते. या जलव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याची गरज आहे. जल व संस्कृतीचे अतूट नाते आहे. भारतीय संस्कृतीशी पाण्याचे महत्व हे पारंपारिक स्वरूपाचे आहे. भारताच्या जलसंस्कृतीची बलस्थाने ब्रिटीशांनी हेतू पुरस्कर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तरीही लोक जागृतीमुळे हे जल व्यवस्थापनाचे तंत्र टिकून राहिले.

जल संवर्धनासाठी परंपरेनुसार जल व्यवस्थापनाचे पुरातन तत्व आजही उपयुक्त आहे. काळाच्या ओघानुसार जल संवर्धनाचे कार्य विकसित व्हायला पाहिजे त्यानुसार ते झाले नाही. या विकसित तंत्रज्ञानाची जोपासना होणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीत पाण्याच्या उपलब्धीनुसारच सणांची, उत्सवांची रचना केलेली आहे. तसेच देवीदेवताही निर्माण केल्या आहेत. संस्कृतीशी पाण्याचे असलेले नाते टिकविण्यासाठी पाण्याचे महत्व सर्वांनी ओळखण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात प्राचीन कालापासून पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर, तलाव, कालवे, पाट याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न त्यावेळच्या लोकांनी केलेले दिसतात. महाराष्ट्रात प्राचीन काळात ज्या सिंचनाच्या पध्दती अस्तित्वात होत्या, त्यापैकी खानदेशात तापी खोर्‍यातील उपनद्यांवर जी अभिनव जलसिंचन पध्दत (फड) ही आजही अस्तित्वात आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवाही सिंचन पध्दत आजही हजारो वर्षापासून आपले अस्तित्व टिकवून आजच्या या विज्ञान युगातील स्वार्थी माणसास आजही एकतेचा, एकोप्याचा व सहजीवनातून समृध्दीचा संदेश देत आहे.

एखाद्या प्रदेशाच्या वस्तीच्या निर्मितीवर व वितरणावर पाण्याची उपलब्धता हा घटक फार महत्वाचा ठरतो. खानदेशातील एकूण ग्राम नामापैकी सुमारे ५२ टक्के ग्रामनामे नैसर्गिक परिस्थितीशी तर बाकीची ४८ टक्के ग्रामनामे सांस्कृतिक घटकांशी निगडीत आहेत. यात पाण्याशी संबंधित असलेल्या ग्रामनामांचे प्रमाण जास्त आढळते. खानदेशातील एकूण ग्रामनामांपैकी सुमारे १३ टक्के च्यावर गावांची नावे पाण्याशी संबंधित आहेत. उदा - पाणी - अंबापाणी, गेरूपाणी, भांगरापाणी, मोगरापाणी इ. विहीरी - अलविहीर, दगडीविहीर, खोलविहीर, वाण्याविहीर, धवळीविहीर इ. कुवा - अक्‍लकुवा, मालकुवा, अमलकुवा, बोरीकुवा, इ. तळे- निमतळे, जामतळे, खडकतळे, तळेगाव, इ. कुंड - बोरकुंड, बेडाकुंड, माकडकुंड इ.

तसेच पाण्याशी सबंधित असलेल्या ग्रामनामांच्या अंत्यपदात नेर (नीर) = पाणी आणि उपपदात जले हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आलेले आहे. थाळनेर, अमळनेर, पिंपळनेर, नेर तर काही ग्रामनामांचा वाहणार्‍या प्रवाहांशी संबंध तर काही झर्‍यांशी संबंधित आहे. या ग्रामनामांचा अभ्यास केल्यावर असे दिसते की, खानदेशच्या संस्कृतीला जल संस्कृती असे संबोधले गेले.

खानदेशातील पांझरा खोरे हे दख्ख्नच्या पाठारावरील अति उत्तरेकडील अथवा वायव्येकडील पांझरा नदी पूर्व वाहिनी. दख्खनचे पठार हे लाव्हा रसापासून निर्माण झाले. साधारणपणे ६४ ते ६५ दशलक्ष वर्षापूर्वी लाव्हा रस हजारो चौरस कि.मी क्षेत्रात पसरून त्यापासून बेसाल्ट खडकाचे थर तयार झाले. दख्खनचे पठार अशा लाव्हारस महापूर प्रक्रियेतून तयार झाले, असे मत नासाचे शास्त्रज्ञ डॉ. मिखाईल रामपियो (१९९०) यांनी मांडले. भूशास्त्राच्या अनुमानानुसार दहा लाख वर्षापूर्वी पांझरा नदी निर्माण झाली असावी, असा अंदाज आहे.

इंडियन आर्किअ‍ॅलॉजी - ए रिव्ह्यू या यादीवरून खानदेशातील अनेक गावे हजारो वर्षापासून अतिप्राचीन वैभव संपन्न इतिहास आपल्या उदरात गडप करून तो उकलण्यासाठी संशोधकांची वाट पहात आहे.

साक्री तालुक्यातील प्राचीन गावे :


१. अश्मयुगीन स्थळे (इ.स. पूर्व १ लाख ते ३० हजार वर्षे) किरवाडे, भोनगाव, भाडणे, भामेर, साक्री, दातरती, धवळविहीर इ.
२. मध्ययुगीन अश्मयुगीन स्थळे : कासारे, गणेशपूर, खोरी, घोडदे, छडवेल, टिटाणे, नवडणे, मालपूर, म्हसदी, वसमार, शेणपूर, शेवगे.
३. उत्तर अश्मयुगीन स्थळे - आष्टाणे, आमखेल, इंदवे, धनेर, नवडणे, ब्राम्हणवेल, वासखेडी.
४. ताम्रपाषाणयुगीन स्थळे - (इ.स.पूर्वी ४ हजार २७०० वर्षे) उभंड, चिंचखेडे, छडवेल, जैताणे, दुसाणे, भाडणे, धाडणे, रूणबळी, साक्री.

वरील गावांचा वैभवशाली इतिहास उत्खनन करून प्राचीन संस्कृतीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकता येईल.

तापी खोर्‍यात त्या काळात ज्या वसाहती झाल्यात, त्याची कारणे खालीलप्रमाणे -

१. खानदेशात तापी खोर्‍याची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना.
२. उत्तर व दक्षिण भारताच्या मधोमध असल्याने प्रारंभीपासून मानवी स्थलांतर.
३. व्यापारास उपयुक्त.
४. योग्य पाऊस, तापी व उपनद्या (पांझरा, कान, बुराई, गिरणा) या बारमाही वाहणार्‍या नद्या इत्यादींमुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी तापी खोर्‍यात उदयास आले. साक्री तालुक्यात पांझरा कान खोर्‍यात मोठ्या प्रमाणात वरील गावांना वसाहती निर्माण झाल्या आहेत.

ताम्रपाषाण युगी समाज रचनेची व संस्कृतीची साक्री जवळील कावठे गावी डेक्कन कॉलेजने केलेल्या सन १९८४ आयत उत्खनाने येथील आद्य शेतकर्‍यांच्या जीवन संस्कृतीवर प्रकाश पडला. कावठे येथील वसाहत तीस हेक्टर भूभागात पसरली होती. साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथे (इ.स.पूर्व १४०० ते १०००) या कालखंडातील जोर्वे संस्कृती उत्खननात मातीची भांडी व तांब्याचा भाला सापडला. यावरून येथे समृध्द वैभवशाली संस्कृती नांदत होती याचा हा पुरावा मिळतो.

पांझरा कान खोर्‍यातील अभिनव जलसिंचन (फड पध्दत) :


खानदेशातील पांझरा नदीचा उगम शेंदवडच्या डोंगरातून होतो. तो प्रदेश समुद्र सपाटीपासून चार हजार फुटापेक्षा जास्त उंच आहे. तिचे उगमस्थान २०.५१ उत्तर अक्षांस व ७३.५५ पूर्व रेखांश या दरम्यान आहे. पांझरा नदी पूर्वेकडे ९९ कि.मी वाहत जाते. पिंपळनेरच्या पुढे जामखेली व पुढे साक्रीजवळ कान नदी तिला येवून मिळते. धुळ्याच्या पूर्वेला तिला काटकोन वळण मिळते व ती तापीला मुडावद गावाजवळ मिळेपर्यंत तिचा प्रवाह दक्षिण - उत्तर असा होतो. साक्री तालुक्यात नदीचे १३८ कि.मी लांबीचे खोरे ३२५७ चौ.कि.मी असून ते पाणी शेतीसाठी वापरण्याकरिता २ ते ५ मीटर उंचीचे दगडी बंधारे बांधून त्यावर फड पध्दतीने शेतीस पाणी पुरवठा आजतायागत केला जातो. या फड पध्दतीचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे.

शेंदवड डोंगरातील एका कपारीतून उगम पावलेल्या पांझरा नदीने साक्री तालुक्याचा सामाजिक, आर्थिक कायापालट केला आहे. या नदीकाठीच प्राचीन संस्कृती उदयास आली.

फड पद्दतीचे ऐतिहासिक संदर्भ :


थळकरी हा शब्द मनुस्मृतीत आढळतो. हल्ली थळकरी हा शब्द थळात जमीन असणार्‍यांसाठी वापरतात. यामुळे ही फड पध्दत मनुस्मृती काळापासून अस्तित्वात असावी असेही म्हटले जाते.

सिंधू संस्कृतीच्या काळापासून बंधार्‍यांची परंपरा आहे. जोर्वे संस्कृतीच्या काळातही बंधारे बांधल्याची माहिती मिळते. प्राचीनकाळी खानदेशला ऋषिक म्हणत. त्यास स्वामीकृष्ण, कृष्णाचा देश, कन्ह देश, खानदेश असे नाव पडले असावे. ही फड पध्दत त्या काळातील लोकांनी सुरू केली असण्याची शक्यता आहे. पुढे खानदेशात मौर्यांची सत्ता आली. मौर्यांनीही सिंचनाची कामे व त्यांची दुरूस्ती करण्याकरिता स्वतंत्र शेतकी खाते निर्माण केले होते. त्या काळात कालवे, तलाव यासारख्या सिंचन पध्दती सरकारी प्रयत्नातून, लोक सहभागातून निर्माण होत. व त्याचा सहकारी तत्वावरच सिंचनासाठी वापर केला जात असे. या सिंचन पध्दतीत (फड) असाच सहकाराच्या पध्दतीचा अवलंब होतो, त्यामुळे ही पध्दत मौर्यकालीन असण्याची शक्यता वाटते.

सुमारे एक हजार वर्षापूर्वी यादवांची सत्ता आली. सेऊणचंद्र हा यादवांचा प्रारंभीचा राजा. त्याच्या नावावरूनच या भागाला नाव पडले. सेऊणदेश व पुढे कालौघात, त्याचे रूपांतर खानदेशात झाले असावे. यादव राजांनीही बंधारे सिंचनास प्रोत्साहन दिले. फड पध्दत त्यांच्या काळापासून अस्तित्वात असल्याची जास्त शक्यता वाटते.

फरिश्ता :


सन १२९६ मुस्लिम सुलतानशाहीने खानदेशचा प्रदेश जिंकला. या जिंकलेल्या खानदेशच्या अधिपतींचा उल्लेख त्याने आपल्या लिखाणात केला होता. फड पध्दत ही या खानदेशची पध्दत म्हणून ओळखली जात असल्याने तिचा संबंध मुस्लिम सत्तांशी नसून यादव किंवा त्यापूर्वीच्या शासकांशी असल्याची दाट शक्यता आहे.

सन १३९६ ते १४०७ च्या दुर्गादेवीच्या दुष्काळाची झळ खानदेशलाही बसली. यातून मार्ग काढण्यासाठी मलिक राजा फरूकीने शेती उत्पादन वाढवण्यासाठी भर दिला. व शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्यात. अबुल फझल म्हणतो, मलिक राजाच्या कार्यक्षम व दक्षतापूर्वक व्यवस्थापनामुळे ओसाड बनलेल्या परदेशात लोकवस्ती वसवून पडीक जमीन लागवडीखाली आणता आली. आदिल खान फारूकी - दुसरा यानेही शेती व कालव्यास प्रोत्साहन दिले. यामुळे फरूखींच्या अगोदर खानदेशात फड पध्दत अस्तित्वात होती.

परदेशी प्रवाशांचे प्रवास वृत्तांत :


प्राचीन काळापासून उत्तर व पश्‍चिमेकडे जाणारे सार्थवाह पथ (महामार्ग) खानदेशातून जात, तेव्हापासून या प्रदेशाचे व्यापारी, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक महत्व वाढीस लागले. इब्नबतुता हा अफ्रिकन प्रवासी सन १३४२ - ४३ च्या सुमारास खानदेशातून गेला. हा अतिशय संपन्न प्रदेश आहे, असे त्याने प्रवासात लिहून ठेवले आहे. राल्फ फिच १५८७ व न्यूबेरी १६०१ च्या दरम्यान खानदेशातून गेले. हा संपन्न प्रदेश असून तांदळाचे पिक मोठ्या प्रमाणात होते. १६०१ मध्ये सलबॅक हा साक्री, निजामपूर भागातून गेला. तर हटकीन्स हा १६०९ सुरत हून बर्‍हाणपूरला जाताना साक्री तालुक्यातून गेला. हा संपन्न प्रदेश असून उसाच्या गुर्‍हाळांची त्याने नोंद केली आहे. टॉमसरो, मार्टीन, मॉरिस यांनीही येथील संपन्नतेची नोंद केली आहे. या काळात या प्रदेशात सिंचन पध्दती असल्याचा उल्लेख केला आहे.

थेवोनो हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात सुरत हून औरंगाबादला जातांना नवापूर, कोडाईबारी, हदिवेल, सामोडे, पिंपळनेर मार्गे गेला. तो म्हणतो, हा संपन्न प्रदेश असून येथे आमराया भरपूर आहेत. उत्तम प्रतीचा सुवासिक तांदुळ (कमोद) भारतातील सर्वोत्कृष्ट आहे असे त्याने नमूद केले आहे. ऊसाचे मळे व गुर्‍हाळांचा उल्लेख केला आहे. भात व ऊस ही येथील फड पध्दतीतील महत्वाची पिके होत. त्यामुळे या सर्वच प्रवाशांच्या वर्णनावरून असा निष्कर्ष काढता येतो की, खानदेशात फड पध्दत आधीच अस्तित्वात होती.

मोगल कालखंडातील इतिहासकार फरिश्ता, अबुल फझल यांच्या लिखाणातही पाणी पुरवठ्यासंबंधीचा उल्लेख मिळतो.

लोकहितवादींच्या पत्र नं. १५० व १७५ नंबरच्या पत्रात थळ पध्दतीचा उल्लेख येतो. ते म्हणतात की वेगवेगळ्या गावी थळे असतात. त्या थळ्यांची नावे गावांच्या नावाप्रमाणे विलक्षण असतात. उदा. म्हसाबाचे फड, पळसाचे फड, ऐडबाईचा फड इ. यावरून असा निष्कर्ष निघतो की, गावांच्या अस्तित्वाबरोबरच थळे अस्तित्वात आली असावीत. हा इतिहास पहात असताना खानदेशातील ही पध्दत प्राचीन काळापासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे.

खानदेशातील दगडी बंधार्‍यांची माहिती चौदाव्या शतकापासून मिळते. त्या अगोदर वाळूचे कच्चे बंधारे असावेत. त्यांच्या सहाय्याने थळांना पाणी दिले जात असावे.

नदीकाठच्या गावी बंधारे असल्याचा उल्लेख शिवकाळातही आढळतो. त्या काळात पाटस्थळ जमिनीसाठी एकरी दहा रूपये असा सारा आकारला जाई.

सन १८१८ मध्ये इंग्रजांनी खानदेश ताब्यात घेल्यानंतर येथील पहिले कलेक्टर जॉन ब्रीग्स यांनी शेतीला पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यांची पहाणी केली असता त्यांना १८७ बंधारे असल्याचे आढळले. पण आज दुर्दैवाने ती यादी उपलब्ध नाही. सन १८१९ मध्ये १८७ बंधार्‍यांपैकी फक्त ४० बंधारे सुस्थितीत होते, अशी माहिती डेक्कन कमिशन रिपोर्ट व ब्रिटीशांच्या खानदेश गॅझेटिअरमध्ये मिळते. खानदेशात त्या काळात काम करणार्‍या स्टुअर्ट गार्डन या अधिकार्‍याने आपल्या लिखाणात पाटस्थळ बागायत म्हणजे नदीवरील लहानशा बंधार्‍याच्या सहाय्याने पाणी अडवून बागायत केली जाणारी जमीन होय, असा उल्लेख केला आहे.

फड पध्दतीचा अर्थ :


नदी ते पार यातील सिंचनास योग्य अशा जमिनीला थळ म्हणतात. त्याचे तीन चार भाग पाडलेले असतात. त्या प्रत्येक भागास फड असे म्हणतात. त्यांना प्रत्येक गावी वेगवेगळी नावे असत. प्रत्येक फड सारख्या आकाराचा नसे. थळात तीन किंवा चार फड असत. एकात ऊस, दुसर्‍यात भात, तिसर्‍यात गहू अशी पिके घेतली जात. एकाच वेळी एका फडात एकच पीक घेत. या पध्दतीचे वैशिष्ट्य असे की, फडातील पिकांची पेरणी, कापणी एकाच वेळी करत. पाणी वाटपासाठी पाटकरी हा स्वतंत्र कर्मचारी असे. त्यामुळे शिस्तबध्द व सामंजस्याने सर्व क्षेत्राला पाणी ठरल्याप्रमाणे दिले जाई. ही पाणी वाटपाची आदर्श पध्दत होती.

पाटस्थळातील कर्मचारी :


पाटकरी - प्रत्येक फडास पाण्याचे वाटप, पाटचारीवर लक्ष देणे ही कामे त्याची होती.
बारेकरी - फडामागे दोन बारेकरी असत. रोज प्रत्येक फडाच्या तुकड्यास पाणी भरणे तसेच पिकाचे रक्षण करणे हे काम तो करी.
हवालदार - नदीवरील बंधार्‍यांपासून पाणी वाटप चार्‍यांपर्यंत तो पाणी योग्यरितीने जाते की नाही ते पहात असे. प्रत्येक तुकड्यास पाणी मिळते की नाही ते पाहणे संपूर्ण फड भरल्याची खात्री करणे इ. पंच व अन्य कर्मचार्‍यातील दुवा म्हणूनही कामे हवालदारास करावी लागत.

या कामाच्या मोबदल्यात वरील कर्मचार्‍यांना धान्याचा भारा किंवा पैसे मिळत असत.

या सर्व पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावातील पंच मंडळ असे. या पंच मंडळातील प्रमुख व त्याचे सहकारी पाण्याचे योग्य पध्दतीने आयोजन, नियोजन होते की नाही ते पहात. कोणत्या फडात कोणते पिक घ्यावे हे ते गावसभेत ठरवत असत. पंच मंडळ हे गाव निवडत असे. गुढीपाडवा किंवा अक्षय तृतीया सारख्या मुहूर्तावर सभा दवंडी देवून बोलवत. व त्यावर पीकनिहाय चर्चा होई. या पंच मंडळांना कामाचा मोबदला दिला जात नसे. पिक लावणी, निंदणी केव्हा करायची हे पंच ठरवून देत. तसेच पाटसफाई (चारी) केव्हा करायची यावरही चर्चा होई. व प्रत्येक भागधारक आपले औत पाठवून त्या पाटचारीची निगा ठेवत असे.

या फड पध्दतीत जिरेमाळी समाजाचे स्थान महत्वपूर्ण आहे. पांझरा खोर्‍यात सुमारे सोळा बंधारे बांधल्याचे त्यांच्या वंशावळी व त्यांच्या अभिलेखातील नोंदीवरून दिसते. श्री. जेबा सावंत घरटेे यांनी सामोडा व दाडणे येथे दोन फड सन १५३९ मध्ये बांधले. औरंजेबास दोन रांझण्यात (मोहरा) पाठ़िवल्याचा उल्लेखही मिळतो. बंधारे बांधल्यामुळे गावची पाटीलकीही देण्यात येई. धुळे येथील बंधारा संतू पाटील भोगे यांनी बांधला. त्यास १८ हजार २५० मोहरा खर्च आला. त्याबदल्यात त्यांना गावची पाटीलकी देण्यात आली. कोकल्याचा बंधारा सावजी कोकले यांनी २५ हजार मोहरा खर्च करून बांधला. या कामासाठी त्यांना पैठणकरांनी दहा पडतन जमीन इनाम दिली. दुसाणे येथील बंधारा अकराव्या शतकात बांधला गेल्याचे सांगितले जाते. कावठे, पाणखेडा, वार, नेर येथील बंधारे जिरेमाळी समाजाने बांधले.

ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत पाण्यासंबंधी व त्यांच्या नियोजनाबद्दल कोणत्या समाजाने काय करावे, हे सांगितले आहे. ते पुढील अभंगात म्हणतात,
माळीये जेवू ते नेले । तेवू ते निवांतचे केले ।
तया पाणीया ऐसे केले । होवावे गा ।

अर्थ - पाणी हे माळी वाट दाखवेल त्याप्रमाणे संचार करीत असते. ते माळ्याला विरोध करीत नसते. त्या ठिकाणी माळी हा समाजदर्शक शब्द अतिशय महत्वाचा आहे. कारण सिंचन क्षेत्रात माळी समाजाचे योगदान मौलिक आहे. खानदेशात सिंचन (फड) पध्दतीत जिरेमाळी समाजाचे कार्य वर उल्लेखल्याप्रमाणे मोठे आहे. पंधराव्या शतकापासूनच्या संदर्भ साधानावरून फड उभारणी व विस्तारण्यात त्यांचे कार्य मोलाचे होते हे प्रकर्षाने जाणवते. त्यांना लाभक्षेत्राच्या मर्यादा, जमिनीचे पोत, त्यावर कोणते पिक घ्यावे समजू शकते. माळ्यांच्या विहीरीतील पाणी कधीच आटत नाही असे म्हणतात.

खानदेशातील जिरेमाळी समाजाने ज्ञानेश्‍वरांनी सांगितलेल्या अभंगाचे महत्व ओळखून या अभिनव फड सिंचन पध्दतीत मोलाचे योगदान दिले, हे त्यावेळच्या कागदपत्रांवरून व त्यांच्या जवळील वंशावळीवरून दिसून येते.

नदीवरील बंधार्‍यांचे काम :


नदीवरील पक्के बंधारे दगड, चुन्याच्या मिश्रणाने बांधले असून त्या चुन्यात वाळूबरोबर शंख, कात, कवड्या, बेलफळ, डिंक, गुळ, ताग व घायपाताचे तंतू याचा वापर करून बांधकाम करीत. प्राचीन काळापासून अत्यंत योग्य पध्दतीने गावातील मंडळी अनुभवी व कर्तबगार पंच मंडळ त्यावर नियंत्रण ठेवते असे.

फड पध्दतीचे फायदे :


१. पाण्याची गरज लक्षात घेवून पाणी वाटप
२. सर्व जमीनीस सारखे पाणी मिळे. त्यामुळे पाणी वाया जात नसे.
३. पिकांच्या क्रम पध्दतीने जमीनीस विश्रांती मिळे. ही पध्दत शेकडो वर्षापासून चालू असूनही येथील जमीन कधीही खराब किंवा क्षारयुक्त झाली नाही.
४. सर्व शेतकर्‍यांचे हितसंबंध एकच असत. त्यामुळे पाण्याचा अवास्तव व अनधिकृत वापर होत नसे. सर्वांना समान पाणी वाटप केले जाई.
५. फड पध्दतीमुळे गावात एकोपा व सहकार्य वाढीस लागे.
६. नदीतील वाहते पाणी सहकारी तत्वावर वाटण्याची ही आदर्श पध्दत होती, थळकरी कुटुंबाच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने ती महत्वपूर्ण होती.
७. यात पाणी वाटप, पिक राखणे हे फड कर्मचारीच करत. त्यामुळे वृध्द, विधवा, नोकरी करणारे यांना उत्पन्नाची निश्‍चिती होती.
८. वृक्ष संवर्धन - पाटचारीत नेहमी पाणी असल्यामुळे चारीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत गावकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले. वीस - पंचवीस वर्षापूर्वी अनेक गावांना आमराया होत्या. या आमरायाच्या उल्लेख थेवेनो व ट्रव्हेनियर या परकीय प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनात केलेला आहे. पण दुर्दैवाने आज त्या नष्ट झाल्या आहेत.
९. रोजगार निर्मिती : पाटचारीत व बांधाच्या बाजूस सतत पाणी असल्याने गवत उगवत असे. त्या गावातील मोलमजुरी करणारे पंधरा - वीस जण गवत कापून ते विकत व आपला चरितार्थ चालवत.
१०. दुधदूभत्यात वाढ : जनावरांना रोज हिरवा चारा मिळाल्याने त्या त्या खेड्यात मोठ्या प्रमाणात जनावरांना (थेंड्या, मेंढ्या, गाई - म्हशी) यांना हिरवा चारा मिळे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधाच्या उत्पन्नात वाढ झाली. तसेच जनावरांच्या विष्ठेने (शेण) शेतास जैविक खत मिळाल्यामुळे जमिनीचा पोत वाढून उत्पादन वाढले. अशा प्रकारचे विविध फायदे या पध्दतीने कमी खर्चात व योग्य नियोजनामुळे समाजाला मिळाले. यामुळे या भागातील आर्थिक स्थिती मजबूत झाल्याचे व शिक्षणाचे प्रमाण वाढल्याचे इंग्रज सरकारच्या अहवालात नमूद केलेले दिसते.

धुळ्यात वास्तव्यास असलेल्या (सन १९८४) भारत रत्न सर विश्‍वैश्‍वरय्या यांची नेमणूक प्रथम धुळे जिल्ह्यात झाली. त्यावेळेस त्यांना या अभिनव जलसिंचन पध्दतीतील योग्य व सुसूत्र पाणी वाटप पध्दतीने मोहून टाकले. पुढे ते म्हैसूरचे दिवाण झाल्यानंतर त्यांनी या फड पध्दतीचा आदर्श समोर ठेवून म्हैसूर संस्थानात ३६ हजार बंधारे बांधले. हे या फड पध्दतीच्या नियोजनाचे मोठे यशच म्हटले पाहिजे.

आपल्या पूर्वजांनी शोधलेली, आपसात सहकार्य वृध्दींगत करणारी, पाण्याचे योग्य व न्याय्य वाटप करणारी ही आदर्शवत फड पध्दत पुनर्जिवित करून ती टिकविण्यासाठी अर्थात आपले राष्ट्रहित जोपासण्यासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.

जागतिक वारसा :


खानदेशातील अभिनव जलसिंचन पध्दतीचा सर्वदृष्टीने अभ्यास केला असता या पध्दतीला जागतिक वारसा मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच त्यास हा वारसा प्राप्त होईल, असे एक अभ्यासक म्हणून माझे मत आहे.

ही अभिनव जलसिंचन पध्दत जागतिक स्तरावर अतिशय अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडण्याचे काम जागतिक जलतज्ज्ञ मा. डॉ. माधवराव चितळे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

या पध्दतीचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर अभ्यास सुरू झाला आहे. सन १९८४ मध्ये अमेरिकेतील फोर्ट कॉलिन्स येथे सिंचन व पाण्याचा निचरा या संबंधी बाराव्या आंतराष्ट्रीय परिषदेत भारतातील तज्ज्ञांनी आपला प्रबंध सादर केला. तसेच सन १९९१ ला जल आयोग व पाटबंधारे खाते महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या मार्फत धुळे, पिंपळनेर, साक्री येथे फड सिंचन पध्दतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच विविध प्रचार माध्यमातून तज्ज्ञांनी वैचारिक मंथन सुरू केले. यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. फक्त इतिहासाचे गोडवे गावून चालणार नाही. नवीन तंत्रज्ञानाची जोड देवून या प्राचीन काळापासून आपल्या दूरदर्शी वारसांनी व प्रशासकांनी ही आदर्श सिंचन पध्दती राबविली. या आदर्श वारश्याचे संवर्धन होवून ती कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सवार्ंनी करावेत.

या अभिनव सिंचन फड पध्दतीला जागतिक वारसा मिळवण्यासाठी सर्व खानदेश वासियांंनी प्रयत्न करणे जरूरीचे आहे. अशाच प्रकारच्या जलसंधारणाच्या पध्दतीला चीन व इराण या देशांनी जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळविली. हा आदर्श आपण समोर ठेवून ज्या पध्दतीने जगाला सिंचनाच्या नियोजनाचा आदर्श घालून दिला व जगाला पाण्याचे आयोजन, नियोजन, संयोजन शिकविले त्या फड पध्दतीला जागतिक वारसा मिळविण्यासाठी ज्या प्रमुख तरतुदी तसेच त्यास लागणारे सर्व ऐतिहासिक प्रशासकीय संदर्भ उपलब्ध करून आपणा सवार्ंची दुर्दम्य इच्छाशक्ती सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन, यंत्रणा व सर्वसामान्यांच्या प्रतिसादाशिवाय ते साध्य होणार नाही. ते साध्य करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर ते शक्य होईल, अशी आशा मी बाळगतो. या जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही संकल्पना सर्व खानदेश वासियांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे, धुळे - मो. ९४२३९७९३६६