Source
जल संवाद
जलसंधारणाच्या तंत्राधारित प्रणालीच्या माध्यमातून भूपृष्ठाखाली थेंब थेंब पाणी पेरण्याच्या रचनात्मक प्रयत्नांस आता 'शिरपूर पॅटर्न' असे नामाभिधान लाभले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातीलच काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना अवघा 600 मिलीमीटर पर्जन्यमान झालेल्या शिरपूर तालुक्यात कुठेही दुष्काळाच्या खुणा दिसत नाही.
'बागायतदार शेतकरी' आणि 'कोरडवाहू शेतकरी' या जणू आधुनिक वर्ण व्यवस्थाच. प्राचीन चातुर्वर्ण्य संरचनेत जन्माधारित जातीव्यवस्थेची उतरंड होती. त्या व्यवस्थेतील कथित दाहकतेमुळे कुणी आपली जीवनयात्रा संपविली असे घडले नाही. तथापि आधुनिक व्यवस्थेतील या भेदाभेदांची होरपळ अधिक जीवघेणी ठरते आहे. कोरडवाहू क्षेत्रातील नापिकी शेतकऱ्यांच्या जगण्यावर घाला घालणारी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर कुणी 'कोरडवाहू क्षेत्र' हा शब्दच नष्ट करण्यासाठी तन, मन आणि धन अर्पित करून अहोरात्र झटत असेल, प्रत्येक गावात बारमाही बागायत होण्याचं स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी अहर्निश प्रयत्न करीत असेल तर ईडा, पीडा टळून बळीराजाचे राज्य स्थापन होणे अशक्यकोटीतील बाब नाही, अशी ग्वाही मिळते. राज्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी मध्यप्रदेश सीमेलगत शिरपूर तालुका आहे. या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून असे प्रयत्न सुरू आहेत.जलसंधारणाच्या तंत्राधारित प्रणालीच्या माध्यमातून भूपृष्ठाखाली थेंब थेंब पाणी पेरण्याच्या रचनात्मक प्रयत्नांस आता 'शिरपूर पॅटर्न' असे नामाभिधान लाभले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातीलच काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढलेली असताना अवघा 600 मिलीमीटर पर्जन्यमान झालेल्या शिरपूर तालुक्यात कुठेही दुष्काळाच्या खुणा दिसत नाही. शिरपूर परिसरात हिंडतांना ठिकठिकाणी दिसणारे जलसाठे आणि हिरवी शेती पाहून कुठे आहे दुष्काळ ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. भूगर्भाखाली जलसाठे वाढल्यामुळे यंदाच्या अत्यल्प पावसातही भाजीपाला लागवड क्षेत्रात तिप्पटीने वाढ झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसते.
तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या शिरपूर तालुक्याचे नाव आज जलसंधारणाच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. राज्यातील बहुतेक राजकीय नेते सहकार सम्राट आहेत. शिक्षणमहर्षी देखील आहेत. यापैकी 'जलसाक्षर' राजकारणी किती हा खरा प्रश्न आहे. 'जलसंधारण', 'जलपुनर्भरण,' ' शेततळे' ही काही भरमसाठ डोनेशन मिळवून देणारी चलनी नाणी नाहीत याची जाणीव चाणाक्ष राजकारण्यांना आहे. तथापि शिरपूरच्या आमदार अमरिशभाई पटेल यांचे व्हिजन जरा वेगळे आहे. शिरपूरचे नगराध्यक्ष ते राज्याचे शिक्षणमंत्री असा राजकीय प्रवास लाभलेल्या अमरिशभाई पटेल यांचे निवडून येण्याचे मुख्य भांडवल 'विकास' हेच राहिले आहे. वास्तविक शिरपूर हा आदिवासीबहुल तालुका. शिरपूर शहर देखील संमिश्र लोकवस्तीचे शहर. या शहरात गुजराथी पटेल समाजाचे स्वत:चे एकमेव घर असलेल्या आमदार पटेल यांची स्थानिक राजकारणावर अजूनही घट्ट पकड आहे.
विकासाची आस असलेल्या मतदारांना जातीपातीचं राजकारण मंजूर नाही हे शिरपूरकरांनी वारंवार सिध्द केलेलं. तापीकाठावर वसलेला शिरपूर तालुका उत्तर महाराष्ट्रातील एक समृध्द तालुका म्हणून ओळखला जातो. धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री आणि शिंदखेडा या तीन कायम अवर्षणप्रवण तालुक्यांपेक्षा शिरपूर तालुक्यात पर्जन्यमान तुलनेने चांगले. उर्वरित तीन तालुक्यांत कमी पावसाचा परिणाम शेतीवर, शेतातील अल्प उत्पन्नावर आणि जनजीवनावर झालेला. पर्यायाने जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या समस्यांसाठी निविदा देणाऱ्यांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक चेहरे दिसतात ते साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील. शिरपूरमध्ये तापी, अनेर आणि अरूणावतीचे विपुल पाणी उपलब्ध आहे. तेथील मेहनती शेतकरी काळ्या आईच्या सेवेत सतत मग्न. त्यामुळे अन्य तालुक्यातील गावढेकरी, काडेचिराईत मंडळींप्रमाणे शिरपूरकर सहसा मोर्चा किंवा चमको आंदोलनात कुठे उंडारतांना दिसत नाहीत. 'कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या' अशा स्वरूपाच्या प्रसिध्द झालेल्या बातम्या बहुतांश धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्याशी संबंधित असतात. 'खाई खाई खत केलं अन् कर्जात शेत गेलं' अशा शेतकऱ्यांच्या पंक्तीत शिरपूरचे शेतकरी बसत नव्हते.
दुष्काळ मुक्तीसाठी आमदार अमरिशभाई पटेलांचा धोरणात्मक निर्णय
कालौघात जलपिपासू ऊस लागवडीचा अतिरेक मूळावर उठला. विजेचे पंप आल्यानंतर पाण्याचा उपसा वाढला. जमिनीतून पाणी उपसण्याचा वेग प्रचंड, त्या तुलनेत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी. तापी काठावरील वैशिष्ट्यपूर्ण भूस्तर रचना वेगाने पाणी झिरपण्यास प्रतिबंध करणारी. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावत चाललेली. शंभर फूटांपर्यंत खोदलेल्या विहीरींनी देखील 'राम' म्हंटले. नंतर मंडळींनी उपशासाठी ठिकठिकाणी कूपनलिका खोदल्या. त्यांची खोलीसुध्दा 800 फुटांपर्यंत गेली. जमिनीची चाळणी करण्याची अहमहमिका सुरू झाली. त्याही आटू लागल्या तेव्हा आमदार अमरिशभाई पटेल यांना भविष्यातील संकटाची चाहूल लागली. हा विषय केवळ चिंतनाचा नसून प्रत्यक्ष कृती करण्याचा आहे ती देखील तातडीने. हे त्यांनी हेरले. कृत्रिम भूजल पुनर्भरण केल्याशिवाय खालावलेली पातळी वर येणार नाही हे लक्षात येण्यास त्यांना वेळ लागला नाही. सन 2005 पासून त्यांनी जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात केली.
निवृत्त भू-वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांची नियुक्ती त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केली. त्यावेळी आमदार पटेल शिरपूरच्या प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष होते. या सूत गिरणीच्या नफ्यातून जलसंधारणाच्या कामांसाठी भरूभरून तरतूद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. विकास प्रक्रियेत पाणी या नैसर्गिक संसाधनाचे महत्व अवर्णनीय आहे. यानिमित्ताने शिरपूर तालुक्याचा चेहरा मोहराच नव्हे तर अंतर्गत भूगर्भ बदलविण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. अलीकडे आमदार पटेल आणि शिरपूरचे नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे वर्चस्व असलेल्या मुंबईस्थित शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणासाठी नाला रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय. प्रत्यक्ष बंधाऱ्यांचे बांधकाम मात्र जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात येते.
पावसाचे पाणी तालुक्यातच 'जेरबंद'
काम करण्याचे स्वातंत्र्य आणि निधीचा शाश्वत स्त्रोत यांस जोड मिळाली ती सुरेश खानापूरकरांच्या निस्वार्थी आणि अभ्यासू मनोभूमिकेची आणि कोणतेही काम झोकून देत तळमळीने करण्याच्या मानसिकतेची. झापटलेल्या खानापूरकरांनी 'पाणी अडवा पाणी मुरवा' या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना नंतर मागे वळून पाहिले नाही. आरंभी केलेल्या सर्वेक्षणानुसार टपप्प्याटप्प्याने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने त्यांचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शिरपूर तालुक्यातील अर्थे बु, अर्थे खुर्दे, भरवाडे, सुभाषनगर व शिंगावे आदि सात गावातील 16 विहीरी पुनर्भरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर दहिवद, गरताड, तांडे, असली, भोरखेडा, सावेर व तरडी गावातून वाहत जावून तापी नदीला मिळणाऱ्या एकाच नाल्यावर तब्बल 16 बंधाऱ्यांचे काम करण्यात आले. सन 2008 पर्यंत अशा आठ नाल्यांवर एकूण 45 बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले होते.
आज डिसेंबर 2015 अखेर बंधाऱ्यांची संख्या 135 च्या घरात पोहोचली आहे. एरव्ही या विविध नाल्यांमधून वाहत जावून तापी नदीच्या माध्यमातून अरबी समुद्राला समर्पित होणारे किती कोटी लिटर पाणी अडविले गेले याची मोजदाद करणेही अवघड आहे. एक मात्र नक्की या बंधाऱ्यांच्या निमित्ताने पाणी थांबले आहे. जमिनीत ते झिरपले आहे, त्यामुळे परिसरातील कूपनलिका आणि विहीरींची पातळी वाढली आहे. यासाठी कराव्या लागलेल्या तांत्रिक करामती कोणत्या या तपशीलात जाण्याची स्थानिक शेतकऱ्यांना आवश्यकता वाटत नाही. शेतात फुललेला भाजीपाला, कापूस, मका आणि कांदा आपल्याला किती पैसे मिळवून देणार या हिशेबात ते दंग आहेत. या तांत्रिकतेची चिरफाड तथाकथित जलतज्ज्ञांनी विविध चर्चासत्र आणि सेमीनारमधून करावी. आम्हाला भर उन्हाळ्यातही पिकं घेण्याची शाश्वती देणारा पाणी अडविण्याचा हा प्रयत्न महत्वाचा वाटतो.
अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारे शेतकरी या परिसरात पदोपदी भेटतात. शेतकऱ्यांची भूमिका केवळ स्तुतीपाठकाची नाही. तर बहुसंख्य शेतकऱ्यांनी नाला रूंदीकरणासाठी आपल्या खाजगी मालकीच्या शेतीचा तुकडा देण्यास कधी खळखळ केली नाही. लोकसहभागाचे हे आगळे वेगळे उदाहरणच. त्यामुळेच शिरपूर तालुक्यातील एकही नाला आणि एकही गाव सोडायचे नाही, प्रत्येक ठिकाणी बंधारा, सिंचनयुक्त शिवार आणि बारमाही बागायत असा थेट कृती कार्यक्रम राबविण्याचा या मंडळींचा निर्धार आहे. यंदा तसे पर्जन्यमान कमीच झाले. परंतु या अल्प पावसाचा परिणाम शिरपूर तालुक्यातील चोपडा रस्त्यावरील शेतीवर झालेला दिसत नाही. या परिसरातील नाल्यांवर पहिल्या टप्प्यातच बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून उपलब्ध झालेल्या पाण्यावर येथील शेती फुलली आहे.
शिरपूर पॅटर्न म्हणजे नेमके काय ?
जलसंधारण क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर राज्यात आहेत. तथापि त्यापैकी बहुतेकांचे कार्य त्यांच्या गावापुरतेच सीमित आहे. शिरपूर पॅटर्न आता एखाद्या गावापुरता मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण तालुका हे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यात अन्यत्र झालेले बहुतांश प्रयोग तत्कालीन परिस्थितीच्या रेट्यामुळे एका विशिष्ट उर्मीतून प्रकट झाले. अंमलबजावणी करणाऱ्यांना या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान होतेच असे नाही. या मर्यादेमुळे अन्यत्र अंमलबजावणी होवू शकली नाही. शिरपूर पॅटर्न पूर्णत: तंत्राधारित आहे. शिवाय याला भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाची जोड आहे. कुठेही बंधारा उभारला, पावसाळ्यात पाणी साठले, त्याचा फोटो काढला, नंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये बंधारा कोरडा असे येथे होत नाही. पावसाळ्यात येणाऱ्या गाळाने या भूभागातील नदी / नाले उथळ झाले आहे. ते बारमाही केल्याशिवाय विहीरींना बारमाही पाणी रहाणार नाही या धारणेतून उगमापासून संगमापर्यंत विशिष्ट अंतरावर टप्प्याटप्प्याने हे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्या आधी लहान लहान नाले कमीतकमी 40 फूट रूंद करून सुमारे 30 फूट खोल करण्यात आले आहेत. स्थानपरत्वे दोन बंधाऱ्यातील अंतर, नाल्याचे खोलीकरण आणि रूंदीकरण बदलण्यात येते. या सर्व बंधाऱ्यांना दरवाजे नाहीत, त्यामुळे पाणी बंधाऱ्यावरून वाहते.
एकाच नाल्यावर साखळी पध्दतीने बंधारे बांधल्यामुळे व नाला पुरेसा खोल व रूंद केल्यामुळे गाळ येण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. लोखंडी दार नसल्यामुळे खर्च कमी होतोच शिवाय दार काढणे व बसविणे अशी कटकट नसल्यामुळे हमखास पाणी अडविले जाते. तापी काठचा शिरपूर तालुक्यातील भूस्तर वैशिष्ट्यपूर्ण रचनेने बनलेला आहे. या ठिकाणी आढळणारा पिवळ्या मातीचा थर पाणी झिरपण्यास अडथळा निर्माण करतो. नाला खोल करतांना पिवळ्या मातीचा व दगडाचा कडकस्तर सुरूंगाद्वारे काढून पाणी जिरवणारा मुरूम उघडा करण्यात येतो. कडक तळ काढल्यामुळे बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याच्या दाबामुळे या मुरूमात पाणी जिरते व नाल्याच्या दोन्ही बाजूच्या विहीरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी लक्षणीय स्वरूपात वाढलेली दिसते. बायपास सर्जरीमध्ये जसे सर्जन अडथळारूपी गाठ सर्जरी करून कापून टाकतो त्याचप्रमाणे नाल्यामध्ये अछिद्रस्तर असेल तर तो बाजूला करणे व पाणी मुरायचा मार्ग मोकळा करणे आवश्यक ठरते. यालाच सुरेश खानापूरकर तंत्राधारित जलसंधारण कार्यक्रमातील बायपास सर्जरी म्हणतात. भूसंपादन नाही, वारंवार करावा लागणारा देखभाल दुरूस्ती खर्च नाही आणि प्रकल्पामुळे स्थानिकांचे स्थलांतर नाही या शिरपूर पॅटर्नच्या वैशिष्ट्यांकडे खानापूरकर वारंवार अंगुलीनिर्देश करतात. सध्या भाटपूरा परिसरात सुमारे पन्नास लाख रूपये खर्च अपेक्षित असलेले नाला खोलीकरण, रूंदीकरण आणि बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी काहीही खळखळ न करता नाल्यालगतच्या जमीनी रूंदीकरणासाठी मोफत दिल्या आहेत.
दुष्काळ आणि महापूरासाठी उमेद वाढविणारा पॅटर्न
अथक परिश्रमातून साकारलेल्या जल पुनर्भरणाच्या 'शिरपूर पॅटर्न' चे परिणाम दृष्टिपथात येवू लागले आहेत. पूर्वी केव्हातरी पोटापाण्यासाठी शिरपूर बाहेर गेलेली मंडळी पुन्हा आपल्या खोपट्याकडे परतू लागली आहे. स्थलांतराचा हा उलटा प्रवास आणि यंदा भाजीपाला लागवड क्षेत्रात तिप्प्टीने वाढ या बातम्या खचितच उमेद वाढविणाऱ्या आहेत. जलसंधारणाच्या वाढत्या कामांमुळे ठिकठिकाणी साठलेले पाणी दिसणे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शिरपूरचे नाव 'जलपूर' झाले तर आश्चर्य वाटणार नाही.
दुष्काळ आणि महापूर या दोन्ही समस्यांवर शिरपूर पॅटर्न हे एकमेव उत्तर आहे, हा सुरेश खानापूरकरांचा दावा या प्रयोगाची यशस्विता पाहिल्यानंतर चटकन पटतो. विशेषत: ज्यांनी शिरपूर तालुक्यात प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी खालविल्यानंतरची शेतकऱ्यांची परिस्थिती जवळून पाहिली आहे, ती मंडळी शिरपूर पॅटर्नची उपयोगिता नाकारणार नाही. भले त्यांच्या दृष्टीने या प्रयोगांच्या अंमलबजावणीमागील तांत्रिकता अगम्य असेल.
मार्च एप्रिल महिन्यात शेतीला प्रत्यक्ष पाणी देणाऱ्या शिरपूर पॅटर्नच्या यशस्वीतेनंतर सुरेश खानापूरकरांची एक अपेक्षा आहे. 28 हजार कोटी रूपये उपलब्ध झाले तर, शिरपूर पॅटर्नच्या अंमलबजावणीतून संपूर्ण महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचे आणि राज्याचे सध्याचे सरासरी 14 टक्के असलेले बागयात क्षेत्र 54 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
झपाटलेला किमयागार
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात ग्रंथ आणि ग्रंथालयांचा सहवास पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी किती प्रभावी ठरू शकतो याचे उदाहरण शोधायचे असेल तर गुगलवर जावून सर्च करण्याची आवश्यकता नाही. शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून खान्देश तापीनदीच्या उत्तर तीरावर जलयज्ञ आरंभलेल्या सुरेश खानापूरकरांचा भूतकाळ जाणून घेतला तर ही शोध मोहीम थांबते. शालेय जीवनात वाचनात आलेल्या केवळ दोन लेखाच्या प्रभावामुळे या किमयागाराचे झालेले परिवर्तन अचंबित करणारे ठरावे. सुरेश खानापूरकर विदर्भातल्या एका छोट्या खेड्यात इयत्ता सहावीत शिकत होते. त्यावेळी नागपूरहून प्रसिध्द होणाऱ्या 'उद्मम' नियतकालिकेतील एक लेख त्यांच्या वाचनात आला. या लेखात मराठी तरूणांनी भूगर्भशास्त्रज्ञ व्हावे या अनुषंगाने प्रेरणा देणारा मजकूर होता, मराठी तरूणांना स्वत:च्या घरामागे, गावात नोकरी हवी असते. भूगर्भशास्त्र यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात येण्याचे धाडस ते करत नाही असे काहीसे डिवचले होते. त्याचवेळी छोट्या सुरेशने भूगर्भशास्त्रज्ञ होण्याची खूणगाठ बांधली. त्यानुसार नववीत असतांना त्यावेळेच्या पध्दतीनुसार विषय बदलविले. पुढे एम.एस्सी होवून ते भूगर्भ शास्त्रज्ञ झाले. एका इंग्रजी मासिकातील लेख ते दहावीत असतांना वाचण्यात आल्यानंतर त्यांनी श्री गजानन महाराजांची पारायणे करणे थांबविले. मूर्तीपूजा आणि कर्मकांडांऐवजी कर्मभक्तीची कास धरण्याचे बाळकडू त्यांना या लेखामुळे मिळाले.
राज्याच्या भूजल सर्व्हेक्षण विभागातून वर्ग एक श्रेणीतील वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ या पदावरून निवृत्त झालेल्या सुरेश खानापूरकर यांनी तंत्र आधारित जलसंधारण कार्यक्रम अंमलात आणून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. भूपृष्ठावरील तसेच भूगर्भातील पाण्याची साठवण क्षमता वाढविणारे प्रयोग अंमलात आणण्यास खानापूरकरांनी सुरूवात केली ती सन 2004 मध्ये. विशिष्ट तंत्र व विज्ञानाचा अंगीकार त्यास भूस्तराच्या सूक्ष्म अभ्यासाची जोड आणि परिसराचा कायाकल्प घडवून आणण्याच्या जिद्दीने प्रेरित होवून झपाटल्यासारखे उन्हातान्हात, रात्रंदिवस घेतलेले परिश्रम, या त्रिसूत्रीचा एकत्रित परिपाक म्हणजे 'शिरपूर पॅटर्न'. माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासारखा विकासाचे व्हिजन असलेला भरभक्कम पाठीराखा लाभणे हा शिरपूर पॅटर्नच्या यशस्वीतेचा मूलाधार. याबाबी एकवटल्यामुळेच अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत तापीकाठावरील नागरिकांचे भाग्य बदलले.
शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून ही किमया साधणारे सुरेश खानापूरकर तसे विदर्भवासी म्हणून ओळखले जातात. अर्थात त्यांचे बालपण, शिक्षण आणि नोकरीचा बहुतेक कालावधी विदर्भातच व्यतीत झालेला आहे. तथापि खानापूरकरांचे घराणे तसे खान्देशातले. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर हे त्यांचे मूळ गाव. आजोबांनी नोकरीनिमित्त खानापूर सोडले आणि पुढील पिढ्यांची भटकंती सुरू झाली. शिरपूर पॅटर्नच्या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झाले. असे म्हणावे लागले. तापी खोऱ्यातील खानापूर गावाचे सुरेश खानापूरकर तापी खोऱ्यातील शिरपूर गावातच आता स्थिरावले आहेत. वडील रेल्वेत नोकरीस असल्याने सतत बदल्या होत. त्यामुळे साधारण दरवर्षी नवीन शाळा. असा पॅटर्न दहावीपर्यंत खानापूरकरांनी अनुभवला. विदर्भातील लहानमोठ्या गावांमध्ये त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण झाले. मात्र पहिली पासून प्रथम क्रमांक कधी त्यांनी सोडला नाही. छोट्या सुरेशमधील गुणवत्ता हेरलेल्या नंदनपवार नावाच्या शिक्षकाने त्यांना दहावीसाठी नागपूरला आणले आणि नवयुग हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. 10 वी ला त्यांना 82 टक्के मार्क्स मिळाले. मात्र गुणवत्ता यादीत येण्याची संधी अवघ्या 3 मार्कनी हुकली. या धक्क्यातून सावरत असतांनाच पुढील शिक्षणासाठी वडिलांनी लाल झेंडी दाखविली. आर्थिक परिस्थितीमुळे आता शिक्षण बंद असे वडिलांनी जाहीर केले. भूगर्भशास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न उरात असलेले खानापूरकर डगमगले नाहीत.
एखादी गोष्ट दुसऱ्याच्या गळी उतरविणे ह्यात सुरेख खानापूरकरांचा हातखंडा. वडिलांकडून त्यांनी 15 रूपये मिळविले आणि तडक नागपूरमधील मथुरादास मेहता कॉलेज ऑफ सायन्स गाठले. माझ्याकडे 15 रूपये आहेत, उर्वरित फी माझ्या स्कॉलरशिपमधून कापून घ्या असे धीटपणे सांगणारा नुकताच 10 वी पास झालेला मुलगा पाहून प्राचार्य बापूराव वऱ्हाडपांडे चमकलेच. त्यांनी मार्कशीट पाहण्यास मागितले आणि प्रवेश देण्यास हरकत नाही असा शेरा लिहिला. प्रवेश तर मिळाला, उर्वरित 285 रूपये आणायचे कुठून या प्रश्नाने छोट्या सुरेशची चिंता वाढली. तेव्हा एका पेपर विक्रेत्याकडे त्यांनी काम मिळविले. नागपूरमध्ये सायकलीवर दररोज 11 कि.मी फिरून 300 घरांमध्ये पेपर टाकण्याचे काम सुरू झाले. पुढे अपेक्षेप्रमाणे स्कॉलरशीप मिळाली, त्यातून आईसाठी शिलाई मशीन घेतले, खानावळ सुरू केली. हा संघर्ष फळास आला. एम.एस्सी झालेल्या खानापूरकरांना शिक्षण पूर्ण होत असतांनाच राज्य शासनात सहाय्यक भूवैज्ञानिक या पदावर नोकरी मिळाली. सन 2004 मध्ये निवृत्त झाले तेव्हा ते वर्ग 1 वरिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर कार्यरत होते.
खानापूरकरांचा शिरपूर पॅटर्नमध्ये प्रवेश झाला तोच मुळी धुळे जिल्ह्यातील एक गाव टँकरमुक्त केल्याच्या निमित्ताने. वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्ग - 1 या पदावर असलेल्या खानापूरकरांची बहुतांश सेवा विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली. नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात सन 2004 मध्ये ते धुळ्यात आले. शिवकालीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत त्यांनी बेटावद ता शिंदखेडा येथे स्थानिक पाणी पुरवठा योजनेचे सक्षमीकरण केले, त्यामुळे संपूर्ण गाव टँकरमुक्त झाले. त्याबद्दल ग्रापंचायतीने त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले होते. या कार्यक्रमास जिल्हा नेते आमदार अमरिशभाई पटेल यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमांतच चाणाक्ष अमरिशभाईंना जाणवले की, खानापूरकर हे वेगळे पाणी आहे. त्यानंतर संपर्क वाढला, आणि खानापूरकरांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर 2004 रोजी अमरिशभाई पटेल यांना निमंत्रित केले. खानापूरकरांनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रभावी विचारसरणीची कल्पना दिल्यानंतरही काँग्रेसचे आमदार असलेल्या पटेल यांनी आपला निर्णय बदलला नाही, हे विशेष.
सन 2004 मध्ये सुरू झालेला हा जलयज्ञ आजतागायत सुरू आहे. आपल्या सेवाकाळात बदलीनिमित्ताने सतत भ्रमंती करणारे, कित्येक वर्षे तंबूत संसार थाटणारे खानापूरकर शिरपूरमध्ये फार काळ वास्तव्य करणार नाही, अशी अटकळ होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तृतिय वर्ष शिक्षित व्यक्ती आमदार पटेल यांच्यासारख्या काँग्रेस नेत्याकडे रूळणार नाही या शंकेतूनही खानापूरकरांच्या वास्तव्याविषयी तर्क लढविले जात होते. मात्र संपूर्ण सेवा काळात पाठबळ आणि अमरिशभाई पटेलांनी दाखविलेला विश्वास यामुळे खानापूरकर स्थिरावले. अर्थात अमरिशभाईंचे हस्तक्षेप न करण्याचे धोरणही यास कारणीभूत आहे. तुटपुंज्या पावसामुळे दुष्काळाच्या झळा दरवर्षी सहन करणाऱ्या राज्यातील मराठवाडा तसेच अन्य जिल्ह्यातील नागरिकांना शिरपूर पॅटर्नविषयी आकर्षण आहे. खान्देशातील कडक उन्हाळ्यात देखील नाल्यांत साठलेले पाणी आणि त्यामुळे परिसरात फुललेली शेती पाहून या प्रयोगामागील किमयागार कोण ? याविषयी कुतुहल निर्माण झाले नसेल तरच नवल. जलसंधारणाचे हे प्रयोग आणि ते अंमलात आणणारा हा झपाटलेला जादूगर पाहण्यासाठी शिरपूरमध्ये सध्या फेऱ्या वाढल्या आहेत. जुलै 2013 मध्ये विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये शिरपूर पॅटर्नवर बोलण्यासाठी खानापूरकरांना निमंत्रित करण्यात आले. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शिरपूर पॅटर्नची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. शिरपूर पॅटर्नची माहिती देणे, या प्रयोगाची अँमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी खानापूरकरांची भ्रमंती सध्या सुरू असते.
तापीच्या उत्तरतीरावर भूगर्भाचे प्रयत्नपूर्वक उदरभरण करून खानापूरकरांना जलयज्ञ आरंभलेला आहे. या जलयज्ञाला शास्त्राधार आहे. तशी खानापूरकरांची तात्विक बैठक देखील आहे. आपल्या वाट्यास आलेले काम प्रामाणिकपणे करा, त्या कामात निष्णात व्हा, समोर आलेल्याचे दैन्य, दु:ख कमी करण्यास हातभार लावा. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य पहाणे निश्चितच विलोभनीय असते, मात्र ते हस्य फुलविण्यास आपण कारणीभूत असलो तर ते जास्त आनंद व समाधान देणारे असते, या धारणेतून माझी वाटचाल सुरू आहे. किंबहुना हेच माझे अध्यात्म आहे, हेच माझे श्रध्दास्थान आहे, असे खानापूरकर सांगतात. तेव्हा पाण्याच्या या किमयागाराचे मूळ बलस्थान अधोरेखीत होते.
संदीप गुजर, रा. बोराडी. ता. शिरपूर
गेल्या दोन वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरात शिरपूर पॅटर्ननुसार बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. गेल्या जूनपर्यंत अंबड नाल्यावर 18 बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा लाभ हळूहळू नजरेस दिसू लागला आहे. बोराडी येथील शेतकरी संदीप गुजर यांची या संदर्भात प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.
'पूर्वी येथे पाण्याची फार गैरसोय होती. आम्ही तीन बोअर केले होते. ते जवळजवळ 800 फूट खोल आहेत. पण पाणी नव्हतं. आमच्या शेतीलगतच्या नाल्यावर बंधारे उभारल्यामुळे पाणी आलं. जर हे काम झालं नसतं तर ऑक्टोबर पासून आमचे हाल झाले असते. पण पाणी अडविल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. अन्यथा हे पाणी वाहून जायचे. हे काम चालू झाल्यामुळे आमचे शेतीचे उत्पादन वाढले. आमची 11 एकर शेती आता बागायती झाली आहे. पूर्वी जे नुकसान झाले होते. ते भरून निघते आहे. मका, कांदा या पिकांचे उत्पादन आम्ही पूर्वी घेत नव्हतो ते यंदापासून सुरू केले. पाण्याच्या नियोजनबध्द वापरासाठी ठिबक सिंचनाची जोड दिली. पूर्वी या परिसरात सुमारे 50 बोअर फेल गेले होते, आता सर्वांना पाणी आहे. पर्यायाने सर्वांचे शेतीचे उत्पादन वाढले. बंधाऱ्याजवळ ज्यांची शेती आहे त्यांनी बंधाऱ्याचे पाणी उचलता आले. ह्या बंधाऱ्यामुळे जवळच्या विहीरींची पाण्याची पातळी वाढली. 100 टक्के बदल हा झाला आहे. 55 फूट विहीर फक्त आता 20 फूट रिकामी आहे. पूर्वी फक्त 2 तास मोटर चालायची, ती आता पूर्ण वेळ चालते. आता आम्ही रब्बी पिक घेवू शकतो. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, भुईमूग जे काही पिक घ्यायचे असेल ते आता 100 टक्के घेवू शकतो. निरनिराळ्या ठिकाणी कामासाठी जाणारी मंडळी आता आपआपल्या शेतातच राबतांना दिसू लागली आहे. पूर्वी जे जे नुकसान झाले किंवा जे होत होते ते आता या बंधाऱ्यांमुळे भरून निघाले. बंधारे होण्याअगोदर 11 एकरात वार्षिक उत्पन्न अंदाजे दीड लाख होते. पण आता ते अडीच लाख ते तीन लाखा पर्यंत झाले आहे. पूर्वी 1 एकर मध्ये ज्वारी ही 8 किंवा 9 पोती यायची पण आता जवळजवळ 15 किंवा 16 पोती येते.'
नरेंद्र राजपूत, वाडी ता. शिरपूर
अंबड नाल्यावर उभारण्यात आलेल्या अठराव्या बंधाऱ्याजवळ नरेंद्र राजपूत यांची शेती आहे. बंधारा रूंदीकरणासाठी त्यांनी त्यांची खाजगी जमीन दिलेली आहे. पाणी अडविल्यामुळे झालेल्या परिवर्तनाचे ते एक लाभार्थी आहेत. ते म्हणाले, या परिसरात सध्या कांद्याची शेती सगळी कडे केली जाते. आधी येथे छोटा नाला होता, जून 2015 मध्ये रूंदीकरण आणि खोलीकरणाचे काम झाले. तेव्हा पासून येथे पाणी साठले आहे. त्यामुळे पूर्वी येथील बरड जमीन आता शेती योग्य झाली आहे. पाण्याचा मोठा प्रश्न मिटला. हे काम होण्याआधी जे बोअर केले होते. त्याला पाणी नव्हते. पण हे काम झाल्यामुळे ते पाण्याने पूर्ण भरले आहे. हे काम होण्याआधी तेथे कापूस लावला जायचा, रब्बीचे प्रमाण फार कमी होते. परंतु आता येथे कांद्याची शेती केली जाते. यंदा आम्ही चार एकरात कांद्याचे उत्पन्न घेतले आहे. ते तीन लाखांपर्यंत जाईल. पूर्वी ही पडीक जमीन होती आता पाणी आल्याने, माती टाकून शेती तयार केली. या बंधाऱ्यामुळे जमिनीला झिरपे फुटले. त्यामुळे जेवढे पाणी वरती आहे, त्यापेक्षा जास्त पाणी जमिनीत मुरते आहे. या परिसरात बारा महिने पाणी राहील.
या कामामुळे परिसरातील लोकांच्या विहीरी आणि बोअर देखील पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे त्यांना सुध्दा लाभ होतोय. पूर्वी बोअर फक्त 4 तास चालायचे नंतर ते आटून जायचे. परंतु आता ते आटत नाही. यंदा पाऊस कमी झाला, तरी पाणी मात्र भरपूर आहे.
श्री. संजय झेंडे, धुळे - मो : 09657717679