नदी पुन्हा जिवंत एक निखळ सत्य

Submitted by Hindi on Sat, 06/24/2017 - 16:50
Source
जलसंवाद, जून 2012

थोडक्यात काय नदी वाचवायची आहे... त्यामागचे शास्त्र सांगा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, शक्य असेल तर नियोजनात समाविष्ट करा, खर्चाचीही कल्पना द्या. त्यांच्यावर काही जाबाबदार्‍या टाका. कामे यशस्वी होण्यामधील अडथळे कमी होतील. मदतीला अनेक हात उभे रहातील. विरूध्द भूमिका घेणार्‍यांचा विरोध कमी होईल. नदी वहाते, नदी आटते, नजी जीवन देते. नदी पुराने आणि पाणी संपल्याने जीवनाला धोका निर्माण करते. आज जागतल्या सर्वच नद्यांची परिस्थिती ही बिघडत चालली आहे. नद्या मरणाचे पंथाला लागल्या आहे, काहींनी तर काम करणेही संपविले आहे.

ही परिस्थिती काही एक दिवसात आली नाही. निसर्गाने संकटाचा इशाराही दिला. नदीने आपली बिघडल्याची अनेक लक्षणे दाखविली. परंतु आपण आपल्याच नादात विकास... विकास करीत धावत होतो. नदीकडे दुर्लक्ष करीत होतो. आता दरवर्षी जगातल्या कुठल्या व कुठल्या कोपर्‍यातून दुष्काळ... दुष्काळ अशा किंकाळ्या ऐकू येतातच. काय करावे हे न कळल्याने किं कर्तव्य मूढ अशी स्थिती निर्माण होते.

अशा या भीषण परिस्थितीतही आशेचे किरण दिसावे असे किरण दिसतात. जगभरातून लोक स्थितबुध्दीने नदी वाचविणे आणि त्यातून जीवन फुलविण्याचे प्रयत्न करतात. त्या सगळ्या यशस्वी प्रयत्नांना शब्दबध्द करून ठेवावयाचे प्रयत्नही करतात. मला या ठिकाणी नद्यांच्या यशाबद्दल लिहावयाचे नाही, त्यांच्या प्रयत्नांची दिशा कोणती होती ? त्यातून काय साध्य करावयाची इचिछा होती ? काय साध्य झाले ? अशा प्रयत्नांना कुणी साथ दिली ? याचा थोडासा आढावा घ्यायचा आहे. शक्य आहे की त्या ठिणगीने इथे एखादी समई पेटेल थोडा प्रकाश पडेल.

भारतात राजिंदरसिंहानी सरल्या विसाव्या शतकात राजस्थानातील अलवर नदीचे पुनरूज्जीवनाचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. खरे तर त्यापध्दतीने किंवा स्थानिक परिस्थितीनुसार त्यात योग्य आणि आवश्यक ते फेरफार करून अनेक ठिकाणी हे प्रयोग झाले पाहिजे होते. पण फारसे झालेले दिसत नाहीत.

कर्नाटकात बंगलोर जवळील इरावतीनदीच्या पुनरूज्जीवनाचा कागदावर प्लॅन तयार झाला. धुळ्याला पांझरा नदी वहाती करण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुमारे 10 ते 12 टक्के काम झाले आणि पैशा अभावी ते बंद पडले. त्या कामासाठी आग्रह धरणारी, सर्वस्व झोकून देणारी टीम विखुरली. मात्र त्यात जिल्ह्यात शिरपुर तालुक्यात असा एक यशस्वी प्रयोग शास्त्रज्ञ खानापुरकर आणि मा. आमदार अमरीशभाई हे राबवित आहेत.

भारताबाहेर कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल ह्या देशांमध्येही असे अनेक प्रयोग राबविण्यात आले आहेत. त्यांचे अनुभवातून कोणती दिशा दिसते ती बघू या.

मुळात नदी म्हणजे केवळ पाणी नाही. नदी म्हणजे सामाजिकता, पर्यावरण रक्षण, जल व्यवस्थापन, आर्थिक विकास व कुटुंबसंस्थांचे स्थिरीकरण, शिक्षण, प्राणी व वनस्पती जीवांचे संरक्षण अशा अनेक अंगानी ही नदी काम करते. वरील सर्व अंगाचे दूरगामी परिणाम व्हावेत असे हे काम असते. आता ह्या नद्यांवरील संकटाचे काळात नदी व्यवस्थापन आणि त्या कामाचे व्यवस्थापन हे नव्या पध्दतीने उभे करावे लागणार आहेत.

मुळात ही कामे घडविणे ही एक कठीण बाब आहे. ती दीर्घकाळापर्यंत टिकविणे आणि त्याचा फायदा समाजात खर्‍या अर्थाने पूर्णत: रूजविणे हे आणखी वेगळ्यात स्वरूपाचे असे किचकट काम आहे. किंबहुना ते साध्य करून दाखविणे हे एक आव्हानच आहे. त्यासाठी पूर्ण वेगळा दृष्टीकोन आणि वेगळ्या आणि सातत्याने कराव्या लागणार्‍या प्रयत्नांची गरज आहे.

मुळात अशा कामांसाठी अनेकांगांनी प्रयत्न करावे लागतात. अशा कामांचे नियोजन देखरेख व अंमलबजावणी आणि मूल्यमापन अशा तीन अंगांवर लक्ष द्यावे लागते. त्यासाठी ज्यांना लाभ मिळणार आहे ते लाभधारक, नियोजकर्ते व मूल्यमापन करणारे तज्ज्ञ,उभारणी करणारे व त्यासाठी पैसा पुरविणारे प्रशासन व शासन ह्यांचे प्रतिनिधींनी एकत्र येऊन एकहीत तयार करून काम करावे लागणार होते. पण तरीही सर्वत्र अपेक्षित प्रमाणात यश आले नाही. मात्र काही ठिकाणे अशी होती की तेथे अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले. तेथे कामाला सतत प्रेरणा देऊ शकणारे जलनेते किंवा नदी व्यवस्थापक होते. ज्या ठिकाणी नदी वरील सर्व अंगानी व्यवस्थित नांदते, सर्व कामे उत्तम रीतीने होतात ती नदी ही आरोग्यपूर्ण नदी (Healthy river) म्हणून ओळखली जाते. ही नदीवरील सगळी जैवसाखळी पुनप्रस्थापित करणे हे खरोखरच एक जटील काम आहे.

केवळ नदीत पाणी आणता आले तर कामाचा तो एक भाग झाला, इतरही उपांगे आपोआप उद्भवत नाहीत. स्थिरावत ही नाहीत. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. त्यादृष्टीने खालील गोष्टी महत्वाच्या आहेत असे ह्या यशस्वी नद्यांचे कामावरून जगभरातून पुढे आलेल्या माहितीवरून निष्कर्ष विघतात.

1. सहभाग व भागीदारी :


लाभक्षेत्रातील शेतकरी, उद्योजक, शासन व प्रशासन पर्यावरणाचे क्षेत्रात काम करणार्‍या संस्था आणि सामान्य जनता तसेच स्त्रिया यांचा सहभाग.

2. सहभागासाठी जागृती :


अशा कामात सहभागी व्हावे यासाठी लोकजागृतीची मोहीम अनेक लोककला... भारूड, तमाशा, वासुदेव, प्रवचन, कीर्तन, भजन इत्यादी तसेच चित्रकला, पथनाट्य, नाटके. टि.व्ही.शो, जाहिराती, कथाकथन, काव्य, वक्तृत्व इत्यादी स्पर्धा व स्पर्धांमधून जागृती व सहभाग.

3. संपूर्ण विकासाचा दृष्टीकोन समजाविणे :


नदी म्हणजे पाणी नव्हे, फक्त पाण्याची शुध्दता व स्वच्छता हेही पुरेसे नाही, सर्व जीवसृष्टीचा विचार आणि त्या विचाराचा व्यक्तिगत व सामाजिक संपन्नतेमध्ये सहभाग हाही महत्वाचाच. हे पहिल्या दिवशी पासून समजाविले नाही तर अपेक्षित ध्येय गाठता येणे हे कठीण होऊन बसते.

4. नियोजन, मूल्यमापन व प्रदीर्घ काळाची देखभाल :


हे खरे काम एकदा प्रकल्प उभारला गेला की त्यानंतरच सुरू होते. सामाजिक लाभाचे मूल्यमापन आणि तो शेवटच्या टोकावरील माणसाला कसा मिळेल ह्यावर देखरेख म्हणजे खर्‍या अर्थाने नदीचे व्यवस्थापन.

5. शाश्वत विकासाची दिशा :


आजच्या कामाचे 5 - 10 वर्षे फळ मिळणे हे एकवेळ शक्य आहे पण ते प्रदीर्घ काळ ठिकावे ह्याचे नियोजन त्या दृष्टीने इतर सर्वच अंगांनी पहिल्यापासून सगळ्यांना सहभागी करून घेऊन कामे करणे हे महत्वाचे आहे. कितीही आव्हानात्मक असले तरीही.

अशा अंगांचा विचार करून सर्व योजना कागदावर लिहून ठेवून मग किमान दहा वर्षे कामे केलेल्या 15 नद्यांचा अनुभावातून खालील मुद्दे स्पष्टपणे समोर आले आहेत.

अ. अशा प्रदीर्घ काम चालणार्‍या कामांमध्ये बहुसंख्य लोक सहभागी होतात. त्यांना आपण कशासाठी काम करीत आहोत, काय करीत आहोत आणि का कारीत आहोत याची कल्पना असते. आपण कोणत्या कागदांवर सह्या केल्या हे त्यांना माहीत असते.

ब. अशा कामांमधून आपल्याला किती टक्के फायदा मिळणार हे त्यांना माहीत असते. इतर कोणाला तो फायदा किती, किती प्रमाणात वाटला जाणार हेही माहीत असते. ह्या सर्वांनाच लाभ देणार्‍या योजनेला लोक तयार होतात.

क.अशा पध्दतीने सामान्य जनता, खाजगी कामे करणारे ठेकेदार, शासन तसेच गैरशासकीय सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून एक अभूतपूर्व ताकद उभी राहतेे. त्यातून पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन आणि त्यातून पर्यावरणाचे संरक्षण ही कामे कोणतेही अडथळेनिर्माण न होता पार पाडता येतात.

ड. अशी कामे करतांना धोरणांमध्ये लवचिकता ठेवावी लागते. ताठर भूमिका घेतली तर अपेक्षित ध्येय गाठणे कठीण होऊन बसते.

इ. लोकांचे मनात ह्या चांगल्या बदलाबद्दल ओढ निर्माण व्हावी लागते. तशी त्यांची मानसिक तयारी करून घ्यावी लागते. त्यातून जो जनरेटा तयार होतो तोच नंतर कामांना गती देतो.

फ. अशा मोठ्या कामांमध्ये व्यक्तिगत स्वार्थ व त्यातून परस्पर विरूध्द भूमिका घेऊन अडथळे निर्माण होणे यात नवे काहीच नाही. हे घडणारच असे गृहीत धरून पूर्व तयारी करावी लागते.

ग. लोकांची मानसिकता, इतिहास, आर्थिक संपन्नता व दुरावस्था ह्या सगळ्याचाच विचार न करताच लोकांना भविष्याची सुंदर स्वप्ने दाखविली तर ती पचत नाहीत. त्यामुळे ती मानसिकता हळूहळूच तयार करावी लागते.

ह. कुणी खूप मोठ्या अपेक्षा घेऊन सहभागी होणार असेल तर त्याला वेळीच योग्य जागा दाखवावी लागते.

- जुन्या जाणत्या लोेकांच्या अनुभवजन्य ज्ञानाचा वापर करून घेतला तर लोकांचा विश्वास लवकर बसतो.

- काम करतांना काहीना काही चुका ह्या होणारच. ते अटळ आहे. अशा चुका वेळीच मान्य केल्या तर त्या दुरूस्त करता येऊ शकतात. पुनर्विचार करता येतो. राजकारण आणि पत्रकारिता ह्यांचा सहभाग हा अटळ असतोच परंतु अनेकांनी अनेक अंगांनी जर बोलायला सुरूवात केली तर चुकीचा संदेश जाण्याची आणि काम विघडण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे ह्या दोन्ही माध्यमांशी कुणी बोलायचे, काय बोलायचे, केव्हा बोलायचे हे निश्‍चित करून मगच बोलायचे पथ्य हा यशस्वीतेतला एक महत्वाचा भाग आहे.

- लोकांचा सहभाग नसेल तर अशी कामे यशस्वी होतच नाहीत. लोकांना काय करावयाचे आहे ते आधी नीट समजावून सांगा. त्यांना त्यावर विचार करू द्या, चर्चा करू द्या, पर्याय मांडू द्या, त्याचीही चर्चा करू द्या. म्हणजे मने स्वच्छ होतात. विरोध मावळतो. कामे सुरळीतपणे करता येतात. मात्र एक पथ्य जरूर पाळा - कोणतेही विरोधी मत असले तरी ते लपवून ठेवू नका, चर्चेच समाविष्ट करून घ्या.

- कामासाठी किती खर्च अपेक्षित आहे ही आधीच कल्पना द्यावी. पैसे कमी असतील तर काही कामे श्रमदानातून करून पैसे वाचविणे शक्य आहे. मात्र अंदाजे खर्च समोर ठेवतांना अशा गोष्ट गृहीत धरता येत नाही. अशा श्रमदानातून किती पैसे वाचविता येतील आणि आपल्या आवाक्यात नसलेले काम करणे शक्य होईल का ही चर्चा मात्र निश्‍चितपणे करता येते.

- त्याचप्रमाणे एखादे काम कसे करावयाचे, त्याच पध्दतीने का करावयाचे याचीही स्पष्ट कल्पना दिली तर समाजातील जागृती बरोबरच काम करविणार्‍यांची विश्वासार्हता वाढते. लोकांमध्ये जेवढे शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त वैचारिक दृष्टीकोन रूजविता येतो. तो इतर कामांमध्येही उपयोगी पडतो.

- अशा कामांमध्ये कुठेही पैसा कमी पडला किंवा आर्थिक अडथळा आला तर लोकसहभागातून तो जादुईपध्दतीने दूर होऊ शकतो. त्यामुळेच गावागावातील लोकांनी आपल्यापर्यंत यावे अशी वाट न पाहता आपणच जनेतपर्यंत पोहोचावे ही भूमिका घेतली तर लवकर यश मिळू शकते. त्यामुळे आपल्यावर काही जबाबदारी दिलेली आहे हे लक्षात येते व सहभाग अर्थपूर्ण होतो.

थोडक्यात काय नदी वाचवायची आहे... त्यामागचे शास्त्र सांगा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, शक्य असेल तर नियोजनात समाविष्ट करा, खर्चाचीही कल्पना द्या. त्यांच्यावर काही जाबाबदार्‍या टाका. कामे यशस्वी होण्यामधील अडथळे कमी होतील. मदतीला अनेक हात उभे रहातील. विरूध्द भूमिका घेणार्‍यांचा विरोध कमी होईल. आपले मत विरूध्द बाजूचे असले तरी ऐकून घेतले जाते हे दिसून आले की परस्पर विश्वास वाढेल, अगदी पैशांची अडचण आली तरी तो सोडविला जावू शकेल.

उद्योजक, प्रशासक, राज्यकर्ते, विविध विषयातले तज्ज्ञ, विद्यापीठीय पातळीवरचे शास्त्रज्ञ हे सगळेच लागतील. अशी एकसंघ पध्दतीची परंतु तरीही आपल्या पध्दतीने आपल्या विषयातले काम करणारी टीम उभी राहिली आणि नेतृत्वस्थळी सामाजिक दृष्टीकोन असलेली व्यक्ती असली तर यश निश्‍चितपणे मिळते. गेल्या अकरा वर्षात वीस नद्यांवर असे यश मिळविता आले आहे.

त्यामुळेच मी आशावादी आहे. हे करता येणार आहे, आम्ही हे करू, नदी वाचवू, संसकृती वाचवी, दुष्काळ संपवू, हे सारे घडू शकेल. ह्याची देही ह्याची डोळा पहाता ही येऊ शकेल. तुमच्या नदीपासून सुरूवात करायची का ?

श्री. मुकुंद धाराशिवकर, धुळे - (दू : 02582 236987)