जाखणगावची जल स्वाभिमान आणि जल स्वातंत्र्याची लढाई (भाग -१)

Submitted by Hindi on Fri, 04/14/2017 - 10:53

‘जल-बिरादरी’ चे तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त अभियंता (जल संपदा विभाग,महाराष्ट्र) प्रभाकर बांदेकर(पुणे) यांच्याशी झालेला हा संवाद..

जाखणगावची जल स्वाभिमान आणि जल स्वातंत्र्याची लढाई

बांदेकरजी सांगत आहेत.


खटाव तालुका, सातारा जिल्ह्यातील जाखणगाव, डोंगराच्या कुशीत वसलेलं, पावसाच्या मेहरबानी वर अवलंबुन असणारं एक गाव. पावसाच प्रमाण जेमतेम 500 मिलिमीटर.ते ही शाश्वत नाही.दुष्काळ पाचवीला पुजलेला. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब गाव शिवारात साठवण्याचा गावानं संकल्प सोडला.

मी गावक-याना विचारल निसर्गाची पाण्याची गावाला देणगी म्हणजे काय ? गावाच एकूण क्षेत्र गुणिले वर्षाचा पाऊस. म्हणजेच 1273 X 500/1000 = 637 कोटी लिटर हि निसर्गाची पाण्याची देणगी. हे पाणी जमिनीवर आणि जमिनीखाली कसं साठवायचं हे निसर्गाचं कोडं सोडवण्याचे आव्हान स्विकारणं म्हणजेच गावाची ‘जल स्वातंत्र्याची’ लढाई. शहरात राहणा-या मला हे सर्व नविन होत.

गावाचा ‘जलआराखडा’ तयार करण्यात आला आहे. गेले तीन वर्ष गावाने पाणी साठवण्याच्या कामात विविध शासकीय योजनां मार्फत भरीव काम केल आहे. आजपर्यंत गावात 49 पाणी साठे निर्माण झाले असुन यात 68 कोटी लिटर पाणी साठा निर्माण झाला आहे. माजी कृषी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच खासदार अनु आगा यानी या कामांसाठी आपल्या खासदार निधीतून भरघोस निधी उपलब्ध करुन दिला होता. सतरा नविन पाणी साठे, नाला खोलिकरण, सलग समतल चर, शेताची बांध बंदिस्ती या कामाचे सहयोगातुन 106 कोटी लिटर पाणी साठा निर्माण करण्याचा आता गावक-यांचा संकल्प आहे. जमिनी वर 174 कोटी लिटर आणि जमिनी खाली 174 कोटी लिटर असे एकूण 348 कोटी लिटर पाणी गावात साठवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे 500 शेतकरी कुटुंबाचे गावात प्रत्येक शेतक-याला सुमारे 70 लक्ष लिटर पाणी दरवर्षी मिळु शकेल. या सर्व कामासाठी सुमारे 283 लक्ष रुपयांचा निधी कसा उपलब्ध करता येईल हे आव्हान गावक-यांचे समोर उभे आहे. जलसंधारणाच्या कामाबरोबर, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा संकल्प आहे, शौचालया साठी पाणी तसेच विहिरी आणि नाल्यातील पुराचे जादा पाण्याचे भूपृष्ठा खाली पुर्नभरण, पाणी हिशोब, गावाचे उत्पन्न वाढविणे , आधुनिक शेती, पिक व्यवस्थापन या विविध विषयावर गावकरी सातत्याने काम करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची मला संधीच नव्हती. गावच्या ‘जल-स्वातंत्र्य’ लढ्यात सहभागी कस होता येईल, याच विचार चक्र माझ्या मनात सुरु झालयं.

जाखणगावाला जल-स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील व्हायची प्रेरणा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या कडुन मिळाली, आणि संपुर्ण गाव झपाटुन कामाला लागलं. पुण्याचे उद्योजक पद्माकर भिडे यानी ‘जाखणगाव पॅटर्न’ कॉक्रिंट बंधा-याचं नविन तंत्रज्ञान विकसीत केलं. लहान, मध्यम आणि मोठे असे हे प्रकार आहेत. भिडे यानी स्वत: तसेच त्यांचे मित्र आणि विविध कंपन्यांचे सहयोगातुन या कामां साठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. या कामात उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद लेले (पुणे) मोलाची मदत करत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक-सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून किमान क्षेत्र असले तरी यशस्वी होता येते हे कृतीतून दाखवून देणारे प्रयोगशील शेतकरी व पॉलिहाउस शेतीचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर बोडके (माण-हिंजवडी,पुणे) यांनी जाखणगाव शेतक-यांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘एका शेतक-याला वर्षाला 70 लाख लिटर पाणी पुरेसे आहे पण एक लीटर पाण्या पासुन 5 पैसे उत्पन्न कसे मिळवायचे याचे आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शेतक-याना शिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे एका शेतक-याला वर्षाला सहजपणे साडेतीन लक्ष रुपये उत्पन्न मिळु शकेल. एक एकर क्षेत्रात 25 हजार रोपांची ड्रिप आणि मल्चिंगच्या सुविधेने 25 विविध पिकांची लागवड करायची. वर्षातील तीन हंगामात 75,000 रोपांची लागवड होऊ शकते.प्रत्येक रोपापासुन 0.6 किलो प्रमाणे वर्षाला 45 टन सैंद्रिय उत्पादन. रुपये 8 प्रति किलो प्रमाणे फायदा रुपये 3.5 लक्ष. प्रत्येक रोपास रोज अर्धा लिटर प्रमाणे पाण्याची गरज सुमारे 40 लक्ष लिटर पाण्याची गरज असते. शेतीमाल निवडुन, स्वच्छ ग्रेडिंग आणि पॅकिंग करुन ग्राहकाच्या घरापर्यंत पोहचवण्याची आवश्यकता आहे. शेती व्यवसाय कारखानदारी प्रमाणे नियोजन पध्दतीने करणे ही काळाची गरज आहे,असे बोडके यांनी स्पष्ट केले.

जाखणगावची जल स्वाभिमान आणि जल स्वातंत्र्याची लढाईवीस शेतक-यांच्या शेतीची ही विविध मॉडेल्स पाहुया. पॉलिटनेल, ड्रिप मल्चिंग आणि इतर सुविधेच्या मॉडेलचा खर्च रुपये 15 लक्ष आहे. 20 जणांचे क्लस्टर खर्च रुपये 300 लक्ष आहे. ज्ञानेश्वर बोडके हा प्रकल्प काही सामाजीक संस्थांच्या मदतीने कसा साकार करता येईल याचा प्रयत्न करित आहेत.

कार्बन प्रदुषण रोखण्यासाठी जागतीक स्तरावर सन 2025 पर्यंत ‘सौर-उर्जा’(सोलर-पॉवर) वापरणार आहेत. सर्व वाहने सन 2030 पर्यंत बॅटरीवर चालणारी असणार आहेत. जागतीक स्तरावर काम करण्याचा अनुभव असणारे तीन न भारतीय उदयोजक 100 किलोव्हँटचा ‘सौर- उर्जा’ प्रकल्प, जाखणगावात सामाजिक कृतज्ञता निधी माध्यमातून (सीएसआर) कसा साकार करता येईल याचा प्रयत्न करत आहेत. तीन एकर जागेत ‘सौर- उर्जा’ प्रकल्प उभारण्याचे त्यांचे ध्येय आहे. ग्रामस्थाना ‘स्किल डेव्हलपमेंट’चे प्रशिक्षण देउन त्यांचे व्यवसाय या पार्क मध्ये उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे. सौर- उर्जा’ निर्मितीचा भव्य व्यवसाय जाखणगावात निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. गावातच रोजगार निर्माण झाला तर ग्रामस्थांचा स्थलांतराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ‘सोलर-पार्क’ मधिल ग्रामस्थांच्या व्यवसायासाठी मोफ़त वीजपुरवठा केला जाणार आहे. ‘सौर-उर्जा’ प्रकल्पाची मालकी ग्रामपंचायतीची असणार आहे. या सर्व कामासाठी दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

‘जल-बिरादरी’चे तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त अभियंता (जल संपदा विभाग,महाराष्ट्र) प्रभाकर बांदेकर(पुणे) यांच्या मार्गदर्शना नुसार गावाचे सर्व माहितीचे संकलन, गावातील युवकां मार्फत डिजीटल पध्दतीने करण्यात येत आहे. प्रत्यक्षात किती प्रगती झाली आहे याचे मोजमाप होणे गरजेचे आहे. भूपृष्ठावर आणि भूपृष्ठा खाली होणारा पाणीसाठा,पंपाने होणारा उपसा मोजला जाणार आहे. गावाचे पाणी बजेट, पीकवार उत्पन्न तयार करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाकडे असणारी साधन सामुग्रीची माहिती संकलित करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाचा उत्पन्न लेखा तयार करण्याचे काम सुरु आहे.

जाखणगावाची जलजीवन रेखा 100 कोटी लिटर म्हणजे 20 टक्के आहे. तर आधुनिक शेतीचे आधारकार्ड 50 हेक्टर म्हणजे अर्धा टक्का आहे. सध्या गावाचे दरडोई उत्पन्न 25 हजार रुपये आहे ते 75 हजार रुपयांपर्यंत कसे वाढवावयाचे हे आव्हान आपल्या समोर आहे. निसर्गाने पाणी सुविधा देउन आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. निसर्गाने बहाल केलेल्या सर्व सुविधा योग्य प्रकारे वापरण्याची कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी 760 लक्ष रुपये निधीची आवशकता आहे. जाखणगावचे शेतकरी, ग्रामस्थ झोकुन देउन काम करत आहेत. महाराष्ट्रातील 30 तालुक्यतील सुमारे 1500 गावात ही लढाई सुरु आहे. आपण ही या लढाईत सामिल होउ शकता.

पुण्यातील आमच्या जलमित्रानीही जाखणगावात श्रमदानात भाग घेणार आहेत. खारीचा वाटा म्हणुन 51 हजाराचा निधी ग्रामस्थाना सुपुर्त केला. सत्तर टक्के शेतीप्रधान देशातील शेतक-याना सुगीचे,समृध्दीचे दिवस निर्माण करण्यासाठी, गावाच्या जल स्वातंत्र्याच्या लढाईत सामिल व्हा. अंत्योदयाच्या चळवळीचे भागिदार व्हा.

संपर्क:


प्रभाकर बांदेकर ( Mobile 9420425038-email-pbbandekar@gmail.com जितेंद्र शिंदे (9881039513), एस.एन.महाडिक (9850829209-email-snmahadik74@gmail.com), बाळासाहेब शिंदे,टेलर(7350306997 balasoshinde0267@gmail.com), पुण्यातीलल जलप्रेमी रविवार 16 एप्रिल रोजी जाखणगावात जाउन श्रमदानात सहभागी होणार आहेत.आपण ही सहभागी व्हा.

(पुणे-सातारा अंतर 110 किलोमीटर असून सातारा - कोरेगाव - पुसेगाव असा मार्ग आहे.पुसेगाव पासून जाखणगाव 45 किलोमीटर अंतरावर आहे.पुसेगावच्या 5 किलोमीटर पुर्वी जाखणगाव फाटा लागतो.)