आणि एक नदी वाहती झाली
महाराष्ट्रात दोन सकारात्मक बदल झाले त्यातील एक होता तो दुष्काळ निवारण करण्यासाठी लोकांना जाणवले कि आपणच पुढे येवून काहीतरी ठोस केले पाहिजे आणि युवकांचा जलसंधारण कार्यातील पुढाकार.असेच अनेक युवक आणि कुटुंबं,गावकरी आणि गावं जल बिरादारीशी जोडली गेली,जोडली जात आहेत.’जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून ते दिसून आले.
‘जल बिरादरी’ हे ‘पर्यावरण संरक्षण,पाणी आणि नदी पुनरुज्जीवन’ या विषयावर तसेच राज्य आणि ‘राष्ट्रीय नदी धोरण’ तयार व्हावे म्हणून जाणीव-जागृती तसेच जमिनीवर प्रत्यक्ष कार्य करणारे राष्ट्रीय व्यासपीठ आहे.या क्षेत्रात कार्यरत विविध व्यक्ती आणि त्यांच्या संस्था आणि कार्याचा सन्मान करून त्यांना या व्यासपीठावर आदरपूर्वक सम्मिलित करून घेतले जाते.त्यांच्या ज्ञानाचा सर्वांना लाभ होईल असा प्रयत्न केला जातो.
”संत,समाज,शासन आणि संशोधक’ यांच्या समन्वयातून 'शाश्वत जल संधारण' आणि “नीर-नदी-नारी सन्मान’ या उपक्रमाद्वारे ग्रामीण आणि शहरी महिलांना नदी पुनरुज्जीवन कार्यातील शास्त्रीय,सामाजिक,कायदेशीर बाबीची माहिती देवून नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.. (संत म्हणजे जो निरपेक्ष भावनेतून नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत आहे)
राष्ट्रीय जल यात्रेचे आयोजन सन-२००२-२००३ या कालावधीत केले गेले.महाराष्ट्रात वर्धा ते गोवा असे जल यात्रेचे आयोजन होते. या 'जलयात्रे'ची थीम लाइन होती.”माणसांना नद्याशी जोडा”..या यात्रेत सहभागी झालेल्या अनेक उत्साही शेतकरी आणि सामान्य लोकांनी प्रेरणा घेवून आपापल्या भागात 'जल बिरादरी' स्थापन केली आणि ग्रामीण भागात जात-धर्म आणि राजकीय पक्ष विरहीत जल कार्यकर्ते तयार होण्यासाठी वातावरण तयार झाले.जल बिरादरीच्या प्रबोधनात्मक कार्यास सुरुवात झाली ती २००३ मध्ये. जलयात्रेनंतर सन २००३ ते २००९ राज्यभरात विविध उपक्रम,चर्चासत्रे,महाविद्यालयीन युवक संवाद,वार्षिक स्नेह संमेलनं,परिसंवाद,शासकीय स्तरावरील बैठका आणि लेखन या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कार्य विस्तारले त्यात प्रामुख्याने राजेंद्र सिंहजी यांची व्याख्याने आणि थेट-भेट याद्वारे माहिती आदान-प्रदान केली गेली
नदी पुनरुज्जीवन देशाला नद्याशी जोडण्याची चळवळ :
सन २००९-२०१० पासून ‘जल बिरादरी’ने 'नदी पुनरुज्जीवना'साठी वातावरण निर्मिती वाढविली.विधानसभा आणि लोकसभा लढविणा-या सर्व पक्षांना निवेदन देवून त्यांच्या जाहीरनाम्यात “नदी पुनरुज्जीवन” हा एकात्मिक जल संधारणाचा अविभाज्य भाग असावा,असे सुचविले आणि त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुख्य मुद्दा राहावा यासाठी प्रयत्न केले त्याचे फळ २०१३-१४ च्या निवडणुकात मिळाले.जवळपास सर्व पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात “जल संधारण”या मुद्द्यात “नदी पुनरुज्जीवन’हा विषय अधोरेखित केला.हे खूप मोठे आणि सांघिक प्रयत्नातून मिळालेले यश आहे.या वर्षी होत असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद.पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील हा विषय अग्रभागी राहावा असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
ओढे-नाले आणि नदी पुनरुज्जीवन:
सन २०१० पासून महाराष्ट्राला जागतिक तापमान बदलाचा मोठ फटका बसू लागल्याचे आपण पाहत आहोत.२०११,२०१२ हि दुष्काळी वर्षे ठरली.महाराष्ट्र सरकारने २०१२ साली “जलयुक्त शिवार’हा उपक्रम जाहीर केला तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख (विद्यमान सचिव,जल संधारण आणि रोजगार हमी योजना,महाराष्ट्र सरकार) यांची भेट घेवून ‘नदी पुनरुज्जीवन’ हा व्यापक स्तरावर आणि लोकसहभागातून करावयाचा कार्यक्रम असल्याचे त्यांना सांगितले आणि 'संत,समाज,शासन आणि संशोधक’ 'यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम राबवावा,असे सुचविले.जसे राजस्थानात डॉ.राजेंद्र सिन्हजीनी लोकसहभागातून घडविले,तसे आपण करू या.
एक फेब्रुवारी २०१३ आणि सहा एप्रिल २०१३ ..दोन मह्त्वाचे दिवस
एक फेब्रुवारी २०१३- आंतरराष्ट्रीय किर्लोस्कर-वसुंधरा चित्रपट महोत्सवावाच्या 'जल-आशय' या चर्चासत्राचे नियोजन माझ्याकडे होते.’जल-बिरादरी’ हे वसुंधरा महोत्सवातील एक उपक्रम संयोजक.पुण्यातील आर्ट गलरीत( घोले रस्ता,बालगंधर्व रंगमंदिरा समोरची गल्ली) आयोजित या कार्यक्रमास जल बिरादरीचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंहजी आणि आंतरराष्ट्रीय संगणक तज्ञ डॉ.विजय भटकर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात बलवडी(ता.खानापूर,जि.सांगली)येथील क्रांती-स्मृती वनाचे प्रणेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार आणि जल-बिरादरी सांगली विभागप्रमुख डॉ.रवींद्र वोरा आलेले.बरेच दिवस त्यांच्या मनात विषय घोळत होता तो आपल्या दुष्काळी भागात नदी पुनरुज्जीवन कार्याचा शुभारंभ झाला पाहिजे.किती वर्षे आपण डॉ. राजेंद्र सिंहजी यांच्या कार्याचे स्मरण करायचे आणि राजस्थान येथील सात नद्याचे पुनरुज्जीवन झाले आहे ते सर्वाना सांगायचे.आपण असे काम आधी करणार.
संपतराव पवार व डॉ,रवींद्र वोरा यांचा मार्मिक प्रश्न होता आम्हाला. आता योग्य वेळ आली आहे.महाराष्ट्रात दुष्काळ आहे गेली काही वर्षे आणि आता आपण जोर लावला तर शक्य आहे हे.‘अग्रणी-’दुष्काळी भाग खानापूर, तासगाव,कवठे महांकाळ या तालुक्यातून वाहणारी नदी अग्रणी.आपण तिला जीवंत करायची आणि सांगली जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात अग्रेसर करायचे.बळीराजा धारण उभारणीचा अनुभव त्याच्या कडे होता. डॉ.राजेंद्र सिन्ह्जीकडे त्यांनी प्रस्ताव ठेवला.डॉ.वोरा यांनी त्याला अनुमोदन दिलें आणि या चर्चासत्रात संपतराव पवार यांनी ‘बळीराजा’ धरण निर्मितीची माहिती देऊन या विषयास हात घातला.आपले अनुभव सांगितले.आता नव्या उमेदीने ते कामाला लागले.अग्रणीसाठी.राजेंद्र सिंहजीने त्यांचे सहकारी गोपालसिंह यांना अग्रणी भेटीसाठी बोलवा,असे सांगितल्यानंतर त्यांची भेट ठरविली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
सहा एप्रिल २०१३ रोजी विधानभवन,पुणे येथे प्रभाकर देशमुख यांनी पुणे विभागीय जिल्हाधिकारी आणि सर्व महत्वाच्या अधिकारी मंडळीची (सर्व जिल्हाधिका-यासह)दुष्काळ निवारण नियोजन बैठक आयोजित केली होती. तेथे आम्ही जल बिरादरी टीम गेलेलो.माझ्यासमवेत नरेन्द्र चुघ ( अग्रणी नदी पुनरुज्जीवन समन्वयक ) आणि विनोद बोधनकर ( अध्यक्ष,जल बिरादरी,पुणे ) होते.मी अग्रणी (जि.सांगली),माणगंगा (जि.सातारा)या दोन कोरड्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प प्रभाकर देशमुख यांच्यासमोर मांडला.मांडला आणि तो सर्व संमतीने स्वीकारला गेला.
प्रभाकर देशमुख यांच्याशी विस्तृत चर्चा झाली. जेवणाच्या सुट्टीत आम्ही चर्चा केली ती तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी डॉ.रामस्वामी यांच्याशी.त्याशी चर्चा करतांना 'माणगंगा 'नदी पुनरुज्जीवन 'कार्याचा विषय होता.सांगोला येथील सामजिक कार्यकर्ते वैजिनाथ घोंगडे आणि त्यांच्या सहका-यांनी माणगंगा नदी उगमापासून संगमापर्यंत (पंढरपूर ) पायी परिक्रमा केल्याचे त्यांना सांगितले आणि श्री घोंगडे आणि त्यांच्या सहका-यांना बोलावून घेण्याविषयी विनंती केली.त्यांच्याशी चर्चा करून पुढे सातारा जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीम ने 'माणगंगा' नदी पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेतली प्रभाकर देशमुख यांच्याशी जोडण्याचे संपूर्ण श्रेय जाते ते इंद्रजीत देशमुख यांना (सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,त्यावेळी ते पुणे विभागीय उपायुक्त होते विकास विभागाचे ) मुळचे ते सांगलीकर (माहुली निवासी)सच्चे अग्रणी पुत्र.त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्याशी आम्हाला जोडून दिले तर डॉ.वोरा यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी..
आणि एक पर्व सुरु झाले.अग्रणी पुनरुज्जीवनाचे..मग त्याचा जोरदार पाठपुरावा सुरु झाला.आणि पुढील दोन-तीन वर्षात आपण पहात आहोत की,परिवर्तन दिसून आले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ‘जलयुक्त शिवार’ हा उपक्रम राज्यव्यापी केला त्यात ‘अग्रणी पुनरुज्जीवन’ (अंदाजे लांबी ६५ किमी,कार्यक्षेत्र-विटा-खानापूर,कवठे महांकाळ,तासगाव हे तीन तालुके सांगली जिल्हा आणि अथणी,जि.बेळगाव) हा सांगली जिल्ह्याचा “फ्लँगशीप’ कार्यक्रम ठरला.२०१३ साली तत्कालीन जिल्हाधिकारी दिपेन्द्र्सिंह कुशवाह आणि आता शेखर गायकवाड यांनी आमच्या सर्व संकल्पना स्वीकारल्या आणि पाहता-पाहता लोकसहभागातून ६ बंधारे उभे राहिले.त्यात पाणी साठले.जमिनीत मुरले.मृतप्राय विहिरी आणि बोअरवेल जिवंत झाले .अवघ्या दोन-तीन वर्षात हा बदल दिसून आला. आता तर संपूर्ण अग्रणी नदी कार्यक्षेत्रातील १०७ गावे ही जोडली गेली आहेत.कर्नाटक राज्यात अथणी (जि.बेळगाव) पासून पुढे ४५ किलोमीटर ‘अग्रणी’वाहते,कर्नाटकातील शेतकरी आणि नदी कार्यकर्त्यांनी तेथे पुढाकार घेतला आहे.नरेंद्र चुघ ( पुणे ) यांच्या मार्गदर्शना व नेतृत्वाखाली आता हे काम सुरु आहे,ज्या मध्ये शेतक-यांना बांधावर लावण्यासाठी आंब्याची कलमे दिली गेली तसेच डोंगरमाथ्यावर व परिसरात वन व महसूल तसेच कृषी विभागाच्या मदतीने सलग समतल चर (सीसीटी) काढून पाणी साठविण्याचे काम जोमाने सुरु आहे.
(पुढे चालू.....)
(सुनील जोशी,संघटक :जल बिरादरी,महाराष्ट्र,पुणे )