पाण्याशी एकदा तांत्रिक शब्द जोडला की सर्व सामान्य माणसाचा सेवाभाव आणि समर्पित वृत्ती क्षणात नाहीशी होते आणि तो पाण्याचं काम आपला नाही हे मनाशी ठरवून टाकतो. ’हवामान बदल’ आणि ‘तापमान वाढ’ ही संकंट त्याची विचारधारा बदलण्यास उपयुक्त आहेत पण इंजिनिअर मंडळीची विचारधारा बदलवण्याची लढाई फार अवघड आहे.
‘हवामान बदल’ आणि ‘तापमान वाढ’ हे शब्द आता या देशात प्रत्येकाच्या तोंडी आहेत.सन दोन हजार पासून सर्व युरोपीय देश हा विषय आपल्या क्षमतेनुसार सोडवायचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलने,परिषदा नित्यनेमाने होत आहेत पण जो सामान्य माणूस,शेतकरी या बदलाचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका झेलत आहे आणि हा बदल म्हणजे नेमके काय घडतेय,हे चिंताजनक आहे तर मग आपल्याला काहीच कसे समजत नाही आपल्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा कोणी का प्रयत्न करीत नाही या विवंचनेत आहे.भारतीय उपखंड आणि मोसमी वारे यांच नाते गेली शंभर वर्षे भूगोल आणि सामान्य विज्ञान या विषयाच्या माध्यमातून आपणास शिकविले गेले आहे पण हे केवळ पुस्तकी ज्ञान या स्वरूपातच राहिले. हवामान बदल’ आणि ‘तापमान वाढ’ या बाबत भारतीय शेतकरी, जो प्रत्यक्ष शेती करतो,कसतो आहे त्याचे शैक्षणिक आकलन,त्याच्या पर्यंत पोहोचणारी शास्त्रीय माहिती,त्याला ती समजल्यानंतर त्याने ती किती उपयोगात आणली आहे याचे मूल्यमापन आणि उपयोगिता याच्या तंत्रशुध्द नोंदी केल्या आहेत का? केल्या असल्यास त्याचा खरंच किती उपयोग झालाय याबाबत सरकारची भूमिका काय आहे यावर कधीही चर्चा झाली नाही. खरतर ही चर्चा सर्व मिडीया (प्रिंट, इलेक्ट्रोनिक, सोशल) आणि विधानसभा,विधान परिषद अशा व्यासपीठावर होणे गरजेचे आहे पण तसे कधी झाल्याचे स्मरत नाही, दिसत नाही. जी चर्चा होते ती अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना दिली जावी, शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करावा,त्याचा सात-बारा उतारा कोरा करावा या व या धर्तीच्या चर्चा सातत्यपूर्ण होत आहेत. त्या शिवाय मोर्चा, संघर्ष यात्रा आणि आसूड यात्रा आदी राजकीय घटनाक्रम सत्ताबदल घडविणे,दबाव निर्माण करणे आदी हेतू समोर ठेवून काही हजार लोक प्रेरित केले जात आहेत पण मूळ प्रश्न यातून सुटणार आहे का ?
‘हवामान बदल’ आणि ‘तापमान वाढ’ म्हणजे अमुक आहे हे शेतक-यांकडून कधी समजावून घेणार ?शेतक-याचं या विषयाबाबत काय म्हणणं आहे हे आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंहजी यांनी अतिशय सोप्या भाषेत विषद केलं आहे.ते म्हणतात,’ धरती को बुखार आया है,मोसम का मिजाज बिघड गया है’ हे त्याचं विश्लेषण शेतक-यांच्या भावना योग्य शब्दात परिस्थितीचे स्वरूप प्रकट करतात.ही स्थिती थांबवायची असेल तर मग काय करायचे हे देखील त्या शेतक-यांनाच विचारायला पाहिजे.त्यांचा अनुभव,जो हवामान बदलाच्या आणि तापमान वाढीच्या फटक्यामुळे आलेल्या नुकसानीतून आहे.
तो सरकारने आपल्याकडे जमा केला पाहिजे त्या अनुभवाच्या आधारे आपली धोरणे बनविली पाहिजेत पण होते आणि होत आहे नेमके उलटे..त्याचे अनुभव आणि सूचना यांना महत्व दिले जात नाही तर त्याला त्याच्या नुकसानीचा पंचनामा आणि मिळणारी नुकसान भरपाई याकडे वळवून मूळ विषय ‘जैसे थे’ ठेवला जात आहे.वर्षानुवर्षे हेच चालत आले आहे.आज ही अनेक गावे आपल्या परिसरातील टेकड्या,झाडे,पाण्याचे ओहोळ, ओढे,झरे,नद्या,देवराई ही आपल्या गावाची ‘अचल संपत्ती’ आहे आणि त्याच रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे, असं समजत नाहीत तर हे सरकारच्या मालकीचं आहे, त्याच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही का घ्यावी,त्याचा आम्हाला काय फायदा ? या विचारधारेत अडकले आहेत. त्यांची ही मानसिकता ‘हवामान बदल’ आणि ‘तापमान वाढी’च्या संकटावर मात करण्यात प्रमुख अडथळा ठरत आहे.
गावांची मानसिकता बदलांच्या कार्यात डॉ. राजेंद्र सिंहजी,पोपटराव पवार,अभिनेता आमिरखान, नाना पाटेकर पासून अनेक दिग्गज आपल्या परीने काम करीत आहेत. हे सर्व घडण्यास काही कालावधी लागू शकेल पण प्रत्येक नागरिकाचा या दीर्घसूत्री कार्यात असलेला सहभाग कसा वाढविता येईल हे मात्र अग्रक्रमाने ठरविले गेले पाहिजे. सारा देश त्यासाठी पेटून उठला पाहिजे.
या वर्षी १५ मार्चपासूनच तापमान वाढ चढत्या क्रमाने होत राहिली आहे. गेले दीड महिना महाराष्ट्र तीव्र उन्हाळा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बाष्पीभवनास तोंड देत आहे. शासकीय स्तरावर असे बोलले जात आहे की महाराष्ट्रातील धरणसाठ्यातील जवळपास वीस टीएमसीहून पाणी या दीड महिन्यात तापमान वाढीमुळे नाहीसे झाले आहे. महाराष्ट्र एका सार्वकालिक आपत्तीला तोंड देणार आहे. मे आणि जून हे दोन महिने तीव्र उन्हाळ्याचे असल्याने आणखी बाष्पीभवन अपेक्षित आहेच. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीच्या प्रमुख शहरात,जी शहरे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत ते येत्या पंधरा दिवसात हाच निर्णय घेतील. लोकांना काटकसरीने पाणी वापर करण्यास भाग पडले जाईल. हे सर्व झाले प्रशासकीय सोय आणि नागरिकांना सुलभतेने पाणी मिळावे म्हणून करायची उपाययोजना.
मूळ प्रश्न परत जितल्या तिथेच आहे. तापमान वाढीचा फटका सुसह्य करण्यासाठी जमिनीच्या पोटात, भूगर्भात पाणी साठविणे हे प्रमुख काम प्रत्येक शेतकरी आणि नागरिकाने केले पाहिजे. त्यासाठी आपल्या परिसरातील भूगर्भाची शास्त्रशुद्ध माहिती प्रत्येक नागरिकाना दिली गेली पाहीजे. कोणत्या खडकात पाणी धरण करण्याची क्षमता आहे आणि नाही हे त्याला सहजतेने कळाले पाहिजे. जमिनीखालील पाणी वाढविण्यासाठीच नियोजन अन प्रयत्न ही घराघरात आणि मनामनात पोहोचले पाहिजे. राज्याचा भूगर्भ आणि पेयजल स्वच्छता, पाणी पुरवठा विभाग समाजापासून कोसो दूर आहे अगोदर या विभागात ‘लीडरशीप’ निर्माण झाली पाहिजे. हा विभाग राज्याचा कणा झाला पाहिजे. शाळा महाविद्यालये आणि सर्व विभाग जेथे लोक एकत्र येतात त्यांना या विषात अधिकाधिक गोडी निर्माण करण्याचे तंत्रशुद्ध आणि शास्त्रीय आधारावर प्रयत्न झाले पाहिजेत. भूगर्भ शास्त्रज्ञ एकमेकांशी सहयोगी भावना ठेवून काम करत नाहीत ही एक मोठ अडचण आहेच. त्यांच्यात अनेक मुद्द्यावर मतभेद आहेत ही चिंतेची बाब आहे.
अनेक वर्षे धरणातील पाणी बाष्पीभवन होऊन नाहीसे होत आहे.बाष्पीभवन रोखता येणे अशक्य आहे सध्या पण जे पाणी त्या माध्यमातून हवेत उडून जात आहे ते पाणी नद्या आणि ओढ्याच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च महिन्यात प्रवाही करता येणार नाही का,जेणेकरून त्या भ्गातील शुष्क नद्या आणि ओढ्यातून पाणी वाहिल्यांनी काही पाणी जमिनीच्या पोटात मुरेल. जलसंपदा विभागाने असा एखादा प्रयोग आणि प्रयत्न केला पाहिजे. त्यनी त्यांचे नियम आणि तरतुदी यांच्यात कालानुरूप बदल केला पाहिजे.धरणातील गाळ काढण्यास जल संपदा विभागास काहीही स्वारस्य नाही.
हा गाळ जमणारच आहे. आम्ही शंभर-पन्नास वर्षात किती गाळ जमू शकतो याचे गणित करूनच धरणाचा आराखडा आणि नियोजन करतो असे या जल संपदा विभागाचे म्हणणे आहे पण उजनी, जायकवाडी, कोयना अशी मोठी आणि शंभर टीएमसी पेक्षा जास्त जल साठा करण्याची क्षमता असलेली धरणे बाजूला ठेवून जी धरणे दोन ते वीस टीएमसी जल साठा निर्माण करू शकतात त्यातील गाल गाळ काढण्यासाठी एक धोरण आखले पाहिजे. तीव्र इच्छाशक्ती आणि सामुदायिक श्रमदानातून फार मोठे कार्य उभे राहू शकते. ’ग्रीनथंब’ संस्था दगडूशेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि काही औद्योगिक कंपन्याच्या सहायता निधीच्या मदतीने पुण्याच्या खडकवासला धरणातून गाळ काढण्याचे काम गेली चार पाच वर्षे करीत आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत पण जलसंपदा विभागास त्याचे फार कौतुक नाही आणि हे काम तांत्रिकदृष्ट्या कसे झाले आहे याचे मूल्यमापन करण्याविषयी देखील फार औत्सुक्य हा विभाग दाखवीत नाही.
पाण्याशी एकदा तांत्रिक शब्द जोडला की सर्व सामान्य माणसाचा सेवाभाव आणि समर्पित वृत्ती क्षणात नाहीशी होते आणि तो पाण्याचं काम आपला नाही हे मनाशी ठरवून टाकतो.’हवामान बदल’ आणि ‘तापमान वाढ’ ही संकंट त्याची विचारधारा बदलण्यास उपयुक्त आहेत पण इंजिनिअर मंडळीची विचारधारा बदलवण्याची लढाई फार अवघड आहे. समाजाभिमुख काम करताना पर्यावरण हा कळीचा मुद्दा असावा की समाजाच्या सर्व विचारधारा सांधणारा दुवा असावा हे जो पर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत हे अधांतरी राहणं क्रमप्राप्त आहे.