जायकवाडीच्या पाण्याचे बाष्पीभवन रोखणे महत्वाचे

Submitted by Hindi on Thu, 08/10/2017 - 12:05
Source
जलसंवाद, मे 2017

गोदावरी नदीवर असलेले हे धरण ३५ हजार हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली आहे. दगडमातीपासून बांधलेल्या धरणाची उंची ४१.३ मीटर, तर लांबी ९९९७.६७ मीटर एवढी आहे. दरवाजे इंग्रजी एस आकारातील असून लांबी ४७१ मीटर इतकी आहे. या दरवाज्यातून प्रतिसेकंद २२ हजार ६५६ क्षमतेचा विसर्ग होऊ शकतो. ३५० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या धरणात २९०९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे.

औरंगाबादमधील गोदावरी नदीवर असलेले प्रमुख धरण म्हणजे जायकवाडी. या धरणाच्या बांधकामाला १९६५ला सुरवात झाली. उद्घाटन १९७६ ला झाले. आजघडीला संपूर्ण मराठवाड्याची तहान जायकवाडी भागवते, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, ही तहान परिपूर्ण भागल्या जात नाही हे वास्तव आहे. दरवर्षी एकूण जलसाठ्यापैकी ५० टक्क्याच्या आसपास पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाते. दरवर्षी पाणी वाचविण्यासाठी असंख्य प्रकारचे प्रयोग जायकवाडीवर केले जातात. मात्र, बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतांना दिसत नाही. यासाठी शासन, प्रशासन आणि स्थानिक सामाजिक संस्था, संघटनांनी पुढकार घेऊन बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाल्यास बाष्पीभवनामध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट शक्य आहे.

असे रोखता येऊ शकते जायकवाडीचे बाष्पीभवन...


१. मुलभूत विज्ञानाचा विचार करता बाष्पीभवनाचा थेट संबंध पृष्ठभागाशी निगडित असतो. जितका जास्त पृष्ठभाग तितके जास्त बाष्पीभवन अधिक ठरलेले असते. प्रामुख्याने जायकवाडीचा विचार केला असता पृष्ठभागावर पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आहे. उदा. कपबशीचा विचार केल्यास बशीमध्ये असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन अधिक होईल. तर कपातील पाण्याची बाष्पीभवन उशीरा व कमी होईल. सध्या जायकवाडीचा आकार हा बशीसारखा आहे. जायकवाडी धरणाच्या स्थापनेपासून आतापर्यंत या धरणाची खोली वाढविण्याचा विचारही करण्यात आला नाही. वास्तविक ज्याठिकाणी खोलगट भाग आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. हा गाळ काढण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरने गेल्या वर्षी पुढाकार घेतला होता. त्यावेळी अक्षरक्ष: काही ग्रामीण भागातील मंदिराचे कळस दिसायला लागले होते. त्यामुळे सर्वप्रथम खोलगट भागातील गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता आहे.

२. दुसरी उपाययोजना म्हणजे पश्चिमेकडून येणार्‍या वार्‍यामुळे धरणाच्या पात्रातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. हे वारे अडविण्यासाठी पश्चिम दिशेच्या बाजूने सरकार, स्थानिक संस्था, सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मोठ्याप्रमाणात वृक्षरोपण करणे आवश्यकता आहे. वनीकरणामुळे वार्‍याचा थेट असलेला पाण्याशी संबंधी कमी होऊन बाष्पीभवन कमी करता येऊ शकेल.

३. उस्मानाबाद जिल्ह्यात मुरुम, वाशी, भूम, तुळजापूर, नळदुर्ग आणि अणदूर येथे पृष्ठभागावार बाष्पीभवन रोधक रसायन (फॅटी ऍसिड कंपाऊंड)चा तवंग निर्माण करून बाष्पीभवनाद्वारे होणार्‍या २५ ते ३० टक्के पाण्याची बचत झाली. हे रसायन बिनविषारी, जैवविघटनशिल आणि पर्यावरपूरक आहे. या योजनेवर गेल्या पाच वर्षात अंदाजे एक कोटी ३० लाख रुपये इतका खर्च आला. याद्वारे १६ प्रकल्पातील ३६ कोटी लिटर पाण्याची बचत झाली. पाणी वाचविण्यासाठी प्रति लिटर खर्च ९० पैसे इतका लागला. हे पाणी पिण्यास उत्कृष्ट असल्याचे प्रयोग शाळेने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे बाष्पीभवन रोधक रसायनाचा वापर जायकवाडीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास नक्कीच होऊ शकतो. त्याशिवाय शहरातील लहानमोठ्या जलाशयांसाठीदेखील या रसायनाचा वापर केला जाऊ शकतो. कमी खर्चिक असल्याने हे सर्वांच्याच हिताचे होईल.

थोडक्यात जायकवाडी


गोदावरी नदीवर असलेले हे धरण ३५ हजार हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली आहे. दगडमातीपासून बांधलेल्या धरणाची उंची ४१.३ मीटर, तर लांबी ९९९७.६७ मीटर एवढी आहे. दरवाजे इंग्रजी एस आकारातील असून लांबी ४७१ मीटर इतकी आहे. या दरवाज्यातून प्रतिसेकंद २२ हजार ६५६ क्षमतेचा विसर्ग होऊ शकतो. ३५० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या धरणात २९०९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. ओलिताखालील क्षेत्रफळ ३५ हेक्टरसह १०५ गावांचा समावेश आहे. डाव्या कालव्याची लांबी २०८ किलोमीटर एवढी असून त्याची क्षमता १००.८० घनमीटर प्रतिसेंकद एवढी आहे. त्याशिवाय उजव्या कालव्याची लांबी १७२ किलोमीटर असून ६३.७१ घनमीटर प्रतिसेकंद इतकी क्षमता आहे.

श्री. मुनीश शर्मा, प्रधान सचिव, एम.आय.टी.