लक्ष्मीरोड क्लबने राबविल्या जलसंधारणाच्या योजना

Submitted by Hindi on Sun, 04/16/2017 - 10:25
Source
जलसंवाद, मार्च 2017

जल व्यापुनी राही जीवन
तोय पिब म्हणती तयाला
जीवन जयांना मिळाले हो
ज्याच्यावाचून कष्ट अपार
जीवन त्याना कळले हो
नाही मिळाले जलबिंदू
जीवन त्यांचे संपले हो
चराचराला महत्व त्याचे
जीवन त्याना कळले हो

रोटरी क्लब ही सेवाभावी संस्था आहे कोणताच क्लब हा पैशाचा फायदा पहात नाही. परंतु या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण समाजाच्या सुखासाठी काही करतो आहोत हे समाधानच खूप मोठे आहे. ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर दिसणारे सुखसमाधान ही त्याची पोहचपावती आहे. आजही क्लबकडे जवळ जवळ 20-25 प्रकल्प मागण्य आहेत. डोंगरातील झरे शोधून काढून शुध्द पाण्यासाठी समाज क्लबकडे मागणी करीत आहे. आम्हालाही हे प्रोजेक्ट करायचे आहेत. आपल्यापैकी कोणी मदतीचा हात घेवून पुढे याल का ?

सजीवांसाठी पाणी हेच जीवन आहे. विश्वाची निर्मितीच पाण्यात झाली. पहिला सजीव पाण्यातच जन्मला. मग पाण्यावाचून सजीव कसा राहू शकेल ? इतकेच नाही तर निर्जीवांनासुध्दा पाण्याची आवश्यकता आहे. पृथ्वीवरील होणार्‍या घडामोडींमध्ये पाणी हा महत्वाचा घटक आहे. हे सर्व जरी खरे असले तरी पाण्याच्या बाबतीत जेवढी साक्षरता असायला हवी तेवढी समाजातील कोणत्याच घटकात दिसून येत नाही. निसर्गाकडून देणगीच्या स्वरूपात अगदी विनामूल्य मिळणारा हा जलस्त्रोत ! म्हणूनच की काय आपण त्याला कवडीचीही किंमत दिली नाही. असे झाले तर तो निसर्ग कोपणार नाही का ? म्हणूनच तो निसर्ग मधून मधूल दुष्काळ दाखवून त्याची किंमत पुरेपूर वसुल करतो.

महाराष्ट्रभर पुरेसा पाऊस पडूनही मार्च - एप्रिल महिना आला की सगळीकडे हाकाटी सुरू होते.. शहरात ही कमतरता जाणवतेच पण त्याची तीव्रता जाणवते ती ग्रामीण भागात. मग लेकी - बाळींना 5 - 6 कि.मी वरून डोक्यावर हंडे भरून पाणी भरावे लागते. ही स्थिती पुण्यासारख्या शहारापासून अवघ्या 30 कि.मी परिसरातील आहे.

या पाणी भरण्याच्या खटाटोपातून ना मुलींचे शिक्षण होते ना स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते. ही स्थिती लक्षात आली तेव्हा लक्ष्मी रोड क्लबने घरापर्यंत पाणी पुरविण्याचा संकल्प सोडला.

लक्ष्मी रोड क्लबचे काम :


एकट्या क्लबला सर्व महाराष्ट्रभरच्या स्त्रियांचे पाण्याचे हाल थांबविणे अशक्य आहे. पण आपला खारीचा वाटा क्लबने उचलला. कोळवण - मुळशी व रिहा या खोर्‍यातील घरापर्यंत पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला. सर्वच मेंबर्सनी त्याला हातभार लावला.

सन 2009 पासून या वॉटर प्रोजेक्ट ला सुरूवात झाली. सुरूवातीला या कामासाठी क्लबने पैसा उभा केला व काही प्रोजेक्टस् तडीला नेले. पण अशी अनेक कामे करावी लागणार या विचाराने रू. 19 लाखांची ग्रोबल ग्रँट मिळविली. यातून 22 प्रोजेक्टस् पूर्ण झाले आहे. अजूनही 2 प्रोजेक्टस् पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.लाभार्थी गावे - कातरखडक, आंधळे, माळवाडी, भालगुडी, जवण, माळवडी, नांदगाव, माळी, दलितवस्ती, निकंदवाडी इ.

प्रोजेक्ट कन्सेप्ट : संकल्पना


कोळवण, रिहा, मुळशी हा डोंगरी भाग आहे. या डोंगरावर पाण्याचे जीवंत झरे आहेत. अशा झर्‍यांचा शोध क्लबचा आर.सी.सी (रोटरी कम्युनिटी कोअर) विभाग घेतो. त्याची माहिती क्लबला पुरविली जाते. क्लब मिटिंगमध्ये त्यावर चर्चा होते व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होते.

फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे झर्‍याच्या कडेनी 3 फूट खोलीचा खड्डा तयार केला जातो व तेथे कुंड तयार केले जाते. दोन झरे असतील तर दोन कुंड तयार केली जातात. ती सिमेंटनी बांधून घेतली जातात. त्यामुळे कुंडातील पाणी पुन्हा झिरपत नाही अगर ते माती मिसळून खराब होत नाही.

उंच डोंगरावर कुंड बांधल्यामुळे ते पाणी गुरूत्वाकर्षणाने डोंगराखाली गावालगत पाईपच्या सहाय्याने आणले जाते. त्यासाठी दुसर्‍या कोणत्याही खर्चिक उर्जेची जरूरी लागत नाही. गावालगत उंचावर दुसरे कुंड बांधले जाते. त्याला आपण टाकी म्हणतो. ह्या टाकीत हे पाणी साठविले जाते ते तेथून पुन्हा गुरूत्वाकर्षणाने नळांच्या सहाय्याने घरोघरी पुरविले जाते.

यामधून अनेक फायदे होतात -


1. झर्‍यांचे पाणी निसर्गत:च शुध्द असल्याने व झरे उंच डोंगरावर अस्पर्श राहिल्याने त्याला वेगळ्या शुध्दीकरणाची जरूरी रहात नाही.

2. ग्रॅव्हिटीने पाणी येत असल्याने विजेची जरूरी (पंप) भासत नाही.

3. बाकी कोणताच खर्च नसल्याने एकदा कुंड व टाकी तयार करणे. यासाठी होणारा खर्च सुरूवातीला केला की फक्त पाईप जुने झाल्यास बदलण्याखेरीज दुसरा खर्च नाही. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 2009 पासून आमचे वॉटर प्रोजेक्ट सुस्थितीत चालू आहेत. एका प्रोजेक्ट साठी साधारणपणे 4 ते 5 लाख रूपये खर्च येतो. त्यातील मुख्य खर्च हा जी.आय पाईप चा आहे.

गावकर्‍यांना होणारे फायदे :


1. 365 दिवस 24 X 7 असा शुध्द पाणी पुरवठा मिळतो.

2. गावात 300 - 400 लोकसंख्या असेल त्यांना विनाखर्च घरपोच शुध्द पाणी पुरवठा होतो.

3. स्त्रियांना 5 ते 8 कि.मी वरून डोक्यावर पाणी आणावे लागत असे. त्यात त्यांची शक्ती व वेळ जावून दिवसभर फक्त पाणी भरण्याचेच काम होत असे. त्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात येत असे. या श्रमातून त्यांची सुटका तर झालीच पण क्लबच्या पुढील दूरदर्शीपणामुळे त्यांनी आर्थिक स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी शिवणयंत्र वाटप तसेच गोधन सारखा गोबर गॅस प्लांट प्रोजेक्ट दिला गेला. त्यातून त्या अर्थार्जन करून स्वावलंबी बनण्यास मदत झाली. यातून रोटरी इंटरनॅशनची Empowerment of Women हे उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य झाले.

4. पाणी भरण्यातून मुलींचीही सुटका नसायची त्यामुळे त्या शाळेत जावू शकत नव्हत्या. पण प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वीच तेथील सरपंचांकडून मुली शाळेला जातील असा करार केला होता त्यामुळे मुलींचे शिक्षण सुरू झाले. ‘बेटी पढाओ’ चा आजचा नारा क्लबने यापूर्वीच अंमलात आणला होता.

5. महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी क्लबने वाचनालय सुरू करून दिले आहे.

6. महिलांमधील हिमोग्लेबिनचे प्रमाण वाढलेले असून त्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभलेले आहे.

7. सर्वात महत्वाचे म्हणजे या गावातून पूर्वी नवर्‍या मुलांना मुली मिळत नवसत. कारण डोक्यावरून लांबून पाणी आणावे लागत असे पण आता घरोघरी पाण्याची सोय झाल्याने गावातील मुलांना नवरी मुलगी मिळून त्यांचे लग्न होवू लागली आहेत.

8. गुरांसाठी चारा व पाणी यांची सोय झाली आहे.

सॅलियंट फिचर :


1. लाभार्थी 10 ते 15 हजार व्यक्ती

2. पाणीसाठा जास्त असल्यास शेजारच्या वाडीवस्तीवरही पाणी देता येते.

3. गावातील लोक श्रमदानानी टाकी बांधतात. पाईप जोडतात. म्हणून खर्च कमी येतो

4. फुकट वस्तूची किंमत नसते यासाठी गाव रू. 5 ते 10 हजार खर्च करते. बाकी खर्च क्लब सधन व इच्छुक व्यक्तींकडून डोनेशन स्वरूपात घेतो

6. इतर ठिकाणी इतर संस्थांकडून बंधारे खूप बांधले गेले पण तेथे पंप व वीज यांचा वापर होत असल्याने विजेचे बील न भरल्याने प्रकल्प काही ठिकाणी बंद पडले. तसे येथे होत नाही.

उद्दिष्ट्य पूर्ती :


रोटरी क्लबच्या उद्दिष्ट्यानुसार पिण्याचे पाणी, स्त्रियांचे सबलीकरण, मुलींचे शिक्षण, आरोग्य व ग्रामस्वास्थ्य अशी विविध उद्दिष्ट्ये यातून सफल झाली आहेत.


रोटरी क्लब ही सेवाभावी संस्था आहे कोणताच क्लब हा पैशाचा फायदा पहात नाही. परंतु या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण समाजाच्या सुखासाठी काही करतो आहोत हे समाधानच खूप मोठे आहे. ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर दिसणारे सुखसमाधान ही त्याची पोहचपावती आहे. आजही क्लबकडे जवळ जवळ 20-25 प्रकल्प मागण्य आहेत. डोंगरातील झरे शोधून काढून शुध्द पाण्यासाठी समाज क्लबकडे मागणी करीत आहे. आम्हालाही हे प्रोजेक्ट करायचे आहेत. आपल्यापैकी कोणी मदतीचा हात घेवून पुढे याल का ?