भिगवण रोटरीने घेतला भविष्यातील पाण्याचा वेध

Submitted by Hindi on Sat, 04/15/2017 - 13:06
Source
जलसंवाद, मार्च 2017

20000 लोकसंख्या असलेल्या या गावात धुणी- भांडी, आंघोळ इत्यादी स्वरूपात माणसी 500 लिटर या प्रमाणे दिवसाला दहा हजार लिटर पाणी वाहूत जाते. गावातील सदोष व उघड्या गटार अवस्थेमुळे हे पाणी ठिकठिकाणी साचून डबके निर्माण होतात. या डबक्यात डास व इतर जीवाणुंची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. शिवाय मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण हे गाव.... आज मीतीला आजूबाजूच्या वाड्या - वस्त्या धरून येथील लोकसंख्या सुमारे 20000 च्या घरात असावी. पर्जन्य छायेतील या परिसारत सरासरी 400 ते 500 मीलीलिटर पाऊस पडतो. त्यामुळे पाणीटंचाई ही ओघानेच आली. परंतु उजनी धरणातील पाण्याचा पसारा लागूनच असल्यामुळे येथील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न बर्‍यापैकी मार्गी लागला. पुणे - सोलापूर महामार्गावर दक्षिणोत्तर वसलेल्या या गावाला पश्‍चिम बाजूने डोंगर असल्यामुळे पश्‍चिम पूर्व उतार असलेली भौगोलिक रचना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे गावात दाबाने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यात स्थानिक प्रशासनाला अद्याप तरी यश आलेले नाही. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाने पाण्याच्या संदर्भात वेळोवेळी अनेक योजना राबविल्या परंतु गावाची भौगोलिक रचना, पाणी व्यवस्थापनातील असंख्य गोष्टी इत्यादीमुळे उशाशी पाणी असूनही गाव सतत तहानलेलेच... अशी अवस्था पहायला मिळते. गेली 5 ते 6 वर्षात अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच तीव्र झालेली आहे. अशा परिस्थितीवर मात करण्याकरिता गेली चार - पाच वर्षे घराघरात कुपनलिका घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र दिवसागणिक जमिनीतील पाणी पातळी खोल जात असल्यामुळे कुपनलिकांची अवस्था बिकट झालेली आहे.

गेल्या चार - पाच वर्षांपूर्वी रोटरी या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संस्थेची येथे स्थापना झाली. गावातील असंख्य सुजाण व सेवाभावी व्यक्तिंचा या संस्थेत समावेश असल्यामुळे या संस्थेने गावातील अनेक समस्यांचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले. अवघ्या तीन - चार वर्षात समाजाभिमुख असे अनेक उपक्रम भिगवण रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात आले. त्यातील पाणी समस्या हा उपक्रम म्हणजे रोटरी क्लबच्या कार्याचा कळस म्हणावा लागेल.

मध्यंतरी दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली. तेव्हा परिसरात मिळेल तेथे पाणी मिळण्याचा प्रयत्न होत होता. हे पाणी साठविण्याकरिता बर्‍याच ठिकाणी साधने उपलब्ध नव्हती. त्या करिता सुमारे एक हजार लिटर पाणी साठवण क्षमतेच्या वीस टाक्यांचे वाटप रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले.

भिगवण हे पुनर्वसित गाव आहे. त्यामुळे या गावाला लागूनच वनविभागाचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांचे वास्तव्य असते. दुष्काळी परिस्थितीत या वन्य प्राण्यांवर पाण्याकरिता भटकण्याची वेळ निर्माण झाली होती. पाण्याअभावी या क्षेत्रातील प्राणी मरायला लागले होते . अशा वेळी येथील वनक्षेत्र परिसरात असलेले सर्व पाणवठे टँकरद्वारा पाण्याने भरून वन्य प्राण्यांकरिता पाण्याचा पुरवठा करण्याचे कार्य भिगवण रोटरी क्लबने केले.

20000 लोकसंख्या असलेल्या या गावात धुणी- भांडी, आंघोळ इत्यादी स्वरूपात माणसी 500 लिटर या प्रमाणे दिवसाला दहा हजार लिटर पाणी वाहूत जाते. गावातील सदोष व उघड्या गटार अवस्थेमुळे हे पाणी ठिकठिकाणी साचून डबके निर्माण होतात. या डबक्यात डास व इतर जीवाणुंची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. शिवाय मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ युनीव्हर्सीटी चॅरीटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्यातून व सिंडीकेट बँक यांच्या सी.एस.आर फंड मधील दहा लाख रूपयांच्या आर्थिक मदतीतून सुमारे एक हजार शोष खड्ड्यांचे काम करण्यात आले. हे खड्डे घेण्याकरिता पुणे रोटरी वॉटर कमिटी प्रमुख व जलतज्ज्ञ श्री. सतिश खाडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले या करिता स्वत:ची पॉकलेन मशीन खाडे यांनी मोफत दिली होती.

या मशिनच्या सहाय्याने गावातील एक हजार कुटुंब राहत असलेल्या त्यांनी सुचवलेल्या जागेत खड्डे घेण्यात येवून त्यात तंत्रशुध्द पध्दतीने शोष खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमाधारे गावातील दिवसाला वाहून जाणार्‍या दहा लाख लिटर पाण्यापैकी कमीत कमी 5 लाख लिटर पाणी वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यानुसार वर्षाला अठरा ते एकोणीस कोटी लिटर पाणी वाचविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढून भविष्यात कुपनलिकेद्वारे शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा नारकिरांना होवू शकेल.

महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण यामुळे लहानमोठी 150 ते 200 हॉटेल्स, उपहारगृह, खानावळी येथे आहेत. त्या प्रत्येकातून दिवसाला सरासरी 300 ते 500 लिटर घाण पाणी उघड्या गटारीमधून वाहून जाते. व गावातील सखल भागात हे पाणी साठून तेथे दुर्गंधी पसरते. यामुळे सुध्दा गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकरिता बंदिस्त गटार योजनेतून ही गटारे बंद करून गटार मुक्त गावाची संकल्पना भिगवण रोटरी क्लबने राबविलेली आहे. या शिवाय ही गटारे जेथे जावून थांबतात त्याठिकाणी शोष खड्ड्यांचे आयोजन करून हे ही पाणी जमिनीत मुरवण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले.