Source
जलसंवाद, मार्च 2015
पाणी पंचायतचे प्रणेते कै. विलासरावांनी समन्यायी पाणी वाटपाचे तत्व मांडले. निसर्गाकडून मिळणार्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. सर्व माणसाच्या गरजा भागविण्यासाठी त्याचे समप्रमाणात वाटप झाले पाहिजे. भारतात पाणी प्रश्नावर काम करणार्या कोणत्याही माणसाला विलासरावांना टाळून पुढे जाता येणार नाही.
पुरंदर हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी तालुका. सरासरी 350 ते 500 मि.मी पाऊस पडतो या भागात. सप्टेंबरमधील परतीचा पाऊस येथे प्रामुख्याने चांगला पडतो. परंतु हा पाऊसही वेळेवर पडला नाही तर दुष्काळ पडतोच. 2009, 2010, 2011 अशीच कमी पावसाची वर्षे झाली आणि 2012 साली कित्येक गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली.ग्राम गौरव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. प्रशांत बोरावके याच काळात परिसरातील गावांमध्ये पाहणी करत होते. संस्थेचे कार्यालय खळद येथे आहे. याच पंचक्रोशीत फिरतांना कुंभारवळण गावात टँकरची वाट पाहत अनेक गावकरी, महिला, मुले उभी होती. 1400 लोवस्तीतील गावाला पाण्याची गरज भागविण्यासाठी दररोज 5000 रूपये खर्च होता. या व्यतिरिक्त कित्येक शेतकरी फळबागा जगविण्यासाठी टँकरने पाणी विकत घेत होते. गावात एक दीड अडीच एकर क्षेत्र असणारे अल्पभूधारक शेतकरी जास्त आणि हाताने प्रत्यक्ष शेती करणारा हा शेतकरी असा दुष्काळी परिस्थितीत हतबल व निराश होतो. कुंभारवळण गावातील पाणलोट समितीचे सचिव श्री. प्रशांत कुंभळकर हे एक उमदे कार्यकर्ते, त्यांच्याकडे गावाच्या पाणलोट क्षेत्र विकासाचा IWMP चा कार्यक्रम सुरू होता. पण सरकारी कामात नियोजनाचा अभाव दिसत होता.
कामांचा प्राधान्यक्रम व्यवस्थित नव्हता. कुंभारवळण मधील 14 माती बंधारे नादुरूस्त झाले होते. गाळ साठल्याने साठवण क्षमता कमी झाली होती. काहींचे सांडवडे नादुरूस्त होते. सर्व लोकांच्यामते हे काम केले तर पावसाळ्यात पाणी साठून याचा गावातील मोठ्या क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होईल. ग्राम गौरव प्रतिष्ठान च्या सोनाली ताई व कल्पना ताई, प्रशांत बोरवके आणि प्रशांत कुंभारकर यांनी सर्व गावाची पाहणी केली. कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. एप्रिल महिन्यातच कामाला सुरूवात केली व पावसाळ्यापूर्वी जर काम पूर्ण झाले तर गावाला त्याचा नक्कीच फायदा होईल अशी सर्वांची खात्री झाली.
डॉ. सोनाली शिंदे ग्राम गौरवच्या कामात सहभागी होत्या आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड शाखेच्या सदस्या आहेत. त्यांनी रोटरी मिटिंग मध्ये कुंभारवळणच्या दुष्काळी कामांचा प्रस्ताव मांडला. अध्यक्ष रो. प्रकाश उमराणी, रो. किरण, रो. ऋत्विज, रो. चिटणीस व सर्व क्लबनेच या कामासाठी पाठिंबा दर्शविला. दीर्घकालीन फायदा होईल असे सलग 5 ते 7 वर्षे या गावात काम करण्याचा निश्चय केला. रोटरीचे सदस्य कुंभारवळण ग्रामस्त, पाणी पंचायतचे कार्यकर्ते अशा सर्वांची गावच्या मंदिरातील बैठकीत चर्चा झाली. ग्रामस्थांनी आपली मते मांडली. अध्यक्ष प्रकाश उमराणी यांनी ग्रामस्थांना रोटरीचे संकल्पना सांगितली आणि अशा उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग अत्यावश्यक कसा आहे हे सांगितले.
कल्पना ताईंनी पाणी पंचायतीची पाणलोट क्षेत्र विकासाची संक्लपना सांगितली. उपलब्ध होणार्या पाण्याचे नियोजन होणे देखील महत्वाचे आहे हे समजावले. ग्रामस्थांनी या कामातील सहभाग म्हणून श्रमदान करण्याचे कबुल केले. या उपक्रमास 2 लक्ष हजार रूपये देण्याचे रोटर अध्यक्षांनी आश्वासन दिले. सासवड मधील किर्लोस्कर चिलर्स या कंपनीने कार्पोरेट सोशल स्स्पिॉन्सीबिलिटी (CSR) मार्फत हा निधी रोटरी क्लब ऑफ कोथरूड ला दिला. ग्राम गौरव संस्थेमार्फत या प्रकल्पाचे कुंभारवळण मध्ये पुढील 2 महिने युध्द पातळीवर काम सुरू राहिले. गावात मिटिंग, कामाची आखणी, शेतकर्यांना प्रकल्प समजावणे, अशी देखील कामे समांतर सुरू होती. पुरंदरच्या त्यावेळेसच्या तहसिलदार सिमा होळकर यांनीही ग्रामसंस्थांशी संवाद साधला व लहान मोठे वाद मिटवले.
गाळ काढण्याचे काम सुरू झाल्यावर गावातील फलकावर जे शेतकरी गाळ वाहून नेणार आहेत त्यांची नावे त्यांच्याशी संपर्क करून त्याचे नियोजन होत होते. प्रशांत कुंभारकर खराडी येथील आय टी कंपनीत रात्रपाळी करून दिवसा गावातील या कामावर हजर असे. त्याचा ग्रामस्थांशी चांगला संवाद होता. कामाची आखणी व देखरेख याची जबाबदारी ग्राम गौरवची होती. कल्पनाताई व सोनालीताई वेळोवेळी कामाची पाहणी करत होत्या.
कुंभारवळणच्या महिला सरपंच सुनिता कुंभारकर या ग्रामस्थांसह श्रमदानासाठी हजर होत्या. या कामामुळे गावही संघटित झाले. गावातील तरूणही कामात सहभागी झाले. गाळ वाहून नेण्याचे काम शेतकर्यांनी स्वखर्चाने केले. या गाळातून त्यांच्या जमिनी ही सुपिक झाल्या, सर्व विहीरींच्या पाण्याच्या पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. गावात वेळोवेळी होणार्या सभांमध्ये पिक नियोजन, चार पिकांची माहिती देण्यात आली. ऊस कांदा केळी इ. पिकांना पाणी जास्त लागते याबाबत वारंवार जागृती करण्यात आली. भूगर्भातील पाणी वाढविण्यासाठी पाणी अडवणे, जिरवणे, वृक्ष लागवड हे सारे महत्वाचे आहे, हे सांगण्यात आले. रो. सतिश खाडे यांचे जलसाक्षरतेसाठी पाण्याचा ताळेबंद हे व्याख्यान गावकर्यांसाठी आयोजित करण्यात आले. सर्वांच्या सहभागाने व मेहनतीने काम पूर्ण झाले. या कामात ग्राम गौरवने काही उद्दिष्ट्य ठेवले होते -
1. गावकर्यांना वर्षभर पिण्याचे पाणी मिळावे.
2. कुंभारवळण मधील सिताफळ, डाळिंब या सारख्या 100 एकर क्षेत्रातील फळबागांना सुरक्षित सिंचन निर्माण करणे.
3. जनावरांना 12 महिने पुरेसा चारा गावातच उपलब्ध होणे.
जुलै 2013 मध्ये पाऊस पडला. सर्वजण प्रशांत च्या फोनची उत्सुकतेने वाट पाहात असत. सर्व बंधार्यात कित्येकदा पाणी साठून ते जिरवले गेले. गेली 4 वर्षे ग्राम गौरव संस्था येथील विहीरींच्या पातळीची नोंद ठेवत आहे. या कामानंतर आजपर्यंत कुंभारवळण गावात पाण्याचा टँकर आला नाही. आजही उन्हाळ्यात विहीरींना पुरेसे पाणी असते. चारा भरपूर आहे, फळबागांसाठी पाणी विकत घ्यावे लागत नाही. 2016 मध्ये गावातील ओढे पावसाळ्यात न भरता हिवाळ्यात ओढ्यांना पाझर फुटून भरले. याचाच अर्थ भूगर्भजलाचे उत्तम प्रकारे पुनर्भरण झाले. यानंतर कोथरूड क्लबने कुंभारवळण येथे वृक्षारोपण, शाळेत RDEP असे अनेक प्रकल्प राबविले. गावाचे आणि कोथरूड रोटरी क्लबचे एक नातेच निर्णाण झाले.
ग्राम गौरव प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व ‘पाणी पंचायत’ या चळवळीचे प्रणेते कै. विलासराव साळुंखे यांनी 1974 ते 1985 या काळात पुरंदरमधील नायगाव गावात पाणलोट क्षेत्र विकास करून गावाचा कायापालट केला. विलासराव आणि कल्पनाताई पाणी प्रश्नासाठी आयुष्य वेचले व अचूक उत्तरही शोधले. सर्वांना पाण्याचा हक्क आहे आणि माणसी अर्धा एकर सिंचन योजना, पाण्याचा ताळेबंद, जल जंगल व्यवस्थापन यातून पाणी प्रश्नासाठी अचूक उत्तरही शोधले. विलासराव नेहमी म्हणत महाराष्ट्रातील पाणी टंचाई ही निसर्ग निर्मित नसून मानवनिर्मित आहे. राजकीय उदासीनता, ऊसासारख्या पिकांना राजाश्रय, शेतमालाला हमी भाव नसणे या महत्वाच्या मानवनिर्मित अडचणी आहेत.
आज ग्राम गौरव प्रतिष्ठानचे खळद येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे. येथे पाणलोट क्षेत्र विकास, जलव्यवस्थापन, सेंद्रीय शेती, वनीकरण, मृदसंधारण याबाबात शेतकर्यांसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम होतात. रोटरी क्लब ऑफ हील साईड च्या मार्फत डॉ. मिनाताई बोराटे यांनी ही कोथरूड क्लबच्या सोबतीने एखतपूर - मुंजवडी या गावात जलसंधारणाचे काम केले. शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. या भागातील 12 शाळांमध्ये कोथरूड क्लब मार्फत RDEP बसविले आहेत. खळद येथील माध्यमिक शाळेत रोटरी अभ्यासिका बसविण्यात आली आहे.
कुंभारवळण मधील जलसंधारणाचे काम हे लोकसहभाग, रोटरी सारखी सामाजिक काम करणारी संस्था, ग्राम गौरव ही गाव पातळीवर काम करणारी सेवाभावी संस्था, प्रशासन, किर्लोस्कर चिलर्स इंडस्ट्रीज या सर्ऴांनी एकत्रित येवून केलेल्या श्रमाचे फलीत आहे.
2013 पर्यंत कुंभारवळण गावातील सर्वच बंधारे गाळमुक्त झाले. गायरान क्षेत्रावर सलग समतल चरांची निर्मिती, वृक्ष लागवड, नवीन छोटे तलाव, रस्ते यासारखी कामे पूर्ण झाली. गावातील 100 कुटुंबांना शेवगा, लिंबू, कढीपत्ता, आंबा, अडूळसा अशी 5 गृहपयोगी झाडे देण्यात आली. आज त्यातील बहुतांशी वृक्ष शेतकर्यांच्या परसबागेत बांधावर उभी आहे. 2014 साली शासनातर्फे 325 हेक्टर वर कुंभारवळण गावात बांधबंदिस्तीची कामे झाली.
या सर्व कामांचा एकत्रित परिणाम म्हणून 2011 साली गावाची असणारी पाणी साठवण क्षमता 16 कोटी वरून तब्बल आठ पटीने वाढून आज 121 कोटी लिटर झाली आहे. मागील दोन्ही उन्हाळ्यात मार्च - एप्रिल - मे मध्ये परिसरातील 20 विहीरींची पाणी पातळी मोजली तेव्हा अगदी सरासरी 200 मि.मी पावसातच पाणीपातळीत 1.76 मीटरची वाढ दिसून आही. गेली 3 वर्षे शिवारात पडलेला थेंब अन् थेंब जमिनीत मुरवला जात आहे. ओढ्यातून नदीला पाणी जावू दिले नाही त्यामुळे हे सर्व पाणी जमिनीत मुरून शेतकर्यांना पाण्याचा शाश्वत स्त्रोत सापडला. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला तसेच गावातील प्रश्नांसाठी एकत्र येवून काम करण्याचा आनंद ही लोकांना समजला त्यातून त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला. 13 हेक्टर वर असणार्या फळबागांचे प्रमाण तिपटीने वाढून 42.5 हेक्टर वर पोहोचले.
2016 चा खरीप हंगाम कमी पावसामुळे वाया गेला. रब्बीच्या सुरूवातीस पडलेला 84 मि.मी व त्यानंतरचा 197 मि.मी पाऊस हा ही तसा अल्पच परंतु एकूणच जलसंधारणाच्या कामांचे हे पाणी गावाच्या शिवाराबाहेर गेलेच नाही. परिणाम शिवारातील विहीरी, विंधन विहीरींना पाणी वाढले, पाझराने 7 बंधारे भरले. त्या रब्बी हंगामात 120 हेक्टर वर गहू व 90 हेक्टर वर कांदा पिक जोमाने वाढले. तत्कालीन बाजार भावाचा विचार करता 1.5 कोटी ची उलाढाल त्या हंगामात झाली. हे सर्व शक्य झाले ते जलसंधारणामुळेच. गावातील लोकांच्या सहभागातून राबविलेली जलसंधारण उपक्रम पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण करू शकतात. हाच खरा शाश्वत ग्राम विकासाचा मार्ग आहे.
पाणी पंचायतचे प्रणेते कै. विलासरावांनी समन्यायी पाणी वाटपाचे तत्व मांडले. निसर्गाकडून मिळणार्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. सर्व माणसाच्या गरजा भागविण्यासाठी त्याचे समप्रमाणात वाटप झाले पाहिजे. भारतात पाणी प्रश्नावर काम करणार्या कोणत्याही माणसाला विलासरावांना टाळून पुढे जाता येणार नाही.
पाणलोट क्षेत्राचा करूनिया विकास
पाणी साठवून वाटूया समान
बीज रूजवून सजवुया निसर्ग
करूया दुष्काळाचा सुकाळच सर्वजण.
उदक चालवावे युक्तिने आणि महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे नियोजन विलासरावांची दोन पुस्तके महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाची उत्तरे आहेत. याची अंमलबजावणी करणे हे राजसत्तेच्या हातात आहे.