Source
जल संवाद
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतीय जलसंसकृती मंडळ, औरंगाबादचे सहावे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन, चंद्रपूर येथील, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे शनिवार दि.18 व रविवार दि.19 डिसेंबर 2010 रोजी पार पडले. सदरील आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.विकास आमटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे, स्वागताध्यक्ष शांताराम पोटदुखे, जलसंस्कृतीमंडळाचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे, आमदार शोभा फडणीस, प्राचार्य मदन धनकर, डॉ.जाकीर शेख व्यासपीठावर हजर होते.
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतीय जलसंसकृती मंडळ, औरंगाबादचे सहावे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन, चंद्रपूर येथील, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजी येथे शनिवार दि.18 व रविवार दि.19 डिसेंबर 2010 रोजी पार पडले. सदरील आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.विकास आमटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे, स्वागताध्यक्ष शांताराम पोटदुखे, जलसंस्कृतीमंडळाचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे, आमदार शोभा फडणीस, प्राचार्य मदन धनकर, डॉ.जाकीर शेख व्यासपीठावर हजर होते.या संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील मरणासन्न नद्या या विषयावर डॉ.सुधीर भोंगळे यांच्या अधयक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रामध्ये, मॅगसेसे पुरस्कार विजेते मा. राजेंद्रसिंहजी, डॉ.एस.एन.कुलकर्णी, प्रा.अनिल नितनवरे. किशोर वरंभे व संजय बौध्द यांनी सहभाग घेऊन आपआपली मते व्यक्त केली.
यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहजी यांनी नद्यांच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला. विकासाच्या नादात आपण देशातील नद्यांचे अस्तित्व हरवून बसलो आहोत. भारतातील सर्व मोठ्या नद्यांना आता नाल्याचे स्वरूप आले आहे. नद्यांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढून नद्या प्रदूषित झाल्या आहेत. आता याच नद्या स्वच्छ करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जात आहेत. यातून काहीही साध्य होतांना दिसून येत नाही. हा सारा प्रकार घाण राजकारण या सदरात मोडणारा आहे. अशी घणाघाती टिका राजेंद्रसिंहजी यांनी बोलतांना केली. देशातील नद्या सध्या अतिक्रमण, प्रदूषण व शोषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. हा विळखा सोडविण्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या मुद्यावर सामुदायिक विकेंद्रिय व्यवस्थपनाची गरज आहे. हे व्यवस्थापन राबवण्यासाठी केवळ सरकारच नाही तर समाजाने देखील समोर आले पाहिजे, शेवटी समाज म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.
समाज व सरकारच्या दुर्लक्षामुळे देशातील सर्वात मोठी गंगा नदी आज घाण वाहून नेणारी नदी झाली आहे. परंतु केवळ गंगेचीच नाहीतर सर्वच नद्यांची स्थिती वाईट आहे असे ते म्हणाले. उद्योगातील प्रदूषणामुळे नद्या दुषित झाल्या आहेत त्यामुळे अशुध्द पाणी प्यावे लागते, ही शोकांतिका आहे. पाण्याच्या भरवशावर अनेकांनी आपले पोट भरले आहे, धरतीचे पोट मात्र आज रिकामे झाले आहे. ते कोण भरून काढणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला. देशात आणि राज्यात नद्यांच्या स्थितीनुसार नदीनिती असावी, व ही नदीनिती आखत असतांना देशातील शेती व उद्योग यांचा विचार करून ही निती असावी. तेेव्हा जलनिती आखण्यासाठी या जलसाहित्य संमेलनात विचार व्हावा असे आवाहन त्यांनी केले. देशाला पाणीदार बनविण्यासाठी नदीनितीची आवश्यकता असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. समाजाचे घटक या नात्याने आपण सारे नवीन तलाव निर्माण करू, नद्या स्वच्छ करू तेव्हाच खरे जल साहित्य निर्माण होईल असे ते शेवटी म्हणाले.
डॉ.एस.एन.कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील नद्यांच्या आजच्या स्थितीवर प्रकाश टाकतांना महाराष्ट्रातील नद्यांच्या वाईट स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मानवी जीवनात नद्यांचे महत्व लक्षात घेता ज्याप्रमाणे मानवाच्या शरिरात रक्तवाहिन्या कार्य करतात त्याचप्रमाणे नद्यांचे देखील समाजाच्या रक्तवाहिन्या म्हणून अतिशय महत्व आहे. परंतु आज या रक्तवाहिन्या प्रदूषित झाल्या असून त्या आपले एकेकाळचे अस्तित्व हरवून बसल्या आहेत. त्यामुळे आज भारतातील तसेच महाराष्ट्रातील नद्यांना त्यांच्या ऱ्हासापासून वाचवणे काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. नद्या प्रदूषित व नष्ट करण्यास मानवी समाजच कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले.
देशातील तसेच महाराष्ट्रातील महत्वाची शहरे व गावे ही नदी काठी आहेत, त्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढले आहे व याचा विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून येते त्यामुळे नद्यांना वाचवणे म्हणजे मानवाला वाचवणे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जलसंपदा विभागातील अभियंता श्री.किशोर वरंभे यांनी नद्यांच्या मरणासन्नतेविषयी बोलतांना नद्यांच्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर प्रकाश टाकला. त्यांच्या मते मोठमोठ्या शहरातील घाणीचे पाणी, सांडपाणी, व कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडणे व शहरातील कचरा नदीकाठी टाकणे यामुळे भारतातील नद्या प्रदूषित व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चंद्रपूर जिल्ह्यासंबंधी बोलतांना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांची वाईट परिस्थिती समोर आणली. या जिल्ह्यातील कारखाने व विजनिर्मिती प्रकल्पांमुळे नद्यांचे पाणी संपत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते या भागात 1/3 पाणी वापरले जाते तर 1/3 पाण्याचे नियोजन केले असून 1/3 पाण्याचे नियोजन देखील केलेले नाही. यासाठी कन्हान नदीचे पाणी वर्धा नदीत नेणे शक्य असून त्यासाठी योग्य नियोजन असावे असे त्यांनी सुचवले.
प्रा.अनिल नितनेवार यांनी मानवी संस्कृतीचा उदयच खोऱ्यात झाला असल्याचे म्हंटले. नदी व मानवाचा अतिशय जवळचा संबंध असून मानवी जिवन हे नद्यांवरच अवलंबून असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीयांना तीर्थस्थानी असलेल्या गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, गोदावरी व इतर नद्या, आज घाण, प्रदूषण व मानवी आरोग्यास घातक ठरत आहेत. आज जवळपास सर्व भारतभर नद्या प्रदूषित झाल्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज मानवाची प्रगती होत असतांना नद्या अधोगतीकडे चालल्या आहेत. त्यामुळे नद्यांना त्यांच्या ऱ्हासापासून वाचविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेव्हाच आपल्या जलसाहित्य संमेलनाचे सार्थक होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चंद्रपूरचे माजी नगरसेवक श्री.संजय वैद्य यांनी देखील नद्यांच्या मरणासन्नतेवर बोलतांना पूर्वीच्याकाळी समाजात असलेले नदीचे स्थान व आजचे नदीचे स्थान यावर चर्चा केली. तसेच चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांच्या समस्येबाबत उलगडा केला. या जिल्ह्यातील दगडी कोळशाच्या खाणी, वीजकेंद्र यामुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. शिवाय या नद्यांची पात्रे बदलत असून खोली सुध्दा कमी होत चालल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आज मानवाचे नद्यांना त्यांच्या नष्ट होणाऱ्या मार्गातून वाचवणे हे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी सर्व मानवांनी व जलतज्ज्ञांनी एकत्र येवून हे महत्वाचे कार्य पार पाडावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेवटी या सत्राचे अध्यक्ष डॉ.श्री.सुधीर भोंगळे यांनी चर्चासत्रात सहभागी असलेल्या वक्त्यांच्या विचारांचा उलगडा करून सहभागी वक्त्यांच्या विचाराचे महत्व लक्षात आणून दिले व खरोखरच आज भारतातील व महाराष्ट्रातील नद्यांना त्यांच्या मरणाच्या वाटेवरून वाचवणे ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या नद्यांना वाचविण्यासाठी नियोजबध्द उपाय व दिशा दर्शक मॉडेल असावे असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी शासनानेही नुसते कायदे करून चालणार नाही. तर प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शासनाने यावर फक्त राजकारण न करता आणि वैयक्तिक फायदे करून न घेता अभ्यासकांचे आणि तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे व त्यांनी सुचवलेल्या उपायावर केवळ विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आणि जेव्हा ही कृती प्रत्यक्षात उतरेल तेव्हाच जलतज्ज्ञांच्या प्रयत्नांचे व जलसंमेलनाच्या आयोजनाचे सार्थक होईल अशी भावना व्यक्त केली.
डॉ. एस.टी.सांगळे, औरंगाबाद - (भ्र : 9421957215)