मराठवाड्यातील पाणी टंचाईवर आंतरखोरे पाणी वळविण्याच्या योजनेतून करता येईल मात

Submitted by Hindi on Sun, 12/27/2015 - 10:51
Source
जल संवाद

अप्पर वैतरणा धरणचा उपयोग करून पिंजाळ व दमणगंगा नदीखोऱ्यातील 185 दलघमी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रस्ताव

वैतरणा धरण :



दमणगंगा नदीवरील गुजराथ राज्यात मधुबन नावाचे धरण असून या धरणाच्या सांडव्यावरून दरवर्षी सरासरी 2858 दलघमी पाणी समुद्रात वाहून जाते. दमणगंगा नदीखोऱ्यात महाराष्ट्र राज्याने आपल्या वाट्याचे पाणी अडविण्याची कामे न केल्याने दरवर्षी उजनी - जायकवाडी धरण भरता येईल इतके पाणी समुद्रात वाहून जाते.

त्र्यंबकेश्वर जवळील ब्रम्हगिरी पर्वताच्या जवळून वैतरणा नदी उगम पावते. त्याच प्रमाणे गोदावरी नदीचा उगमही याच डोंगरातून होतो. वैतरणा नदीवर वैतरणा गावाजवळ 320 दलघमी क्षमतेचे धरण बांधण्यात आलेले असून धरणाची पूर्ण संचय पातळी समुद्र सपाटीपासून 604 मीटर वर आहे. या धरणावर पूराचे पाणी नियंत्रित करण्यासाठी 5 वक्राकार लोखंडी दरवाजे व एक सांडवा बांधलेला आहे. धरणाच्या पाण्याचा उपयोग जलविद्युत निर्मितीकरीता होतो. जलविद्युत निर्मितीनंतर हे पाणी मोडक सागरात जाते व या पाण्याचा उपयोग मुंबईसाठी केला जातो. वैतरणा नदी खोऱ्यातील पाणी सध्या संपूर्णपणे मुंबईसाठी वापरले जाते.

1. वैतरणा धरणावरील मातीचे सॅडल धरण :


वैतरणा धरणामुळे जलपातळी वाढून मौजे अहरूली गावाजवळील भागातून हे पाणी गोदावरी खोऱ्यातील उंडुडोल नदीमध्ये येते. उंडुडोल नदी गोदावरीची उपनदी आहे. वैतरणा धरणाची जलपातळी वाढून वैतरणेचे नैसर्गिकरित्या पाणी गोदावरी खोऱ्यात येवू शकते. गोदावरी खोऱ्यात पाणी वाहून जावू नये यासाठी अहरूली गावजवळ मातीचा बांध बांधलेला असून त्यास सॅडल डॅम म्हणतात. या सॅडल डॅमच्या बांधकामामुळे वैतरणेचे पाणी वैतरणेच्या खोऱ्यातच राहते. वैतरणा धरणाचे नियोजन करताना आंतरखोरे पाणी वळविण्याची योजना नसावी, त्यामुळे त्याकाळी या सॅडल धरणावर सांडवासुध्दा बांधलेला नाही. तथापि त्या वेळी असणारी परस्थिती आता राहिलेली नसल्याने या मातीच्या बांधावर सांडवा करून किमान पुराचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची योजना तातडीने घेणे आवश्यक आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पाणलोट पूर्वेकडे वळविण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी ही चांगली संधी आहे. यासाठी महागडी वीजही लागणार नाही.

नैसर्गिक उताराची योजना असल्याने प्रथम प्राधान्याने ही योजना हाती घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मध्ये विपुल प्रमाणात पाणी जरी उपलब्ध असले तरीही पूर्वेकडे आणण्यासाठी उपसा करणे भाग पडते. उपसा करण्यासाठी वीज खर्च करणे व पंपाची देखभाल, दुरूस्ती या साठी मोठा खर्च नियमित करावा लागतो. त्यामुळे ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या आंतरखोरे पाणी वाहन करणे शक्य आहे अशा योजना प्रथम करणे योग्य ठरते. नैसर्गिकरित्या पाणी वळविण्याच्या योजना संपल्यानंतर कमी उंचीच्या योजना विचारात घेता येतील. पाण्याचे मूल्य हे मागणी व टंचाईच्या तीव्रतेवर अवलंबून असल्याने आंतरखोरे पाणी वळविण्याच्या योजनाचा प्राधान्यक्रम सुध्दा टंचाईनुसार बदलणार आहे. तथापि ज्या ठिकाणी वीज खर्च न करता आंतरखोरे पाणी आणता येते त्या योजना करण्यासाठी खर्चही कमी लागतो त्यामुळे अशा योजना लवकरात लवकर हाती घेणे ही काळाची गरज आहे.

2. आंतरखोरे पाणी वळविण्याची आवश्यकता :


पाऊस सर्वभागात सारखा पडत नाही. काही भागात तो 4000 मि.मी तर काही भागात 450 मि.मी असे त्याचे विषम वाटप आहे. जो पाऊस पडतो तोही असमान पध्दतीने पडतो. ठराविक दिवसात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास तो जमिनीत न मुरता वाहून जातो व पाण्याची टंचाई कायम राहते. पावसाच्या या असमान व दोलायमानतेवर मात करण्यासाठी आंतरखोरे पाणी वळविण्याची यंत्रणा सज्ज असणे ही काळाची गरज आहे. एका भागात पूर, पण त्या वेळी काही भागात प्रचंड पाणी टंचाई यावर उपाय म्हणजे आंतरखोरे पाणी वळविण्याची योजना करणे हा आहे. कोकणाच्या ज्या भागात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्या भागात त्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी शेतीचे क्षेत्र उपलब्ध नाही व ज्या भागात शेतीचे मोठे क्षेत्र आहे त्या भागात पाणी उपलब्ध नाही. आंतरखोरे पाणी वळविल्यास ही विसंगती दूर करता येते.

जायकवाडी धरणापर्यंतचा गोदावरी खोऱ्याचा भाग उर्ध्व गोदावरी खोरे म्हणून ओळखला जातो. या खोऱ्यात औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर ही मोठी शहरे असून ग्रामीण भागातून स्थलांतरीत झालेली लोकसंख्या या शहराच्या आश्रयास आलेली आहे. औरंगाबाद, नाशिक या भागात उद्योगधंद्याची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. नवीन प्रस्तावित डि.एम.आय.सी, स्मार्ट सिटी अशा योजना आखल्या जात आहेत. या भागातील पाणी वापर हा वाढत जात आहे. तथापि त्या प्रमाणात पाणी उपलब्ध कसे करणार याचा फारसा विचार केला जात नाही. पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यास कशी परिस्थिती होते हे दै. सकाळ 13 जुलै 2015 च्या पान क्र. 5 वरील बातमीने स्पष्ट होते. पाण्याअभावी परळीचे 1130 मॅ. वॅट क्षमतेचे संच बंद पडले असून त्यामुळे 8000 कोटी रूपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.

या बातमीमध्ये म्हटले आहे की पाण्याअभावी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद पडल्यामुळे राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक येथील खत आणि सिमेंट उद्योग अडचणीत आलेला आहे. परळी येथे बारा ते पंधरा हजार टन कोळसा लागतो, हा कोळसा खाणीतून रेल्वेद्वारे आणला जातो. 51 ते 54 डब्याचा वॅगनने तीन ते साडेतीन हजार टन कोळसा येथे आणला जातो अशा दररोज चार ते पाच वॅगन परळीत येतात. वीज केंद्र बंद पडल्याने रेल्वेची कोळसा वाहतूक ही थांबली आहे. या ठिकाणी तयार होणारी फ्लाय अॅश विटासाठी तसेच सिमेंट, कृषी, खते, सिमेंटचे पेव्हर ब्लॉक इत्यादी उद्योगासाठी वापरली जाते. परळीतून रोज सुमारे 200 टँकरने ही राख राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड येथे पाठविली जाते. रोज साडेचार हजार टन राख वरील शहरात जाते. राखेची वाहतूक व विक्री यामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळतो. टँकरमुळे शहरात अॅटोमोबाईल, फॅब्रीकेशन, गॅरेज या उद्योगांना काम मिळत होते.

परळी येथील थर्मल केवळ पाण्याअभावी बंद पडल्याने त्याचे किती जणांवर विपरित परिणाम होतात हे पाहिल्यावर पाणी वळविण्याच्या योजना तातडीने करण्याची आवश्यकता किती आहे सहज समजते. परळीच्या इंडिया सिमेंट कंपनीचा प्रकल्प पाण्याअभावी आता अडचणीत आला आहे. औरंगाबाद येथील शेंद्रा पंचतारांकित उद्योग नगरी, नाशिक येथील औद्योगिक उत्पादन डी.एम.आय.सी यामध्ये होणारी लाखो कोटीची गुंतवणूक केवळ पाण्याअभावी अडचणीत येवू शकते. लाखो लोकांना रोजगार व शासनास कोट्यावधी महसूल मिळत असतांनाही आंतरखोरे पाणी वळविण्याच्या योजना तातडीने न करणे म्हणजेच आत्मघात केल्यासारखे आहे. दमणगंगा, पिंजाळ वैतरणा गोदावरी खोरे हे नैसर्गिक रित्या प्रवाही पध्दतीने एकमेकांस जोडता येते.

गोदावरीचे खोरे माजलगाव प्रकल्पामुळे सिंदफणा नदीस जोडलेले आहेच. वर उल्लेख केलेला महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्प पूर्ण केल्यास वैतरणेचे पाणी परळीपर्यंत आणता येईल व पाण्याअभावी थर्मल पॉवर स्टेशन बंद आहे अशी नामुष्की येणार नाही तसेच शासनाचा महसुलही बुडणार नाही. एका जागी तयार होणारी वीज त्याच ठिकाणी न वापरता ग्रीडद्वारे शेकडो कि.मी अंतरावर नेवून वापरता येते. याच न्यायाने आंतरखोरे पाणी वळविण्याचा योजना करून पाणी टंचाईमुळे थर्मल अथवा इतर उद्योगधंदे बंद पडू नये अशी उपाययोजना करणे आता सहज शक्य आहे. मात्र यासाठी कल्पकता वापरून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. या आंतरखोरे पाणी वळविण्यामुळे 40 हजार ते 45 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल. या पाण्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटेल.

3. आंतरखोरे पाणी वळविण्याच्या बाबतीत यापूर्वी झालेला अभ्यास व त्याबाबत असणाऱ्या शिफारशी : दुसरा सिंचन आयोग सन 1999 :


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ व स्टॉकहोम पुरस्कार विजेते श्री. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दुसऱ्या सिंचन आयोगाने विपुल पाणी असणाऱ्या नदीखोऱ्यातील पाणी तुटीच्या खोऱ्यात अशी शिफारस केलेली आहे. उर्ध्व गोदावरीचे खोरे तुटीचे असल्याने या खोऱ्यात वैतरणेचे पाणी वळविण्याची शिफारसही केलेली आहे. (पान क्र. 180) सध्या वैतरणेचे पाणी मुंबईसाठी राखीव असल्याने मुंबईसाठी नार - पार, पिंजाळ, भातसा, काळू - अंबिका इत्यादी नद्यांवर धरणे बांधावीत व मुंबईसाठी पर्यायी योजना झाल्यानंतर अप्पर वैतरणेचे पाणी सॅडल धरणाच्या मार्गे गोदावरी खोऱ्यात आणावे असे या शिफारशी मध्ये म्हटले आहे. मुंबईस पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नवीन धरणांचे कामे झाल्याशिवाय वैतरणेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार नाही. नवीन धरणांना किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्या सिंचन आयोगाची आश्वासक शिफारस असूनही त्याप्रमाणे प्रत्यक्षात पाणी मिळण्यात मोठा विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून खालील पर्यायाचा विचार करावा.

4. आंतरखोरे पाणी वळविण्यासाठी उर्ध्व वैतरणा धरणाचा वापर केवळ माध्यम म्हणून करणे :


वैतरणा खोऱ्यातील सर्व पाणी मुंबईस वापरले जात असल्याने व मुंबईसाठी पाणी कमी पडत असल्याने उर्ध्व वैतरणा धरणाचा उपयोग केवळ माध्यम म्हणून करावा. वैतरणा धरणाच्या लगतचा पिंजाळ व दमणगंगा नदीखोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पडणारे पाणी उर्ध्व वैतरणा धरणात वळविणे व असे वळविलेले पाणी अहरूली येथील सॅडल धरणामार्गे गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. या वळण योजनेमध्ये मूळ वैतरणेचे पाणी वळविणे प्रास्ताविक नसल्याने मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर काहीही विपरित परिणाम होणार नाही. उर्ध्व वैतरणा धरणाचा उपयोग माध्यम म्हणून केल्यास पिंजाळ व दमणगंगा खोऱ्यातील पाणी प्रवाही पध्दतीने गोदावरी खोऱ्यात आणणे कमी खर्चात होईल सर्व पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातील असल्याने यासाठी कोणत्याही लवादाच्या निर्णयाचा अडथळा येणार नाही.

1. पिंजाळ नदी खोऱ्यातील पाणी उर्ध्व वैतरणा खोऱ्यात वळविण्याची योजना :


उर्ध्व वैतरणा धरणाचा पूर्ण संचय तलांक 604 मी. असून धरणाच्या उजव्या भागात पिंजाळ नदी खोऱ्यातील 604 मी. तलांकच्या वरच्या भागातील पाणी उर्ध्व वैतरणा धरणात वळविण्याची योजना आहे. जेणे करून पाणी नैसर्गिकरित्या प्रवाही पध्दतीने वळविता येईल व त्यासाठी वीज खर्च करण्याची आवश्यकता राहणार नाही. पिंजाळ नदी खोऱ्यातील 605 मी. तलांकास समतल कालवा काढून डोंगरावरून येणारे पाणी या समतल कालव्यात घेवून ठराविक ठिकाणी वळण कालवे किंवा छोटे बोगदे करून कलाव्यातील पाणी उर्ध्व वैतरणेत घेता येते. टोपोशीट अभ्यासानुसार 55 कि.मी लांबीचा समतल कालवा पिंजाळ खोऱ्यात करून त्यात 8 ते 10 जागी वळण कालवा अथवा बोगदा करून पाणी उर्ध्व वैतरणेत घेता येते असे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे. या वळण योजनेद्वारे 15 चौ.कि.मी क्षेत्रावरील 605 मी. तलांकावरील क्षेत्राचे पाणी उर्ध्व वैतरणेत घेता येते. ज्या भागातून असे पाणी वळविणे शक्य आहे. या भागातील पाणलोट क्षेत्र जरी केवळ 15 चौ. कि.मी असले तरी हा भाग जास्त पावसाचा असल्याने किमान 35 दलघमी पाणी वळविता येईल असा प्राथमिक अंदाज आहे.

2. दमणगंगा नदीखोऱ्यातील पाणी प्रवाही पध्दतीने उर्ध्व वैतरणा धरणात वळविणे :


उर्ध्व वैतरणा धरणाच्या लगत जसे पिंजाळ नदी खोरे आहे तसेच दमणगंगा नदीचेही खोरे असून या खोऱ्यातील 605 मी. तलांकावरील पाणलोट क्षेत्र सुध्दा उर्ध्व वैतरणेत घेता येते, यासाठी 3 जागी वळण बंधारे बांधावे लागतील व त्यातील पाणी 6.50 कि.मी लांबीच्या बोगद्याद्वारे उर्ध्व वैतरणात घेता येते. याद्वारे 25 चौ. कि.मी भागातील पाणी उर्ध्व वैतरणात वळविता येईल. दमणगंगा नदीवरील गुजराथ राज्यात मधुबन नावाचे धरण असून या धरणाच्या सांडव्यावरून दरवर्षी सरासरी 2858 दलघमी पाणी समुद्रात वाहून जाते. दमणगंगा नदीखोऱ्यात महाराष्ट्र राज्याने आपल्या वाट्याचे पाणी अडविण्याची कामे न केल्याने दरवर्षी उजनी - जायकवाडी धरण भरता येईल इतके पाणी समुद्रात वाहून जाते. यातील 605 मी. तलांकाच्या वरचे पाणी तरी किमान तातडीने प्रवाही पध्दतीने वळवून उर्ध्व वैतरणेत वळविल्यास 60 दलघमी पाणी मिळेल यासाठी वीज खर्च करण्याची आवश्यकता नसून नैसर्गिक उताराने हे पाणी उर्ध्व वैतरणेत येवू शकते.

3. उर्ध्व वैतरणेचे पूराचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे :


उर्ध्व वैतरणा धरणाच्या सांडव्यावरून मागील 10 वर्षात 900 दलघमी पाणी समुद्रात वाहून गेलेले आहे. सॅडल धरणावर सांडवा बांधून हे पाणी गोदावरी खोऱ्यात आणले असते तर त्या पाण्याचा सदुपयोग झाला असता. सांडवा न करता केवळ मातीचे सॅडल धरण करून मोठ्या प्रमाणावरील पाणी समुद्रात जावू दिले जाते. ते पाणी सांडवा बांधून यापुढे तरी गोदावरी खोऱ्यात घ्यावे व या खोऱ्यातील तुटीवर काही अंशी मात करावी असे वाटते. या पध्दतीने सरासरी 90 दलघमी पाणी दरवर्षी उपलब्ध होवू शकते.

वळण योजनांचा भांडवली खर्च :


वर सुचविण्यात आलेल्या योजनेमध्ये आहे त्या प्रकल्पाचा बुडीत क्षेत्रामध्ये कल्पकरित्या वापरल्याने बुडीत क्षेत्रासाठी भूसंपादन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पाणी वळवून प्रवाही पध्दतीने सांडव्यावरून गोदावरी खोऱ्यात घेता येते. वळवून आलेले पाणी साठविण्यासाठी उर्ध्व गोदावरी खोऱ्यात भरपूर जागा असल्याने या प्रकल्पात फारशी जमीन संपादित न करता पाणी मिळविता येईल. वर उल्लेख केलेल्या वळण योजना केल्यास अंदाजे 185 दलघमी पाणी प्रवाही पध्दतीने वळविण्यात येईल. प्रस्तावित कामांना अंदाजे 325 कोटी खर्च येईल. या योजनेमधून मिळणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या उत्पन्नातून झालेला खर्च दोन वर्षाच्या आत वसुल होईल. या प्रस्तावातील वळण योजनेचा खर्च कर रूपाने मिळणाऱ्या महसुलातून लगेचच वसूल होईल. या योजनेमुळे उद्योगधंद्यास चालना मिळेल, रोजगार वृध्दीसाठी खात्रीशीर पाणी उपलब्धता असावी लागते या बाबीकडे एरवी लक्ष दिले जात नाही. परंतु थर्मल पॉवर स्टेशन व त्यावर आधारित उद्योग व रोजगार यावरील होणारा परिणाम पाहिल्यास पाणी उपलब्धतेकडे दुर्लक्ष करणे किती महाग पडते हे सहज समजू शकेल.

श्री अरूण घाटे, औरंगाबाद, मो : 09890203442