Source
जलसंवाद, जून 2017
प्रतिमत
कोकणातील समुद्रास वाहून जाणार्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास औरंगाबाद व डी. एम. आई. सी. साठी होऊ शकतो २४ तास पाणी पुरवठा.
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मोठ्या व महत्त्वाकांक्षी योजना केल्याशिवाय पर्याय नाही. विशेषतः नवीन स्मार्ट सिटी , डी. एम. आई. सी. व मोठ्या प्रमाणावर शहरीकरण या मुळे पाण्याची गरज वाढते जात आहे व त्या प्रमाणात पाण्याची योजना न केल्यास अश्या योजना केवळ पाण्याअभावी सोडून देण्याची पाळी येईल. मुळात खात्रीशीर पाणी असल्याशिवाय उदयोगधंदे येणार नाहीत त्यामुळे मोठ्या योजनाकडे दुर्लक्ष करून लहान योजनेतून पाण्याचे प्रश्न सुटतील अशी आशा बाळगू नये. लहान जलयुक्त योजना स्थानिक पाण्याच्या गरजा भागवतील . मोठ्या मागणीसाठी अश्या योजना पुरू शकत नाहीत हे पण लक्षात ठेवणे योग्य ठरेल.
गोदावरी खोर्यात आधीच पाणी टंचाई असल्याने या खोर्यात इतर खोर्यातून पाणी वळविणे भाग आहे. कोकण भागातून प्रवाही पद्धतीने (By gravity) पाणी वळविण्याच्या जागा अंदाजित २५ च्या आसपास आहेत. यापैकी २३ योजनावर काम सुरु असून त्यातून फक्त १.७ दलघमी पाणी वळविले जाणार आहे. या व्यतिरिक्त फक्त एकच अशी योजना आहे कि ज्यापासून ७५० दलघमी आणता येते व त्यापैकी ५०० दलघमी पाणी प्रवाह पद्धतीने येते. हि योजना म्हणजे वैतरणा गोदावरी लिंक योजना.
Part 1: या योजनेत वैतरणा धरणावर गेट बसवून सर्वप्रथम पुराचे समुदास वाहून जाणारे ५७ दलघमी पाणी प्रवाही पद्धतीने पाणी गोदावरी खोर्यात वळवावे. यामुळे वैतरणाच्या सध्याच्या पाणीवापरावर काहीही बदल न करता हे करणे शक्य आहे . वैतरणा धरणाची पूर्ण संचय पाणी पातळी ६०४ मीटर आहे. या पातळीच्या वर पाणी गेल्यास ते सांडव्यावरून वाहून समुद्रास जाते. वैतरणा धरण कोकणात आहे. मुकणे धरण गोदावरी खोर्यात असून या धरणाची पूर्ण धरण पातळी ५९५ मी आहे त्यामुळे वैतरनेचे पाणी प्रवाह पद्धतीने मुकणे धरणात येते. मुकने धरणाचे पाणी पुढे गोदावरी वरील नांदूर मधमेश्वर येथील वळण बंधार्यातून हे पाणी जायकवाडी धरणात गोदावरी नदीतून येवू शकते.
Part 2 : पुढच्या टप्प्यात वैतरणेच्या सध्याच्या पाणीवापरावर काहीही बदल न करता जेवढे पाणी वैतरणेत आणता येईल तेवढे पाणी गोदावरीत खोर्यात याच गेट चा उपयोग करून आणता येईल. दमनगंगेतील ५७ दलघमी ( दोन अब्जघन फुट TMC) पाणी वैतरणा धरणात ६.५ किलोमीटर बोगद्याद्वारे पाणी वळविणे तसेच पिंजाळ नदी खोर्यातून कंटूर कालव्याने ५७ दलघमी ( दोन अब्जघन फुट TMC) पाणी वैतरणात वळविणे . या दोन पद्धतीने वैतरणेचे पाणी वाढवून ते वळविणे शक्य आहे .
औरंगाबादसाठी वैतरणेच्या सॅडल धरणावर गेट बसून मुकणे धरण मार्गे नांदूर मधमेश्वर डावा एक्सप्रेस कालव्याद्वारे थेट औरंगाबाद जवळील टेंभापुरीत आणणे शक्य आहे. डाव्या एक्सप्रेस पाणी कालवाद्वारे वैजापुरकडे येते. या कालव्याच्या शेवटच्या भागातील ४९४ मी तलांकावरून २८ किलोमीटर लांबीच्या पाईप लाईनद्वारे टेंभापुरी धरणात आणता येते. टेंभापुरी धरणाची तळपातळी ४८१ मी आहे त्यामुळे कालव्यातील पाणी टेंभापुरीत प्रवाह पद्धतीने (By Gravity) येऊ शकते यामध्ये शंका घेण्याचे काही कारण नाही.
वैतरणेतील पाणी मुकनेमार्फत वळविण्याची शिफारसही जुनीच असून ती मा. चितळे साहेबांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या दुसर्या सिंचन आयोगाचे पान क्र. १८० खंड १ वर नमूद केलेलीच आहे. हि शिफारस होऊन १८ वर्षाचा वर कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे हि नवीनच योजना आहे असे समजण्याचे काही कारण नाही . फक्त यातील पाणी प्रवाही पद्धतीने एक्सप्रेस डावा कालव्यामार्फत टेंभापुरी धरणात आणता येते हा भाग नवीन सुचविलेला आहे.
कोणत्याही नवीन योजना सुचवली कि आपल्या मनात काही प्रश्न लगेच तयार होतात त्यापैकी ढोबळ प्रश्नाची उत्तरे खाली दिली आहेत. तज्ञांनी त्यांचे प्रश्न अथवा शंका (ghate2087gmail.com) वर पाठविल्यास स्वागत आहे.
१. ही योजना प्रवाही पद्धतीने (By Gravity) शक्य आहे का ?
आधी उल्लेख केल्याप्रमाणे वरील योजनेतून ६७% पाणी प्रवाही पद्धतीने वळविता येते. उर्वरित साठी रिवर्सिबल पंप जनरेटर बसवावी लागतील.
२. योजनेसाठी इतर राज्यांची केंद्राची परवानगी आवश्यक आहे का?
वनजमिनिसाठी व पर्यावरणासाठी केंद्राची परवानगी लागेल.
पाणलोट क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असल्याने शेजारच्या राज्यांचा यावर हक्क नाही. दमणगंगा नदीचे पाणी पुढे गुजरातला जाते मात्र त्यांच्या वाट्याचे पाणी त्यांनी पूर्वीच मधुबन धरण बांधून वापरून घेतले असल्याने आता उर्वरित पाण्यावर गुजरातचा हक्क नाही.
३. खरेच पाणी कोकणात समुद्रास वाहून जाते का? असे पाणी वळविल्यास कोकणात पाण्याची टंचाई निर्माण होईल का?
असे पाणी वळविल्यास कोकणात पाणी टंचाई होणार नाही कारण कोकणात प्रचंड पाउस पडतो (३२०० मीमी वार्षिक) व मोठ्या प्रमाणावर पाणी समुद्रास वाहून जाते. पाण्याचा उपयोग करण्यासाठी तेथे जागासुद्धा उपलब्ध नाही.
४. अशा योजना प्रचंड खर्चाच्या असतात व अश्या मोठ्या योजना करणे खरच गरजेच्या आहे का?
महाराष्ट्रातील खेड्यापासून ते सर्व शहरांचा पाणी पुरवठा जलसंपदा खात्याच्या कोणत्याना कोणत्या धरणावरून अथवा धरणाजवळील विहिरीवरून केलेल्या असल्याने मोठ्या योजना फायदेशीर आहेत यात शंका नाही. पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाने घेतलेलं असल्याने पाण्यासाठी कितीही खर्च झाला तरीही ती आवश्यक बाब असल्याने पाण्यासाठीच्या योजना सार्वजनीक पैश्यातून करणे योग्य ठरते.
५. आधीच शेकडो योजना अपूर्ण असताना व पूर्ण करण्यास पैसे नसतात अजून एखादी नवीन योजना घेण्यात व्यवहारी शहाणपण आहे का?
पिण्याच्या पाण्यासाठी नवीन योजना करणे आवश्यक आहे कारण जुन्या योजना सिंचनासाठी असून त्याच योजनातून पिण्यासाठी पाणी पुरवठा योजना केल्यास सिंचनासाठी पाणी कमी पडते. या कारणामुळे पिण्याच्यापाण्यासाठी नवीन योजना करणे आवश्यक असते.
पाण्याची किंमत टंचाई काळात खर्या अर्थाने कळते. विशेषतः रेल्वेने ३५० किमी अंतरावरून डीझेल खर्चून पाणी आणण्याऐवजी प्रवाही पद्धतीने पाणी आणण्यात निश्चित व्यवहारी शहाणपणा आहे. कितीतरी योजना सुरु असल्या तरीही ज्या योजनेतुन उद्योगांना व पिण्यासाठी खात्रीशीर पाणी मिळविण्याची शक्यता आहे त्या योजनेला केवळ काही जुन्या योजना अपूर्ण असल्याने टाळणे यामध्ये काहीही शहाणपणा नाही . नव्याने प्राधान्य ठरविणे हाच एक उपाय यावर होऊ शकतो. वरील योजनेतील बहुतांश पाणी प्रवाह पद्धतीने वळविता येते याची प्राथमिक खात्री गुगल अर्थ द्वारेही करता येते.
श्री, अरूण घाटे, औरंगाबाद, मो : ९८९०२०३४४२