Source
जल संवाद
श्रवणाचे अभ्यास विषय :
आर्थिक विकास :
अवर्षणाच्या धक्क्याने विकसनशील अर्थव्यवस्था कशा कोलमडू लागतात याचे सुस्पष्ट विवेचन त्यांनी अनेक उदाहरणे देत एका व्याख्यानात मांडले. तेव्हा महाराष्ट्रातील दुष्काळाबाबतची आकडेवारी सादर करत विश्लेषण केले. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो.
अवर्षणाच्या धक्क्याने विकसनशील अर्थव्यवस्था कशा कोलमडू लागतात याचे सुस्पष्ट विवेचन त्यांनी अनेक उदाहरणे देत एका व्याख्यानात मांडले. तेव्हा महाराष्ट्रातील दुष्काळाबाबतची आकडेवारी सादर करत विश्लेषण केले. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. विकसनाची आर्थिक प्रक्रिया देशादेशांमध्ये कशी घडली, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विकासाच्या टप्प्यांमध्ये काय समस्या उत्पन्न होतात याचे चपखल विश्लेषण ते त्यांच्या विवेचनात सविस्तरपणे मांडत असत. प्रिन्स्टनमधील अभ्यासक्रमात ज्या व्याख्यानांचा मनावर खोल ठसा उमटला, त्यातील महत्वाची व्याख्याने म्हणजे प्रा. आर्थर लुई यांनी 'आर्थिक विकास' या विषयावर वर्गात दिलेली व्याख्याने. फळ्याचा उपयोग फार कमी, माहितीचा ओघ आणि त्यावरचे चपखल शब्दातले त्यांचे अभिप्राय तासन् तास ऐकतच रहावे असे वाटे. नंतर 1979 मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. मला विशेष जाणवले म्हणजे त्यांच्या जवळच्या माहितीची अद्ययावतता. 1972 - 73 च्या महाराष्ट्रातील दुष्काळाबाबतची सांगोपांग माहिती त्यांच्याजवळ 1974 - 75 प्रिन्स्टनच्या मध्य वर्गात शिकवतांना उपलब्ध होती. अवर्षणाच्या धक्क्याने विकसनशील अर्थव्यवस्था कशा कोलमडू लागतात याचे सुस्पष्ट विवेचन त्यांनी अनेक उदाहरणे देत एका व्याख्यानात मांडले. तेव्हा महाराष्ट्रातील दुष्काळाबाबतची आकडेवारी सादर करत विश्लेषण केले. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. विकसनाची आर्थिक प्रक्रिया देशादेशांमध्ये कशी घडली, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विकासाच्या टप्प्यांमध्ये काय समस्या उत्पन्न होतात याचे चपखल विश्लेषण ते त्यांच्या विवेचनात सविस्तरपणे मांडत असत.विकसनाचे निकष काय ? भांडवल, तंत्रविज्ञान, परदेशी व्यापार, श्रमशक्ती, औद्योगिक नेतृत्व अशा भिन्न भिन्न घटकांचा विकसन प्रक्रियेत नेमका काय वाटा असतो ? याचे मार्मिक विवेचन त्यांनी देशोदेशीचे अनेक ऐतिहासिक दाखले देवून केले. श्रमशक्तीच्या उत्कृष्ट उपयोगाचे जागतिक आदर्श उदाहरण म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी कामांच्या आखणीचा वर्गात सविस्तर उहापोह केला. मला त्या दिवशी वर्गात फार अभिमान वाटला. लुईंचा शब्दश: अभिप्राय मी लगेच त्या दिवशी श्री. सुब्रमण्यम (महाराष्ट्राचे तत्कालिन सचिव, नियोजन विभाग) यांना कळवला.
पण एकंदरीने मात्र भारताबद्दल प्रा. लुईंचे मत तितकेसे अनुकूल दिसले नाही. एका खाजगी चहापान मेळाव्यात त्यांच्याशी सविस्तर बोलण्याची मला संधी मिळाली. भारत आपल्या आर्थिक समस्यांबद्दल काहीच गंभीर हालचाल करीत नाही, याचे त्यांना कोडे वाटे. भारतातील अर्थशास्त्रज्ञ, सल्लागार व सामाजिक नेतृत्व वास्तववादी व स्वतंत्र विचारांचे नाही याचे त्यांना दु:ख होते.
त्यांच्या तासाला मला जगभराची खूप विविध माहिती ऐकायला मिळे. त्या संदर्भात ते हिंदुस्थानच्या आर्थिक दु:स्थितीचा जेव्हा बोचरा उल्लेख करीत तेव्हा मात्र अत्यंत संकोचल्यासारखे होई. 'आमच्या आर्थिक समस्यांवर नेमका उपाय काय' म्हणून पाकिस्तानाचे तत्कालीन सहसचिव व माझ्या वर्गातले अभ्यासक सहाध्यायी श्री. कुरेशी यांनी त्यांना वर्गातील चर्चेत विचारले असता, 'तुमच्या सारख्या अनेकांसाठी अमेरिकेतील निरूपयोगी उच्च शिक्षणावर तुमच्या देशांनी खर्च न करता तुम्ही सर्वांनी देशाच्या प्राथमिक गरजांचा प्रथम विचार करणे व त्यावर लक्ष केंद्रीत करणे हा उपाय आहे' असे त्यांनी रोखठोक उत्तर दिले होते. त्यांच्या मांडणीतला असा क्लेशदायक भाग सोडला तर यांच्या तासाला जावून आल्यानंतर काहीतरी वेगळे, नवीन, सखोल परिपूर्ण विचार ऐकल्याचा आनंद होई. या विषयात मी केवळ श्रवणार्थी म्हणून भाग घेतला होता. त्यामुळे मनावर परीक्षेचे दडपण नव्हते. नुसताच ज्ञानग्रहणाचा आनंद होता. पण नंतर त्यांच्या व्याख्यानाच्या टिपण्या मला अनेक वर्षे संदर्भासाठी व विचारमंथनासाठी उपयोगी पडल्या.
तंत्रविज्ञान व समाज :
केवळ श्रवणार्थी म्हणून मी निवडलेला दुसरा विषय म्हणजे 'तंत्रविज्ञान व समाज.' प्रिन्स्टनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे हा परिसंवादात्मक अभ्यासक्रम चालवला गेला. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, अभियांत्रिकी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा मिळून हा एकत्रित अभ्यासवर्ग झाला. या विषयावर प्रगत देशातील विचारवंतांनी खूपच विविध लेखन केले आहे हे त्या चर्चांमधून प्रथमत: लक्षात आले. उद्योग, स्थापत्य, शिक्षण, वैद्यक अशा क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना बोलावून त्यांची व्याख्याने या वर्गात आयोजित करण्यात आली होती. त्या क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगतीचे समाजावर भले बुरे काय परिणाम होतात याचा उहापोह या भाषणात निमंत्रित व्याख्यात्यांकडून होई. त्यावर नंतर चर्चा केली जाई. त्या लिखाणातील बरेचसे लेखन वाचून येवून परिसंवादात भाग घ्यावयाचा असे. या परिसंवादात्मक अभ्यासवर्गात सामील झालेले विद्यार्थी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वैमानिक विद्या, नगररचना अशा विविध शाखांचे अभ्यासक होते. तरीही या अभ्यास वर्गात इतर विषयांप्रमाणे उंची गाठता आली नाही. प्राध्यापकांची सूत्रधारकता विषयाच्या उंचीच्या मानाने कमी पडते असे मला वाटे. या अभ्यास विषयाचे संचालन करणारे प्रा. स्लॅबी यंत्रशास्त्राचे पदवीधर होते.
हा विषय मी परीक्षार्थी म्हणून घ्यावा व भारताच्या संबंधात या विषयावर एखादा लघु प्रबंध सादर करावा अशी त्यांची फार इच्छा होती. पण माझ्या निवडीच्या इतर महत्वाच्या विषयांचा पसारा अगोदरच मर्यादेबाहेर वाढलेला असल्याने मी त्या मोहापासून स्वत:ला दूर ठेवले. या विषयावर झालेल्या विचार परिपूर्ण अशा प्रकाशित अमाप लेखनाच्या तुलनेने अभ्यासवर्ग फारसा रंगला नाही हे खरे. माझ्या संदर्भात पुस्तकांमध्ये भर पडायला मात्र या वर्गाचा मला चांगला उपयोग झाला.
माझे सहाध्यायी :
विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रिन्स्टन अतिशय चोखंदळ आहे. केवळ वुड्रो विल्सन महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी म्हणून एक स्वतंत्र पूर्णकालिक पद होते. 'अमेरिकेतील इतर विद्यापीठांतून व संस्थांतून काम करणाऱ्या चांगल्या उमेदवारांची नावे सुचवा, तेथील अधिकाऱ्यांचे, अध्यापकांचे पत्ते द्या', म्हणून आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक तक्ता या अधिकाऱ्यातर्फे भरून घेण्यात आला. त्याप्रमाणे येथील विद्यापीठांना व संस्थांना त्यांची पत्रेही गेली. नंतरच्या दुसऱ्या सहामाही सत्रात तीन महिने हा निवड अधिकारी वेगवेगळ्या विद्यापीठांतून जावून उमेदवारांच्या मुलाखती घेतो, अभ्यासक्रमाविषयी प्रचारात्मक चर्चा, बैठकी भरवतो व परतल्यावर आपला अहवाल विद्यापीठास सादर करून त्यावरून पुढील वर्षाच्या विद्यार्थ्यांचा वर्ग तयार होतो. WWS मधील प्रवेशासाठी किमान तीन वर्षांचा सामाजिक विषयांमधला अनुभव आवश्यक मानला जाई.
सेवामध्य ज्ञानार्थी :
या व्यतिरिक्त सार्वजनिक सेवा मधल्या प्रवेशानंतर काही वर्षे - म्हणजे साधारणत: किमान दहा वर्षे प्रत्यक्षात अनुभव घेवून नंतर सेवामध्य काळात पुन्हा विद्यापीठात परत जावून त्या सेवेतील उच्च पदांवरच्या वाढत्या जबाबदाऱ्यांना पूरक ठरणाऱ्या विषयांचा अभ्यास करवून घेण्याची पध्दत अमेरिकेतील प्रशासनाच्या सर्वच खात्यातून वाढली आहे. या पध्दतींत योग्य माणसाची व योग्य विषयासाठी निवड व्हावी म्हणून अमेरिकेच्या लोकसेवा आयोगाने ही निवड अलिकडेच आपल्या हाती घेतली आहे असे कळले. त्यामुळे वरिष्ठ सेवामधील नेमणुकांसाठी ज्याप्रमाणे लोकसेवा आयोगातर्फे स्पर्धा परीक्षा घेतली जाते, त्याचप्रमाणे सेवामध्यातील विद्यापीठ शिक्षणास प्रवेश देण्यासाठी अमेरिकेच्या लोकसेवा आयोगातर्फे चाचणी परीक्षा घेतली जाते. तीन वर्षाचा अनुभव असलेले व किमान 10 वर्षाचा अनुभव असलेले असे अमेरिकन उमेदवारांचे दोन गट आहेत.
प्रत्येकाने आपल्या खात्यामार्फत लोकसेवा आयोगाकडे अर्ज करावयाचा. त्या अर्जाची छाननी होवून काही उमेदवार चाचणीस बोलावले जातात. त्या चाचणीतून जे पात्र ठरतील, त्यांना योग्य त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास जावू देण्याची शिफारस आयोगातर्फे प्रशासकीय खात्याला मिळते व मग तो उमेदवार या अभ्यासक्रमांना येतो. निवडीच्या या पध्दतीमुळे प्रिन्स्टनच्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेले अमेरिकन अधिकारी विचारपूर्वक व आत्मविश्वासपूर्वक WWS मधील अभ्यासासाठी तयारी करून आले असल्याचे जाणवे. स्पर्धेतून एखादी गोष्ट हाती लागली की त्याचा आनंदही वेगळाच असतो. त्यामानाने इतर देशांतून निमंत्रित करायच्या पर्विन फेलोंची निवड निदान बाहयत: तरी तितकीशी स्पर्धात्मक किंवा कडक वाटली नाही. कदाचित त्या त्या संस्थांच्या व शासनाच्या शिफारशींवरच प्रिन्स्टनची मुख्य भिस्त असल्याने असे होत असावे.
कर्तव्यकालमध्यांत अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारचेच बहुसंख्या अधिकारी... प्रिन्स्टनला आलेले दिसले. अमेरिकेच्या प्रान्तिक राज्य सेवांमधले अधिकारी तुरळकच होते, प्रिन्स्टनला पाठवले जाणे हा त्यांचा खात्यातर्फे झालेला मोठा मान समाजला जात होता. पुढे वरिष्ठ पदांवरचे अधिक महत्वाचे काम देण्यापूर्वी प्रिन्स्टनला पाठवण्याची पध्दत प्रशासनाच्या अनेक खात्यांमध्ये रूढ होतांना दिसली. अमेरिकेच्या नौसेनेतला अभियंता आमच्या वर्गात आमच्या बरोबर होता, त्याप्रमाणे अमेरिकेच्या केंद्रीय माहिती अभिकरणाचा (सी.आय.ए) चा अधिकारी आमच्या बरोबर होता. तो वागण्यात नेटका, साधा व शालीन होता. त्याच्या अभ्यासाच्या ऐच्छिक विषयांमध्ये त्याने 'हिंदुधर्म' हा विषय घेतला होता, कारण त्याची पुढील नेमणूक बँकॉकला होणे त्याला अपेक्षित होते.
ज्येष्ठ अध्यायनव्रती :
किमान तीन वर्षाचा सार्वजनिक कामाचा अनुभव असणारे व WWS दोन वर्षाच्या मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 40 नियमित विद्यार्थी, त्यांच्या बरोबरीने सेवामध्यांत काळात कामाचा किमान 10 वर्षाचा यशस्वी अनुभव असणारे अमेरिकेतील 15 अभ्यासक अधिकारी अशाच प्रकारचे विदेशातून निवडून घेतलेले व पर्विन फेलो म्हणून निमंत्रित केलेले आठ अभ्यासक अधिकारी व या शिवाय सार्वजनिक सेवेतील उच्च पदांवरचे सहा ज्येष्ठ निमंत्रित असा एकूण अध्ययनव्रतींचा एकत्रित संच तयार करण्याचा WWS चा प्रयत्न होता. अतिज्येष्ठ मंडळी ही फक्त तीन महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंतच या रचनेत सामील होत. आमच्या पहिल्या सत्रात न्यूजर्सी प्रांताचे भूतपूर्व राज्यपाल या पध्दती प्रमाणे समाविष्ट झालेले होते. शैक्षणिक वातावरणात येवून आपल्या क्षमता आणखी वृध्दींगत करण्याची अमेरिकन परंपरा प्रिन्स्टनच्या परिसरात विद्यमान दिसली.
वुड्रो विल्सन महाविद्यालयात ज्येष्ठ अध्ययनव्रती म्हणून त्यावेळी आम्हा सर्वां समवेत सहजपणे वावरणारे प्रा. व्होल्कर नंतर पुढच्या वर्षी 1975 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या रिझर्व बँकेचे प्रमुख म्हणून नेमले गेले. ते मुळात प्रिन्स्टनचेच पदवीधर होते. अध्ययनव्रती म्हणून त्यांनी प्रिन्स्टनमध्ये घालवलेल्या त्या वर्षात त्यांनी 'आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्था' या विषयावर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. अमेरिकेचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या चौकशीचे संसदेतील कायदेशीर सल्लागार जॉन डोअर हे सुध्दा ज्येष्ठ अध्ययनव्रती म्हणून वुड्रो विल्सन महाविद्यालयात आमच्याबरोबर कार्यरत होते. अशा व्यक्तींच्या वास्तव्यामुळे वुड्रो विल्सन महाविद्यालयाचे जे मुख्य ध्येय होते की, शासकीय सार्वजनिक सेवेची क्षमता व प्रतिष्ठा वाढवणे त्यात भर पडतांना स्पष्टपणे जाणवे. त्याचा बऱ्यापैकी गाजावाजाही या महाविद्यालयाकडून होत असल्याचे लक्षात येई.
चांगल्या व्यावहारिक अनुभवाची मुरब्बी माणसे अध्ययनव्रती म्हणून गोळा करण्यासाठी विद्यापीठाची चाललेली धडपड लक्षात येई. अमेरिकन संसदेच्या न्याय - समितीचे सदस्य डॉन डोअर 'संसदेतील काम सोडून बौध्दिक पुनर्जीवनासाठी प्रिन्स्टनला येणार' म्हणून प्रिन्स्टनच्या स्थानिक दैनिकातून महिनाभर गाजत होते. जॉन डोअर यांची औपचारिक संमति विद्यापीठाकडे येताच वुड्रो विल्सन महाशाळेत केवढा तरी मोठा आनंद साजरा झाला. महाशाळेतर्फे आम्हा सर्व विद्याथर्यांना हस्तपत्रके वाटून लगेच तो आनंद व्यक्त करण्यात आला. जॉन डोअर विद्यापीठातील काही परिसंवादांचे मार्गदर्शन करणार होते.
प्रबोधनाच्या अनौपचारिक चर्चा :
औपचारिक अभ्यासवर्गाव्यतिरिक्त अनौपचारिक चर्चांचे आयोजन हा सेवामध्य अध्ययनव्रतींसाठी एक स्वतंत्र ऐच्छिक कार्यक्रम होता. साधारणत शुक्रवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीत यासाठी एकत्रित भोजनाचा कार्यक्रम आयोजित होई. तेथे एखाद्या जगप्रसिध्द तज्ज्ञ व्यक्तीला बोलावलेले असे. भोजनोत्तरच्या चर्चेमधून त्या तज्ज्ञ व्यक्तीकडून अद्ययावत माहिती मिळू शके. साधारणत: 2 ते 2.30 तास छान गप्पा रंगत. अशा व्यक्तींना जवळून पहायला मिळे. त्यांच्याशी बोलायला मिळे. आमच्या वर्गाच्या अशा कार्यक्रमाला दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातले अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. वेब निमंत्रित तज्ज्ञ म्हणून आले होते. देशोदेशीच्या नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नांमधली अंतर्गत तफावत किती आहे, ती का आहे व कितपत दूर करता येईल या संबंधीतचे संशोधन करणारा प्रकल्प प्रिन्स्टन व ब्रुकलीन या विद्यापीठांनी चालवला होता. या संशोधनाचे प्रिन्स्टनमधील काम प्रा. डॉ. वेब पहात. त्या संशोधनासाठी एकत्रित केलेली व विश्लेषण झालेली पुष्कळ माहिती त्यांनी सांगितली. ती लवकरच पुस्तकरूपाने प्रसिध्द व्हायची होती. WWS चे भूतपूर्व डीन प्रा. जॉन लुई सध्या पुस्तक लेखनात गुंतले असल्याने रजेवर होते. तेही एकदा निमंत्रित तज्ज्ञ म्हणून आमच्या बरोबर या कार्यक्रमासाठी आले. 'दक्षिण आशियाचा विकास' विशेषत: भारतातील घडामोडी हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य गाभा होता.
या कार्यक्रमासाठीचा एक दुर्लभ योग म्हणजे इस्त्राईलच्या भूतपूर्व प्रधानमंत्री असलेल्या गोल्डा मायर यांचे वुड्रो विल्सन महाविद्यालयात कडेकोट बंदोबस्तात झालेले एक सविस्तर व्याख्यान व नंतर अध्ययनव्रती बरोबर झालेले त्यांचे दुपारचे अनौपचारिक भोजन व त्यानंतरची चर्चा.
बोधप्रद व्याख्याने :
अशा या भोजनकालीन चर्चांपेक्षा वेगळी स्वतंत्र व्याख्याने व त्याला जोडून काही संवादात्मक चर्चा अधून मधून आयोजित केल्या जात. त्यातील एक संस्मरणीय संवाद म्हणजे चंद्रावर पाय ठेवून आलेल्या श्मिड या अंतराळयात्री बरोबरचा. विश्वरचनेचे विवेचन त्याच्या तोंडून ऐकतांना आपण भारतीय वेदान्तच त्याच्या मुखातून ऐकत आहोत असे वाटत राहिले. उत्तम शारीरिक प्रकृतीचा हुशार भूवैज्ञानिक म्हणून त्याची अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमात निवड झाली होती. निवडीनंतर 3 वर्षे त्याला प्रथम विमान विद्या शिकावी लागली. नंतर त्याची अपोलो 17 च्या उड्डाणाची तयारी सुरू झाली. चंद्रावर उतरलेला हा पहिला भूशास्त्रज्ञ. अपोलोहून परतल्यानंतर नासामध्ये तो प्रशासकीय पदावर काम करीत होता. सूर्यतेजाचा उपयोग कसा करावा यावर नासामध्ये जे संशोधून चालू होते. त्यात तो समाविष्ट होता. श्मिटची बोलण्याची धाटणी, त्याची खोल वैचारिक तयारी, व बौध्दिक उंची प्रभावकारी होती. अपोलो अंतराळयान हे तांत्रिक व सामुहिक परिश्रमाचे फळ कसे आहे हे त्याने सविस्तर समजावून सांगितले.
चंद्रावरून त्याने काढलेली पृथ्वीची व खुद्द चंद्राची अनेक छायाचित्रे त्याने दाखवली. चंद्रावर आपल्या महाराष्ट्रातील कातळासारखाच दगड असल्याने त्या चित्रांमध्ये या दगडांचे वेगवेगळे प्रकार Breccia flow व त्याचे गोटे हे स्पष्ट दिसत होते. या दगडात असणाऱ्या छोट्या पोकळ्या ही चांगल्या स्पष्ट दिसल्या.
पृथ्वीवरच्या निरीक्षणांवरून कोपर्निकसने पृथ्वी गोल आहे हे ठरवले. 500 वर्षांनंतर ती खरोखरच गोल आहे हे प्रत्यक्ष चंद्रावर जावून मानव पाहून आला. पण हा केवळ एक टप्पा संपला आहे. संपूर्ण विश्वाचे चित्र अजून स्पष्ट व्हावयाचे आहे. 'माणूस' हा या विराट विश्वाचा एक छोटा घटक आहे. ही विनम्र भावना त्याच्या बोलण्यात ओतप्रोत भरलेली होती. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना खुला असल्याने कार्यक्रमाला खूप गर्दी होती.
असाच एक अत्यंत दुर्मिळ योग म्हणजे नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जिमी कार्टर यांच्या व्याख्यानाचा व त्यानंतरच्या मनमोकळ्या चर्चेचा. केवळ WWS च्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा कार्यक्रम होता. त्या काळात जिमी कार्टर अमेरिकेतील जॉर्जिया राज्याचे राज्यपाल होते. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे रहायचे ठरवले, तेव्हा त्यांनी मुद्दाम वुड्रो विल्सन महाशाळेत येवून प्रचाराचे पहिले व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी दिले. अमेरिकेचे नेतृत्व जागतिक पातळीवर विश्वासदायी राहिलेले नाही. म्हणून इतर देशांचा अमेरिकन नेतृत्वावरचा विश्वास प्रस्थापित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशा आत्मप्रत्ययी शब्दांनी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावित केले. भाषणाच्या अगोदर पाच मिनिटे ते वर्गातील पहिल्या बाकावर एकटेच येवून बसले होते. नंतर विद्यार्थी हळूहऴू वेळेवर गोळा झाले. तेव्हा कार्टर स्वत:च उठून टेबलाशी गेले व अगदी सहज सुलभ अनौपचारिकतेने त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलायला सुरूवात केली. परिचयाचे अवडंबर नाही, समारोपाचे आभार प्रदर्शनही नाही.
व्याख्यानाशेवटी विद्यार्थी त्यांच्या भोवती गोळा झाले. त्या सर्वांशी त्यांनी अकृत्रिमपणे संवाद केला. प्रश्नांची हसत खेळत उत्तरे दिली. राजकीय धुरीण असणारी व्यक्ती किती निर्मळ व व्यापक विचारांची असू शकते याचे त्या दिवशी दर्शन घडले. पुढे ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ती कारकर्ीद संपल्या नंतर अलीकडे आफ्रिकेतील मागास समाजासाठी करायच्या अनेक सेवाभावी कामांमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे असे ऐकले.
अध्ययन वर्षाची फलश्रुती :
सेवामध्य अधिकाऱ्यांचे व पर्विन फेलोंचे WWS मधील मार्गदर्शक असणारे प्रा. शेन हंट यांचा सबुरीचा सल्ला डावलून मी हौशीने अनेक अभ्यासक्रमांमधून भाग घेतो आहे, तेव्हा यात आपल्याकडून काही मोठी चुक तर होत नाहीना ही शंका वर्षाच्या पहिल्या सत्रात अधूनमधून मनात डोकावे. केवळ दोन किंवा तीन अभ्यासक्रमांमधूनच प्रवेश स्वीकारलेले अमेरिकेचे सेवामध्य अधिकारी व इतर पर्विन फेलो हळूहळू त्या मर्यादित विषयांमधूनही गळत आहेत किंवा परिक्षार्थी म्हणून न राहता श्रवणार्थी होत आहेत हे पाहिल्यानंतर मला अधिकच भीती वाटे. यापूर्वीच्या पर्विन फेलोंची मागील वर्षातील श्रेणी ऐकून महाविद्यालयातील तरूण विद्यार्थ्यांच्या तुलनेने मी निदान 'ब' श्रेणी पर्यंत चढलो तरी पुष्कळ जिंकली अशी मनात कल्पना करून होतो. निदानपक्षी किमान तीन विषयात तरी उत्तीर्ण व्हायचे एवढे प्राथमिक ध्येय मनात निश्चित केले होते. पहिल्या सत्रातले परीक्षाफल कळले, तेव्हा इतके घवघवीत यश माझ्या पदरी येईल असे वाटले नव्हते. त्यामुळे ते 'अ' श्रेणीचे परीक्षाफल कळल्यावर मला मनापासून आनंद झाला. माझा आत्मविश्वास एकदम खूपच वाढला व नंतर दुसऱ्या सत्रातले अभ्यास मी अधिक मोकळ्या मनाने करू शकलो.
सार्वजनिक व्यवहारांचे (संगणिती) विश्लेषण हा व्यवस्थापन शास्त्रातील अत्यंत प्रगत व प्रगल्भ विषय पहिल्याच सत्रात मी घेतला होता. या विषयाला लेखी परीक्षा नव्हती, पण सत्रअखेरी प्रबंधात्मक एक दीर्घ लेख सादर करावयाचा होता. सेवामध्य अमेरिकन अधिकारींमध्ये एक अधिकारी असा होती की, जो या विषयाच्या त्यांच्या शासकीय कार्यालयाचा प्रमुख होता. पण याबाबतचे विद्यापीठांतील बौध्दिक संशोधन, त्याआधारे विद्यापीठाने बसवलेले नवनवीन आडाखे व त्यावर आधारलेली व्यवहारोपयोगी साप्ताहिक गृहकृत्ये त्यामुळे हा विषय वर्गात शेवटी शेवटी त्यालाही क्लिष्ट व अनाकलनीय होत आहे असे वाटल्याने त्याने तो सोडून दिला होता. सेवामध्य अधिकारी पैकी इतर कोणी किंवा पर्विन फेलोपैकी इतर कोणी या विषयाकडे फिरकलेच नव्हते.
मला या विषयात अ श्रेणी देण्यात आली, याचा मला अत्यंत आनंद झाला. विशेषत: हा विषय मला पेलणारा नाही व मी सोडावा म्हणून प्रा. शेन हंट (माझे अभ्यासक्रम सल्लागार) नोव्हेंबरपर्यंत मला पुन्हा पुन्हा सांगत होते. पण या विषयाचे जागतिक वाढते महत्व व हिंदुस्थानातही त्याचा उपयोग व फायदा होण्याची तत्काल शक्यता, या विषयाचे अद्ययावत आव्हानात्मक नावीन्य, या सर्वांचा विचार करून मी हा विषय पूर्ण करावयाचाच असा मनाशी निर्णय केला होता. परमेश्वराच्या कृपेने त्यात मला अपेक्षेबाहेर यश मिळाले.
प्रबंधलेख सादर केल्यानंतर त्यावर तोंडी उलट तपासणी होवून नंतर श्रेणी ठरवण्याची पध्दत होती. पण माझा प्रबंधच प्राध्यापकांना इतका प्रभावी वाटला की मला तोंडी परीक्षेतून सुट देवून एकदमच माझी श्रेणी कळवण्यात आली होती. प्राध्यापकांनी त्यासोबत फार समाधानकारक असा लेखी अभिप्रायही कळविला होता. तोंडी परीक्षा न घेताच एकदम अनपेक्षितपणे श्रेणी कळवण्यात आल्याने मलाही आनंदाचा गोड धक्का बसला. माझा प्रबंधलेख उत्तम वठला आहे हे मला माहित होते पण तो इतका प्रभावी झाला आहे याची जाणीव नव्हती. या विषयात प्रवेश घेतलेल्या 30 पैकी एकूण 18 च विद्यार्थी अखेरपर्यंत टिकले होते. मला आश्चर्य वाटले म्हणजे वसतिगृहातील माझा तरूण मित्र व जपानच्या अर्थखात्यातील अधिकारी असलेला युझे हराडा यालाही ब वर्ग मिळाला होता. हा पुढे आशियाई विकास बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी झाला.
पहिल्या सत्रात मला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही असा विषय म्हणजे ' प्रकल्पांचे सामाजिक मूल्यांकन'. या अभ्यासक्रमात अखेरपर्यंत फक्त 20 विद्यार्थी टिकले होते. अमेरिकेच्या तीन सेवामध्य अधिकारींनी अभ्यासक्रमास सुरूवातीस प्रवेश घेतला पण नंतर अंग काढून घेतले. पाकिस्तानचे मुझफर कुरेशी व जमेकाच्या आर्थिक नियोजन अधिकारी जॉयसा अलकांटारा या दोन पर्विन फेलोंनीही निम्म्यापर्यंत विषयाचा पाठपुरावा केला पण पुढे जमेनासे झाल्याने विषय सोडून दिला होता. या विषयाच्या परीक्षा निर्णयाने महाविद्यालयात खळखळ उडवून दिली होती. कारण 20 पैकी 4 विद्यार्थी या विषयात चक्क अनुत्तीर्ण होण्याची अभूतपूर्व घटना महाविद्यालयात कैक वर्षात प्रथमच घडली होती. वर्गात एरवी आघाडीवर असणारी कु. मरियाना अलवारिझ (पोर्तुगीज) व जपानच्या उद्योग आणि परदेशी व्यापार खात्यातील अर्थशास्त्रीय अधिकारी मिनीची नकायामा या दोघांनीही अपेक्षित यश मिळाले नव्हते. नाकायामाला ब मिळाला हे कळल्यावर मलाही आश्चर्य वाटले. वर्गात विश्व बँकेच्या व्याख्याच्या तज्ज्ञांना अडवून प्रतिप्रश्न विचारण्याइतकी त्याची उत्तम तयारी होती.
प्रिन्स्टनच्या व WWS च्या कडक व तौलनिक परीक्षा पध्दतीचा धसका घेवून अनेक सेवामध्य अध्ययनव्रतींनी परीक्षार्थी म्हणून न राहता श्रवणार्थी म्हणून त्यांच्या सहभागाचे रूपांतर केले. पण त्यातही एकांतिक पाऊल उचलले ते जॉर्ज कोलरिज या पश्चिम आफ्रिकेच्या परराष्ट्र खात्याच्या सचिव असलेल्या अध्ययनव्रतीने. पहिल्या सत्रात तो कोणताच अभ्यासक्रम पूर्ण न करू शकल्याने त्याने अखेरी मायदेशी परतणेच पसंत केले. दुसऱ्या सत्रासाठी तो थांबलाच नाही.
पर्विन फेलोंमध्ये दक्षिण अमेरिकेतून आलेले तीन जण होते. ते मुख्यत: राज्यशास्त्र या विषयातले होते. त्या विषयाच्या अंतर्गत त्यांनी वेगवेगळे तीन अभ्यासक्रम समाधानाने पूर्ण केले होते. परीक्षाही दिल्या होत्या. पण कठोर परिश्रमांची सातत्याने अपेक्षा करणारी प्रिन्स्टनमधील शिक्षण पध्दती पाहून त्यापैकी दोघांनी, एक अर्जेंटिनाचा व एक चिलीचा, सेवामध्य अधिकारी यांनी सुध्दा गोडीतच आपल्या देशांना परतणे पसंत केले. केवळ स्पॅनिश भाषेत व्यवहार करण्याचा त्यांना सराव असल्याने प्रिन्स्टनमधील केवळ इंग्रजीतील सर्व व्यवहार त्यांना कष्टदायक वाटत आहे त्यांच्याशी बोलतांना जाणवत असे. त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी हाही घटक असावा.
महाराष्ट्र शासनाने प्रिन्स्टन विद्यापीठाकडून वर्षा अखेरीचा मजबद्दलचा लेखी अहवाल मागितला, तेव्हा विद्यापीठातील पर्विन अध्ययनवृत्ती कार्यक्रमाचे संचालक असलेले जॉन लुई (अर्थशास्त्र व आंतरराष्ट्रीय व्यवहार यांचे प्राध्यापक) यांनी तो सविस्तरपणे पाठवला. विद्यापीठाच्या पध्दतीप्रमाणे त्याची प्रत मलाही पाठवली. ती वाचल्यावर मला समाधान वाटले. मी प्रिन्स्टनला निघतांना मुंबईच्या विमानतळावर मला निरोप द्यायला शासकीय सेवेतील, खासगी मैत्रीतील, नात्यातील मंडळी इतक्या मोठ्या संख्येत येतील असे वाटले नव्हते. मी त्यांच्या आपुलकीने भारावून गेलो होतो. प्रिन्स्टनच्या वास्तव्यात या सगळ्या मंडळींची सदिच्छा मला मदत करणार आहे यामुळे धीर येत होता. त्याचवेळी मला त्यांच्या अपेक्षांना उतरावे लागेल याचेही दडपण वाटत होते. प्रिन्स्टनच्या वर्षातील माझी सफलता पाहून त्यांनाही आता आनंद वाटेल या विचाराने प्रिन्स्टनहून परततांना मी सुखावलो होतो.
माझ्या त्या समाधानावर शिक्कामोर्तब करतांना प्रा. लुईनी त्यांच्या पत्रात नि:संदिग्धपणे लिहिले होते की, 'श्री. चितळेंनी त्यांच्या अध्ययन वर्षात कामाचा उत्कृष्ट ठसा उमटवला. परिक्षार्थी म्हणून सत्रनिहाय सहा सत्रांचे पूर्ण अभ्यासक्रम व एक अर्ध्या सत्राचा अभ्यासक्रम असे त्यांनी पार पाडले, शिवाय केवळ श्रवणार्थी म्हणून इतर तीन सत्रवर्गांमध्ये भाग घेतला. हे सर्व अभ्यासक्रम पदव्युत्तर पातळीचे होते. प्रशासनिक विश्लेषण, केंद्रीकृत राज्यव्यवस्थेतील धोरणे व अधिकार, सांख्यिकी विश्लेषण या तिन्ही विषयात त्यांना अ वर्ग मिळाला. 'सार्वजनिक व्यवस्थांचे प्रबंधन' या महत्वाच्या अभ्यासक्रमाच्या कडक प्राध्यपकांकडूनही अ श्रेणी मिळाली. 'आशियातील आधुनिकीकरण' या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमात त्यांनी जपानच्या कृषी विकासावर खूप संशोधनपूर्ण व संतुलित असा आणि आशियातील निम्नविकसित देशांच्या धोरणात्मक दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल असा उत्कृष्ट निबंध लेख तयार केला.
'पर्यावरणीय प्रश्न व धोरणे यांचा परिचय' या विषयाचे प्राध्यापक त्यांच्या सत्र लेखाने फार प्रभावीत झाले, लेखाचा विषय होता 'पाण्याचे सामाजिक मूल्य.' या दोन्ही विषयात त्यांना अ श्रेणी मिळाली. अशाप्रकारे श्री. चितळेंच्या अभ्यासक्रमात त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील उत्कृष्ट पातळीच्या विद्यार्थ्यांशी पदव्युत्तर स्पर्धा करीत त्या विद्यार्थ्यांच्या सरासरी पातळीच्या बरेच वर राहून अ श्रेणी मिळवली. शैक्षणिक दृष्टीने हे फारच उठावदार होते. त्या सोबत त्यांचे अध्यापक व सहाध्यायी विद्यार्थी यांच्या बरोबर खेळीमेळीचे व सुखद सुसंवादाचे संबंध होते. थोडक्यात म्हणजे पर्विन कार्यक्रमातील ते सर्वाधिक यशस्वी अध्ययनव्रती होते. '
जगाच्या पाठीवर नव्याने पुढे येत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या तुलनेत, विशेषत: आर्थिक विकासाच्या विचारांमध्ये, व नव्या व्यवस्थेत आपण नेमके कोठे आहोत हे चाचपण्याची संधी या शैक्षणिक वर्षाने मला दिली. नव्या उमेदीच्या पदवीधर तरूण विद्यार्थ्यांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उभे रहाणे काहीसे जिकरीचे व धाडसाचे होते. पण प्रिन्स्टनच्या प्रगतीशील व गुणवत्ता आधारित कठोर शैक्षणिक वातावरणात वसतिगृहातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांबरोबर वावरण्याचा मला फायदा झाला. पर्विन अध्ययन कार्यक्रमाचे जे मुख्य उद्दिष्ट होते, 'वैचारिक व्यापकता,' त्यादृष्टीने वाचन, चर्चा व लेखन करण्याची संधी मला तेथे मिळाली. किंबहुना नंतरच्या नोकरीच्या काळात मुंबई महानगर प्राधिकरणाच्या जलसंपदा व्यवस्थापन मंडळाच्या कामाची किंवा लाभक्षेत्र विकासाच्या बहुशाखीय कामाची किंवा आंतरराज्यीय संवादाची व आंतरराष्ट्रीय सामंजस्याची जी जी जबाबदारी पुढे मजकडे येणार होती त्याची जणू पूर्वतयारीच या वर्षभराने मला करून दिली होती.
WWS मधील सेवामध्य अध्ययनव्रतींच्या वर्ष अखेरीच्या निरोपाचा अध्यापक वर्गाबरोबर जो अनौपचारिक कॉफीपानाचा कार्यक्रम झाला त्यात मी त्या सर्वांच्या आग्रहावरून मोकळेपणाने बोललो व वर्षभरातील माझ्या अनुभवाबद्दल माझा अभिप्राय सांगितला. 'ज्ञानसाधनेमध्ये गुणवत्तामापनाचे काही सोपे व स्पष्ट निकष असले पाहिजेत सतत केवळ स्पर्धात्मक तुलनेतच अध्ययशील माणसाची मोजणी करीत रहाणे व त्या पध्दतीमुळे अनेक गुणवंतांना नामोहरम करणे हे ज्ञानविस्ताराच्या वास्तविक उद्दिष्टांना मारक आहे. श्रेष्ठतेच्या गौरवा बरोबरच ज्ञानविस्ताराची यथोचित प्रोत्साहनात्मक भूमिकाही विद्यापीठाची असली पाहिजे. ती प्रिन्स्टनच्या व्यवस्थेत नाही. दम फुटेपर्यंत अखंडपणे धावायलाच लावणारी ही निष्ठूर व्यवस्था आहे. तिचा फेरविचार होणे इष्ट राहील. कदाचित मी एरव्ही असे बोलण्याचा धीर केला नसता. पण विद्यापीठाच्या या विद्यमान पध्दतीतूनच मी तावून सलाखून बाहेर पडत असल्यामुळे माझ्या सांगण्याचा चुकीचा अर्थ केला जाणार नाही असे मी समजतो.'
विद्यापीठाचा निरोप अखेरी अशा शब्दात घेतांना मला फार वाईट वाटले. जलसंपत्तीचा विकास हे समाजिक व आर्थिक परिवर्तनाच्या उन्नतीचे प्रभावी साधन आहे. म्हणून आधुनिक व्यवस्थांमध्ये अभियंत्याला तांत्रिक नैपुण्य सांभाळण्या बरोबरच नैसर्गिक संसाधनांचे नियोजन व सामाजिक प्रगती यांची सांगड घालता यायला हवी, याची जी जाणीव नोकरीत असतांना हळूहळू माझ्या मनात प्रस्फुरित होत होती व प्रिन्स्टन प्रवेशासाठी झालेल्या मुलाखतींमध्येही मी ती व्यक्त केली होती, तिला अधिक पक्क्या पायावर स्थिरावण्याचा अवसर प्रिन्स्टनमधील अभ्यासामुळे मिळाला. 'नित्य नवा दिस जागृतीचा' म्हणजे काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेवून उल्हासित मनाने मी परतलो व मोठ्या उत्साहाने नोकरीतील माझ्या जबाबदारीवर परत रूजू झालो.
पुरक संदर्भ :
1. सुवर्ण किरणे - लेखीका सौ. विजया चितळे - साकेत प्रकाशन - 2010 पृ 78 ते 82
2. एकता मासिक लेखक कु. विद्या चितळे (सौ. विद्या काणे) फाल्गुन शके 1901 ते आषाढ शके 1903
डॉ. माधवराव चितळे , औरंगाबाद - मो : 09823161909