Source
जल संवाद
ज्ञानतीर्थ - प्रिन्सटन विद्यापीठ :
पण त्या गप्पांमधून हेही कळले की, गतानुगतिक पठणापेक्षा स्वतंत्र प्रगल्भता, नवीन वैचारिक निर्मिती हे स्पर्धात्मक अमेरिकन शिक्षणाचे मुख्य सूत्र आहे. सर्व विद्यापीठे एकाच पातळीवर नसल्याने अमेरिकेतील पदवीचे खरे मूल्य विद्यापीठाच्या बौध्दिक क्षेत्रातील श्रेष्ठते वरून ठरते.
प्रिन्सटन म्हटले की, आइन्स्टाइन व 9 वर्षे सलग नोबेल खेचून आणणारे तेथले फिजिक्सचे डिपार्टमेंट आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते. अशा विद्यापीठांमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा अशी प्रत्येक देशातील हुशार विद्यार्थ्यांची मनीषा असते, धडपड असते. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी सतत शैक्षणिक चुरस असते. दरवर्षी गुणवत्ता यादी प्रमाणे सर्व विद्यापीठांचे अनुक्रमांक लागतात. 1969 पासून सतत बर्कले विद्यापीठाने आपला पहिला क्रमांक राखला आहे असे ऐकून होतो. Princeton, Harward, Yale, Berkle या सारख्या विद्यापीठांचे माजी विद्यार्थी अमेरिकेतील 200 उच्च जागांपैकी 50 टक्के जागांवर आहेत असेही सांगितले जाई.अशा एका विद्यापीठांत आपल्याला शैक्षणिक वर्ष घालवायचे आहे याचे मनावर प्रारंभी बरेच दडपण होते. प्रत्यक्ष तेथे गेल्यानंतर त्या विद्यापीठाच्या श्रेष्ठतेबद्दल आणखी तपशील ऐकण्यात आल्यावर या दडपणांत सुरूवातीला काहीशी भरच पडली. दोनदा पारितोषिक मिळवणाऱ्या ज्या अपवादात्मक थोड्या व्यक्ती जगांत झाल्या, त्यात ट्रान्झिस्टर व सुपरकंडक्टिव्हिटी या दोन शोधांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जॉन बर्डिन हेही प्रिन्स्टनचे. ते जेथे विद्यार्थ्यांच्या मोठ्या भोजनशाळेत बसायचे, तेथे त्यांच्या नावाची छोटीशी पितळी पाटी लावलेली आहे. तिच्याकडे नकळत वारंवार लक्ष जाई.
प्रिन्स्टन विद्यापीठात पदव्युत्तर वर्षाचे 1000 विद्यार्थी असतात. त्यातले बहुसंख्य पदव्युत्तरांच्या वसतिगृहात रहातात. तेथे रहायला लागल्यावर लक्षात आले की, त्यातले 700 हून अधिक पीएच.डी करणारे आहेत. विविध विषयांचा खोलात पाठपुरावा करणाऱ्या या विद्यार्थ्यांशी रोजच्या जेवणाच्या टेबलावर किंवा गप्पा भेटींच्या सभागृहात किंवा वाचनालयात त्या त्या विषयाबद्दल बोलण्याची वारंवार संधी मिळे. विशेषत: सायंकाळच्या जेवणानंतर जेवणाच्या टेबलाभोवती रेंगाळत बसून गप्पा रंगत असत. मैत्रीतल्या अशा सहज गप्पांमुळे हळूहळू मला विश्वास वाटायला लागला की, आपण येथील सरमिसळ वातावरणात रूळू शकू.
पण त्या गप्पांमधून हेही कळले की, गतानुगतिक पठणापेक्षा स्वतंत्र प्रगल्भता, नवीन वैचारिक निर्मिती हे स्पर्धात्मक अमेरिकन शिक्षणाचे मुख्य सूत्र आहे. सर्व विद्यापीठे एकाच पातळीवर नसल्याने अमेरिकेतील पदवीचे खरे मूल्य विद्यापीठाच्या बौध्दिक क्षेत्रातील श्रेष्ठते वरून ठरते. अमेरिकेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा मूलभूत आधारच मुळी संशोधन, नवे विचार, नवे प्रयोग, ज्ञानाची नवी क्षितिजे व्यापणे, धुंडाळणे हा असल्याने रूढ व्याख्यानात्मक शिक्षण पध्दतीपेक्षा अगदीच वेगळे वैचारिक वातावरण विद्यापीठांच्या पदव्युत्तर वर्गांमध्ये असते.
आंतराष्ट्रीय व सार्वजनिक व्यवहारांच्या अध्ययनाचे वुड्रो विल्सन स्कूल :
दुसऱ्या महायुध्दानंतर होणारे जागतिक बदल लक्षात घेवून केवळ औद्योगिक व आर्थिक विस्ताराला उपयोगी पडणाऱ्या व्यवस्थापनाचे पदव्युत्तर महाविद्यालय न काढता त्या ऐवजी सार्वजनिक व्यवहारांना व आंतरराष्ट्रीय व्यवस्थांना मार्गदर्शक होतील असे जाणकार तयार करण्यासाठी प्रिन्स्टन विद्यापीठांत जे महाविद्यालय नव्याने स्थापन करण्यात आले ते म्हणजे 'वुड्रो विल्सन स्कूल', सार्वजनिक व आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे अध्ययन घडवणारे (wws). त्यामुळे त्या महाशालेच्या पुस्तकालयात प्रवेश द्वाराशी जगाचा नकाशा व भूगोल ठेवलेला आहे, अमेरिकेचा नकाशा नाही. तेथील विद्यार्थ्यांमध्ये 'जगाचा विचार' हा केंद्रबिंदू रहावा ही अपेक्षा. पण तो विचारही अमेरिकन भूमीवरून होत असल्यामुळे त्यावर अमेरिकन विचारसरणीची छाया काहीशी पडत रहाते, हे त्या महाविद्यालयातील व्यवहारांची पध्दत व अभ्यासक्रमांचे तपशील यावरून लगेच लक्षात आले.
वुड्रो विल्सन महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे स्वरूप माझ्या अंदाजापेक्षा पुष्कळच वेगळे व वरच्या दर्जाचे निघाले. महाविद्यालयांतील विषयांच्या अभ्यासात वर्गाबाहेर रहाणे मला तितकेसे सोपे गेले नाही. पुष्कळच तारांबळ उडाली. वर्गात शिकवल्या जावयाच्या विषयांचे पूर्व वाचन व त्या नंतर दिलेले गृहपाठ हे उरकतांना वेळेची पाठशिवणी होई.
एका महत्वाच्या अभ्यासक्रमासाठी जातो आहे याची कल्पना होती पण हा अभ्यासक्रम इतका मूलगामी असेल याचा अंदाज नव्हता. या अभ्यासक्रमास अमेरिकन सरकारच्या विविध खात्यांमधून 35 ते 40 या वयोगटातील 20 अधिकारी आले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर कळले की या अभ्यासक्रमासाठी निवड होण्याकरिता त्यांना बऱ्याच चाचण्यांतून जावे लागले. त्यामानाने दिल्लीला केवळ दोनदा मुलाखतीला जाणे या पलिकडे मला काहीच श्रम पडले नव्हते.
आंतर शास्त्रीय अध्ययन पध्दती :
प्रगत देशांमध्ये ज्ञानाच्या विविध शाखांनी स्वतंत्रपणे घोडदौड केली होती. त्या ज्ञानाचा लोकाभिमुख समन्वय साधण्याचे काम हे मोठे प्रयासाचे आहे, पण जनहितासाठी व मानवी जीवनाच्या संतुलित विकासासाठी ते अतिशय आवश्यक आहे अशी ध्र्ध्र्द्म ची धारणा होती. त्यामुळे अनेक आंतरशाखीय विषयांचा तेथे नवनव्याने जन्म होतांना व पाठपुरावा होतांना दिसत होता. पदव्युत्तर अभ्यासात एखाद्या विषयाचा पाठपुरावा करीत संशोधन क्षेत्राकडे वळणारे जसे विद्यार्थी होते तसेच विविध शाखांचा समन्वयात्मक अभ्यास करणारे विद्यार्थीही संख्येने वाढू लागले होते.
सार्वजनिक व्यवहारामधील मास्टर्स पदवीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजे चार अभ्यास सत्रे शिकायचे असे. त्यातील प्रत्येक सत्रात चार अभ्यास विषय पूर्ण करावे लागत. एका वर्षानंतर जून ते सप्टेंबर या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना वर्ल्ड बँक किंवा युनो या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये किंवा अमेरिकेच्या व अन्य देशांच्या मोठाल्या शासकीय, राजकीय, सामाजिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम करण्यासाठी जावे लागे. अभ्यास विषयाची निवड एखाद्या सामाजिक क्षेत्रात व्यावहारिक कुशलता प्राप्त व्हावी यादृष्टीने करावयाची असे.
अशा अभ्यासांमध्ये सर्वात महत्वाचे वेगळेपण प्रथमत:च नजरेत भरले ते हे की, गणित ही सर्व समाजशास्त्रीय विषयांच्या चर्चेची, उहापोहाची व विचार विनिमयाची एक अत्यंत प्रभावी भाषा बनली होती. आपल्याकडे गणित हा विषय साधारणत: वैज्ञानिक विषयांकडे जाणारे विद्यार्थी घेत व तांत्रिक विषयांसाठीच तो विषय आहे असे मानले जाई. पण सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवहारात मोठ्या संख्येत हाताळावयाचे प्रश्न पुढे येत असल्यामुळे बीजगणित, आलेख, सांख्यिकी या गणिती विषयांना ध्र्ध्र्द्म मध्ये अतिशय प्राधान्य आले होते. राज्यशास्त्राच्या किंवा अर्थशास्त्राच्या किंवा वित्तीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही वर्गात जावून पहावे तर शिकवतांना प्राध्यापकांनी आलेख, समीकरणे, यांनी वर्गातील फळेच्या फळे भरून टाकलेले असत. विविध पक्षांच्या मतदानात होणारे बदल हे गणिताच्या परिभाषेत समीकरणांनी मांडले जात. प्रकल्पाची आर्थिक उत्पादनाची उद्दिष्टे मॅट्रिक्स आलजिब्रा (जाल गणित) च्या पध्दतीने लिहिली जात. अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र या सर्व विषयातील विद्यार्थी गणिती परिभाषेत विनाकष्ट बोलतांना आढळले.
मला हे सारेच अगदी नवीन होते. तांत्रिक खाते म्हणून गणल्या गेलेल्या पाटबंधारे खात्याच्या विचार विनिमयांत किंवा लेखन व्यवहारातही गणिती परिभाषेचा इतका विस्तृत उपयोग महाराष्ट्रात करीत नव्हतो. वुड्रो विल्सन महाविद्यालयांत गणित हा केवळ एक वेगळा विषय न रहाता कोणत्याही विषयाच्या परामर्षाचे एक माध्यम म्हणून तो वापरात होता.
पाण्याचा जास्तीत जास्त अनुकूल उपयोग कसा साधावा यावर एका रशियन तज्ज्ञाचे भाषण प्रिन्स्टन महाविद्यालयात झाले. मी ते ऐकायला गेलो. त्या व्याख्यात्याचे इंग्रजी अगदी कच्चे, मोडके - तोडके आणि पुष्कळसे अशुध्दही. पण त्याने त्याचे सर्व मुद्दे हे आलेख व गणिती समिकरणे यांच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले. रशियन भाषेत लिहिलेल्या त्याच्या एका लेखाच्या प्रतीही त्यांनी आम्हा श्रोत्यांना वाटल्या. श्रोत्यांना रशियन भाषेचा गंधही नसतांना त्यातील समीकरण प्रचुरतेमुळे त्या लेखाचा मतितार्थ सर्वांना कळला.
एका बाजूस गणिती विचारसरणीतून विद्यार्थ्यांना संगणक यंत्राचा मुक्त उपयोग करू देत असतानाच काही विचारवंत प्राध्यापक या गणिती साचेबंद संगणकीय पध्दती विरूध्द तडाखेही ओढत होते. ' संगणक यंत्रांमुळे बौध्दिक सृजनशीलता आटत आहे, नवा विचार, नवीन जाणीव याला महत्व न राहता आकड्यांचा पसारा व समीकरणांचा डोलारा याला अवास्तव महत्व येत आहे.' या विरूध्द जाणकार प्राध्यापक उभे राहिले होते. स्वीडन मधले नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ गुन्नर मिरडाल यातीलच एक आहेत असे तेथे ऐकण्यांत आले. त्या पारितोषिकासाठी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले प्रिन्स्टनचे सर आर्थर लुई हेही गणिती जाळ्यात फसु नका म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या व्याख्यानात आवर्जून सांगत असत.
गणिती विचार पध्दतीमुळे विचारांना धार, गती व अचूकता आली हे खरे असले तरी माणसाची तर्कशक्ती खरोखरच कुंठित होत आहे का असे मलाही वाटले. तर्क आणि अनुमान हेही ज्ञानाचे दोन खंबीर आधार असतात. त्याचा विसर पडून प्रत्येक विचार गणिती साच्यात बसविण्यासाठी ओढून ताणून काल्पनिक गृहीतकृत्ये स्वीकारणे हा दोष वाढत्या प्रमाणात दिसला. गणितीय पध्दत व वैचारिक तकर्धिष्ठित अनुमान या दोहोंचा समन्वय ज्ञानाच्या क्षेत्रात यापुढे साधावा लागेल असे वाटले.
पण अशा या गणित प्रवणतेमुळे अभियंता मंडळी इतर विषयांमध्येही कशी आघाडीवर आहेत याचे उत्तम प्रत्यंतर प्रिन्स्टनच्या आमच्या महाविद्यालयाच्या (wws). अभ्यासक्रमांमध्येच पहायला मिळाले. महाविद्यालयातील प्रमुख सहा विषय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, वुड्रो विल्सन स्कूल मध्ये येवून शिकवित. फ्रान्सहून प्रिन्स्टनच्या वुड्रो विल्सन स्कूल मधील अभ्यासक्रमाला आलेल्या अर्थशास्त्रातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, आर्थिक व्यवहारातील गणितप्रवणतेमुळे व तंत्रविज्ञानाच्या जागतिक प्रभावामुळे अभियंता मंडळींचे प्राबल्य आता फ्रान्समध्ये इतके वाढले आहे की, तेथील विद्यापीठातील अर्थशास्त्राची संपूर्ण शाखाच आता अभियांत्रिकी महाविद्यालयांना जोडून टाकण्यात आली आहे. त्या मुळे अर्थशास्त्राची उत्तम पदवी घ्यायची असेल तर फ्रान्सच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली दोन समान वर्षे पूर्ण करावी लागतात.
व्यक्तीश: मला अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असली तरी माझी 1955 पर्यंतच झालेली महाविद्यालयीन गणितातील तयारी मला प्रिन्स्टनमध्ये फार अपुरी पडली. ' वारंवारता, अचानकता, दोलायमानता' अशा अनेक संकल्पनांची गणितीय अभिव्यक्ति सुरूवातीच्या अनेक तासांमध्ये माझ्या डोक्यावरून गेली. सोप्या सोप्या साध्या चौकटीमध्ये विचार करायची सवय झालेल्या मला काही विषयांमध्ये वर्गांबरोबर येण्यासाठी बरेच कष्ट पडले.
अभ्यासक्रमांची रचना :
wws मधील विषयांची निवड दोन पध्दतींनी करता येई. 'परिक्षार्थी' म्हणून किंवा केवळ 'श्रवणार्थी' म्हणून. परिक्षार्थी विद्यार्थ्यांस दर आठवड्याचे गृहपाठ व प्रश्नोत्तरे पूर्ण करून सादर करावी लागत, शिवाय सत्रांतीची व सत्रमध्यांतली परीक्षा द्यावी लागे. विद्यार्थ्यांने केलेले गृहपाठ व परीक्षेतील उत्तरे यावरून त्याची श्रेणी ठरे. केवळ श्रवणार्थी विद्यार्थी मात्र त्या विषयांवरील व्याख्याने फक्त ऐकत. त्यांना गृहपाठ व परीक्षा श्रेणी नाही. ज्यांना 'मास्टर्स' पदवी हवी आहे, ते दर सत्रांत साधारणत: तीन ते चार परीक्षार्थी विषय व एखादा श्रवणार्थी विषय निवडत. प्रत्येक विषयाच्या वर्गातील शिक्षणाचे साप्ताहिक तीन तास व स्वाध्यायाचे दहा तास असे 12 ते 13 तास काम विद्यार्थ्यांकडून एका विषयासाठी व्हावे अशी विद्यापीठाची अपेक्षा होती. चार परिक्षार्थी विषयांचे मिळून साधारणत: 50 तास अधिक दोन श्रवणार्थी विषयांचे केवळ वर्गातील श्रवण 5-6 तास एवढे सारे काम दर आठवड्यास मला झेपेल का असा माझ्यापुढे प्रश्न होता.
गुणवत्ता मोजणीची पध्दत :
कोणत्याही विषयात किंवा एकूण परीक्षेत गुणानुक्रम देण्याची पध्दत प्रिन्स्टन विद्यापीठात नव्हती. परीक्षेतील यशाची श्रेणी ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत साधारणत: वरचे 10 ते 15 टक्के अ गटात नंतरचे 15 ते 35 टक्के ब गटात व नंतरचे 30 टक्के क गटात व उरलेले ड गटात अशी विभागणी होती. परीक्षेत फारसे कोणी अनुत्तीर्ण असे होत नाही. विषय झेपत नसेल, तो विद्यार्थी क्रमश: साप्ताहिक गृहकृत्यात मागे पडत असेल तर त्याला त्या विषयातून अंग काढून घेण्याची अगोदरच परवानगी देत. त्याने आपण होवून आपला त्या विषयातील कच्चेपणा ओळखला नाही, तर प्राध्यापक त्याला त्या वर्गातून मागे पाय घेण्याचा सल्ला अनौपचारिकपणे कानावर घालत त्यामुळे परीक्षेला बसणे किंवा एखाद्या विषयाचा प्रबंध पूर्ण करणे व तरीही अखेर अनुत्तीर्ण असा शिक्का पदरी येणे अशी अवस्था फारशी कोणाची होत नसे. वुड्रो विल्सन सारख्या मातबर महाविद्यालयातून परीक्षेपर्यंत पोचून अनुत्तीर्ण जाहीर झाल्याचे उदाहरण वर्षांवर्षातून घडलेले नाही असे कळले. जेथे गणिती विषय आहेत व त्यात गुणसंख्येवरून विषयातील पारंगततेचा पूर्ण बोध होवू शकतो तेथे 90 ते 100 या गुणांतील विद्यार्थ्यांना अ श्रेणी 75 ते 90 या गुणातील विद्यार्थ्यांना ब श्रेणी 60 ते 75 या विद्यार्थ्यांना क श्रेणी व 40 ते 60 या विद्यार्थ्यांना ड श्रेणी देत.
प्रिन्स्टन सारख्या अमेरिकेतील उच्चभ्रू प्रतिष्ठित विद्यापीठांमधली विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवण्याची तौलनिक मोजणी पध्दत मला फार अमानवीय वाटली. तुम्हाला नेमके किती कळले, यापेक्षा तुम्ही इतरांच्या तुलनेत कोठे आहात यावर तुमची श्रेणी ठरणार. त्यामुळे पुर्वायुष्यांत बुध्दीमान म्हणून गाजलेल्या, व नंतर या विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना, या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये तौलनीक मोजणीत जेव्हा संख्यात्मक दृष्टीने खालच्या दर्जाच्या 50 टक्के मधील विद्यार्थी म्हणून गणले जाई तेव्हा मोठा मानसिक धक्का बसतांना मी पाहिले व वाईट वाटले. मूळ विषय नीट आकलन झालेले विद्यार्थीसुध्दा या तौलनिक मोजणीमुळे क किंवा ब गटाचे ठरत. ते त्यांना फार दु:खद असे. तत्पूर्वीच्या दोन वर्षांमध्ये प्रिन्स्टनच्या दहा विद्यार्थ्यांनी अशा धक्क्यांमुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची विद्यापीठांत उघड चर्चा चाले. तेव्हा हार्वर्डमध्ये तर 1.5 टक्के विद्यार्थी असे करतात अशी उघड तुलना होई. त्यावेळी बौध्दिक साधनेतील यशस्वीतेची मोजपट्टी केवळ स्पर्धात्मक अग्रेसरत्वाने मोजणे हे मनाला न पटणारे होते. पण या दिव्यातून जाणे मला आवश्यक होते.
अभ्यासविषयांची निवड :
प्रिन्स्टन विद्यापीठात पाय ठेवल्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे 1974 - 1975 या शैक्षणिक वर्षभराचा माझा सुयोग्य कार्यक्रम कसा आखायचा. अभ्यासी (फेलो) निमंत्रित म्हणून येणाऱ्या निमंत्रितांना तीन पर्याय होते. विद्यापीठातील सुविधांचा उपयोग करून एखाद्या विषयावर एखाद्या पुस्तकासाठी विपुल लेखन करायचे, आपल्या विषयात प्रपाठक या नात्याने विद्यार्थ्यांचे काही तास घ्यायचे / मार्गदर्शन करायचे किंवा सार्वजनिक व्यवहारांच्या पदव्युत्तर दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर काही औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण करायचे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या अनेक विषयांची आकर्षक यादी पहाता, मी तिसरा पर्याय निवडायचा ठरवला. पदव्युत्तर वर्गातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच चार विषय एकेका सत्रासाठी मुळात निवडले. अशी ही निवड पाहिल्यानंतर अभ्यासी निमंत्रितांचे समन्वयक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांना काहीसे आश्चर्य वाटले. कारण तिसरा पर्याय निवडणारे निमंत्रित अभ्यासी अधिकारीसुध्दा सामान्यत: दोन सत्रात मिळून चार किंवा पाच विषय निवडत.
मी निवडलेल्या विषयांमध्ये माझ्या इच्छेनुसार पहिल्या सत्रात प्रवेश तर मिळाला. वर्गही नीट चालू झाले. ' ग्रामीण विकास' हा विषय त्या बाबतची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा विनिमयांतून प्राध्यापकांकडून विकसित केला जाईल असे विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेत लिहिले होते. त्या अपेक्षेने मी त्या वर्गात समाविष्ट झालो होतो. प्रत्येक विषयांची वर्गवेळ 3-3 तासांची असे. दीड तासानंतर दहा मिनिटे कॉफी पानाची सुट्टी असे.
कॉफी पानाचे मध्यंतर होईपर्यंत मला शंका यायला लागली की हे प्राध्यापक या विषयाची एकांगी मांडणी करीत आहेत. अमेरिकेच्या विदेश सेवेत दीर्घकाळ नोकरी केलेले व तेथे हा विषय हाताळलेले एक जाणकार अभ्यासक म्हणून त्यांचा परिचय माहिती पुस्तिकेत देण्यात आला होता. सहभागी विद्यार्थ्यांना आपले मुद्दे किंवा अभिप्राय केव्हा मांडायचे आहेत हे त्या प्राध्यापकांना मी कॉफीच्या मध्यंतरात विचारले. पण त्यांनी ते फारशा गांभीर्याने घेतले आहे असे मला वाटले नाही म्हणून तीन तासांचा पहिला वर्ग संपत यायला दहा मिनिटे अवकाश असतांना मी वर्गात हात व करून प्राध्यापकांना पुन्हा विचारले की, आपण मांडलेल्या मुद्यांवर काही अभिप्राय व्यक्त करायला किंवा शंका विचारायला आपण केव्हा वेळ देणार आहात ? आपण मांडलेल्या मुद्यांबाबत मलाही काही सांगायचे आहे. त्यांनी मजकडे कानाडोळा केला. तेव्हा वर्ग संपल्यावर मी त्यांना भेटून सांगितले मी या वर्गातून नाव काढून घेत आहे. पुढच्या आठवड्यापासून मी येणार नाही. ते चिडल्यासारखे दिसले. पण काही न बोलता घुश्श्यात निघून गेले.
दुसऱ्याच दिवशी मला महाविल्यालयाच्या सूत्रचालिकांचे बोलावणे आले. मी वर्ग का सोडतो आहे हे त्यांनी विचारले. माझ्या खुलाशानंतर मात्र हा प्रश्न तेथेच संपला. पण आपणाला सर्व जग समजले आहे अशी अमेरिकी अहंकाराची पहिली झलक पहिल्या आठवड्यातच मला अनुभवायला मिळाली होती.
पुढे दुसऱ्या सत्राच्या विषय निवडीची नंतर वेळ आली, तेव्हाही काहीसा अमेरिकी एकांगी आग्रहीपणाचा अनुभव पुन्हा एकदा आला. त्या सत्रासाठी मी निवडलेल्या एका विषयाचे नाव होते 'सार्वजनिक व्यवहारांचे वित्तीय व्यवस्थापन,' सार्वजनिक व्यवहारांची यशस्विता आर्थिक निकषांवर ठरवावी असा कल वाढत असल्याने हा अभ्यासक्रम यंदा प्रथमच नव्याने वुड्रो विल्सन महाविद्यालयात आखण्यात आला होता. अशा प्रकारचा अभ्यासक्रम अन्यत्रही कोठे नसल्याने त्यादृष्टीने हा अभ्यासक्रम प्रिन्स्टनमध्ये प्रयोगावस्थेत होता. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करावा अशी अमेरिकन सरकारची व राज्य शासनांची प्रिन्स्टन विद्यापीठाकडे बरेच दिवस मागणी चालू होती.
विमा व्यवस्था, सिक्युरिटीजचे व्यवहार, वित्तीय निधींचे हिशोब, सार्वजनिक अंदाजपत्रके, खर्चातील नियंत्रणे याचा पारमर्श या अभ्यासक्रमात घेतला जाणार होता. अभ्यासक्रम गणिती होता व बराचसा किचकट होता. पण त्याची रचना मला खूप उपयोगी वाटली. या अभ्यास विषयाचे प्राध्यापक राइनहार्ड हे रँड कॉर्पोरेशनचे वित्तीय सल्लागार व अमेरिकेच्या शिक्षण व आरोग्य खात्याचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करीत होते व प्रिन्स्टनमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवित. त्यांनी मला त्यांच्या वर्गात प्रवेश द्यायचे नाकारले. तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांच्या ताठरपणाचा अनुभव आला. हा अत्यंत गणिती विषय आहे. विम्याचे दर निर्धारण इ. क्लिष्ट विषय त्यात हाताळायचे आहेत. तुम्हाला ते पेलणार नाहीत. असा त्यांनी खुलासा केला. मी अभियांत्रिकी पदवीसाठी म्हणून माझी झालेली गणिती विषयातील पूर्वतयारी त्यांना समजावून सांगितली, तेव्हा मोठ्या अनिच्छेने ते मला वर्गात घ्यायला तयार झाले.
त्या विषयाची उंची त्यांनी इतकी वाढवली व इतकी कठीण गृहकृत्ये दिली की अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गातून नंतर पाय मागे घेतला. विद्यापीठामधली त्यांची एकंदरीत ख्यातीही अशीच होती. त्या विषयात प्रवेश घेणारे मूळचे आम्ही 40 विद्यार्थी होतो. पण सत्राअखेर पर्यंत 19 च जण शिल्लक राहिलो. मी मी म्हणणाऱ्यांना विद्यापीठाने तावून सुलाखून घेवून विद्यापीठात प्रवेश दिल्यानंतर त्यांना अशाप्रकारे निरूत्साहित व पराभूत करण्याचे धोरण अचंबित करणारे होते. नोबेल पारितोषिके मिळवणारे पाच पाच / सहा सहा प्राध्यापक एकाच वेळी तेथील शिकवणाऱ्यांमध्ये असल्याने त्यांच्या या विद्यापीठीय अहंकाराची ती एक अभिव्यक्ती आहे असे माझ्या लक्षात आले. माझ्या मनाला गुणवत्ता प्रधानतेचा हा अतिरेक वाटला.
या प्राध्यापकांच्या एका वर्गवेळेच्या पहिल्या अर्ध्यांत काही वित्तीय पैलूंची हिशेबी मांडणी गणितातील अनुश्लेषण पध्दतीने वर्गातील मोठ्या रूंद फळ्यावर त्यांनी लिहून दाखवली. 'समजले ना' म्हणून विद्यार्थ्यांना थाटात विचारले. मला त्यांची विश्लेषण मांडणी अनावश्यक क्लिष्टतेची वाटली. मी कॉफीपानाच्या वेळेत धीर केला व जवळपास 20 ओळींमध्ये पायरी पायरीने जे गणित त्यांनी सोडवून दाखवले, तेच फक्त सात पायऱ्यात दुसऱ्या पर्यायी पध्दतीने कसे सोडवता येते हे फळ्याच्या उरलेल्या भागात मी लिहून ठेवले. कॉफी वेळेनंतर वर्ग वेळेचा दुसरा अर्ध सुरू झाल्यानंतर आम्हा सर्वांबरोबरचे कॉफीपान आटोपून ते पुढचे शिकवायला म्हणून फळ्याशी गेले, तेव्हा त्यांनी माझा फळ्यावरचा प्रताप वाचला. 'कोणी लिहिले हे' त्यांनी लालबुंद होवून विचारले. मी हात वर केला. त्यांनी पुन्हा फळ्याकडे पाहिले, पण नंतर काही बोलले नाहीत. नंतर त्यांच्या वर्गात मी शेवटपर्यंत टिकून होतो. त्यांनी कधी त्या घटनेचा पुन्हा उल्लेख केला नाही. त्या विषयाच्या अंतिम परीक्षेला बसण्याचा धीर करणाऱ्यांतही मी होतो. परीक्षेनंतर त्यांनी मला दिलेली श्रेणी पाहिली. तेव्हा मला सुखद धक्का बसला. उत्तीर्ण झालेल्या फक्त सात विद्यार्थ्यांमध्ये मी एक होतो, व मला अ श्रेणी दिलेली होती. त्यांनी कोणताही राग न ठेवल्याचा तो पुरावा होता. अमेरिकन दिलदारपणाचेही अशा प्रकारे प्रत्यंतर आले.
प्राध्यापकांबाबतच्या कटुतेचे हे दोन अपवादात्मक अनिष्ट प्रसंग सोडले, तर माझे बाकीचे अभ्यासवर्ग खेळीमेळीत व निरामयतेत पार पडले. विद्यार्थ्यांचा व इतर देशातून आलेल्या अधिकाऱ्यांचाही खूप स्नेह मिळाला.
सार्वजनिक धोरणांसाठी गणिताचा वापर :
आकडेवारीचा व संख्याशास्त्रातील प्रमेयांचा उपयोग करून सार्वजनिक व्यवहाराचे अधिक डोळस समालोचन कसे करता येते व त्यातून अधिक अर्थवाही निर्णय कसे घेता येतात याचा अभ्यास या विषयात होता. या विषयात प्रारंभी माझी वर्गाबरोबर येण्यासाठी बरीच तारांबळ उडाली. हा अभ्यासक्रम प्रा. टुफ्टे व प्रा. नीबर्ग या दोघांनी मिळून शिकवाला. प्रा. दुफ्टे मूलत: राज्यशास्त्राचे आहेत, पण नंतर सांख्यिकीवर त्यांनी विपुल संशोधन व लेखन केले होते. प्रिन्स्टनमधील अत्यंत विद्यार्थी प्रिय व निष्णात प्राध्यापक समजले जात. प्रा. निबर्ग यांना स्वीडनहून मुद्दाम वुड्रो विल्सन महाशालेत पाहुणे प्राध्यापक म्हणून आणण्यात आले होते. ते मूलत: अर्थशास्त्रातले आहेत. येथील अर्थशास्त्रातले सर्वच प्राध्यापक कॅल्क्युलसमध्ये बोलू लागले की माझी जरा गडबड उडे.
हा अभ्यासक्रम पुढील अनेक अभ्यासक्रमांना पायाभूत आवश्यक विषय म्हणून मानला जाई. त्याला मर्यादेबाहेर गर्दी झाल्यामुळे या विषयाच्या ऐनवेळी दोन तुकड्या (प्रत्येक 35 विद्यार्थ्यांच्या) कराव्या लागल्या. शेवटी या विषयाची स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली, मला अ श्रेणी देण्यात आली. यापूर्वी अशा प्रकारे विचार करण्याची संधी न आल्याने मला अशा प्रकारच्या या अभ्यासक्रमांचा फार लाभ झाला, नवी दृष्टी आल्यासारखे वाटले.
सार्वजनिक संरचनांचे विश्लेषण :
wws मध्ये हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्थापत्य शाखेतर्फेच चालवला गेला. प्रा. आर्लाफ हे मूलत: स्थापत्याचे प्राध्यापक. त्यांचा वर्ग मात्र वुड्रो विल्सन महाविद्यालयात चाले. प्रकल्पांची रचना, कार्यवाही प्रकल्पांची आर्थिक उद्दिष्ट्ये अशा संदर्भात अधिकाधिक फलदायी व कुशलतम रचना पध्दती व कार्यमालिका कशी असावी हे ठरवण्याचा अभ्यास या विषयात होता. कार्यकुशलतेचे गणिती विश्लेषण तंत्रही या विषयाखालीच शिकवले गेले. व्यवस्थापनाचा विषय म्हणून या विषयातील पुष्कळसा भाग व्यवस्थापनाच्या संस्थांमधून व अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपल्याकडेही काहीसा शिकवला जातो. पण ध्र्ध्र्द्म मधील अभ्यासक्रमामुळे मला या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्याची उत्तम संधी मिळाली. व्यवहारातील या तत्वांचा उपयोग करणाऱ्या तीन निष्णात व्यक्तींची व्याख्यानेही या अभ्यासक्रमात ऐकायला मिळाली. आपल्या कडील शासनाच्या व्यवहारामध्ये या पध्दतींचा वापर करण्यास निश्चितच फार मोठा वाव आहे हे जाणवले.
या अभ्यासक्रमाच्या अखेरी एखाद्या विषय क्षेत्रावर किंवा समस्येवर स्वतंत्र विस्तृत लेखन करायचे होते. तीच परीक्षा. वेगळी प्रश्नपत्रिका नाही. मी wws Systems analysis in the development of water resources in Maharashtra या विषयावर 44 पानी प्रदीर्घ लेख सादर केला. या लेखास उत्तम अभिप्राय मिळाला. या विषयात मला अ श्रेणी देण्यात आली. प्रा. ऑर्लाफयांचे या अभ्यासक्रमामुळे माझ्यावर खूप प्रेम बसले. एखाद्या विदेशी व्यक्तीबरोबर निर्माण झालेल्या आत्मीयतेच्या संबंधाचा अनुभव घेण्याचा हा पहिलाच योग होता. पुढील आयुष्यात असे अनेक मैत्रीचे संबंध येणार होते व त्यातून ही माणसे व त्यांचे देश कशामुळे मोठे होतात हे ही कळणार होते. त्याचा हा प्रारंभ होता.
प्रकल्पांचे सार्वजनिक मूल्यांकन :
केवळ रूढ आर्थिक मूल्यांकनापेक्षा सामाजिक अंगांचेही विचार अंतर्भूत करून प्रकल्पांचे वास्तविक मूल्य ठरवण्याच्या पध्दती नव्यानेच सुचवण्यात येत होत्या. त्यांचा उत्तम परामर्श या अभ्यासक्रमात घेण्यात आला. मला हा अभ्यासक्रम सर्वात अधिक उपयुक्त वाटला. आपल्याकडील रूढ पध्दतीपेक्षा किंवा सुचवलेल्या सुधारित पध्दतींपेक्षाही वेगळे विचार या अभ्यासवर्गात ऐकायला मिळाले. मात्र विषयाची सर्वच मांडणी पूर्णत: गणिती पध्दतीने आलेख व समीकरणे यांच्या आधारावर केलेली होती.
या विषयाच्या बाबतीतील विशेष मणिकांचन योग असा की वर्ल्ड बँकेचे दोन अर्थतज्ज्ञ श्री. सोलोस्की व श्री. फोन्टेन वॉशिंग्टनहून मुद्दाम आठवड्यातून एक दिवस प्रिन्स्टला येवून हा वर्ग घेत. वर्ग तीन तासांचा सलग असे. नोकरी सांभाळून प्रिन्स्टन विद्यापीठाच्या आग्रहाखातर ते हा विषय सांभाळत असल्यामुळे वॉशिंग्टनहून येणाऱ्या या अभ्यागत व्याख्यात्यांना सोयीची म्हणून त्यांच्या वर्गाची वेळ सायंकाळी 7.30 ते 10.30 अशी होती. कार्यालय आटोपून द्रुत रेल्वे गाडीने ते वॉशिंग्टनहून प्रिन्स्टनला येत. या वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी अर्थशास्त्राची पदवी असलेले होते. त्यांच्याशी स्पर्धा करणे मला बरेच अवघड गेले. या वर्गाच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 23 जणांमध्ये माझा गुणानुक्रम 10 वा आला. या उपयुक्त विषयात आणखी प्रगती करणे मला जमू शकले नव्हते.
केंद्रीकृत शासन व्यवहारातील अधिकार व धोरणे :
शासन व्यवहारांची तत्वे, त्यातील तंत्रज्ञांचे स्थान, निर्णय प्रक्रिया, शासकीय अधिकाऱ्यांची निवड व प्रशिक्षण, त्यांचे सामाजिक व्यवहारातले स्थान, राष्ट्रीय नियोजन, प्रादेशिक विकास व विकेंद्रीकरण अशा विविध अंगाचा उहापोह या विषयाखाली झाला. जगातील आदर्श शासन व्यवस्था म्हणून नावाजलेल्या फ्रेंच शासन पध्दतीचा संदर्भ घेत घेत व त्यांच्याशी मुख्यत: ब्रिटीश व अमेरिकन शासन पध्दतींची तुलना करत व जर्मनी, जपान, रशिया, चीन यांच्या अनुभवांचाही परामर्श घेत हा अभ्यासवर्ग झाला. राज्याशास्त्राचे प्राध्यापक व्हाल व नगररचना विभागातले प्राध्यापक किन्से अशा दोघांनी मिळून हा अभ्यासवर्ग घेतला.
महाराष्ट्रात व भारतात प्रशासकीय पुनर्रचनेचा विविध अंगांनी विचार त्या दशकात चालू होता. या अभ्यासक्रमामुळे या प्रश्नाच्या अंगोपांगांची मला चांगली माहिती झाली. परीक्षार्थी या नात्याने मी या अभ्यासविषयात सामील झालो होतो. त्याच्या आधारावर 'प्रशासकीय व्यवस्थेचे विकासातील स्थान' या विषयावर मी प्रदीर्घ निबंध तयार केला. तो प्राध्यापकांच्या पसंतीस आला व मला या विषयातही अ श्रेणी मिळाली.
आशियातील आधुनिकीकरण जपानी आदर्श :
जगामध्ये अद्वितीय ठरलेल्या अशा जपानच्या विकासाचा इतिहास नेमका काय आहे, त्यातून काय बोध घेण्यासारखा काय आहे, विशेषत: औद्योगिकरण, शेती व शिक्षण यात जपानने कशी प्रगती करून दाखवली व त्या तुलनेत सध्या भारत व चीन यांच्या प्रयत्नांचे मूल्यमापन कसे दिसते, अशी या विषयाची मांडणी या विषयाच्या प्राध्यापकांनी केली. ' आंतरराष्ट्रीय व्यवहार' या विषयाच्या सन्माननीय प्राध्यापक पदावर असलेले प्रा. लॉकवुड यांनी हा विषय शिकवला. ते अमेरिकन सरकारचे बरीच वर्षे चीन, जपान व कोरियामध्ये शासकीय सल्लागार होते. जपानवर व आशियातील समस्यांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. प्रा. लॉकवुड यांच्या तासाला आपण जागतिक माहितीच्या धबधब्याखाली उभे आहोत असे वाटे.
अर्धसत्राचा हा अभ्यासक्रम मी परीक्षार्थी या नात्याने घेतला होता. समाज व राष्ट्र कशामुळे मोठे होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रिन्स्टनमधील अभ्यासात मजकडून व्हावा अशी एक मौलिक सूचना श्री. आपटे साहेब (मंत्रालयातील मुख्य अभियंता) यांनी मला केली होती. त्या सुचनेला अगदी अनुकूल असा हा अभ्यासक्रम मला पूर्ण करायला मिळाला. त्याची परिणती म्हणून 'जपानमधील कृषिक्रांती' या विषयावर मी विस्तृत निबंध लिहिला. लॉकवुड यांच्या तो पसंतीला आला. त्यामुळे या विषयातही मला अ श्रेणी मिळाली. प्रा. ऑर्लाफ प्रमाणे प्रा. लॉकवुड यांचेही वैयक्तीक प्रेम मला मिळाले. शिवाय त्यांचे वेगळेपण जाणवले ते म्हणजे wws मधील बहुसंख्य प्राध्यापक हे भारताविषयी एक तर उदासीन होते किंवा तुच्छतेचा भाव बाळगणारे होते, पण प्रा. लॉकवुड मात्र भारताबद्दल आशावादी होते.
पर्यावरणीय समस्या व धोरणे :
तंत्रविज्ञानातून येणारी भौतिक समृध्दी ही निसर्गचक्रांवर दुष्प्रभाव टाकीत असल्याने या समृध्दीला व विकासाला अखेर कशा मर्यादा पडतात व त्यामुळे केवळ आर्थिक आकडेवारीने होणारे प्रकल्पांचे पारंपारिक मूल्यांकन त्या प्रकल्पाच्या परिणामांची यथार्थ मोजणी कशी होवू शकत नाही याचा अभ्यास या विषयात होता. त्या काळात अमेरिकेत तंत्रवैज्ञानिकांच्या विरूध्द लोकमताची प्रभावी लाट आली होती. तांत्रिक प्रगतीच्या व तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने धुंद झालेले तंत्रज्ञ समाजाचे पुष्कळदा अकल्याण करीत असतात असा सर्वत्र ओरडा चालू होता. म्हणून प्रिन्स्टनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने हा विषय वुड्रो विल्सन महाविद्यालयात मंथनाला घेतला गेला होता. एक आंतरशास्त्रीय विषय म्हणून त्यात अभियांत्रिकीचे, नगररचनेचे, अर्थशास्त्राचे, राज्यशास्त्राचे, रसायनशास्त्राचे, जीवनशास्त्राचे, पदार्थशास्त्राचे, भूस्तरशास्त्राचे अनेक पदव्युत्तर विद्यार्थी एकत्र आले होते.
भारताच्या केंद्रीयजल आयोगाचे सदस्य राहिलेले श्री. सलढाणा नुकतेच अमेरिकेचा दौरा करून आले होते व महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्यात पूर्ववत रूजू झाले होते. मी प्रिन्स्टनला येण्यापूर्वी त्यांनी या समस्येकडे माझे लक्ष वेधले होते. माझ्या प्रिन्स्टनच्या वास्तव्यात या विषयाचा पाठपुरावा करता आल्यास मी पहावे अशी त्यांची मला आग्रहाची सूचना होती. योगायोगाने नेमक्या याच विषयाचा अभ्यास करण्याची संधी वुड्रो विल्सन महाविद्यालयात मला मिळाली.
धरणे, औष्णिक वीजघरे, अणुनिर्मित वीज, खाणी, रासायनिक उद्योग यावर पर्यावरणवाद्यांचा विशेष हल्ला होता. बहुशाखीय विश्लेषणाचा नमुना म्हणून पूरनियंत्रणाचे मुख्य उद्दिष्ट्य असलेला व अमेरिकेत विवादग्रस्त ठरलेला Tocks Island Dam Project हा जलाशय प्रकल्प छाननीसाठी या वर्गात घेण्यात आला होता. एखाद्या प्रकल्पाच्या इष्टानिष्टतेचा निर्णय अखेर कोणी करायचा ? तंत्रज्ञांनी, सामाजिक विचारवंतांनी का राजकीय पुढाऱ्यांनी ? असाही वाद होता. घोळात पडलेल्या या प्रकल्पाची छाननी करण्याचे संशोधनपर काम वुड्रो विल्सन महाविद्यालयाला अमेरिकन प्रशासनातर्फे देण्यात आलेले होते.
त्याचबरोबर नमुन्यादाखलचा दुसरा विषय म्हणून 'ऊर्जा समस्येचा गुंता ' हा जागतिक चर्चेचा झालेला विषय घेण्यात आला होता. हा अभ्यास विषय अणु तंत्रातली पीएच.डी असलेले प्रा. फिवसन व विज्ञान विद्या शाखेतील प्रा. सॉकोलोव्ह हे दोघे मिळून घेत होते. मी परीक्षार्थी म्हणून हा अभ्यासक्रम स्वीकारला होता.
वर्गात वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असणारे 20 विद्यार्थी एकत्र होते या वर्गातील चर्चेमध्ये धरणांवर सर्वांकडून होणारा हल्ला पाहून मी स्तंभित झालो. टॉक्स आयलंड प्रकल्पाची आखणी अमेरिकेच्या Army Corps of Engineers या अनुभवी संघटनेने केलेली होती. विशेष गंमत अशी की Army Corps मधील एक अभियंता अधिकारी मोन हा मजबरोबर वुड्रो विल्सन महाविद्यालयात या अभ्यासवर्गात होता. स्थापत्यशास्त्राचे असे आम्ही दोनच विद्यार्थी या वर्गात होतो. इतरांकडून होणाऱ्या हल्ल्याचा आक्रमक पवित्रा पाहून मोन ने वर्गात मौन स्वीकारले. या संबंधातील अभियांत्रिकी दृष्टीकोन मांडतांना मलाही पुष्कळ कष्ट पडत होते. अमेरिकन प्रशासनाची या प्रश्नांवरची भूमिका समजावून घेण्यासाठी त्यांच्या पर्यावरण संरक्षण अभिकरणाच्या प्रतिनिधींना मुद्दाम वर्गात चर्चेला बोलावले होते. त्यांची गुळमुळीत अधांतरी भूमिका पाहून मग मात्र मी वर्गात स्पष्टपणे आक्रमक भूमिका घेतली. जलाशये व विविध प्रकारचे ऊर्जा प्रकल्प यांच्यावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे खंडन केले.
पर्यावरणीय सुस्थिती हा विषय परिस्थिती सापेक्ष आहे. त्या त्या प्रदेशाच्या ऐहिक प्रगतीच्या अवस्थेशी संबंधीत असलेला विषय आहे, प्रादेशिक विशेषतांशी संबंधीत असलेला विषय आहे. खुद्द अमेरिकेतच याबाबतचे निकष एकाच पध्दतीने बारमाही पावसाच्या पूर्व अमेरिकेत व अवर्षण प्रवण पश्चिमेत व नैऋत्य अमेरिकेत लावता येणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका मी मांडली. प्रा. फिव्हसन माझ्यावर खूष झाले. तुम्हीच पुढे होवून हा सारा विषय विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगा म्हणून त्यांनी मला फळ्याजवळ येण्याचे आवाहन केले व हातात खडू पकडवून दिला. वर्गातील सहाध्यायींवर माझ्या सविस्तर निवेदनाचा चांगला प्रभाव पडल्यासारखे वाटले. कारण नंतर रात्रीच्या जेवणात एकत्र गप्पा करतांना त्यातील काहींनी हा विषय तुम्हीच का शिकवत नाही अशी काहीशी एकांगी सूचनाही मला केली.
या विषयाची परीक्षा म्हणून एक प्रदीर्घ निबंध प्रत्येकाने लिहायचा होता. मी ' पाण्याचे सामाजिक मूल्य' हा निबंध सादर केला. आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्यांचा अंतिम विचार हा सामाजिक संदर्भातच व्हायला हवा असा दृष्टीकोन त्यात मांडला. त्या विषयातही मला अ श्रेणी मिळाली. माझ्या निबंधाची एक छायाप्रत काढून ती अभियांत्रिकी महाविद्यालयातील संदर्भालयात विद्यार्थ्यांसाठी ठेवतो आहोत असेही नंतर मला सांगण्यात आले. हा विषय घेतल्यामुळे पर्यावरण या विषयावरचे सर्वकष अद्ययावत वाचन मजकडून घडून आले.
डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद - मो : 09823161909