जलतरंग - तरंग 3 : धरण रचना

Submitted by Hindi on Tue, 12/01/2015 - 13:47
Source
जल संवाद

1956 ते 60 या काळात नदीवरील पुलांप्रमाणे सिंचन प्रकल्पांच्या धरणबांधणीचा मोठा कार्यक्रम सरकारच्या दृष्टिपथात होता. यंत्राच्या सहाय्याने मातीची धरणे द्रुतगतीने उभी करण्याचे तंत्र गंगापूर व घोड धरणांवर यशस्वीपणे वापरल्यानंतर या पध्दतीने अनेक मातीची धरणे महाराष्ट्रात हाती घेण्याचे नियोजन होते. अडचण होती ती धरणांची रचना आधुनिक पध्दतीने ठरवू शकणाऱ्या व ती तशी प्रत्यक्षात उभी करू शकणाऱ्या प्रशिक्षित अभियंत्यांची.

1956 ते 60 या काळात नदीवरील पुलांप्रमाणे सिंचन प्रकल्पांच्या धरणबांधणीचा मोठा कार्यक्रम सरकारच्या दृष्टिपथात होता. यंत्राच्या सहाय्याने मातीची धरणे द्रुतगतीने उभी करण्याचे तंत्र गंगापूर व घोड धरणांवर यशस्वीपणे वापरल्यानंतर या पध्दतीने अनेक मातीची धरणे महाराष्ट्रात हाती घेण्याचे नियोजन होते. अडचण होती ती धरणांची रचना आधुनिक पध्दतीने ठरवू शकणाऱ्या व ती तशी प्रत्यक्षात उभी करू शकणाऱ्या प्रशिक्षित अभियंत्यांची. दुसऱ्या महायुध्दानंतर मातीच्या मोठ्या धरणांचे नवे तंत्र जगभर मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मृद अभियांत्रिकी हा नवा विषय आकाराला आला होता. त्याविषयी आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण होवून त्यांच्या त्रैवार्षिक परिषदा सुरू झाल्या होत्या. पण भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र अजून या विषयाचे अध्यापन सुरू झाले नव्हते.

श्री. भालेराव, श्री. दाते अशा उदयोन्मुख नव्या अभियंत्यांना अशा परिषदांना व प्रशिक्षणाला परदेशी पाठवून सरकारने या विषयांतील तज्ज्ञांची नवी पिढी उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्या धारेत सामील होण्यासाठी मला पुलांच्या संकल्पचित्रांमधून काढून मातीच्या धरणांच्या संकल्पचित्रांच्या जबाबदारीत भाग घेण्याकरता पाटबंधारे खात्याच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेत अचानक वर्ग करण्यात आले. कोयना प्रकल्पाचे अभियंता व शिल्पकार श्री. चाफेकर यांच्या मार्गदर्शना प्रमाणे केंद्रीय सेवांमध्ये झालेली माझी स्वत:ची निवड स्वेच्छेने नाकारून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागांत रूजू होण्यापाठीमागे माझ्या मनात चाफेकरांनी रूजवलेले जल विकास सेवेचे मुख्य उद्दिष्ट होते. ते आता सहजपणे पूर्ण होवू शकेल याचा या अकल्पित झालेल्या नेमणुकीमुळे मला खूप आनंद झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन धारांत वाटणी होवून पाटबंधारे धारा स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन होण्याचे ठरत होते. त्यामुळे पाण्याच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम करायची संधी अनायसे चालून आली होती.

परदेशात झालेल्या जागतिक परिषदांमध्ये प्रसिध्द झालेले लेख व मृद अभियांत्रिकी या विषयावर डॉ. कार्ल टेरगॅझी यांचे गाजलेले पुस्तक यांच्या आधाराने मला 'मृदयांत्रिकी' हा नवा विषय समजवून घ्यायचा होता. या विषयांतल्या अनेक संकल्पना मला पूर्णत: नव्या होत्या.

पूर्णा नदीवरील येलदरी व सिध्देश्वर या मोठ्या धरणांचे काम हाती घेण्यात आले होते. विदर्भात बाघ, इतियाडोह, बोर या धरणांना चालना मिळाली होती. तेथील उपलब्ध मातीची परीक्षा, त्यासाठी नव्याने उभ्या होत असलेल्या प्रकल्पीय परीक्षण शाळांच्या मदतीने करवून घेणे व त्याच्या आधारावर धरणांची रचना निश्चित करणे हे काम होते. मी रूजू झाल्यानंतर थोड्याच महिन्यात गुजराथ वेगळा झाला. त्यामुळे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेत श्री. धानकांच्या जागी श्री. सलढाणा रूजू झाले. गंगापूर धरणावरील परीक्षण शाळेचे काम यशस्वीपणे सांभाळलेले श्री. सलढाणा आता अधीक्षक अभियंता झाले होते. एका नवख्या विषयात रूळण्यांत मला माझे ज्येष्ठ अधिकारी व मार्गदर्शक असणारे श्री. धानक, कार्यकारी अभियंता, श्री. जथल, (ते पुढे गुजराथचे मुख्य अभियंता झाले) व श्री. सलढाणा यांची खूप मदत झाली. श्री. भालेराव व श्री. दाते मातीच्या धरणांच्या कामावर त्या काळात क्षेत्रीय कार्यकारी अभियंता होते. त्या दोघांबरोबरच्या मनमोकळ्या चर्चांचा व चोखंदळ विश्लेषणाचाही मला हा विषय समजण्यात खूप उपयोग झाला. यथाकाल काही वर्षांनंतर श्री. भालेरावांनी मातीचे धरण हे या विषयावरचे मराठीतले पहिले वैज्ञानिक पुस्तकही लिहिले. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेत सहाय्यक अभियंता म्हणून काम करीत असतांना माझी यथाकाल तेथेच पदोन्नती होवून मी कार्यकारी अभियंता झालो होतो.

धरणांच्या क्षेत्रीय वसाहतींत माती परीक्षण शाळा नव्याने उभारण्यात येत होत्या. परीक्षण कामासाठी आवश्यक असलेली वैज्ञानिक उपकरणे त्यावेळी भारतात सहजपणे उपलब्ध होत नव्हती. भारतीय उपकरणे उत्पादकांनी नव्याने यात लक्ष घालायला सुरूवात केली होती. पण पुरवठ्याला विलंब लागे. अशा अडचणींतून मार्ग काढून मातीच्या मोठ्या धरणांची बांधकामे वैज्ञानिक पायावर होण्यासाठी ज्या अभियंत्यांनी विशेष धावपळ केली, परिश्रम केले, त्यात लक्षात रहाण्यासारखे योगदान विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील बोरधरण वरच्या परिक्षण शाळेत कामाला असलेले श्री. सहस्त्रबुध्दे यांचे होते. जेथे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांत मृद यांत्रिकीचा समावेश नव्हता, तेथे पदवीधारकांना तर या विषयाची तोंड ओळख असणे शक्यच नव्हते. पण स्वप्रयत्नांनी या विषयाची समज वाढवत वाढवत मातीचे परिक्षण करून धरणाच्या विविध भागांसाठी योग्य त्या गुणवत्तेची माती निवडण्यात त्यांनी चांगली पारंगतता मिळवली होती.

बोर धरणावर गेलो की त्यांची भेट होई, तेव्हा त्यांचे कौतुक वाटे. या अभ्यासू वृत्तीमुळे पुढे त्यांनी औपचारिक शैक्षणिक पात्रता हस्तगत करीत करीत शेवटी पीअेच.डी मिळवली. अशी धडपडणारी नवी तरूण पिढी या धरणांच्या वसाहतीत भेटायची. मातीच्या मोठ्या धरणांच्या प्रारंभीच्या काळातील त्यांच्या तपश्चर्येमुळे हळूहळू मातीची धरणे हा विषय महाराष्ट्रात चांगला रूळला. आज हजारो मातीची धरणे आपण महाराष्ट्रात आधुनिक पध्दतीने उभी करू शकलो याचे श्रेय त्या काळातील या अबोल कार्यकर्त्यांना आहे. शासनात आता रूढ झालेली वार्षिक गुणवत्ता पुरस्कारांची चांगली पध्दत त्या काळात सुरू झाली नव्हती. तरीसुध्दा निरपेक्ष वृत्तीने ज्यांनी मृदयांत्रिकीचा नवा विषय आत्मसात केला व जलविकासाची सर्वदूर पायाभरणी केली, त्यांचे आपल्यावर मोठे ऋण आहे.

महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशावर सर्वत्र एकाच प्रकारचा कातळाचा दगड, मुरूम, काळी माती, चिबड माती अशी भूस्तरीय रचना आहे. पण पूर्व विदर्भात वैनगंगेच्या पूर्वेला भूस्तरीय रचनेतच भूशास्त्रीय वेगळेपणा असल्याने तेथील इतियाडोह, बाघ या धरणांवर वापरायची माती अगदी भिन्न गुणधर्माची आहे. तिचा वापर मोठ्या धरणांसाठी कुशलतेने घडवून आणणे हे धरण रचनेतले वेगळे आव्हान होते. बाघ प्रकल्पाच्या धरणाच्या जागी भिसा नावाची अगदी वेगळ्या प्रकारची पांढऱ्या रंगाची माती आहे. त्या प्रकल्पांवर नेमले गेलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हळूहळू अशा वेगळ्या प्रकारच्या मातीची प्रयोग शाळेत नीट तपासणी करून त्या मातीच्या वापराचे तंत्र विकसित होण्यात मोठा वाटा उचलला. म्हणून धरण बांधणीचे नवे आधुनिक युग तेथेही पोहचू शकले.

विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील दीना नदीवरील धरणस्थळींची भूस्तरीय रचना अगदीच वेगळी व गुंतागुंतीची आहे. पातळ पापुद्रे निघणारा शीस्ट दगड त्या परिसरात सर्वत्र आहे. पाणी टाकले की त्याच्या मातीचा लगदा हाताळणे अवघड जाईल. स्पर्धा परिक्षेत नव्यानेच प्रथम श्रेणीचे अधिकारी म्हणून नेमणुक झालेले श्री. श्रीधर भेलके सहाय्यक अभियंता म्हणून तेथे नेमले गेले होते. पावसाळ्यात धरण स्थळींच्या वसाहतींत पोचणे चार महिने शक्य नव्हते ते सपत्नीक रहात असलेल्या धरण स्थळींच्या वसाहतीचा इतर भागांशी संपर्क तुटलेला. वैनगंगेवर व दीनेवर पुल नव्हते, रस्तेही जेमतेमच. अशा अवस्थेतही श्री. भेलके नेटाने त्या कामावर टिकून राहिले. अपरिचित गुणधर्मांच्या मातीची तपासणी करून धरणाची रचना, पायाखालील चराची खोली, यातील नव्या गरजांची डोळस मांडणी करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. पुढे भेलके महाराष्ट्राचे पाटबंधारे खात्याचे सचिव झाले.

मध्यवर्ती संकल्पचित्र मंडळाचे कार्यालय मुंबईत असल्याने माझे वास्तव्य मुंबईत होते. धरणस्थळांवरच्या वातावरणापासून अगदी वेगळ्या नागरी वातावरणात दैनिक वावर होई. पण धरणस्थळींच्या प्रयोगशाळांमध्ये व क्षेत्रीय बांधकामावर धडपडणाऱ्या, योग्य त्या मातीच्या शोधासाठी आडवळणी परिसरात पायपीट करणाऱ्या अभियंत्यांची आठवण होई. त्यांचा तेथील कामाचा हुरूप पाहून उत्साहित व्हायला होई. स्पर्धापरीक्षेतून प्रथमश्रेणीत आलेल्या नव्या तरूण अधिकाऱ्यांना मोठ्या धरणांच्या नव्या कामावर शासनाने विचारपूर्वक त्या काळात नेमलेले दिसते. पुढे शासनाच्या ज्येष्ठ पदावर पोचलेले श्री. शिंपी, श्री. डांगे, श्री. ओक, श्री. रत्नपारखी, श्री. नवाथे हे सारे अधिकारी मोठाल्या धरणांच्या उभारणीच्या कामावर त्यांच्या सेवेच्या प्रारंभीच्या काळातच नेमले गेले होते.

पानशेतच्या मातीच्या धरणाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पावसाच्या अवकाळी तीव्र वर्षावाने 1961 जुलैमध्ये ते अचानक कोसळून पडले. पाठोपाठ पानशेतच्या खाली असलेले जुने खडकवासला धरणही कोसळले. त्या दोन्ही धरणांच्या पुनश्च उभारणीचे मोठे आव्हान होते. मातीची धरणे बांधावीत का नाही यावर वर्तमानपत्रात व औपचारिक / अनौपचारिक चर्चांमध्ये खूप खल चालू झाला होता. पुणे परिसराचे खूप नुकसान झालेले असल्यामुळे त्या अपघाताची चौकशी विशेष न्यायमूर्तींकडे देण्यात आली होती. त्यांच्यासमोर अनेकांच्या उलट सुलट साक्षी झाल्या.

त्यात मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेत मातीच्या धरणांचा विषय हाताळणारे अधीक्षक अभियंता श्री. सलढाणा (ते पुढे महाराष्ट्राचे पाटबंधारे सचिव व केंद्रिय जल आयोगाचे सदस्यही झाले) यांची समतोल पण दृढ विचाराने मांडलेली साक्ष झाली. वेगवेगळे संदर्भ व जगभराचे अनुभव यांचा आधार घेत त्यांनी आश्वासक साक्ष दिली. संकल्पचित्र संघटनेतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा त्या विषयातील कार्यकारी अभियंता म्हणून ती साक्ष न्यायसभेत बसून ऐकण्याचा मला योग आला. गंगापूर धरणाच्या माती परिक्षणाची व परीक्षण शाळेची जबाबदारी सलढाणांनीच पूर्वी सांभाळलेली होती. त्यामुळे त्यांच्या विवेचनातील स्पष्टता व आश्वासकता याचा न्यायमूर्तीवर पडणारा प्रभाव तेथे स्पष्टपणे जाणवत होता. न्यायालयीन प्रक्रिया हाताळतांना लागणारी व्यापकता व कुशलता यांचे या निमित्ताने माझे शिक्षण झाले.

आधुनिक विकासाच्या मार्गावर निघालेल्या मराठी समाजाचेही मातीच्या धरणांच्या स्वीकारात मोठे योगदान राहिले आहे. विज्ञाननिष्ठ समाजाने जसे सूज्ञपणे वागायला हवे, तसे घडले. एकाहून एक अधिक उंचीच्या व अवघड रचनांच्या मातीच्या धरणांचा सिलसिला पानशेत नंतरही चालू राहिला. आता मागे वळून पाहिले की, स्पष्टपणे जाणवते की, बांधकामाखाली असलेले एक मोठे धरण पडल्यानंतर व पुण्यासारख्या महत्वाच्या शहराला त्याचा मोठा फटका बसल्यानंतर राजकीय नेतृत्वाने हाय खाल्ली नाही. नव्या आधुनिक दिशेने विकास कामांची मांडणी करण्याची पध्दत त्यांनी कायम ठेवली. या विषयाला गवसणी घालणाऱ्या अभियंत्यांची सुध्दा धिटाई व तांत्रिक आत्मविश्वास इतका की, मुसळधार पावसाला दरवर्षी तोंड देणाऱ्या कोकणात मातीची धरणे यशस्वी होवू शकणार नाहीत अशी शंका महाराष्ट्राच्या पहिल्या सिंचन आयोगाने त्यांच्या 1962 च्या अहवालात व्यक्त केल्यानंतरही माती निवडीचे व धरण उभारणीचे बारकावे काटेकोर पध्दतीने हाताळून एकेक करत आजवर शंभराहून अधिक मातीची धरणे कोकणात यशस्वी करून दाखवली गेली आहेत.

पानशेतच्या अपघातानंतर मातीची जी इतर मोठी धरणे त्यावेळी बांधकामाखाली होती किंवा पूर्ण होत आली होती त्यांच्या रचनांची पुन्हा एकदा काटेकोर शहानिशा करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यासाठी श्री. सलढाणांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. त्या समितीचे सचिव पद मला सांभाळावे लागले. धरणांच्या समग्र रचनांच्या फेरतपासणीचा हा माझा पहिलाच अनुभव. अत्यंत मोकळ्या मनाने त्या धरणांवरच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य दिले. त्यामुळे अगोदरच मंजुर झालेल्या रचनांमध्येही आणखी काही सुधारणा करून त्या धरणांची उभारणी अधिक निर्दोष व सुरक्षित करता आली. पुढे महाराष्ट्रात मुख्य अभियंता पदावर पोचलेले श्री. वरूडकर, श्री. गानू, श्री. अभंगे यांच्याशी मराठवाड्यातील धरणांवर त्यावेळी माझी प्रथम ओळख झाली. नवा विचार, नव्या सुधारणा यांचा त्यांनी सहजपणे स्वीकार केला.

धरणरचनांच्या कामात भूस्तराचे स्थल विशिष्ट महत्व लक्षात आलेले असल्यामुळे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेतून बदली होवून मुळाधरणावर कार्यकारी अभियंता म्हणून रूजू झाल्यावर तेथील भूस्तरांची नीट तपासणी करण्याकडे माझे प्रथम लक्ष गेले. त्यामुळे नदी पात्रात व नदी काठी खोल वर गाळ असलेल्या नदीवर धरणाच्या पायाच्या कामाची फेर आखणी वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारावर करता आली. शिवाय नदी स्कंधांवरील टेकड्यांमध्ये लाल गेरूच्या थरांवरही मातीच्या धरणाचे कवच घालून सुरक्षित रचना ठरवता आली. धरणाच्या रचना निश्चित करण्यापूर्वी धरणस्थळाचे भूस्तरीय अन्वेषण काटेकोरपणे व्हायला हवे असते. पण त्याला वेळ लागतो. विकास कामांच्या दबावाखाली तेवढा धीर अधिकाऱ्यांना धरवत नाही. प्रकल्प अहवालात मंजूर करण्यात आलेल्या मुळा धरणाची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मला पूर्णत: फेररचना करावी लागली होती.

त्यासाठीच अभ्यास चालू असतांना मला मात्र तत्कालिक अधीक्षक अभियंत्याकडून एक दोषदर्शक खरमरीत पत्र आले. 'भूस्तरीय अभ्यासात आपण फार वेळ वाया घालवू नका' माझ्या शासकीय नोकरीच्या प्रदीर्घ काळात मला मिळालेले हे एकमेव दोषारोपाचे पत्र ! पण त्या पत्राने गडबडून न जाता मी आवश्यक त्या फेररचना नीट पूर्ण करू शकलो याचे मुख्य श्रेय माझे सहकारी असलेल्या त्या वेळच्या माझ्या उपअभियंत्यांना आहे. त्यांनी भूशास्त्रीय अभ्यासात व जलवैज्ञानिक फेर हिशेबात खुल्या मनाने काम केल्यामुळे धरण रचनेतले आवश्यक ते महत्वाचे बदल होवू शकले.

घाईघाईत केलेला प्रकल्प अहवाल व पाण्याच्या उपलब्धता ठरवण्यासाठी वापरलेली चुकीची सूत्रे यामुळे मुळा धरणाची मंजूर प्रकल्पातील साठवण क्षमता 32 टीएमसी ठरवण्यात आली होती. पावसाच्या व नदीप्रवाहांच्या मोजणीचे फेरविश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की 24 टीएमसी पेक्षा अधिक पाणी मुळा धरणाच्या जागी विश्वासार्ह साठवणीसाठी उपलब्ध नाही. शासनाच्या हे लक्षात आणून दिल्यानंतर, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेतील जलविज्ञान विभागाचा सल्ला घेवून धरणाची उंची कमी करायला शासनाने अनुमती दिली.

अशा निर्णयांचा त्यावेळी अगोदर चुकीचा राजकीय अर्थ लावला गेला. गोदावरीवर मुळा धरणाच्या खालच्या बाजूस जायकवाडीचे मोठे धरण होवू घातले असल्याने मुळा धरणाची उंची कमी करण्यात येत आहे अशी आंवई उठवण्यात आली. तत्कालीन विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्याबाबतीतील शहानिशा करून घेण्यासाठी अनेकदा माझ्याकडे आले. शेवटी असे ठरले की, कॉ. दत्ता देशमुखांच्या बरोबर या सर्वांनी बैठकीसाठी मुळा धरणावरील विश्रामालयात एकत्र यावे. तेथे पाण्याची मोजणी व फेरहिशोब करणारे धरणाचे उप विभागीय अधिकारी त्यांना सर्व तक्ते व मोजणी पत्रके दाखवतील. नंतर चर्चा होईल. त्याप्रमाणे खुली चर्चा झाल्यामुळे सर्वांच्या शंकाचे निरसन झाले व धरणाची उंची कमी केल्याच्या तक्रारीला आंदोलनाचे स्वरूप आले नाही. कॉ. दत्ता देशमुखांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा असा की, त्यांनी सर्व तपशील समजून घेतल्यावर शासकीय निर्णय योग्य असल्याचे मन मोकळेपणाने स्वीकारले व तसे बोलून दाखवले. या वादातून माझा मात्र एक मोठाच अप्रत्यक्ष फायदा झाला तो म्हणजे दत्ता देशमुखांशी झालेली दीर्घकालीन वैयक्तिक मैत्री.

मुळा नदीच्या पाण्याच्या प्रवाहांची फेरतपासणी करतांना आणखी एक निसर्गाचे वैशिष्ट्य लक्षात आले की, पूरांचे प्रमाण दरवर्षी फार फार भिन्न आहे. एखाद्याच वर्षी भरमसाठ पूर येतो. पण बरीचशी वर्षे अगदी मोजका थोडा पूर येतो. मातीच्या धरणाच्या रचनेत पूर सुरक्षितपणे हाताळणारी सांडव्याची रचना नीट असावी लागते. सांडव्यावरून कोसळणाऱ्या पुराची तीव्रता फक्त कधी तरीच खूप राहणार आहे. मग सांडव्याच्या तळाशी पूरपाण्याच्या ऊर्जाशमनाची व्यवस्था सांडव्याच्या सर्व दरवाजांसाठी सारखीच कशासाठी ठेवायची ? म्हणून मुळा धरणाच्या सांडव्याच्या माथ्यावरील दरवाजांचे धरणाच्या फेररचनेत तीन गट करण्यात आले. दरवाजांचा मधला गट हा पुराच्या पूर्ण ऊर्जाशमनासाठी लागणारे कुंड असणारा व बाजूचे दोन गट मात्र हे त्यातून जाणाऱ्या पुराचे पाणी पायथ्याजवळ दगड हा पुरेसा वर उत्प्लवन पध्दतीने दूर फेकले जाईल अशा रचनेचे. सांडव्याच्या पुढ्यातला दगड हा पुरेसा टणक व भेगा नसलेला आहे याची भूस्तरीय निरीक्षणांनी खात्री करून घेतल्यामुळे मंजूर प्रकल्पापेक्षा वेगळी अशी काटकसरी व्यवस्था बसवता आली. सांडव्याचा खर्च 30 टक्के कमी झाला. भूस्तर अभ्यासामधील डोळस विश्लेषणांमुळेच हे शक्य झाले होते.

ब्रिटीश राजवटीच्या काळात योजले गेलेले पण नंतर पायातील वाळूथरांना अभेद्य करण्याचे फ्रेंच तंत्र लागू न पडल्याने धरणाच्या पायाखालील वाळूच्या थरांतून खालच्या खडकापर्यंत मानवी श्रमांतून टाकण्यात आलेला जलविरोधी लवचिक पडदा, बाजूच्या टेकड्यांमधील थरांना झाकणारे धरणाचे कवच, सांडव्याची तीन टप्प्यांतील रचना व तदनुसार ऊर्जा नि:सारण व्यवस्था असे प्रथमच अमलात येणारे अनेक तांत्रिक पैलू यशस्वीपणे व्यवहारात आणून एका अवघड वाटणाऱ्या जागी उभे राहात असलेले मुळा धरण हे अभियांत्रिकीचा एक आगळावेगळा नवा नमूना असल्यामुळे त्याच्या बांधणीचा इतिहास नीट क्रमश: लिहिला जावा अशी सरकारची इच्छा होती. त्यासाठी मंत्रालयातून एक दिवस आदेश आले की, 'मुळा धरण इतिहास लेखन उप विभाग' मंजूर करण्यात येत आहे. त्या स्वतंत्र उप विभागातून हे काम पूर्ण करून घेतले जावे. उपविभागाची स्थापना होवून त्याचे काम श्री. धोंगडे, उप अभियंता यांनी सुरू केले.

पुढे काही कालावधीनंतर जेव्हा माझी मुळा धरणावरून दुसरीकडे बदली झाली. त्यानंतर केव्हा तरी तो उप विभाग 'काटकसरीच्या' निमित्ताने बंद करण्यात आला तो कायमचाच. 2008 मध्ये अहमदनगर सिंचन सहयोगातर्फे मुळा धरणाचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. बांधकामाच्या काळातील कामगार, अभियंता, लिपीक त्या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्साहाने व आत्मयितेने दुरून दुरून स्वखर्चाने आले. एकमेकांना त्या काळाच्या आठवणी सांगतांना सद्गदीत झाले. त्यांनी केलेल्या कामाची जुनी छायाचित्रे, नकाशे, तपशीलांतले तक्ते, चित्रफीत, यांतील बरेचसे काही त्यांना पहायला मिळू शकले नाही. इतिहास उप विभाग बंद झाल्यानंतर काळाच्या उदरात ते सारे गडप झाले.

टीप :
1. पूरक संदर्भ : सुवर्ण किरणे - सौ. विजया चितळे : साकेत प्रकाशन (2010) पृष्ठ 41 ते 50
2. विज्ञानयात्री डॉ. माधव चितळे - अ.पां.देशपांडे, राजहंस प्रकाशन (2011) पृष्ठ 30 ते 36

डॉ. माधवराव चितळे , औरंगाबाद - मो : 09823161909