Source
जलसंवाद, अप्रैल 2017
राज्य शासन नुसते योजना राबवून थांबले नाही तर पाणी हे किती अमूल्य आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने गेल्या वर्षीपासून जलजागृती सप्ताहाचे आयोजन सुरू केलेले आहे. या जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न जागोजागी केला जात आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये पाण्याबाबत जागरुकता निर्माण करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासह त्याचा काळजीपूर्वक वापर करण्याबाबत जागृती केली जाते.
पाणी हेच जीवन आहे, असे नेहमीच म्हटले जाते. पाण्याविना पृथ्वीवर मानवीजीवनाची कल्पनाही करवत नाही. आज मानव चंद्रापासून ते मंगळाच्या पृष्ठभूमीवर पाण्याचा साठा आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे जेणेकरून तेथे मानवजीवनाची शक्यता पडताळून बघता येईल. परंतु, पृथ्वीवर वास्तव्य करणारे आम्ही निसर्गाने अगदी मोफत दिलेल्या अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व जाणतो का? म्हणतात की पाणी जेवढे प्याल तेवढे कमीच आहे. परंतु, ही बाब खरोखरच पूर्णपणे सत्य आहे का, असे विचारले तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील आरोग्यास घातक ठरू शकते. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणे केव्हाही धोकादायकच आणि पाणीदेखील त्याला अपवाद नाही. पाणी कार्बोहायड्रेट्स, प्रोटिनसारखे पोषणाचे काम करत असते.जिवांना ज्या वस्तूची ज्या अनुपातात गरज असते निसर्गाने ते तत्त्वही त्याचा अनुपातात उपलब्ध करून दिले आहे. परंतु, सध्याचा विचार करता पाणी आणि वायू या दोन्ही गोष्टींबाबत गंभीर संकट निर्माण झाले असेल तर आम्ही नक्कीच कुठे ना कुठे चूक केली हे समजून घेण्याची गरज आहे. पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे. अवस्था परिवर्तन करण्याचा पाण्याचा हा स्वभाव त्याच्या उपयोगाच्या आयामांना विस्तृत करतो. पाणी जर बर्फ बनून राहू शकले नसते तर गंगेसारख्या पवित्र नद्या अस्तित्वात नसत्या आणि पाण्याचे वायू बनून बाष्पिभवन झाले नसते तर पृथ्वीवर पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नव्हती. परंतु, ज्या वस्तूला तो व्यवहारात आणतो ती दूषित करून टाकतो, हा मानवी गुणधर्मच आहे. त्यामुळेच आज नद्या सुकल्या आहेत, भूमिगत जलसाठे असलेल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत, केवळ समुद्रच नव्हे तर पावसाचे पाणीही कमी अधिक प्रमाणात दूषित झाले आहे. वाढत्या जल प्रदूषणावर अनेक चर्चासत्र, परिसंवाद वगैरे असंख्य गोष्टी आयोजित केल्या जातात. परंतु, या विश्वव्यापी समस्येवर कोणताही ठोस तोडगा काढण्यात अद्याप यश आलेले नाही.
नैसर्गिक स्रोतांचे पेटेंट केले जावे, असाही प्रयत्न सुरू आहे. याचाच अर्थ असा की, विशिष्ट नदी किंवा धरणावर एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचा अधिकार असावा आणि त्या कंपनीने या साठ्यातील पाणी बाटल्यांमध्ये बंद करून ते मिनरल वॉटर म्हणून बाजारात विकणे यामध्ये अभिप्रेत आहे. याबाबत सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन होता, परंतु पर्यावरणवाद्यांनी याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर सरकारने याबाबत मौन धारण केल्याचे बोलले जाते. ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तूवर बाजारवादाचा प्रभाव आहे तो बघता नद्या आणि इतर जलाशये या कंपन्यांपासून किती काळ मुक्त राहू शकतील, असा प्रश्नच आहे. सरकारे आपल्या वाढत्या खर्चाच्या भरपाईसाठी विविध क्लृप्त्या शोधत आहे.
पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मानवासह भूतलावर असलेल्या सर्वच प्राण्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, असे असले तरी पिण्याचे स्वच्छ पाणी खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. सुरक्षित पाण्याचा अभाव म्हणजेच दुष्काळ. आजही देशाच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा दुष्काळ असून, त्या भागातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हे एक फार मोठे आव्हान आहे. पाण्याच्या अभावामुळे लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना तोंड द्यावे लागते. दुष्काळी भागातील लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खूप प्रयत्न, पैसा आणि वेळ लागतो. केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ज्या लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्यांना आपण दररोज अनावश्यक कारणांसाठी जो पाण्याचा अपव्यय करतो त्याचे महत्त्वच लक्षात येत नाही.
आपणा सर्वांना याची कल्पना असेलच की, पृथ्वीवरील फक्त दोन टक्के पाणी शुद्ध आणि मानवाने सेवन करण्यासाठी उपयुक्त आहे. बहुतांश पाणी ग्लेशियर, बर्फ आणि इतर खुल्या स्रोतांमध्ये अडकले आहे. भूजल हा शुद्ध पाण्याचा मुख्य स्रोत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नैसर्गिक प्रक्रिया उपलब्ध असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदल, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग या विविध कारणांमुळे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली जात असून, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामुळे स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता वाढत आहे. वाढती लोकसंख्या, कृषी व औद्योगिक क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता येणार्या दशकांमध्ये स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याच्या मागणीत वाढ होणार हे निश्चित.
ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता शक्य तेवढे पाणी वाचविण्यासाठी आम्ही एकत्र येऊन प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. दैनंदिन जीवनात पाणी वाचविण्याचे अनेक उपाय आहेत. जल संवर्धनाच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसार पाणी वाचविले जाऊ शकते. वर्तमान आणि भविष्यातील गरज भागवायची असेल तर पाणी वाचविण्यासह ते प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. येणार्या पिढ्यांना पाणी उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्यासाठी आज ते वाचविणे आवश्यक आहे. जर आम्ही आजच या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर नैसर्गिक स्रोतांपासून मिळणार्या शुद्ध पाण्याची कमतरता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याची गरज कमीत कमी करुन आम्ही केवळ मानवालाच नव्हे, तर शुद्ध पाण्याचे स्रोत, स्थानिक वन्यजीव आणि स्थलांतरित पक्ष्यांनाही वाचवू शकतो. यादृष्टीने पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब वाचविण्यासाठी आम्हाला आमच्या सवयींमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील.
आज जगातील अनेक देशांमध्ये पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. मात्र, सर्वच लोकांचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. निसर्गाचे चक्र बिघडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. वनांची आणि वृक्षांची कमतरता यामुळे पावसाचे पडणारे पाणी पृथ्वीच्या पोटात जाण्याऐवजी दूर जाते. काहीही झाले तरी ही परिस्थिती आम्हाला बदलावीच लागेल.
गेल्यावर्षी वरुण राजाने महाराष्ट्रावर कृपा केली असली तरी त्याआधीची तीन-चार वर्षे आपल्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेतकर्यांना सिंचनासाठी व इतर कामांसाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारने राज्यातील अवर्षणग्रस्त भागांना कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये प्रमुख ठरली ती जलयुक्त शिवार योजना. जलयुक्त शिवार योजनेचे फायदे यंदा दिसतील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. याशिवाय मागेल त्याला शेततळे, विहिरींसाठी अनुदान या इतर योजनांच्या माध्यमातून फडणवीस सरकारने कायमच्या दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदा अंदाज वर्तविल्याप्रमाणे जर मान्सूनच्या पावसावर अल निनोचा फारसा परिणाम जाणवला नाही तर या सर्व योजना किती फायदेशीर आहेत याची आपल्याला प्रचिती येऊ शकते. याशिवाय आमिर खान व इतर मराठी कलावंतांनी देखील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या कामी हातभार लावला आहे.
राज्य शासन नुसते योजना राबवून थांबले नाही तर पाणी हे किती अमूल्य आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने गेल्या वर्षीपासून जलजागृती सप्ताहाचे आयोजन सुरू केलेले आहे. या जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न जागोजागी केला जात आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये पाण्याबाबत जागरुकता निर्माण करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासह त्याचा काळजीपूर्वक वापर करण्याबाबत जागृती केली जाते. शासनाच्या या उपक्रमाला राज्यभरात भरभरून प्रतिसाद मिळाला असून सामान्यांना पाण्याचे महत्त्व कळून आले असेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
श्री. प्रवीण महाजन ,नागपूर - मो : 9922380111