सागर मित्र अभियान आणि तिसरे स्वराज्य

Submitted by Hindi on Mon, 12/26/2016 - 11:40
Source
जल संवाद

या आधीच्या काही सागरशृंखलेतील लेखांमध्ये डॉ. विश्वास येवले आणि त्यांनी सुरू केलेल्या जलदिंडीबद्दल लिहिले आहेच. २००२ ते २००५ मध्ये जल दिंडीतील अनुभव घेता घेता अनेक संस्थांशी संबंध जुडले. त्यातच प्रवासाच्या वेळेस जाणवले की जलदिंडीच्या आळंदी ते पंढरपूर प्रवासात जे लोक भेटतात त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी भीमा नदीचा नकाशा काढला पाहिजे. माझे मित्र मिलिंद सोनटक्के यांच्या मदतीने, जलदिंडिच्या सेवेत, भीमा नदीचा एक साधा नकाशा तयार झाला. त्यात जलदिंडीच्या ४५० कि.मी नदी प्रवासात आळंदी ते पंढरपूर जातांना, ज्या ११ गाव - खेड्यांमध्ये टीम रात्री थांबायची त्यांचे स्थान दाखविले होते. या नकाशात भीमा नदीच्या, नीरा, कर्‍हा, घोड, कुकडी व इतर उपनद्यांचे प्रवाह मार्गही आखलेले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात डॉ. येवलेंच्या ‘उवाच’ या प्रासादिक प्रथम - ग्रंथातील अतिशय महत्वाच्या रचना होत्या.

जलसंवाद‘अहमाचे दंभ विरले, थेंबाशी थेंब जुळले,
प्रेमाने कुंभ भरले व चिंब चिंब भिजले
रंगांचे बीज लोपले, किरणांचे पुंज जुळले,
ज्ञानाचे गुंज ऐकले, बिंब पूर्णाचे ओंकारले.’


हा भीमा नदीचा नकाशा जलदिंडीच्या ग्राऊंड टीमच्या ट्रक वर दोन्ही बाजूला फ्लेक्स वर लावला जात असे. अगदी १२ x ८ फूट एवढा. याला प्रवासाच्या वेळेस चांगलाच प्रतिसाद मिळायचा. आळंदी, तुळापूर, पाटेठाण, वाळवी संगम, दौंड, कुंभारगाव, सिध्दटेक, गंगावळण, कांदलगाव, देवाची - रांजणी, नीरा - नरसिंगपूर, नेवरे, इसबाबी, पंढरपूर, आळंदी, देहू.... अशा गावांमधील लोकांना आळंदी ते पंढरपूरचा इंद्रायणी व भीमा नदीचा प्रवाह कसा आहे, उजनी धरण जलाशय नक्की केवढे व कसे दिसते आणि आपले गाव यात कुठे आहे हे बघितल्यामुळे नदीचा विचार समग्रतेने करणे आपोआपच उमजत गेले.

मला स्वत:ला, मिलिंद बरोबर नकाशा काढण्यासाठी तासंतास बसल्यामुळे, कोणत्याही नदी व नदीच्या खोर्‍यात व्यापक आणि शाश्वत कार्य करायचे असेल तर प्रथमत: सर्वसाधारण लोकांना समजू शकेल असा नदीचा एक उगम ते संगम नकाशा तयार झालाच पाहिजे हे समजले. अशा नकाशामुळे तज्ज्ञापासून ते सर्वसाधारण नागरिक व राजकीय क्षेत्रातील माणसांपासून ते समाजकारण साधणार्‍या समाजसेवकापर्यंत - सर्वांनाच - कार्यक्षेत्राचे सर्व समावेशक आकलन होण्यात मदत होते. तो नकाशा पुढे ठेवून नदीचा समग्रतेने विचार केला पाहिजे हे आपोआप अंगवळणी पडते.

२००५ मध्ये इंद्रायणी नदी काठी तुळापूर येथील आमच्या विश्वसंस्कृती आश्रमातील ‘नमशयोग जीवनीती’ चे एक साधक शैलेश काटे यांच्याबरोबर चर्चा झाली. तीन वर्षांसाठी शैलेशने जलदिंडीच्या ग्राऊंड टीमच्या वाहनांचे व त्यांच्या आळंदी ते पंढरपूर प्रवासाचे समर्थपणे आयोजन केले होते. जलदिंडीचा विषय पुण्यातील गणेश उत्सवातील देखाव्याद्वारे पुणे शहरासमोर मांडला पाहिजे. विश्वसंस्कृती आश्रमाचे सहसंचालक नरेंद्र चुघ यांच्याबरोबर तीन एकर जमिनीवर एक हजार झाडे लावण्याचे कार्य शैलेशने केलेच होते. हा खंदा कार्यकर्ता. एकदम डायनॅमिक, त्याने वेध घेतला सरळ ग्रामदेवतेचा. श्री. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचा.

१९९२ मध्ये दासबोधाचे प्रथम वाचन करतांना प्रत्येक ओवीचा अर्थ लिहीत गेलो तेव्हा तो इंग्रजी काव्य रूपाने व्यक्त होत गेला म्हणून लिखाण झालेले माझे ‘जिज्ञासा: एक शोध’ हे पुस्तक इंग्रजी व नंतर मराठी मध्ये प्रकाशित झाले होते. त्यात समर्थ रामदासांच्या दासबोधातील निवडक ओव्यांच्या आधारे व दशक १ समास २ गणेशस्तवन च्या विस्तारानुवादाच्याही आधारे, अध्यत्म-विज्ञान युति - शोधातील सिध्दांतांच्या अनुषंगाने ‘मूर्ती पूजेपासून वृत्ती पूजे पर्यंत’ आणि ‘३६५ दिवसांचा जिज्ञासा गणेश उत्सव’ असे विषय मांडले होते. त्यात मानवाने विश्वजिज्ञासा ठेवून आता विश्वमानवच बनावे व पृथ्वीव्यापक पृथ्वीसमर्पितच जीवन जगावे असे मांडले होतेच. हे पुस्तक नैवेद्यमात्र होते. १९९२ नंतर २००६ मध्ये एका तपानंतर श्रीगणेशाचे बोलावणे आले ते जलदिंडीच्याही कृपेने. नैवेद्याचा प्रसाद झाला. इंद्रायणी खोर्‍यातील हाकेला मुठा खोर्‍यातील विघ्नहराकडून प्रतिसाद मिळाला. नमशयोग साधक शैलेश काटे यांची शशांक व निलेश वकील बंधूंची मैत्री झाली. या तीघांनी मिळून कसबा गणपती मंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांचीच भेट घडविली.

२००६ च्या गणेशउत्सवात ग्रामदेवते पुढील देखावा ‘जलदिंडी’ असा झाला. यात अभिनव कला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डोंगर, नदी व जलाशय यांचा देखावा तयार केला. जलदिंडीचा मोठा नकाशाही विघ्नहराच्या पुढे मांडला गेला. त्यात पुणे शहरातून उजनी धरणापर्यंत पुण्याचे प्रदूषण जात आहे व ते साफ करण्याची जबाबदारी आपण पुणेकरांचीच आहे असे मांडले होते. लोकांनी तो कितपत बघितला व त्यांच्या लक्षात हा विषय किती दिवस राहिला असेल - असा विचार तेव्हा फारसा आलाच नाही. ग्रामदेवते समोर, तेही स्वराज्य साक्षी विध्नेश्वरासमोर हा विषय मांडता आला व त्यामुळे कसबा गणपती मंडळ, विश्वसंस्कृती आश्रम आणि जलदिंडी परिवार यांच्यात परस्परपूरक मैत्री झाली व जल सेवेचे कार्य वाढत गेले हे काय सुरूवात म्हणून कमी होते?

एक वर्षानंतर जेव्हा श्रीकांतजींनी परत बोलावून सांगितले या वर्षीही, म्हणजे २००७ मध्ये, तुम्हीच देखावा डिझाईन करावा. अप्पर भीमा रिव्हर बेसीन मधून ‘अध्यात्म, पर्यावरण आणि स्वास्थ्य’ हा मंत्र घेवून जाणारी जलदिंडी व पुण्यातील प्रदूषणामुळे उजनी धरणावर होणारे दुष्परिणाम या अंतर्गत पुण्याच्या नागरिकाला स्वत:बद्दल व पुण्याबद्दल विचारमंथन करण्यास लावेल असा देखावा असावा.

२००४ मध्ये जलदिंडीतून प्रेरणा घेवून डॉ. विश्वास येवलेंच्या मार्गदर्शनाखाली सी.ओ.ई.पी- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे च्या समर्थ सहभागातून व सर्वांग सहयोगातून ‘जलमैत्री यात्रा’ सुरू झाली होती. मुठा नदी उगमापर्यंत चा वेधरे गावापासून जाणारा ट्रेक, सांगरूण गावातील खडकवासला जलाशय काठावर जलदिंडी व सी.ओ.ई.पी. कार्यकर्त्यांचा कयाक - ट्रेनिंग कॅम्प, राजा भालेकर, सुहास कांबळे, मुळा- मुठा संगमाच्या संगमवाडी येथील मासे पकडणार्‍या समूहाचे ग्रामप्रमुख बबनराव काची व सांगरूण येथील तारू समूहातील नदीमित्र यांच्या मार्गदर्शनाखाली सी.ओ.ई.पी. विद्यार्थ्यांचे नदी परिक्षण, खडकवासला जलाशयातून जलमैत्रीच्या कयाक नौकांचा प्रवास, विठ्ठलवाडी मंदीरात सी.ओ.ई.पी. विद्यार्थ्यांचे वारकरी शिक्षण मंडळाच्या विकास महाराजांच्या व डॉ. येवलेंच्या मार्गदर्शनाखाली होणारे अध्यत्म - शिबीर, विठ्ठलवाडी मंदीरापासून ओंकारेश्वर मंदीर ते पुढे मुळा - मुठा संगम व सी.ओ.ई.पी बोट क्लब पर्यंत सेरी, म्हणजेच संदीप जोशी चे सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट च्या मार्गदर्शनाखाली होणारी मुळा व मुठा नदी प्रदूषणाची तपासणी - असे हे ‘मुठा जल मैत्री’ अभियान.

जानेवारी च्या सुमारास घडणार्‍या या वार्षिक जलमैत्री यात्रेचे दोन इतर पैलू असे होते -
१. मुठा नदी उगमापासून ते संगमापर्यंत पाण्यातील प्रदूषणाची चाचणी घेतांना मुठा नदी काठी विठ्ठलवाडी मंदीरापासून सी.ओ.ई.पी बोट क्लब पर्यंची पदयात्रा

२. सी.ओ.ई.पी. बोट क्लब व मुठा नदी पात्र या मधील नदी - काठच्या भागात आझम शेख व हृषिकेश सगर या विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने व कांबळे सरांच्या मार्गदर्शनात सुरू केलेले रामनदी स्वच्छता अभियान मॉडेल सारखे दर रविवारी १ तास प्लास्टिक कचरा वेचण्याचे श्रमदान. मिलिंद सोनटक्के यांच्या कोरेलड्रॉ वरील प्रभुत्वातून ‘जलमैत्री यात्रा’ असा मुठा नदीचा नकाशाही तयार झाला.

याच ‘जलमैत्री’ नकाशाला केंद्र स्थानी ठेवून २००७ मध्ये ग्रमदेवते समोर विश्वसंस्कृती आश्रमातर्फे दुसरा देखावा सादर झाला.

जलसंवादया नकाशात त्या वर्षीचे मुठा नदीतील पाण्याचे प्रदूषण किती आहे याचे सेरी आणि सी.ओ.ई.पी यांनी तपासून घेतलेले आकडे जाहीर झाले. त्यात खडकवासला जलाशयापुढे वाहणार्‍या मुठा नदीतील प्रदूषण कसे वाढत जाते आणि संगम पुलाखाली नदीतील रासायनिक प्रदूषण प्रमाण COD (केमिकल ऑक्सिजन डिमांड) ३५० mg / lit झाले आहे असे मांडले होते. याच COD चा अंतर राष्ट्रीय नॉर्मल शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी ३ mg / lit असा आहे जे आम्हाला मुठा उगमाच्या पाण्यात सापडले. खडकवासला जलाशयात COD ८ mg / lit झाले होते असे दिसले. COD (रासायनिक प्रदूषण पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायुला कोणत्या प्रमाणात स्वत:च्या विघटनासाठी वापरले याचे आकडे) व BOD (जैविक प्रदूषण पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायुला कोणत्या प्रमाणात स्वत:च्या जगण्यासाठी व त्या पश्‍चात मृत झाल्यानंतर स्वत:च्या विघटनासाठी वापरले याचे आकडे) वाढत असते. आपण जड आणि द्रव कचरा पाण्यात सोडल्यामुळे. त्यामुळे पाण्याते DO (डिझॉल्वड ऑक्सिजन) कमी होत जाते. संगम पुलाखालील पाण्यातले DO (डिझॉल्वड ऑक्सिजन) ZERO mg / lit झाले आहे अशी नोंद ‘जलमैत्री’ यात्रा या देखाव्यात होती. जैविक स्वस्थ्य सुरक्षित असलेल्या नदीतील पाण्यात DO हे ८ पी.पी.एम असते. ८ Parts per Million ८ दशलक्षांश. दशलक्ष पाण्याच्या थेंबांमध्ये ८ ‘थेंब’ प्राणवायुची उपस्थिती. हा प्राणवायु पाण्याच्या H2O मध्ये गुंतलेल्या ० च्या व्यतिरिक्त प्राणवायु असतो. विरघळलेला प्राणवायु. DO ८ Parts per Million च्या पेक्षा कमी होवून जेव्हा ४ PPM च्याही खाली जातो तेव्हा पाण्यातील मासे जगणे अशक्य होत जाते. DO तर संगमपुलाखाली शून्य PPM झाला होता.

अशा प्रकारे ग्रामदेवतेसमोर आपणच पुणेकरांनी आपल्याच पवीत्र नदीवर व तिच्यामध्ये जगणार्‍या जीवांवर किती अन्याय केला आहे हे मांडले गेले.

कसबा गणपती समोरील देखाव्यात दाखविलेले हे सगळे आकडे पुणेकरांनी पाहिले का ? खरेच याबद्दल मला स्वत:ला काहीच काळजी नव्हती. ग्रामदेवते समोर मांडले म्हणजे शहराच्या मुळाशी असलेल्या सर्वांच्या हृदयातील व स्वप्नांतील शुभ संकल्पासमोर मांडले असे मला वाटते.

२००८ कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी शेटे यांनी परत बोलावले. रात्रीचे ९ वाजलेले. मंडळाच्या विश्वस्थांची बजेट बैठक चालू होती. त्यात १० मिनिटाचा ब्रेक, ‘बोधनकर, सात दिवसांवर गणेश उत्सव आला आहे, यावेळेसही देखावा आपणच डिझाईन करावा. पाण्याच्या विषयापलिकडे पण पाण्याला आणि पर्यावरण रक्षणाला जोडूनच काही विषय सुचवा.’

माझे लगेच उत्तर - श्रीकांतजी, तिसरे स्वराज्य डिक्लेर करूयात. कसबा गणपतीची वास्तु आणि परिसर हे पहिल्या व दुसर्‍या स्वराज्याच्या घोषणेचे शक्तीपीठ आहे. फारच महत्वाचे शक्तीपीठ. इथूनच तिसर्‍या स्वराज्याचे डिक्लेरेशन झाले पाहिजे.

सर्वांच्याच डोळ्यांमध्ये एक आश्‍चर्य आणि कुतुहल. ‘तिसरे ’स्वराज्य ? हे काय आणि कसे?

‘पहिले स्वराज्य शिवाजी महाराजांचे, महाराष्ट्र व्यापक. दुसरे स्वराज्य टिळकांचे, भारत व्यापक. दोन्हींचा विघ्नेश्वर हा स्वराज्यसाक्षी कसबा गणपती. आता संपूर्ण पुण्याच्या नागरिकांच्या वतीने पुन:स्वराज्य तिसरे स्वराज्य’ हा संकल्प सोडण्यासाठी कसबा गणपती स्वराज्य शक्तीपीठाचा प्लॅटफॉर्म परत एकदा उपलब्ध करावा.

काही क्षणातच श्रीकांतजीचा निर्णय ‘बोधनकर, दोन दिवसात हे लिहून आणा. डॉक्युमेंटचा देखावा करू असे डिझाईन करा.’

मग दोन दिवस माझ्या अभ्यासिकेतील संकल्प मंथन कागदावर उमटत गेले. श्रीकांत शेटेंकडे हस्तलिखित स्वत: घेवून गेलो. त्यानी वाचले. ‘ एकही फुल्स्टॉप किंवा कॉमा नब दलता असेच्या असे ६४,००० कॉपीज छापा . ’या कागदी तीन पदरी स्वराज्य घोषणेच्या मुखपृष्टाची ८ x ३ फुटाची रंगीत प्रतिकृती ग्रामदेवते समोर मांडली गेली. हजारोंनी प्रती वाटण्यात आल्या. हीच ‘तिसरे स्वाराज्य’ ची प्रत विसर्जनाच्या दिवशी तुतार्‍यांच्या शुभशक्ती निनादांबरोबर दिमाखाने वाजत गाजत मिरवण्यात आली.

१९९२ मध्ये प्रकाशित दासबोधातील गणेशस्तवनावर लिहिलेल्या ‘जिज्ञासा: एक शोध’ या काव्याचा नैवेद्य दाखविला होता. २००२ मध्ये १० वर्षांनंतर जलदिंडी जीवनात आली. २००८ मध्ये १६ वर्षांनंतर ‘तिसरे स्वराज्य’ लेखणीतून उतरले. त्यात प्रथम मुखपृष्ट, मग ३ पृष्टांवर ९९ ओळींची काव्यरचना आणि २ पृष्टांवर सध्याची जागतिक समस्या व त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला सुचविलेले ‘नागरिकाचे स्वराज्य कर्तव्य’ - म्हणजेच स्वेच्छेने व आत्मशिस्तीने पाळल्या पाहिजेच अशा ५ सूचना - म्हटलं तर ५ नियम.

नदीचा अनुभव घेता घेता सुचलेले व कसबा गणपती स्वराज्य शक्तीपीठीच्या विघ्नेश्वरासमोर मांडलेले हे स्वराज्य कर्तव्याचे ५ नियम पुढे साहर-मैत्री साठीही मार्गदर्शन करतील हे तेव्हा माहिती नव्हते. विचार - मंथन, मूल्य - मंथन आणि संकल्प- मंथनाच्या या क्रमविकासात हे ५ नियम मात्र अंतरमनात, नव्हे अंतरआत्म्यातच विस्तारित होत गेले- परत परत शब्दांत व कार्यात व्यक्त होत गेले.

२०११ मध्ये कोणतेही विशिष्ट नाव अथवा ओळख चिन्ह न वापरता मी, सुझन राज व ललित राठी यांनी प्लास्टिक रिकलेक्शन आणि प्लास्टिक रीसायक्लिगं चे कार्य ‘पुणे शहरातील शाळा’ हे माध्यम आणि कार्यक्षेत्र मानून सुरू केले. यात शैक्षणिक आणि सांस्कृतिक भाग व मुलांमध्ये कचरा - व्यवस्थापनाचा अभ्यास व कार्य जागृती घडविण्याचा भाग सुझन राज व माझा होता. मुलांनी एकदा प्लास्टिक शाळेत आणले की ते विकत घेवून रीसायकल करणे हा भाग ललितभाईंचा होता. सांस्कृतिक कार्य आणि उद्योजगता यांची ही युती. दी अकॅडेमिक अ‍ॅडव्हायझर्स ( The Academic Advisors - TAA) चे विश्वस्त म्हणून सूझन आणि मी यांनी शालेय अभियानाची सांस्कृतिक जबाबदारी घेतली. ललित भाईंनी C.G.M.P.L या त्यांच्या क्लीन गार्बेज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने शाळेत आलेले प्लास्टिक विकत घेवून त्याला रिसायकल करण्याची जबाबदारी घेतली.

२०१२ मध्ये शाळांपर्यंत हे काम वाढले आणि मग सुझन राज कोटा, राजस्थान येथे शिफ्ट झाल्यामुळे -शाळेतील सादरीकरण आणि सांस्कृतिक व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन- पूरक- मूल्य रूजविण्याची जबाबदारी माझ्यावर आली. या नव्या आणि व्यापक जबाबदारी बद्दल माझ्या अभ्यासिकेत शैलेश काटे बरोबर परत एकदा चर्चा झाली. ‘तिसरे स्वराज्य’ या घोषणेचे परत एकत्र वाचन झाले, विचरमंथन झाले. तेव्हा मला समजत गेले की, ‘तिसरे स्वराज्य’ मध्ये दिलेल्या पाच नियमांप्रमाणेच (स्वराज्य कर्तव्यांप्रमाणेच) आपले प्लास्टिक रीकलेक्शनचे कार्य शाळांमध्ये सुरू आहे.

२०११ - २०१२ मध्ये मी सुझन बरोबर शाळेत प्लास्टिक रिसायक्लींग जागृतीसाठी जायचो तेव्हा तिच्या सादरीकरणानंतर शेवटच्या १०मिनिटांत मी २००६ आणि २००७ च्या जलदिंडी आणि ‘जलमैत्री’ चे नकाशे दाखवीत असे - मुलांना हे दाखविण्यासाठी की पुण्यातून वाहते प्रदूषण हे उजनी धरण जलाशयापर्यंत पोहोचले आणि पुढे पंढरपूर पर्यंत ही. पुण्यातील प्रदूषण आपल्या पुण्यातील प्रत्येक नदीवर एक अन्याय आणि अत्याचारच आहे. मुलांसमोर हे मांडतांना कसबा गणपतीच्या समोरील २००६ आणि २००७ च्या देखाव्यांतील मजकूराचा शिरकाव पुण्यातील शिक्षण क्षेत्रात सर्वप्रथम झाला, तो असा. जे ग्रामदेवतेसमोर मांडले होते तेच सागर - छात्रांसमोर म्हणजेच सागरमित्रांसमोर मांडले गेले.

प्रदूषित नद्यांचे देखावे नागरिकांनी बघितले पण त्यांना काही त्यांचे गांभीर्य कळलेच नाही. म्हणूनच, या विघ्नापलीकडे जाण्यासाठी. प्रदूषित नद्यांचे हे देखावे प्रत्येक घरामध्ये पोहचविण्यासाठी शाळा शाळांमध्ये दाखल झाले !!

शाळेतील मुलांना नदी व तलावांमधील मासे प्रदूषणामुळे मरतात हे समाजल्यावर त्याबद्दल आपण काही तरी करावे असे वाटते. नदीतील प्रदूषण समुद्रापर्यंत पोहचले व त्यामुळेही पक्षी व मासे मरतात - असे जागतिक प्रसार माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्या होत्या. हे सर्व शैलेश काटे बरोबर चर्चा करतांना अचानक सुचले. ‘अरे शैलेश, या कार्यक्रमाचे स्वरूप बदलुयात’ -

१. संपूर्ण ओला व सुका कचरा याबद्दल मुलांना अतिविस्तार करून सांगणे थांबवुयात.
२. कृती कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थी केवळ प्लास्टिक गोळा करतात - त्यांच्याबरोबर बोलतांना केवळ आणि केवळ प्लास्टिक हा पादार्थ मांडावा.
३. मोटिव्हेशन व मॅनेजमेंट यावर सर्व भर द्यावा.
४. आता फक्त आपल्या नदीला आपली गरज आहे असे नाही तर ‘सागरा प्राण तळमळला’ च्या पलीकडे ‘सागराचाच प्राण तळमळला आहे’ असे मुला-मुलींना सांगावे व दाखवावे लागेल.
५. या कार्यक्रमाचे नाव २०१३ पासून ‘सागरमित्र’ अभियान.
६. पहा ना शैलेश, ‘तिसरे स्वराज्य’ मध्ये दिलेल्या सर्व पाच नागरिकांचे स्वराज्य कर्तव्य यांना आपले सागरमित्र विद्यार्थी पाळतात.
७. सागरमित्र अभियान ‘तिसरे स्वराज्य’ चे बालरूप आहे.

२००८ मध्ये ग्रामदेवते समोर मांडलेला ‘तिसरे स्वराज्य’ संकल्प २०१३ मध्ये आठवलं -
पहिले स्वराज्य शिवबांचे, महाराष्ट्र व्यापक, यात माणसाने माणसांवर केलेल्या अत्याचारांमुळे तसा अत्याचार करणार्‍यांना पराभूत करावे लागले

जलसंवाददुसरे स्वराज्य टिळकांचे, भारत व्यापक. यातही माणसाने माणसांवर केलेल्या अत्याचारांमुळे अत्याचार करणार्‍यांना पराभूत करावे लागले.

तिसरे स्वराज्य सर्वांचे, यात सर्व मुक्या प्राण्यांवर, मुक्या झाडांवर, मुक्या पर्यावरणावर, वाचारहित निसर्गावर, नद्यांवर आणि डोंगरांवर आणि वाचारहित समुद्रावर होणार्‍या मानवी अत्याचारांना थांबवावे लागेल. आपल्यातील दुष्ट जीवन - मारक प्रवृत्तींना आपणच पराभूत करावे लागेल - व्यापकपणे - संपूर्ण पृथ्वीवरील सर्वच्या सर्व मानवांमध्ये.

या तिसर्‍या स्वराज्य कार्यात सर्वात अग्रणी आहेत आपल्या पुण्यातील ११५ शाळांतील १,११,००० सागरमित्र विद्यार्थी. ते हेच करीत आहेत - मुक्या प्राण्यांचे, मास्यांचे, गाईंचे, जल वनस्पतींचे प्लास्टिक पासून रक्षण.

सागरमित्र अभियानातून प्रेरणा घेवून किवळे येथे पर्वतारा या हाऊसिंग प्रोजेक्ट मध्ये सागर संकुल सांस्कृतिक केंद्र उभे होत आहे.

खडकवासला जलाशयाकाठी सागरूण गाव, २५० उबंरठे १२०० लोकसंख्या. सुनील भोकरे हे समाजकार्यात पुढाकार घेत असतात. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च चे प्रिन्सिपल पोळ आम्हाला सांगरूण येथे घेवून गेले. त्यातून ७ ऑक्टोबर रोजी विठ्ठल मंदीरात सागरमित्र चे व्याख्यान झाले. २०० बचत गट सदस्य महिलांनी आपापल्या घरातील वेस्ट प्लास्टिक आणले. सरपंच सीताताई मानकर आणि ग्रामसेवक अभय निकम यांचा समर्थ सहभाग. सुनील भोकरेंचे आयोजन, ७ ऑक्टोबरला सागरमित्र च्या प्रेरणेतून एक नवी योजना सुरू झाली - नवा प्रकल्प. सागर-ग्राम, प्लास्टिक कचरा मुक्त गाव. १८ नोव्हेंबरला प्लास्टिक कचर्‍याचे दुसरे कलेक्शन झाले. त्यात प्रत्येक घरातून आणलेल्या प्लास्टिक वेस्ट चे वजन करण्यात आले !! ज्या घरातून प्लास्टिक आले नाही तेथे जावून नागरिक पटवून देणार की सांगरूण पहिले सागर- ग्राम आहे. एकू एक घरातून वेस्ट प्लास्टिक आलेच पाहिजे, अपवाद नको.

डॉ. देशकर सर म्हणाले, बोधनकर, सागरमित्र ची कव्हर स्टोरी हवी, मला वाटले - सागरमित्र अभियान (त्याबरोबर सागर संकुल आणि सागर ग्राम अभियान) वरकरणी पाहिले तर वाटते की हा प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा प्रकल्प आहे. पण खरे तर ही मुले केवळ प्लास्टिकच गोळा करतात असे नाही तर त्यांची टीम वाढवत असतात (पाचच वर्षात १५० ते १,५०,००० सागरमित्र झाले आहेत) स्वत:चा हक्कांचा पाठपुरावा करणारा स्वभाव बदलून जबाबदारी निभावणारा स्वभाव बांधत असतात, त्याचबरोबर तिसर्‍या स्वराज्याचेही कार्य करीत असतात.

कसबा गणपतीच्या स्वराज्य शक्तीपीठावर देखावा, मिरवणूक व लेख रूपाने ‘तिसरे स्वराज्य’ हा संकल्प सागरमित्र, सागर संकुल आणि सागर - ग्राम अभियानांचा गाभा आहे. डॉ. देशकरांनी दर महिन्यात जलंसवाद मध्ये सागर - शृंखला या शिर्षकाखाली सागरमित्रच्या प्रगतीबद्दल लिहा असे सांगतलेच आहे. वाटले, या निमित्ताने सागरमित्र अभियानाचा गाभा असलेला ‘तिसरे स्वराज्य’ हा संकल्प जलसंवाद माध्यमातून सर्वांपुढे आणावा.

सागरमित्र अभियानातून सर्व विद्यार्थी पुढे तिसर्‍या स्वराज्याचे कार्य एकत्र आणि डोळसपणे करतील - ही आम्हा विश्वसंस्कृती आश्रमातील सर्व सदस्यांची आणि सागरमित्र परिवाराची श्रध्दा आहे.

सागरमित्रांसाठी, तसेच सागर - संकुल, सागर धारा, सागर माथा, सागर ग्राम, सागर सेतू यातील सदस्यांसाठी वैयक्तिक व सामुहिक मार्गदर्शनाचा गाभाच असलेले ‘तिसरे स्वराज्य’ डिक्लेरेशन २००२, हे पुढे जोडले आहे.

सागरमित्र अभियानात पुणे व पिंपरी - चिंचवड मधील ११५ शाळांमधील १,११,००० विद्यार्थी दर महिन्याला घरातील वेस्ट प्लास्टिक शाळेत आणून देतात तेव्हा ते ‘तिसरे स्वराज्य’ डिक्लेरेशन मधील ५ ‘नागरीकांचे स्वराज्य कर्तव्य’ या दिशेनेच वाटचाल करीत असतात.

१. सागरातील मासे वाचविण्यासाठी जेव्हा ते मास्यांना मारणारे प्लास्टिक वेचून ठेवतात तेव्हा ते पहिल्या स्वराज्य कर्तव्यातील ‘हे विश्वची माझे घर’ ला जोडलेल्या कृतीशी एकनिष्ट असतात.

२. स्वत: प्लास्टिक वेचून रिसायक्लींग ला पाठविल्यानंतर जेव्हा हे विद्यार्थी घरातील आई वडील आणि इतरांना तसेच करण्यास सांगतात तेव्हा ते दुसर्‍या स्वराज्य कर्तव्यातील ‘स्वकृती वळवल्यावरच इतरांना समजावून सांगा’ हे प्रत्यक्षात जगत असतात.

३. मागच्या ५ वर्षात या सागरमित्र मुला-मुलींनी ५० टन प्लास्टिक रीसायक्लींग ला पाठविल्यामुळे ते तिसर्‍या स्वराज्य कर्तव्यातील ‘पुणे शहर हे माझे स्वत:चे घरच आहे असे समजून जगा’ या प्रमाणे जगले आहेत व जगत आहेत व १:१५० या प्रमाणात त्यांनी ५० टन प्लास्टिक पासून ७५०० टन जो मिक्सड कचरा तयार झाला असता तो आपल्या शहर - घरात होऊच दिला नाही.

४. चौथ्या स्वराज्य कर्तव्यात दिल्याप्रमाणे हे सर्व सागरमित्र विद्यार्थी पर्यावरण बचाव कार्यात तर आहेतच पण ते भ्रष्टाचार विरोधी निष्ठाचारी जीवन संवर्धक आहेत.

५. पाचव्या स्वराज्य कर्तव्यात दिल्याप्रमाणे त्यांचा स्वत:वर विश्वास आहे ती त्यांची सागरमैत्री वाचारहित जीवांना वाचविते म्हणून - तिसर्‍या स्वराज्याचा पाया रचणारी, सीमित जनजागृती पलीकडची शाश्वत श्रमजागृती आहे.

तरी, पुण्यातील दी अकॅडेमिक अ‍ॅडव्हायझर्स (TAA) या स्वयंसेवी संस्थेने सुरू केलेले सागरमित्र अभियान हे केवळ प्लास्टिक कलेक्शन आणि रीसायक्लींग चे सीमित कार्य नसून तिसर्‍या स्वराज्यातील कर्तव्य -जबाबदारी कृती कार्यक्रमांतून - शिकण्यासाठी व तिसर्‍या स्वराज्यात बालवयातच समर्थ कार्यकर्ता बनण्यासाठी तयार झालेला एक शुभ - साधन मार्ग आहे.

सम्पर्क


श्री. विनोद बोधनकर, पुणे, मो : ९८५०२३००६४