Source
जल संवाद
युगांमागून युगं सरली. काळ झपाट्यानं लोटत गेला, काळ जसजसा लोटला तसतशी आटपाटनगरातल्या माणसांची आसक्ती वाढत गेली, अन् आसक्तीपूर्तीच्या महत्वाकांक्षाही अमाप वाढल्या. आपल्या ताब्यात आणखी धन-धान्य हवं, आणखी सुबत्ता, आणखी सुखं, आणखी संपन्नता हवी असं त्यांना वाटू लागलं. जास्तीची जमीन, जास्तीचं पाणी, जास्तीची संपत्ती, जास्तीची सुखसाधनं पदरात पाडून घेण्याचा हव्यास त्यांना जडला. स्वत:चं सारं बुध्दिसामर्थ्य त्यांनी सर्व प्रकारच्या अतिरिक्त उत्पादनासाठी पणाला लावलं.
आटपाटनगर होतं. सृष्टीदेवतेनं प्रसन्न होऊन तिथल्या माणसांना असा वर दिला होता की सर्व तृषार्त जीवमात्रांना आणि मानवांना पिण्यासाठी, जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी मुबलक शुध्दोदक प्राप्त होत जाईल. हे अभूतपूर्व वरदान मिळाल्यामुळे अवघी नगरी सुजलाम् सुफलाम् बनली. तिथल्या वाहत्या नद्या स्वच्छ होत्या, लहानमोठे निर्झर निर्मळ होते. तिथे असणारी सरोवरंही नितळ आणि पारदर्शी होती. नद्यांच्या आणि सरोवरांच्या स्त्रवणक्षेत्रांत दाट वनराया होत्या. त्यांच्यामुळे अवघा परिसर हिरवागार बनला, हा हिरवागात परिसर नितांत सुंदर आणि निरामय भासत असे. डोंगर - टेकड्यांवर शक्तिशाली पर्जन्यधारा कोसळल्या तरीही उतारांवरील वृक्षराजींमुळे आणि सुंदर हिरव्या तृणाच्छादनामुळे मृदास्खलन होत नसे. म्हणूनच की काय, कोण जाणे, पण झुळुझुळू वाहणाऱ्या नद्या-निर्झरांचं शुध्द जल ओंजळीत घेऊन थेट प्यायलं तरी ते अमृतासम मधुर आणि शीतल भासत असे. सुंदर सरोवरांचं निळं पाणी लाल- गुलाबी कमलपुष्पांच्या साथीनं आणखीनच जास्त मोहून टाकत असे. श्रावणसरींच्या पावलांनी येणारा पर्जन्यराजा चार मासांपर्यंत मुक्कामास असे, डोंगरदऱ्या, शेतीभाती, गावं-शहरं साऱ्यांना चिंब भिजवत असे.नद्या-निर्झर-सरोवरांना जीवनदान देत असे. न्हात्या ओल्या जमिनीत लोक बीजपेरणी करत. ग्रीष्मदाहानं तप्त धरतीची तृष्णा शमली की त्या धरेच्या उदरातून जोमदार अंकुर उगवत. नव्या नवलाईच्या हिरवाईनं शेत न् शेत नटून जाई. कणसात दाणे भरले की शेताशेतांमध्ये उत्सव होत. ढोलताशाच्या गजरात पिकांची पूजा होई. कार्तिकात पिकं काढणीला येत. मग सुरेल गाण्यांच्या लयीवर पाय नाचू लागत. खळी आटोपली की हिवाळ्याची चाहूल लागे. चार महिने हिवाळा चाले. हवेत हिंव दाटून येई, रबीच्या पिकांना बळ देई. लोक शेतांमधून पोटापुरतं धान्य पिकवत. शेणगोठा, शेतातला कचरा, फोलपट-पाचोळा शेतातच मुरवत. जमीन म्हणजे काळी आई. तिचं आरोग्य, तिचं सौष्ठव ते नेटानं जपत. जरूरीपुरताच धनसंचय करीत. रबीचं पीक हाती आले की चार महिने उन्हाळा असे. वावरांची सफाई, जमिनीची मशागत, अन् लग्नं-कार्य यांत लोक गढून जात. त्यांच्या जीवनाचं चक्र कृषिचक्राच्या साथीनं चाले, आणि कृषिचक्र जलचक्राच्या साथीनं फिरतं होई. जलचक्र आणि कृषिचक्र या त्यांच्या जीवनचक्राच्या मूलभूत प्रेरणा होत्या. निसर्गातून जरूरीपुरतंच पाणी घ्यायचं अन् पाण्याचे सारे स्त्रोत अबाधित आणि विशुध्द राखणं हा त्यांचा धर्म होता. त्यांचं जीवनचक्र निसर्गाशी एकरूपता साधणारं असे, निसर्गाला ओरबाडणारं नव्हे! नगरीतले लोक कष्ट करीत, गरजेपुरतं धान्य पिकवीत. स्त्रीपुरूष सारे समाधानी होते. ते आपापसात सौहार्द्र राखून होते. त्यांच्यात जरूरीपुरती देवाणघेवाण चाले. पण त्यांच्या गरजाच फार कमी होत्या. ते खाऊनपिऊन सुखी होते. त्यांच्या समाजांतही बहुअंशी शांतताच नांदत होती.
युगांमागून युगं सरली. काळ झपाट्यानं लोटत गेला, काळ जसजसा लोटला तसतशी आटपाटनगरातल्या माणसांची आसक्ती वाढत गेली, अन् आसक्तीपूर्तीच्या महत्वाकांक्षाही अमाप वाढल्या. आपल्या ताब्यात आणखी धन-धान्य हवं, आणखी सुबत्ता, आणखी सुखं, आणखी संपन्नता हवी असं त्यांना वाटू लागलं. जास्तीची जमीन, जास्तीचं पाणी, जास्तीची संपत्ती, जास्तीची सुखसाधनं पदरात पाडून घेण्याचा हव्यास त्यांना जडला. स्वत:चं सारं बुध्दिसामर्थ्य त्यांनी सर्व प्रकारच्या अतिरिक्त उत्पादनासाठी पणाला लावलं. ज्ञानविज्ञानाचा वापर विश्वाच्या आकलनासाठी करण्याऐवजी त्यांनी यांत्रिक उपयोजनासाठी करावयास सुरूवात केली. खेतायुग संपलं, व्दापारयुग सरलं, आणि कलियुगाचं शेपूट धरून श्वेताचं यंत्रयुग अवतरलं. बहुल सुखसाधनांच्या निर्मितीचा झपाटा वाढला तसा यंत्रयुगाचा विस्तार अमाप झाला, आणि त्यातून वनतंत्रयुग जन्माला आलं. या यंत्र-तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी पाणी, जमीन, जंगल आणि खनिजं या निसर्गसंपत्तीचा वापर अनिवार्य झाला. तशांतच श्वेतांनी पैदा केलेलं नवं व्यापारयुग अवतरलं. या व्यापारयुगात माणसाच्या निसर्गसंपत्तीच्या वापराचा एवढा अतिरेक झाला की त्यानं चिरंतनतेची कास सोडून अशाश्वततेची परिसीमा गाठली. सुखसाधनांची रेलचेल झाली, माणसांची चंगळवृत्ती शिगेला पोहोचली. यंत्र-तंत्रज्ञानाच्या उपयोगातून शेतीत कृत्रिम रसायनं वापरली गेली, त्यांनी अवघी सुपीक जमीन अमंगळ करून टाकली. सुखसाधनांच्या उत्पादनप्रक्रियांतून जहरी सांडपाणी निपजलं, त्यानं पृष्ठजल अन् भूजल दोन्ही दूषित झाले. दाट लोकसंख्येच्या मनुष्यवस्त्यांतून गटारं निघाली, त्यांनी नद्या-निर्झर-सरोवरं मलिन करून टाकली. यंत्रांमधून तैलखनिजांचे धूम्रलोट उठले, त्यांनी हरितगृहवायूंचं काहूर माजवलं. मलविसर्जनानं सारं शुध्दोदक प्रदूषित झालं, वायुउत्सर्जनानं अवघं वायुमंडळ काळवंडलं. अभद्रतेतून एक तप्तोषण पर्व निपजलं. ऋतुबदलांनी सृष्टीचक्रही अडखळलं. धरती अवघी झाली विद्रुप, मनुष्यप्राणी बनला विकृत. जलचक्राची केली शिकार, पण मनुष्य मात्र तरीही राहिला बेदरकार. कारण सृष्टिदेवीचं त्याला होतं चिर वरदान, मुबलक शुध्दोदक प्राप्तीनं तो बेभान !
अशातच एका पौर्णिमेच्या रात्री साक्षात सृष्टिदेवता आकाशातून विहरत होती. आटपाटनगरावरून जात असतांना तिनं रात्रीच्या धवल चांदण्यातून खाली भूमीकडे नदर टाकली. आणि नेहमीप्रमाणे पृष्छा केली, को जागर्ती, कोण जागं आहे ?
तिच्या पृच्छेला खालून नेहमीप्रमाणेच - मी जागा आहे, अहं जागर्मि! असा प्रतिसाद येईल असं वाटलं होतं. त्या आटपाटनगरातल्या कुणाही जागृत मानवाकडून नेहेमी तसाच प्रतिसाद मिळत असे. पण या खेपेस खालून काहीच प्रतिसाद आला नाही. सृष्टिदेवतेला मोठं आश्चर्य वाटलं. तिनं आकाशातून खाली झेप घेतली. ती जसजशी खाली जाऊ लागली तसतसे खालून महाभंयकर, कर्णकर्कश्श असे बहुविध आवाज तिला ऐकू येऊ लागले. वाहनांची धडधड, आगगाड्यांची खडखड, कारखान्यांचे भोंगे, विमानांची घरघर, बांधकामांची लगबग, शेतीतली तगमग यांच्या कर्णविदारक ध्वनींनी नीरव रात्रीत हलाहलाचा दाह कालवला, काळ्या, पांढऱ्या, पिवळ्या विविध तऱ्हांच्या धुरांचे मरण्मयी लोटच्या लोट तिच्या दिशेनं वर उभरू लागले. भूमीसमीप आल्यावर सृष्टिदेवतेनं खाली दिसणाऱ्या नद्या-सरोवरांकडे नजर टाकली. तेव्हा तिला निळ्या जलाची नितळ सरोवरं शेवाळलेली दिसली, ओसंडून वाहणाऱ्या निर्मळ नद्या रोडावलेल्या अन् काळवंडलेल्या दिसल्या, अन् छोटेमोठे निर्झर तर कोरडे पडलेले दिसले.
विस्मयानं कुंठित झालेली सृष्टिदेवता खाली दिसणाऱ्या एका सरोवरात मध्यभागी अलगदपणे उतरली. त्याही सरोवराचं पाणी नेहेमीसारखे निळं नव्हतं. ते काळपट गढूळ झालं होतं. सरोवराच्या पृष्ठभागी जागोजागी विनाबी शेवाळाची दाट साय जमू लागली होती. तिथल्या पाण्यात नेहेमी डोलणारी सुंदर कमळंही कुजून वाळून गेली होती. आणि एक विचित्र उग्र दर्प आसमंतात भरून राहिलेला होता.
सृष्टिदेवतेची चाहूल लागताच तिच्या स्वागतासाठी जलदेवता लगबगीनं पुढे आली. सृष्टिदेवतेला अभिवादन करून ती म्हणाली - देवी, आपलं स्वागत आहे.
जलदेवतेच्या आवाजातील सूक्ष्म कंप सृष्टिदेवतेच्या लक्षात आला. तिनं तिची खिन्न मुद्रा न्याहाळत विचारलं - जलदेवते, काय वर्तमान आहे?
वर्तमान काही फार चांगले नाही, देवी, जलदेवता म्हणाली - इथले अवघे जलस्त्रोत रूग्णाईत बनले आहेत. माणसाच्या शेतीच्या नव्या तंत्रानं अनिवार्य केलेली खतांची अन कीटकनाशकांची रसायनं नद्या-निर्झर-सरोवरांत येऊन पडत आहेत. या साऱ्या जलस्त्रोतांचं क्षारीकरण वेगानं सुरू आहे. वृक्षविनाशामुळे परिसरातली ढासळलेली मृदा जलस्त्रोतांना गढूळ बनवते आहे. माणसाच्या विविध वस्तुनिर्मिती कारखान्यांमधून, आणि शर्करा आणि मद्य उद्योगांतून, रसायन, उर्जा आणि इतर साऱ्या उद्योगांतून निर्माण होणारं जहरी सांडपाणीही जलस्त्रोतांना अशुध्द बनवत आहे. शिवाय आटपाटनगरातल्या घरोघरीच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलं गेलेलं बहुतांश पाणी मलिन आणि अपवित्र होऊन पुन्हा मूळ जलस्त्रोताकडे वाहून नेलं जात आहे. हे सृष्टिदेवी, या सर्व प्रदूषणामुळे नद्या-निर्झर प्रमाणाबाहेर नासत आहेत, आणि सरोवरं दूषित होवून शेवाळणाकडे वाटचाल करीत आहेत.
जलदेवते, सृष्टिदेवतेनं काळजीच्या स्वरात विचारलं - अगं, पण नद्या-सरोवरातल्या इतर जीवमात्रांच काय ? अशानं त्यांच्या अस्तित्वाला बाधा नाही का येणार?
जलीय जीवमात्रांचं अस्तित्व धोक्यात आलेलंच आहे देवी. जलदेवतेनं सांगितले - एकूण जलीय जैवविविधतेवरच मोठं अरिष्ट कोसळू पाहात आहे. जलस्त्रोतांचं प्रदूषण झाल्यामुळे त्यांच्या पाण्यात गढूळपणा, संवाहकता, पदार्थकणांची मात्रा, क्षारांची मात्रा, काठिण्य आणि अल्कधर्मीयता ह्या सगळ्याच गोष्टी प्रमाणाबाहेर वाढत आहेत. पाण्यात द्रवलेल्या प्राणवायूचं प्रमाण कमी झालंय. त्यात प्राणवायूची जैविक मागणीही वाढत चालली आहे. शुध्द पेयजलाच्या स्त्रोतात मैलायुक्त सांडपाणी मिसळल्यामुळे अतिसाराचे जीवाणू आणि घातक कवकं यांचा प्रादुर्भाव होऊन ते पाणी पिण्यायोग्य राहात नाहीय. हँच चित्र भूमीवर सर्वत्र दिसतं. पण माणसाला त्याची क्षिती नाही. पृथ्वीवरच्या संपूर्ण जैवविविधतेचा मूलाधार जलीय जैवविविधता हाच आहे हेही त्याच्या खिजगणतीत नाही. अवघं पाणी प्रदूषित करण्याचे त्याचे उपद्व्याप सुरूच आहेत.
अगं पण पाणी हा तर माणसाच्या स्वत:च्या जीवनाचा मूलाधार आहे ना ? त्यालाही जगण्यासाठी, प्राण टिकवण्यासाठी पाणी हवंच की! तो करीतच असेल की पाणी विशुध्द ठेवण्याचे काही प्रयत्न.
जलदेवता उपहासानं म्हणाली - देवी, माणूस पाणी प्रदूषित करण्याचे खटाटोप जेवढ्या प्रमाणात करतो ना. त्याच्या तुलनेत पाणी विशुध्द राखण्यासाठी तो करीत असलेले यत्न एक शतांशाहूनही कमी आहेत, वस्तुत: जलस्त्रोतांतून पाणी घेणाऱ्या सर्व वसाहतींनी, कारखान्यांनी, रसायन उद्योगांनी, शर्करा व मद्य निर्मिती उद्योगांनी, औषधी उद्योगांनी आणि इतर तत्सम उद्यमसंस्थांनी वापरेलेल पाणी योग्य प्रमाणात शुध्द करून मगच ते मूलस्त्रोतात सोडले पाहिजे. शिवाय अनेक कार्यासाठी शुध्दोदकाचा वापर करण्याऐवजी शुध्दीकृत सांडपाण्याचा पुनर्वापर त्यांच्यावर बंधनकारक करायला हवा. ते तसं करत नसतील तर त्यांचं कृत्य घोर दंडनीय मानून शिक्षा केली गेली पाहिजे. पण तसं कधी घडत नाही. वापरलेलं पाणी प्रक्रिया करून शुध्द राखण्याची किंवा त्याचा पुनर्वापर करण्याची काळजी कोणीही घेत नाही.
पण मग, सृष्टिदेवीनं विचारलं - त्यांच्यावर नगरीचं प्रशासन कारवाई का करीत नाही?
कारवाई होत नाही, आणि झाली तरी नाममात्र होते. कारण जो जो प्रदूषण करतो त्याचे हितसंबंध नगरीच्या सत्तेतही असतात.
ओ हो! असं आहे काय ! सृष्टिदेवता उद्गारली - पण काय गं, एवढं सगळं पाणी दूषित करण्याजोग्या अशा कोणत्या गरजा आहेत माणसाच्या?
देवी, त्या गरजेला विकास असं म्हणतात, चंगळवादी सामुहिक जीवनशैली, तिच्यासाठी घाऊक प्रमाणावर उत्पादन, त्यासाठी निसर्ग संसाधनांचा अतिरिक्त वापर, उत्पादनांचा जागतिक पातळीवर व्यापार, व्यापारात जीवघेणी चढाओढ, व्यपारातून अमाप धनसंचय, धनसंचयातून आर्थिक वाढ, आर्थिक वाढीतून आणखी चंगळवादी जगणं, त्यासाठी आणखी उत्पादन, त्यासाठी आणखी निसर्गसाधनं....
पुरे.. पुरे... सृष्टिदेवतेनं तिला थांबवलं, विकास ही अशी सततची साखळी आहे तर. पण काय गं, या विकासामुळे सगळी माणसं सुखी झालीयत का?
सगळी कशी होणार? जलदेवता म्हणाली, ज्यांच्याकडे गुतवणूक करायला आणि नंतर संचय करायला धन आहे ती सुखी होतात. म्हणजे किती ? म्हणजे वीस-बावीस टक्के माणसं. ती वरचेवर श्रीमंत होत जातात. आणि बाकीचे अठ्ठयाहत्तर टक्के लोक ?
ते वरचेवर गरीब होत जातात. जलदेवता उत्तरली - हे लोक पाणी, जमीन, वन या निसर्ग संसाधनांवर उपजीविका करीत असतात. पण या विकासाच्या साखळीत ही संसाधनं धनिकांच्या हाती जातात. आणि मग हे गरीब लोक हळूहळू या विकासाच्या परिघाबाहेर जातात.
सृष्टिदेवता चिंताक्रांत झाली. मानवप्राण्यानं सारंच शुध्द जल दूषित करून टाकलं आहे, आणि जलाप्रमाणेच इतर सारी निसर्ग संसाधनंही नष्ट करायला सुरूवात केली आहे हे पाहून क्रोधानं ती संतप्त झाली. पुन्हा आकाशात झेप घेऊन तिनं जरबेच्या स्वरांत पृच्छा केली - रे मानव, किं करोषि?
तिच्या आवाजातला क्रोध विकासात मग्न माणसाच्या ध्यानी आला. पण त्यानं सृष्टीच्या नजरेला नजर भिडवून उद्दाम स्वरांत उत्तर दिलं - मी माझ्या विकासासाठी शुध्द जल घेतोय, आणि म्हणून ते प्रदूषित होतंय. शुध्दोदकम् प्रदुष्यामि !
मानवाला आपण दिलेला मुबलक शुध्दोदकाचा वर हे एक अपात्री दान होतं हे सृष्टिदेवतेच्या ध्यानी आलं, आणि तिनं दिलेला वर तात्काळ परत घेतला!
आणखी काही योजनं उलटली. माणसाचं विकासाचं हे विपरित चक्र सुरूच राहिलं. अल्पावधीतच हरितगृहयुक्त धूम्रशलाकांनी सारं वायुमंडळ व्यापून गेलं. अवघा अवनीतल तप्त झाला. हिमशिखरं वितळू लागली. ध्रुवीय हिमसंचय आकसत जाऊन नष्ट झाला. सागरांच्या जलसंचयाला अभूतपूर्व उधाण आलं. सप्तनद्यांचं पाणी आटून गेलं. सरोवरं शुष्क झाली. भूजलाचे स्त्रोत सूक्ष्मात गेले. पृथ्वीतलावरच्या सुजलाम् सुफलाम् हिरव्या भूखंडांनी दाहक, वालुकामय रूप परिधान केलं.
नंतर बराच काळ लोटला. अशाच एका रात्री सृष्टीदेवता आकाशात विहरत असतांना तिला एक कृष मानवप्राणी खालच्या शुष्क पुळणीत उकिडवा बसलेला दिसला. खाली झेप घेत सृष्टीदेवतेनं विचारलं - को जागर्ति ? त्या कृश माणसानं सावकाश मान वर उचलली, अन् क्षीण आवाजात तो उत्तरला - अहं जागर्मि.
त्याच्याकडे पाहून सृष्टीदेवतेला मोठं आश्चर्य वाटलं. तिनं त्याला विचारलं - रे मानवा, तू असा रूग्णाईतासारखा हताश होत्साता का बसून आहेत?
त्या माणसानं आपल्या भेगाळलेल्या ओठांवरून शुष्क पडलेली जीभ फिरवली. तो म्हणाला - हे सृष्टीदेवते, मी पाणी फार कमी पितो. म्हणून मला मूत्रपिंडाची दुर्धर व्याधी जडलेली आहे. चोविस तास मला केवळ अर्धा पेला पाणीच अनुज्ञेय आहे. साऱ्यांनाच केवळ तेवढंच पाणी पिता येतं. कारण पृथ्वीतलावर आता पाणीच फार थोडं उरलेलं आहे. नद्या-निर्झर-भूजल सारी आटून तरी गेलीयंत, नाहीतर प्रदूषित झालीयत. आता आम्ही अंग स्वच्छ करण्यासाठी खनिज तेलाचे बोळे वापरतो. डोकं धुण्यापुरतं पाणी अप्राप्य असल्यामुळे आम्ही सारे केश वपन करतो. समुद्राचं खारं पाणी शुध्द करण्याच्या तंत्रामुळे आम्हाला अर्धा पेला तरी पिण्यासाठी मिळू शकतं. तेवढं पाणीही हिसकावून घेण्यासाठी लोक आजकाल दरोडे घालतात, दंगे करतात. पाणी नसल्यामुळे आता जमिनीत काही पिकत नाही. आम्ही खातो ते अन्न सिंथेटिक असतं. आम्ही कपडे धुवू शकत नाही. त्याऐवजी वापरून फेकण्याजोगे कपडे आम्ही वापरतो. त्यामुळे घनकचऱ्याचं प्रमाण अफाट वाढतंय. पाण्याअभावी ड्रेनेज व्यवस्था बंद पडली आहे. त्यामुळे सर्वत्र घाण होते. त्यातूनही रोगराई पसरत आहे. आमची त्वचा सुकलेली सुरकुतलेली आहे. त्वचेचे, आंतड्यांचे अन् मूत्रनलिकांचे कर्करोग हेच सहसा आम्हा लोकांच्या मृत्यूचं कारण असतं. वृक्षसंपदा नष्ट झालेली आहे. तापमान वाढत चाललं आहे. आमची बौध्दिक क्षमता कमी होतेय. जननक्षमताही क्षीण झाली आहे. आमचं सरासरी आयुष्यमान केवळ पस्तीस वर्षांचं झालं आहे. पाण्याचा अपव्यय करण्याचं आणि असणारं पाणी प्रदूषित करण्याचं पातक आम्ही केलं. त्याची जबर किंमत आता आमच्या मुलाबाळांना द्यावी लागत आहे. आता आम्ही जागे झालो आहोत. मी जागा झालो आहे. अहं जागर्मि, हे सृष्टिदेवते, आता तूच आम्हाला वाचवू शकतेस. तूच आमची तारणहार आहेस.
सृष्टिदेवतेच्या डोळ्यांत अश्रू आले. पण आता काहीच करू शकत नव्हती. तिनं हताशपणे त्या व्याकुळ मानवाकडे एकदा पाहिलं, आणि पुन्हा अवकाशात उंच भरारी घेतली.
श्री. विजय दिवाण, औरंगाबाद - (भ्र : 9422706585)