मराठवाड्याचे अतिशोषित भूजल

Submitted by Hindi on Tue, 03/06/2018 - 13:31
Source
जलोपासना, दिवाळी, 2017

अशा रीतीने मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये भूजलाचे अतिशोषण झाल्यामुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भूजलाची सरासरी पातळी २ ते ३ मीटर्सने खाली गेलेली आहे. बोअर किंवा कूपनलिकांची बेसुमार संख्या, जास्त खोलवर बंदिस्त किंवा अर्ध-बंदिस्त जलसाठ्यांतूनही केला जाणारा पाण्याचा उपसा, आणि सिंचनासाठी धरण-कालव्यांच्या पाण्यापेक्षा भूजलाचा होणारा अतिरिक्त वापर यांमुळे मराठवाड्यात उपरोक्त चार जिल्ह्यांत भूजल साठ्यांचे अनिर्बंध शोषण होत आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा विभाग हा मूळातच तीव्र पाणीतुटीचा प्रदेश आहे. हा प्रदेश दक्खनच्या पठाराचा एक भाग आहे. या पठारात असणारे खडक हे साधारणत: १४४ दशलक्ष वर्षांपूर्वीचे असावेत असे मानले जाते. बालाघाट आणि अजिंठ्याच्या डोंगरमाळा वगळता या प्रदेशाचा बहुतांश भूभाग हा सपाट आणि समतल आहे. या जमिनीत लाव्हा खडकांचे चाळीस-पंचेचाळीस मीटर जाडीचे आडवे थर आहेत. आणि या लाव्हा खडकांतील भेगांमध्ये, भंगलेल्या प्रस्तरांमध्ये, आणि थराथरांतील पोकळींमध्ये भूजल संचयित झालेले आहे. सर्वसाधारणपणे या सुमारे ८ ते ९ मीटर्स खोल पातळीवर हे भूजल आढळते. मराठवाड्याच्या एकूण आठ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांचे सरासरी पर्जन्यमान कमी, म्हणजे ४०० ते ७०० मि.मी. एवढेच आहे. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण मर्यादित आहे. या विभागात ७६ तालुके आहेत.

त्यांपैकी ६१ तालुक्यांत भूजलाची पातळी अत्यंत खाली गेलेली होती. २०११ नंतरच्या दीर्घ अवर्षण काळात ही पातळी जास्तच खालावली आहे. सहाव्या भूजल निर्धारण अहवालानुसार मराठवाड्यात संख्येने सुमारे ३ लाख ४८ हजार पेक्षा जास्त विहिरी घेतल्या गेलेल्या असून त्यांपैकी ३ लाख २३ हजार विहिरींतून सतत उपसा होत असतो. या प्रदेशातील ७६ तालुक्यांपैकी २९ तालुके अवर्षणप्रवण आहेत, तर १२ तालुके हे कायम दुष्काळी स्वरूपाचे आहेत. अलीकडच्या काळात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने (G.S.D.A. )मराठवाड्यातील तीव्र पाणीटंचाईच्या आणि अतिशोषित खेड्यांची एक यादी प्रसृत केली आहे. त्या यादीनुसार या विभागाच्या ३० पाणलोटक्षेत्रांतील ५४१ खेड्यांमध्ये भूजलाची स्थिती अतिशोषित आणि चिंताजनक अशी आहे. यांपैकी सर्वात गंभीर स्थिती लातूर जिल्ह्यात आहे. या एकाच जिल्ह्यातील ७ पाणलोटक्षेत्रांत आणि १५२ खेड्यांत भूजलाचे अतीव शोषण झालेले आहे.

औरंगाबाद जिल्हा हा मुख्यत: गोदावरी खोर्‍यात आहे, पण जिल्ह्याचा वायव्येकडील थोडा भाग मात्र तापी खोर्‍यात मोडतो. या जिल्ह्यातून गोदावरी, पूर्णा, दुधना, आणि तापी नद्यांच्या विविध उपनद्या वाहतात. कोळ, शिवना, खाम, येळगंगा, शिवभद्रा, येळभद्रा, गल्हाटी, धेंडा, दुधना, मुसा इत्यादि गोदावरीच्या प्रमुख उपनद्या या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याचा भूस्तर काही ठिकाणी खडकाळ तर काही ठिकाणी गाळयुक्त मातीचा आहे. खडकाळ भागांत पठारीय खडकांचे एकावर एक असे अनेक आडवे थर आहेत. हा भाग कठीण बेसाल्ट खडकांचा आहे, तर उर्वरित भाग मुरुमाड आणि गाळाच्या जमिनींचा आहे. कठीण खडकांचे स्तर हे वरच्या बाजूस सच्छिद्र बनलेले आहेत. या सच्छिद्र थरांमध्ये आणि त्याखालील खडकांच्या भेगांमध्ये भूजल साठलेले असते. या भागांतील बांधीव विहिरींची खोली सरासरीने १२ ते १५ मीटर्स एवढी असते. या जिल्ह्यात गोदावरी, शिवना आणि पूर्णा नद्यांच्या खोर्‍यांतील नरम जमिनींमध्येही खोलवर भूजलाचे साठे आढळतात. या जमिनींत साधारणत: १६ ते २६ मीटर्स खोलीपर्यंत दगड, रेती, आणि मातीच्या गाळाने भरलेले थर आहेत. तिथे साधारणत: २५ मीटर्स खोलीपर्यंत भूजल आढळू शकते. या भागांत सुमारे २० मीटर खोल खणलेल्या विहिरी आढळतात. केंद्रीय भूजल मंडळाच्या वतीने या औरंगाबाद जिल्ह्यात भूजलाची पातळी आणि दाब मोजण्यासाठी एकूण २५ नॅशनल हैड्रोग्राफ नेटवर्क स्टेशन्स स्थापन करण्यात आलेली आहेत. भूजलाच्या अमर्याद उपशामुळे या जिल्ह्यात १२५ गावे अतिशोषित म्हणून ज्ञात आहेत.

औरंगाबादच्या पूर्वेस असणारा जालना जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे एक उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. या केंद्राद्वारे अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोपे जाते. या जिल्ह्याच्या वायव्येस अजिंठा डोंगरराशींच्या पूर्वेकडील उताराची जमीन आहे. अग्नेयेस सातमाळा डोंगरांची एक रांग जाफ्राबाद तालुक्यातून विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पसरलेली आहे. अजिंठा डोंगरराशींची सपाट माथ्याच्या टेकड्यांची एक रांग या जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. या टेकड्यांमुळे पूर्णा आणि गिरिजा नद्यांच्या मध्ये असणारा प्रदेश हा गिरिजा आणि दुधना नद्यांमधील प्रदेशापासून विभागाला गेलेला आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस आणि पश्चिमेस जाफ्राबाद, भोकरदन आणि अंबड तालुक्यांतही छोट्या टेकड्या आहेत. त्याशिवाय जिल्ह्याच्या दक्षिण आणि मध्य भागांत चढउताराच्या जमिनी बर्‍याच आहेत. या सगळ्या टेकड्यांची समुद्रसपाटीपासून असलेली उंची ४५० ते ९०० मीटर्स आहे. जिल्ह्यातील जमिनींचे उतार सर्वसाधारणपणे पूर्व आणि दक्षिण-पूर्व बाजूंनी आहेत. अंबड आणि परतूर तालुक्यांतील गोदावरी आणि दुधना नद्यांच्या बाजूच्या प्रदेशांत १५० ते ३५० मीटर उंचीच्या टेकड्या आहेत.

गोदावरी, पूर्णा आणि दुधना या तीन मोठ्या नद्या या जिल्ह्यातून वाहतात. मुख्य खोरे गोदावरीचे आहे. त्याखेरीज शिवभद्रा, येलदरी, गल्हाटी या गोदावरीच्या उपनद्याही जालना जिल्ह्यातून वाहतात. गोदावरी खेरीज पूर्णा ही दुसरी मोठी नदी या जिल्ह्यात आहे. गिरिजा, दुधना, खेळणा, चारणा, धामना, जुई, अंजन आणि जीवरेखा या पूर्णेच्या उपनद्या या जिल्ह्यातून जातात. शिवाय दुधना नदीच्या कुंडलिका, लहुकी, सुखना, कल्याण आणि बालडी या उपनद्याही या जिल्ह्यात आहेत. जालना जिल्ह्यातली बहुतांश जमीन देखील बेसाल्टयुक्त लाव्हाच्या थरांसून बनलेली आहे. हे थर ५ ते २५ मीटर जाडीचे आहेत. यातील प्रत्येक थराच्या खालच्या भागात कमी सच्छिद्र्तेचा कठीण खडक असतो. या थरांच्या वरच्या भागांत काळाच्या ओघात जीर्ण झालेला, तडकलेला आणि काही प्रमाणात सच्छिद्र बनलेला खडक असतो. त्यात थोडीबहुत भूजल-धारण क्षमता असते. जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागांत जमिनींमध्ये खोलवरपर्यंत दगडगोटे आणि मुरूम असल्याने सुपीक मातीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. परंतु मध्य, पूर्व आणि दक्षिण भागांत गोदावरी व दुधना नद्यांच्या काठांलगत एक ते दोन मीटर जाडीचे काळ्या सुपीक मातीचे थर आहेत. ही माती सेंद्रिय पोषणद्रव्यांनी युक्त अशी आहे.

या जिल्ह्यातल्या डोंगराळ भागांत कमी प्रतीच्या हलक्या जमिनी आहेत. या जमिनींत मातीचे थर साधारणत: सहा इंच जाडीचे आहेत. डोंगरांच्या पायथ्याशी असणार्‍या काही उंच-सखल जमिनींत मध्यम प्रतीच्या भुरकट रंगाच्या मातीचे दीड फूट जाडीचे थर आहेत. नदीकाठी असणार्‍या जमिनींत मात्र दोन ते पाच फूट खोल काळ्या मातीचे थर आहेत. या थरांखाली मुरुमाची जमीन असते. या जमिनींत साधारणत: २० ते २५ मीटर खोलीवर भूजलाचे साठे आढळतात. या जिल्ह्यात जुन्या १५ ते ३० मीटर खोल खणलेल्या विहिरी आणि अलीकडे अमाप संख्येने घेतल्या गेलेल्या ६० ते ८० मीटर खोल बोअर विहिरींद्वारे भूजलाचा उपसा होत असतो. या जिल्ह्यातील डोंगराळ भागांची भौगोलिक स्थितीही भूजल-धारण क्षमतेवर परिणाम करणारी आहे. उंच-सखल डोंगराळ भागांत बृक्षराजीचा अभाव असल्याने डोंगरमाथ्यावरून पावसाचे ओहोळ जास्त वेगाने दर्‍याखोर्‍यांत येतात, आणि पावसाचे पाणी जमिनींत फारसे न जिरता वाहून जाते. त्यामुळे जालना जिल्ह्यात एकूण ९८ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून काही गावांत तर चिंताजनक स्थिती आहे.

मराठवाड्यातील परभणी जिल्हा हा समुद्रसपाटीपासून सरासरी ५८० मीटर्स उंचीवर आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त उंचीचे ठिकाण जिंतूरजवळ चारठाणा गावाच्या उत्तरेस १३ कि.मी. अंतरावर आहे. तेथील उंची ५८० मीटर्स एवढी आहे. आणि गोदावरी नदी परभणी जिल्ह्यातून जिथे बाहेर पडते ते सर्वात कमी, म्हणजे ३६६ मिटर्स उंचीचे ठिकाण आहे. पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, पालम, सेलू आणि परभणी या तालुक्यांच्या जमिनी तुलनेने सपाट आहेत. परंतु जिंतूर तालुक्यातील बराचसा भाग छोट्या छोट्या डोंगर-टेकड्यांचा आहे. गोदावरी आणि पूर्णा नद्यांची आणि त्यांच्या उपनद्यांची खोरी या जिल्ह्यांत आहेत. अनेक ठिकाणी सपाट जमिनींवर बरेच चढ-उतार आहेत. काळाच्या ओघात या जमिनींच्या थरांची धूप होऊन ते विघटित झालेले आहेत. जमिनींमधील उतार हे साधारणत: वायव्येकडून अग्नेय दिशेकडे आहेत. ५०० मीटर उंचीच्या बहुतेक टेकड्या सपाट माथ्याच्या आहेत. अशा रीतीने परभणी जिल्ह्यात एकीकडे चढ-उतारांच्या शेतीयोग्य जमिनी आहेत, तर दुसरीकडे उखडलेल्या दगडगोट्यांनी भरलेली माळराने आहेत. या जमिनींमध्ये हलकी आणि मध्यम प्रतीची माती असते. पाथरी आणि परभणी तालुक्यांत काही ठिकाणी काळ्या मातीची जमीन आहे. काही ठिकाणी चिकण माती आढळते, तर काही ठिकाणी दुम्मट माती दिसते.

संपूर्ण परभणी जिल्ह्यात जमिनींमध्ये लाव्हा थरांपासून तयार झालेले बेसाल्ट खडक आणि चुनखडीयुक्त मातीचे थर आढळतात. गोदावरी, पूर्णा, दुधना, गलाटी, धोंड आणि करपरा नद्यांच्या परिसरात काही प्रमाणात गाळाची जमीनही आढळते. या जिल्ह्यात भूजलाचे अस्तित्व, आणि त्याचे जमिनीखालील वहन या दोन्ही गोष्टी खडकांच्या प्रकारांनुसार ठरतात. खडकांच्या सच्छिद्रतेचे प्रमाण, आणि त्यांची शोषणक्षमता यांवर त्या अवलंबून असतात. जिल्ह्यात साधारणत: २० ते २५ मीटर्स खोल जमिनीत भूजल साठे आहेत. इतर जिल्ह्यांप्रमाणे याही जिल्ह्यात १५ ते ३० मीटर खोल सध्या विहिरी, आणि ६० ते ८० मीटर कुपनलिका यांच्याद्वारे भूजल उपसले जाते. या जिल्ह्यात देखील काही नॅशनल हैड्रोग्राफ नेटवर्क स्टेशन्सद्वारे भूजल पातळींवर देखरेख केली जाते.

नांदेड जिल्हा हा काही मर्यादित चढ-उतार असणार्‍या पठारांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मर्यादित डोंगराचे उतार वायव्येकडून नैऋत्येकडे झुकलेले आहेत. या डोंगरांची उंची साधारणत: ३५० मीटर्स पासून ५५० मीटर्स पर्यंत आहे. गोदावरी, पेनगंगा, मांजरा आणि मन्याड या नद्या जिल्ह्यातून वाहतात. आसना, सीता, सिद्धा या तीन उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. मन्याड आणि लेंडी या मांजरेच्या उपनद्या होत. कयाधू नदी आणि तामसा नाला या पेनगंगेच्या उपनद्या आहेत. पेनगंगा नदीवर किनवट तालुक्यातील इस्लापूर गावाजवळ एक मोठा सहस्रकुंड नामक धबधबाही आहे. या जिल्ह्यात एकूण ४९ पाणलोट क्षेत्रे असून त्यांतील १७ पाणलोट पावसाळी ओहोळक्षेत्रांत, १८ पुनर्भरण क्षेत्रांत, आणि उर्वरित १४ पाणलोट हे स्त्रवणक्षेत्रांत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या बेसाल्ट आणि ग्रॅनाईट खडकांच्या जमिनींत आणि काही प्रमाणात काळ्या मातीच्या जमिनींत भूजल साठे आढळतात. येथील ग्रॅनाईटचे खडकाळ प्रस्तर हे २९ मीटर एवढ्या मर्यादित खोलीपर्यंतच सच्छिद्र असतात. तथापि या खडकांमधील तडे, भेगा आणि सांधे यांमधून पाण्याचे स्त्रवण शक्य होते. त्याखालील बेसाल्टच्या खडकांत जमिनीखाली १७० मीटर्स खोलीवर काही भूजल साठे आहेत. तेवढ्या खोलीवरच्या बेसाल्टमधील बुडबुड्यांसारख्या पोकळींमध्ये भूजल साठलेले असते. मात्र त्याखालील जास्त कठीण बेसाल्टमध्ये मात्र अशा पोकळी नसतात.

लातूर जिल्ह्यातील जमीन ही मुख्यत: बालाघाटाच्या पूर्वेकडील पठाराची जमीन आहे. समुद्रसपाटीपासून ५०० ते ७१५ मीटर उंचीवर असलेल्या या जिल्ह्यात काहीशी चढ-उतारांची जमीन असून बालाघाटाचे काही छोटे डोंगरही तीवर आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यांत उंच पठारांच्या जमिनी आहेत. तर अहमदपूर आणि उदगीर तालुक्यांत मन्याड, लेंडी, मांजरा आणि तावरजा नदीखोर्‍यांतील कमी उंचीच्या जमिनी आहेत. मांजरा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. शिवाय तावरजा आणि तेरणा या तिच्या पूर्वेकडे वाहणार्‍या उपनद्या, आणि रेणा व घरणी या दक्षिणवाही उपनद्या या आहेत. जिल्ह्यात या सर्व नद्यांची शाखाकार वहन-रचना तयार झालेली आहे. मातीच्या प्रकारांवरून या लातूर जिल्ह्याचे दोन गटपाडता येतात. जिल्ह्याच्या पूर्व भागात अहमदपूर व उदगीर हे संपूर्ण तालुके, आणि लातूर व औसा तालुक्याचे काही अंश असे आहेत जिथे हलक्या आणि मध्यम प्रकारची माती आहे. या मातीत ओल टिकून राहत नाही. त्यामुळे ही माती केवळ खरीप पिकांसाठी योग्य आहे. मात्र संपूर्ण निलंगा तालुक्यात, आणि लातूर व औसा तालुक्यांच्या उर्वरित भागांत खोल काळ्या मातीची जमीन आहे.

त्यामुळे ती खरीप आणि रबी या दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी उत्तम आहे. या संपूर्ण जिल्ह्यात लाव्हाच्या थरांपासून तयार झालेल्या कठीण बेसाल्ट खडकाचा पाया मातीच्या खाली असतो. हे खडक खालच्या बाजूस अखंड आणि कठीण असून वरच्या बाजूस सच्छिद्र आहेत. या दोन थरांच्या मध्ये साधारणत: १५ ते २० मीटर्स खोलीवर या जिल्ह्यात भूजल आढळते. त्याशिवाय सुमारे ३०० मीटर्स खोलीपर्यंत खडकांमध्ये छुपे अथवा अर्ध-छुपे भूजल साठेही आहेत. या जिल्ह्यात १५ ते ४० मीटर्स पर्यंतच्या भूजलाचा अतिशयोक्त उपसा झालेला आहे. त्या मानाने पुनर्भरण कमी आहे. आणि आता काही ठिकाणी ३०० मीटर्स खोलवर कूपनलिका खोदून पाणी उपसले गेले आहे. एवढ्या खोलवरचे भूजल उपसले गेले तर त्याचे पुनर्भरण सहजासहजी होणे अवघड असते असे तज्ञ सांगतात. या जिल्ह्यात निलंगा, देवणी, जळकोट आणि उदगीर तालुक्यांमध्ये ४० मीटर्स खोलीपर्यंत भूजल आढळते. तर रेणापूर, लातूर,अहमदपूर, औसा, शिरूर या तालुक्यांत ५ ते १० मीटर खोलवर पाणी आढळते. २०११ नंतरच्या दीर्घ अवर्षण काळापासून आजपर्यंत भूजलाच्या बेसुमार उपशामुळे खुद्द लातूर शहर देखील तीव्र पाणीटंचाईने होरपळले आहे. लातूर जिल्ह्यात केंद्रीय भूजल मंडळाच्या वतीने भूजल पातळीच्या देखरेखीसाठी एकूण २८ गावी नॅशनल हैड्रोग्राफ नेटवर्क स्टेशन्स प्रस्थापित केली गेलेली आहेत.

उस्मानाबाद जिल्हा हा बहुतांशाने बालाघाटाखालील पठाराच्या नैऋत्य आणि दक्षिण उतारांवर अस्तित्वात आहे. या जिल्ह्यातील जमीन डोंगराळ भाग, चढ-उतारांच्या जमिनी आणि पठारे अशा वैविध्यपूर्ण भूभागाने व्यापलेला आहे. या जमिनींवरील छोट्या टेकड्या आणि त्यांहून लहान चढउतारांमुळे भूजल साठे विखुरलेले आढळतात. या जिल्ह्यात भूजलाचा वापरही खूप अतिरिक्त होत असतो. गोदावरी नदीच्या अनेक उपनद्या बालाघाटातून उगम पावतात. उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणारी मांजरा ही मुख्य नदी आहे, आणि शिवाय या जिल्ह्यात सीना, तेरणा, बोरी, वेनितुरा आणि बाणगंगा या तिच्या उपनद्या आहेत. या नद्यांच्या संरचनेमुळे उस्मानाबाद जिल्हा एकूण ४१ पाणलोट क्षेत्रांत विभागाला गेलेला आहे. या जिल्ह्यात डोंगराळ भागांच्या अधेमध्ये उथळ मातीच्या सपाट जमिनींचे तुकडे आहेत. ही माती गडद राखी रंगाची असून हलक्या प्रतीची आहे. भूम, कळंब आणि उस्मानाबाद तालुक्यांमध्ये थोडी काळसर आणि मध्यम प्रतीची माती आढळते. तुळजापूर तालुक्यात काही ठिकाणी थोडी खोल काळी माती आहे. हा संपूर्ण जिल्हा बेसाल्ट खडकांच्या जमिनींनी व्यापलेला असून मोठ्या नद्यांच्या काठांवर उथळ मातीच्या जमिनींचे पट्टे आहेत. भूजल धारणेसाठी हा प्रदेश फारसा पोषक नाही.

त्यामुळे तुलनेने भूजलाचे प्रमाण कमी आहे. या संपूर्ण जिल्ह्यात फार कठीण बेसाल्ट खडक असल्याने योग्य जागी खोदलेल्या विहिरी करणे हेच उपयोगाचे आहे. इथे कूपनलिका घ्यावयाच्या असतील तर योग्य वैज्ञानिक संशोधनाअंतीच त्यांच्या जागा निश्चित करणे योग्य होय. भूजल शास्त्रज्ञ सांगतात की या जिल्ह्यात कूपनलिकांचे पाणी गुणवत्तेच्या दृष्टीने तपासून ते चांगले असल्यास फक्त पिण्यासाठी वापरावे, सिंचनासाठी वापरू नये. जिल्ह्यात भूम आणि तुळजापूर तालुक्यांचे नैऋत्य भाग, परंडा तालुक्याचा ईशान्य भाग, उस्मानाबाद तालुक्याचा वायव्य भाग, आणि उमरगा तालुक्याचा दक्षिण भाग या प्रदेशांत अद्यापही भूजल उपलब्धतेच्या संधी चांगल्या आहेत. मात्र या जिल्ह्यात काही ठिकाणी उथळ जमिनीतील भूजल हे नायट्रेट प्रदूषणाने, तर खोलवरचे भूजल हे फ़्लोराईड प्रदूषणाने ग्रस्त आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर योग्य त्या प्रक्रियेनंतरच करणे उचित आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन पाणलोट क्षेत्रांत २८ गावांतील भूजल अतिशोषित असून आणखी पाच पाणलोट क्षेत्रे शोषित झालेली आहेत. त्यांतील ५८ गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. आता या संपूर्ण जिल्ह्यात भूजल पुनर्भरणाच्या योजना युध्दपातळीवर राबविल्या जाणे गरजेचे आहे.

भूजलाच्या अभ्यासाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचे तीन भाग पडतात. जिल्ह्याच्या उत्तरेस गोदावरी खोर्‍याचा सखल जमिनीचा भाग आहे. हा भाग समुद्रसपाटीपासून सरासरी ४०० मीटर उंचीवर आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडे बालाघाटाखालील डोंगर-पठारांचा उंच भाग आहे. हा साधारणत: ५०० ते ६०० मीटर उंचीचा आहे. आणि जिल्ह्याच्या पश्चिम आणि नैऋत्य बाजूंना सीना नदीखोर्‍याचा सखल भाग आहे ज्यात संपूर्ण आष्टी तालुका येतो. गोदावरी, मांजरा आणि सीना या नद्या आणि त्यांच्या काही उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या बहुतांश भागांत खडकाळ आणि मातीच्या पातळ थरांच्या जमिनी आहेत. गोदावरी आणि सिंदफणा नद्यांच्या किनारी मात्र करड्या किंवा काळ्या मातीच्या जमिनी आहेत. या जमिनींच्या खालच्या भागांत दक्खन पठाराचे कठीण खडक आहेत. या खडकाचा वरचा भाग विघटित होऊन त्यात अनेक पोकळ्या, छिद्रे आणि फटी पडलेल्या असतात. साधारणत: २० ते २५ मीटर्स खोलपर्यंत असे सच्छिद्र खडक आहेत. त्यांत भूजल साठलेले असते. या जिल्ह्यात सुमारे २९ मीटर खोलीपर्यंतच्या विहिरी आणि कूपनलिका अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी ५० मीटर खोल कूपनलिकांद्वारे खडकांतील बंदिस्त जलसाठ्यांतूनही भूजलाचा उपसा होतो.

हिंगोली हा मराठवाड्याच्या विदर्भ सीमेनजिकचा नवा जिल्हा आहे. या जिल्ह्यात सपाट माथ्याच्या काही टेकड्या असणारी माळरानांची दक्षिणेकडे उतार असणारी जमीन आहे. इथल्या माळहिवरा डोंगरराशींनी या जिल्ह्यातील पेनगंगा खोरे हे कयाधू खोर्‍यापासून विभागले गेलेले आहे. या जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी काळ्या मातीची जमीन आहे. या मातीत चुनखडी, लोह आणि मॅग्नेशियम ही द्रव्ये जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे इथली माती अल्कधर्मी आहे. पेनगंगा, कयाधू आणि पूर्णा या तीन नद्या या जिल्ह्यातून वाहतात.पेनगंगा ही मोठी नदी असून या नदीवर इसापूर धरण बांधलेले आहे. पूर्णा नदीवर येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे आहेत. या जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागांतील जमीन ही उथळ आणि मुरुमाड आहे. परंतु पेनगंगा आणि पूर्णा नद्यांच्या काठांवरची दक्षिणेची जमीन मात्र सुमारे २ मीटर खोल काळ्या मातीची आहे. जिल्ह्यातील खडकांच्या रचनेचा आणि रासायनिक गुणधर्मांचा परिणाम येथील भूजलावर झालेला दिसतो. वेगवेगळ्या खडकांतील प्राथमिक आणि दुय्यम सच्छिद्रतेनुसार कमी-जास्त भूजलाचे साठे बनले आहेत. जमिनीखाली साधारणत: २० ते २५ मीटर खोल खणल्यावर भूजल आढळते.

इतर जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यातही खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिका अमाप आहेत. विहिरी सुमारे १५ ते ३० मीटर खोलीच्या असतात. तर कूपनलिका ६० ते ८० मीटर्स खोलीच्या असतात. जमिनीखाली साधारणत: ५ ते २५ मीटर जाडीचे बेसाल्ट लाव्हा खडकांचे थर आहेत. त्यांतील खालच्या बाजूचे सुमारे ५० टक्के खडक हे सच्छिद्र नाहीत. वरच्या भागात मात्र ३० ते ६० टक्के सच्छिद्रतेचे खडक आहेत. त्यांचे नैसर्गिक विघटन होऊन त्यात अनेक फटी, भेगा, छिद्रे आणि सांधे तयार झालेले आहेत. त्यांत मर्यादित प्रमाणात भूजलाचे साठे आढळतात. या जिल्ह्यात भूजलाचे बाजूंना निरीक्षण करण्यासाठी ४२ नॅशनल हैड्रोग्राफ नेटवर्क स्टेशन्स अस्तित्वात आहेत.

अशा रीतीने मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांमध्ये भूजलाचे अतिशोषण झाल्यामुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भूजलाची सरासरी पातळी २ ते ३ मीटर्सने खाली गेलेली आहे. बोअर किंवा कूपनलिकांची बेसुमार संख्या, जास्त खोलवर बंदिस्त किंवा अर्ध-बंदिस्त जलसाठ्यांतूनही केला जाणारा पाण्याचा उपसा, आणि सिंचनासाठी धरण-कालव्यांच्या पाण्यापेक्षा भूजलाचा होणारा अतिरिक्त वापर यांमुळे मराठवाड्यात उपरोक्त चार जिल्ह्यांत भूजल साठ्यांचे अनिर्बंध शोषण होत आहे. नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांत अजून जरी एवढे भूजल शोषण होत नसले, तरी भविष्यात ते होऊ शकते. त्यामुळे मराठवाड्यात नव्या कूपनलिका घेण्यावर बंदी घालणे, कूपनलिकांच्या खोलीवर मर्यादा घालणे, अस्तित्वात असणार्‍या कूपनलिकांच्या वापरांवर बंधने घालणे, आणि एकूणच भूजल उपसा व वापर यांच्यासाठी नियमावली तयार करणे या गोष्टी आता जरुरीच्या झाल्या आहेत.

प्रा.विजय दिवाण - मो : ०९४०४६७९६४५