Source
जल संवाद
नद्या नाले यांची निर्मिती विश्वाच्या जन्मापासून झाली आहे व त्यामुळे त्यांच्या मूळ रूपाला मानव आज जरी बदलू पहात असला तरी निसर्गच मानवावर अंतिम मात करणार यात शंका नाही. अर्थात ती मात कधी व कोणत्या स्वरूपाची असेल याचा अंदाज सर्वसामान्यांना आज तरी येणार नाही. मात्र पर्यावरण अभ्यासकांना त्याची चाहूल आज पासूनच लागली म्हणून तर आज सर्व पर्यावरण प्रेमी स्वत:चा वेळ देवून लष्कराच्या भाकऱ्या भाजत आहेत.
नद्या नाले यांची निर्मिती विश्वाच्या जन्मापासून झाली आहे व त्यामुळे त्यांच्या मूळ रूपाला मानव आज जरी बदलू पहात असला तरी निसर्गच मानवावर अंतिम मात करणार यात शंका नाही. अर्थात ती मात कधी व कोणत्या स्वरूपाची असेल याचा अंदाज सर्वसामान्यांना आज तरी येणार नाही. मात्र पर्यावरण अभ्यासकांना त्याची चाहूल आज पासूनच लागली म्हणून तर आज सर्व पर्यावरण प्रेमी स्वत:चा वेळ देवून लष्कराच्या भाकऱ्या भाजत आहेत. प्रसंगी घरातल्यांच्या शिव्या ऐकून नदी प्रदूषणासाठी स्वत:च्या वाहनात इंधन भरून नदी स्वच्छता करण्यासाठी नदी वर जातात व हे नदीवर जाणारे सर्व जण खूप दूरवरच्या अंतरावरून येतात आणि प्रत्येकवेळी खारीचा सहभाग तरी नोंदवितात. स्थानिक प्रशासनाकडे कधी कधी काही मदतीच्या अपेक्षा ठेवतात पण स्थानिक प्रशासनातील जो मूळ गुणधर्म आहे ज्याला आपण बोली भाषेत गेंड्याच्या कातडीची माणसे असे म्हणतो त्याची आपणास खूप वेळा अनपेक्षित नकारात्मक ओळख घडून येते.जगातील सर्व धर्मातील शिकवणीत प्रत्येक धर्माने प्रत्येक माणसाचे नदी सोबत जोडलेले विशेष नाते हे सर्व धर्मात एक सारखेच आहे व प्रत्येकाला नदीवर एकदा तरी काही निमित्ताने जावेच लागेल असे काही धार्मिक विधी निर्माण करून नदी सोबत आपली सर्वांची गाठ मारली आहे. आपण आज सुध्दा नदीवर जातो ते एक चांगल्या भावनेनेच जातो कारण नदीच्या पावित्र्याबाबत मनातून खूप आशादायी आहोत पण आजची नदीची अवस्था म्हणजे गटारगंगेचे रूप आहे. एवढे गलिच्छ रूप उघड्या डोळ्यांना दिसत असताना सुध्दा आपण आपले धार्मिक विधी त्याच नदीत नित्य नियमाने करीत आहोत किंवा तसा हट्ट करतोच. पिपंरी चिंचवड शहरात कोणत्याही नदीने प्रवेश केला की ती नदी गटारगंगा बनणार याबाबत शंका नाही त्याचे कारण सुध्दा तेवढेच ताकदवार आहे ते म्हणजे स्थानिक प्रशासनाची नदी विषयक कोणतीही सकारात्मक मानसिकता नसणे हे एकमेव कारण आहे.
प्रशासनाच्या पवना सुधार प्रकल्पासाठी खूप मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे व ती मोठी रक्कम आणि ती शासनाची रक्कम खर्ची करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या हाती येणार ह्या एका मोठ्या हमखास धनलाभापोटी आज स्थानिक स्वराज्य संस्थेत चढाओढ निर्माण झालेली दिसत असेल तर नवल वाटावे असे काही नाही, पण ती नदी रोज स्वच्छ कशी राहील याबाबत मात्र कोणतीही एक ही दमडीची योजना आज अस्तित्वात कोणाकडे नाही हेच आपले दुर्भाग्य म्हणावे लागेल.
गणतपी मूर्ती विसर्जन नदीत करावे असे धर्मात म्हटले आहे ते अगदी योग्य असणारच पण त्या मूर्ती मातीच्या व नैसर्गिक रंगांना रंगविलेल्या असाव्या असा संकेत लेखी नसल्याने आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवून नदी पात्रात सोडतो त्यांना आवर घालण्यासाठी मूर्तीदान व कुंडात मूर्ती विसर्जन प्रथा समोर आली पण हे फक्त गणपती सोहळ्यापुरतीच मर्यादित राहिली. परत वर्षभरात पुन्हा नदीचे तोंड पहायचे नाही असा विचार सामाजिक संस्था व प्रशासनाने केलेला असतो त्यामुळे नदीत पडणारा कचरा मात्र तसाच नदी पात्रात पडून रहातो व ते चित्र एवढे विदारक व गलिच्छ असते की आपण त्याकडे पाहून फक्त नाके मुरडत बसतो.
पवना नदी मधील पाणी जरी पिण्यासाठी वापरण्यात येत असले तरी ती नदी रावेत बंधाऱ्या पासून दापोडीच्या पुलापर्यंत म्हणजेच संगमापर्यंत मृत म्हणून घोषित आहे. नदी रावेत बंधाऱ्याची भिंत ओलांडते व त्वरित 'अ' दर्जा सोडून लगेच 'क' दर्जा प्राप्त करते या मागील खरे कारण आहे ते नदी विषयक सकारात्मक मानसिकतेचा अभाव. पुनावळे व रावेत भागातील मानवी मलमूत्र व सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया होत नाही त्यामुळे ठिकठिकाणी ते पाणी छोट्या नाल्या वाटे अथवा जमिनीत गाडलेल्या बंद पाईप मधून नदीपात्रात गुपचूप सोडले गेलेले आहे. नदी बाजूला पेपर मिल सारख्या मोठ्या उद्योग समुहाने प्रचंड कारभार मांडला आहे. जरी कागद पत्री सगळे काही प्रदूषण विरहित सुंदर असले तरी नक्की अस्तित्वात काय आहे हे मात्र देव जाणे.
काल परवा नवरात्रीच्या देवी विसर्जनाच्या वेळी सर्वांनी देवीच्या मूर्ती पुरेसे पाणी नसतांना सुध्दा नदी पात्रात फेकून दिल्या आहेत. ते विदारक चित्र पवना नदीचे चिंचवड गावातील बिर्ला हॅस्पिटल जवळील नदी घाटावर दि. 26 ऑक्टोबर 2015 रोजी मला पहावयास मिळाले म्हणून मी त्या विषयाचे फोटो काढले व स्थानिक प्रशासनास पाठवून दिले व अपेक्षा केली की नदी घाट स्वच्छता अपेक्षित आहे. कधी कधी प्रशासनास कोणी तरी धक्का देणारा अपेक्षित असतो व तो मी ठरलो. त्या नंतर आज 31 ऑक्टोबर रोजी आम्ही शहरातील सर्व पर्यावरण वादी मंडळी एकत्रित त्या ठिकाणी जमलो व विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून प्रचंड मनुष्यबळ व सहकार्य आम्हास मिळाले व तो घाट व नदी पात्र बघता बघता एकदम सुंदर व आल्हादकारक दिसू लागले.
ह्या प्रसंगी काही घटना येथे विशेष करून नमुद कराव्याशा वाटतात त्या म्हणजे -
1. स्थानिक प्रशासनास नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाली
2. नदी बाबत नागरिक अतिशय संवेदन बनू लागले आहेत हे प्रशासनास जाणवत आहे व तसा दबावगट आम्ही निर्माण करण्याकामी काही अंशी सफल झालो आहोत
3. स्थानिक प्रशासन सनदी अधिकारी हा ग्रामीण जीवन जगल्याने व नदीशी त्याचे भावनिक नाते असल्याने त्या सनदी अधिकाऱ्यास हा विषय अतिशय महत्वाचा वाटला
4. ज्या ठिकाणी हा प्रकार झाला होता त्या ठिकाणचे महापालिका क्षेत्रिय अधिकारी रजेवर असल्याने तो पदभार नव्याने रूजू झालेल्या एका तरूण युपीएससी पास अधिकाऱ्याकडे होता व हा प्रसंग त्याच्या सेवाकाळातील पहिला प्रसंग त्यामुळे त्याने अतिशय उत्साहाने हाताळला. विना कोणताही नानाचा पाढा न वाचता
5. नदीवर आम्ही आमचे कार्यकर्ते जमा झालो तेव्हा कशी स्वच्छता होणार हा मोठा प्रश्न होता कारण -- प्रदूषत पाणी - कुजलेल्या निर्माल्याचा घाण वास - पाण्यात पाय घालण्यास सुध्दा परिस्थिती परवानगी देत नव्हती - नदीच्या तळाशी साठलेल्या पिशव्या व जुने कपडे आणि त्यातून पाण्यावर येणारे बुडबुडे. एकंदरीत पाण्यात पाय टाकला तर पायाला त्वचा रोग होण्याची लक्षणे दिसत होती. त्या पाण्यात हात घालणे तर सोडाच.
नेहमी अशा प्रकारची कामे करण्याची सवय असलेली प्रशिक्षित मंडळी महापालिका आरोग्य विभागाकडे असल्याने त्यांनी पटापट पाण्यात जावून लोखंडी तारांच्या आकड्यांनी नदीच्या तळाशी चिटकलेल्या बाबूंच्या असंख्य पूजेच्या परड्या व देवीला अर्पण केलेले हजारो चोळीचेे खण कुजलेल्या अवस्थेत बाहेर काढले. ह्या कचऱ्यात जास्त प्रमाण होते ते गाठमारून फेकलेल्या प्लास्टीक कॅरी बॅगचे ज्याच्यात पाणी घुसल्याने (पाणी शिरल्याने जड बनून) त्या नदीच्या तळाशी जावून बसलेल्या होत्या. एकंदरीत त्या प्रशिक्षित मंडळींमुळे आम्हा वरील संकट टळले अन्यथा आमच्याने तेवढे सफाईदार व पटकन ते काम झाले नसते. प्रामुख्याने सांगावेसे वाटते ते म्हणजे महापालिका क्षेत्रिय अधिकारी स्वत: त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत होता.
ह्या प्रसंगातून मी माझे मत आपणासमोर मांडायचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे आपण नागरिकांनी स्वत: नदी विषयी आत्मियता निर्माण करणे गरजेचे आहे. दुसऱ्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी आपणच चार पावले पुढे चालणे गरजेचे आहे. जी बाब आपण एकटे किंवा लहान गट करू शकत नाही अथवा ते शक्य नाही, त्यासाठी स्थानिक प्रशासनास त्या विषयाची पूर्ण कल्पना देणे गरजेचे आहे व तशी गरज घेताना प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गाचा स्वभाव व वर्तनांचा पूर्ण पणे अभ्यास करून किंवा त्याबाबत कोणतीही तक्रार अथवा संकोच मनात न ठेवता विषय सादरीकरण करावे.
नदीचे गत वैभव निर्माण करण्यासाठी नदी परिसरात ठिकठिकाणी असे प्रयोग होणे गरजेचे आहे व त्यासाठी त्या परिसरातील सामाजिक परिस्थिती योग्य आहे याची चाचपणी करणे सुध्दा गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचा मी उल्लेख या साठी केला की आज माणसाची सर्वात प्रगत अशी अवस्था आपण उपभोगत आहोत. कारण माणसाकडे त्याच्या गरजेपुरता पैसा आहे व जर तो नसेल तर पैसा प्राप्त अथवा निर्माण करण्याचे अनेक मार्ग आज सहज त्याला अवगत आहेत. दुसरे म्हणजे त्याच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे दळण वळणाची सर्व साधने सहज उपलब्ध आहेत. त्याला सुंदरता काय याचे चांगले भान आहे, माणूस आज सुध्दा मोठ्या प्रमाणात माणुसकीने वागतांना दिसतो, त्याला स्वहिता पेक्षा जनहिता बाबत आज तरी संवेदना शिल्लक आहेत, सर्वात मोठे आशास्थान म्हणजे त्याच्याकडे संदेशवहन कार्यप्रणाली उत्तम आहे त्यामुळे नदीचे गत वैभव प्राप्त करणे आपल्या सारख्या माणसांना सहज शक्य आहे.
जेव्हा आपण नदीवर जातो व तेथील परिस्थिती न्याहाळतो तेव्हा किती सुंदर सुंदर विचार येतात. त्या नदीचे आपल्या जीवनातील महात्म्य लक्षात येते. कालचेच उदाहरण देतो पवना नदी पात्र व घाट स्वच्छता करताना काही जण पाण्यात तर काही काठावर काही जण कचरा वाहून नदी बाहेर रस्त्यावर उभ्या ठेवलेल्या कचरा गाडीत टाकण्यासाठी फेरे मारत होते तर काही जण गालावर डास चावला व त्यामुळे आलेल्या टपोऱ्या टेंगळाला खाजवत होते तर काहीजण हाताला खाज सुटली म्हणून हात खाजवीत कामाच्या ठिकाणी दिसत होते ही सर्व परिस्थिती असताना अचानक एक कार रस्त्यावर आली व थांबली, गाडीतून अगदी सुंदर साडी परिधान केलेली व शंृगार केलेली एक महिला खाली उतरली स्वत:ला तिने प्रथम आवरले व पुन्हा गाडीचा दरवाजा उघडला व एक सुंदर नवी कोरी अंदाजे दीड फुट उंचीची मूर्ती घेवून नदी घाटाच्या पायऱ्या उतरून सरळ नदीतील पाण्यापर्यंत आली व आम्ही काय करतो ते बघत बसली.
अर्थात आमच्या सोबत काही नदी प्रेमी महिला होत्या त्यांनी त्या महिलेस पाहिले व मला आवाज दिला - सर सर (मला चुकून माझे सोबती सर म्हणतात) त्या बाईला थांबवा व मी पण आज्ञेचे पालन केले. मी त्या महिलेस हाताने इशारा करून बोलाविले व विचारले की आपण काय करायला ह्या घाणेरड्या पाण्यात आला आहात ? माझ्या प्रश्नाचे उत्तर येण्या अगोदरच आमच्या रणरागीणींना तिला प्रश्न विचारणे सुरू केले. प्रश्न पहिला - ए बाई आज तू आंघोळ केली का ? हो ।। प्रश्न दुसरा - आंघोळ चांगल्या पाण्यात केली का ? गटाराच्या पाण्यात ? चांगल्या पाण्यात ।। तिसरा प्रश्न - ही मूर्ती तू पूजन करून भक्तिभावाने विसर्जन करण्यासाठी आलीस ना ? होय ।। चौथा प्रश्न - तू ह्या नदीच्या पाण्यात आंघोळ करशील का ? नाही ।। अरे जर ह्या पाण्यात आंघोळ करण्यास तयार नाही , तुला आंघोळ करायला चांगले पाणी हवे आहे पण तू तर तुझा देव ह्या नदीतील घाण पाण्यात बुडवायला निघालीस, अरे तुला काय वाटत नाही का मनाला ? कुठे फेडशील हे पाप.
पाप पुण्याचा पाढा जसा सुरू झाला तसा लगेच मी परत विषयात हस्तक्षेप केला व त्या महिलेस सांगितले की ताई ती मूर्ती तुम्ही मला दान करा किंवा समोर विसर्जन कुंड आहे त्या कुंडात पाणी नसल्याने त्या कुंडाच्या भिंतीवर ठेवा मी करेन त्या मूर्तीचे काय करायचे ते तुम्ही आता मूर्ती ठेवून परत जा. खरे पहाता त्या महिलेला एवढे ओशाळल्यासारखे झाले की ती आम्हा सर्वांना नमस्कार करून म्हणाली की मला सुध्दा पटत नाही अशा घाणेरड्या पाण्यात विसर्जन, पण घरातल्यांनी सांगितले म्हणून मी आले, मी माझ्यासाठी केलेले एक व्रत पूर्ण झाले व त्याची ही मूर्ती होती. मला खात्री आहे आज झालेला मूर्ती विसर्जनाचा प्रसंग ती महिला तिच्या परिवारात व तिच्या मैत्रिणी सोबत नक्कीच चघळणार व नदी महात्म्य पुन्हा चर्चेत येणार.
ह्या सर्व प्रसंगातून एकच लक्षात आले की आज भरपूर जनजागृती समाजात नदी संवर्धनाबाबत झालेली आहे व प्रत्येकाला आपल्या धार्मिक प्रथांमुळे डोळे झाकून काहीही करावे लागत आहे व जर आपण त्यांना पर्यायी व्यवस्था करून दिल्या तरच जनसमुदाय आपले जनजागरण आत्मसात करणार आहे म्हणून मी वारंवार व सातत्याने म्हणतो की आपण कृतीशील होणे गरजेचे आहे आपण सर्व जण कृतीशील झालो व नदीचा परिसर आपापसात विभागून घेवून आपण फक्त नदीचे पालक बनण्याचा प्रयत्न केला तर आपल्या नद्या एक वर्षात पूर्ववत होतील या बाबत खात्री आहे.
नदीचे पालकत्व म्हणजे मालकी हक्क नाही व मालकी नसल्याने कोणती ही कमाई नसणार हे विसरता कामा नये. दर वर्षी पावसाळा येतो नदी पावसाच्या पाण्याने नदी स्वच्छ होत असते व जर आपण इतर प्रदूषणापासून नदी मुक्त ठेवली तर पुढच्या दिवाळीला आपली नातवंडे अथवा तुम्ही स्वत: नदी पात्रात आंघोळीला जावू शकता हे स्वप्न नाही. ही सत्यकथा बनू शकते.
नदी बाबतीत विविध विचार प्रवाह आहेत पण ते फक्त चार भिंतीच्या आत बसणाऱ्यांचे. जरा या बाहेर व चला नदीवर व बोला, लिहा, मनन करा, डोके आपटा, थयथयाट करा, नाचा, बागडा व नंतर पहा आपले आरोग्य कसे ठणठणीत रहाते ते, कारण तुमच्या नदीवर येण्याने नदीचे आरोग्य सुधारणार व आपण सर्व आनंदी होणार याची खात्री आहे.
आपण आज सर्व जण डोळे असून अंध बनले आहोत कारण आपण नको तेवढ्या भौतिक सुखाच्या अपेक्षा बाळगण्याच्या हव्यासाचे बळी पडलो आहोत त्यामुळे नदी सारख्या जीवनदायी विषयाकडे अतिशय निष्काळजीपणाने पहात आहोत. पवना नदी पात्र स्वच्छतेचा कालचा प्रकार हे एक सुंदर उदाहरण ठरू शकेल जर त्या विषयाला आपण योग्य भावनेने व सकारात्मक प्रेरणेने हाताळले नाहीतर हा विषय फक्त पब्लिसिटी स्टंट ह्या आधुनिक विचार सरणीने हाताळला तर मात्र आपण सर्व नद्यांना काही वर्षात गटार रूपात पाहणार या बाबत खात्री आहे. आपण आपली विचार सरणी सुधारणे गरजेचे आहे व जे कोणी नदी विषयक मेहनत करीत असतील त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे अर्थात सर्वांची कृती उपयुक्त असेल असे नाही तर अशांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे प्रसंगी त्यांच्या वर टीका करणे हा आपला स्वभावगुण बदलावा लागेल तरच आपण नदी संवर्धन ही संकल्पना चांगल्या जोमाने पुढे नेवू शकतो.
निसर्गात निसर्ग निर्मित कोणतीही वस्तु मग ती वनस्पती असो अथवा जीव असो अथवा नैसर्गिक परिस्थिती ती नष्ट करण्याची यंत्रणा निसर्गाने स्वत: केली आहे प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा निश्चितच करून दिल्या आहेत त्यांना स्वत:ला वयोमान ठरवून दिलेले आहे. तेरड्याच्या फुलांना तीन दिवस तर माणसाला 100 वर्षे आयुमान दिले आहे. जैवविविधता विषयात विविध जीव व त्यांचे महत्व अभ्यासणे महत्वाचे आहे. प्रत्येक जीव कसा दुसऱ्याच्या उपयोगी येतो व कोणाचे भक्ष कोण आहे व शेवटी कोण हे पहाणे सुध्दा महत्वाचे आहे. नद्या मधील जैवविविधता पाहण्यात जो आनंद मिळतो तो म्हणजे स्वर्गसुख म्हणावे लागेल. नैसर्गिक पाणी शुध्दीकरण व त्यात सहभागी होणारे घटक आणि त्यात त्यांचे महत्व व अस्तित्व सुध्दा तपासणे महत्वाचे आहे. नाले स्वच्छ व जीवंत ठेवणे आपली जबाबदारी आहे व ह्या स्वच्छतेमध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे.
मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512