नद्यांचे स्वास्थ्य - भाग 1

Submitted by Hindi on Tue, 12/01/2015 - 12:48
Source
जल संवाद
(श्री. विकास पाटील हे पुणे शहरातील एक पर्यावरण तज्ज्ञ आहेत. पुणे जिल्हा पर्यावरण समिती (महाराष्ट्र राज्य) या समितीचे सदस्य आहेत. पुणे चिंचवड नगरपालिकेला सातत्याने आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारे एक जागरूक नागरिक आहेत. नद्यांचे स्वास्थ्य या विषयावर एक मालिका लिहिण्याचे त्यांनी मान्य केले असून या अंकापासून ती मालिका सुरू होत आहे. )

इंद्रायणी नदीची कथा अगदी अशीच आहे. उगमस्थान उध्वस्त, नदी पात्रात प्रचंड अतिक्रमणे, टाटा धरणात सर्वपाणी अडवून नदी पात्र कोरडे करण्याचे पाप, नागरी वस्तीतील मानवी मलमूत्र व उद्योगधंद्यातील प्रदूषित सांडपाणी, भरमसाठ वाळू उपसा, नदी च्या संवर्धनासाठी नक्की कोणाकडे जबाबदारी नसणे व याची भिन्नभिन्न उत्तरे अथवा निरूत्तरपणा आदी विषय फार महत्वाचे आहेत की जे आपण क्रमश: चर्चीले तरच आपण खोलवर जावून विचार मंथन होवू शकेल.

नद्या नाले यांची निर्मिती विश्वाच्या जन्मापासून झाली आहे व त्यामुळे त्यांच्या मूळ रूपाला मानव आज बदलू पहात असला तरी निसर्गच मानवावर अंतिम मात करणार यात शंका नाही. अर्थात ती मात कधी व कोणत्या स्वरूपाची असेल याचा अंदाज सर्व सामान्यांना आज तरी येणार नाही. मात्र पर्यावरण अभ्यासकांना त्याची चाहूल आज लागत आहे व त्यासाठी मानवाला मोठी किंमत मोजावी लागणार यांत शंका नाही. आपण मानवांनी नद्या नाले, हवा, जमीन या बाबत अतिशय संवेदनशील बनणे गरजेचे आहे. मानव जातीच्या जन्माच्या व त्याच्या विकसित रूपाची फार मोठी कथा प्रत्येकजण विविध रूपात व पध्दतीने रंगवून सांगू शकेल पण आपल्या नद्या व पाण्याचे स्त्रोत या बाबत आपण फार कमी बोलतो व जर बोललो तर प्रत्यक्ष कृती करण्यात आपण फारच मागे आहोत. उपदेश करणे व दुसऱ्याची निंदा अथवा टिका टिप्पणी करण्यात आपण स्वत:ला फार हुषार मानणारे आहोत व त्यामुळे आज आपल्या सर्व नद्या काही अनपेक्षित अति वाईट व अति अस्वच्छ रूपात आपण अनुभवत आहोत.

'नदी माझी माता', 'नदी माझे जीवन' हे सगळे विचार इतिहास जमा करणारे संवेदना हीन व हतबल असलेले आपण किंबहुना जीवंत मुरदाड मनुष्य प्राणी लवकरच विनाशाकडे पोहचणार आहेत हे भाकित वर्तविण्यासाठी जंगलातील अथवा घराच्या छपरावर वावरणाऱ्या माकडांनी वर्तवण्याची गरज नाही कारण ते आपणास उघड्या डोळ्याने दिसत आहे. हे विश्व संपणार नाही तर आपली ही मानवजात संपणार आहे.

आपण सर्वांना माहित असलेली व संतांच्या साहित्यात लाखो करोडो ठिकाणी उल्लेखलेल्या इंद्रायणी नदी बाबत आपण चर्चा करू. जी चर्चा इंद्रायणीची होणार तीच दुसऱ्या सर्व नद्यांची थोडीफार वेगळी फक्त भौगोलिक परिस्थिती बदलून होणार आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत कुरवंडे नावाच्या गावा जवळील जंगलात ही नदी उगम पावते ती सुध्दा एका प्रचंड मोठ्या खडकाच्या सुळक्याच्या पायथ्याशी की जो सुळका नागफणी नावाने सुप्रसिध्द आहे.

नदीचे मानवी जीवनाशी असलेले नाते नळ कोंडाळ्याच्या नळाचे पाणी पिणाऱ्या व बंद प्लास्टिक बाटल्यातील पाणी पिणाऱ्या मंडळीस काय समजणार ? नदी चा उगम कसा असतो असे विचारले तर मी म्हणेन की तो आपल्या डोळ्यातील असलेल्या ओलाव्या प्रमाणे असतो की जो माणसाच्या पूर्ण हयातील बारमाही ओलावा टिकून धरतो आणि कोणत्याही परिस्थितीत तो ओलावा कमी होत नाही अथवा आटत नाही तर एकंदरीत असा असतो नदीचा उगम. मग तो कधी एखाद्या दगडा खालून वाहतो तर कधी उंच ठिकाणाहून खोलदरीत थेट झेपावणारा असतो.

उगमाच्या ओलाव्यामुळे जवळपासची माती अथवा दगड ओले राहतात व त्या ओल्या मातीत जंगली खेकडे व त्यांचा मित्र परिवार त्या ओल्या जमिनीवर क्रिकेट खेळत असतात. हा क्रिकेटचा खेळच हे जंगली प्राणी अथवा जीव का खेळतात तर आज माणसाला म्हणजेच आपल्याला आज इतर खेळच माहिती नसल्याने ह्या आधुनिक जगाच्या ओळखीचा खेळ मुद्दाम घेतला आहे. त्या सुंदर रंगी बेरंगी खेकड्यांची दिवस भर खाद्याच्या शोधाची कसरत व मेहनत तेथे सुरू असते कारण उगमाच्या आजूबाजूच्या परिसरात झाडी झुडपे वाढलेली असतात व त्यामुळे मधमाश्या सारखे कीटक, पाणी पिण्यासाठी ह्या उगमावर येत असतात व आमची खेकडे मंडळी त्यांना भक्ष करून त्यांची शिकार करतात व जर हा मांसाहार मिळाला नाही तर नुकतेच उगवलेल्या गवताचे कोवळे हिरव्या पिवळ्या रंगाचे कोंब तोंडात कोंबून जसा आपण एखाद्या बरणीत कागदी बोळा कोंबतो अगदी त्या प्रकारे आधाश्या प्रमाणे ते गवताचे ओझे घेवून त्याच्या बिळात अथवा दगडाच्या कपारित सावकाश स्वत:च्या शरीराला कोणतीही इजा न पोहोचविता अर्थात आपली माणसाची चमडी बचाव सवयी प्रमाणे ते खाद्य स्वगृही पोहचवून परत बाहेर येवून त्यांचे आपल्या स्वयंपाक घरातील लाटण्याच्या आकारा सारखे फोल्डींगचे डोळे वटारून पुन्हा पूर्वीचा खेळ खेळताना दिसतात. खेकड्याला पाहून बेडूक मामा मात्र स्वत:ला अगदी सुरक्षित ठिकाणी जागा पकडून त्याच्या भक्षाची वाट पहात बसलेला असतो. तेवढ्यात जंगलातील एखादा पक्षी पाणी पिण्यासाठी गडबडीने तेथे येतो व पटकन त्या पाण्यात आंघोळ करून निघून जातो व जवळच्या झाडाच्या फांदीवर बसून अंग सुकविण्यात मग्न होताना बाकीचे विश्व आपल्या कडे बघत असेल याचे सुध्दा भान हरपलेला पक्षी कोणताही मेकप न करता भुर्रर्र उडून सुध्दा जातो. अशी सर्व उगमस्थानावरील मज्जा म्हणजे ही लहान मुलांची एक जंगल कथा वाटेल पण हीच खरी कथा आहे व त्या दृष्याला आपण मुकत चाललो आहोत.

नद्या उगम पावतात व त्या अखंड प्रवास करीत आजूबाजूला हिरवळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात प्रचंड वनराई जंगलांना पोसतात आणि ती जंगले पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवतात व त्यामुळे झऱ्यांची निर्मिती होते व असे असंख्य झरे छोटे छोटे झरे एकत्रित होवून नदीच्या प्रवाहाची सुरूवात होते.

नदीच्या प्रवाहाची सुरूवात होताच ती मानवाच्या फुकटचे लाभ व स्वामित्व लुटण्याच्या सवयींची शिकार बनते मग ती एखाद्या लहान मोठ्या धरणात अडकते अथवा मोठ्या शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी एखाद्या भल्या मोठ्या बंद पाईपमध्ये घुसविली जाते व मुक्त मनमुराद प्रवाहीपणा विसरते आणि ह्यामुळे नदी पात्राच्या शेजारचे शेतकरी मात्र त्यांच्या हक्काच्या पाण्याला वंचित होतात. शेवटी त्यांना सुध्दा पावसाच्या पाण्यावरच शेती करणे नशीबी आले आहे. नदीचा प्रवाहीपणा नाहीसा झाल्याने नद्या फक्त पावसाळ्यात तीन महिनेच वाहताना दिसतात अन्यथा नदी पात्रे रिकामी ओस पडलेली असतात त्यामुळे भरमसाठ प्रमाणात नदी पात्रात मानवी हस्तक्षेप होताना दिसतो आहे. वर्षाच्या 12 महिन्यातील इतर महिन्यात गावठी दारूच्या भट्ट्या ह्याच नद्यांच्या कोरड्या पात्रात जळतांना दिसतात व त्याच्या बाजूलाच मानवी देह सुध्दा जाळले जातात. माणूस मेला की त्याचे अंथरूण, पांघरूण व पायातील चपला सुध्दा नदी पात्रात टाकून देणारे आपण संस्कृतीच्या नावावर प्रत्येक प्रकारची घाण ह्या नदी पात्रात सोडत आहोत.

आज नद्या बाबत बोलतांना आपण स्वत:कडे कोणतीही जबाबदारी अथवा कर्तव्य आहेत हे सोयीस्कर विसरून फक्त दुसऱ्याने काय करावे याच्या मोठ्या अपेक्षा बाळगतो आहोत व त्यात अगदी. भारताच्या उत्तर दिशेचा तज्ज्ञ आपण आमंत्रित करतो व त्याच्या मागे फिरून त्याचे मत व टिप्पणी एका कानाने ऐकतो व त्याची पाठ फिरली की विसरून जातो पण स्थानिक पातळीवर धुमसणारी एखादी विझलेली वात आपण परत तेल घालून अथवा हाताने हवेची झुळुक अडवून तेजस्वी करण्याचे विसरून जातो त्यामुळे स्थानिक नदी प्रेमी मंडळी सुध्दा नदी प्रेमाची भाषा विसरून नदी ह्या सार्वजनिक मालमत्तेचे लचके तोडण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतांना दिसत आहेत.

नदीचा पुर्नजन्म करायचा म्हणजे नक्की काय करायचे तर त्या नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देणे, मग ते गत वैभव काय ? आपल्या बालपणा पासून नदीचे जे वर्णन आपण ऐकत आलो तेच तिचे नैसर्गिक रूप. आता ते अनुभवणे शक्य आहे का ? याबाबत आज आपली नकारात्मक मानसिकतेने आजारी पडलेली पिढी नाही म्हणून उत्तर देईल पण त्याचे खरे उत्तर आहे 'होय'. यासाठी आपण सर्व वाचकांनी थोडी थोडी आत्मियता दाखविणे गरजेचे आहे.

इंद्रायणी नदीची कथा अगदी अशीच आहे. उगमस्थान उध्वस्त, नदी पात्रात प्रचंड अतिक्रमणे, टाटा धरणात सर्वपाणी अडवून नदी पात्र कोरडे करण्याचे पाप, नागरी वस्तीतील मानवी मलमूत्र व उद्योगधंद्यातील प्रदूषित सांडपाणी, भरमसाठ वाळू उपसा, नदी च्या संवर्धनासाठी नक्की कोणाकडे जबाबदारी नसणे व याची भिन्नभिन्न उत्तरे अथवा निरूत्तरपणा आदी विषय फार महत्वाचे आहेत की जे आपण क्रमश: चर्चीले तरच आपण खोलवर जावून विचार मंथन होवू शकेल.

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512