नदी गतवैभवाची अपेक्षा - भाग 12

Submitted by Hindi on Sat, 06/04/2016 - 16:18
Source
जल संवाद

नदी विषय म्हणजे आज गंभीर समस्या असून सुध्दा आमच्या साहित्य संमेलनात महिलेचे रूप व तिचे अविष्कार ह्याच विषयावर आमचे कवी लेखक पुस्तके भरून लिखाण करीत असतात आढळले आहे. साहित्य संमेलनात नदी गत वैभव सोडाच नदीचे आज रूप या विषयाला कोणीही हाताळतांना दिसत नाही.

मागील संपूर्ण वर्षभर आपण ह्या विषयावर विचार मंथन केले व त्यात काही बुध्दीवादी मंडळीने त्यांचे विचार स्पष्ट केले त्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद देतो, अर्थात काहींनी त्यातून टीका केली असेल अथवा सूचना किंवा प्रस्ताव मांडले असतील ते सर्व आपल्या विषयाला पुरकच ठरणार आहेत, त्यांना सुध्दा धन्यवाद.

नद्यांचे गतवैभव प्रत्येकाने अनुभवले आहे त्यामुळे ती स्थिती पुन्हा आणू शकण्याबाबत प्रयत्नशील राहिलो तर त्यात वाईट काय आहे ? पाणी हा प्रश्‍न बिकट नाही कारण पृथ्वीवर पाणी खूप आहे पण पिण्यायोग्य अथवा मानवाच्या व सजीवांच्या गरजा भागविण्याच्या योग्यतेचे पाणी नदीच आपणास देत आली आहे म्हणून नद्यांना आधुनिक रूपात परावर्तीत करण्यापेक्षा त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या विचारांना ताकद देणे गरजेचे आहे.

भारत सरकारच्या नदी सुधार योजनेचे नाव जरी नदी सुधार असले तरी त्या मागील हेतू मात्र ‘नदी संवर्धन’ हाच असावा व जर नसेल तर आपण तो सरकार समोर मांडणे अतिशय महत्वाचे आहे. पुण्याच्या नदीच्या सुधारणे साठी जपान मधील कंपनी ९९० कोटी गुंतवणार व नंतर आपल्याच डोक्यावर कर रूपाने ते एक कर्ज थोपविणार आहे. त्यातील कर्ज विषय आपण बाजूला ठेवू व एवढाच विचार करू की आपण काय चुकलो आहोत हे जपानी मंडळीने अभ्यासले आहे ते म्हणजे पुण्यातील मंडळी कडे ज्ञान आहे व ही ज्ञानी मंडळी विकत घेणे सोपे आहे म्हणून ह्यांना विकत घेतले व त्यांच्या कडून खर्‍या समस्या समजावून घेतल्या तर फक्त मॅनेजरचा रोल निभावून जपानची ‘जायकी’ कंपनी हे करणार आहे.

आपल्या समस्या अथवा आपल्या सवयी ह्यांचे भांडवल करून त्यावर ही जायका कंपनी धंदा करणार आहे व आपण जे काही तत्वज्ञान मांडतो आहोत किंवा व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते निव्वळ टाईमपास कट्टा बनणार आहे. पुण्यात नदी काठी विविध झाडे लावण्याची मोहीम म्हणजे नद्यांचे गतवैभव व ही मोहीम आपण हाती घेताना आता समस्या उभी राहते की लावलेली झाडे जायकी प्रकल्पात उपटून / उखडून फेकून दिली जाणार व आमच्या प्रयत्नांना पुन्हा तिलांजली दिली जाणार आहे.

आपण जायका सोबत जावून सुध्दा नदीचे गतवैभव प्राप्त करू शकतो पण त्यासाठी जायका चा प्रकल्प पूर्ण अभ्यासणे अतिशय महत्वाचे व आवश्यक आहे. नदीवर भरमसाठ सिमेंट बांधकाम करून नदीचे रूप बदलेल पण नदीतील पाण्याची गुणवत्ता व नैसर्गिक पाणी शुध्दीकरण प्रक्रिया या बाबत विचार होणे सुध्दा गरजेचे आहे.

जलसंवाद ह्या वैचारिक बैठकीच्या अंकाच्या सर्व वाचकांना विनंती आहे की प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी द्यावी, सर्वांची मते सर्वांना आवडणार नाहीत कारण आपण प्रत्येक जण निरनिराळ्या अनुभवातून प्रवास केला आहे व आपल्या मागे निरनिराळी वलये निर्माण झालेली आहे. मला तरी अगदी स्पष्ट पणे व्यक्त करावेसे वाटते की बोलणे व कृती करणे हे एकाच वेगाने असणे गरजेचे आहे. त्यातील कृती न करणार्‍या मंडळीने कृपा करून कृतीशील विषयाला थोडीफार मुभा दिली पाहिते. कारण कृती करतांना क्षमते नुसार चुका होणारच आहेत व त्या पोटात घेवून त्यांना त्यांच्या श्रमाचे श्रेय देणे गरजेचे आहे.

नदी विषयावर आज विद्वान मंडळीने बाजार मांडला आहे. पूर्वी हे होत नव्हते त्यामुळे मी असे विचार मांडतो की नदी गतवैभवाच्या प्रक्रियेत विद्वानांनी सुध्दा गतवैभवाप्रमाणे भाष्य करावे व ह्या संकल्पनेत सहभागी व्हावे. आणि ही आजची गरज आहे. प्रत्येक विद्वानाने स्वत:ला प्रश्‍न विचारावा की मी नदी प्रदूषणात सहभाही आहे किंवा नाही ? उत्तर सांगू नका पण त्या बाबत चिंतन तरी करावे ही अपेक्षा.

नदीचे गतवैभव ह्या विषयात आपणास निसर्गाकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत तर आपल्या जीवनशैलीत व हवरेपणाच्या सवयी मध्ये बदल करावयाचे आहेत. अर्थात त्या बदला साठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात सर्वात प्रथम करण्यायोग्य आहे ते स्वत:च्या कृतीशील प्रयत्नांवर विश्वास ठेवणे व दुसर्‍यांना प्रोत्साहन देणे. पुण्यात नदीचे संवर्धन होणार व पुण्याच्या वरच्या भागातील मंडळीने म्हणजे नागरिकांनी ह्या विषयापासून दूर राहणे हे परवडणारे नाही म्हणून प्रत्येक नदी ही उगमापासून तपासणे गरजेचे आहे. नदीच्या विषयात निर्माण झालेले सर्व दोष दूर करणे व त्या दोषांना पर्यायी उपाय देण्यापेक्षा ती समस्या दोष मुक्त करण्याच्या मानसिकतेस खतपाणी घालणे गरजेचे आहे. फक्त चिमटे काढणे अथवा फोडणी देवून विषय तापविणे किंवा शिजवणे पध्दत बंद होणे गरजेचे आहे.

आपण सर्वसामान्य माणसाने नदीच्या संवर्धनासाठी करण्यासारख्या व प्रशासकीय यंत्रणेने करावयाच्या बाबी व्यवस्थित पणे व स्प्ष्टपणे मांडल्या पाहिजेत व त्यांचा कार्यावधी ठरविला पाहिजे पण त्या पध्दतीने गंभीरतेने कोणीही त्या विषयाकडे वेळ देत नाही व तसे अद्याप घडले सुध्दा नाही.

पुण्यातील सर्व ज्ञानी माणसांनी त्यांची मते मांडली व ती मते जर तपासली तर त्यात खूप सुंदर कल्पना व सूचना प्राप्त होतील व आपण त्या प्रमाणे जर प्रशासनास दबाव आणला तर प्रशासन लोकांच्या दाबवाखाली ‘जायकाचे’ प्रकल्प राबविण्यापेक्षा ‘पुणेरी’ प्रकल्प राबविले जातील हे एकदम सत्य आहे.

मी नदीत कचरा टाकणार नाही, मी नदी स्वच्छ ठेवेन, दर रविवारी नदीवर जावून येईन, नदीत प्रदूषण करणार्‍याला दंड व समज देवू, आदी चांगले विचार प्रत्यक्षात नावारूपाला येण्यासाठी आवश्यक आहे ती नागरिकांची मानसिकता. आज प्रत्येकाला नदी बाबत लिहायचे आहे, बोलायचे आहे व त्यातून नदी प्रेम व्यक्त करायचे आहे पण प्रत्यक्षात काहीच करीत नसल्याची कबुली देणे महत्वाचे आहे. लेखात शास्त्रीय लिहिणे फार सोपे आहे पण प्रत्यक्षात नदीच्या पात्रात अथवा काठावर उभे राहून तेथील एक काडी इकडची तिकडे करण्याची क्षमता आपली लोपली आहे.

आपल्या सभोवताली काय चालले आहे याची विचारपूस सुध्दा आपण करीत नाही. घाण वास आला म्हणून नाकावर रूमाल लावून आपण पळ काढतो पण ती दुर्गंधी का व कोण निर्माण करीत आहे याचा शोध व पाठपुरावा करण्याची प्रवृत्ती आपल्यात नाही. प्रत्येक ठिकाणी मी कशाला नाक खुपसायचे असा साधा विचार मनात आपण जन्माला घालतो व ह्या विषयाला दृष्टीआड करीत आहोत.

आपल्या शहरातील सर्व नद्यांच्या आजूबाजूला पाणथळी असायची पण आता ती सुध्दा संपुष्टात आले आहेत. ही पाणथळी म्हणजे विविध प्राणी, पक्षी व वनस्पती यांचे गोडाऊन असायचे. त्यात अनेक जीव जन्म घ्यायचे व नदीच्या इतिहासाचे ते एक संदर्भ ग्रंथ म्हणून काम करायचे पण आता आपणास ती पहावयास मिळत नाहीत.

अशा ठिकाणी पृथ्वीच्या अनेक भागातून विविध पक्षी विशिष्ट हंगामात हजर व्हायचे व न सांगता पुन्हा परत जायचे त्यामुळे पक्षांचे पर्यटन व्हायचे त्यातून जैवविविधतेला भक्कम अशी साथ मिळत होती. आज अशा ठिकाणांचा र्‍हास झाला आहे व तो आपणच केला आहे.

नदी विषय म्हणजे आज गंभीर समस्या असून सुध्दा आमच्या साहित्य संमेलनात महिलेचे रूप व तिचे अविष्कार ह्याच विषयावर आमचे कवी लेखक पुस्तके भरून लिखाण करीत असतात आढळले आहे. साहित्य संमेलनात नदी गत वैभव सोडाच नदीचे आज रूप या विषयाला कोणीही हाताळतांना दिसत नाही. जी काही वाक्य चुकून कोणी उच्चारली असतील ती अनवधानानेच म्हणावी लागतील त्या साठी कोणी दाद सुध्दा दिली नसेल.

मी माझ्या कडून योगदान म्हणून नदी विषयक असणारे सर्व विषय संबंधीत प्रशासनास कळविण्याची जबाबदारी स्विकारली आहे. काही दिवसांपूर्वी बाणेर भागातून वहात येणारे सांडपाणी कोणतीही शुध्दीकरण प्रक्रिया न करताच मुळा नदीत सोडले होते त्याचे मी फोटो काढून मा. आयुक्त पुणे महानगरपालिका यांना पाठ़िवले व पाठपुरावा केला. अंतिम मला समाधान मिळाले की तो नाला आता कोरडा आहे, त्यातून एकही थेंब सांडपाणी नदीत थेट मिसळत नाही अशी खूप उदाहरणे आहेत की जेथे स्थानिक प्रशासन योग्य पध्दतीने जनहिताच्या कामांना प्राधान्य देते.

आपण सर्वांनी हा प्रयोग केलात तर आपले स्थानिक प्रशासन किंवा शासन आपल्या समस्यांची योग्य नोंद घेते, जरी हे प्रत्यक्षात अवघड व अशक्य वाटले तरी मला व माझ्या असंख्य मित्रांना त्याबाबत आशादायी चित्र पहावयास मिळत आहे. आपणास मी विनंती करेन की आपण स्वत: नदीवर जा व १५ मिनिटे तिच्या भग्न चित्राचे अवलोकन करा आणि ठरवा काय करता येईल ह्या नदीच्या गतवैभवास प्राप्त करण्यासाठी.

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे, मो : ०७७९८८११५१२