नद्यांचे स्वास्थ्य - भाग 2

Submitted by Hindi on Tue, 12/01/2015 - 15:07
Source
जल संवाद

कोणत्याही नदीच्या उगमाची आजची खिन्न अवस्था पाहता आपल्या लक्षात येईल की आज सर्वच नद्यांची अवस्था वाईट बनली आहे ह्या अवस्थेस जबाबदार आपली प्रशासकीय, शासकीय आणि राजकीय मंडळींच्या मनातील नदी बाबतची अनास्था व अपरिपक्व विचारधारा. ह्या अविवेकी विकास योजनेतून आपण स्वत:चा कसा ऱ्हास करीत आहोत याचे अनुभवलेले उदाहरण म्हणजे इंद्रायणी नदी जी सह्याद्रीतून वाहते व देहू आळंदी ह्या संतांच्या पावन जन्मभूमीचा प्रवास करून स्वत:

कोणत्याही नदीच्या उगमाची आजची खिन्न अवस्था पाहता आपल्या लक्षात येईल की आज सर्वच नद्यांची अवस्था वाईट बनली आहे ह्या अवस्थेस जबाबदार आपली प्रशासकीय, शासकीय आणि राजकीय मंडळींच्या मनातील नदी बाबतची अनास्था व अपरिपक्व विचारधारा. ह्या अविवेकी विकास योजनेतून आपण स्वत:चा कसा ऱ्हास करीत आहोत याचे अनुभवलेले उदाहरण म्हणजे इंद्रायणी नदी जी सह्याद्रीतून वाहते व देहू आळंदी ह्या संतांच्या पावन जन्मभूमीचा प्रवास करून स्वत: गटारगंगा बनून व घातक रसायने मिश्रीत मलिन होवून तुळापुरला मुळा, मुठा व भिमा संगमात भिमा नदीच्या पात्रात लुप्त होवून भिमेचे पाणी प्रदूषित करते.

आज इंद्रायणी नदीत जे पाणी आपणास पावसाळ्या व्यतिरिक्त इतर दिवशी दिसते ते इंद्रायणी नदीचे मुळी नाहीच आहे कारण त्या नदीचे सर्व पाणी टाटा धरणात लोणावळ्यात अडविले आहे व एक थेंब पाणी सुध्दा धरणातून सोडण्याची व्यवस्था आज अस्तित्वात नाही. धरण बांधतांना सरकारी नियमाप्रमाणे इतर धरणांना असलेला अनिवार्य नियम म्हणजे एक ठराविक पाण्याचा साठा वर्षभर त्या धरणाखालील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिक उत्पादनासाठी निसर्ग होणे गरजेचे असते पण टाटा धरणाबाबत हे नियम गुंडाळून ठेवल्या सारखी परिस्थिती आज मागील दहा वर्षांपासून निर्माण झाली आहे. अर्थात ही परिस्थिती आपल्या राजकीय भ्रष्टाचारातून निर्माण झालेली आहे. या धरणाच्या भिंतीच्या मध्यावर खाली दोन झडपांची सोय केलेली आहे व ज्यामधून ठराविक पाणी साठा विसर्ग यापूर्वी होत होता आणि नदीचे पात्र बारमाही प्रवाही रहात होते. नदीच्या निळ्या रेषेमध्ये पाणी नेहमी असायचे पण त्यामुळे नदी पात्रात मानवी हस्तक्षेप कमी व्हायचा.

आज लोणावळा शहरातील जागांच्या किंमती व शहराचे पर्यटनासाठीचे महत्व पाहता बिल्डर लॉबी व स्थानिक राजकारणी मंडळींने डाव साधला व धरणाच्या झडपा कश्या बंद होतील याची समीकरणे मांडून टाटा पॉवर सोबत आर्थिक मांडवल्या करून नदी पात्र कोरडे केले व नदी पात्रात म्हाडा सारख्या शासनाच्या घर बांधणी प्रकल्पांची उभारणी चा घाट घालण्यात आला. एवढेच नाही तर आज त्या धरणातून एक थेंब सुध्दा पाणी सोडले जात नाही व धरण इतके मजबूत आहे की त्यातून पाणी गळती हा विषयच नाही त्यामुळे आपणास इंद्रायणी नदीत जे दिसते अथवा लोणावळा शहरात असणारे नदी पात्र म्हणजे लोणावळ्यात रहाणाऱ्या नगारिकांचे निर्माण झालेले सांडपाणी व मानवी मलमूत्र वाहून नेणारे गटार बनले आहे तरी पण भक्ती भावे वारकरी त्या नदीला आज पण पवित्र व पावन नदी मानतात. ह्या धरणाला भूशी धरण नावाने संबोधले जाते. येथील सर्व पाणी वीज निर्मितीसाठी वापरात येते व त्याच लोणावळ्यातील जनतेस वळवण धरणाचे पाणी पिण्यासाठी पुरविले जाते अर्थात ह्या मागची परिस्थिती अभ्यासता असेच लक्षात येईल की आंधळा दळतोय व कुत्र पीठ खातोय.

नदीमध्ये प्रचंड प्रमाणात घन कचरा लोणावळा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सुध्दा टाकला जातो व ह्या घन कचऱ्याच्या विघटणापेक्षा तो कचरा नदी पात्रात लपविण्याचा प्रयत्न जास्त होतांना दिसत आहे. नदी पात्रात अतिक्रमण हा विषय तर एक स्पर्धेचा विषय बनला आहे. आपल्या ह्या इंद्रायणी नदीत मानवी मलमूत्र व घन कचरा टाकणारे लोणावळा प्रशासन नदीच्या उगमा पासूनच बेदखल प्रवृत्तीचे शिकार बनले आहेत. ही नदी लोणावळा सोडताना रेल्वे लाईनच्या खालून घुसते व त्या ठिकाणच्या विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे लोणावळा बाजूस प्रचंड प्रमाणात प्रदूषित पाण्याचा साठा बनला आहे व तो अतिशय घाणेरडा साठाच आपणास नदीच्या दुर्दशेचे दर्शन घडवितो.

ही गटार गंगा नदी अगदी संथ पणे लोणावळा सोडते व पुढचा प्रवास सुरू करते. लोणावळा परिसर सोडला की माळरानावरून नदी वाहताना मानवी मलमूत्र व सांडपाणी याच्यावर निसर्गच शुध्दीकरणाची प्रक्रिया करतो व ते मलमूत्राचे पाणी परत थोड्या अंतरावर पुन्हा प्राण्यांना पिण्यायोग्य व शेतीसाठी उपयुक्त बनते त्याचा फायदा नदी पात्रा नजदिकचे शेतकरी व विट निर्मिती साठी करतात व तो त्या शेतकऱ्यांचा जोड धंदा म्हणा अथवा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून बनला आहे. व ह्या अमर्याद व विना निर्बंध पाणी उपश्यानंतर पात्रात पाणीच उरत नाही व परत पात्र कोरडे दिसू लागते.

सह्याद्री पर्वत रांगा मध्ये दुसऱ्या अनेक छोट्या नद्या उगम पावतात व त्या सर्व थोड्या थोड्या अंतरावर इंद्रायणी नदीस मिळत आहेत व त्यामात्र स्वच्छ व सुंदर पाणी घेवून इंद्रायणीस मिळताना आढळतात अर्थात तेच पाणी शेवट पर्यंत येते. यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखी उपनदी म्हणून आपण कुंडली नदी कामशेत च्या जवळपास येवून मिळते पण त्या आगोदर अंगणगाव, भाजेलेणी या परिसरातील अनेक जीवंत झरे बारमाही वाहते आहेत व ते कार्ला परिसरात नदीच्या उजव्या बाजूने येवून मिळतात व एकविरा डोंगराच्या बाजूने काही असेच बारमाही वाहणारे नाले इंद्रायणीस पाणी पुरवित असतात.

कार्ल्याच्या परिसरात इंद्रायणी नदीवरचा पहिला कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा (के.टी.विअर) अस्तित्वात आहे व त्या बंधाऱ्यास अजून तरी प्रदूषणाचा फटका बसला नाही त्यामुळे नदीचे मूळ रूपाचे दर्शन कार्ला परिसरात आज सुध्दा अनुभवण्यास मिळते. त्याच पुढे काही अंतरावर इंद्रायणीवर दुसरा कोल्हापुरी पध्दती बंधारा (के.टी.वेअर) मळवली येथे आहे त्यामुळे ह्या दोन बंधाऱ्यांच्या मध्ये जलाशयात जैवविविधता आज सुध्दा बऱ्यापैकी अबाधित आहे असे म्हणताना आनंद होतो. ह्या मळवली च्या बंधाऱ्या अगोदर कार्ला भागातून खुपसे पाणी ह्या इंद्रायणी नदी पात्रात येवून मिळते त्यानंतर टाकवे बंधारा आहे जो सुध्दा कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा (के.टी.वेअर) आहे त्याच्या अगोदर शिलाटणे व नदीच्या उजव्या बाजूने पाटण ह्या परिसरातील पाणी येते. त्या नंतर पिपळोली बंधारा जो सुध्दा कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा (के.टी.विअर) आहे.

टाकवे व पिपळोली हे बंधारे अगदी जवळजवळ असल्याने नदीचा प्रवाह 90 अंशाने उजव्या बाजूला वळला आहे व हेच खरे सौंदर्य नदीचे पाहण्याजोगे आहे. ही नदी अचानक अशी वळते त्यामागील निसर्गाची योजना काय असावी हे अभ्यासणे मानवाच्या बुध्दीला आवाहन आहे. टाटा टॉली बंधारा सुध्दा त्या टाकवे परिसरातच आहे. ह्या परिसरातून मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीच्या पात्रात पाणी झिरपत असते कारण वडीवळे कालव्याचा उजवा कालवा टाकवे परिसराच्या शेतीला मुबलक पाणी पुरवित आहे त्यामुळे तो परिसर एक सुंदर परिसर बनला आहे हे सर्व नदीच्या मूळ रूपात कोणतेही बदल न केल्याने शक्य झाले आहे.

नदी प्रवाहात मानवी हस्तक्षेप कमी केल्याने नदीतील उपलब्ध पाणी साठा गुणवत्ता व निसर्गाबाबत समाधानी चित्र आहे. त्यानंतर पाथरगाव बंधारा जो सुध्दा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा (के.टी.विअर) आहे व त्या बंधाऱ्याचा फक्त पाणी साठा हाच उद्देश दिसून येतो. त्यानंतर आहे कामशेत बंधारा जो सुध्दा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. ह्या बंधाऱ्याची उपयुक्तता पाहता नागरी पाणी पुरवठा ह्या एकाच अपेक्षेने हा बंधारा असावा असे जाणवते. कामशेत नंतर मात्र ह्या नदीत दुसरी उपनदी विलीन होते ती आहे कुंडली नदी.

कुंडली नदी जरी लांबीला कमी असली तरी हीच खरी इंद्रायणी नदीची लाज राखणारी व पाणी पुरवीणारी पर्यायी सोय म्हणावी लागणार व तसे बोलणे सुध्दा योग्यच ठरेल. जांभवली, धोरण, शिरदे आणि वळवणती ह्या परिसरातून जीवंत झऱ्यांचे पाणी सोमवाडी तलावात जमा होते व त्या तलावात नेहमी सदैव पाणी झऱ्यांच्या रूपाने उपलब्ध होत असते. त्यामुळे निसर्ग सदैव या परिसरात प्रसन्न असतो.

सोमवाडी तलावावर वडीवळे या गावी वडीवळे धरण व याच प्रकल्पातून शेतीसाठी सिंचन प्रकल्प तयार केला आहे उजवा कालवा व डावा कालवा असे दोन कालवे तयार झाले आहेत त्यामुळे पाण्याचे वाटप शेतीसाठी उजवा कालवा अंतर्गत कार्ला पासून वेल्होळी व डाव्या अंतर्गत पारवडी ते वडीवळे ह्या परिसरातील सर्व गावांना फायदा होत आहे. हीच खरी नदीची किमया आहे.

कुंडली नदीचा दुसरा उगम शिरवटा धरणातून होतो. शिरवटा धरण हे एक मोठे धरण आहे त्याच्या विसर्गातून बाहेर आलेले पाणी कुंडली नदीला वर्षभर तुडुंब ठेवण्यात यशस्वी होत आहे. कुंडली नदीवर परत दोन ठिकाणी कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे आहेत. त्यापैकी एक आहे सांगीसे बंधारा व दुसरा बुधवडी बंधारा ह्या साठ्यामुळे देहू आळंदी मध्ये साजरे होणारे वारकऱ्यांचे अनेक धार्मिक सोहळे व त्यासाठी आवश्यक नदी पात्रातील पाण्याची पातळी सांभाळली जाते. थोडक्यात वारकऱ्यांना आवश्यक पाणी नदीत वडवीळे धरणातून सोडले जाते.

कुंडली नदी ही अगदी महत्वाची भूमिका निभावत असताना सुध्दा एकही वारकरी त्या नदीचे गुणगान गात नाही किंबहुना कित्येकांना माहिती सुध्दा नसेल की कुंडली नावाची नदी मुळेच इंद्रायणी नदीचे अस्तित्व टिकून आहे. अर्थात मानव जातीचे हे वैशिष्ट्यच आहे की ज्याला महत्व द्यावयास हवे तो वंचित राहतो व पुढेपुढे करणारे व स्वत:ला बाजारात विकू शकणारेच ह्या जगात प्रकाशात राहतात. ही नदी कामशेत व खडकाळे ह्या दोन कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या मध्यावर इंद्रायणी नदीला मिळते व त्या ठिकाणी इंद्रायणी नदीची भव्यता जाणवायला लागते. ही भव्यता काय असते ? ते अनुभवण्यासाठी पावसाच्या दिवसात सप्टेंबर महिन्यात कधीही आपण भेट देवू शकतो.

कुंडली नदीचे पाणी प्रदूषण विरहित व स्वच्छ मागील पाच वर्षापूर्वी होते पण आता ते पाणी पण काही प्रमाणात प्रदूषित होवू लागले आहे कारण वडविळे सिंचन प्रकल्पाच्या पाण्याची विपुलता लक्षात घेवून सर्व व्यावसायीक शेतकरी पारंपारिक शेती सोडून देवून ग्रिन पाऊस सारखी महागडी शेती करू लागले आहेत त्यामुळे त्यातून बाहेर पडणारे घातक रसायनयुक्त व रासायनिक खते मिश्रीत सांडपाणी हळूहळू नदीपर्यंत पोहचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज प्रदूषणाची मात्रा जरी ह्या परिसरात कमी असली तरी प्रदूषण शेती मुळे सुरू झाले आहेच.

खडकाळे बंधारा, नानोली बंधारा, पारवाडी बंधारा 1 व पारवाडी बंधारा 2 ह्या चार कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या पाण्याचा वापर जास्त करून शेतीसाठी होतांना दिसतो व यामुळे नदीच्या पात्रात अतिक्रमण हा विषय आटोक्यात आहे. आपण वडगाव पासून नागरी वसाहती नदीच्या पात्राच्या अगदी शेजारी म्हणजे पात्राला बिलगून विकसित करण्याच्या मोहात पडलो व घनकचरा नदी पात्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात जातांना दिसत आहे त्यासोबत मानवी मलमूत्र कोणतीही शुध्दीकरणाची प्रक्रिया न करता थेट व बेधडक नदी पात्रात सोडतांना कोणतीही संवेदना मानवास होतांना दिसत नाही थोडक्यात नदी प्रदूषण नियंत्रण करण्याकामी आम्ही संवेदन हीन बनलो आहोत व आपण डोळे असूनसुध्दा अंध बनत चाललो आहोत.

इंद्रायणी नदीला नाव का ठेवले असेल याचे उत्तर पाहिजे असेल तर आपणास कित्येक वर्ष म्हणजे अंदाजे भूशी धरण (टाटा धरण) बनण्या आगोदरची इंद्रायणी नदीची बारमाही प्रवाही पणाची सवय कराणीभूत असावी.

भूशी धरण व त्या मागील धनदांडग्यांची दांभिकता हा जरी आपला आजचा लेखाचा विषय नसला तरी तो नदी च्या गत वैभवातील कळीचा मुद्दा नक्कीच आहे. आज आपण आपल्या ह्या लेखाच्या दुसऱ्या भागात फक्त नदी समजून घेण्यात वडगाव पर्यंत पोहचलो आहोत आता या पुढचा प्रवास म्हणजे नदी प्रदूषणाची गंभीर समस्या व त्या समस्येकडे पाहण्याची मानवाची संवेदनहीन प्रवृत्ती.

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512