Source
जल संवाद
नदीचे गतवैभव प्राप्त करणे हे काही अवघड नाही पण त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय मानसिकता व आम नागरिकांच्या मनात तशी प्रामाणिक भावना निर्माण होणे गरजेचे आहे. प्रामाणिक भावना ही संकल्पना विकत मिळणारी वस्तु नाही तर ही प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण होणारी विषयाबाबत आपलेपणाची भावना आहे जो पर्यंत आपण आपल्या सभोवतालच्या नदी नाल्यावर प्रेम करणार नाही व तेथील जीव जंतुंना अथवा जनजीवनाबाबत प्रेम व्यक्त करणार नाही तो पर्यंत आपण फक्त ह्या संकल्पनेबाबत चर्चाच करीत राहणार आहोत.
नदीचे गतवैभव प्राप्त करणे हे काही अवघड नाही पण त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय मानसिकता व आम नागरिकांच्या मनात तशी प्रामाणिक भावना निर्माण होणे गरजेचे आहे. प्रामाणिक भावना ही संकल्पना विकत मिळणारी वस्तु नाही तर ही प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण होणारी विषयाबाबत आपलेपणाची भावना आहे जो पर्यंत आपण आपल्या सभोवतालच्या नदी नाल्यावर प्रेम करणार नाही व तेथील जीव जंतुंना अथवा जनजीवनाबाबत प्रेम व्यक्त करणार नाही तो पर्यंत आपण फक्त ह्या संकल्पनेबाबत चर्चाच करीत राहणार आहोत. खरे पाहता आज निसर्गाच्या जलचक्रात झालेला बदल लक्षात घेवून आता नदी नाले वाचविणे क्रमप्राप्त बनले आहे.सत्तेत असलेले सरकार स्वत:ची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी निरनिराळ्या कायद्यांना जन्म देणे अथवा त्यात बदल करणे हा राजकीय खेळ खेळत असते पण त्याचे दूरगामी होणारे विपरित परिणामांचा विचार करण्यासाठी नागरिकांनी सतर्कता दर्शविणे गरजेचे आहे, ते होतांना आज तरी दिसत नाही. आरआरझेड सारखे कायदे रद्द होणे हे याचे बोलके उदाहरण आपणास नजरेआड करता येणार नाही.
निमित्त कोणतेही असो आपण नदी नाल्यांच्या पात्रापर्यंत पोहोचून तेथील जैवविविधता अभ्यासणे व तपासणे आणि नदी संवर्धन कार्यात पुढाकार दर्शविणे अथवा स्थानिक समस्यांचा अभ्यास करून त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नजरेस ती बाब आणून देणे गरजेचे आहे आणि हा पुढाकार आपण स्वत: घेणे गरजेचे आहे. मला कल्पना आहे की त्यामुळे थोडे वाद व श्रेय लाटण्यासाठी स्पर्धा सुध्दा होणे अपेक्षित आहे पण त्या सर्व समस्यांना व्यवस्थित हाताळून आपल्या नद्या वाचविणे आपले अंतिम ध्येय असणे गरजेचे आहे. श्रेय लाटण्यासाठी राजकीय मंडळी बोक्याप्रमाणे टपून जरी असली तरी आपण काही क्षणापुरते समजदार बनून त्या बाबत दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.
पिंपरी चिंचवड शहरात तीन नद्या व पुण्यात दोन नद्या आहेत. त्यातील पवना नदी म्हणजे राजकारणी मंडळीस आर्थिक लुटालुट करण्याची संधी देणारी नदी आहे असे पवना सुधार या योजनेवरून तरी वाटते तर इंद्रायणी नदी ही राजकारण्यांच्या हस्तकांना मलीदा पुरविणारी नदी ठरली आहे. पुण्यातील राम नदी तर जवळ जवळ बूजवूनच टाकली आहे, तीच गत आज मुळा नदीची आहे. पुणे महानगर पालिकेची बाणेर मधील गटारे व म्हाळुंगा ग्रामपंचायतीची थेट मानवी मलमूत्र सोडण्याची गटार गंगा ठरली आहे. म्हाळुंगे ग्रामपंचायतीकडे मलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक ताकद नाही म्हणून नागरी वस्तीतील सर्व मानवी मलमूत्र व सांडपाणी कोणतेही शुध्दीकरण न करता नदी पात्राच्या मध्यापर्यंत जमिनीखालून टाकलेल्या मलवाहिनीतून सोडले जाते ही वाहिनी गाडण्याचा व त्यातून मानवी मैला नदीत सोडण्याचा शहाणपणा (मूर्खपणा) केला गेला आहेच सोबत त्या प्रकाराबाबत चर्चा होवू नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या पुणे विभागाने पुढाकार घेवून प्रकरण दाबून टाकले आहे.
आर्थिक पत पुरविण्यामधील कमतरता बाबतीत कारणे सांगून नदी प्रदूषण वाढवित आहोत. आज नदी प्रदूषण वाढल्याने पिंपरी चिंचवड शहरात 50 पेक्षा जास्त बाटली बंद पाण्याचे उद्योग उभे राहीले आहेत व नागरिकांच्या खिश्यातून अफाट पैसा ओरबाडून घेत आहेत. ह्याचा सर्व फटका आम नागरिकांना बसत आहे व त्यांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे, खरे पाहता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या पुणे विभाग यांच्या अधिकाऱ्यांवर पोलीस खटले नोंदविणे गरजेचे आहे पण तसे होत नाही उलट तक्रारकर्त्यांना दमदाटी अथवा खूनासारख्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे हे आपण सर्वजण मान्य करणारच.
मला असे वाटते की प्रत्येक नदीसाठी एक सनदी अधिकारी - नदी सुरक्षा अधिकारी म्हणून जिल्हा पातळीवर नियुक्त करावा व नदी सुरक्षा अधिकाऱ्यांकडे नदी विषयक सर्व अधिकार प्रदान करावेत. ही मागणी मागील 10 वर्षांपूर्वी इंद्रायणी बचाव कृती समितीने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन महोदयांना केली पण राजकीय इच्छा शक्तीचा अभाव व नद्या बाबत असंवेदनशील धोरणामुळे त्या मागणीवर कोणताही विचार पुढे आला नाही पण ह्याची गरज व आवश्यकता तपासता आपण सर्वजण ह्या मागणीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेणारच. आज नदी पात्रांवर अतिक्रमणे होतात व आपल्या सारखे संवेदनशील नागरिक अतिशय पोटतिडकीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनास त्या बाबत लेखी तसेच तोंडी माहिती देतात एवढेच नाही तर स्थानिक वृत्त पत्रातून विषयावर प्रकाश टाकला जातो पण आमचे प्रशासन त्या बाबत ढिम्म आहे, यामागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न केलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींना एकच उत्तर मिळते ते म्हणजे अशा प्रकारांना आळा घालण्याचा नक्की अधिकार कोणत्या विभागास आहे हेच अद्याप नक्की झालेले नाही.
रिव्हर बेड अॅक्ट प्रमाणे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार असला तरी निष्कारण कधीकधी जिल्हाधिकारी हस्तक्षेप करतात तर कधी जलसिंचन, पटाबंधारे आणि महसुल विभाग सुध्दा लुडबुड करतात पण जर प्रकरण अंगलट येणारे वाटले तर सर्वच जण एकमेकांकडे बोट दाखवून शेवटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाला दावणीला बांधून विषयांतर करतांना दिसतात व मूळ विषय तसाच राहतो. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे फावते आणि त्याच्या कृत्याची रि पुढचा सुध्दा ओढतो व म्हणूनच आज सर्वत्र राजरोस नदी पात्र अतिक्रमणे आपणास बघावयास मिळत आहेत. तुमच्या अथवा माझ्या ओरडण्याने हे अतिक्रमण बंद होणार नाहीत तर त्यासाठी अतिशय प्रामाणिक व कठोर कारवाई होणे गरजेचे आहे म्हणूनच हे अधिकार नदी सुरक्षा अधिकाऱ्यास प्रदान होणे गरजेचे आहे व त्यासाठी आवश्यक मुबलक निधी सुध्दा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आज ह्या बाबात आपण सर्वांना दबावगट निर्माण करून कायद्यात बदल घडवून आणणे अथवा नवा कायदा निर्माण करण्याची फार आवश्यकता आहे.
आजपर्यंत अनेक कायदे जन्माला आले पण त्या कायद्यांच्या निर्मितीच्या वेळी खूप मोठ्या पळवाटा निर्माण केल्या अथवा शिल्लक ठेवल्या आहेत. अर्थात त्या सर्व पळवाटा ह्या कायदे बनविणाऱ्या मंडळींने जाणीवपूर्वक व अक्कल हुषारीने मोकळ्या सोडल्या असाव्यात असा भास होतो. विषयाचे स्वामित्व म्हणजे मालकी व निर्णय प्रक्रियेतील स्वातंत्र एखाद्याला जर नसेल तर तो अधिकारी तरी कशाला नहाक आपुलकीने जीव ओतून काम करेल ? ही भावना आपणास सर्वांना मान्य असणारी आहे. हीच भावना दूर व्हावी व प्रशासनातील अधिकारी वर्ग आत्मियतेने काम करतील अशी योजना राबविणे गरजेचे आहे, म्हणून तर आज आपण नदी सुरक्षा अधिकारी जन्माला घालत आहोत.
एक ना अनेक प्रकाराने आपणास नदी चे वैभव निर्माण करता येण्यासारखे आहे. उद्या गणपती विसर्जन सारखा धार्मिक विधी करण्यासाठी आपण नदीवर जाणार आहोत हे नक्कीच आहे. माझी विनंती राहील की आपण सर्वांनी आपल्या नदीच्या पात्रात आपण केवढे प्रदूषण केले आहे याचा अभ्यास व सत्य परिस्थितीचा आढावा घेतलात तर आपणास लक्षात येईल की नागरिक म्हणून आपण काही मूलभूत तत्व व शिस्त पालन केले तर आपल्या नद्या आपण पूर्ववत करण्यात यशस्वी होवू शकणार यात शंकाच नाही.
निर्माल्य दान, मूर्ती दान, शाडू मातीच्या गणेश मूर्ती विसर्जन आपल्या परसात अथवा कुंडात करण्याची सवय आदी विषय अतिशय गंभीरतेने हाताळण्यात पुढाकार घेणे गरजेचे असतांना आपण फक्त समाजसेवी संस्थांची वाट पाहात असतो व जर ते त्या कामात उपलब्ध नसतील तर त्यांच्यावर टीका करतो, ही आपली नेहमीची सवय सोडून आपण स्वत: शिस्तबध्द वागणे ही सवय अवलंबणे आज तरी महत्वाचे आहे.
नुकतेच भारताचे माजी राष्ट्रपती कै. डॉ. अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध उपक्रम आपण केले असतील व त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला असेलच पण तोच प्रसंग नदी तीरावर मुस्लीम दफनभूमीत भारतीय वंशाच्या झाडांच्या प्रजातींची लागवड करून सुध्दा साजरा केला जावू शकतो याचा प्रयोग पर्यावरण संवर्धन समितीने दापोडी येथे पवना नदीवर 70 झाडे लावून करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. नदीच्या पात्राच्या बाजूला करंज, कडू लिंब, जांभूळ, पिंपळ सारखी झाडे लावून नदीच्या सभोवतालची जैवविविधता जपणे महत्वाचे आहे. जैव विविधता जोपासणे म्हणजेच नदीला पुर्नजन्म देणे असा होतो. कित्येक नद्यांच्या पात्रांना सिमेंटच्या भिंती घालून नदीला कालव्याचे रूप देणाऱ्या मानसिकतेची कीव करावी तेवढी कमीच आहे. नुकताच गुजराथ परिसरात खूप पाऊस पडला व त्यामुळे नदीत पाणी दुथडी भरून आले व ते पाणी शेवटी मानव निर्मित सिमेंटच्या सिमाभिंती तोडून बाहेर आले व हाहाकार माजवला त्याची दृश्य आपण टीव्हीवर बातम्यातून पाहिली असणारच. या प्रसंगातून आपण धडा घेणे गरजेचे आहे की निसर्ग निर्मित नद्या नाले व जलसाठे त्यांच्या स्वत:च्या पाणी साठविण्याच्या मर्यादा बदलू नयेत अथवा मार्गात जास्त बदल करू नयेत अन्यथा उत्तरांचल मध्ये झालेल्या महाप्रलयास आपण सर्वांना तोंड द्यावे लागणार.
आपण हे सर्व कळत आहे तरी आपण आपले वर्तन बदलत नाही कारण आम्हास आज फार मस्ती व पैश्याची गुर्मी आलेली आहे. ही काही लोकांची मस्ती व गुर्मी त्या परिसरातील संपूर्ण जनजीवन नदी पात्रातील अतिक्रमणामुळे विस्कळीत करून टाकते तरी पण आपण भित्रट व स्वबचाव करणारी मंडळी शूर बनून प्रशासनावर दबाव टाकून अश्या प्रवृत्तींना आळा घालण्यात पुढाकार घेत नाही, म्हणूनच आपणा सर्वांना फक्त आज नदीचा आक्रोश येण्यापलिकडे काहीच उरलेले नाही.
नदीच्या उगमा पासून नदीच्या शेवटा (संगम) पर्यंत प्रत्येक नदी अभ्यासली तर लक्षात येईल की नदीचे गत वैभव प्राप्त करणे किती सहज शक्य आहे व ती काही अशक्य बाब नाही. आपण प्रत्येकाने आज पासून पुढाकार घेवून प्रशासनावर दबाव टाकला तर बघता बघता प्रशासन कामाला सुरूवात करेल व आपल्यातील काही जणांवर केलेल्या चुकीच्या कामाबाबत कारवाई सुध्दा होईल व नदी संवर्धन व कार्य प्रारंभ होईल, आज आपण कित्येक चुका सहज जाता येतांना करतो आहोत अथवा चुका करून घेत आहोत जेणे की आपण नदीचे प्रदूषण वाढवीत आहोत.
नदी पात्रातील वाळू उपसा जर नियंत्रित व शास्त्रीय पध्दतीने केला तर आपणास नदीतील जैवविविधता जोपासता येईल. नदी च्या बाजूने वृक्षारोपण करून वनराई तयार केली तर नदी पासून पावसाळ्यात कधीच पुराचा फटका नगर वस्तीला बसणार नाही. प्रत्येक नदी ही बारमाही वाहती ठेवण्यासाठी नदीच्या पाण्याच्या साठ्याचा योग्य व गांभीर्याने अभ्यास होणे गरजेचे आहे.
नदी बारमाही वाहण्यासाठी नदीच्या आजूबाजूचे पाणी जमिनीत जीरविणे क्रमप्राप्त आहे. पाणी जमिनीत जीरवतांना विशिष्ट जातीच्या झाडांच्या मदतीने जमिनीच्या पोटात पाणी साठवण करणे सुध्दा महत्वाचे आहे. नदीतील पाणी हे पिण्यास योग्य राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाबाबत संपूर्ण जागृती सर्व स्तरावर होणे गरजेचे आहे ही एक अवघड पण तशी सोपी गोष्ट सर्वांना कळली पाहिजे.
1. प्रत्येक नदीचा हायड्रोलॉजीकल सर्व्हे होणे गरजेचे आहे.
2. प्रत्येक नदीतील गाळ अथवा वाळू नियमित व शास्त्रीय पध्दतीने काढणे गरजेचे आहे.
3. प्रत्येक नदीच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वनराई बनविणे गरजेचे आहे. त्यात घायपात, कोरफड, करवंद सारखी काटेरी वनस्पतींची संख्या मोठ्या प्रमाणात असणे महत्वाचे आहे. जांभूळ, करंज, पिंपळासारखी कमी पाण्यावर जगणारी झाड जमिनीच्या पोटात पाण्याचा साठवणूक करण्याकामी अतिशय उपयुक्त ठरतील.4. प्रत्येक नदीसाठी शासन नियुक्त 'नदी सुरक्षा अधिकारी' असावा.
5. प्रत्येक नदीचे पात्र सिमांकन करून त्या बाबत स्पष्ट रेषा अथवा निशाण लावावे आणि नदी प्रवाहाला मिळणाऱ्या सर्व नाल्यातून वहात येणारा कचरा नदीला मिळण्या आगोदर नाल्यातच अडविण्याची यंत्रणा सर्वत्र विकसित करावी.
वरील 5 बाबी जरी मोठ्या गांभीर्याने हाताळल्या तरी आपणास लवकरच आपले ध्येय गाठता येईल. आता प्रश्न उरतो तो हे करायचे कोणी यासाठी आपण सर्वच जण प्रशासनाकडे बोट दाखविणार आहोत मग ही गोष्ट प्रशासनाच्या माथी थोपवण्यात आपण सर्वांनी अगदी जबरदस्त पुढाकार घेवून दबाव गट निर्माण करणे गरजेचे आहे.
आज आपण काही मुद्यांवर बोलत आहोत हे मुद्दे आज जन्माला आले आहेत का ? आज पर्यंत हा विचार कोणाच्या मनात आलाच नाही का ? फक्त आम्हीच फार हुषार म्हणून आम्हाला सुचले, बाकीच्यांना कळत नाही अश्या समजाचा तर भाग नाही ना ? मागील अनेक वर्षात अनेकांनी हे मुद्दे सातत्याने मांडले आहेत पण आज पर्यंत त्याला कोणताही आधार अथवा त्याबाबत विचार केला गेला नाही याचे कारण हा विषय कोणालाच हाताळण्याची परवानगी कायद्याने नाही अथवा तसे अधिकार कोणा एका विभागाकडे सुपूर्द केले गेले नाहीत.
आता गरज आहे एकत्रित बोलण्याची व एकमेकांच्या विचारांचा आदर करून विचारातील कमतरता कमी करून भक्कम विचारसरणीचा. तो म्हणजे नदी चे गत वैभव प्राप्त करणे.
मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512