Source
जल संवाद
भारत देशाला इतिहासाची व्यापक बैठक आहे. हा इतिहास जयाचा, पराजयाचा. समृध्दीचा, दारिद्र्याचा, विषमतेचा, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आदी परिवर्तनांचा आहे. हजारो वर्षांपासून मानवी संस्कृती या ठिकाणी स्थिरावली आहे. रामायण, महाभारत, बौध्दकाळ, सातवाहन ते थेट इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळेतोपर्यंतच्या या कालखंडात अनेक स्थित्यंतरे झाली. सर्वच कालखंडातील जल - इतिहास संप्रेषित करणारे पुरावे, अवशेष आपणास सापडतीलच असे नाही. साधारणत: इसवी सनाच्या सुरूवातीपासून पुढचा कालखंड बराच बोलका असणार आहे. हे पुरावे शिलालेखाच्या स्वरूपात असतील, भौतिक सांगाड्यांच्या स्वरूपात असतील वा लिखित व शब्दबध्द स्वरूपात असतील, मागील घटनांचा इतिहास जाणून घेवून भविष्यातील वाटचालीच्या दिशा निश्चित करणे, गतकालीन त्रुटींची पुनरावृत्ती टाळणे आणि त्याबरोबरच त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करणे ही इतिहास जाणून घेण्यापाठीमागची काही उद्दिष्ट्ये असू शकतात. ज्या संस्कृतीला इतिहास नाही या इतिसाहाची माहिती नाही ती संस्कृती कोणता वारसा घेवून भविष्यात कालक्रमण करणार आहे याबद्दल प्रश्न निर्माण होतो. म्हणून भविष्यातील यशस्वी मार्गाचा वेध घेण्यासाठी इतिहासाचा आधार हे एक प्रमुख अंग ठरते. या दृष्टिकोनातून अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी वेगवेगळ्या कालखंडातील इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून समाज, राज्यकर्ते, जाणकार, विद्वान आदींनी भविष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधावीत अशा अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत.
इतिहास लेखनावरून नजर टाकल्यास असे दिसून येते की, बहुतांशी लेखन हे राजकीय घडामोडींशी संबंधित आहे. युध्दांचा, तहांचा इतिहास लिहिलेला आहे. सैन्याची रचना, त्यांचे बळ, लढ्यांचे प्रकार , किल्ले, तटबंदी, सुरूंग, वापरली जाणारी हत्यारे / शस्त्रे यांचा इतिहास आपणास सविस्तरपणे वाचावयास मिळतो. ज्या राजकर्त्यांनी युध्दे जिंकून त्या त्या प्रदेशांवर राज्य केले त्या प्रदेशांचा इतिहास, त्या प्रदेशाचा ऐतिहासिक भूगोल, त्यांनी बांधलेल्या वास्तूंचा, महालांचा, राजवाड्यांचा, त्यांनी निर्माण केलेल्या कलेचा, प्रसारित केलेल्या धर्मांचा, बसविलेल्या राज्यव्यवस्थेचा, सामाजिक शिस्तीचा, समाजांच्या अन्य गरजांची पूर्तता करणाऱ्या व्यवस्थेचा (बाजारपेठ, व्यापार इ.) पण इतिहास आपणास वाचावयास मिळतो. त्यांची जीवनपध्दती, आभूषणे, वस्त्रे, अलंकार, त्यांचे पंथ, राजांचे, राजपुत्रांचे, राजकन्यांचे स्वभाव यांचा पण सविस्तर कालखंडनिहाय इतिहास वाचावयास मिळतो. देवळांचा, प्रार्थना मंदिरांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या अनेक देशभक्तांचा इतिहास आहे, शेती व्यवस्थेचा इतिहास आहे. शेतीवरील शेतसारा, महसूल जमा करण्याची पध्दती, उत्पादने, त्यांचा व्यापार, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, कपडे, त्यांचे विणकाम, रेशीम, तलम कपड्यांत त्यांचे रूपांतर, अन्नधान्याचे अधिकचे उत्पादन, त्याची देवाण घेवाण यांचा पण इतिहास आपणास वाचावयास सापडतो. पण या सर्व समृध्दीचा मूलभूत आधार, जे पाणी आहे, त्याच्या भिन्न कालखंडात केलेल्या नियोजनाचा, पाणी हाताळण्याच्या पध्दतींचा, त्यांच्या उपलब्धतेस कारणीभूत असलेल्या नैसर्गिक घटकांचा आणि त्यांच्या वापराच्या व्यवस्थापनातील कौशल्याचा इतिहास मात्र अभावानेच वाचावयास मिळतो.
योगायोग असा आहे की, हजारो वर्षांपासूनच्या या पाणी व्यवस्थापनाचे पुरावे (जमिनीवरील पार्थिव व्यवस्था) मात्र आज सुध्दा उपलब्ध आहेत. तर काही ठिकाणी त्या व्यवस्था उत्तम स्थितीत कार्यक्षम आहेत, जिवंत आहेत. ज्या उद्दिष्टांसाठी त्या व्यवस्था त्या त्या कालखंडात निर्माण केलेल्या होत्या त्याच्या पुढच्या पिढ्यांनी त्याकडे दुर्लक्ष जरी केले असले तरी, त्यातील काही व्यवस्था आज जिवंत आहेत व मानवाच्या, प्राणीमात्रांच्या, वनस्पतींच्या, पर्यावरणाच्या गरजा त्या भागवत आहेत, पाणी हा समृध्दीचा स्त्रोत आहे. ऐकेकाळी हा देश समृध्द होता. काही शतकापूर्वी तर येथे सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जात होते. हा देश शेतीचा आहे. या शेतीला समृध्दी आणण्यास कारणीभूत असलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनातील कौशल्याचा मात्र अद्याप मागोवा घेण्यात आला नाही ही इतिहास लेखनातील उणीव जाणवते. पाणी व्यवस्थापनातील तंत्र, त्यातील समाजिक आशय जाणून घेवून व त्याची सूत्रबध्द पध्दतीने मांडणी करून पुढच्या पिढीला त्याचे संप्रेषण करण्याची गरज का भासली नाही हे एक कोडेच आहे ! परंतु याला काही इतिहासकार अपवाद आहेत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने पाणी व्यवस्थापनातील इतिहास समजून घेवून त्यांच्या अभ्यासाचा तो विषय नसतांना त्याचे आकलन करून सातत्याने हा विषय, चिंतनात ठेवलेला आहे हे पण सत्य मान्य करावेसे वाटते. या ऐतिहासिक पाणी हाताळणाऱ्या व्यवस्थेतून संप्रेषित होणाऱ्या कौशल्याचा शोध व अभ्यास करणे गरजेचे राहणार आहे.
पाण्यातून समृध्दी हा धागा आपणास वेरूळच्या कैलास लेण्यात दिसतो. तुडुंब जलाशयात कमलासनावरील लक्ष्मीस गजराज सुस्नात करीत आहेत ! हे काय दर्शविते ? ते हेच दर्शविते की, पाण्यातून संपत्ती, पाण्यातून समृध्दी, पाण्यातून विकास, गरीब दुबळा समाज वेरूळ, अजिंठ्यासारख्या अप्रतिम लेण्या, सुंदर शिल्पाने युक्त अशा अगणित वास्तू (ज्या देशभर पसरलेल्या आहेत) याची निर्मिती करू शकत नाही. हे पाणी डोंगर आणि नद्यांच्या पोटातून, निसर्गाच्या चक्रातून निर्माण झालेले आहे आणि म्हणून समृध्दीचा आधार डोंगर, जमीन, पाणी हेच होत. हाच नेमका भाव, हाच संदेश वेरूळच्या कैलास लेण्यामधून आपणास मिळतो. आपण शिल्पाकडे पाहतो. त्याच्या सांैदर्याकडे पाहतो, त्याचे गुणगाण करतो पण त्यातून दिल्या जाणाऱ्या संदेशाकडे डोळेझाक करतो. कारण ती दृष्टी आपणास मिळालेली नसते. दरिद्री समाजव्यवस्था उन्नतिच्या भराऱ्या मारू शकत नाही. भले तो समाज कितीही विद्वान, ज्ञानी असेल. समाजाच्या उन्नतिसाठी, भौतिक प्रगतीसाठी संपत्तीचे, समृध्दीचे महत्व नाकारून चालत नाही. हा धडा आपण इतिहासातून घेतला पाहिजे. देशात अशी ऐतिहासिक पाणी व्यवस्थापनाची ठिकाणे हजारोंनी आहेत. महाराष्ट्रातच 300 च्या वर डोंगरी किल्ले आहेत. या व इतर ठिकाणी पाणी व्यवस्थापनात वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळे तंत्र उत्तमपणे त्या भागातील, प्रदेशातील हवामानाशी, सामाजिक व्यवस्थांशी, गरजांशी निगडित असे हाताळलेले आपणास दिसते. एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणे, नदी वळविणे, पाण्याची स्वच्छता राखणे, त्याचे बाष्पीभवनापासून संरक्षण करणे या प्रकारचे अनेक घटक विचारात घेवून पाण्याला योग्य त्या प्रकारे खेळवून त्यातून त्या त्या वेळच्या समाजजीवनाची पाण्याची गरज समर्थपणे भागविण्यात आलेली आहे. हे आपणास या वस्तुनिष्ठ पुराव्यावरून दिसून येते.
विदर्भातील वैनगंगा खोऱ्यात मुबलक पाऊस पडतो. त्यास अनुसरून तेथील पाणी हाताळण्याची व्यवस्था ही वेगळी आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परळी, अंबाजोगाई, जालना इ. प्रदेशातील जो भाग अवर्षणप्रवण आहे, जो प्रदेश खडकाचा आहे, जो प्रदेश शुष्क वातावरणाचा आहे त्या ठिकाणची पाणी हाताळण्याची व्यवस्था ही वेगळीच आहे. तापीच्या खोऱ्यात त्याचे वेगळेच पैलू दिसतात. तर विदर्भातील पूर्णा या पाण्याच्या खोऱ्यात वेगळ्या पध्दतीचा अवलंब करावा लागलेला आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक उदाहरणातील कौशल्याचे व त्याच्या वेगवेगळ्या अंगांचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. त्यातील संदेश हा महत्वाचा राहणार आहे. तो फक्त अभ्यास करण्यापुरता महत्वाचा नसून त्यातून आजच्या काही प्रश्नांची उत्तरे समर्थपणे मिळणार आहेत. आजच्या उणीवा लक्षात येणार आहेत आणि या उणीवांची पुनरावृत्ती न होवू देता भविष्यातील गरजांची उत्तरे आपल्याला त्यातून शोधावयाची आहेत. म्हणून या ऐतिहासिक पाणी व्यवस्थापनातून संप्रेषण होणारे तंत्रज्ञान, कुशलता इ. भविष्यातील समाजाच्या समृध्दीसाठी कारणीभूत ठरून हा समाज बलशाली, समृध्द व्हावा या भूमिकेतून संशोधन, अभ्यास होणे गरजेचे आहे. इतिहासातील या उपेक्षित घटकांना संशोधनाच्या माध्यमातून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न आहे. हा विषय फार व्यापक आहे. हा देश पण फार विस्तीर्ण आहे आणि म्हणून महाराष्ट्र व त्याच्या शेजारील प्रदेशातील अशा ठिकाणच्या प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक खाणाखुणा, तर काही ठिकाणच्या जिवंत व्यवस्था यातून जो संदेश मिळणार आहे त्याचा संशोधनात्मक अभ्यास व त्याचे विश्लेषण हा मर्यादित विचार प्रस्तुत मांडणीत ठेवण्यात आलेला आहे.
इतिहासामध्ये शास्त्र आणण्याची गरज होती, की ज्यामुळे इतिहासकालीन कौशल्याचे शास्त्र समजण्याची कुवत समाजामध्ये निर्माण झाली असती व त्या कुवतीतून जलव्यवस्थापनाचा इतिहास हा शास्त्रशुध्द पध्दतीने मांडला गेला असता. पण असे झाले नाही. पाण्याचे शास्त्र हे इतिहासाच्या जवळ गेले नाही आणि त्यामुळे इतिहास आणि अभियांत्रिकी शास्त्र हे वेगवेगळे राहिले. त्यामुळे इतिहासात अभियांत्रिकी शास्त्र शोधण्याच्या प्रेरणा मिळाल्या नाहीत असेच म्हणावे लागेल. मग इतिहासामधून पाणी व्यवस्थापनाविषयी काही शिकण्याचा भाग तर बराच दूर राहिला. थोडक्यात पाणी आणि इतिहास यांना एकत्र करण्यात प्रचलित जाणकार कमी पडले. त्याची परिणीती, आज पाणी हा विषय हाताळण्यात, त्यातील सामाजिक व आर्थिक आशय जाणून घेण्यात अपयश येत आहे. कोणती नदी आज स्वच्छ आहे ? कुठले पाणी मोजले जाते ? याची उत्तरे मिळत नाहीत. त्याच्यातून जी अपप्रवृत्ती आज पुढे आलेली आहे ती म्हणजे पाणी हाताळणाऱ्या व्यवस्थेचे शासकीयकरण झाले. लोकप्रवणता जावून शासनप्रवणता आली व शासनावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढली. शासनावर अवलंबून राहण्याच्या वृत्तीचा उदय झाला. यालाच आपण परावलंबित्व म्हणूया. ही प्रवृत्ती लोकांना, समाजाला पंगू बनवित आहे. समृध्दी ही समाजाला पंगू बनवून येत नसते. समृध्दी लोकांमध्ये अंत:प्रेरणा जागृत करून, त्यांना उत्तेजन - प्रोत्साहन देवून प्राप्त होत असते.
दोन अडीच हजार वर्षांच्या कालखंडावरून दृष्टिक्षेप टाकल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आणि ती म्हणजे अनेक राजघराण्यांच्या कालखंडातून या व्यवस्था अविरतपणे कार्यरत राहिलेल्या होत्या. धर्म, पंथ, जात वा राजघराण्यांच्या नावाखाली त्यांचे उध्वस्तीकरण करण्यात आले नाही हे विशेष होय. पण शेवटच्या पर्वात (ब्रिटीश कालखंड) या व्यवस्थेमधील लोकप्रवणता हळूहळू कमकुवत होत गेली. समाज परावलंबित्वाकडे झूकू लागला. यातच या व्यवस्थेमधील शाश्वतता अस्थिर होण्याची बीजे रूजली गेली.
लेखक परिचय
(डॉ. दि.मा.मोरे हे एक ख्यातनाम जल अभियंता. संपूर्ण आयुष्य जलक्षेत्रात कार्यरत, त्याचप्रमाणे जलक्षेत्रातील एक चिकित्सक व संशोधक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला त्यांनी जलव्यवस्थापनातील पारंपारिक शहाणपण या विषयावर आपला संशोधनाचा प्रबंध सादर करून Ph.D ही पदवी संपादन केली. या शहाणपणातील काही कथा ते आपल्या या मालिकेत सादर करीत आहे.- मो : 09422776670