11 वी महाराष्ट्र सिंचन परिषद : व्यवस्थापन अहवाल

Submitted by Hindi on Sat, 02/06/2016 - 11:24
Source
जल संवाद

गतवर्षी लातूर येथे 11 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे सूप वाजले त्यावेळी समारोपाच्या सत्रात घोषीत करण्यात आले की औरंगाबादस्थित महात्मा गांधी मिशन व मराठवाडा संशोधन व विकास संस्था यांच्या निमंत्रणाला मान देवून 11वी महाराष्ट्र सिंचन परिषद औरंगाबाद येथे 16 व 17 जानेवारी 2010 रोजी संपन्न होणार आहे.

गतवर्षी लातूर येथे 11 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे सूप वाजले त्यावेळी समारोपाच्या सत्रात घोषीत करण्यात आले की औरंगाबादस्थित महात्मा गांधी मिशन व मराठवाडा संशोधन व विकास संस्था यांच्या निमंत्रणाला मान देवून 11वी महाराष्ट्र सिंचन परिषद औरंगाबाद येथे 16 व 17 जानेवारी 2010 रोजी संपन्न होणार आहे. अर्थातच प्रथेप्रमाणे स्थानिक सिंचन सहयोग ही परिषद आयोजनातील एक प्रमुख यजमान संस्था असल्याने 11 वी महाराष्ट्र परिषद या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार हे ओघाने आलेच. राज्यातील सर्व सिंचन सहयोगांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र सिंचन सहयोगची भूमिका ही सर्वसाधारणपणे मार्गदर्शकाची असल्याने या शिखर संस्थेच्या वेळोवेळच्या सल्ल्याप्रमाणे आणि शिखरसंस्थेचे सल्लागार व मार्गदर्शक डॉ.माधवराव चितळे, डॉ.सु.भि.वराडे यांच्या मूलभूत विचारांचा धागा पकडून एखाद्या मध्यवर्ती विषयावर सांगोपांग चर्चा परिषदेत घडवून आणण्याचे प्रत्येक परिषदेचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे फलोत्पादनासाठी जलव्यवस्थापन हा मध्यवर्ती विषय निश्चित करून महाराष्ट्र सिंचन सहयोगच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त नमूद त्रिमूर्ती संस्थांच्या संयुक्त विद्यमाने परिषद महात्मा गांधी मिशन संस्थेच्या भव्य परिसरात घेण्याचे निश्चित करण्यात आले.

विवाहासारख्या एखाद्या कौटुंबिक सोहळ्यासाठी मुहूर्त ठरल्यावर एखादे मंगल कार्यालय निश्चित केले की या कौटुंबिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्याप्रमाणे यजमानांची धावपळ सुरू होते त्याप्रमाणे परिषदेचा मुहूर्त व स्थळ निश्चित झाल्यावर आयोजक संस्थांच्या धावपळीला प्रारंभ झाला तो एप्रिल 2009 पासूनच. 26 एप्रिल 2009 रोजी औरंगाबाद येथे परिषद आयोजित करण्याच्या दृष्टीकोनातून आणि परिषदेच्या मध्यवर्ती विषयाच्या अनुषंगाने उपविषय ठरवून माहितीपत्रिका प्रसृत करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारीसाठीची प्रथम बैठक सिंचन तज्ज्ञ व मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधी मिशन संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. या प्राथमिक बैठकीतच डॉ.माधवराव चितळे, डॉ.दि.मा.मोरे, डॉ.सर्जेराव ठोंबरे, भुजंगराव कुलकर्णी, या.रा.जाधव, विजय दिवाण, वाल्मी संस्थेची प्राध्यापक मंडळी, राज्याच्या विविध भागातील सिंचनतज्ज्ञ व विविध सिंचन सहयोगांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व माननीय अंकुशराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादनासाठी जलव्यवस्थापन या मध्यवर्ती विषयाच्या अनुषांगाने सांगोपांग चर्चा होवून परिषदेतील चर्चेसाठी व स्मरणिकेसाठी अनेक उपविषयांची निश्चिती करण्यात आली.

अशा प्रकारे 11 व्या परिषदेचे पडघम वाजण्यास परिषदेच्या तारखांच्या नऊ महिने आधीपासूनच सुरूवात झाली होती. परिषदेचा विषय, उपविषय, सर्वसाधारण ढोबळ रूपरेषा, स्मरणिकेसाठी लेख पाठविण्यासाठी आवाहन इत्यादीबाबातची माहितीपत्रिका जून 2009 मध्ये छापून जुलै 2009 मध्ये राज्यातील जवळपास चार हजार संभाव्य सहभागीतांपर्यंत पोहोचली देखील होती. या 4000 संभाव्य सहभागीतात राज्यातील मान्यवर सिंचन तज्ज्ञ, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, राज्याच्या सिंचन विभागाचे अधिकारी, सर्वसामान्य शेतकरी, पाणीवापर संस्था, ऊस उत्पादक संस्था, साखर कारखान्यांचे पदाधिकारी, विविध प्रकल्पांचे लाभधारक व प्रकल्पग्रस्त यांचा मोठ्या प्रमाणावर अंतर्भाव होता. इतक्या लवकर माहितीपत्रिता परिषदेचे वेळापत्रक विसरण्यासाठी पाठविली आहे काय असा खोचक प्रश्नही त्यावेळी काही जेंटलमन तर्फे विचारण्यात आला होता.

पण यथोचित विचारमंथन परिषदेत होण्यासाठी व त्या अनुषंगाने दर्जेदार लेख स्मरणिकेसाठी प्राप्त होण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला प्रदीर्घ वेळही बऱ्याच वेळा अपूरा पडतो अशा आतापर्यंतच्या परिषदांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणातून प्रत्यक्षात उतरलेली ही कृती होती. हे निदान त्यावेळी तरी असा प्रश्न वितारणाऱ्यांना समजणे शक्य नव्हते. कौटुंबिक विवाहसोहळ्याची निमंत्रितांची साधारणत: एक हजाराची यादी ही जवळच्या नातेवाईकांची,मित्रमंडळींची, हितचिंतकांची म्हणजेच पर्यायाने ज्ञात मंडळींची असते. तर याऊलट परिषदेतील निमंत्रित मात्र फार मोठ्या संख्येने संपूर्ण राज्याच्या विविध भागातील अपरिचित शेतकरीवर्ग व विविध खात्यांची मान्यवर मंडळी असतात.

अशांचे दूरध्वनी क्रमांक, पत्ते मिळवून त्यांचेशी संपर्क साधणे, प्रत्यक्ष पत्र पाठविणे, पाठविलेले पत्र वा माहितीपत्रिका त्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात पोहोचली आहे किंवा कसे याबाबतचे दृढीकरण करणे, लेखांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, परिषदेसाठी येणाऱ्या अपेक्षितांचे दृढीकरण अन् अनपेक्षितांचा अचूक अंदाज घेवून त्यांच्या निवास, वाहतूक, नोंदणी इत्यादींची व्यवस्था करताना तारांबळ उडणार नाही याची काळजी घेणे, मान्यवरांचा यथोचित सन्मान राखतानाच अनंत बारकाव्यांनिशी त्यांची व्यवस्था राखणे, राज्यातील कृषीसंबंधीत विविध संस्था - उद्योग - व्यक्ती यांचेशी संपर्क साधून प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान परिषदेतील सहभागीतांपर्यंत पोहोचविणे, परिषदेचा मध्यवर्ती विषय व उपविषयांच्या अनुषंगाने अनुभवसंपन्न व तज्ज्ञ व्याख्यात्यांशी संपर्क साधून समान व समांतर सत्रांतील व्याख्यात्यांची अपेक्षित संख्येने योजना करणे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेवून त्या अनुषंगाने त्यांना ज्यांच्याकडून मार्गदर्शन मिळू शकेल अशा त्या त्या क्षेत्रातील अनुभवसंपन्न वैचारिक व क्षेत्रीय तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे, मंडप-व्यासपीठ-सभागृह-ध्वनीयंत्रणा-भोजन इत्यादींची मोठ्या प्रमाणात व्यवस्था पाहणारी यंत्रणा निर्माण करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे..... अशा एक,दोन,तीन नव्हे तर अनंत प्रश्नांच्या मालीकांचा वेळीच वेध घेवून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असंख्य प्रामाणिक सचोटीच्या, कष्टाळू व तत्पर कार्यकर्त्यांची फळी उभी करून परिषद यशस्वी करणे हे वाटते तितके किंवा दिसते तेवढे सोपे नसते हे खरे. जावे त्याच्या वंशा तेव्हाच ते कळते. त्यामुळेच एक परिषद यशस्वीपणे संपन्न झाली की लगेच दुसऱ्या परिषदेचे वेध लागायला सुरूवात होते.

पहिल्या परिषदेचे कवित्व पुरते संपलेले नसतानाच त्या परिषदेतील बऱ्यावाईट घटनाक्रमांचा अनुभव विचारात घेवून नव्या परिषदेच्या आयोजनाच्या नियोजनास सुरूवात करणे क्रमप्राप्त ठरत असते. त्या दृष्टीने मिळणारा वर्षभराचा वेळही तसा अपूराच असतो. तसे एखादी संस्था चालविणे, अशा मोठ्या परिषदांचे नियोजन करून तळागाळापर्यंत विचारांचे लोण पोहोचविण्याच्या प्रयत्नात सहभाग वाढविणे हे पूर्ण वेळेचेच काम आहे याची कल्पना येणे शक्य नाही. त्यासाठी काया, वाचे, मने अशा कार्यात उडी घेवून स्वत:ला संपूर्णपणे झोकून द्यावे लागते तेव्हा कुठे परिषद चांगली झाली एवढे केवळ तीन शब्दांचे वाक्य कानावर पडण्याची शक्यता असते. अन्यथा घरचे खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांच्या नशिबी अनेकांच्या झालेल्या गैरसोयींच्या अनुषंगाने शिव्याशापांचे धनी होण्याचेच भाग्य (?) असते.

या सर्व पार्श्वभूमीवर 11 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या तयारीची सुरूवात नऊ महिने आधीच झाली. सहा-सात महिने आधी माहितीपत्रिका संभाव्य सहभागीतांपर्यंत पोहोचल्या. एवढ्या आधी माहितीपत्रिका पोहोचून व सातत्याने लेखांसाठी पाठपुरावा करूनही परिषदेच्या दोन दिवस आधीपर्यंतच नव्हे तर परिषद संपल्यानंतरही लेखांचा ओघ आजपावेतो सुरूच आहे. या परिषदेसाठी राज्याच्या सर्वच भागातून उस्फूर्त प्रतिसाद मिळून स्मरणिकेसाठी विक्रमी एकशे दहा लेख प्राप्त झाल्याची नोंद आवर्जून घ्यावीशी वाटते.

दरवर्षी संपन्न होणाऱ्या परिषदांप्रमाणेच 11 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आयोजनात वेळोवेळी महाराष्ट्र सिंचन सहयोगचे मार्गदर्शक व सल्लागार डॉ.माधवराव चितळे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभत होते. महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे हे तर परिषद यशस्वीपणे कार्यान्वीत होण्याच्या दृष्टीकोनातून सातत्याने कार्यरत राहणारे एक झपाटलेले व्यक्तीमत्व होते. नित्य नवे, काहीतरी हवे या विचाराने रोज होणाऱ्या परिषदेबाबतच्या चर्चेतून रूढ प्रथांला फाटा देवून व अनाठायी खर्च टाळून परिषद आर्थिक दृष्ट्या काटकसरीने पण वैचारिक श्रीमंतीने संपन्न कशी होईल याचाच ते सारखा वेध घेत असत. याच दृष्टीकोनातून खर्चिक किट चा विचार दूर सारून साध्या खादीच्या कॉटनच्या कपड्याच्या पिशव्या शिवून घेण्याच्या क्रांतीकारक विचाराचा जन्म झाला व त्याची अंमलबजावणीही त्यांनी तत्परतेने घडवून आणली. ऋण काढून सण साजरे करायचे नाहीत या कल्पनेतून अंदाजे साडेचार - पाच लाखांची स्मरणिका त्यांनी निवडक चांगले लेख स्मरणिकेत अंतर्भूत करून अवघ्या लाखात बसवली व उर्वरित लेख सी.डी.मध्ये समाविष्ट करण्याचा क्रांतीकारक निर्णय कुणाला काय वाटेल याचा फारसा विचार न करता अंमलात आणला. गेल्या दहा वर्षांच्या सिंचन परिषदांतील उत्कृष्ट लेखांचे संकलन करून सिंचन साधना हे निवडक लेखांचे पुस्तक सिंचन प्रेमींपर्यंत पोहोचविण्याची कल्पना त्यांचीच.

परिषद यशस्वी करण्यासाठी विविध उपक्रम कल्पकतेने योजणे व कणखरपणे राबवणे आवश्यक असते. ऐनवेळच्या त्रुटी दूर सारण्यासाठी कामाचे रितसर वाटप करून त्यासाठी कार्यान्वीत असणाऱ्या समितींचे गठन होणे क्रमप्राप्त ठरते. परिषदेची सर्वसाधारण आवश्यकता विचारात घेवून सूकाणू, समन्वय, स्वागत, निवास, वाहतूक, प्रदर्शन, मंडप, व्यासपीठ, भोजन, अर्थनियोजन, नोंदणी, स्मरणिका, अभ्यास सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिध्दी.... अशा विविध चोवीस समित्यांचे गठन करण्यात येवून प्रत्येक समितीचा प्रमुख व त्या त्या समित्यांमधील सहकारी सभासद निश्चित करण्यात आले. वेळोवेळी या समित्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. योग्य सूचना देण्यात आल्या. सर्वसाधारण सोयीच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधी मिशन परिसराच्या आत असणारे काम त्या संस्थेकडे तर परिसराच्या बाहेरचे काम जलसंपदा विभागाकडे अशी स्थूलमानाने कामाची विभागणी सहमतीने करण्यात आली. कामाच्या विभागणीप्रमाणे व वाटपाप्रमाणे सर्व समित्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे दृश्य फलीत म्हणजेच परिषदेचे यश म्हणावे लागेल.

महात्मा गांधी मिशन आणि मराठवाडा संशोधन विकास व प्रतिष्ठान या दोन आयोजक संस्थांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या म्हणण्यापेक्षा त्यांनी उत्फूर्त स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. माननीय श्री. अंकुशराव कदम, प्रतापराव बोराडे, या.रा.जाधव (समन्वयक), प्राचार्य डॉ.सुधीर देशमुख, प्रा.बी.एम. पाटील, प्रा.कुल्लुरकर, प्रा. अन्नदाते आणि त्यांच्या सर्व सहकारी प्राध्यापकवर्ग कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थीवर्गांनी परिषदेच्या कार्यात अपूर्व योगदान दिले. माहितीपत्र छपाई, मंडप, व्यासपीठ, मंडप-व्यवस्था, अल्पोपहार-चहापान भोजन-व्यवस्था, समानसत्र-व्यवस्था, समांतर सत्र व्यवस्था, ध्वनीयंत्रणा.... जे जे त्यांनी स्वीकारले ते ते त्यांनी व्यवस्थित पार पाडले. परिषदेसाठी आयोजीत करण्यात आलेल्या विविध बैठकांना मी नियमीतपणे उपस्थित राहात असे. परिषदेच्या निमित्ताने चर्चेच्या अनेक फैरी झडल्या.

मी स्वत: आणि आमचे मित्र मुसांडे अनेक वेळा माननीय अंकुशरावांना आणि प्रतापरावांना भेटलो तेव्हा त्यांच्या आश्वासक वृत्तीने आम्ही प्रभावीत झालो. माननीय श्री. अंकुशरावजी कदम अत्यंत शांत चित्ताने चेहऱ्यावरचे मिस्कील, मृदू स्मीत अजिबात ढळू न देता आश्वासक सूरात व शब्दात मला म्हणायचे ʅकाही काळजी करू नकोस, तू जे जे सांगशील जे जे सोपवशील ते ते मी सर्व शंभर टक्के करेन.ʆ प्रतापरावजी नवनव्या कल्पना सुचवायचे. परिषदेच्या कामात जीव ओतायचे. परिषदेचे उद्घाटन सर्वसाधारण प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करून करण्याऐवजी ठिबक वा तुषार पध्दतीचा अवलंब करून पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्याचा संदेश देणारा प्रयोग करण्याची कल्पना त्यांचीच.

प्रतापराव बोराडे यांची ही कल्पना जैन इरिगेशन जळगाव यांच्या मदतीने कार्यान्वीत करण्याची योजना मात्र महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे यांची. जे.एन.इ.सी. चे प्राचार्य डॉ.सुधीर देशमुख यांनी अत्यंत सकारात्मक पध्दतीने सर्व समान अन् समांतर सत्रांचे नियोजन केले. कामांचे सुविहित वाटप करून समांतर सत्रांमध्ये सुसुत्रता आणली. प्रा.बी.एम. पाटील आणि सहकारी हे सदैव दक्ष राहून विविध कामांवर देखरेख ठेवून होते. त्यांचे एकंदरीत त्यांचेकडे सोपविण्यात आलेल्या संपूर्ण कामावर सुयोग्य नियंत्रण होते. शिवाय वेळोवेळी आम्हाला आलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ते सदैव तत्परतेने प्रतिसाद द्यायचे. या सर्वांच्या सहकार्याचा एकत्रीत परिणाम परिषद अपेक्षिल्याप्रमाणे आखीव - रेखीव व देखणी होण्यात झाला. प्रा.श्री. बी.एम.पाटील व सहकारी यांनी त्यांच्यावरील अन्य जबाबदाऱ्यांबरोबरच व्ही.आय.पी. मंडळींच्या जेवणाची व्यवस्था करण्यात विशेष अगत्यपूर्वक लक्ष दिले हे कृतज्ञतापूर्वक नमूद करावे लागेल.

महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे यांनी जीव ओतून संपूर्ण परिषदेचे परिपूर्ण नियोजन केले होते. त्यांना गोदावरी खोऱ्यातील कर्मचारी वर्गाने यथायोग्य साथ दिली. महाराष्ट्र सिंचन सहयोगचे सचिव व सिंचन सहयोग, औरंगाबादचे कोषाध्यक्ष श्री. वसंतराव मुसांडे हे सदैव सारखे अध्यक्षांची पाठराखण करत होते. श्री. वसंतराव मुसांडे यांनी देवगिरी महाविद्यालयाचे प्रा.अशोक नाईकवाडे यांच्या सहाय्याने सिंचन साधना या ग्रंथाच्या तसेच परिषदेच्या स्मरणिरकेच्या संपादनाची जबाबदारी व्यवस्थीत पार पाडली. अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे यांनी सर्व समान व समांतर सत्रांच्या वक्त्यांचे व त्यांच्या विषयांचे काटेकोरपणे नियोजन केले होते. त्यामुळेच सर्वश्री विजय दिवाण, डॉ.ज्ञानेश्वर हापसे, डॉ.अविनाश पोळ, डॉ.शिवाजी शिंदे, डॉ.सुधीर भोंगळे, डॉ.दत्तात्रय वणे, विजय जोगळेकर, ज्ञानेश्वर बोडखे, भगवानराव कापसे, नंदकुमार वडनेरे, विद्यानंद रानडे, डॉ.दत्ता देशकर, डॉ.बी.जी.जडे, वसंतराव ठाकरे, भगवानराव देशपांडे, डॉ.सु.भि.वराडे, डॉ.मो.शं.पळसकर , मुकुंद गायकवाड, या.रा.जाधव, विजयअण्णा बोराडे, डॉ.सर्जेराव ठोंबरे, डॉ.रा.श्री. मोरवंचीकर यांच्यासारख्या राज्याच्या विविध भागातील मान्यवर विषयतज्ज्ञ व्याख्यात्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा लाभ परिषदेतील उपस्थितांना मिळू शकला. परिषदेच्या पहिल्या दिवशी (16 जानेवारी 2010) उद्घाटन सत्राला मा,ना,श्री. बाळासाहेब थोरात, मा.ना.श्री. राजेश टोपे, औरंगाबाद जि.प.अध्यक्षा सौ. लताताई पगारे, डॉ.माधवराव चितळे, विजयअण्णा बोराडे, जलसंपदा विभागाचे सचिव मु.स. मुंढे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक दिपक कंदी, एम.जी.एम चे विश्वस्त प्रतापराव बोराडे समन्वयक या. रा. जाधव यांची विशेष उपस्थिती होती. या परिषदेचे उद्घाटन उद्घाटक मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात यांचे हस्ते ठिबक व तुषार सिंचन सुरू करण्यास्तव असलेल्या व्यवस्थेची तोटी (नॉब) फिरवून करण्यात आले.

तर सिंचन साधना या सिंचनविषयक गत दहा वर्षांतील उल्लेखनीय लेख अंतर्भूत असणाऱ्या ग्रंथाचे विमोचन मान्यवरांच्या समोर नुसतेच ठेवण्यात आलेले ग्रंथ उंचावून करण्यात आले. सर्वमान्य प्रचलीत पध्दतीप्रमाणे दीपप्रज्वलनाला फाटा देवून करण्यात आलेले परिषदेचे उद्घाटन आणि बंदिस्त ग्रंथावरील वेस्टन दूर रण्याच्या पध्दतीऐवजी टेबलावरील सुटे ग्रंथ उंचावून करण्यात आलेले विमोचन या दोन्ही नवकल्पनांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी मनापासून टाळ्या वाजवून दाद दिली. परिषदेच्या उद्घाटन सत्रातच अॅग्रो इंडिया फलोत्पादन संघ, अकोलादेव ता. जाफ्राबाद जि. जालना या गटशेतीचा पुरस्कार करणाऱ्या संस्थेला सिंचन मित्र पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर सिंचन कार्य प्रशस्तीपत्रांचे मानकरी ठरले वाशिम जिल्ह्याच्या बोरगाव खेड्यातील शेतकरी श्री. वसंता अश्रुजी लांडकर आणि लातूर जिल्ह्यातील नृसिंह पाणीवापर सहकारी संस्था.

म. वांजरखेडा. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (दि.17 जानेवारी 2010) पहिल्या सत्रात जायकवाडी प्रकल्पाच्या 40 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रकल्पाच्या सिंहावलोकनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सिंहावलोकनाचे प्रास्ताविक व सादरीकरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता .श्री. रा.ब.घोटे यांनी केले. त्या निमित्ताने सर्वश्री. या.रा.जाधव, व्यंकटराव गायकवाड, दि.रा.कंदी, वि.म.रानडे, आ.अं.जवळेकर, श्री.ल.वरूडकर यांनी प्रकल्पविषयक लाभहानी बाबतचे विचार मांडले व प्रकल्पाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याच सत्रात तत्कालीन अभियंते व कंत्राटदार यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या अभियंत्यांमध्ये महाराष्ट्र सिंचन सहयोगचे सचिव श्री. प्रदीप चिटगोपेकर आणि सिंचन सहयोग, औरंगाबादचे अध्यक्ष श्री. रा.मं.जोशी यांचा विशेषत्वाने अंतर्भाव होता. प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्पग्रस्तांचा तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या करण्यात आलेल्या सत्कारानंतर त्यांनीही मनोगत व्यक्त करताना आपल्या व्यथा व प्रकल्पाप्रती ऋण यांचा जाहीर उल्लेख केला.

दुसऱ्या दिवशी (17 जानेवारी 2010) परिषदेच्या समारोप सत्रात महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे यांनी विविध समान व समांतर सत्रातील चर्चेद्वारे काढण्यात आलेले निष्कर्ष, ठराव आणि शासनास सादर करावायाच्या शिफारशी यांची मांडणी केली. परिषद यशस्वी करण्याचे कामी सहकार्य करणाऱ्या व विशेष योगदान देणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गाचा व महात्मा गांधी मिशनच्या प्राध्यापकांचा, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यात महात्मा गांधी मिशनच्या प्रा.बी.एम.पाटील, प्रा.एस.जी. कल्लुरकर यांच्याबरोबरच जलसंपदा विभागाच्या सर्वश्री प्र.द.वझे, रमाकांत केंद्रे, आर.पी.काळे व वाल्मीचे श्री.मनोज अवलगावकर यांचा अंतर्भाव होता.कार्यकारी अभियंता श्री. प्र.द.वझे यांचेकडे व्याख्यात्यांची व मान्यवर मंत्रीमहोदयांची निवास व्यवस्था, श्री. रमाकांत केंद्रे यांचेकडे शेतकऱ्यांची निवास व्यवस्था, श्री. आर.पी.काळे यांचेकडे वाहतूक व्यवस्था तर श्री. मनोज अवलगावकर यांचेकडे अधिकाऱ्यांच्या निवास व्यवस्थेबरोबरच सदस्य नोंदणीचे कामही सोपविण्यात आले होते. गोदावरी खोऱ्याचे श्री. वसंतराव मुसांडे यांचेकडे स्मरणिका व सिंचन साधना ग्रंथाचे काम, डॉ.मासूम यांचेकडे सदस्यनोंदणीचे काम, तर सुरेश नाईक यांचेकडे कर्मचारी वाहतूकीचे व स्वागताचे काम सोपविले होते. या तिघांचाही परिषदेत प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांनी परिषदेचा समारोप केला. डॉ. शरद भोगले यांनी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सिंचन सहयोग या परिषदेच्या आयोजक संस्थेचे अध्यक्ष रा.मं.जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने 11 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेची सांगता झाली.

टीप : परिषदेतील विविध व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे अंतरंग व व्यक्त झालेले विचार याच अंकात इतरत्र अंतर्भूत करण्यात आले आहेत.

11 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेतील निष्कर्ष व शिफारशी
- मृदसंधारण व जलसंधारणाचे काम पारंपारिक तलाव - कालवे या सिंचन पध्दतीला पूरक आहे म्हणून या दोन्ही कामात एकसंघपणा ठेवावा.
- जमिनीचा कर्ब सांभाळून पोत वाढविण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा.
- लहान तुकड्याच्या शेतीला गटशेती, सामुदायिक शेती हा पर्याय ठरावा.
- फलोत्पादनातून समृध्दीसाठी शासनाने अनुदान देण्याऐवजी रस्ते, वीज या सारख्या चांगल्या सार्वजनिक सुविधा पुरवाव्यात.
- आर्थिक अनुशेषाबरोबरच भौतिक अनुशेष (प्रकल्प पूर्ण करणे) ही पूर्ण करावा.
- महाराष्ट्र सिंचन परिषदेमधे कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठांचा सहभाग वाढवावा.
- उत्पादनवाढीसाठी आधुनिक सिंचन पध्दतीचा वापर हा एकच राजमार्ग आहे.
- विंधन विहिरीद्वारे भूजल उपशावर नियंत्रण आणावे
- पाण्याचा बाष्पीभवनाद्वारे अपव्यय टाळण्यासाठी पाण्याचे दुय्यम साठे निर्माण करण्यात यावेत.
- पाण्याच्या कायद्याचे अनुपालन केले जावे.
- पाणी मोजण्याची व्यवस्था न बसविता वॉटर ऑडिट, बेंच मार्किंग करणे अशास्त्रीय असल्याने पाणी मोजूनच वापरले जावे.
- चीनप्रमाणे शेतीतून उत्पादन वाढीसाठी देशावर प्रेम केले जावे.
- जांभूळ, बोर, सीताफळ, आवळा, करवंद या सारख्या फळाला रोजच्या व्यवहारात प्रतिष्ठा मिळावी.
- शेणखतासाठी पशूपालन आवश्यक करावे.
- जलस्त्रोतांवर कोणा खासगी व्यक्ती अथवा संस्थेच्याऐवजी समुदायाचा हक्क असावा.
- पाण्यावर शासनाची मालकी असण्याबद्दलचा कायदा करणे हानिकारक ठरेल.
- जलनितीचे दर पाच वर्षांनी पुनर्विलोकन होणे गरजेचे असून तसेच पाणी वापराचा अग्रक्रम बदलून गरजांची किमान पूर्तता हे धोरण ठेवण्यात यावे.
- सिंचन व्यवस्थापनातून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पाणी, खते, बियाणे आणि मजुरांची कार्यक्षमता वाढविण्याचे धोरण ठेवले जावे.
- प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातही शेततळी निर्माण करण्यासाठी शासनाने धोरणात बदल करावा.
- शेतीची बांधबंदिस्ती, पाणलोटक्षेत्र विकासाच्या इतर उपचारापेक्षा (सिमेंट बांध, नालाबांध आदी) मृद व जल संवर्धनासाठी अधिक परिणामकारक असून ती नियमितपणे शासनाच्या आर्थिक आधाराने केली जावीत.
- शेतकऱ्याला शेतीचे अर्थशास्त्र येणे आवश्यक आहे. उत्पादनाचा खर्च काढता आला पाहिजे तरच बाजारात भाव मागता येईल. कराराची शेती वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.
- जायकवाडी जलाशयातील पाणीसाठा दरवर्षी न संपविता, पुढील वर्षासाठी राखून ठेवला जावा.
- जायकवाडी प्रकल्पाची 3 घनमीटर प्रति सेकंद (100 क्यूसेस) पुढची वितरण व्यवस्था नलिकाची करावी. त्याला शेततळ्याची जोड देऊन सर्व सिंचन आधुनिक सिंचन पध्दतीखाली आणावे.
- शेती , सिंचन हे विषय शालेय स्तरापासून शिकविण्यात यावेत.
- प्रत्येक शेतकऱ्याने शेताच्या किमान एका तुकड्यात अधिक उत्पन्नासाठी फळबाग, फूलशेती, भाजीपाला लागवड करावी, ज्यातून एकरी किमान 25 हजार रूपये महिना मिळवावे.
- या ठरावांपैकी काही ठरावांची अंमलबजावणी शासनाकडून करणे गरजेचे आहे, तर काही ठराव शेतकरी व जनतेने आचरणात

आणण्याचे असून, हे ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि.

मा. मोरे यांनी ठरावाचे वाचन करताना सांगितले.