जलगौरव पुरस्कार - 2010 माझे मनोगत

Submitted by Hindi on Sat, 02/06/2016 - 10:52
Source
जल संवाद

भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे पाणी विकासाच्या कार्यात भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या जलकार्यकर्त्याला प्रतिवर्षी देण्यात येणारा अत्युच्च सन्मानाचा जलगौरव पुरस्कार - 2010 मला चंद्रपूर येथे 18 डिसेंबर 2010 रोजी संपन्न झालेल्या 6 व्या जलसाहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला याचा निश्चितच आनंद आहे. हा पुरस्कार राजस्थानचे जलदूत व मॅगासेसे जलपुरस्कार विजेते श्री. राजेंद्रसिंहजी आणि संमेलनाध्यक्ष असलेले आनंदवनचे शिल्पकार तथा महारोगी सेवा समिती, वरोराचे सेवाव्रती अध्यक्ष डॉ. श्री. विकास आमटे यांच्या शुभहस्ते प्रदान झाला म्हणजे दुधात साखर पडावी त्याप्रमाणेच झाले.

भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे पाणी विकासाच्या कार्यात भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या जलकार्यकर्त्याला प्रतिवर्षी देण्यात येणारा अत्युच्च सन्मानाचा जलगौरव पुरस्कार - 2010 मला चंद्रपूर येथे 18 डिसेंबर 2010 रोजी संपन्न झालेल्या 6 व्या जलसाहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला याचा निश्चितच आनंद आहे. हा पुरस्कार राजस्थानचे जलदूत व मॅगासेसे जलपुरस्कार विजेते श्री. राजेंद्रसिंहजी आणि संमेलनाध्यक्ष असलेले आनंदवनचे शिल्पकार तथा महारोगी सेवा समिती, वरोराचे सेवाव्रती अध्यक्ष डॉ. श्री. विकास आमटे यांच्या शुभहस्ते प्रदान झाला म्हणजे दुधात साखर पडावी त्याप्रमाणेच झाले. ज्यांच्या अतुलनीय कार्याची दखल जगाने घेवून विविध सन्मानांच्या पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी गौरविले त्या ऋजू व्यक्तीमत्वाच्या दोन सन्माननीय सेवाव्रतींच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार गेल्या 34 वर्षांपासून माझे दैवत असलेल्या व ज्यांना मी माझे द्रोणाचार्य संबोधतो अशा स्टॉकहोम जलपुरस्काराचे मानकरी डॉ. माधवराव चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिळाल्याने हा आनंद निश्चितच द्विगुणीत झाला. 18 डिसेंबर हा माझा जन्मदिवस. माझ्या 68 व्या वाढदिवशी मला गवसलेला हा पुरस्कार म्हणजे बर्थ डे गिफ्ट ठरल्याने हा आनंदाचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल.

तसे यापूर्वी मला अनेक छोटे मोठे पुरस्कार मिळाले असले अन् महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने राज्यपालांचे हस्ते आदर्श तथा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देवून गौरविले असले तरी भारतीय जलसंस्कृती मंडळ या अशासकीय व अराजकीय संस्थेतर्फे दिला गेलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अनपेक्षित होता. कधीकाळी असा प्रतिष्ठेचा, सन्मानाचा पुरस्कार मिळू शकेल असे स्वप्नातही मला कधी वाटले नव्हते. वस्तुत: कुठल्याही पुरस्कारासाठी मी कधीच काम केले नाही. निष्काम कर्मयोग हाच माझ्या जीवनाचा स्थायीभाव ठरावा अन् सचोटी, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, जीव ओतून केलेले संस्थात्मक तसेच शासकीय काम, विश्वासार्ह कार्यकर्ता एवढीच माझ्या कार्याची ओळख राहावी यापलीकडे जावून मी विशेष उल्लेखनीय असे काही केले आहे असे मला स्वत:ला कधी वाटले नाही. जाणीवपूर्वक विनम्र भावनेने अंगिकारलेल्या या सेवाव्रताला बरेच जण ' हमाली ' किंवा ' लष्करच्या भाकऱ्या भाजणे ' संबोधतात त्याचेही मला कधी वाईट वाटले नाही व रागही आला नाही. माझ्यातील या सहजभावनेनेच गेल्या सहा वर्षांपासून डॉ. दत्ता देशकर या माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या अजोड सहकार्याने जलसंवाद मासिकाच्या माध्यमातून पाणीविषयक विविध पैलूंचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्वांची परिणती मला मिळालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या पुरस्कारात होणे निदान मला तरी अपेक्षित नव्हते. हा पुरस्कार देवून पुरस्कार देणाऱ्यांनी पुरस्कारार्थीची जबाबदारी अनेक पटींनी वाढविल्याचे जाणवले.

भारतीय जलसंस्कृती मंडळाचे समन्वयक सचिव श्री.गजानन देशपांडे यांनी 16 डिसेंबरला सर्वप्रथम मला निरोप दिला की तुम्हाला यंदाचा जलगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हा तुम्हाला याचा अर्थ आम्हाला म्हणजे मी आणि माझे ज्येष्ठ मित्र डॉ.दत्ता देशकर यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जलसंवादला असाच माझा प्रामाणिक ग्रह झाला. डॉ.दत्ता देशकरांचा अर्ध्या तासाने जेव्हा दूरध्वनी आला तेव्हा निरागसपणे मी त्यांचे आणि त्यांनी माझे हार्दिक अभिनंदन करत जलसंवाद च्या सहा वर्षांच्या वाटचालीची दखल घेतली गेल्याचा निर्मळ आनंद एकमेकांकडे व्यक्त केला.

पुरस्काराची गोड बातमी ऐकून मी आमचे व जलसंवादचे मार्गदर्शक, हितचिंतक व सल्लागार डॉ.माधवराव चितळे यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी जलगौरव पुरस्कार 2010 हा व्यक्तीगत स्वरूपात श्री.प्रदीप चिटगोपेकर यांना देण्यात आला आहे असे सांगून मला आश्चर्याचा धक्का दिला. या धक्क्यातून मी लवकर सावरलो नाही. हा पुरस्कार मला अवेळी आणि जरा लवकरच मिळाला असल्याची प्रतिक्रिया मी माझ्या दैवताकडे विनम्रपणे व्यक्त केली. माझे जलसंवादचे ज्येष्ठ संपादक मित्र डॉ.दत्ता देशकर आणि त्यांच्या तोडीचे तसेच माझ्याहून सरस असे अनेक जलमित्र या जलगौरव पुरस्कारासाठी पात्र असल्याने हा पुरस्कार स्वीकारताना मला संकोच वाटेल असे मत मी माझ्या आदर्शाकडे व्यक्त केले.

डॉ.माधवराव चितळे यांनी सर्वानुमते व एकमताने घेण्यात आलेल्या पुरस्कार समितीच्या आणि भारतीय जलसंसकृती मंडळाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे समर्थन करत व त्यांच्या निवडीबाबतचे विश्लेषण करत मला समजावले. जलसंवाद मासिक हे जलविषयक प्रचार, प्रसार व प्रबोधन करणाऱ्या साहित्य प्रकारात वर्गीकृत होत असून त्याचा विचार जलसाहित्य पुरस्कारासाठी वेगळा होवू शकतो. तर जलगौरव पुरस्कार हा पाणी विषयात भरीव योगदान देणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला देण्यात येणारा व्यक्तीगत स्वरूपाचा पुरस्कार असल्याचे सांगून माझ्या मनातला संकोच दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या समजावणीतूनच मला मी पुरस्कारासाठी पात्र असलेला एक चांगला कार्यकर्ता असल्याचे जाणवले. एरव्ही पडेल ते काम अंगावर घेवून, झोकून देवून व जीव ओतून करण्याच्या प्रवृत्तीचे फळ मला जलगौरव पुरस्काराच्या रूपाने मिळाले. निष्काम कर्मयोगातूनच फळाची प्राप्ती झाली. आपले कर्म निष्ठेने करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. फळ ओपोआपच मिळेल या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीतील उक्तीची प्रचिती मला आली. श्री. गजानन देशपांडे यांच्या तुम्हाला पुरस्कार मिळाल्याच्या निरोपातील तुम्हाला हा शब्द अनेकवचनी नसून आदरार्थी एकवचनी असल्याचा उलगडा अशा प्रकारे झाला.

माझे प्रति आपुलकी व प्रेम असणारे माझे हितचिंतक डॉ. माधवराव चितळे, भारतीय जलंसस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष व निवृत्त न्यायमूर्ती श्री.नरेंद्र चपळगावकर, विद्यमान अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. रा. श्री. मोरवंचीकर, मंडळाच्या विद्यमान उपाध्यक्षा व जलसाहित्य मंचप्रमुख श्रीमती अरूणा सबाने, पुरस्कार समितीचे सर्व अज्ञात सदस्य यांचेप्रती मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो - आणि सर्वात शेवटी, हा जलगौरव पुरस्कार मला मिळण्यात आम्ही सहा वर्षे सातत्याने चालवीत असलेल्या ज्या जलसंवाद मासिकाचा मोठा वाटा आहे त्या जलसंवादचे माझे ज्येष्ठ सहकारी संपादक डॉ.दत्ता देशकर यांच्या उल्लेखाशिवाय मला थांबताच येणार नाही. त्यांच्या सदैव ऋणात राहणेच मला आवडेल.

'जलसंवाद' चे संपादक श्री.प्रदीप चिटचगोपेकर जलगौरव पुरस्काराने सन्मानीत
पाणी विकासाच्या कार्यात भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या जलकार्यकर्त्यास प्रतिवर्षी भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे देण्यात येणारा अत्युच्च सन्मानाचा जलगौरव पुरस्कार 2010 यंदा जलसंवादचे संपादक श्री. प्रदीप चिटचगोपेकर यांना नुकतेच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या 6 व्या जल साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रूपये 11000/- रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे असून हा जलगौरव पुरस्कार मॅगासेसे पुरस्कार विजेते श्री.राजेंद्रसिंहजी व आनंदवनचे शिल्पकार डॉ.विकास आमटे यांनी श्री. चिटगोपेकर यांना प्रदान केला. त्यावेळी मंचावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे आणि राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तांत्रिक महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष तथा भारत सरकारचे माजी अर्थमंत्री श्री.शांताराम पोटदुखे उपस्थित होते. सन्मानपत्राचे वाचन जलसाहित्य मंचप्रमुख श्रीमती अरूणा सबाने यांनी केले. श्री.प्रदीप चिटगोपेकर यांना गौरविण्यात आलेले सन्मानपत्र पुढे दिले आहे.

भारतीय जल संस्कृती मंडळ, औरंगाबाद

जलगौरव पुरस्कार 2010


श्री. प्रदीप नारायणराव चिटगोपेकर
- सन्मानपत्र -
पाणी विकासाच्या कार्यात भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या कार्यकत्यास प्रतिवर्षी भारतीय जल संस्कृती मंडळातर्फे देण्यात येणारा अत्युच्च सन्मानाचा जल गौरव पुरस्कार 2010 श्री. प्रदीप नारायणराव चिटगोपेकर यांना प्रदान करतांना मंडळास व जल विकासासंदर्भात सजग असलेल्या समस्त नागरिकांस अत्यंत आनंद होत आहे.

गेल्या 20 वर्षांपासून पाणी विकासाच्या कार्यात आपले योगदान एक अष्टपैलु कार्यकर्ता म्हणून अतिशय ठळक असे राहिले आहे. एक उत्साही व सातत्त्याने सर्व स्तरांत स्वत:स सहजतेने सामाऊन घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपला सार्थ परिचय सर्वांस झाला आहे.

शासनाच्या जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असतांना आपण आपले वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण जपत जे अपूर्व योगदान दिलेत व खात्यावर आपल्या कर्तव्यनिष्ठ कामाचा अमीट ठसा उमटवलात त्याची परिणती राज्याच्या राज्यपालाचे हस्ते आपणांस पहिला आदर्श अभियंता पुरस्कार मिळण्यात झाली होतीच. शासनसेवेतील आपले हे वेगळेपण आपण शासकीय सेवेत असतांनाच सिंचन सहयोग सारखी अशासकीय व अराजकीय संस्था स्थापण्यात अन्य कार्यकर्त्यांसह पुढाकार घेतांना दिसून आले. सिंचन सहयोगच्या स्थापनेपासूनच म्हणजे गेल्या दीड दशकांपासून आपण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आहात. गेल्या पांच वर्षापासून राज्यातील सर्व सिंचन संस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र सिंचन सहयोग चे सचिव या नात्यानेही आता आपण राज्यातील सिंचन चळवळ पुढे नेण्यासाठी निष्ठापूर्वक प्रयत्नशील आहात. सिंचन व पाणी विषयक विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतांना प्रसिद्धि पराड्.मुख राहून केवळ कर्तव्यबुद्धीने कार्यतत्पर कार्यकर्ता म्हणून आपण आपले अपूर्व योगदान प्रदान केलेले आहे.

आपल्या या संस्थात्मक कार्याची दखल घेवून सिंचन सहयोग, औरंगाबादच्या 18 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने आपणास नुकतेच गौरविण्यात आले आहे.

आपण जलविषयक कार्य विविध अंगांनी, नेटाने व निष्ठेने चालविणाऱ्या भारतीय जल संस्कृती मंडळाचे सुरूवातीपासून सदस्य आहात. संस्थेच्या प्रत्येक कामात कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता म्हणून प्रयत्नपूर्वक योगदान देण्यात आपण आघाडीवर असता. भारतीय जल संस्कृती मंडळातर्फे गेल्या पाच वर्षापासून संपन्न झालेल्या नागपूर, पुणे, मालगुंड, नाशिक व जळगाव येथील पाचही जलसाहित्य संमेलनास उपस्थित राहून एक निरलस कार्यकर्ता या रूपाने आपण ती संमेलने यशस्वी करण्यात अपूर्व योगदान केले आहे. आपण आपले मित्र डॉ. दत्ता देशकर यांच्या अजोड सहकार्याने जलसंवाद मासिकाच्या माध्यमातून पाणी विषयक विविध पैलूंचा उहापोह आपण गेली सहा वर्षे सातत्याने करत आहात. कोणताही संस्थात्मक आधार पाठीशी नसतांना प्रसंगी आर्थिक ताण व झीज सोसून आपण डॉ. दत्ता देशकरांच्या बरोबर आपला जलयज्ञ अथकपणे अखंड चालू ठेवला आहे. पाणी विषयावर वेळोवेळी अनेकांना विविध अंगांनी लिहिण्यास प्रवृत्त करून जललेखकांची एक मजबूत फळी निर्माण करण्यामागे आपले फार मोठे परिश्रम आहेत.

गेल्या वीस वर्षांपासून पाणी विकासाच्या कार्यात आपले भरीव योगदान राहिले आहे. एक उत्साही, सातत्याने कार्य करणारा, विश्वासार्ह व यशस्वी कार्यकर्ता म्हणून आपला ठसा सर्वत्र उमटलेला आहे. आपल्या या सर्व गौरवास्पद कामगिरीचा विचार करून चंद्रपूर येथील सहाव्या जलसाहित्य संमेलनात जलकार्यकर्त्यांसाठी असलेला 2010 या वर्षासाठीचा जलगौरव पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.

श्री. प्रदीप चिटगोपेकर, पुरस्कारार्थी, औरंगाबाद (भ्र : 9850697360)