वारसा पाण्याचा - भाग 11

Submitted by Hindi on Fri, 03/04/2016 - 10:32
Source
जल संवाद

काही किल्ले नदीतच बांधलेले आहेत आणि यामुळे किल्ल्याचा एक तट तलावाची पाळ म्हणून काम करतो. सोलापूरच्या किल्ल्याने सिध्देश्वर तलाव निर्माण केला. चंद्रपूरच्या किल्ल्याने रामाळा तलाव निर्माण केला. फत्तेपूरसिक्रीचा किल्ला आणि तुघलक किल्ला हे तलावातच बांधलेले आहेत. तंजावरच्या राजवाड्याच्या खंदकातून ग्रॅड ऐनिकटचा कालवाच वहातो आहे.

त्या काळची शहरे म्हणजे किल्ले असे समजण्यास काही हरकत नाही. किल्ले हे मुख्यत: चार प्रकारचे. भुईकोट, डोंगरी, वनदुर्ग व जलदुर्ग. स्वत: राजा, त्याचे अफाट सैन्य, घोडदल, हत्तीदल, मंत्री आणि संबंधित असलेली प्रजा ही किल्ल्यामध्येच रहात असे. आंध्र प्रदेशातील वरंगल येथील काकतीय राजवटीतील किल्लादेखील असाच आकाराने मोठा आहे. औरंगाबादजवळील देवगिरीचा किल्ला, हैद्राबादचा गोलकोंडा अशी अनेक उदाहरणे देता येतील. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुरूड जंजिरा, जयदुर्ग हे समुद्रातील किल्ले आहेत.

इतिहासात एखाद - दुसरा अपवाद सोडला, तर असा कोठेही संदर्भ येत नाही की, किल्ल्यामध्ये पाणीसाठा कमी पडला, राजधानीचे स्थलांतरण झाले इत्यादी. विजयनगरचे साम्राज्य संपले, पण तो वारसा डोळ्यासमोर ठेवून मराठी राज्य उदयास आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सतराव्या शतकाच्या शेवटी, राज्यारोहणाचा भव्य असा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम मे - जून महिन्यात ऐन उन्हाळ्यात घडून आला असावा, पण अशी कोठेही नोंद आढळत नाही की, रायगडावर पाण्याची चणचण भासली. आजही रायगड पहातांना त्या गडावर अवती - भवती अनेक पाण्याचे साठे दिसतात. किती असावेत ? कोणी मोजले नाहीत. सिंहगडावरही अशीच स्थिती आहे. किल्ले पुरंदर, देवगिरी, गुजरातमधील पावागड, तापीच्या उत्तरेकडील आशीरगड व त्याच्या अलिकडे अनकाई, टनकाई, पेमागिरी, कोल्हापूर भागातील पन्हाळा, साताऱ्याजवळ अजिंक्यतारा, सज्जनगड, विदर्भातील गावीलगड, नरनाळा, राजस्थानातील चितोड, अशी किती तरी उदाहरणे देता येतील की, ज्या ठिकाणी जमिनीवर मातीची - दगडाची भिंत बांधून व खडक कोरून मोठ्या संख्येत लहान - मोठे पाण्याचे साठे निर्माण केलेले चित्र दिसून येते. महाराणा प्रतापच्या चित्तोड गडावरील महाल (राणी पद्मीनी, संत मीरा व पन्नादायी इ.) हे तलावातच आहेत. अशा साठवलेल्या पाण्याचा उपयोग एकाच वर्षासाठी नाही, तर पावसाने ताण दिला तरी पुढील वर्षात पाण्याचा तुटवडा भासू नये अशी पध्दतीने होत असावा. गडावर पडलेल्या पाण्याचा थेंब वाहून जावू न देता त्याला अडवून, साठवून त्याचा वापर पुढील काळात करण्याचे कौशल्य दोन अडीच हजार वर्षांपासून या भूमीवर राबविलेले आहे हे आपणास सहज दिसते.

समुद्रातील किल्ल्यांमध्येही हेच तत्व अंगिकारले आहे. चोहोबाजूने खारे पाणी, पण समुद्रातील त्या जमिनीच्या लहानशा भागावर मात्र मुबलक गोड पाणी, ही निसर्गाची किमया आहे. त्याला शास्त्रीय आधार आहे. भूप्रदेशावर पडलेले पावसाचे पाणी, त्याच ठिकाणी मुरवून विहीरी, बारव, तलाव यांच्या माध्यमाने वापर करण्याचे तंत्र त्या समाजाने विकसित केलेले दिसून येते.

भुईकोट किल्ल्यातील जलव्यवस्थापन याही पेक्षा पुढे जाते. किल्ल्याभोवती कालवा (खंदक) खोदून त्यातून अविरतपणे पाणी खेळवून किल्ल्यातील पाणीपुरवठ्यासाठी पुनर्भरण केलेले आपणास दिसते. असा एकही भुईकोट किल्ला नाही की ज्याच्या भोवती खंदक नाही. अगदी पुण्याच्या जवळील लहानशा चाकण व इंदोरी किल्ल्याचे उदाहरण घेतले तरी चालेल. तेथे उत्तम खंदक आहेत. खंदकातील पाणी जरी किल्ल्याचे संरक्षण करीत असले, तरी त्याचे महत्वाचे काम पुनर्भरणाचे आहे, हे सहजपणे समजून येते. यामुळेच किल्ल्यातील विहीरींना, बारवांना, तलावांना अविरतपणे भूजलाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

हे खंदक - कालवे जवळच्याच नदी, ओढा वा तलावास जोडलेले आहेत. अनेक ठिकाणी नद्यांचे प्रवाह खंदकात वळविलेले आहेत. यमुनेकाठचा आग्रा किल्ला, दिल्ली परिसरातील अनेक किल्ले, तंजावरचा बृहदेश्वरचा किल्ला अशी अनेक उदाहरणे देता येतील. काही किल्ल्यांच्या वरच्या भागात तलाव बांधून, (करमाळा, सोलापूर, चंद्रपूर इत्यादी) तलावांचे पाणी खंदकाला जोडलेले आहे. गुलबर्गा येथील किल्ल्याचे वैशिष्ट्य मात्र वेगळे आहे. एका लहानशा नदीला वळवून खंदकात घेण्यात आले आहे व या खंदकाचे जास्तीचे पाणी जगत नावाच्या तलावात घेण्यात आल्याचे आजही आपणास दिसते. या तलावांच्या खाली भाताची शेती कसली जाते. सोलापूरजवळील नळदुर्गचा किल्ला हा अभियांत्रिकी शास्त्रामधील एक उत्कृष्ट नमुना आहे. वरंगलच्या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने तो स्वयंपूर्ण म्हणावयास हरकत नाही. मंगळवेढा, अक्कलकोट या गावांच्या भोवती खंदक पाहावयास मिळतो. या खंदकांना त्यांच्या वरच्या भागातील तलावांनी जोडले आहे.

राष्ट्रकुटांची राजधानी कंधार (नांदेड) व त्या ठिकाणचा जगतुंगसागर आजसुध्दा (1400 वर्षांपूर्वीचा) दिमाखाने उभा आहे. त्यानंतरच्या यादवांच्या काळात पाणी व्यवस्थापनातील कौशल्याने परमोच्च बिंदू गाठलेला दिसतो. राज्याची, सैन्याची वास्तव्याची ठिकाणे म्हणजे किल्ले. किल्ले जलसंवर्धनाचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत. देवगिरीचा गिरीदुर्ग जमिनीपासून 250 - 300 मीटर उंच व त्यावर पाण्याचे सात टाके आहेत. ते पण भुयारी मार्गाने एकमेकास जोडलेले व खडकात कोरलेले आहेत. आज पण जीवंत दिसतात. सिंहगडच्या किल्ल्यावर अनेक तलाव होते. आज 100 एक पहावयास मिळातात. यातील काही खडकात कोरलेले तर काही पृष्ठभागावर मातीचे वा दगडांचे बांध घालून निर्माण केलेले आहेत. जवळ जवळ असेच चित्र सर्व गिरीदुर्गांवर पहावयास मिळतात. रायगड, प्रतापगड, पुरंदर, तोरणा, अशीरगड, शिवनेरी, विशालगड, नरनाळा, अनकाई, पेमगिरी इत्यादी. या व अशा अनेक गिरीदुर्गावर तलावाची मालिकाच निर्माण केलेली आपणास पहावयास मिळते. नरनाळा, गाविलगड, पुरंदर वर तलावाची मालिकाच आहे. पाण्यामध्ये विपुलता निर्माण करणारी ही इतिहासकाळातील उत्तम उदाहरणे आहेत. पडलेले पाणी पृष्ठभागावर वा भूमिगत साठवणीत साठवून ठेवायचे आणि किल्ल्यातील वास्तव्यासाठी (राजघराणी, सैन्य, घोडदळ, हत्ती इ. ची) कायमची बारमाही पाण्याची सोय करण्याचे तत्व त्यांनी उत्कृष्टपणे हाताळलेले दिसते.

भुईकोट किल्ला तर जलसंधारणाचा एक आदर्श नमुनाच आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राजवटीत निर्माण केलेले भुईकोट किल्ले हजारोंच्या संख्येमध्ये सापडतील. महाराष्ट्रातही अनेक आहेत. किल्ला म्हणजे शहरच. देवगिरीच्या पायथ्याच्या किल्ल्यामध्ये त्या काळी (11 वे / 12 वे शतक) लाखापेक्षा अधिक लोक रहात असावेत असे इतिहासकार सांगतात. अशा किल्ल्याला मजबूत अशा तटबंदी व त्याच्या बाहेर खंदकाची मालिका अशी त्यांची संरक्षणाच्या दृष्टीने रचना आहे. खंदकामध्ये बारा महिने पाणी भरून ठेवण्याची व्यवस्था आहे. किल्ल्याच्या आत मात्र विहीर व बारवाद्वारे पाणी वापरण्याची व्यवस्था केलेली आहे. या विहीरी आणि बारवांना बारा महिने मुबलक पाणी पुरवठा होण्याचे गमक हे किल्ल्याच्या भोवती असलेल्या पाण्याच्या कड्यामुळे. म्हणून खंदक हे सुरक्षिततेपेक्षा पुनर्भरणाचे एक उत्तम साधन म्हणून वापरले जात होते असेच या निरीक्षणातून दिसून येते.

आणि म्हणून किल्ल्यात पाण्याची चणचण जाणवली नाही. देवगिरीच्या पायथ्याचा किल्ला नगर, बीड, धारूर, परांडा, करमाळा, औसा नळदुर्ग, उदगीर, सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट, सिन्नर, बाळापूर, अकोला, आचलपूर, चंद्रपूर, विजापूर, बिदर, गुलबर्गा, फत्तेपूर सिक्री, आग्रा, दिल्लीचा लाल किल्ला, जुना किल्ला, तुघलक किल्ला, तंजावरचा किल्ला, कंधारचा किल्ला, चाकण, गोवळकोंडा, अशी अनेक इतिहासकालीन जलसंधारणाची, किल्ल्याच्या स्वरूपातील उदाहरणे आजपण जीवंत अवस्थेत पहावयास मिळतात. अशा खंदकात पाणी आणण्याची व्यवस्था ही आगळी वेगळीच आहे. गोवळकोंड्याच्या किल्ल्यात साधारणत: 5 कि.मी अंतरावरील दुर्गया या तलावातून भूमिगत कालव्याद्वारे पाणी आणल्याचे दिसून येते. कंधारच्या किल्ल्यासाठी वर जगतुंगसागर बांधलेला आहे. करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा व विजापूर येथील किल्ल्यासाठी तलावांची व्यवस्था आहे. नळदुर्गच्या खंदकात बोरी नदीच वळविलेली आहे. आग्रा व दिल्लीच्या लाल व जुन्या किल्ल्याच्या खंदकात यमुना नदी वळविलेली आहे. बीडच्या किल्ल्यात बिंदुसरा नदी वळविलेली आहे. औशाचा व परांडाचा किल्ला वाटीच्या आकाराचा आहे.

काही किल्ले नदीतच बांधलेले आहेत आणि यामुळे किल्ल्याचा एक तट तलावाची पाळ म्हणून काम करतो. सोलापूरच्या किल्ल्याने सिध्देश्वर तलाव निर्माण केला. चंद्रपूरच्या किल्ल्याने रामाळा तलाव निर्माण केला. फत्तेपूरसिक्रीचा किल्ला आणि तुघलक किल्ला हे तलावातच बांधलेले आहेत. तंजावरच्या राजवाड्याच्या खंदकातून ग्रॅड ऐनिकटचा कालवाच वहातो आहे.

किल्ल्याच्या तटबंदीचा उपयोग करून जसे किल्ल्याबाहेर तलाव निर्माण करण्यात आले त्याप्रमाणेच किल्ल्याच्या आत देखील तलाव निर्माण केलेली उदाहरणे आपणास अशीरगड, सिंहगड, गावीलगड, नरनाळा या ठिकाणी आजपण जीवंत अवस्थेत पहावयास मिळतात.

देवगिरीचा किल्ला हा गिरीदुर्ग व भुईकोट किल्ला यांचे उत्तम मिश्रण आहे. या ठिकाणची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथील गिरीदुर्गाला देखील खंदक आहे. या खंदकासाठी जो खडक तासलेला आहे त्या ताशीव कामाला जगात तोड नसावी. या उंचावरील खंदकात पाणी कसे आणले असावे ? असा साहजिकच प्रश्न पडतो. आणि मग याचे उत्तर मिळते त्या काळी (1000 वर्षापूर्वी) त्या समाजाने जलगती (Hydraulics) आणि जलसंधारण (Rainwater Harvesting) या दोन शास्त्रात गाठलेल्या अत्त्युच्च उंचीकडून जवळच्याच साधारणत: 1 कि.मी अंतरावरील मौसाळा टेकडीवरून पावसाचे पाणी एकत्रित करून दोन नलिकाद्वारे (400 मि.मी व 200 मि.मी) जमिनीच्या चढउतारानुसार दगडी बांधकामात बांधून या खंदकात आणून सोडलेले आहे. जमिनीच्या चढउतारातील फरक हा 20 ते 25 मीटर इतका आहे. पावसाळ्याच्या अल्पकालावधीत या शुष्क प्रदेशात पडणारं तुटपुंज पाणी बारमाही वापरासाठी देवगिरीच्या खंदकात साठवून मोटेद्वारे पायथ्याच्या किल्ल्याभोवतीच्या प्रजेला, सैन्याला, हत्तीला पुरविण्याची व्यवस्था हा एक जल अभियांत्रिकी मधील जगातील उत्तम नमुना असावा. आज देखील ही व्यवस्था अभ्यासण्यासाठी व्यवस्थितपणे उपलब्ध आहे. या ठिकाणची वर्षा जल संधारणाची (Rainwater Harvesting) व्यवस्था, त्यासाठी वापरलेले जलगती शास्त्रातील तत्व हे जगातील, इतिहासकाळात उभे केलेले असं एकमेव उदाहरण असावे.

देवगिरीसारख्या शुष्क प्रदेशात ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण 500 मि.मी आहे, तापमान 45 अंश च्या वर जाते आणि आर्द्रता ही 50 टक्के पेक्षाही कमी आहे, त्या ठिकाणी पाण्यात विपुलता निर्माण करण्यासाठी पाणी हाताळण्याची वेगवेगळी कौशल्य वापरलेली आपणास दिसतात. यादवकालीन बांधलेल्या तलावांची मालिका, शेवटच्या खंदकात (7 वा) बांधलेले ओळीतील बंधारे आणि त्यातून आजूबाजूच्या बारवांना व विहीरींना पाण्याचा मुबलक पुरवठा आजसुध्दा पहावयास मिळतो. यादवांनी जवळ जवळ 300 वर्षे राज्य केले. पाण्याच्या दृष्टीने निसर्गनिर्मित अवर्षणप्रवण अशा प्रदेशाचं रूपांतर मानवी कौशल्याच्याद्वारे पाण्याच्या विपुलतेत करण्यात आल्याचे उदाहरण येथे आपणास दिसते.

यातून खालील प्रमुख कौशल्ये आपल्या नजरेसमोर येतात. 1. जलविज्ञान 2. जलगती शास्त्र 3. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) 4. Inverted siphon 5. पाणी साठवण 6. रॉक कटिंग 7. रेन वॉटर हार्वेस्टिंग 8. पाण्याचा बहुउपयोग इत्यादी पाणी उचलण्यास अडचण येवू नये म्हणून खंदकामध्ये (Diphragms) पडद्या ठेवलेल्या आहेत. त्या पडद्यातून एका ठराविक उंचीवरचे पाणी दुसऱ्या भागात जाते. पाणी व्यवस्थापनाचा सूक्ष्म विचार या व्यवस्थेतून आपल्याला दिसून येतो. पानकळा जर चांगला असेल तर खंदकामधील जास्तीचे पाणी बाहेर घेवून जाण्यासाठी एस्केपची (सांडवा) व्यवस्था केलेली आहे आणि या व्यवस्थेतून वाहणारे पाणी या किल्ल्याच्या शेवटच्या खंदकामधील बंधाऱ्याच्या साखळीत अडवून सिंचनाची व्यवस्था केलेली आज पण आपणास पहावयास मिळते. रेन वॉटर हार्वेस्टिंग एक जगातील उत्कृष्ट नमुना आणि त्याद्वारे खंदकामध्ये पाणी भरण्याची व्यवस्था आणि त्या पाण्याचा उपयोग वर्षभर करण्याची सोय हा यातील एक महत्वाचा धागा आपणास मिळतो.

उस्मानाबाद - सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर करमाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी अलिकडे म्हणजे 17 व्या शतकानंतर हैद्राबाद निजामाचा मराठी सरदार निंबाळकर यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे. हा भागसुध्दा दुष्काळी, पाऊस हा 500 मि.मी च्या आसपास पडणारा, तापमान 45 अंश सेंटिग्रेटपर्यंत जाणारे, शुष्क हवा, हलकी जमीन असलेला आणि सीना ह्या तुटीच्या खोऱ्यातला आहे. या ठिकाणचा राजा रावरंभा निंबाळकर त्याच्या काळात बांधण्यात आलेले कमलादेवीचे मंदीर आणि त्याच्या पुढील भागात 96 पायऱ्यांची बारव आज देखील पहाण्यास उपलब्ध आहे.

करमाळा गावास मात्र जुना इतिहास आहे असे स्पष्टपणे या ठिकाणच्या वास्तूंवरून दिसते. त्या गावामध्ये एक लहानसा भुईकोट किल्ला आहे. नेहमीप्रमाणे त्याच्या भोवती दोन खंदक आहेत. खंदकाच्या आत दोन यादव / चालुक्याच्या काळातील उत्कृष्ट देवळे आहेत. किल्ल्याला लागूनच एक बारव आहे. किल्ल्याच्या आत एक कारंजा बारव आहे. या किल्ल्याच्या अवतीभोवती जुने गाव आहे.

त्या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावाला लागूनच एक सात विहीरींची बारव आहे. या बारवेचा आकार 150 - 200 फूट व्यासाचा आहे. तिची खोली 70 - 80 फूट असावी. त्या विहीरीमध्ये परत सात विहीरी आहेत आणि पाणी हे जमिनीला काठोकाठ असे भरलेले असते. ही मोठ्या आकाराची प्रचंड विहीरी, विहीरखोदाईच्या शास्त्रातील आश्चर्य मानायला काही हरकत नाही. ती कढईच्या आकाराची आहे. ज्या लहानशा नाल्यावर हा तलाव बांधलेला आहे तोच नाला पुढे खंदकाला पाणी पुरवठा करतो. या सात विहीर नावाच्या मोठ्या विहीरीवरून करमाळा गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अलिकडे म्हणजे अगदी 1960 पर्यंत होत होता असे कळते. विहीरीपासून काढलेल्या एका नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जात असे. त्याला पुढे हौदाची मालिका जोडलेली आहे. ही व्यवस्था आजसुध्दा उध्वस्त झालेल्या अवस्थेत आपणास दिसते. दोन माणसाद्वारे किंवा रहाटाचा उपयोग करून या नलिकेला (पाईपलाईनला) सातत्याने पाणीपुरवठा केला जात होता असे सांगतात. अलिकडच्या काळात दूर अंतरावरून (सीना नदीतून) पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे ही सर्व जुनी ऐतिहासिक व्यवस्था आज वापरात नाही.

साधारणत: या गावाला जहागिरी जी मिळाली ती सतराच्या शतकापासून पुढची असेल, तर त्या ठिकाणच्या मंदिराचे अस्तित्व, विहीरीचे अस्तित्व यावरून या गावाचा इतिहास हा फार मागचा आहे हे दिसते. अशा कोरड्या हवामानाच्या, कमी पावसाच्या भागात हे ठिकाण वसलेले असतांना सुध्दा तलाव, त्याला जोडून विहीरी, त्या तलावाच्या नाल्याला खंदकाला जोडणारी जी पाणी वापराची व्यवस्था आहे असे म्हणायला काही हरकत नाही. किल्ल्यामध्येही बारा महिने विहीरीच्या माध्यमाने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था म्हणून खंदकाचा पुनर्भरणासाठी उपयोग केला जात होता.

अशा शुष्क भागातसुध्दा पावसाचे पाणी तलावात साठविणे आणि त्या पाण्याला जमिनीत मुरवून विहीरीद्वारे त्या पाण्याचा मानवाच्या वापरासाठी उपयोग करणे आणि त्याच्याच जोडीला जास्तीचे झालेले पाणी खंदकात घेवून खंदक भरून ठेवणे आणि किल्ल्यातील पाण्याची व्यवस्था करणे हे कौशल्य आपल्याला या व्यवस्थेतून सापडते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे विहीरी निर्माण करण्यापूर्वी त्या विहीरीमध्ये पुनर्भरण होण्याची व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता त्या काळातील लोकांना पटली होती. ही आहे, म्हणून या व्यवस्थेला सातत्य लाभलेले आहे. आज आपण विहीरी खोदतो पण पुनर्भरणाची सोय करत नाही आणि म्हणून विहीरीच्या जीवंतपणात सातत्य राहत नाही.

वरील दोन्ही उदाहरणे, एक डोंगरी किल्ल्याचे व एक भुईकोट किल्ल्याचे, पण दोन्हीही अवर्षणप्रवण, कोरड्या, हवामानातील, हलक्या जमिनीतील आहेत. निसर्गत: पाण्याची चणचण असतानासुध्दा मानवी कौशल्यातून त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात विपुलता गाठलेली आहे. त्या ठिकाणचे सैन्य, हत्ती, घोडे व प्रजा यांना पुरेल इतकी पाण्याची व्यवस्था त्यांनी सर्वप्रथम केलेली होती. करमाळा येथील मंदिरे, विहीरी, तलाव या व्यवस्था पुन्हा आपणास यादव काळ आणि त्यांच्याही पलिकडे घेवून जातात. या ठिकाणच्या 96 पायऱ्या असलेल्या विहीरीचा उपयोग हा मर्यादित असावा कारण त्याच्या वरच्या भागात भूजलाला आधार देण्यासाठी पुनर्भरणासाठी तलावाच्या स्वरूपात वा अन्य प्रकारची सोय नाही. ही सोय किल्ल्याच्या जवळील सात विहीरीला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जमिनीतून जितका उपसा कराल त्याच्यापेक्षा जास्त पाणी मुरविण्यासाठी आपण जोपर्यंत व्यवस्था करणार नाही तोपर्यंत पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेला सातत्य लाभणार नाही हा निष्कर्ष या व्यवस्थेतून आपणास मिळतो.

डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670