Source
जल संवाद
इतिहास काळामध्ये जवळ जवळ सर्वच (शहरी व ग्रामीण) भागात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था या भूजलावर अवलंबून होत्या. गाव तेथे गाव तालव आणि गावामध्ये सार्वजनिक व खाजगी विहीरी आणि त्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सूत्र बसविलेलं होत. गावतलाव हे चांगल्या पध्दतीने बांधले होते.
आधुनिक कालखंडात शहराची वाढ होवू लागली, उद्योगधंदे वाढू लागले, पाण्याचा वापर वाढला. वापरलेले प्रदूषित पाणी शहरात जवळच्या नदी नाल्यात येवून त्या पाण्याला प्रदूषित करू लागले. उद्योगधंद्याचा विळखा शहराभोवती पडू लागला. देशभरामध्ये नद्याचे पाणी प्रदूषित होण्याची प्रक्रिया वाढू लागली. अनेक कारणामुळे वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था बसविण्यामध्ये आपला समाज मागे पडला. 20 व्या शतकाच्या सुरूवातीला पुणे शहरातील वापरलेल्या पाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करून त्या पाण्यातून सिंचन करण्यात पहिला प्रयोग हडपसर भागात करण्यात आला. या प्रयोगाचा प्रणेता म्हणून ब्रिटीश अभियंता सी.सी. इंग्लिश यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.पुणे शहराच्या पूर्वेकडे हडपसर जवळ भैरोबा नाल्यावर पुणे शहरातील वापरलेले पाणी एकत्रित करून पंप बसवून (भैरोबा पंपिंग स्टेशन) ते उचलून त्यावर प्रक्रिया करून मुठा कालव्यातील स्वच्छ पाण्याबरोबर मिसळून शेतीला वापरण्याचा प्रयोग 1916 मध्ये राबविण्यात आला. हा प्रयोग फार यशस्वी झाला. या वापरलेल्या पाण्यातून घनखत उपलब्ध झाले आणि नायट्रोजनयुक्त पाणी (ट्रीटेड सिवेज वॉटर) उपलब्ध झाले. हे पाणी खताच्या दृष्टीने फारच मूल्यवान असते. शेतीला हे पाणी दिल्याने शेतीची सुपिकता वाढते. अशा जमिनीसाठी बाहेरून खत विकत घेण्याची गरज भासत नाही. जमिनीची उत्पादकता खूप वाढते. या पाण्यामध्ये खताचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते प्रमाण पिकांना सोसत नसल्यामुळे कालव्याचे पाणी त्यात मिसळून तीव्रता कमी करावी लागते.
हा प्रयोग हडपसर भागात जवळ जवळ 70 ते 75 वर्षापासून राबविण्यात आला. काळाच्या ओघात या व्यवस्थेकडे म्हणावे तितके लक्ष दिले गेले नाही. पाणी देण्याची व्यवस्था विस्कळीत झाली. शहराची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. उद्योगधंदे वाढले, यातून निर्माण होणार्या, वापरलेल्या पाण्याचे प्रमाण पण फारच वाढले. हे सर्व पाणी पुणे शहराच्या मुठा नदीत येते. मुठा नदी ही नदी राहिली नसून घाण पाणी वाहून नेणारी गटार झाली आहे. हेच पाणी उजनी जलाशयाला प्रदूषित करीत आहे.
या संकटाची जाणीव होवून पुणे महानगर पालिकेने गेल्या चार ते पाच वर्षापासून इतिहास कालीन हडपसर प्रयोगापासून धडा घेवून शहराच्या वेगवेळ्या भागात अशा वापरलेल्या पाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करण्या (sewage treatment) च्या व्यवस्था बसवून ते पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. पिपंरी - चिंचवड भागात पण वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून पाणी सिंचनासाठी वापरले जात आहे. हे पाणी जवळच्या शेतीला उपलब्ध करून शेतीचे उत्पादन वाढवले जात आहे.
देशात प्रथमच 20 व्या शतकाच्या सुरूवातीला असा प्रयोग घडवून आणण्यात आला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. यानंतर मधल्या काळात प्रगती झाली नाही. त्याचा परिणाम आता भोगावा लागत आहे. देशभरात नद्यांचे प्रदूषण होण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आवाक्याबाहेर गेले आहेत. यावर मात करण्यासाठी जिद्दीने प्रक्रिया केंद्राची (sewage treatment plants) निर्मिती करून त्या योजना परिमणामकारकपणे राबविलेल्या गेल्या पाहिजेत. पुणे येथील ही ऐतिहासिक व्यवस्था भविष्यासाठी पथदर्शक ठरणार आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर हंपी येथे पण लहान आकाराची अशी व्यवस्था असल्याचे दिसून येते. या वापरलेल्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होत असल्याचे कळते.
इतिहास काळामध्ये जवळ जवळ सर्वच (शहरी व ग्रामीण) भागात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था या भूजलावर अवलंबून होत्या. गाव तेथे गाव तालव आणि गावामध्ये सार्वजनिक व खाजगी विहीरी आणि त्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे सूत्र बसविलेलं होत. गावतलाव हे चांगल्या पध्दतीने बांधले होते. बार्शी जवळ पाणगाव येथे अष्टकोनी तलाव आहे. या तलावाची रचना उत्तम आहे. कोकण भागात तर प्रत्येक गावामध्ये तलाव आहेत. हे तलाव म्हणजे पुनर्भरणाच्या व्यवस्था, या तलावामुळे गावातील सार्वजनिक व खाजगी विहीरीत पुनर्भरणामुळे पाण्याचा भरणा होतो. लहानशा विहीरींना आड असे म्हटले जाते. जमिनीमध्ये खोलवर भूजल अडवून त्याचा साठा करणारी व्यवस्था म्हणून याला आड म्हणतात. जुन्या काळात असे लहान आड प्रत्येक वाड्यात असत, वाड्यामध्ये पडलेले पाणी वाड्यामध्ये अडवून भूजलाची पातळी वाढवून वाड्यातील आणि शेजारच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था केलेली असे. दोन ते तीन फूट व्यासाचे आड 50 ते 60 फूट खोली पर्यंत खोदून निर्माण करण्याचे कौशल्य स्थानिक कारागिराकडे होते, आज पण असे आड विशिष्ट प्रकारचे लोक बांधून देतात.
गावठाणातील पाणी, गावातच साठवून पुनर्भरणाची कायमची व्यवस्था करण्याची परंपरा या देशातील जलसंस्कृती होती. या बरोबरच वाड्यातील पाणी वाड्यातच मुरवून आडातील पाणी वर्षभर वापरण्याची कला, तंत्र हे देखील या खंडप्राय देशाला नवीन नाहीे. अतिशय कमी पाऊस पडणार्या राजस्थान भागाला याच तलावानी आणि आजूबाजूच्या आड व विहीरींनी स्वयंपूर्णता दिली आहे.
आडाची निर्मिती इ.स. पूर्व दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी मोहंजोदारो आणि हरप्पा संस्कृतीच्या कालखंडात झालेली आहे असे इतिहासकार मानतात. काळाच्या ओघात या अशा अतिशय चांगल्या व्यवस्थेकडे आपले दुर्लक्ष झाले. आडातून पाणी उचलण्यासाठी मनुष्यशक्तीचा वापर करण्यामध्ये कमीपणा वाटू लागला. ग्रामीण जीवनाला आधार या ठिकाणी निखळून पडू लागला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांच्या अवाजवी मागण्या पुरविण्याचा या लोकशाहीच्या युगात पायंडा पडू लागला, नाही म्हणण्याची ताकद प्रशासनामध्ये निर्माण झाली नाही. शहराप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये पण नळाने पाणी देण्याची मागणी पूर्ण करावी लागली. मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिकी पध्दतीने बोअरवेल व ट्यूबवेल निर्माण करून त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यामध्ये स्पर्धा लागल्या. असे करीत असतांना पुनर्भरणाची साधने वाढविण्यावर भर दिला गेला नाही. जुन्या गाव तलावासारख्या साधनांकडे लक्ष न दिल्यामुळे ती नामशेष झाली. पुनर्भरण नाही, उपसा मात्र अनियंत्रित, यामुळे विदारक चित्र निर्माण झाले. ऐतिहासिक परंपरा मात्र अगदी वेगळे शिकवते.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (ग्रामीण भागात) राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशाने कसा सोडविला आहे, याकडे डोळेझाक करून चालणार नाली. पाणी दूरवरून उचलून आणून नळाद्वारे द्यावे हा निर्णय ग्रामीण भागात राबविल्यामुळे लोकांना परावलंबनाकडे घेवून जाण्यात गतिमानता आली. ही नळसंस्कृती जुन्या आड संस्कृतीला उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरली. ग्रामीण भागाचा आधार गावतलाव, विहीर, आड आणि या व्यवस्थेचे खच्चीकरण झाले. तलाव, विहीर, आड बुजविण्यात आले. ज्या ठिकाणी ते शिल्लक आहेत, त्यातील पाणी न वापरल्याने क्षारयुक्त झाले. लाखमोलाची व्यवस्था वाया गेली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर झाले.
गावागावामधील तलावाची श्रृंखला उध्वस्त झाली. विहीरी गाळानी भरल्या, आड बुजविण्यात आले आणि गावात टँकर आला, नळ आले, या न पेलविणार्या व्यवस्था, न परवडणार्या व्यवस्था, यांचे परिचालन शासन नियंत्रित, उपलब्धता अनियमित, सातत्य नसलेली, याचा परिणाम पाणी टंचाईमध्ये झाला. वर्षानुवर्षे हा प्रश्न बिकट होत चालला आहे.
मुंबई शहर एकेकाळी (साधारणत: 19 व्या शतकाच्या मध्यापर्यत) भूजलावर आधारित होते. मुंबई शहरात शेकडो तलाव व हजारो विहीरी होत्या. शहराची वाढ, उद्योगधंद्यांची वाढ, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया न करणे, यातून भूजलाचे प्रदूषण, विहीरीच्या पाण्याची गुणवत्ता ढासळणे या दुष्टचक्रात मुंबईपण सापडली. भूजल प्रदूषित झाल्यास त्यास स्वच्छ करणे फार अडचणीचे असते. मुंबईच्या फोर्ट भागात काही विहीरी अद्यापही आपले अस्तित्व दाखवतात. चर्चगेट जवळ पारशी विहीर आहे. येथे स्वच्छ पाणी लोकांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. बर्याच विहीरींतून शहरामध्ये पाण्याची विविध कामासाठी विक्री केली जाते. पुणे शहर हे देखील भूजलावर आधारित होते, पाणशेत धरण फुटले त्यावेळी बराचसा काळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील विहीरींनीच आधार दिला होता. शहराची लोकसंख्या वाढली, त्यामुळे पाण्याची गरज वाढली, हे करत असतांना जुन्या विहीरींचा विचार केला गेला नाही. जुन्या व नवीन विचाराची सांगड आवश्यक होती. हीच परिस्थिती जवळजवळ देशाच्या सर्व भागात झालेली आढळते.
कोकणात तलावात विहीरी आहेत त्या पाठीमागची भूमिका फार विचार करण्यास भाग पाडणारी आहे. या विहीरी उन्हाळ्यातच उपलब्ध होतात. उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा गावाला पाण्याची तूट जाणवते त्यावेळी या विहीरीतील पाण्याचा उपयोग केला जातो. तो पर्यंत विहीरी भोवती पाणी असल्यामुळे या विहीरीच्या पाण्याचा वापर करता येत नाही. पाणी व्यवस्थापनेतील ही जाणीव, हा विचार, अतिशय मौल्यवान वाटतो. पाण्याचे जतन करावे, आपले पाणी जपून ठेवावे. ही शिकवण या पारंपारिक व्यवस्थेतून मिळते. अकोला भागात पूर्ण नदीचा भाग खारपाण पट्टा म्हणून ओळखला जातो. जमीन खारी आहे म्हणून भूजलपण खारे आहे. तेथे आज पण काही ठराविक ठिकाणी दरर्वषी एक ते दीड मीटर आकाराच्या 3 ते 4 मीटर खोलीच्या लहान विहीरी खोदून थेंबा थेंबाने पाझरलेले पाणी एकत्र करून पिण्यासाठी वापरण्याचे स्थानिक कौशल्य आपणास पहावयास मिळते.
या हंगामी विहीरीस शेवडी असे म्हणतात. या विहीरींना कुलूप घालून बंद करण्याची पण व्यवस्था केलेली असते. अधिक संरक्षणासाठी कुटुंबातला एक माणूस शेवडीवरच चारपायी टाकून रात्री झोपतो. गोड्या पाण्याचे महत्व किती असते याचे हे एक आत्यंतिक उदाहरण आहे. हे प्रतिनिधिक स्वरूपात आहे. देशामध्ये असं कोणतेही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी तलाव, आड नव्हते. अलिकडच्या काळात त्या व्यवस्थेचे उध्वस्तीकरण झाले.
मुंबई येथील हाजीअली येथील प्रार्थना स्थळाला त्या परिसरात असलेल्या आडाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. गर्दी वाढली आणि म्हणून मुंबईच्या नळाचे पाणी या ठिकाणीपण पोहचले. पण इतिहासकालीन आड आजही आपणास त्या ठिकाणी पाहता येतात. चारीबाजूने समुद्राचे खारे पाणी आणि आडामध्ये मात्र गोडे पाणी ही वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था येथे अनुभवास मिळते.
सातारा जिल्ह्यात औंध हे संस्थान इतिहासकालीन गावतलाव व आड याचे एक आदर्श उदाहरण आहे. या गावात आज पण ही व्यवस्था कार्यरत आहे. गावाला लागून प्रचंड मोठे व नीट बांधलेले एका खाली एक असे 2/3 तलाव आहेत. हे गावतलाव सतत भरून असतात. यातून पाझरणार्या पाण्यामुळे गावातील भूजल समृध्द झालेले आहे. या पुनर्भरणाच्या सोईमुळे औंध गावातील सर्व विहीरींना (खाजगी व सार्वजनिक) सतत पाण्याचा पुरवठा होतो. संस्थानिकाच्या वाड्यातील विहीरीला पण याच व्यवस्थेचा आधार आहे.
भविष्यकाळात ग्रामीण भागाला स्वावलंबी करण्यासाठी गावतलाव आणि आड याचाच आधार असणार आहे. गावतलाव, त्यांच्या बाजूला मंदीर आणि जवळ आड हे ग्रामीण भागाच्या स्वयंपूर्णतेसाठीचे उत्तर असेल. तलावातील पाणी देवाचे आहे ते स्वच्छ राखले पाहिजे आणि त्या पाण्याच्या वापरातून गावाला स्वयंपूर्ण करणे गरजेचे आहे, ही भावना रूजण्याची गरज आहे. पंजाब, हरियाणा या प्रदेशात सुध्दा गावतलावाचे मोठे जाळे पसरलेले होते. बरेचसे तलाव प्रदूषित होवून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अमृतसर परिसरातील आणि खुद्द शहरातील त्याकाळातील पिण्याच्या पाण्याची साधने हीच होती. काळाच्या ओघात याला धार्मिक स्वरूप आले आणि या पाण्यात स्नान केल्यानंतर पवित्रता मिळते असा भाव निर्माण झाला. पण मुळामध्ये या व्यवस्था पिण्याच्या पाण्यासाठीच होत्या. अमृतसर शहरातील विशाल असे खोदून तयार केलेले तलाव (कामतलाई, दुगिर्याना, अमृतसर, तरणतारण इ.) हे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचे दिग्दर्शन करतात. पंजाब प्रांतात तलाव आणि गुरूद्वार यांची सांगड सार्वत्रिक दिसते. गुरूद्वाराच्या अस्तित्वामुळे तलाव स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था आपोआप रूजली.
हा देश जसा तलावाचा म्हणून ओळखला जातो तसा बारवांचा पण आहे. या बारवांना काही ठिकाणी कुंड, तीर्थ, पुष्करणी, तळे अशा नावाने संबोधले जाते. बारव म्हणजे त्या अर्थाने नीटपणे बांधलेली पायर्या असलेली एक मोठी विहीर. या बारवा काही ठिकाणी विटकामात पण बांधलेल्या आहेत. बहुतांशी ठिकाणी या दगडी बांधकामातच निर्माण केलेल्या आहेत. बारव ही बारमाही पाणी वाहणारी व्यवस्था आहे. पाणी साठवण्याची क्षमता मोठी असल्याने इतिहास काळात या वास्तूचा उपयोग सार्वजनिक पाणी पिण्याची सोय म्हणून केलेला दिसतो. बर्याचशा बारवा राजांनी स्वत:च्या व्यक्तिगत खजिन्यातून बांधलेल्या असाव्यात कारण त्या बारवांना राणीची बारव असे नाव देण्यात आलेले आहे. देशभर बारवांचे जाळे पसरले आहे. बहुतांशी बारवांचे बांधकाम अतिशय सुंदर आणि स्थापत्य कलेतील एक उत्तम नमुना म्हणून दर्जेदार आहे. यापैकी अनेक बारवा आजपण वापरात आहेत. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्यामुळे वास्तू मोडकळीस आलेल्या आहेत. त्यातील पाण्याचा वापर न झाल्याने पाणी प्रदूषित झाले आहे.
जगातील सर्वात सुंदर बारव म्हणून गुजरात मधील पाटण या ठिकणच्या राणीच्या बारवेचा उल्लेख करता येईल. ही बारव सात मजली आहे. आकाराने विशाल आहे. प्रत्येक दगडावर अप्रतिम असे शिल्प आहे. वाळू मऊ मातीच्या पायावर शेकडो वर्षापासून ती भक्कमपणे उभी आहे. या बारवेची खोली 100 फूट पेक्षा जास्त आहे. मातीचा दाब मानेवर घेवून ऊन, पाऊस, वारा, भूकंप इत्यादीला न जुमानता ती ताठ मानेने उभी आहे. त्या काळात सिमेंट व स्टीलचे तंत्रज्ञान अवगत नव्हते. लांबी जास्त, खोली जास्त असलेल्या या बारवा रूंदीमध्ये मात्र मर्यादित आहेत. प्रत्येक मजल्यावर आडवे टप्पे (floors) टाकून याचा compression member म्हणून वापर केलेला आहे.
बर्याच बारवा गोल आकाराच्या आहेत. त्यामुळे बारवेच्या भिंतीत tensil stresses निर्माण होत नाहीत. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान माहिती नसतांना पण स्वत:चे अंगभूत कसब वापरून त्या लोकांनी अप्रतिम अशा वास्तू निर्माण केल्या आहेत. बारवेची रचना symmetrical नाही. वापरलेल्या दगड व चुना हे गुणवत्तापूर्ण आहेत. यामुळेच या वास्तू महाकाय भूकंपाला (भूज) तोंड देवून उभ्या आहेत. देशातील सर्वच बारवा symmetrical आहेत. देवळाचे पण बांधकाम असेच symmetrical असते. याला अपवाद चांदवड येथील होळकरांच्या राजवाड्यातील होळकर बारवेचे आहे. 1972 च्या दुष्काळात चांडवडसह आजूबाजूच्या 80 खेड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या बारवेतून केला जात होता, असे समजते. आजपण याच बारवेतून चांदवड शहराला पाणी पुरवठा केला जातो. ही बारव मात्र symmetrical आहे. वाड्यातून एका बाजूने उतरण्यासाठी पायर्या केलेल्या आहेत. दुसर्या बाजूने मात्र पायर्या नाहीत.
अशा प्रकारची ही एकमेव बारव पाहण्यात आलेली आहे. दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, देवगिरी, तिसगाव, नगर, जालना, एरंडेश्वर, पिंगळी, औंढा नागनाथ, देगलूर, मोहोळ, चारठाणा, परळी, बीड, अंबाजोगाई, लातूर, कोल्हापूर, मुखेड, मंगळवेढा, अक्कलकोट अशी कितीतरी नावे डोळ्यासमोर येतात की, ज्या ठिकाणी सुंदर बारव आहेत. मंगळवेढ्याच्या बारवेला कृष्णा तलाव व खंदकापासून पुनर्भरणाची सोय केलेली आपणास दिसते. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या राजधानीच्या ठिकाणी सुंदर बारवा आहेत. अनेक बारवामध्ये महालांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाण्याच्या जवळ आल्हादकारक वातावरण असते. त्याचा फायदा घेवून विश्रांतीचे ठिकाण म्हणून अशा तरतूदी केलेल्या असाव्यात. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी या ठिकाणी किल्लेवजा गढी आहे. या उंचावरील गढीवर पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी एक सुंदर अशी बारव निर्माण करण्यात आली आहे.
आज पण ती सुस्थितीत आहे. बारवेच्या पायर्या वळण घेत गोलाकार विहीरीत घेवून जातात. गढीची एक बाजू बारवेची भिंत म्हणून काम करते. लगतच्याच बाहेरच्या बाजूस विशाल असा तलाव निर्माण करण्यात आलेला आहे. तलावातून बारवेत येण्यासाठी लहानशा बोगद्याची पण सोय केलेली आहे. आजसुध्दा धर्मापुरी या गावाच्या 12 ते 15 हजार लोकवस्तीला यात इतिहासकालीन तलावातील विंधन विहीरीद्वारेच पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. या गावाच्या परिसरातच केदारेश्वराचे उत्तम शिल्पाने सुशोभित हेमाडपंथी मंदीर आहे. या सर्व वास्तू यादवकालीन 11 व्या - 12 व्या शतकातील असल्याचे कळते. या शिल्पांमध्ये एक शिल्प वेगळीच माहिती देते. एक महिला फळ्याचा उपयोग करून मुलांना शिकवत असल्याचे दिसते. हजार वर्षापूर्वी महिला अध्यापनाचे काम करत होत्या याचे हे उदाहरण आहे.
प्रत्येक बारवांना पुनर्भरणाची सोय केलेली आहे. अशी एखादीही बारव नसावी की ज्या ठिकाणी पुनर्भरणाची सोय केलेली नाही. काही ठिकाणी ओढा, नदी यांच्या प्रवाहाचे पुनर्भरणाचे साधन म्हणून वापर केलेला आहे. कराडची बारव विटेमध्ये बांधलेली आहे. आणि ती कृष्णेच्या काठावर आहे. कृष्णा नदी या बारवेचे पुनर्भरण करते. पाटणची बारव सहस्त्रलिंग तलावात बांधलेली आहे. वेरूळ येथील बारव ओढ्याच्या काठावर निर्माण केेलेली आहे. काही ठिकाणी अशा पुनर्भरणाच्या साधनांची मोडतोड झाल्यामुळे बारवा या एकाकी पडल्या आहेत. पुनर्भरणाचे साधन नामशेष झाल्यामुळे या बारवा मध्ये पाणी दिसत नाही. ज्या ठिकाणी पुर्नभरणाची सोय केली नव्हती अशा ठिकाणच्या बारवा कोरड्या पडलेल्या आहेत. करमाळा येथील जुनी 96 पायर्यांची बारव हे त्याचेच उदाहरण आहे.
प्रत्येक बारवेच्या आत देवकोष्ठ निर्माण केलेले आहे. त्यामध्ये देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. कदाचित पाण्याचे पावित्र्य जतन करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी. बारवेतील पाणी देवाचे आहे. यामध्ये पाय धुवू नयेत. ते प्रदूषित करू नये हा त्या पाठीमागचा भाव असावा.
या बारवामध्ये पाण्याचा साठा अमाप असतो. काही बारवांचा शेतीच्या सिंचनासाठी वापर केलेला आहे. बैलाच्या मदतीने , हत्तीच्या मदतीने, उंटाच्या मदतीने पाणी उचलण्याची सोय होती असे आजच्या त्या ठिकाणच्या अवशेषावरून दिसून येते. काही बारवेला 16 मोटेने पाणी उपसण्याची व्यवस्था केलेली दिसते. एकाच वेळी सोळा मोटेने पाणी काढणे शक्य होते, याचाच अर्थ बारव म्हणजे पाण्याचा सागरच.
बारवाचे बांधकाम अप्रतिम आहे. त्या महालासारख्या दिसतात. राणी आणि राजाच्या महालापेक्षासुध्दा बारवाचे सौंदर्य अपूर्व आहे. पाण्याच्या साठ्यासाठी इतके विलोभनीय बांधकाम करणे हे एक आश्चर्य वाटते. त्याकाळचा समाज (राजवटी) पाण्यावर खूपच प्रेम करत होता हे यातून दिसून येते. बारवा म्हणजे अप्सरांची घरे म्हणून ती सुंदर असावीत. आजच्या विहीरी खोदण्याच्या पध्दती आणि त्या काळच्या विहीरी बांधण्याच्या पध्दती आणि त्याची जपणूक करण्यासाठीची व्यवस्था या मध्ये महदअंतर आहे. त्या पिढीमध्ये लोकांना, राजा - राणीला पाण्याबद्दल टोकाचा आदर होता. पाण्याबद्दल ममत्व होते. पाण्याला कसे हाताळावे, त्यावर किती प्रेम करावे, याचे प्रतिक म्हणजे बारव आहे.
बारवांचे आकार पण वेगवेगळे आहेत. फुलाच्या आकाराच्या बारवांना पुष्करणी असे म्हटले जाते. सातारा येथील लिंब गावातील बारव पण अनेक मजल्यांची आहे. त्यामधून सुमारे शंभर एकर क्षेत्रावर बागायती पिके घेत असावीत. या ठिकाणी अनेक मोटेने पाणी काढण्याची सोय केलेली दिसते. सांगली शहरातील शहा या व्यक्तीची बारव पण अप्रतिम आहे. बारवेत उतरतांना दिवाणखान्यात उतरत आहोत असे वाटते. कागल - कोल्हापूर येथील बारवेमध्ये अशीच अनेक मोटेंची सोय आहे.
दिल्ली येथील अग्रसेन बारव अठवणीत राहण्यासारखी आहे. अहमदाबादची अदालज बारव, मुंदेरा येथील सूर्य मंदिराजवळची बारव इत्यादी वास्तू स्थापत्यकलेतील उत्तम नमुने आहेत. अंबड या शहरामध्ये आकाराने प्रचंड अशा तीन बारवा आहेत. या प्रत्येक बारवेला पुनर्भरणाची सोय आहे. सिंदखेडराजा, लोणार या ठिकाणीपण उत्कृष्ट असे बांधकाम केलेल्या बारवा आहेत. पुतळा बारवेसाठी प्रत्येक दगडावर मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी राजाने बारवांना आपल्या मुलींची (सजना, गंगा) नावे दिलेली आहेत. यावरून या बारवांवर म्हणजे त्यातील पाण्यावर त्यांचे किती प्रेम होते याची आपण कल्पना करू शकतो. सजना व पुतळा या बारवांना चांदणी तलाव पुनर्भरणाची साथ देत असतो.
या बारवा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जात होत्या. आजपण काही बारवा वरीलप्रमाणे मानवाची हजारो वर्षापासून तृष्णा भागवित आहेत. एक प्रेमाचे प्रतिक, भक्कमपणाचे प्रतिक, उत्कृष्ट वास्तू कलेचे प्रतिक म्हणून या बारवा चिरंतन उभ्या राहणार आहेत. पारनेर या ठिकाणच्या बारवा या गावतळ्याचे काम करतात. मंचर येथील बारवापण फारच देखण्या आहेत. देशाच्या सगळ्या भागामध्ये पाण्याचे उत्तम व विश्वसनीय साधन म्हणून बारवाची निर्मिती झालेली दिसते. या लाख मोलाच्या बारवा दुर्लक्षिल्या जावू नयेत यासाठी लोकांनी पुढे येवून त्याचे व्यवस्थापन करावयास पाहिजे. अल्पशा खर्चामध्ये त्या पुनर्जिवीत होतील आणि पाण्याचे साधन म्हणून परत वापरात येतील. देवी अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात अशा हजारो बारवांचे पुनरूज्जीवन केल्याची नोंद आहे. म्हणून या बारवांना अहिल्याबाई होळकरांच्या बारवा म्हणून लोक ओळखतात. देवी अहिल्याबाईचे हे पुण्यकाम आहे. हाच वसा आजच्या समाजाने घेवून पुढे जाण्याची गरज आहे.
डॉ. दि. मा. मोरे. पुणे, मो : 09422776670