Source
जल संवाद
विदिशा येथील तांब्याच्या नाण्यावर नदी व पोहणारे मासे दाखविले आहेत. मथुरा येथील गोमित्र यांच्या नाण्यावर नदीप्रवाहातील माश्यांची आकृती कोरलेली आहे. कुशाणाच्या नाण्यावर कलशाचे चित्र आहे. पाण्याने भरलेल्या कलश हा शुभसूचक मानला जातो, समृध्दी दर्शवितो. उज्जैनीच्या नाण्यावर लक्ष्मीची आकृती आहे.
पावसाच्या पाण्यामुळे पाणलोटात पडलेले पाणी वाहून जाणे, मातीची झीज होणे, पर्यावरणाचे नुकसान होणे, हे टाळणे गरजेचे असते. ही जाण इतिहासकाळात पण होती. याचे पुरावे आपणास अनेक ठिकाणी दिसून येतात. सिंदखेडराजा, जिजाईचे माहेर हे याचे उत्तम उदाहरण आहे. शिखरशिंगणापूर, रामटेक, पद्मपूर, धारूर, परळी, तांबाळा, मोरखंडी, हिमायतबाग, औंढानागनाथ अशी काही प्रातिनिधिक स्वरूपात पाणलोट विकासाच्या प्रक्रियेतून विकसित झालेली ठिकाणे आपल्या डोळ्यापुढे येतात. या परिसरात आपण सहजपणे भ्रमण केल्यास जुने तलाव, विहीरी आपल्याशी बोलतात, खुणावत असतात. या व्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष केले आहे. तलाव गाळानी भरले, विहीरी, बारवा आटल्या, याच व्यवस्थेने कधीकाळी त्या परिसराला जलक्षेत्रात स्वयंपूर्णता दिली होती. या वास्तवतेचे आपण अवलोकन केले पाहिजे.विदर्भातील पद्मपूर हे संस्कृत कवी भवभूतीचं ठिकाण आहे व तलावाने वेढलेले आहे. सिंदखेडराजा या ठिकाणी १६ तलाव होते, परळी या ठिकाणी दोन तलाव, धारूर हे तलावाचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. तांबाळा गावात दोन तलाव आहेत. मोरखंडी या गावात तीन तलाव आहेत, औंढानागनाथ भागात तलाव आणि बारवाची मालिका दिसून येते. रामटेक आणि पद्मपूर या परिसरात अनेक तलाव विखुरलेल्या स्वरूपात दिसून येतात. जमिनीवर पडलेला प्रत्येक थेंब साठवून जमिनीची झीज थांबवणे, भूजल पातळी वाढविणे आणि त्यातून पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या पाठीमागचा उद्देश आहे. अशाच प्रकारचा विकास इतिहासकाळात पण झालेला होता.
कोकणामध्ये खाचराची शेती, त्यासाठी मजबूत अशी बांधाची रचना ही ऐतिहासिक देण आहे. या सर्व व्यवस्था लोकांनी केल्या, स्वयंप्रेरणेने साकार झाल्या, पुढील काळात मात्र यामध्ये शासन प्रवणता आल्यामुळे लोक पांगू झाले. रोजगार हमी योजनेतून हे निर्माण करून द्यावे असे सर्वांना वाटू लागले. या व्यवस्था मोडकळीस आल्या, राळेगणसिध्दी, आडगाव, पळसखेड अशा काही मोजक्या गावांची आपण कौतुकाने उदाहरणे देतो. पाणलोट क्षेत्र विकास हा कार्यक्रम आपल्या समाज व्यवस्थेला नवीन नाही. हा जुनाच कार्यक्रम आहे. याचे तंत्र आणि मंत्र समाज व्यवस्थेमध्ये पूर्णपणे मुरलेले आहे व त्याची आज गरज आहे. त्यांचे पुनरूज्जीवन करण्याची आवश्यकता आहे.
अलिकडच्या १६ व्या - १७ व्या शतकात प्रामुख्याने मुघल राजवटीच्या काळात या पाणी व्यवस्थेचा उपयोग जीवनामध्ये ऐश्वर्य, सुखलोलूपता आणण्यासाठी केला गेल्याची उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. स्नानगृहाला (हमाम) पाण्याचा पुरवठा हे या राजवटीतील आवश्यक आणि वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणून उल्लेख करावासा वाटतो. किल्ल्यामध्ये हमाम, त्याला जलवाहिन्यांची व्यवस्था बर्याच ठिकाणी सापडते. यासाठी पाणी उंचावर घेवून जाण्याची गरज भासते आणि तशी पाणी उचलण्याची व्यवस्था मानवी आणि प्राण्यांच्या शक्तीद्वारे अनेक ठिकाणी केल्याची उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. दिल्लीचा लाल किल्ला, हुमायूनची कबर, सफदरजंग कबर, फत्तेहपूर सिक्री, बेगमपूरा, माचनूर, देवगिरीचा भुईकोट किल्ला, थाळनेर या ठिकाणी आपणास बाजूच्या नदीतील पाणी जवळ जवळ ३० ते ४० मीटर वर उचलून हमामसाठी, बागेसाठी, कारंज्यासाठी व महालासाठी झेलमोटेद्वारे वापरल्याचे दिसते. झेलमोट म्हणजे दुहेरी मोट - दोन भिन्न उंचीवरील मोटा - हत्तीने, उंटाने मोटेद्वारे पाणी उचलण्याची व्यवस्था, पाणी उचलण्याचा रहाट या देशातलाच आहे.
अल्पशक्तीने रहाट या साधनाद्वारे २० - २५ मीटर पर्यंत पाणी उचलण्याच्या जलतंत्राचा उपयोग देशात अनेक ठिकाणी केल्याचे दिसते. वाई येथे अशाच कौशल्याने पाणी वरच्या मजल्यावर नेल्याचा प्रयोग आपणास पहावयास मिळतो. वाई, भोर, औंध, सातारा हा प्रदेश पेशव्यांच्या अधिकारातलाच होता. मुघलांचे या बाबतीतील अनुकरण पेशवाईतील काही घराण्यांनी केल्याच्या त्यांच्या आजच्या अवशेषांवरून दिसून येते. पुणे येथील शनिवार वाडा हे त्याचे उदाहरण आहे. या वाड्यातील कारंजे, कात्रजच्या तळ्यातून येणार्या भूमिगत नहर / नलिकांच्या पाण्यावर आधारित आहे.
हे कारंजे दररोज सकाळी पाण्याचा दाब चांगला असतांना परवा परवा पर्यंत नाचत होते. पुणे शहरामध्ये हे पाणी आजपण भूमिगत नहरीद्वारे वाहत आहे. याच पाण्यावर शनिवार वाड्यातील हजार कारंजा आपलं विलोभनीय रूप दाखवत होता. हा कारंजा एक आश्चर्य म्हणून प्रसिध्दीस आला. काही ठिकाणी लोक या नहरींवर पंप बसवून पाणी वापरत असल्याचे दिसून आले आहे. आग्राच्या किल्ल्यातमात्र महालासाठी पाणी मानवी साखळीद्वारे (कैद्यांचा उपयोग) भरले जात होते.
दिल्लीतील हुमायुन व सफदरजंग कबरीत आतील उथळ पाण्याचे पाट त्याला कारंज्याची जोड हा जलगती शास्त्रातील उत्तम नमुना आहे. या वास्तूतील एकूण पाटाची लांबी कितीतरी किलोमीटर येईल. असे पाट आणि कृत्रिमरित्या श्रावण भाद्रपदातील वातावरण निर्माण करण्याचा प्रकार लाल किल्ल्यात आपणास आजपण पहावयात मिळतो. फत्तेहपूर सिक्री येथील महालासाठी पाणी सात टप्प्यांत उचललेले आहे. याच ठिकाणी छपरावरील पडलेले पाणी भुयारी विहीरीत खांबातून नळाद्वारे सोडण्याची व्यवस्था पण केलेली दिसते. याचा उल्लेख इतर ठिकाणी विवेचनात आला आहे.
पुणे हा मराठी साम्राज्याचा बालेकिल्ला म्हणावयास काही हरकत नाही. पेशव्यांच्या काळात पुण्याचा विस्तार झाला. या शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तीन दिशेने डोंगरातून तलाव व विहीरींच्या माध्यामातून भूमिगत नहरी / नलिकांद्वारे पाणी आणल्याचे स्पष्टपणे त्यांच्या अवशेषांवरून आजही दिसून येते. पहिली नहर सिंहगड, धायरी या भागातून येते. दुसरी नहर कात्रजकडून येते आणि तिसरी नहर कात्रज आणि दिवे घाटाच्या मधल्या डोंगरातून येवून मुंडवा (हडपसर) या भागात येते. कात्रजची नहर शहरातून फिरत शनिवार वाड्यात येते व ती आजपण वाहते. मुंडव्याला आलेली नहरपण सतत वाहते. ते पाणी मुठा नदीच्या पात्रात स्थानिक लोक वापरतात.
रायगड ही मराठ्यांची राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य अल्प काळासाठी रायगडावर झाले. रायगड महाराजांनी खूप विचाराने व कल्पकतेने बांधला. आजच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वातील खाणा - खुणांवरून राजा- राणीच्या निवास व्यवस्थेसाठी भूमिगत नलिकांद्वारे पाणी खेळवल्याचे दिसून येते. ही साध्या पध्दतीची व्यवस्था आहे. या वास्तूंच्या उपलब्ध अवशेषांवरून असे दिसून येते की, गरजेपेक्षा जास्त सुखसोई या ठिकाणी निर्माण केल्याच्या दिसत नाहीत. रायगडावर राजांनी वर्षा जलसिंचनाच्या माध्यमातून (तलावांची शृंखला) विपुल प्रमाणात पाणी निर्माण केले होते याचा उल्लेख इतरत्र आलेलाच आहे.
रायगडाच्या एका बाजूला मातोश्री जिजाईसाठी पाचाड येथे निवासस्थानाची व्यवस्था केलेली होती. पाचाडच्या त्या वास्तूत एक विहीर, उल्लेख करण्यासारखी आहे. बाजूला दगडामध्ये बांधलेला ओटा आहे. त्या ओट्यावर टेका देवून बसण्यासाठी व्यवस्था आहे. या विहीरींतून पाचाड भागातील सर्व जातींच्या व सर्व थरांतील लोकांना पाणी घेवून जाण्याची मुभा होती असे इतिहास वाचनातून समजते. शिवाजी महाराज आईला भेटण्यासाठी अधून - मधून पाचाडला जात असत. त्या वेळी या विहीरीच्या कट्ट्यावर ते टेका देवून बसत असत आणि पाणी घेवून जाण्यासाठी आलेल्या सर्व लोकांबरोबर त्यांच्या अडचणींसंबंधी विचारपूस करत असत. हा एक त्यांचा लोकदरबारच होता असे म्हणावयास काही हरकत नाही. विहीरीच्या कट्ट्याचा उपयोग एक संवेदनशील आत्मा किती चांगल्या प्रकारे करू शकतो त्याचे हे चांगले उदाहरण आहे. पाणी हे चैनीसाठी, जीवन जास्त सुखलोलूप करण्यासाठीची वस्तू नाही हा संदेश या पाचाड येथील बारवेमधून मिळतो.
रायगडाच्या दुसर्या बाजूला रायगडवाडी आहे. हे लहानसे गाव रायगडाच्या पायथ्याजवळ आहे. या पायथ्याजवळ वसलेल्या गावाशेजारी एक झर्याची विहीर आहे. ती एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देते. या विहीरीलगत एक अतिशय सुंदर असे तुळशीवृंदावन आहे.
या विवेचनावरून जीवन घडविण्यात पाणी कसे वळण घेते याचे दिग्दर्शन होते. मुघल आणि पेशवे यांच्या कालखंडात पाणी ऐषआरामाकडे वळविलेले आहे, शिवाजी महाराजांनी पाण्याच्या स्थळाचा उपयोग गोरगरीबांचे दु:ख जाणून घेण्यासाठी केला आहे.
जाता जाता दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मस्तानी तलावाकडे आपण वळू या. पाण्याचे जीवंत झरे असलेला, डोंगराच्या पायथ्याशी निर्माण केलेला दगडी कामाची भिंत असलेला हा बराचसा जुना तलाव आहे. पेशव्यांच्याही काळापूर्वी याची निर्मिती झाली असणार. जनमानसामध्ये हा मस्तानीचा तलाव म्हणून रूढ आहे. या तलावाच्या भिंतीमध्ये जलमहल आहे. त्याला लागूनच मस्तानीश्वराचे मंदीर आहे. मस्तानीवरून हे नाव पडलेले आहे. हा तलाव म्हणजे या भागातील सिताफळाच्या बागा फुलविणारे एक उत्तम असे साधन आहे. दिवे घाटातले पाणी अडवून त्या पाण्याला मुरवून खालच्या भागात ५ - १० किलोमीटरच्या पट्ट्यात लोक शेकडो वर्षांपासून सिताफळाच्या, अंजिराच्या बागा पिकवून संपन्न झालेले दिसतात. येथे भाजीपालाही पिकवतात.
या वस्तुस्थितीवरून नजर टाकल्यावर असे दिसून येते की, हा तलाव बाजीराव मस्तानी यांच्या विहारासाठी केलेला नाही. ग्रामीण भागाला सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेले ते एक साधन आहे. आपल्या राजाचे (पेशवे) आणि त्याला प्रिय असलेल्या व्यक्तीचे पाय लागलेले हे ठिकाण म्हणूनच या तलावांचे मस्तानी तलाव असे नामकरण झालेले असावे. लोककल्याणार्थ निर्माण केलेले हे एक साधन आहे. राजा राणीच्या विहारासाठी निर्मिलेली वास्तू ती खचितच नसणार.
ऐतिहासिक काळात वेगवेगळ्या राजवटींनी आर्थिक व्यवहारासाठी नाणी पाडल्याचे दिसून येते. नाण्यावरून त्या ठिकाणच्या राजवटीचा कालावधी, राजांची नावे माहिती होतात. बरीचशी नाणी तांबे या धातूंनी बनवलेली दिसतात. काही नाणी चांदी व सोने या धातूची ही केलेली होती. त्या त्या राजवटीचे चिन्ह त्या नाण्याच्या दोन्ही बाजूला कोरलेले असते. त्या चिन्हावरून पण त्या राजवटीच्या वैभवाची त्यांना प्रिय असलेल्या विचारधारेची कल्पना येते. इतिहासातील या नाण्याचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, काही राजवटीमध्ये नाण्यावर पाणी व पाण्याशी संबंधित चिन्हे उमटविलेली होती. यातून त्या राजवटींचे पाण्याविषयीचे प्रेम तथा आदर दिसून येतो. पाण्यात जगणारे प्राणी मगर, मासे, बगळा, बेडूक यांच्या आकृती नाण्यावर कोरलेल्या दिसतात.
विदिशा येथील तांब्याच्या नाण्यावर नदी व पोहणारे मासे दाखविले आहेत. मथुरा येथील गोमित्र यांच्या नाण्यावर नदीप्रवाहातील माश्यांची आकृती कोरलेली आहे. कुशाणाच्या नाण्यावर कलशाचे चित्र आहे. पाण्याने भरलेल्या कलश हा शुभसूचक मानला जातो, समृध्दी दर्शवितो. उज्जैनीच्या नाण्यावर लक्ष्मीची आकृती आहे. सातवाहनाच्या नाण्यावर लक्ष्मी पहावयास मिळते. काही नाण्यावर जहाजाची आकृती दिसते. यावरून या राजवटीचे दर्यावर वर्चस्व असल्याचे कळते. क्षत्रपच्या नाण्यावर पर्वताची आकृती दिसते. पर्वतावरून जलप्रवाह निघतो. गुप्त कालखंडातील नाण्यावर कमळ व त्यात लक्ष्मीची आकृती आहे. कमळावरील लक्ष्मी हे समृध्दीचे लक्षण मानले जाते. पांड्य राजवटीच्या नाण्यावर माशाची आकृती आहे. पल्लव राजवटीच्या नाण्यावर जहाजाची, शंखाची, माशाची आकृती आहे. चौलाच्या नाण्यावर माशाची आकृती आहे.
एकूणच वैभवात नांदलेल्या राजवटीच्या काळातील या नाण्यावर पाण्यातून वैभव प्राप्त झाल्याचे निदर्शक म्हणून कमळ, लक्ष्मी, कळस, मासे, यांचे चित्रण केलेले दिसते. काही नाण्यावर बैलांची आकृती आहे. अशा रितीने पाण्यातून वैभव सांगणार्या आकृतीमधून आपणास त्या त्या राजवटीचे पाण्याबरोबरचे सख्य, ममत्व दिसून येते. यावरून जलसंस्कृतीचा विकास इत्यादीबद्दल राजवटीनिहाय ऐतिहासिक अंदाज बांधता येतो. पाण्याशी संबंधीत नाण्यावरील आकृतीवरून त्यांच्या राजवटीत जलविकासाची साधने मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती यांची प्रचिती येते.
इतिहासकाळात पाण्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आलेला होता. त्यांचा प्रत्यय आपणास औरंगाबाद येथील पाणचक्की, नळदुर्ग किल्ल्यावरील पाणचक्की, भोज तलावावरील पाणचक्की इ. वरून दिसून येईल. पाण्याच्या वेगाचा उपयोग करून त्यातून यांत्रिकी शक्ती निर्माण करून धान्य दळण्यासाठी त्यांचा उपयोग चक्की म्हणून केल्याचे आपणास दिसून येते. हिमाचल प्रदेशात उंचीचा फायदा घेवून झर्याच्या पाण्यातून नैसर्गिक कारंजे निर्माण केल्याचे आपणास दिसून येते.
पाण्याच्या अन्य उपयोगाबरोबरच महालात वातानुकूलता निर्माण करण्यासाठी पाण्याचा उपयोग केल्याचे आपणास काही ठिकाणी दिसून येते. नळदुर्गचा जलमहाल, हिमायतबागेतील जलवास्तू, मस्तानी तलावाजवळचा जलमहल, मौसाळा आणि जूनाचा तलावाच्या शेजारील जलमहल ही काही त्यांची उदाहरणे आहेत. नळदुर्गचा जलमहल हे स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य आहे. याचे वर्णन अगोदरच आलेले आहे. मोठ्या बारवाच्या सान्निध्यात असे महाल निर्माण केले जात असत. पाण्याचे सान्निध्य परिसर थंड ठेवते नेमका या गुणधर्माचा फायदा घेवून त्याकाळामध्ये जलमहल निर्माण केले गेल्याचे दिसून येते. मांडवगडावर उत्तम अशी स्नानगृहे निर्माण केलेली आहेत.
या स्नानगृहामध्ये गरम पाण्याचे फवारे, बाष्पस्नान, तुषारस्नान यासारखी व्यवस्था त्या कालखंडात निर्माण केली गेली असल्याचे त्यांच्या आजच्या अवशेषावरून जाणवते. राजघराण्यातील मंडळीसाठी अशा महालाचा वापर होत असावा. देवगिरी किल्ल्याच्या परिसरात परियोंका तलाब या नावाचा सुंदर तलाव आहे. राजघराण्यातील स्त्रियांसाठी, जलविहार करण्यासाठी, राष्ट्रकूट यादव यांच्या काळात हा तलाव निर्माण केला असावा असे वाटते. सिंदखेडराजा येथील जालना बारवेमध्ये पण महल आहे. अनेक विशाल व सुंदर बारवामध्ये त्या त्या काळातील कल्पक मंडळींनी विश्रांतीसाठी व अन्य उपयोगासाठी लहानशा जागेतच अप्रतिम असे महाल निर्माण केलेले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी अशा व्यवस्था मोठ्या संख्येने पहावयास मिळतात.
डॉ. दि. मा. मोरे. पुणे, मो : ०९४२२७७६६७०