Source
जल संवाद
महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतांना मूलभूत व चिरंतन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जलप्रश्नाची वास्तविकता जाणून घेवून संभाव्य जल संकटाचा सामना यशस्वीपणे करण्यासाठी जलप्रश्नावर मूलगामी चिंतन करण्यासाठी भारतीय जलसंसकृती मंडळ औरंगाबादचे वतीने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे दि.18 व 19 डिसेंबर 2010 रोजी सहावे जलसाहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. 2002 पासून सुरू झालेल्या आगळ्यावेगळ्या जलसाहित्य संमेलनाला आता एक आगळी वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
जलनितीची चिरंतनता अक्षय राहावी म्हणून विविध विषयावरील जलचिंतन या संमेलनात करण्यात आले. त्याचबरोबर साहित्यात प्रकटणारे जलचिंतन अभिव्यक्त करणारे एक पाणीदार कवीसंमेलनही या संमेलनात चांगलेच रंगले.
किशोर पाठक (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या संमेलनात महाराष्ट्रातील अनेक ख्यातकिर्त कवींबरोबरच स्थानिक कवींनीही आपला सहभाग संस्मरणीय केला.
मंचकावरती स्वारी झाली
चंद्र आम्ही जिंकीला
परी पिण्याच्या पाण्यासाठी
जीव असे गांजला
हे आपले पाण्यासंदर्भातील खोचक वर्तमान या वास्तविकतेकडे अंगूलीनिर्देश करीत कवीसंमेलनाचे अध्यक्ष श्री. किशोर पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रहिम पानी राखीये बिन पानी सब सून या अब्दुल रहीम खानेखाँना च्या दोह्याने संमेलनास सुरूवात झाली. चंद्रपूर येथील कवी श्री. किशोर मुगल यांनी आपल्या खुमासदार शैलीने कवी संमेलनाच्या प्रारंभीच त्यात रंगत आणली.
प्रा.दत्ता यांनी चिंतनगर्भ कविता अलीकडे दुर्मिळ होत चालली आहे अशी खंत व्यक्त करीत सर्वव्यापी राजकारणाने जल समस्येसह अनेक समस्या निर्माण केल्या आहेत असे परखड मत व्यक्त करीत आपली रचना सादर केली.
प्रा.पद्मरेखा धनकर - वानखेडे या कवियत्रीने निसर्गाचे गुढरम्य स्वरूप सादर करणाऱ्या आपल्या रचना सूस्वर स्वरात सादर करून रसिकांच्या हृदयाला हात घातला. त्यांची
गार गार वारा, वाऱ्यामागे धारा,
चिंब भिजे अशी, तहानलेली धरा
ही कविता आणि
तुला शोधलं, उजाडलेल्या रानामध्ये बांधामध्ये,
तर कधी आकाशाच्या निळ्याशार रेषेमधे।।
या धारा आणि शोध अशा दोन्ही कविता श्रोत्यांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या. त्याचप्रमाणे माधुरी अशीरगडे या ख्यातकिर्त कवियत्रीनेही
या पावसात
ऊर भरतो
देह भरतो
देह शिणतो
चिबचिंब होऊन
या पावसात
गाज येते
चाहूल लागते
सृजनाची
या आपल्या सुरेल पद्यमय रचनेने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दूरध्वनीचे उंच मनोरे अवतीभोवती
हृदयापासून हृदयासाठी रेंज मिळेना
या आपल्या काव्यपंक्तीने रसिकांचे लक्ष वेधून घेत प्रसेनजीत गायकवाड यांनी आपल्या रचना रसिकांसमोर ठेवल्या. कवी आहे मी सांगत असतो किसनाभाऊ ही त्यांची रचना विशेष भाव खावून गेली.
अवघडले सृजनाचे कोडे
झूरे पाखरू पाऊसवेडे
सूर दाठले कंठामधले
पंखामधली सरली फडफड
नजर शोधते आकाशातील
ओला हिरवा मेघ सावळा
ही पाण्याविषयीची आर्त तगमग रसिकांसमोर मांडत श्री. मनोहर नरांजे यांनी वेदनेचा आदिम स्वर, आणि सार्वत्रिक सूर्यास्त असा नसतोच या आपल्या रचना सादर केल्या.
जलसाहित्य मंचाच्या प्रमुख तथा भारतीय जलसंस्कृतीमंडळाच्या उपाध्यक्षा अरूणा सबाने यांनी सर्वांच्या आग्रहास्तव या कवीसंमेलनात सहभाग घेतला. त्यांनी कवीसंमेलनाचे अध्यक्ष श्री.किशोर पाठक यांच्या संभवा या आकांक्षा प्रकाशनाने अगदी अलीकडेच प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहातील
थेंब रूखासूखा एक थेंब रूखासूखा ।
पापणीत झुलतोय एक ओला झोका।।
थेंब ही रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
अध्यक्ष श्री.किशोर पाठक यांच्या पर्स
मैत्रिण बोलते
तेव्हा काळजात विसाव्याचे जहाज हलते
तिच्या खांद्यावर दु:खाची संध्याकाळ कलते
मैत्रिण बोलतच रहाते
या कवितेने संमेलनात विशेष रंगत आणली. उपस्थित कॉजेलकन्यकांनी त्यांना भरभररून दाद दिली.
संमेलनास जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे, डॉ. दि. मा. मोरे, डॉ. देशकर, मदन धनकर, प्रभू राजगडकर, विद्याधर बनसोड, डॉ. जया द्वादशीवार.... इत्यादी मान्यवरांसह श्रोतृवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. या अतिशय रंगलेल्या कवी संमेलनाचे संचालन डॉ.मनोहर नरांजे यांनी केले.
श्रीमती अरूणा सबाने - (भ्र : 9970095562)