बाटली बंद पाणी उद्योग - एक अनावश्यक गरज

Submitted by Hindi on Mon, 10/05/2015 - 14:35
Source
जल संवाद
बाटली बंद पाण्याचा वापर आता प्रतिष्ठेचा विषय राहिलेला नाही. त्यामुळेच बाटली बंद पाणी न वापरणे हे काही कमीपणाचे लक्षण मानले जात नाही. वस्तुस्थिती अशी आहे की बाटलीबंद पाण्याचा वापर ही आपल्या जीवनातील एक अनावश्यक गरज (Necessary Evil) झालेली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जगात निदान अजूनतरी असे उपाय नाहीत की ज्यायोगे कोणत्याही व्यक्तीला जेथे वाटेल त्या जागी मुबलक पाणी वापरावयास मिळेल. आज जर आपण आपल्या घराबाहेर पडलो व रस्त्यात तहान लागली तर पिण्याचे पाणी कोण देणार?

निदान भारतात बऱ्याच कालापर्यंत 'पाणपोई' ही संकल्पना अस्तित्वात होती. पण 'पाणपोई' ही काही 'पायाभूत सुविधा' या सदरात येणे शक्यच नाही. शहरांतर्गत किंवा जवळपास 'पाणपोई' शक्य आहे पण एका गावाहून दुसऱ्या गावी जाताना निर्जन रस्त्यावर हे कसे शक्य आहे ? तेथे पाणी कोण व कसे पोचवणार ? पाण्याचा दर्जा हा विषय तर दूरच राहिला. नेमके याच कारणांमुळे बाटली बंद पाणी गरजेचे झाले आहे. पण हे ही तितकेच खरे आहे की त्यामुळे प्लॅस्टिकचा अती वापर व कचरा समस्या वाढली आहे. तसेच भूजलाचा अमर्याद उपसा ही पण समस्या निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर बाटली बंद पाणी हा एक 'धरले तर चावते, सोडले तर पळते' असा मुद्दा झालेला आहे.

याकडे वळण्यापूर्वी प्रथम आपण बाटली बंद पाणी या विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवू.

1. भारतीय बाटली बंद पाणी उद्योगाची 2012 - 2013 ची एकूण उलाढाल रू. 10000 कोटी इतकी आहे. दरवर्षी ही उलाढाल सुमारे 19 टक्क्याने वाढत जाते. या नुसार ती 2015 मध्ये रू.15000 कोटी पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

2. बाटली बंद पाणी उद्योगाची जागतिक उलाढाल आज मितीस (2012 - 2013) 8500 ते 9000 कोटी डॉलर इतकी आहे. मागच्या 5 वर्षात या उद्योगाची सुमारे 40 ते 50 टक्के वाढ झालेली आहे.

3. बाटली बंद पाण्याचा वापर दरडोई दरवर्षी अमेरिकेत 42 लिटर व युरोपात तर 111 लिटर इतका आहे. भारतात तो 0.5 लिटर (फक्त अर्धा लिटर) आहे अशी आकडेवारी आहे. भारतात 2010 - 2011 दरम्यान दरडोई दरवर्षी 11 लिटर पाणी वापरले गेले असे संदर्भ आहे. तसेच 2011 - 2012 या वर्षात यामध्ये सुमारे 21 टक्क्यांची वाढ झाली असेही संदर्भ आहेत .पण हे काही खरे नाही. साधे गणित आहे. जर 2012 - 13 ची उलाढाल एकूण 121 कोटी जनतेच्या माथी मारली तर या वर्षी प्रत्येक भारतीयाने 82.65 रूपयांचेे पाणी प्यायले असे उत्तर येते व सरासरी 12 रूपये लिटर प्रमाणे दर भारतीयाने 6.89 लिटर पाणी प्यायले हे समजते.

4. भारतातील नामांकित (Branded) व संघटीत क्षेत्रातील बाटली बंद पाणी उद्योग हा एकूण उद्योगाचा 40 टक्के आहे. याचा अर्थ उरलेले 60 टक्के बाटली बंद पाणी हे विशेष प्रसिध्द नसणाऱ्या कारखान्यांमध्ये उत्पादित केले जाते. असा असंघटीत उद्योग एकूण उद्योगाच्या 60 टक्के असणे हे फारच धोक्याचे आहे.

5. भारतीय बाटली बंद पाणी हे खरे तर दर्जाच्या बाबतीत फारच वादग्रस्त आहे. Consumer Education and Research Society (CERS) या अहमदाबादच्या सेवाभावी संस्थेने (NGO) तपासणी करून असा निष्कर्ष काढला आहे की बाजारपेठेतून कोणत्याही ब्रँडच्या बाटल्या डोळे झाकून उचलून आणल्या व तपासल्या तर अशा 13 वेगवेगळ्या ब्रँडपैकी 10 ब्रँडच्या बाटल्यात चक्क अनावश्यक घटक तरंगतांना दिसतात. म्हणजे तपासणीस आणलेल्यापैकी 76.9 क्के पाणी पिण्यास अयोग्य असते. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आरोग्य चेअरमेन श्री. मंजुनाथ रेड्डी यांनी अचानक सूचना न देता बंगलोरमधील 2 बाटली बंद पाण्याचे कारखाने दि. 11 जानेवारी 2011 ला तपासले. या कारखान्यात 'मिनरल वॉटर' च्या नावाखाली चक्क नळाचे पाणी सरसकट भरले जात होते. इतकेच नव्हे तर याच कारखान्यात असे नळाचे पाणी भरलेल्या बाटल्यांवर इतर कंपन्यांच्या नावाची लेबले लावली जात होती. चक्क नळाच्या पाण्याचा डुप्लिकेट धंदा चालू होता. स्थायी समितीच्या सदस्यांनी भेट दिली व तेथे तर मिनरल वॉटर हे साध्या पाण्यात मिसळून चक्क भेसळीचा धंदा चालला असल्याचे उघडकीस आणले. इतकेच नव्हे तर ISI हे चिन्ह लावणे अभिप्रेत असूनही तसे कोणत्याही बाटलीवर लावले जात नव्हते. थोडक्यात म्हणजे. आपण समजतो तसे बाटली बंद पाणी हे आरोग्यास योग्य असे नसतेच व नळाच्या पाण्यापेक्षा त्याचा दर्जा हा अजिबात जास्त नसतो. हीच कथा जगात इतरत्र पण खरीच आहे. जगातील फक्त 35 टक्के ग्राहकांचे असे म्हणणे आहे की बाटली बंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा खरोखरच आरोग्यदायी असते. हे जर खरे असेल तर मुळातच बाटली बंद पाण्याची खरोखरीच गरज आहे काय ?

6. अमेरिकेत तर बाटली बंद पाण्याचा वापर प्रचंड वाढत चाललेला आहे. 2011 मध्ये अमेरिकेत 910 कोटी लिटर (110.53 लिटर दरडोई) एवढे बाटली बंद पाणी विकले गेले. आजपर्यंत दरवर्षी झालेल्या वार्षिक विक्रीपेक्षा हे कितीतरी जास्त प्रमाणे होते. अमेरिकेतील ग्राहक हा या भाबड्या समजुतीत आहे की आपण पित असलेले बाटली बंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा फारच स्वच्छ आरोग्यदायी व स्फुर्तीदायक आहे. खरे तर अमेरिकेतील नळाद्वारे पाणी पुरवठा हा जगातील सर्वात स्वच्छ समजला जातो. तेथे ही कथा आहे ! तरी पण तेथे बाटलीतील पाण्याचा धंदा हा तेजीत आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे. बाटली बंद पाणी ही गरज नसून उद्योजक व व्यापाऱ्यांनी अत्यंत व्यवस्थित योजना करून निर्माण केलेली एक अवडंबर आहे. त्यामुळे तेथेच हळूहळू नळाचे पाणी पिण्यास अयोग्य आहे असे समजणारी पिढी व नव वर्ग उदयास आलेला आहे. आज तेथे दर पाच व्यक्तींपैकी एक व्यक्ती बाटली बंद पाणीच पिते. याचाच अर्थ असा की दिवसेंदिवस आपण निसर्गावर अवलंबून न रहाता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या पाण्यावरच अवलंबून आहोत. या बहुराष्ट्रीय कंपन्या पाण्यासारखा संपणारा नैसर्गिक स्त्रोत प्रचंड नफेखोरी करीत आपणांस विकत आहे. त्यांनी केलेल्या चकचकीत जाहिरातीचा मारा व यामुळे झालेली ही कमाल बरेच काही बोलून जाते. पण लक्षात कोण घेतो ?

7. इतकी प्रचंड उलाढाल व समाज मान्यता असून ही खुद्द अमेरिकेत सुध्दा दरवर्षी एकूण विकले गेलेले बाटली बंद पाणी हे प्रत्यक्षात नळाद्वारे पुरविलेल्या पाण्याच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. अमेरिकेत नळाद्वारे सरासरी 100 कोटी गॅलन (379 कोटी लिटर) पाणी दर तसाला वर्षातील 24 तास असे वर्ष भर पुरवले जाते. वर्षभरात एकूण बाटली बंद पाणी हे अमेरिकेतल्या कोणत्याही एका दिवशी फक्त 9 तास नळाच्या पाणीपुरवठ्या एवढेच आहे. याचा अर्थ खुद्द अमेरिकेतच अशा पाण्याची बाजारपेठ ही नगण्य आहे व चिमुटभर ग्राहकांच्या भ्रामक कल्पनांमुळे पोसली जात आहे. मग भारत देशाच्या दृष्टीने आपण अशा पाण्याची आपल्याला तरी गरज का भासावी ?

8. भारतात मुठभर श्रीमंत आपल्या चोचल्यांसाठी बाटली बंद पाणी वापरतात. गरीब व पाण्यासाठी मोताद झालेले लोकांना असे पाणी परवडूच शकत नाही. त्यांची गरज पाण्याचा टँकर भागवतो.

9. सर्वात मोठा विरोधाभास हा आहे की या उद्योगाला भूजल / पाणी हा कच्चा माल जवळपास फुकटच मिळतो. पण विक्री किंमत मात्र 1900 पट (1900 टक्के नाही) असते. हा उद्योग केवळ साध्या सोप्या सुमार तंत्रज्ञानावर आधारित आहे. या हाय - टेक असे काहीही नाही. पण इतके असूनही हा उद्योग समाजाची मुलभूत गरज भागवतो व यात महाप्रचंड अशा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. हे खरे आहे की वरील 1900 पट विक्री किंमतीत वाहतुक खर्च किरकोळ विक्रेत्याचा नफा वजा जाता उत्पादकाच्या हातात फार फार तर 10 ते 15 पट नफा (टक्के नव्हे) शिल्लक रहातो. पण हे पण इतर उद्योगांच्या तुलनेत फारच झाले. याशिवाय ग्राहकास पाण्याची अवाच्या सव्वा किंमत द्यावी लागते त्याचे काय ?

10. आश्चर्याची गोष्ट अशी की लोक या पाण्यासाठी 12 रूपये प्रती लिटर ही किंमत देण्यास तयार होतात. ज्या पाण्याची खरी किंमत फक्त 0.25 पैसे प्रती लिटर असते. (यात कामगारांचा खर्च धरलेला नाही पण ही किंमतच 4800 पट आहे.) 'Think Outside the Bottle' ही चळवळ सुरू झालेली आहे. याच्या वेबसाईटवर तर जाहिर केले आहे की 40 टक्के बाटली बंद पाणी हे दुसरे तिसरे काहीही नसून नळाच्या पाण्यापासूनच निर्माण केलेले असते.

11. यामध्ये नुसते बाटली बंद पाणी उद्योजकच सामील नाहीत दक्षिण भारतात हजरो इंधन वाहू ट्रक चक्क पाण्याच्या टँकरचे काम करतात आणि घरोघरी भूजल अथवा नळाचे पाणी पुरवतात. फरक इतकाच की ते भरमसाठ किंमत मागत नाहीत. (रूपये 500 चे 550 प्रती 5000 लिटर) 13000 पेक्षाही जास्त पाण्याचे टँकर चेन्नईच्या आजूबाजूच्या शेतजमिनीतील भूजल उपसा करून चेन्नई गावात पुरवतात. भारतातील सुमारे 800 ते 900 कोटी रूपयांचा पाणीपुरवठा टँकर उद्योगाची उलाढाल नुसती चेन्नईतच नव्हे तर दिल्लीची पण तहान भागवते. खरे तर टँकरचा पाणी पुरवठा ही आपल्या राज्यकर्त्यांना लाज वाटायला लावणारी गोष्ट आहे पण बाटली बंद पाण्यापेक्षा केव्हाही बरी.

12. बरेचसे बाटली बंद पाणी उद्योग हे भूजलावर अवलंबून आहेत. असे उद्योग ज्या भागात असतात, त्या भूभागातील जलस्त्रोतांवर प्रचंड ताण येतो कारण अशा बऱ्याच भागात भूजल हाच स्थानिक लोकांचा एकुलता एक पाण्याचा स्त्रोत असतो. या गोष्टीमुळे अशा भागात स्थानिक जनता व बाटलीबंद पाणी उद्योजक यांच्यात संघर्ष निर्माण होतो. भूजलाचा नको तितका उपसा हेच त्याचे खरे कारण असते.

13. भारतातील खाजगी उद्योग भूजलाचा अमर्याद उपसा तर जवळपास फुकटच करतात, कारण आजही आपल्या देशातील या बाबतचे कायदे जुने पुराणे व काळाशी विसंगत आहे. अजूनही कायदा असे म्हणतो की 'ज्या माणसाची जमीन, तो माणूस त्या जमिनीखालील पाण्याचा मालक.' याचा अर्थ असा की केवळ काही चौरस फुट जमीन विकत घेतली तर त्या जमिनीतून खालील कितीही पाणी तो फुकट वापरू शकतो. नेमका हाच तो कळीचा मुद्दा जनता व उद्योजक यांच्यामध्ये आहे. यामुळेच उद्योजकाला जवळपास अमर्याद नफा मिळतो.

कोका कोला या कंपनीचेच उदाहरण बघा. राजस्थानमध्ये काला डेरा या दुष्काळग्रस्त भागात कोका कोलाचा बाटली बंद पाण्याचा कारखाना आहे. त्यांना सर्व पाणी फुकट मिळते. नाममात्र पाणीपट्टी भरावी लागते, कारण ते आपले सांडपाणी कारखान्याबाहेर सोडतात. असे सांडपाणी सोडण्याची त्यांची 2001 - 2002 मध्ये पाणीपट्टी रूपये 5000 व 2003 मध्ये रूपये 24246 इतकीच होती. कोका कोला सुमारे 5,00,000 लिटर पाणी दररोज उपसते. यासाठी त्यांना 14 पैसे प्रती 1000 लिटर खर्च होतो. साहजिकच 10 ते 12 रूपये 1 लिटरच्या किनले बाटली बंद पाण्याच्या कच्च्या मालाची किंमत फक्त 0.02 ते 0.03 पैसे प्रती लिटर इतकीच असते. (साधारण: 1 लिटर बाटली बंद पाणी बनविण्यासाठी 2 लिटर भूजल हा कच्चा माल लागतो.) भारत सरकारने राजस्थानातील 80 टक्के जलस्त्रोत हे अती उपसले गेले आहेत असे जाहिर केले. 34 टक्के जलस्त्रोत हे अत्यंत नाजूक व अत्यंवस्थ अवस्थेत असल्याचे जाहिर केले आहे. हाच प्रकार इतरत्र पण आहे. दक्षिण भारतात आज पर्यंत सर्वात जास्त बाटली बंद पाणी उद्योग आहे व एकट्या दक्षिण भारतात बाटली बंद पाणी उद्योगाचे 50 टक्के पाणी वापरले जाते.

14. 2004 सालच्या सांख्यिकीनुसार जगात 26,000,000,000 लिटर बाटली बंद पाणी वापरले गेले. यासाठी 28,000,000,000 प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या गेल्या (यात उत्पादन करताना वाया जाणारे प्रमाण गृहित धरले आहे.) यातील 86 टक्के बाटल्या या कचऱ्यात जमा झाल्या (म्हणजे साधारण दर सेकंदाला 1500 बाटल्या) फक्त 14 टक्के बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात आला असे कंटेनर रिसर्च इंस्टिट्यूटटे म्हणणे आहे. 29,000,000,000 प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी 17,000,000,000 बँरल इतके कच्चे तेल लागते. (1 बॅरल कच्चे तेल म्हणजे 42 यु.एस.गँलन म्हणजेच 158.99 लिटर) या सर्व पाण्याच्या बाटल्या व त्यांची सर्वत्र वाहतुक करण्यासाठी पण इंधन हे लागतेच. खरे तर वरील कच्च्या तेलापासून जर वाहतुकीचे इंधन केले असते तर वर्षाला 1,000,00 कारसाठी इंधन तयार झाले असते. यातून 2,500,000 टन इतका कार्बनडाय ऑक्साईड पण बाहेर टाकला गेला. 2013 ची याबाबतीतील आकडेवारी किती असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

15. 2004 मध्ये जगातील सर्व ग्राहकांनी 100,000,000,000 यु.एस. डॉलर इतका पैसा फक्त बाटली बंद पाण्यावर उडवला व तो ही एका वर्षात. या पैशाचा सुयोग्य विनियोग केला असता तर यापेक्षा कितीतरी कमी पैशात सर्व जगात स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठ्याची योजना राबवता आली असती.

16. प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यात उष्णतेमुळे आपोआपच प्लास्टिकमधील पदार्थांचे विघटन होवून असे घटक पाण्यात मिसळतात. उदा. बाटली बंद पाण्याची गोदामे (-) 3.33 डिग्री. सें ते 29.5 डिग्री सें. ट्रक मधून वहातूक- 37.8 ते 65.55 डि. सेंटी. मालाची चढ - उतार करताना 7.22 ते 37.8 डि.सेंटी, किरकोळ विक्री केंद्र 12.8 डिग्री.सेंटी, ते 65 डिग्री सें. प्रत्यक्ष ग्राहकाच्या ठिकाणी -12.8 ते 37.8 डिग्री सें. कार वा बंद कपाटात तर याहीपेक्षा जास्त तापमान जाते. कल्पना करा की अशा तापमानाच्या चढ उतारामुळे पाण्यात काय काय मिसळत असेल ? असे घटक हे कॅन्सरला कारणीभूत आहेत याची आपल्याला जाणीव आहे काय ?या सर्व बाबींचा विचार केल्यावर असे लक्षात येते की -

1. बाटली बंद पाणी हे नळाच्या पाण्याला गुणात्मक अथवा संथ्यात्मक असा पर्याय असूच शकत नाही. बाटली बंद पाण्याचा वापर हा सर्वत्र नळाच्या पाण्यापेक्षा अत्यंत नगण्य आहे. कदाचित अजूनही भरपूर मागास असणाऱ्या देशात व भूभागावर जेथे विकासाची कसलीही लक्षणे अथवा प्रयत्न दिसत नाही अशा ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणून बाटली बंद पाणी योग्य असेलही. भारतात तर 60 टक्के बाटली बंद पाणी हे आरोग्यास चांगले नाही. राहिलेले 40 टक्के बाटली बंद पाणी बहुराष्ट्रीय कंपन्याच विकतात. ज्या कसलेही प्रगत तंत्रज्ञानाशिवाय आपल्या खिशातून आपला पैसा नेतात.

2. जगभरात व भारतात सुध्दा नळाच्या पाण्याच्या तुलनेत बाटली बंद पाण्याचा वापर हा अत्यंत नगण्य आहे. पण असे पाणी ही एकाच ठिकाणाहून भरपूर प्रमाणावर उपसले गेल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या भूजलसाठ्यावर अथवा नळाच्या पाण्याच्या साठ्यावर प्रचंड ताण येतो. खरे तर बाटली बंद पाणी बनवण्यासाठी नळाच्या पाण्याचा वापर करू देणे हा शुध्द मुर्खपणा आहे. पण खरा मुद्दा आहे तो प्लास्टिकच्या वापराचा. जर असे पाणी साठविण्यासाठी कच्चा तेलाच्या वापराविना व पर्यावरण पुरक पदार्थांचा वापर करून त्यापासून जर बाटल्या अथवा पिशव्या निर्माण करता आल्या तर निदान असे पाणी हे बऱ्यातच प्रमाणात गरजुंसाठी उपयुक्त तरी ठरेल.

3. भारतातील गोरगरीब व खेडेगावातील जनतेसाठी व उद्योग तर काहीही उपयोगी नाही कारण यातील कोणीही भरमसाठ किंमतीला असे बाटली बंद पाणी विकत घेवू शकत नाही.

4. हा उद्योग शेतीसाठी व पिण्यासाठी लागणारे पाणी पळवतो व भूजल स्त्रोतांवर व त्यायोगे स्थानिक पर्यावरणावर आघात करतो.

5. या उद्योगामुळे प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो.

6. या उद्योगाद्वारे जगभरात प्रचंड प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड निर्माण होतो व वातावरणात सोडला जातो.

7. बाटली बंद पाणी उद्योगात कसलेही उच्च तंत्रज्ञान नाही. यामुळे उत्पादनात खरोखरीच मूल्यवर्धन होत नाही. पण तरीही जवळपास फुकटच मिळणाऱ्या कच्च्या मालावर भरमसाठ नफा घेण्याची संधी यात आहे. बाटली बंद पाण्यावर स्वच्छतेची कसलीही हमी नाही. व केवळ मुठभर लोकांचे चोचले पुरवणे एवढेच यामध्ये साध्य होते. असा उद्योग काय कामाचा ?

खरे तर हा सर्व बाजारपेठांच्या नियमांशी पूर्णपणे विसंगत आहे व त्यामुळेच अनावश्यक आहे व धोकादायक पण आहे. ह्या उद्योगाची खरी जननी म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा !!

या सर्व बाबींचा विचार केल्यावर खालील उपाय सुचवावेसे वाटतात -
1. देशांतर्गत पिण्याच्या पाण्याच्या साठ्याचे रक्षण करण्यासाठी देशातील नव्याने उभे रहाणारे बाटली बंद पाणी उद्योग बंद करावेत. असाच प्रकार आपण गुटखा व प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बाबतीत केलेला आहे.

2. आज सुरू असणारे बाटली बंद पाणी उद्योग बंद करण्यासाठी साधारणत: 10 वर्षाचा कालावधी द्यावा. याशिवाय, विद्यमान कर व शुल्क आहे तसेच ठेवून सरकारने प्रत्येक बाटली बंद पाणी उद्योग करणाऱ्या कंपनीबरोबर 50 टक्के महसूल वाटून घेण्याचा करार करावा. या योगे सरकार त्यांच्या नफ्यात पण वाटेकरी होईल. इतके असूनही या उद्योगातून उद्योजकाला सुयोग्य नफा मिळेलच मात्र तो भरमसाठ नसेल.

यांचा फायदा असा की अकारण भरमसाठ नफेबाजी करणाऱ्यांच्या शिडातील हवा काढून घेतली की आपोआपच या धंद्याला उतरती कळा लागेल. 10 वर्षाच्या कालावधीनंतर मात्र देशातील सर्व बाटली बंद पाणी उद्योगावर सर्वकष बंदी घालावी. 10 वर्षाचा कालावधी नक्कीच इतका मोठा आहे की नुकत्याच गुंतवणूक केलेल्या उद्योगाचेही नुकसान होणार नाही.

सरकारकडे बाटली बंद पाण्यातून मिळालेल्या महसूलातून जनतेस पाणी पुरवठा होईल अशा योजना राबवाव्यात. एखाद्या एन.जी.ओ ने अशा कडक उपाययोजना सरकारकडे पाठपुरावा करावा.

3. एन.जी.ओ किंवा सरकारने देशांतर्गत प्रचंड प्रमाणात आंदोलन करून बाटली बंद पाण्याचे उद्योगाचे खरे स्वरूप व त्याचा पर्यावरण व जनजीवनावर होणारा आघात जनतेसमोर आणावा. सुदैवाने 50 ते 60 टक्के जनतेस हे माहितच आहे. उरलेल्या 35 ते 40 टक्के ग्राहकांना या विषयाचे गांभीर्य व यातील फसवेगीरी समजलीच पाहिजे. ज्यायोगे त्याचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे.

4. सरकारी संस्था, निमसरकारी संस्था व सेवादले व सरकारच्या अखत्यारीतील सर्व उपक्रम योजना त्यांनी बाटली बंद पाणी वापरावर बहिष्कार घालावा. जनतेच्या पैशातून कोठेही बाटली बंद पाणी वापरले जाणार नाही याची तजवीज करावी.

5. पर्यावरणपूरक पदार्थांपासून पाणी साठवण्याच्या पिशव्या अथवा बाटल्या बनवण्याच्या संशोधनात पैसा ओतावा. मध्यंतरी केळीच्या सोपटाचा वापर करून असे पर्यावरणपूरक प्लास्टिक बनवता येते असे काही प्रयोग जाहीर झाले होते. याचा पाठपुरावा करण्यात यावा. जर असे झाले तर मात्र लोक स्वत:हून पुढे येतील व त्यायोगे स्वत:चे पाणी स्वत:च आणतील.

6. खरे तर बाटली बंद पाणी हा काही जनतेस आवश्यक प्रकार नाही. त्यामुळे त्यावर बंदी आणली तर जनतेचे कसलेही नुकसान होणार नाही किंवा जनतेस त्रास होणार नाही. सर्वजण आपापल्या पध्दतीने सर्वांची सोय बघून घेतील. पूर्वीसारख्या गावोगावी पाणपोया सुरू होतील. जवळपासच्या हॉटेलमधून लोकांसाठी नळ उपलब्ध करून दिला जावू शकतो. जनता पूर्वीसारखी स्वत:च्या स्टीलच्या किंवा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून प्रवास करू शकेल. इतकेच नव्ह तर प्रवासात वापरता येतील असे मातीचे खोजे / माठ पण जास्त निर्माण होतील.

7. पर्जन्य जल भरण (Rain Water Harvesting) योजना देशभर सक्तीच्या करण्यात याव्यात.

8. प्रत्येक शहरात निर्माण झालेले सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यात यावेत. यातून स्वच्छ झालेले पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी व असे पाणी शेतीसाठी व उद्योगांसाठी पुरवावे. हे पाणी कोणत्याही परिस्थितीत नदीत सोडण्यात येवू नये. शेतीला असे पाणी नक्की उपयुक्त आहे. उद्योग धंद्यांनी गरज असल्यास स्वत:साठी लागेल तेवढा शुध्दीकरण प्रकल्प बांधून स्वत:च्या पाण्याची गरज भागवावी.

विनंती :


हा लेख जनसामान्यांना सर्वसमावेषक माहिती देण्यासाठी लिहिलेला आहे. त्यामुळे कसलेही संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण अजिबात न गाळता मूळ स्थितीतच वाचकांच्या समोर यावा ही विनंती. असे न केल्यास लेखाचा मूळ उद्देश पूर्ण न होता वाचकांपर्यंत फक्त अर्धसत्यच पोहोचेल तसेच इतर हितसंबंधीयसुध्दा अकारण गैरसमजामुळे दुखावले जातील व यातून अनावश्यक प्रतिक्रिया निर्माण होतील. मात्र नाईलाजास्तव काही दुरूस्ती करावयाची असल्यास कृपया मूळ लेखकास विश्वासात घेवूनच करण्यात याव्यात ही नम्र विनंती.

विश्वास पिटके - मो : 9011092781