Source
जल संवाद
तासावर आधारित पाणी वाटप :
पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापर होऊन जमिनीची प्रत खालावत आहे. यासाठी प्रचलित सिंचनपध्दतीमध्ये काहीतरी बदल होणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन या कार्यक्षम सिंचनपध्दती आहेत. परंतु त्याचा धरणातील पाण्यावर अवलंब करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. त्याचबरोबर या पध्दतीत विजेचा वापर पण खूप आहे. तेव्हा सध्या वापरात असलेल्या प्रचलित पध्दतीत घनमापनाने होणारा पाणीपुरवठा व घडाळ्याची वेळ यांची सांगड घालून शेती सिंचन केले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याच्या प्रतियुनिट उत्पादकतेत वाढ होईल.
पाणी वापर संस्थेला घनमापनाने मिळणार्या धरणातील पाण्याचे शेतकर्यांमध्ये तासावर आधारित पध्दतीने सिंचनासाठी वाटप करणे.सहभागी सिंचनाने सिंचनक्षेत्रात वाढ झाली, परंतु पाण्याच्या प्रतियुनिट उत्पादकतेत वाढ होत नव्हती. ठिबक सिंचनात पाण्याची उत्पादकता वाढते, परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीची गरज आहे व क्षेत्रावर आधारित सिंचनात पाण्याचा व्यय होतो. म्हणून घनमापन व घडाळ्याची वेळ याची सांगड घालून शेती सिंचन केले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याच्या प्रतियुनिट उत्पादकतेत वाढ होते.
तासावर आधारित पाणीवाटपाचे फायदे :
1. शेतकर्यांना वेळेची किंमत कळते.
2. पाण्याचा नाश थांबतो.
3. सिंचन कार्यक्षमता वाढते.
4. शेतकर्यांची पाणीपट्टी वाचते.
5. संस्थेचे पाणी वाचते.
6. पाणी वाटपाला शिस्त लागते.
7. पिकाच्या गरजेइतकाच पाणीवापर होतो.
8. पाणीपट्टी आकारणीत सुसुत्रता.
9. सिंचनासाठीच्या मजुरीत बचत.
संयुक्त पाणी वापर :
एखाद्या पिकासाठी धरणातील पाणी व विहिरीचे पाणी म्हणजेच भूपृष्ठ जलाबरोबरच भूजलाचापण वापर होतो. अशा प्रकारच्या पाणी वापराला संयुक्त पाणी वापर असे म्हणतात.
धरणाच्या पाण्याच्या दोन आवर्तनाच्या दरम्यान जर पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली तर विहिरीतील पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो.
संयुक्त पाणी वापराचे फायदे :
1. पीक रचनेत उत्पादनक्षम बदल.
2. हंगामी पीक रचनेचा बारमाही पीक रचनेत बदल.
3. पिकाची गरज वेळेवर भागवणे.
संयुक्त पाणी वापर व तासावर आधारित पाणी वाटप पध्दतीने ओझर (मिग) ता.निफाड, जि.नाशिक येथील पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रात झालेले बदल -
1. सिंचित क्षेत्र 35 हेक्टर होते. ते रब्बीत 700 हेक्टर व उन्हाळ्यात 330 हेक्टर पर्यंत वाढले.
2. सरासरी प्रतिहेक्टरी वार्षिक उत्पादकता 2800/- पासून 1,10,00/- पर्यंत वाढली.
तासावर आधारित पाणीवाटप :
पाणी वाटपाच्या या पध्दतीत घनमापनाने होणार्या पाणी पुरवठ्याचे लाभधारक शेतकर्यांना तासावर आधारित वाटप पध्दतीने सिंचनासाठी वाटप होते. सहभागी सिंचनाने सिंचित क्षेत्रात वाढ झाली. परंतु प्रतियुनिट पाण्याच्या उत्पादकतेत म्हणावी तेवढी वाढ झाली नाही. कारण धरणाच्या पाणी वापराच्या पध्दतीविषयी अभ्यास करून कालानुरूप त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. परंतु सिंचनाच्या पाण्याच्या वापराविषयी जेवढी जागरूकता लाभधारकांच्या मनात यायला पाहिजे ती अजून न आल्याने पारंपारिक पध्दतीनेच धरणाच्या पाण्याचे शेती सिंचन केले जाते. त्यात पाण्याचा व त्याचबरोबर वेळेचापण अपव्यय होतो. पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापर होऊन जमिनीची प्रत खालावत आहे. यासाठी प्रचलित सिंचनपध्दतीमध्ये काहीतरी बदल होणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचन, तुषार सिंचन या कार्यक्षम सिंचनपध्दती आहेत. परंतु त्याचा धरणातील पाण्यावर अवलंब करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. त्याचबरोबर या पध्दतीत विजेचा वापर पण खूप आहे. तेव्हा सध्या वापरात असलेल्या प्रचलित पध्दतीत घनमापनाने होणारा पाणीपुरवठा व घडाळ्याची वेळ यांची सांगड घालून शेती सिंचन केले तर सिंचनाची कार्यक्षमता वाढून पाण्याच्या प्रतियुनिट उत्पादकतेत वाढ होईल.
तासावर आधारित पाणी वाटपाचे फायदे :
1. शेतकर्यांना वेळेची किंमत कळते : घड्याळाच्या वेळेनुसार पाणीपुरवठा होत असल्याने शेतकर्याला त्याला दिलेल्या वेळेला बांधील राहून शेतीसिंचन करावे लागते. शेतकरी त्याच्या वेळेविषयी जागृत न राहिल्यास त्याच्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेत त्याचे सिंचन पूर्ण होणार नाही. अर्धवट राहील व जर संस्थेने पाणी दिले तर त्याला जास्त पाणीपट्टी मोजावी लागेल. ही बाब स्पष्ट झाल्याने शेतकर्याला वेळेची किंमत समजते व तो आपल्याला दिलेल्या वेळेतच आपले सिंचन कसे पूर्ण होईल याचा विचार करू लागतो. यासाठी तो आपल्या पाण्याचे पाट स्वच्छ ठेवू लागतो. कारण अस्वच्छ पाण्याचे पाट वाहणार्या पाण्याच्या गतीला अवरोध निर्माण करताता व पाण्याची गती कमी झाली म्हणजे सिंचनासाठी वेळ वाढतो.
2. पाण्याचा नाश थांबून सिंचन कार्यक्षमता वाढते :
शेतकर्याला त्याच्या पाणी मिळण्याची वेळ दिली असल्याने तो त्या वेळेच्या अगोदरच हजर होतो. याने एका शेतकर्याचे भरणे झाल्यावर व दुसर्याचे भरणे सुरू होणे यात पुढील शेतकरी हजर असल्याने पाण्याचा नाश होत नाही. शेतकरी सिंचन करीत असताना त्याच्या पुढील शेतकरी हजर असल्याने शेतकर्याच्या सिंचनावर त्याचा शेजारीच लक्ष ठेवत असतो. याने पाणीवाटपाला शिस्त लागते.
3. शेतकर्याची पाणीपट्टी वाचते :
शेतकर्याला सिंचनाच्या पाण्याची केली जाणारी आकारणी ही तासावर आधारित असल्याने शेतकरी आपले सिंचन कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. समजा एखाद्या शेतकर्याला 5 तास पाणी सिंचनासाठी दिले असतील तर तो आपले सिंचन 4.30 तासात पूर्ण करण्याचा प्रयत्न करून आपली अर्धा तासाची पाणीपट्टी वाचविण्याचा प्रयत्न करतो.
4. संस्थेचे पाणी वाचते :
लाभधारकाने आपले भरणे त्याला दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्यास त्याला मंजूर असलेल्या पाणी कोट्यातील पाणी शिल्लक राहते. पर्यायाने त्या अवर्तनात संस्थेचे पाणी वाचते. पाणी शिल्लक राहिल्याने अवर्तनांची संख्या वाढते. अवर्तनांची संख्या वाढल्याने संस्थेच्या लाभक्षेत्रात पाणी उपलब्धतेचे दिवस वाढल्याने संयुक्त पाणी वापरास चालना मिळते.
5. पिकाच्या गरजेइतकाच पाणी वापर होतो :
समजा एखाद्या पिकाची पाण्याची गरज दोन तास त्या क्षेत्राला पाणी दिल्यानंतर पूर्ण होणार असेल आणि शेतकर्याने तीन तास पाणी त्या क्षेत्राला दिले तर जास्तीच्या पाणीपट्टीचा बोजा शेतकर्यांवर पडेल. यामुळे शेतकरी पिकाच्या गरजेइतकाच पाणी वापर करतो. सर्वसाधारणपणे जमिनीच्या प्रकारानुसार चार इंच खोलीचे सिंचन पाच तासांत 1 हेक्टर क्षेत्रावर होते. यासाठी 1.3 डे.क्यू. पर्यंतचा प्रवाह पुरेसा होतो. शेतकरी आपल्या सिंचनाची खोली या पाणी तासावार नियंत्रित करू शकतात.
6. पाणीपट्टी आकारणीत सुसूत्रता :
पाणीपट्टी आकारणी तासावर आधारित होत असल्याने सिंचित क्षेत्र मोजण्याची गरज पडत नसल्याने पाणी वापर संस्थेच्या मनुष्यबळात बचत होते.
7. सिंचनासाठीच्या मजुरीत बचत :
प्रतिहेक्टर सिंचनासाठी लागणारा वेळ घटल्याने सिंचन करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ पूर्वीच्या तुलनेत कमी लागते. पर्यायाने सिंचनासाठीच्या मजुरीवरील खर्चात बचत होते.
संयुक्त पाणी वापर :
पाणी वापराच्या या संकल्पनेत पिकाच्या सिंचनासाठी भूपृष्ठजल (धरणाचे पाणी), भूजल (विहिरीचे पाणी) या दोन्हींचा एकत्रितरित्या वापर होतो. आवर्तनकाळात सिंचन चालू असताना झिरप्याचे पाणी जमिनीत मुरते. या मुरणार्या पाण्याने विहिरींची पाणीपातळी वाढते. काही धरणे आठमाही आहेत, काही धरणे बारमाही आहेत. परंतु लांबणार्या आवर्तन कालावधीमुळे दोन आवर्तनांच्या दरम्यान जर पिकाला पाण्याची गरज निर्माण होते त्यावेळी शेतकरी आपल्या विहिरीचे पाणी पिकाला देऊ शकतो.म्हणजे कालव्याचे पाणी व विहिरीचे पाणी असा संयुक्तपणे पाण्याचा वापर होतो.
संयुक्त पाणी वापराचे फायदे :
संयुक्त पाणी वापराने सिंचन कार्यक्षमता वाढते, पाण्याची प्रतियुनिट उत्पादकता वाढते, पिकांची घनता वाढते, हंगामी पीक रचनेचे रूपांतर बारमाही नगदी पीक रचनेत होते. पर्यायाने शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारते. पिकाला पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही.
तासावर आधारित सिंचन व संयुक्त पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रात कसा बदल घडवून आणतो ते ओझर येथील पाणी वापर संस्थांच्या लाभक्षेत्रात गोळा केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. (महात्मा फुले, जय योगेश्वर, बाणगंगा पाणी वापर संस्था).
ओझरच्या तीनही पाणी वापर संस्था सन 1990 पासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. या तीनही संस्थांना दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरणातून घनमापनावर आधारित पाणी पुरवठा होतो व त्याचे शेतकर्यांमध्ये तासावर आधारित पध्दतीने वाटप केले जाते. सन 1990 पूर्वी कालव्याच्या पाण्याने फक्त 35 हेक्टर क्षेत्र रब्बीत सिंचित होत होते. ते आज तासावर आधारित सिंचन व संयुक्त पाणी वापराने रब्बीत 750 हेक्टर व उन्हाळ्यात 330 हेक्टर पर्यंत वाढले. लाभधारक शेतकर्याचे प्रतिहेक्टर वार्षिक सरासरी उत्पन्न 2800/- रूपये वरून 1,10,000/- रूपयांपर्यंत वाढले. द्राक्षांसारखे बारमाही नगदी पीक सी.सी.ए च्या 2 टक्केपासून 40 टक्क्यांपर्यंत वाढले. शेतकर्यांबराबेर शेतमजुरांची सुध्दा रोजगार उपलब्धता वाढली. त्यांना वर्षातील 40 ते 50 दिवस रोजगार मिळत होता तो आज 250 दिवसांपर्यंत मिळत आहे. द्राक्ष शेतीत वापरल्या जाणार्या पाण्याची उत्पादकता प्रतीयुनिट 20 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती पर्यंत वाढली व द्राक्षाचे उत्पादन प्रतियुनिट 15 क्विटंलपर्यंत वाढले. आठमाही प्रकल्प पण सिंचन बारमाही अशी परिस्थिती या संयुक्त वापराने तयार झाली.
सन 1990 मध्ये ज्या वेळेस संस्थांनी सुरूवात केली त्या वेळेस तेव्हा चार्यांना झिरपा होतो, फूटतूट होती, झिरप्याचे पाणी जमिनीत मुरायचे, परंतु फुटतुटीचे पाणी लाभक्षेत्रातून वाहणार्या नाल्यातून पुढे बाणगंगा नदीला मिळत असे. म्हणजे ज्या पाण्यासाठी संस्था पैसा मोजत होती ते पाणी नदीत वाहून जात होते. अशा वेळेस लाभधारक शेतकर्यांनी श्रमदानाने मातीच्या गोण्यांचे कच्चे बंधारे तयार करून हे वाहणारे पाणी अडविले व जमिनीत जिरविले. यामुळे आजूबाजुंच्या विहिरींच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पुढे कालवा, चार्या यांची दुरूस्ती झाल्यावर फूटतूट बंद झाल्याने या बंधार्यात येणारे पाणी बंद झाले. झिरप्याचे पाणी जमिनीत मुरायचे पण त्याला बंधार्यामुळे मिळणारी जोड बंद झाल्याने त्याचे परिणाम शेतकर्यांना जाणवले तेव्हा लाभधारकांनी अशी मागणी केली की संस्थेकडून आम्हाला सिंचनासाठी जे पाणीतास मिळणार आहे त्यापैकी काही पाणीतास बंधार्यात साठविण्यात यावे. आम्ही त्या तासांची पाणीपट्टी संस्थेला देवू.