दरवर्षी नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे वर्षातून २ -३ वेळा पुण्यात मुळा, मुठा, पवना येथे व नुकताच कात्रज तलावात जलपर्णीने घातलेल्या धुमाकुळाविषयी वर्तानपत्रे, दूरदर्शन ह्यावर आपल्याला सतत माहिती दिली जाते. मग त्याच्या निर्मूलनासाठी जनता हाकाटी करते. महापालिकेला एकुलता एकच पर्याय माहिती असल्याने महापालिका ती उपटून टाकण्याचे काम करते. जनता तात्पुरती खूष होते. परत २-३ महिन्यात येरे माझ्या मागल्या ! दुप्पट जोराने जलपर्णी तरारून वरती येते. मग परत बोंबाबोंब. परत खेळ चालू, असे वर्षानुवर्षे चालू आहे. याचे कारण भारतात असलेली विज्ञान अज्ञानता.
सामान्य माणसाच्या दृष्टीने मला एवढेच म्हणावयाचे की साधे पिण्याचे पाणी, सांडपाणी निर्मूलन, कचरा व्यवस्थापन ह्या गोष्टीत भरपूर विज्ञान आहे. जोपर्यंत हे प्रश्न सोडविण्यासाठी अनुभवी शास्त्रज्ञ, अत्युत्कृष्ट तंत्रज्ञ व जागरूक प्रशासन एकत्र येणार नाहीत तेथे भारतभर जीवनातील सर्व गोष्टींबाबत आंधळी कोशिंबीर खेळली जाईल ह्यात वाद नाही.
जलपर्णीचा (Water hyacinth) उगम प्रथम दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन खोर्यात झाला. हे जलतण पाण्यावर सहजपणे ३ फूट तरंगणारे, चकचकीत, रूंद, गर्द हिरवट काळपट, मेणचट पाने असलेले, छान मोहक, लिलीसारख्या रंगाचे ६ ते ७ फुले एकत्र असलेले, पोकळ वासा असलेले, दाटीने उगवणारे असे तण आहे. दिसावयास मोहक असल्याने त्याची (Ornamental) शोभेची वनस्पती अशी प्रथम गणना करण्यात आली.
जेथे उष्ण समशीतोष्ण हवामान आहे, त्या जगतात ती जलप्रवासामार्फत पोहचली व डेमॉन ब्लूडेव्हिल, कर्स ऑफ बेंगाल, सिंर्डेला, खुनी सुंदरी (Beauty Killer) ह्या नावाने ओखळू जाऊ लागली.
ज्या देशात प्रखर प्रकाश व जोडीला उच्च तापमान आहे, साधारणत: २५° ते ३०° सें. तापमान, प्रकाश २४००० लक्स अवर्स असा जेथे परिसर असेल तेथे त्याची वाढ प्रचंड होते. हिवाळ्यात जलपर्णीची वाढ खुंटते. ज्या प्रदेशात तापमान १०° सें. खाली असेल व ४० अंश से. वर तपामान असेल तेथे ह्या वनस्पतीची वाढ होवू शकत नाही. विशेषत: खार्या पाण्यात ही वनस्पती तग धरू शकत नाही.
द. अमेरिकेतून जलपर्णी ऑस्ट्रेलियात १८९५ साली पोहचली. तेथून भारतात ती १९०२ साली पोहचली. भारतातून मलेशियात १९१० साली गेली. पुढे झिम्बाब्वे येथे १९३७ साली तर केंगोमध्ये ती १९५२ पोहचली. १८८४ साली अमेरिकेत पोहचल्यावर १० -१२ वर्षात तिथे अमेरिकेला असा दणका दिला की निर्मूलनासाठी १९०२ साली तेथे खास कायदे करावे लागले.
जलपर्णीच्या एकूण ७ जाती जगात आढळतात. समाशितोष्ण व शितोष्ण अशा वातावरण असलेल्या प्रदेशात ही वनस्पती सहजपणे रूजते. केरळ, बंगाल येथे पहिले बस्तान ह्या वनस्पतीने भारतात प्रथम बसवले.
साधारणत: खार्या म्हणजे समुद्रासारख्या पाण्यात हे जलतण आढळत नाही. पण ह्या वनस्पतीची वाढ बे तापमान, आर्द्रता, पोषकद्रव्ये नैसर्गिक शत्रू ह्यावर अवलंबून असते.
१४° ते २९° से. तापमान जलपर्णी फोफवण्यास अत्यंत मदत करते. ह्या पेक्षा कमी तापमानात त्याची वाढ खुंटते. ज्या भागात धुके असते तेथे जलपर्णी पाते तग धरू शकत नाही, हवेतील आर्द्रता Relative Humidity १५ ते ४० अशी असेल तर ही वनस्पती वाढत नाही.
पाण्यातील फॉस्फरस व नायट्रोजन ह्या दोन गोष्टीवर जलपर्णी वाढीचे प्रमाण ठरवता येते. पाण्यात जेथे ०.०५ ते १ मिगॅ्र / लिटर नायट्रोजन (Total Nitrogen) व फक्त ०.०२ - ०.१ मि.ग्रॅ / लिटर फॉस्फरस पाण्यात असेल तर एवढेही प्रमाण जलपर्णी वाढीला अत्यंत पोषक ठरू शकते.
वरील परिस्थितीत ही जलपर्णी पाण्यात कुठल्याही प्रकारात म्हणजे वाहते, संथ पाणी ह्यात उगवू शकते. ज्या पाण्यात शहराचे सांडपाणी मिसळते तेथे तर ती हमखासच फोफावतेय साधारण तळ्यात सांडपाणी मिसळत असेल तर २५५ टन / हेक्टरी/प्रतिवर्ष येथवर ती उत्पादीत होवू शकते.
जलपर्णीची वाढ ही दुहेरी पध्दतीने म्हणजे जलपर्णी बियांद्वारे व व्हिजिटेटीव्ह (वनस्पतीजन्य) ह्या दोन पध्दतीने होते आणि मजा म्हणजे जलपर्णीचे बी पाण्यातील चिखलाबरोबर खोलवर तग धरते. पुढे हे बी पाण्यात २० वर्षापर्यंत टिकू शकते. आणि ह्यातून जलपर्णी वारंवार फोफावते. त्यामुळेच ह्याचे निर्मूलन अवघड होवून जाते.
जलपर्णी ही पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे. हिचे देठ पोकळ, स्पंजप्रमाणे असतात. त्यावर साधारणत: ५ से. मी. आकार असलेली गर्द हिरव्या रंगाची पाने डोलत असतात. ही वनस्पती तिला पोषक परिस्थिती मिळाली कि ५ दिवसात दुप्पट गतीने वाढत असते. वर्षात त्यामुळे एका जलपर्णीमुळे लाखो अहिरावण, महिरावण जलपर्णी निर्माण होतात. जेव्हा जेव्हा पाणी आटण्यास सुरूवात होते, त्यावेळी जलपर्णी बी वातावरणाशी जुळवून घेवून, वनसप्ती वाढ परतपरत करू शकते. साधारणत: ऑक्टोबरचा महिना भारतासाठी त्यासाठी उपयुक्त आहे. ह्या जलपर्णीत साधारणत: ९५ टक्के हे पाणीच असते. ह्यावरून पाणी खेचण्याची जलपर्णीची क्षमता तुमच्या ध्यानी येईल.
मग ही वनस्पती अक्षरश: गालीच्याप्रमाणे फोफावते. त्यामुळे ह्याच्या गर्दतेमुळे पाण्यात प्रकाश किरणांची वाट अडवली जाते. त्यामुळे Photosynthesis चे प्रमाण घटून त्याचा इतर जलजंतू, इतर जीव, जलवनस्पतीवर विपरित परिणाम होतो. मुख्यत: पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते. त्याचबरोबर तापमान कमी होवून जलसृष्टीला आवश्यक असणारी प्रकाशसंश्लेषक Photosynthesis प्रक्रिया पूर्ण होवू शकत नाही. त्यामुळे इतर उपयुक्त जैविक पाणवनस्पती वाढीवरही त्याचा परिणाम होतो.
जलपर्णीमुळे जलतण, डासांना राहण्यास, पैदास करण्यास आमंत्रण मिळते. त्यामुळे हिवताप साथीचा प्रादुर्भाव होवू शकतो. जलपर्णीमुळे शेतीवर ही परिणाम होतो. पाणीपुरवठा करणार्या वाहिन्या व कालवे ह्यात जलपर्णीने अडथळे निर्माण होतात. शिवाय धरणाच्या भिंती, कालव्यालगतचे पूल या सर्वांना जलपर्णीच्या वजनाने धोका निर्माण होतो. वीजनिर्मितीतही ही वनस्पती पाणीप्रवाहाला प्रचंड अडथळे आणू शकते.
मासेमारी करणार्या लोकांना ह्या जलपर्णी जाळ्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो, जलवाहतूकही प्रचंड त्रास सहन करावा लागतो, जलवाहतूकही प्रचंड प्रमाणावर थांबते. त्यामुळे नदी, कालवे येथून पोहोचणार्या गोष्टींवर कायम अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वेळ येते.
कथा ही अमेरिकेतील जलपर्णी उपद्रवाची !
भारतात जलपर्णीचा प्रवेश अमेरिका व्हाया ऑस्ट्रेलियातून जलमार्गे १९०२ साली झाला. पण अमेरिकेत ती १८८४ साली पोहोचली आहे. ह्या प्रगत राष्ट्राने त्याचा मुकाबला आजवर कसा केलाय, ते पाहू या.
अमेरिकेत, १८८४ साली फ्लोरिडा येथील सेंट जॉन नदीमध्ये जलपर्णीची फुले फार मोहक दिसतात म्हणून नदी काठावरील एका तळ्यातील कारंज्यात ही वनस्पती प्रथम सोडली गेली. ह्या जलपर्णीने अख्खे तळेच ५ वर्षात व्यापून टाकले. एवढेच नव्हे तर १८९६ पर्यंत ह्या जलतणाने नदीपात्र ही भरून टाकले. १८९८ साली तर कहरच झाला. नदीवर जलपर्णीचे इतके आक्रमण झाले की त्यातून संपूर्ण जलवाहतूक थांबली, लहान बोटी ज्या बंदराकरता नदीतून जावयाच्या त्यांना जलपर्णीतून मार्ग काढणे अशक्य झाले. बंदराकड च्या पुलाखालून जाणार्या वाटाही ह्या जलपर्णीने बंद केल्या. अमेरिकन लोकांच्या दैनंदिन उत्पन्नावर, व्यापारावर जलपर्णी वाढीचा प्रचंड परिणाम होवून नुकसान होवू लागले.
ह्याकरता अमेरिकन सैन्याच्या अभियंतांना तेथे पाहणी करून, ह्या जलपर्णी निर्मूलनाकरिता नदी व बंदरासाठी १८९९ मध्ये स्वतंत्र कायदा करावा लागला व आज आपण जलपर्णी उपटतो आहोत, त्या पध्दतीने अनेक बोटी, यंत्रे ह्या साहाय्याने तेथे जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला गेला. येथून प्रथम जलपर्णी निर्मूलन लढ्याला सुरूवात झाली, पण हा उपाय जलपर्णी निर्मूलनासाठी तात्पुरता ठरला.
अमेरिकेतील सरकार १९०२ साली इतके वैतागले की ही जलपर्णी नष्ट करण्यासाठी लोकांना, यांत्रिक, रासायनिक वा अन्य कोणताही उपाय राबवण्यात अमेरिकन लोकांना खास परवानगी अमेरिकन कॉँग्रेसने दिली.
मग काय ही जलपर्णी नष्ट करण्याकरता सर्व तर्हेची अॅसिडस्, फिलॉलस्, रॉकेल, अर्र्सेनिक, पारा इ. संयुगे, ह्या सर्वांचा मारा जलपर्णीवर करण्यात आला. त्या काळात अमेरिकेत कीटकनाशकांचा इतका उदय झाला नव्हता. त्यामुळे जी उपलब्ध असतील ती रसायने जलपर्णी वाढ रोखण्यासाठी वापरली गेली.
१९०५ साली अमेरिकन सरकारला ह्या सर्व रसायनांचा घातक परिणाम जलचर, जनावरे ह्यावर गंभीर प्रमाणात होतो आहे हे आढळल्याने जी रसायने घातक ठरली त्या वापरावर बंदी घालण्यात आली.
मग संशोधनाला प्रचंड प्रमाणावर सुरूवात झाली की, जनावरे ह्या घातक रसायनापासून कशी वाचतील. पुढे तंबाखू, सर्व तर्हेची तेले. कुजवलेली अंडी, मास ह्यांचा फवारा मारून पाहण्यात आला. हेही प्रयत्न अत्यंत खर्चिक, शिवाय उपयुक्त नसल्याचे आढळून आले. आणि सन १९०० ते १९५० पर्यंत फक्त जलपर्णी उपटून टाकणे एवढाच पर्याय अमेरिकेत सर्वत्रराबवला गेला.
ह्यावरून आपणसुध्दा लक्षात घेतले पाहिजे की जलपर्णी उपटून टाकणे हा अत्यंत तात्पुरता उपाय आहे. जलपर्णी परत परत उपटून टाकली तरी दुप्पट जोमाने उगवते, वाढते. अमेरिकेत ह्या जलपर्णीने तोपर्यंत इतके हातपाय पसरले, की अमेरिकेतील बंदरात पोहोचणारे कालवे - जलमार्ग, धरणाचे अडवलेले पाणी हे जलपर्णीने सतत भरून जायचे.
सन १९४७ साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्यापूर्वी अमेरिकेला पहिले यशस्वी तणनाशक निर्माण करता आले. ज्यामुळे जलपर्णी वाढ आटोक्यात ठेवणे, अमेरिकेला शक्य झाले. हे तणनाशक मानव, जलचर, जनावरे इ. साठी घातक नाही ना हेही तपासण्यात आले. आणि जलपर्णी निर्मूलनासाठी अत्युत्तम उपाय म्हणून अमेरिकेने तो यशस्वीपणे राबवला.
पण संशोधन येथेच थांबले नाही तर जैविक, नैसर्गिक रितीने जलपर्णी वाढीवर मात करता येते का ? ह्यावर उत्तर शोधण्यात आले.
सन १९६० पासून ते १९७२ पर्यंत यशस्वीपणे जलपर्णीचे नैसर्गिक शत्रू शोधून काढण्यात आले व हे तंत्रज्ञान ही अमेरिकेने लगेच अंमलात पण आणले. लक्षात घ्या अमेरिकेसारख्या प्रगत देशाला ७० वर्षामध्ये जलपर्णी फक्त आटोक्यात ठेवण्याइतके तंत्रज्ञान मिळवता आले. जलपर्णी निर्मूलनासाठी आपल्याकडे हे तंत्रज्ञान न वापरता अजूनही ही अमेरिकेची सन १८९९ ची जलपर्णी उपटणे एवढीच पध्दत भारतात सर्व राज्यात वापरली जाते.
उपद्रवीपणा जलपर्णीचा :
सर्व जगाला त्राही भगवान करून सोडणारी जलवनस्पती कोणती ? तर एकमताने सांगेल, ती म्हणजे जलपर्णी (Water Hyacinth) अजरामरतेवर आपल्या हिंदू संस्कृतीचा विश्वास आहे. त्यांना चिरंजीव असे आपण संबोधतो - त्यादृष्टीने जलपर्णी वनसप्ती अजरामरच आहे, असे म्हटले पाहिजे.
सर्व वैज्ञानिकांनी आजवर शर्थ केलीय - तोडा, फोडा, झोडा, मारा पण ही जलपर्णी अहिरावण, महिरावण सारखी परत उभीच ! हिच्या वाढण्याचा झपाटा पुण्यातील कात्रज तलावात नुकताच अनुभवला आहे. जलपर्णीच्या बी पासून जलपर्णीची जेव्हा निर्मिती होते, त्यावेळी तिची मुळे परत परत फुटून नवनवी जलपर्णी निर्माण करते. ती इतक्या वेगाने की तुम्ही तोंडातच बोट घालाल. जलपर्णी पैदासकाळात २५ जलपर्णी रोपे पाण्यात २ लाख रोपे निर्माण करू शकतात. त्यांची वाढ एखाद्या तलावात - जोपर्यंत पूर्ण पाणी गालिच्याप्रमाणे आच्छादिले जात नाही तोपर्यंत काही ती वाढ थांबत नाही.
आणि मग पुढे जलपर्णी उपद्रवचालू राहतो, तो असा -
१. पोहणारी मंडळी, पाणी पिण्यासाठी उतरलेली जनावरे जलपर्णी मुळातील जाळ्यात अडकून प्राण गमवू शकतात.
२. जलपर्णी पानावर गोगलगाई, डास ह्यांची पैदास जोरदार होते त्यामुळे मानवाला डासांपासून होणारे हिवताप इ. रोग जडू शकतात. फैलावूही शकतात.
३. अशा ठिकाणी चांगले पिण्याचे पाणी मिळवणे अत्यंत कठीण होवून बसते.
४. जलपर्णीच्या मुळांमुळे शेती पंप पुरेसा ताकदीने पाणी खेचू शकत नाहीत.
५. जलपर्णीमुळे जलवाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.
६. नद्यांचे प्रवाह जलपर्णी मुळामुळे अडवून बंद झाल्याने जेव्हा पाऊस येतो त्यावेळी पुराचे पाण्याला वाहून जाण्यास पुरेशी वाट मिळू शकत नाही त्यामुळे पुराचा धोका दुप्पट वाढतो.
७. पावसाळ्यात ही वनस्पती तुटून पाणी प्रवाहाबरोबर नदीतून वाहत जावून नदीवरील पूल, धरणाच्या भिंतीवर इतर तरंगणार्या वस्तुनिशी आढळते. त्यामुळे ह्या वनजदार गोष्टीमुळे पूल, धरण बांधकाम, नदीवरील व कालव्यावरील बांधकामांना प्रचंड धोका संभवू शकतो.
८. जलपर्णी ही प्रचंड प्रमाणावर पाणी शोषून घेणारी वनस्पती आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष ह्या वनस्पतीमुळे जास्त वाढते. साधारणत: ३ पटीने जास्त पाणी पानांद्वारे शोषले जाते. शिवाय त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता देखील खालावली जाते.
९. जलचरांवर अत्यंत घातक असा परिणाम जलपर्णी जलव्यापकतेने होतो. त्यांच्या नैसर्गिक जीवनावरच त्याचा प्रत्यक्ष परिणाम होतो.
१०. जलपर्णीचा परिणाम अत्यंत घातक आहे. पाण्यातील विरघळलेला प्राणवायूच ह्या वनस्पतीमुळे कमी झाल्याने मासे पाण्यात जिवंतच राहू शकत नाहीत. त्यामुळे पूर्ण मत्सोद्योग धोक्यात येतो.
११. यांत्रिक होड्यांच्या इंजिनमध्ये तण गेल्याने जलक्रीडेवर त्याचा विपरित परिणाम होतो.
१२. एकूण तलावाचे सौंदर्य, त्याचे आरोग्य व त्यातील जलक्रीडा ह्या सर्वांवरच जलपर्णी आक्रमण करते. त्यांचा प्रवाशांवरती सुध्दा परिणाम होवून अशा जागा प्रवासी म्हणून टाळल्या जातात.
१३. सर्प, मगरी ह्यांचे वास्तव्य अशा ठिकाणी लपण्यास उत्तम म्हणून असू शकते.
१४. पावसाच्या पुराने जलपर्णीचे वाण तलावात, नदीच्या संथ पाण्यात, नदीकाठच्या, तलावाच्या, धरणांच्या आसपास, सांदी फटीत सहज वाढू शकते.
१५. घरातील पाळीव प्राणी म्हणजे कुत्री व माजरांना हे जलपर्णी तण खाण्यात अथवा श्वसनात आल्यास त्यांना ते धोकादायक आहे.
१६. जलपर्णी बी पाण्यातील चिखलात आरामात, दुष्काळी परिस्थितीत २० वर्षे तग धरू शकते. परिस्थितीनुसार त्यातून जलपर्णी परत उगवू शकते. त्यामुळे जलपर्णी संपूर्ण नष्ट करणे ही कर्मकठीण गोष्ट होय.
भाग २ पुढील अंकी...........
डॉ. प्रमोद मोघे, पुणे - मो : ९३२५३८००९३
Dr Moghe has written in his article about Water hyacinth. These Water hyacinth were first found in South America – Amazon. He has stated the conditions in which these water hyacinth are flourished, the temperature and the climatic conditions.
He also stated that how these Water hyacinth can be demolished with the help of acids, pesticides etc.
Source
जलसंवाद, एप्रिल 2018