Source
जल संवाद
गाळलेल्या पाण्यात काही प्रमाणात सूक्ष्मजीव राहतात. त्यामुळे क्लोरिनची प्रक्रिया आवश्यक ठरते. या ठिकाणी क्लोरिनची योग्य मात्रा देणे आवश्यक असते. काही ठिकाणी क्लोरिन वायूचा वापर करतात तर काही ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर करतात. गाळलेले पाणी भूमिगत हौदात सोडले जाते. पाणी हौदात सोडतानाच क्लोरिनची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे क्लोरिन सर्व पाणी साठ्यात मिसळला जातो.
निसर्गात डोंगरदऱ्याजवळ पाण्याचे झरे असतात. हे कृत्रिम प्रदूषणापासून दूर असतात. काही भूमिगत पाण्याचे स्त्रोतही सांडपाण्याच्या प्रदूषणापासून दूर असतात. अशा स्त्रोतांच्या पाण्यात आपल्या पोषणाला आवश्यक असलेली खनिजे असतात. अशा पाण्याला खनिज पाणी म्हणतात. काही कंपन्या अशा स्त्रोताचे पाणी बाटलीमध्ये बंद करून खनिज पाणी म्हणून विकतात. अशा प्रकारच्या पाणीसंकलनाला व विक्रिला कायद्याची बंधने आहेत. अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 व त्या अंतर्गत नियम 1955 नुसार ही बंधने आहेत. नैसर्गिक स्त्रोतातून पाणी संकलन करताना रासायनिकदृष्ट्या व जैविकदृष्ट्या पाणी दूषित होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. शुध्दीकरणाची प्रक्रिया ही अनुज्ञेय (Permitted) प्रक्रियेशिवाय करता येत नाही. त्यावर इतर प्रक्रिया करता येत नाहीत. याशिवाय या नियमांतर्गत संकलनासंदर्भात व वेष्ठणांसंदर्भात काही बंधने आहेत. वेष्टण साहित्य हे स्वच्छ, आरोग्यपूर्ण, रंगहीन, पारदर्शक, बिघाड न होणारे असेच पाहिजे. वेष्टण हे प्लॅस्टिकचे असल्यास अन्नसाठवणुकीच्या प्रतीचे (Food grade) व खालीलप्रमाणे असावे.पॉलिइथिलिन आय.एस.10146 च्या कसोटीला उतरणारे किंवा पॉलिव्हिनिल क्लोराईड आय.एस. 10151 च्या कसोट्यांना उतरणारे किंवा पॉलिअल्कलिन टेरिप्थेलेट आय.एस. 12252 च्या कसोट्यांना उतरणारे किंवा पॉलिप्रॉपिलिन आय.एस. 10910 च्या कसोट्यांना उतरणारे किंवा अन्न प्रतवारीचे पॉलिकार्बानेट किंवा निर्जंतुक अशा काचेच्या बाटल्या, की ज्यामध्ये पाणी कोणत्याही प्रकारे पुन्हा दूषित होणार नाही. स्थलांतरामुळे अशा वेष्टणात फरक न पडता ते कसोटीला उतरावेत. अशा प्रकारे वेष्टण केलेले खनिज पाणी प्रयोगशाळेतील ठरवून दिलेल्या चाचण्यांच्या कसोटीला उतरले पाहिजे. या पाण्यासाठी प्रयोगशाळेला एकूण 48 चाचण्या (कधी याहीपेक्षा जास्त) कराव्या लागतात. त्यात नऊ सूक्ष्मजीव शास्त्रीय चाचण्या, तीन कायिक चाचण्या व उर्वरित 36 किंवा यापेक्षा जास्त रासायनिक चाचण्या आहेत. प्रत्येक चाचणीला प्रमाणके ठरवून दिलेली आहेत. यापैकी एका चाचणीच्या प्रमाणाशी जरी पाणी कसोटीला उतरले नाही, तरी असे खनिजपाणी अप्रमाणित ठरवले जाते व संबंधित कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. खनिज पाण्याच्या वेष्ठणावर लावलेल्या खूण चिठ्ठीवर (Label) खालील मजकूर असणे या नियमानुसार बंधनकारक आहे.
1. कंपनीचे म्हणजेच उत्पादकाचे, वेष्टण करणाऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता
2. पाणी वेष्टण केल्याची तारीख, पाण्याचे घनफळ
3. बॅच किती कालावधीपर्यंत उत्तम राहील, यासंबंधी विधान
5. वापरानंतर बाटली नष्ट करावी अशी सूचना
6. आय.एस.आय मार्क व आय.एस.क्रमांक असावा
याशिवाय वेष्टणावरील खूणचिठ्ठीत काही दावे करण्यात प्रतिबंध करण्यात आलेली आहे. जसे की -
1. पाण्याचे गुणधर्म औषधी, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक परिणाम करणारे आहेत.
2. उपभोक्त्याच्या आरोग्यास फायदेशीर परिणाम
3. संभ्रम निर्माण होईल किंवा दिशाभूल होईल अशी विधाने खनिज पाण्याचे वेगवेगळे प्रकारही या नियमांतर्गत देण्यात आले आहेत.
शुध्दीकरण केंद्र (Water - Works)
पाणी शुध्द करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. शहरी भागाला पाणी पुरवठा करण्यापूर्वी पाणी शुध्द करण्याचे एक केंद्र असते. तेथे पाणी कसे शुध्द केले जाते, याचीही आपण माहिती करून घेतली पाहिजे.
धरणातील साठविलेले पाणी (Raw - Water) हे स्वच्छ नसते. त्यात अनेक घटक मिसळलेले असतात. प्रथम शुध्दीकरण केंद्रावर जलवाहिनीने ते पाणी आणले जाते. शुध्द करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यांतून म्हणजेच प्रक्रियेतून हे पाणी जाते. या प्रक्रिया खालीलप्रकारे आहेत.
1. हवामिश्रण :
या प्रक्रियेत धरणातील आणलेले पाणी उंच मनोऱ्याच्या खडबडीत पृष्ठभागावरून वाहू दिले जाते. खडबडीत पृष्ठभागावरून पाणी वाहताना खळखळ असा आवाज येतो. या वेळी पाण्यात हवा मिसळली जाते व हवेतील वायू पाण्यात विरघळतात. विशेषत: पाण्यात विरघळणाऱ्या प्राणवायूचे (ऑक्सिजन) प्रमाण वाढते. या प्राणवायूचा उपयोग करून जीवाणू पाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करतात. तसेच फेरस लोहाचे रूपांतर फेरीक लोहात होते. विरघळणाऱ्या प्राणवायूमुळे पाण्यातील विरघळलेले काही घटक अविद्राव्य रूपात पाण्यात येतात व ते पाण्यात तरंगत राहतात. हवामिश्रण ही पाण्यावर प्रथम करण्यात येणारी प्रक्रिया अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. पाण्याला कार्बनीपदार्थांमुळे येणारा वासही या प्रक्रियेत कमी होतो. हवामिश्रणाच्या प्रक्रियेबरोबरच क्लोरिनचे द्रावण पाण्यात मिसळले जाते. यास प्रीक्लोरिनेशन म्हणतात. यात पाण्याला काही वनस्पतींमुळे रंग आलेला असल्यास तो कमी होण्यास मदत होते. कार्बनी घटकांमुळे येणारा वासही कमी होतो.
2. सेटलिंग (पाणी स्थीर करणे) :
हवामिश्रण केलेले पाणी एका मोठ्या हौदात स्थिर करण्यास सोडतात. या हौदाला सेटलिंग टँक म्हणतात. टँकमध्ये पाणी सोडतानाच त्यात तुरटीचे ठराविक तीव्रतेचे द्रावण मिसळले जाते. तुरटीचे द्रावण पूर्णपणे पाण्यात मिसळले जाईल अशा प्रकारे प्रक्रिया केली जाते व हा तुरटीमिश्रित पाण्याचा साठा टँकमध्ये काही काळ स्थिर ठेवला जातो. या टँकमध्ये पाण्यात तरंगणारे कण व तुरटीचे घटक एकत्र येऊन साका तयार होतो. पाणी स्थिर असल्यामुळे हा साका टँकच्या तळाशी बसतो व त्यामुळे पाण्यातील तरंगणारे पदार्थ कमी होतात. पाणी स्थिर ठेवल्यानंतर तळाशी बसलेल्या साक्यावरील पाणी निवळलेले दिसते.
3. निवळणे :
ही प्रक्रिया संथपणे होऊ द्यावी लागते. टँकमध्ये निवळलेले पाणी वरचेवर एका गाळण स्तरावर आणले जाते. हे निवळलेले पाणी धरणातील पाण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात पारदर्शक झालेले असते. त्यातील जीवाणूंचे प्रमणाही कमी झालेले असते.
4. गाळणे :
गाळण स्तर (Filter - bed) यांचे एकावर एक असे वेगवेगळे थर असतात. त्यात लहान गोट्यांचा स्तर, मोठ्या वाळूचा स्तर, बारीक वाळूचा स्तर असे स्तर एकावर एक रचून मोठा गाळण स्तर तयार केला जातो. काही गाळण स्तरावर क्रियाशील कोळशाचा चुराही वापरला जातो. शैवालांची वाढ होऊ नये म्हणून हे गाळण स्तर सूर्यप्रकाशापासून सुरक्षित ठेवतात. निवळलेले पाणी अशा गाळण स्तरावर सोडतात. यातून गाळले गेलेले पाणी हे स्फटिकासारखे स्वच्छ व पारदर्शक असते. या पाण्याची गढुळता (Turbidity) 1.0 (एक) एन.टी.यू. पेक्षा (नेफॅलोमेट्रिक टरबिडिटी युनिट) कमी असते. त्यातील 95 टक्क्यांपेक्षा जास्त सूक्ष्मजीवांचा भार हलका झालेला असतो.
5. क्लोरिनची प्रक्रिया :
गाळलेल्या पाण्यात काही प्रमाणात सूक्ष्मजीव राहतात. त्यामुळे क्लोरिनची प्रक्रिया आवश्यक ठरते. या ठिकाणी क्लोरिनची योग्य मात्रा देणे आवश्यक असते. काही ठिकाणी क्लोरिन वायूचा वापर करतात तर काही ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर करतात. गाळलेले पाणी भूमिगत हौदात सोडले जाते. पाणी हौदात सोडतानाच क्लोरिनची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे क्लोरिन सर्व पाणी साठ्यात मिसळला जातो. अर्धा ते एक तासाचा संपर्क कालावधी दिल्यानंतर हे शुध्द झालेले पाणी उंच असलेल्या टाकीत पंपाने साठविले जाते व तेथून जलवाहिन्यांमार्फत पंपिंग करून सर्व शहराला पुरविले जाते. असे संपूर्ण शुध्द केलेले पाणी जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला शुध्द आहे की नाही, याची तपासणी केली जाते. या पाण्यात क्लोरिनचा अल्प अंश आढळणे आवश्यक असते. पाण्याचा मोठा साठा अशा प्रकारे शुध्द करण्यास फार मोठा खर्च येतो. त्यामुळे आपण शुध्द केलेले पाणी सुरक्षित कसे राहीत व त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जलवाहिन्यांमध्ये गळती निर्माण झाल्यामुळे किंवा जलवाहिन्यातील झडपा निकामी झाल्यामुळे असे शुध्द झालेले पाणी पुन्हा अशुध्द होऊ शकते. म्हणून जलवाहिनीच्या सतत देखभालीची आवश्यकता असते. आपणही पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन घेताना आपल्या जलवाहिन्या गटारातून किंवा नाल्यातून घेऊ नयेत. सांडपाणी वाहिन्यांची व पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांची फारकत राहील याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिनचा वापर केल्यामुळे सर्वच रोगकारक जीवाणू नष्ट होतात. विषाणू मात्र क्लोरिनमुळे लगेच नष्ट होत नाहीत. पाण्याला प्रथम काही प्राथमिक प्रक्रिया कराव्या लागतात. तुरटीची मात्रा, निवळणे, गाळणे अशा प्रकारच्या प्रक्रियांमुळे पाणी संपूर्ण पारदर्शक बनते व अशा पाण्याला क्लोरिनची मात्रा दिल्यास विषाणू नष्ट होतात. शुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी त्यामुळे जीवाणू व विषाणूमुक्त असते. क्लोरिनमुळे अत्यल्प प्रमाणात असलेले काही पदार्थही नष्ट होतात.
क्लोरिनच्या योग्य मात्रेला विशेष महत्व आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेत नैसर्गिक स्त्रोताचे पाणी जलकुंभात साठविले जाते व त्याला ब्लिचिंग पावडरची मात्रा देतात. हृी मात्रा जास्त झाल्यास पाणी कडवट लागते व वास येतो, म्हणून लोक तक्रारी करतात. मात्रा योग्य असेल व संपर्क कालावधी योग्य असेल, तर अशा तक्रारी येत नाहीत. यासाठी जलकुंभातील पाण्याच्या साठ्याला ब्लिचिंग पावडरची मात्रा देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पाण्याला देण्यात येणारी ब्लिचिंग पावडरची मात्रा व क्लोरिन द्रावणाची मात्रा आपण सर्वांनीच माहिती करून घेतली पाहिजे. क्लोरिन हा ऑक्सिडेशन करणारा अभिकारक आहे. पाण्याच्या एका रेणूशी त्याची अभिक्रिया होऊन हायपोक्लोरस आम्ल व हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होतात. नंतर हायपोक्लोरस आम्ल विघटित होऊन नवजात, क्रियाशील प्राणवायू तयार होतो. हा प्राणवायू पाण्यातील काही घटकांचे ऑक्सिडेशन करतो. त्यामुळे अल्प प्रमाणात असलेले कार्बनी व अकार्बनी घटक नष्ट पावतात. जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी हे प्रयोगशाळेतील सर्व कसोट्यांना उतरणारे असते. अशा प्रकारची जलशुध्दीकरण केंद्रे ग्रामीण भागातही काही ठिकाणी आहेत. नदीच्या पाण्यातील प्रदूषण वरचेवर वाढत आहे म्हणून असे जलशुध्दीकरण होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी जलशुध्दीकरण केंद्र नाही अशा ठिकाणी इतर पध्दतीने जलशुध्दीकरण होणे आवश्यक आहे.
डॉ.पी.जी.कुलकर्णी, नाशिक - (दू : 9423396492)