Source
जल संवाद
पाणी म्हणजे जीवन, अमृत आपलं जीवन फुलविणार आनंद, सुख, समाधान देणारं या पाण्याचा स्त्रोत म्हणजे गगनातून धरतीवर आपोआप बरसणारा निर्भेळ पाऊस.
परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली. जमीन निर्माण केली, विश्वाचीही निर्मिती केली, मनुष्य प्राणी जन्माला आला. लोकसंख्या वाढली पण पाण्याचा साठा मात्र मर्यादितच राहीला, वाढते प्रदूषण, जंगल तोड, तापमानात होणारी वाढ, लोकसंख्या वाढ, पाण्याचा अपव्यय, अशा अनेक कारणांनी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याला कारणही आपणच.
यामुळे जागतिक जलदिन सारखे दिन साजरे करण्याची आपल्यावर वेळ आली. २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने प्रतिवर्षी दिनांक १६ ते २२ मार्च हा स्पताह संपूर्ण राज्यात जल जागृती स्पताह म्हणून करण्याचे ठरविले जाते.
आपल्या देशाचत बर्याच प्रदेशात जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. पण तो कधी कमी तर कधी अति पर्जन्यवृष्टी होते. जानेवारी पासूनच दुष्काळाची झळ लागायला सुरूवात होते. शहरातून पाणी कपात तर खेड्यातून टँकरने पाणी पुरवठा तो ही मर्यादितच. माणसांनाच पाणी नाही तर शेती, बागायत, गुरे ढोरे , पशु पक्षांना पाणी कोठून मिळणार?
यावर्षी कोकणात फक्त ४० टक्के पाणी शल्ल्क आहे. ते आपल्याला मे महिन्यापर्यंत पुरेल. मराठवाड्यात ६ टक्के, पुणे येथे २२ टक्के, तर विदर्भात १६ टक्के एवढ्याच पाण्याचा साठा उपलब्ध आहे. अजून ३ -४ महिने पावसाची वाट पहावी लागणार आहे. अति सुखाच्या हव्यासापोटी, पैशासाठी आपण जंगल तोड केली. निसर्ग निर्मित झरे, ओढे, नाले बुजवून टाकले. प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या वाढविली त्यामुळे हवेतील ओझोनचा थर कमी होवू लागला. हळूहळू सर्वच प्राणीमात्रांना ऑक्सीजनही मिळेनासा होणार आहे. कारखान्यातील दूषित पाणी नदीच्या पाण्यात सोडले गेल्यामुळे नदी तर प्रदूषित झालीच सहाजिकच पिण्यासाठीचे पाणी ही निरूपयोगी झाले. नदीतील जलचर प्राणी मृत होवू लागले या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर होवू लागला. पाण्याचे स्त्रोत कमी झाले, दुष्काळ वाढला, शेतकरी आत्महत्या करू लागले.
महात्मा गांधी म्हणाले होते, की ही भूमी तुमच्या गरजा पूर्ण करू शकते परंतु तुमची लालसा पूर्ण करू शकत नाही. म्हणून निसर्गाला ओरबाडू नका, संत तुकारामांनी ही म्हटले आहे की, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, आपणही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे, मराठी म्हण आहे ना तहान लागली की विहीर खोदणे ही आपली मनोवृत्ती बदलायला पाहिजे.
म्हणूनच दरवर्षी येणार्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जाण्यासाठी पाण्याचे नियोजन करूया, पाण्याचा काटकसरीने वापर करूया. एक थेंब पाण्याचा, आहे अनमोल जीवनाचा या पाण्याचे नियोजन कसे करावयाचे ते पाहुया -
१) पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवायचे यासाठी शोष खड्ड्यांची उभारणी करून त्यात डबर, विटांचे तुकडे. मोठी खडी, लहान खडी, आणि जाडसर रेती भरायची म्हणजे पाणी झिरपण्याचे उद्दिष्ट्य साध्य होईल.
२) जमिनीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून साठवून ठेवणार्या विहीरी म्हणजे भूपृष्ठ जल विहीरी. डोंगरमाथ्यापासून ते खोल दरीपर्यंत कुठल्याही भूप्रदेशावर या विहीरी घेता येतील.
३) सौरशक्ती हा पाणी बचतीवरचा एक उत्कृष्ठ उपाय आहे. यामुळे वीजेची बचत होईल. या संदर्भात गुजराथ राज्यात मोदी सरकारने केलेला एक अभिनव प्रयोग वाखाणण्यासारखा आहे. तो म्हणजे नदीपात्रावर सौर ऊर्जेची पॅनेल्स बसवून केलेली वीज निर्मिती. यासाठी जागा मोठी लागते परंतु नदीपात्राचा वापर केल्यास जमिनीचा प्रश्नच राहणार नाही. नदीपात्र पॅनेल्सनी झाकले गेल्यामुळे नदीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.
हायवेवर सोलर पॅनेल्स बसवून वीज निर्मिती केल्यास रस्त्यावर पाणी साचून रस्ते खराब होणार नाहीत, आणि रस्त्यांचे आयुष्य वाढेल, रस्ता खड्डे मुक्त होईल. या पॅनेल्सवर पावसाचे पडणारे पाणी जमा करून रस्त्यांच्या बाजूला मोठे शोष खड्डे खोदून तिकडे पाणी वळविल्यास पुनर्भरणामुळे भूजल वाढण्यास मदत होईल आणि याद्वारे निर्माण झालेली वीज ग्रामीण उद्योगकांना, शेतकर्यांना स्वस्त दरात देता येईल. आपल्या देशात मोठी हॉटेल्स, हाऊसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन, एस.टी स्टॅण्ड, सरकारी इमारती या ठिकाणी असे पॅनेल्स बसवून वीजेची, पाण्याची बचत होईल.
४) कुपनलिका खोदणे
५) विहीरींमध्ये पुनर्भरण होणे (पावसाचे पाणी जमिनीत मुरवून विहीरद्वारे त्या पाण्याचा वापर करणे)
६) प्लॅस्टिक आणि टायर्सचा वापर करून छोटे छोटे बंधारे, शेततळी बांधणे, विजय बंधारे, पाझर तलाव बांधणे.
७) नदी आणि शेततळी यांना गतवैभव प्राप्त करून देणे, आज नदीचे लचके तोडले जात आहेत पुढच्या पिढीला नदी आणि तळी कोणत्या स्वरूपात पहायला मिळतील याची शंकाच आहे.
८) राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी तेथील ग्रामस्थांच्या मदतीने जवळ जवळ ७ हजार जोहड बांधले आणि तेथील प्रदेश सुजलाम सुफलाम केला.
९) इस्त्राईल येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर ८५ टक्के शेतीसाठी उपयोगात आणला जातो. तेथे ५ ठिकाणी समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे प्रकल्प असून त्यातून ५८७ दलघ.मी पाणी उपलब्ध होते. या पाण्यासाठी लिटर मागे २४ पैसे इतका खर्च येतो, तेथे सर्वत्र मिटर पध्दत आहे.
१०) सिंगापूर येथेही पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे तेथे प्रत्येक घरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करतात. एकही पाण्याचा थेंब समुद्राला जावू देत नाहीत ही प्रक्रिया एवढी सक्षम आहे की, मिनरल वॉटरपेक्षाही शुध्द पाणी वापरायला मिळते. समुद्राच्या पाण्यावरही प्रक्रिया करून पाणी वापरले जाते त्यामुळे तेथे पाण्याची कमतरता भासत नाही.
११) पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी पाणी वापर संस्था स्थापन करून, सिंचन व्यवस्थापन लाभधारकांनी करावे त्यामुळे पिकांच्या गरजेप्रमाणे पाणी वापर होईल आणि अनावश्यक पाणी वापराला आळा बसेल.
१२) जलाशयाच्या संपूर्ण परीघावरील क्षेत्रात उंच आणि दाट वृक्षांची लागवड केल्यास, जलाशयातील बाष्पीभवनाचा वेग कमी करता येईल.
१३) नद्यांमध्ये सांडपाणी, कारखान्यातील दूषित पाणी सोडणे बंद करून प्रदूषण टाळायला हवे, नद्या वाचवायला हव्यात.
१४) काही नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढते ती काढून टाकू नये, कारण याच्यामुळे नदीतील पाणी नैसर्गिकरित्या शुध्द होते.
आताच्या दुष्काळ परिस्थितीत जे काही पाणी उपलब्ध आहे त्या थेंब थेंब पाण्याला आपल्याला वाचवायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया -
१. मी मला पाहिजे तेवढेच पाणी प्यायला भांड्यात घेईन आणि आलेल्या पाहुण्यांनाही उगीचच ग्लास भरून पाणी देणार नाही कारण उरलेले पाणी फेकून दिले जाते.
२. घरातील गळके नळ वेळीच दुरूस्त करून थेंब थेंब पाणी वाचवीन, घरात कमी इंचाचे नळ बसविणे म्हणजे पाण्याचा प्रवाह कमी होईल याबाबतीत डॉ. राजेंद्रसिंहनी म्हटले आहे की, अत्यंत गरीब माणूस तुपाचा वापर जेवढ्या काटकसरीने करील, तसा तो पाण्याचा वापर करतो असे करायला हवे.
३. धान्य, भाजीपाला धुतलेले पाणी गॅलरीतून कुंडीत किंवा बागेत घालावे त्यामुळे झाडांचे पोषण चांगले होईल आणि पाणी वाया जाणार नाही.
४. धुणी, भांडी करणार्या महिला संघटनांना पाणी बचतीचे महत्व पटवून देणे.
५. दुष्काळामध्ये वॉशिंग मशिन वापरणे बंद करावे, कारण मशिनला पाणी खूप लागते, ते सर्व पाणी सांडपाण्यात जाते, हाती कपडे धुतले तर पाणी कमी लागते आणि हे पाणी बागेत, कुंड्यातील झाडांना वापरता येते.
६. आदल्या दिवशीचे पाणी शीळे समजून ओतून दिले जाते पण पाणी कधीच शीळे होत नाही ही पध्दत बंद व्हायला हवी.
७. शॉवरचा वापर टाळावा, त्याऐवजी बादलीत मोजकेच पाणी घ्यावे.
८. गाड्या धुण्याऐवजी पुसून घ्याव्यात.
९. बादलीत पाणी साठवून ते वापरणे, नाही तर नळ चालू बादली वहाते ते टाळावे.
१०. तुषार आणि ठिबक सिंचन पध्दतीने झाडांना पाणी द्यावे यामुळे उपलब्ध पाण्यात जवळ जवळ तिप्प्ट पिक येते.
११. पाणी टंचाईच्या काळातच होळी, रंगपंचमी, हे सण येतात या सर्वांसाठी होणारा पाण्याचा अपव्यय टाळावा.
१२. आपल्या प्रमाणेच पक्षांनाही पाण्याची गरज आहे. यासाठी गॅलरीत, टेरेसवर, अंगणात छोट्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे, जेणे करून पक्षी आपली तहान भागवतील.
१३. नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सल्ला दिला आहे की, लग्न सोहळे, धार्मिक विधी या सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. हा अति वापर टाळण्यासाठी हे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना करण्यात यावे याचीही अंमलबजावणी आपण करायला हवी.
आपण सर्वजण सुजाण, सुशिक्षित आहोतच, पाण्याचे महत्व तर सर्वांनाच पटलेले आहे, पण यासाठी जन जागृती व्हायला हवी. जल साहित्य संमेलन भरून पाण्याची महती पटवून द्यायला हवी.
आपण नशिबवान आहोत यासाठी की, आपल्याकडे मा. डॉ. माधवराव चितळे सारखे प्रेरक, मार्गदर्शक, ज्ञानयोगी, कर्मयोगी, जलाचार्य आहेत फक्त गरज आहे ती सर्वांच्या इच्छा शक्तीची. त्यासाठीच हा लेख प्रपंच.
सौ. प्राची जोशी. चिपळूण, मो : ९८२३५२१९६२