जलतरंग-तरंग 1 : पाण्याचा परिचय

Submitted by Hindi on Thu, 10/01/2015 - 13:06
Source
जल संवाद
जललहानपणी आपण अनेक नवनव्या गोष्टी पहात असतो, अनुभवत असतो. पण तेव्हा त्यांचे आपल्या स्वत:च्या आयुष्यातलं स्थान, किंवा समाजाच्या जडणघडणींतले स्थान नीट कळत नसते. तसे कळण्याचे ते वयही नसते. पण त्यावेळचे ते अनुभव मनावर कोरलेले राहतात. त्यांतला कार्यकारणभाव नंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उलगडत जातो.

माझे लहानपण चाळीसगावांत गेले. चाळीसगांव हे 20,000 वस्तीचे छोटे गांव, तालुक्याचे ठिकाण, स्वातंत्र्यपूर्व काळांत केवळ घरोघरच्या विहिरींवर अवलंबून असलेले. पावसाळ्यानंतर विहिरींना भरपूर पाणी असणारे, पण उन्हाळ्यांत पाण्याची हाकाटी होणारे. मुळात तितूर व डोंगरी या दोन नद्यांच्या संगमावर, त्या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले. त्यामुळे जुन्या गांवठाणाच्या परिसरांत विहिरींना चांगले पाणी असे. मात्र तितूर नदी ओलांडून पलिकडे उत्तरेला गांवाच्या नव्या विस्तारांत आलो की, फक्त नदीकाठंच्या काही परिसरांत चांगल्या विहीरी, तर नदीपासून जसजसे दूर जावे तशी पाण्याची दुर्मिळता.

पाण्याचा एकंदर घरगुती वापर कमी, विहिरींतून पाणी रहाटाने ओढून काढावे लागे. ते एक रोजचे श्रमाचे काम राही. सुखवस्तु कुटुंबात विहीरींतून पाणी काढून घरचे हौद भरायला पाणके असत. पहांटे त्यांचा लगबग असे. झुंजुमंजु झाले की, रहाटांचा खडखडाट ऐकू यायला लागे. काही तरी कारणाने आमच्याकडचा पाणीवाला सुटला. विहिरींतल्या पाण्याने हौद भरायचे काम माझ्याकडे आले. पुढे महाविद्यालयांतून सुट्टीसाठी घरी आलो की, हे काम माझ्याकडेच राही. नंतर काही वर्षांनी गांवात नळ आले, तेव्हा हौदात नगरपालिकेची तोटी बसली. आधुनिक पाणी पुरवठा व्यवस्थेत रोजचे परिश्रम किती कमी होतात त्याचा मला सुखद अनुभव आला.

माझ्या वडिलांचा व्यवसाय वकिलीचा. कोर्ट - कचेरीच्या कमानिमित्त शेती व्यवसायांतल्या अनेकांचे त्यांच्याकडे येणे जाणे राही. अशा शेतकऱ्यांच्या शेतावर वडिलांबरोबर कधी मधी जाण्याची मला संधी मिळे. पाऊस कमी झाला की, शेतातल्या विहीरीला पाणी कमी पडल्याची तक्रार ऐकू येई.

तालुक्यांतले सधन शेतकरी हे गिरणा नदीला काढलेल्या जामदा कालव्यावरचे बागायतदार. ब्रिटीशांनी 1878 च्या दुष्काळांत गिरणा नदीवर मोठा दगडी बंधारा बांधून नदीला डावा कालवा काढला होता. त्याला बारमाही पाणी असे. त्यावर हिवाळ्यांत गव्हाचे पीक व पेरू, केळी, मोसंबी, लिंबे - अशी फळझाडे होती. शाळेच्या विद्यार्थ्यांची हुकमी यशस्वी सहल म्हणजे त्या जामदा धरणाला भेट. बंधारे व धरण यांतला तांत्रिक फरक लोकांना अपरिचित होता. जामदा बंधाऱ्यालाच जामदा धरण असे म्हटले जाई. जामदा धरणाच्या काठांवर असलेल्या सरकारी प्रशस्त रहदारी बंदल्यांतील आवारांत हुंदडणे, चिंचा पाडणे, आणि पाणी कमी वाहत असेल तर नजर चुकवून कालव्यांत डुंबणे हा सहलीचा कार्यक्रम.

कालव्यांत कधी भरपूर पाणी असे, तर कधी कालवा बंद - कोरडा. हे असे कां, हे कधी त्यावेळी मला कळले नाही. कधी कोणी समजावूनही सांगितले नाही. कालव्याचे पाणी नसलेल्या इतर भागांतील गावांची शेती व कालव्याचे पाणी मिळणारी शेती यांतील फरक साध्या नजरेलाही जाणवे. जामदा कालव्याच्या पाण्यावर प्रसिध्दीला आलेल्या व आमच्या शालेय भूगोलाच्या पुस्तकांत उल्लेख असलेल्या बहाळ या गांवांतील शेतावर जायला खूप आनंद वाटे.

जामदा बंधाऱ्याच्या माथ्यावरून, 5 -6 मीटर उंचीवरून, नदीचा प्रवाह खाली पडत राही. त्या धबधब्याचे दृष्य जवळपास होळीच्या दिवसांपर्यंत टिके. त्या काळांत पर्यटन नावाचा शब्द कधी शाळेत ऐकला नव्हता. पण गांवात येणाऱ्या पाहुण्यांसकट सर्व लहानमोठ्यांना जामदा धरणावर सहलीला जाण्याची ओढ असे.

बहाळ गांवच्या संपन्न शेतीमुळे नगरपालिकेने बांधलेल्या चाळीसगांवच्या जुन्या गांवठाणाच्या वेशीतील उत्तरेकडच्या दरवाजाला 'बहाळ दरवाजा' असेच नांव होते. त्यामुळेही बहाळ गांवचा मोठेपणा मनांत ठसे. विहिरीवरच्या पाण्यावर शेती असणारी रांजणगांव, पातोडे. वाघळी, ही गांवे बहाळ इतकी मनांत भरत नसत. त्या गांवांमध्ये विहिरींवरचा भाजीपाला मात्र भरपूर होई. गांवच्या वेशीला 'रांजणगांव दरवाजा' होता. पण बहाळ दरवाजाची ऐट जादा होती.

डोंगरी नदीला मिळणारा एक नाला गांवाजवळून वाहत होता. त्याच्या काठांवर ओळखींतल्या एका कष्टकरी शेतकऱ्याचे छोटेसे शेत होते. त्यांचे नांव नागूदादा. शेतातून मिळणारे उत्पन्न फारच तोकडे. चाळीसगांवचे रेल्वेस्थानक हे जंक्शन व व्यापारी मालाच्या चढ उताराचे मोठे ठिकाण. नागोदादा व त्यांचे तरूण भाऊ शेती सांभाळून स्टेशनवरच्या मालधक्क्यावर पोती चढवणे - उतरवणे याचे हमाली काम करत. फाटके कपडे व डोक्यावर मुंडासे. एक दिवस मी वडिलांबरोबर त्यांच्या शेतावर गेलो, तेव्हा नागोदादा व त्यांची बायको शेतापासून नाल्याच्या अंगाने वरच्या बाजूस जाणारा चर खणतांना दिसले. माझ्या वडिलांना नागोदादा मोठ्या जिद्दीने समजावून सांगत होते की हा चर म्हणजे नाल्याचे पाणी शेतात आणणारी चारी होणार आहे. मंद चढावाने खणत जात जात 2 किलोमीटर अंतरावर ती नाल्याला मिळणार होती. पावसाळ्यानंतर तेथे नाल्याचे पाणी अडवले की, या चारींतून हिवाळ्यांतल्या पिकांसाठी त्यांना पाणी मिळणार होते. वर्षभरानंतर पुन्हा तेथे गेलो, तर ती चारी खरच वाहू लागली होती. त्यामुळे शेताचे रूपही बदलले होते.

पुढे 1952 चा दुष्काळ आला. मी 17 वर्षांचा होतो. पुण्यांतील महाविद्यालयाच्या वसतिगृहांत राहायला लागून दोन वर्षे झाली होती. तेथे हुकमी पाण्याची संवय झाली होती. पण इकडे गांवातल्या बहुसंख्य विहीरींचे पाणी आटले होते. आमच्या घरच्या विहीरीचाही ठणठणाट झाला होता. सकाळी रहाटाच्या दोराला धरून खाली उतरले तर वाटीने खरवडून बादली दोन बादल्या पाणी मिळे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरची मंडळी काही दिवस इतरत्र नातेवाईकांकडे गेली - आम्हा दोघा भावांवर घर सोपवून. माझा वर्गमित्र जगदीश पेंडसे सुट्टीत म्हणून माझ्याकडे त्या उन्हाळ्यांत चार दिवस रहायला यायचा होता. पाण्याची अडचण असूनही मी त्याला अडवले नाही. सकाळी उठून तोही आमच्याबरोबर नागोदादांच्या शेतांतील विहीरीवर आंघोळीला व कपडे धुवून घ्यायला येई. घरापासून 7 - 8 किलोमीटरची रपेट होई. नागोदादांनी घाम गाळून खणलेल्या चारीला दुष्काळामुळे काहीच पाणी नव्हते. पण शेतात नव्याने विहीर खणली होती, तिला पाणी टिकून होते. गांवच्या व्यवस्थेत व नागोदादांच्या शेतीच्या व्यवस्थेत कोठे तरी काही तरी कमी पडते आहे एवढे मला जाणवे.

नंतर कानावर आले की, धुळ्याजवळच्या बोरी नदीवर अशा दुष्काळाची तीव्रता जाणवल्यामुळे मातीचे धरण बांधण्याचे काम चालू झाले आहे. त्या कामाचे कौतुक लोकांच्या तोंडून ऐकायला मिळे. म्हणून एका मित्राबरोबर आडवळणी प्रवास करून त्या धरणाचे काम पहायला गेलो. धरणाच्या रचनेतील तपशील कांही कळले नाहीत. समजावून सांगणारेही कोणी तेथे नव्हते. आसपासच्या परिसरांत सर्वत्र विस्तृत खोदाई, बैलगाड्यांतून मातीची वहातूक, धुरळा, रस्त्यावरची खडी दाबणाऱ्या रूळाने धरणाच्या मातीभरावाची चेपणी यात काही आकर्षक वाटले नाही. पावसाळ्यांतल्या पुराचे पाणी सांठवून घ्यायला हवे होते. त्याशिवाय बोरी नदीला वर्षभर पाणी टिकणार नव्हते. दुष्काळांत तर ती पार कोरडी पडली होती. एवढा एकच उलगडा मला झाला. रोजंदारी नसलेल्या मजुरांना कष्टाचे स्थानिक काम मिळत होते. ते तेथे मोठ्या संख्येत राबतांना दिसत होते.

गांवाला लागून नदीजवळ एक गोशाळा होती. तेथे बऱ्यापैकी मोठी विहीर होती. तिच्यावर मोट चाले. उन्हाळ्यांत मोठी मुले त्या विहीरींत डुंबायची. तरूण वयांत असलेले माझे मामा एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे आले होते. ओळखींतल्या इतरांबरोबर ते मला त्या विहीरीवर घेवून गेले. तेव्हा मी दहा वर्षांचा होतो. कंबरेला दोर बांधून त्यांनी मला पोहायला म्हणून विहिरींत उतरवले. दोन तीन दिवसांत कंबरेचा दोर काढता आला. इतरांबरोबर मी तरंगू लागलो होतो, पोहूं लागलो होतो. त्यानंतर मग दर उन्हाळ्यांत विहीरीत उडी मारून भरपूर पोहणे चालायचे. आपण चांगले पोहूं शकतो असे वाटायला लागले.

नंतर एकदा बाबुलाल वाणींच्या बहाळमधील शेतावर गेलो असतांना ते गिरणा नदीवर स्नानाला गेले. मलाही बरोबर घेवून गेले. नदीत उतरल्यावर नदीतले पोहणे व विहीरींतले पोहणे यातला फरक लगेच जाणवला. सकृत् दर्शनी संथ वाहाणाऱ्या पाण्याला सुध्दा किती ओढ असते हे अनुभवले व सावध झालो. नंतर शालांत परीक्षेच्या वर्षात मुंबईच्या शाळेत शिकायला होतो. तेव्हा गिरगावांत चौपाटीजवळ रहाणे झाले. आमच्या वाडींतल्या तरूण मित्रांच्या आग्रहाने रविवारी सुट्टीच्या दिवशी समुद्रांत पोहायला जाणे होवू लागले. भरतीच्या वेळी लाटांवर स्वार होण्यांत डौल होता. पण दोन लाटांमधल्या खोबणींत असतांना भोंवतीच्या उंचावलेल्या पाण्याने घेरल्यावर भीति वाटे. विहीरींतले पोहणे, नदींतले पोहणे व समुद्रातले पोहणे यांतले अंतर कळले.

महाविद्यालयीन जीवनांत राष्ट्रीय छात्र सेनेत चार वर्षे सैनिकी शिक्षण घेण्याचा अनुभव मिळाला. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात होतो तेव्हा छात्र सेनेतील सार्जंट पदावर पोचलो होतो. त्या वर्षी आमचे वार्षिक शिबीर खडकवासला जलाशयाच्या काठांवर एका उंच माळरानावर तंबूमध्ये होते. छात्रसेनेतील अभियांत्रिकी प्रशिक्षणाचा भाग म्हणून खडकवासला तलावांत तरंगत्या नावांना नावा जोडून झटपट तरंगता पूल तयार करण्याचा अभ्यास आमच्याकडून करून घेतला जाई. चांगले पोहू शकणाऱ्या आम्हा काही जणांना त्या कामांत जरा जास्त भाव मिळे. छावणींतल्या सर्व छात्र-सैनिकांना दम भरण्यांत आला होता की तलावांत मगरींचा धोका आहे कोणी फार अंतर आत जायचे नाही.

आम्ही काही सैनिक मित्रांनी आमचे डोके लढवले. तलावाच्या काठांवर मगरी नाहीत. त्या केवळ खोल तलावांत कशा येणार ? एका रविवारी सकाळी सेनेच्या दैनिक संचलनाला सुट्टी होती. आम्ही कांही छात्रसैनिक सर्वांच्या नजरा चुकवून तलावांत पोहायला उतरलो. खूप आत पर्यंत पोहत गेलो. तेथे एक रंगीत फडके बांधलेली तरंगती वस्तू दिसली. ती नेमकी काय आहे हे जवळ जावून पाहिले. तर आमच्या तुकडीचे कमांडंट असलेले मेजर सरदारजी पोहत होते. आम्हांला पाहून ते चपापले. त्यांना पाहून आम्हीहि वरमलो. चुपचाप त्यांच्यासकट सर्वजण किनाऱ्यावर परत आलो. नंतर दहा दिवस शिबिरात त्याच सदराजींच्या नेतृत्वाखाली राहत होतो. पण कोणीच हा विषय काढला नाही. तो तिथेच संपला. पण धाडसाने तलावांत दूर आतपर्यंत पोहत जाणाऱ्या आम्हा दोघा - तिघांबद्दल त्यांच्या डोळ्यांतील कौतुकाचा भाव जाणवत राहिला.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चाळीसगांवला बांधकाम विभागाच्या कायम स्वरूपाचा उपविभाग होता. त्याचे पक्क्या दगडातले बांधकाम होते. त्या आवारांतच उपविभागीय अभियंत्याचे निवासस्थान होते. आवारांत थोडीशी झाडी होती. गावांत हिंडणाऱ्या ज्या मोजक्याच मोटारी होत्या, त्यांतील एक त्या उपविभागीय अधिकाऱ्याची असे. शासकीय रूबाबाची ओळख त्या मोटारीमुळे आम्हा शालेय विद्यार्थ्यांनाही होई. माधवने पुढे अभियंता व्हावे व उपविभागीय अभियंत्याच्याही वरचे म्हणजे कार्यकारी अभियंत्याचे पद मिळावे असे माझे वडील घरांतल्या गप्पांमध्ये अधून मधून बोलून दाखवत.

मित्रांमध्ये व गांवातल्या घरगुती परिचयाच्या कुटुंबांमध्ये अधून मधून विषय निघे की वर्गात सतत अग्रेसर असणाऱ्या माधवने पुढे काय करावे ? देश नुकताच प्रजासत्ताक झाला होता. उत्साहाचे नवे वातावरण होते. माधवने प्रशासकीय सेवेत जावे असा काही वडिलधाऱ्या मंडळींचा आग्रह होता. वडिलांजवळ व माझ्याजवळ ते तसे बोलून दाखवत. पंचवार्षिक योजनेची नवी संकल्पना वृत्तपत्रांत वारंवार चर्चेत असे. विकासाची नवी महत्वाकांक्षी दालने उघडत आहेत असे जाणवे. त्यांतून माझ्या मनांतली स्थापत्य अभियांत्रिकीची ओढ हळूहळू पक्की होत गेली.

पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी आवेदन पाठवले, त्यांत स्थापत्य शाखेची निवड लिहून दिली होती. गुणानुक्रमाने प्रवेशाची यादी लागली, त्यांत माझे नांव अग्रस्थानी होते. पण माझ्या नांवापुढे दूरसंचार - टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स - हा विषय लिहिलेला होता. प्राचार्यांनी असे गृहित धरले होते की मी तिकडेच जाणार. 'ग्रामीण' भागांतून आलेला विद्यार्थी - त्याच्याकडून अर्ज भरण्यांत काही तरी चूक झालेली दिसते असा त्यांचा समज. त्यांना व्यक्तिश: भेटून मला पटवून द्यावे लागले की मला खरोखरीच स्थापत्य शाखेकडे जायचे आहे. नंतर माझे पाहून माझ्यानंतरच्या आणखी दोघांनी निवडक्रम बदलून टेलिकम्युनिकेशन ऐवजी स्थापत्याकडे प्रवेश बदलून घेतला. ज्याचा मला विशेष आनंद झाला. त्यापैकी दापोलीहून आलेला माझा वर्गमित्र मदन तलाठी पुढे रेल्वेचा महाव्यवस्थापक झाला. आमची अजून घट्ट मैत्री आहे.

अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षात आलो, तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला असलेले तीन अधिकारी आम्हांला अध्यापक होते. प्रा. अमिनभावी सिंचन विषय शिकवीत, प्रा. वाळिंबे नागरी पाणी पुरवठा शिकवीत, तर प्रा. बोपर्डीकर मलप्रवाहांचे विसर्ग व शुध्दीकरण शिकवीत. पुढे प्रा. अमिनभावी कर्नाटकांत जावून तिकडे मुख्य अभियंता झाले. प्रा. वाळिंबे महाराष्ट्रांत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता झाले. दोघांनाही क्षेत्रीय कामांचे तपशील फार चांगले अवगत होते.

प्रा. अमिनभावींनी बांधकाम खात्यांतील जाणकारांना बोलावून विद्यार्थ्यांसाठी चांगली व्याख्याने घडवून आणण्याचा उपक्रम चालू केला होता. त्यांत नाशिक जवळ गोदावरी नदीवरील गंगापूर धरणाचे बांधराम प्रथमच अवजड यंत्रे वापरून आधुनिक पध्दतीने करणारे कार्यकारी अभियंता श्री. धानक होते. ते पुढे गुजराथचे मुख्य अभियंता झाले. त्यांचे सचित्र व्याख्यान फार प्रभावी होते. माझ्या मनावर त्या कामाची छाप पडली. आपल्या देशांतल्या नद्यांवर असे काही तरी घडत रहायला हवे असे वाटले.

अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षांत कोणत्या तरी एका प्रकल्पाची रचना करून दाखवण्याच्या कामाचा समावेश होता. त्यासाठी प्रा. वाळिंबेंनी एक पाणी पुरवठा प्रकल्प आम्हा विद्यार्थ्यांसाठी सुचवला. पुण्याजवळच्या औंध गांवाला लागून मुळा नदी वहाते. तेथे पाणी उचलण्याची व्यवस्था करून, ते गाळून शुध्द करून पुण्याच्या गणेशखिंडीकडील विस्तारित नागरी क्षेत्राला पुरवायचे असा प्रकल्प दिला होता. त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करून नकाशे तयार करायचे होते. आम्हा विद्यार्थ्यांना ते काम फार आकर्षक वाटले. अनेकांनी त्यांत चांगला रस घेतला, क्षेत्रीय अनुभव असलेल्या प्राध्यापकांमुळे आम्हाला हळूहळू एक नवे विश्व उलगडायला लागले होते.

(क्रमश:)
तरंग 2 : पुढील अंकात

लेखक परिचय
डॉ. माधवराव चितळे

डॉ. माधवराव चितळे मूळचे चाळीसगावचे. अज्ञापासून ते जागतिक जलतज्ज्ञापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास कसा उलगडत गेला, त्यात कसे विविध तरंग उठत गेलेत याची माहिती त्यांच्याच शब्दात 'जलतरंग' या लेखमालेत सादर करीत आहोत. मो : 09823161909