नदी आणि भूजल

Submitted by Hindi on Tue, 03/06/2018 - 14:41
Source
जलोपासना, दिवाळी 2017

आज अनेक ठिकाणी नदी प्रवाहाचे रूंदीकरण, खोलीकरण करून त्यातून भूजलाचे पुनर्भरणाचे प्रयत्न हाती घेतले गेले आहेत. अशा सर्व ठिकाणी वरील चर्चा उपयुक्त ठरावी व रूंदीकरण खोलीकरणाच्या जागा वैज्ञानिक पध्दतीने ठरवल्या जातील अशी आशा करूयात.

जल व्यवस्थापन हा विषय गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक चर्चेचा केंद्रसाथनी असल्याने त्याबाबत बरीच जन जागृती झालेली दिसते. सर्व सामान्यांमध्ये अशी जाणीव निर्माण होणे हे खूप महत्वाचे पहिले पाऊल आहे. राज्याचे मोठे क्षेत्र दुष्काळ प्रवण असल्याने वारंवार पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण ह्यासाठी अनेक ठिकाणी जनसहभागातून नव्या उत्साहाने प्रयोग हाती घेतले जात आहेत व महाराष्ट्र शासन त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे हे सर्व स्वागतार्ह आहे.

जे वेगवेगळे प्रयोग सध्या होत आहेत त्यामध्ये नदी पात्रामधून जलसंवर्धन व भूजल पुनर्भरण हा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी नदी पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण आणि सिमेंट बंधारे निर्मिती ह्या प्रयोगाची नव्याने भर पडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अशा प्रयोगाला खूप मोठे यश मिळाल्याने अशा प्रयोगाच्या प्रतिकृती निर्मिण्याचे काम राज्यात अनेक नदी नाल्यावर सध्या सुरू आहे.

अशा प्रयोगाची यशस्विता एक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट स्थान विशिष्ट भू भौतिक परिस्थिती ठरते. ह्यामध्ये खालील बाबी येतात -

१. प्रयोग क्षेत्र कुठल्या विभागात आहे, दुष्काळी, निम दुष्काळी का पुरेशा पावसाचे
२. वॉटर शेडचे स्थान, आकार, प्रकार व नाला - नदीची श्रेणी (ऑर्डर)
३. जमिनीखाली भूस्तरांचा प्रकार आणि त्यांची भूजल भंडारण आणि वहन क्षमता
४. नदी आणि वॉटर टेबल ह्यांच्यामधील परस्पर सापेक्ष नाते.

ह्या संक्षिप्त लेखामधील चर्चा केवळ चवथ्या मुद्याची, म्हणजे नदी व भूजल ह्यामधील सापेक्ष नाते, एवढ्या पुरतीच मर्यादित आहे.

नदीचे प्रमुख कार्य भूभागावर पावसामधून पडणारे पाणी, वॉटरशेड मधील सर्व ओहळ, नाले, छोट्या नद्या, उपनद्या ह्याद्वारे एकत्र करून सागरात पोहोचणे असे असते. हे काम अव्याहतपणे एका पर्जन्यकाळापासून पुढे येणार्‍या पर्जन्य काळापर्यंत सतत चालू राहाते. पावसाच्या पाण्याचा एक भाग जमिनीखाली मुरून भूजल तयार होते. जसे वॉटरशेडवर पडणारे पाणी जमिनीवरून नदी पात्रात येते तसेच वॉटरशेडखाली जे वॉटर टेबल तयार होते त्यातले पाणीही शेवटी मंद गतीने झिरपून नदी पात्रात पुन्हा उद्भवते. जमिनीवरून वाहाणारे पाणी जलद गतीने (काही किलोमीटर प्रतिदिन) वाहाते ज्यामुळे त्याचा नदीद्वारे अपधाव पर्जन्य काळ संपल्यावर दोन चार महिन्यातच खूप रोडावतो. पण ह्या उलट भूजलाची भूस्तरातून झिरपण्याची गती प्रतिदिन काही मीटर इतरी मंद असल्याने दीर्घकाळपर्यंत त्याचा निचरा होत राहिल्याने प्रमुख नद्यांचा प्रवाह पुढील पावसापर्यंत कमी प्रमाणात टिकून राहातो. ह्या टिकून राहाणार्‍या प्रवाहात लोकवस्ती /उद्योगधंदे ह्यामध्ये वापरातून निर्माण होणार्‍या सांडपाण्याचा भाग मात्र मोठा असतो.

नदीचे प्रमुख कार्य जरी जमिनीवरून व जमिनीखालून वाहणार्‍या पाण्याचा सागरात विसर्ग करणे हे असले तरी हे काम टप्प्टा टप्प्याने होत असते, म्हणजे नदी / नाल्यांचे पाणी काही ठिकाणी भूजलाचे पुनर्भरण करते तर काही क्षेत्रात भूजलाचा विसर्ग करते. कुठला नदीचा टप्पा योग्य नाही हे जर आधी ठरवता आले तर पुनर्भरणाचे प्रयोगाची योग्य जागा ठरवण्यास मदत होते.

असा पूर्वाभ्यास प्रयोग क्षेत्राचा वॉटर टेबल कंटूर नकाशा बनवून सहज करता येतो. सोबतच्या आकृती वरून हे स्पष्टपणे उलगडते.

कुठल्याही नदीच्या अनेक उपनद्या असतात व उपनद्यांमध्ये अनेक लहान वॉटर शेड असतात. सोबतच्या आकृतीत अशी एक लहान वॉटरशेड, वॉटर टेबल कंटूर व भूजलाची प्रवाह दिशा (Flow lines) ह्यांच्यासह दाखवली आहे.

सर्वप्रथम पावसाच्या पाण्याचे लहान ओहळ बनतात असे ओहळ एकत्र येवून प्रथम श्रेणीचे नाले (First order streams) असे दोन प्रथम श्रेणीचे नाले एकत्र येवून द्वितीय श्रेणीचे व पुढे तृतीय श्रेणीचे नाले / ओढे छोट्या नद्या, उपनद्या असे क्रमाक्रमाने जलोढ क्षेत्र विस्तारत जाते. प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीचे उदगम डोंगर उतारावर असल्याने तेथील नाल्यांचे पात्र भूजलाचे तुलनेने (म्हणजे खाली वॉटर टेबल निर्माण झाले असल्यास ) उंचावर असल्याने त्यातील पाणी जमिनीवर खोलवर असणार्‍या भूजलाचे पुनर्भरण करत राहते. त्यामुळे अशा नाल्यांचा जमिनीवरील प्रवाह रोडावत जातो losening stream)) ह्या क्षेत्रातील वॉटर टेबल कंटूरचा आकार U सारखा असतो व U चे वळण नदीच्या प्रवाहाच्या दिशेकडे असते. ह्या क्षेत्राचे खाली छोट्या नद्यांचे प्रवाह कमी उताराच्या मधल्या क्षेत्रात (Transition Zone) मध्ये नदी पात्राचा व वॉटर टेबलचा उतार साधारण सारखा असल्याने व भूजलाच्या प्रवाहाची दिशा बरीचशी नदी प्रवाहाचे समांतर असल्याने कुठे कुठे नदीपात्र भूजलाचे थोडे वर ( विशेष पूर स्थितीत) किंवा थोडे खोलवर असल्याने नदी व भूजलाचे नाते बदलत राहते. सामान्यत: भूजल प्रवाहाची दिशा नदीशी समांतर असते. इथून पुढे खालच्या क्षेत्रात उपनद्याचे जास्त खोलवरून वाहात असल्याने भूजलाच्या कंटूरचा आकार सारखा असून त्याचे वळण नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने असते.

भूजलाच्या प्रवाहाच्या रेषा कंटूरशी काटकोनात असल्याने भूजलाचा प्रवाह नदीकडे असतो इथे नदी भूजलातून पाणी घेत असल्याने तिचा प्रवाह वाढत जातो. (Gaining stream)

वरील चर्चेमधून नदीक्षेत्रामध्ये कोणत्या जागी जलसंधारण केल्यास भूजलाचे चांगले पुनर्भरण होते हे ठरवणे सोपे होते. जिथे निसर्गत:च नाले भूजल पुनर्भरण करत असतात ( प्रथम, द्वितीय श्रेणीचे प्रवाह व कुठे कुठे तृतीय श्रेणीचेही) त्या जागा पाणी अडवायला योग्य असतात. जिथे नद्या निसर्गत:च भूजलाचे निस्सारण करत असतात (Gaining stream) त्या जागा नदी पात्रात अडवलेल्या पाण्यातून पुनर्भरण करू शकत नसल्याने योग्य नसतात. असे करणे पालथ्या घड्यावर पाण्यासारखे असते. त्यामुळे इथे अडवलेल्या पाण्यातून पुनर्भरण करायचे असल्यास ते दोन्ही तटांवर दूरवर उचलून नेवून कोरड्या पडलेल्या विहीरींमध्ये सोडवणे हा चांगला उपाय ठरतो.

आज अनेक ठिकाणी नदी प्रवाहाचे रूंदीकरण, खोलीकरण करून त्यातून भूजलाचे पुनर्भरणाचे प्रयत्न हाती घेतले गेले आहेत. अशा सर्व ठिकाणी वरील चर्चा उपयुक्त ठरावी व रूंदीकरण खोलीकरणाच्या जागा वैज्ञानिक पध्दतीने ठरवल्या जातील अशी आशा करूयात.

श्री. रमेश आगाशे - मो : ०९४२०४६३१८४