राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

Submitted by Hindi on Mon, 07/04/2016 - 11:44
Source
जल संवाद

श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


राजस्थान रजत बुंदे हे पुस्तक 1999-2000 च्या आसपास हाती आले. आणि वाचता वाचता त्या विषयाने मनाची एवढी पकड घेतली की एकदा वाचून पुरेसे वाटेना. मग लेखकाशी म्हणजे दिल्लीच्या श्री. अनुपम मिश्र यांच्याशी पत्र-व्यवहार केला आणि चेंबूरचे श्री. मेमाणी यांच्याकडून हे पुस्तक मी स्वतःसाठी विकतच घेतले। मग काय? कधीही कुठलंही पान उघडून वाचायचे असे चालू झाले. आणि शेवटी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. तेच भाषांतर जलसंवाद मध्ये प्रमशः प्रकाशित होत आहे.

ही अशी निराकर संघटना ह्या समाजाने ना राज्याकडे, सरकारकडे सोपविली ना आजच्या भाषेत 'निजी' म्हणजे स्वत:च्या क्षेत्राकडे दिली - त्याने ती जुन्या भाषेच्या 'निजी' हातातच राखली. घरोघरी, गावोगावी लोकांनीच स्वत: ह्या योजना साकारल्या, सांभाळल्या आणि पुढे नेवून वाढवल्या.

'पिंडवडी' म्हणजे स्वत:ची मेहनत, स्वत:चे कष्ट, मोठ्या कष्टाने दुसऱ्यांची मदत. समाज परिश्रमाचे, घामाचे थेंब गाळतो आहे, पावसाच्या थेंबांना एकत्रित करण्यासाठी !

राजस्थानचे रूपेरी थेंब :


घामाने थबथबलेले 'चेलवांजी विहीरी' (कुई) च्या आत काम करताहेत. साधारण तीस - पस्तीस हात खोल खणाई झाली आहे. आता आंतली उष्णता वाढतच जाईल. विहीरीचा व्यास घेर खूपच कमी आहे. अरिडव्या बसलेल्या चेलवंजीच्या पाठीपासून व छातीपासून मागे - पुढे एकएक हात दूर माती आहे. इतक्या चिंचोळ्या जागेतलं खेदकाम कुऱ्हाड किंवा फावड्याने नाही होवू शकत. त्यामुळे इथे खोदकाम 'बसौली ' ने केले जातयं. 'बसौली ' म्हणजे छोटा दांडा असलेले छोट्या फावड्यासारखं हत्यार. पोलादी टोकदार फाळ आणि लाकडी दांडा.

कुईंत खोलवर चाललेल्या ह्या मेहनतीच्या कामावर तिथल्या गरमीचा परिणाम होईल. गरमी कमी करण्यासाठी वर जमिनीवर उभे असलेले लोक मधून मधून मुठी भरून रेती खूप जोराने खाली फेकतात. त्यामुळे वरची ताजी हवा खाली फेकली जाते आणि खोलवरची जमा झालेली 'दमकोंडू' हवा वर येते. इतक्या उंचीवरून जोराने फेकल्या जाणाऱ्या वाळूचे कण खाली काम करणाऱ्या 'चेलवांजी' च्या डोक्याला लागू शकतात, म्हणून ते आपल्या डोक्यावर कांसे, पितळ अन्य कुठल्यातरी धातूचे भांडं टोपीसारखं घालून आहेत. खाली थोडं खोदकाम झाल्यावर 'चेलवांजी' च्या पंजाच्या आसपास मळ जमा झालाय. वरून दोरीने एक छोटंसं डोल किंवा बादली खाली उतरवली जाते. त्यात माती भरली जाते. अति काळजीपूर्वक वर खेचत असतांनाही बादलीतून काही रेती- दगडगोटे खाली पडू शकतात. डोक्यावरला टोप ह्यांच्यापासूनही चेलवांजीचं डोकं सांभाळीत.

'चेलवांजी' म्हणजेच 'चेजारो', हे कुईंचे खोदकाम आणि एका विशिष्ट प्रकारे तास काम करणारे सर्वांत अधिक दक्ष लोक. ह्या कामाला 'चेजा' असं म्हणतात. 'चेजारो' जी कुईं खोदताहेत, तो काही साधासुधा नमुना नाही आहे. कुईं म्हणजे अतिशय छोटीशी विहीर, कुआं पुल्लिंगी आहे, तर कुई स्त्रिलिंगी. ही फक्त घेरानेच छोटी असते, मात्र हिची खोली अन्य कशाहूनही कमी नाही. राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एका खास कारणांसाठी कुईंची खोली थोडी कमी - जास्त असते.

'कुईं' आणखी एका अर्थाने कुआं म्हणजे मोठ्या विहिरीपेक्षा वेगळी असते. मोठी विहीर ही भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी बनते, पण कुईं ही भूजलाशी विहीर ज्या प्रकारे संबंधित असते, त्या प्रकारे संबंधित नसते. कुईंर् पावसाच्या पाण्याला मोठ्या विचित्र प्रकारे सामावून घेते, जेव्हा पाऊसच नसतो तेव्हाही. म्हणजे कईंमध्ये एका पातळीवरून वाहणारं पाणी नाही की आंतले झरे नाहीत. हा तर 'नेतिनेति' सारखा जरा कठीणच मामला आहे.

वाळवंटात वाळूचा विस्तार आणि खोली अथांग आहेत. इथे पाऊस जास्त प्रमाणात जरी पडला तरी त्याला जमिनीत जिरून जायला वेळ लागत नाही. पण कुठे कुठे मरूभूमीच्या रेतीच्या पातळीखाली साधारण दहा-पंधरा हातांपासून ते पन्नास - साठ हात खाली खडीच्या दगडांचा एक थर सापडतो. हा थर जिथे कुठे असेल - चांगला लांबरूंद असतो - पण रेतीखाली दबला गेल्यामुळे तो दिसत नाही.

अशा जागी मोठ्या विहीरी खोदतांना मातीत आढळणाऱ्या फरकावरून ह्या खडीच्या थराचा पत्ता लागतो. मोठ्या विहीरींना पाणी तर दीडशे - दोनशे हातांवर लागतंच, पण ते बहुधा खारट असतं , त्यामउळे ते पिण्यासाठी उपयोगी नसतं. बस, तेव्हाच ह्या जागांवर कुईं बनवल्या जातात. खडीचा थर शोधण्यात पिढयान् पिढ्यांचा अनुभवही कामाला येतो. पावसाचे पाणी एखाद्या भागात एकदम बसलं नाही, तर समजावं की रेतीच्या खालून असा थर जातोय.

हा थर पावसाच्या पाण्याला खोलवरच्या खारट भूजलापर्यंत जाण्यास अटकाव करतो. अशा स्थितीत त्या मोठ्या पट्ट्यात पडलेला पाऊस जमिनीवरील रेतीच्या थराच्या आणि ह्या खडीच्या दगडगोट्यांच्या पट्टीच्या मध्ये अडकून ओलावा धरून पसरतो. कडक उन्हात ह्या ओलाव्याची वाफ बनून उडून जाण्याची शक्यता असेत. पण अशा भागांत निसर्गाचं एक वेगळच औदार्य कामाला येतं.

रेतीचे कण खूपच बारीक असतात. अन्यत्र मिळणाऱ्या मातीच्या कणांसारखे ते एकमेकांना चिकटत नाहीत. जिथे चिकटणं आहे, तिथे सुटणंही असतं. ज्या मातीचे कण एकमेकांना चिकटतात, ते आपली जागाही सोडतात, आणि म्हणून तिथे काही भाग मोकळा राहून जाते. जसे दमट किंवा काळ्या मातीच्या भागात - गुजराथ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार इ. प्रांतात पाऊस बंद झाल्यानंतर उन्हं पडू लागली की मातीचे कण चिकटायला लागतात आणि जमिनीत शेतांमध्ये, अंगणात, भेगा पडू लागतात. जमिनीत साठलेला ओलावा, उन्हा पडू लागल्यावर ह्या भेगांमधून वाफ बनून पुन्हा वातावरण मिसळू लागतो.

पण इथे मात्र विखरून राहण्यातच एक संघटन आहे. वाळवंटात रेतीचे कण एकसारखे पसरलेले असतात. इथे एकमेकांशी सलगी नाही, त्यामुळे वेगळं होणंही नाही. पाऊस पडल्यावर रेतीचे कण थोडे जड होतात, पण आपली जागा सोडत नाहीत. त्यामुळे वाळवंटात जमिनीला भेगा पडत नाहीत. आंत समावलं गेलेलं पाणी आंतच साचून राहातं. एका बाजूला थोेड्या खालून जाणारी सखेऱ्याची पट्टी त्याचं रक्षण करते, तर दुसरीकडे वरच्या बाजूला असलेल्या रेतीच्या असंख्या कणांचा त्यावर कडक पहारा बसलेला असतो.

ह्या भागात पडलेला थेंबन् थेंब रेतीत मिसळून ओलाव्याचं रूप घेतो. आता इथे कुईं बनली तर तिचा पोटांतली रिकामी जागा, चहूबाजूंनी रेतीत सामावलेल्या ओलाव्याचं पुन्हा थेंबात रूपांतर करते. थेंब थेंब ओघळतो आणि कुईंमध्ये पाणी जमा होवू लागतं - खाऱ्या पाण्याच्या सागरात अमृतासारखं गोड पाणी !

हे अमृत मिळवण्यासाठी मरूभूमीचे समाजाने खूप मंथन केल आहे. आपल्या अनुभवांना व्यवहारात प्रत्यक्ष रूपात आण्याचं संपूर्ण शास्त्र विकसित केल आहे. ह्या शास्त्राने समाजासाठी उपलब्ध पाण्याला तीन रूपांत विभागलं आहे.

पैकी पहिलं रूप आहे पालरपानी, म्हणजे थेट पावसाचे मिळणारे पाणी. हे जमिनीच्या वरून वाहत आणि ते नही - तलाव वगैरेंमध्ये अडवलं जातं. इथे या वगैरे शब्दातही बरंच काही लपल आहे. त्याचं पुरं वर्णन पुढे कुठेतरी मिळेल.

पाण्याच्या दुसऱ्या रूपाला 'पाताळपानी' म्हटलं जातं. हे तेच भूजल आहे जे विहीरीतून काढलं जातं.

'पालरपानी' आणि 'पाताळपानी' ह्यांच्या मधलं पाण्याचे तिसरे रूप म्हणजे 'रेजाणी पानी'. भूपृष्ठातून खाली झिरपलेलं पण खोलवर पाताळांत जावू न शकलेलं पाणी. रेजाणी असते. पाऊसमान मोजण्यासाठी सुध्दा इंच किंवा सेंटिमीटर नव्हते, तर 'रेजा' शब्दाचा वापर केला जातो.... आणि रेजाचं माप जमिनीवर पडलेल्या पावसाला नव्हते, तर जमिनीत मुरलेल्या पाण्याला मोजतं. वाळवंटात पाऊस इतका पडला की पाणी 'पाच अंगुळं' आंत साचलं, तर त्या दिवशीचा पाऊस 'पांच अंगुल रेजो' झाला असं म्हणतील.

हे रेजाणी पाणी खडीच्या पट्ट्यामुळे पाताळपाण्यापासून वेगळं राहतं. ह्या खडीपट्ट्याच्या अभावी रेजाणी पाणी हळूहळू खाली झिरपून पाताळपाण्यात मिसळून आपलं वैशिष्ट्य गमावून बसतं. जर एखाद्या ठिकाणी भूजल - म्हणजे पाताळपाणी खारट असेल, तर रेजाणी पाणीसुध्दा त्यात मिसळून खारट बनतं.

हे वैशिष्ट्यपूर्ण रेजाणी पाणी समावून घेवू शकणारी कुंई बनवणं म्हणजे खरोखरच एक खास कला आहे. चार - पाच हात व्यासाची कुंई तीस पासून ते साठ पासष्ठ हात खोलीपर्यंत खणत नेणारे चेजारो कुशलता व सावधानी यांत फार मोठी उंची गाठतात.

'चेजो' म्हणजे तासण्याचं श्रेष्ठतम काम कुंई चा प्राण आहे. यांत थोडीशी चूक देखील 'चेजारो' चा प्राण घोवू शकते. दर दिवशी थोडं थोडं खोदकाम होतं. 'डोल' मधून 'मलबा' काढला जातो आणि मग पुढचं खोदकाम थांबवून आतापर्यंत झालेल्या खोदकामाची 'चिनाई' केली जाते, अशासाठी की माती भस्सकन् पडू नये.

वीस - पंचवीस हात खोलवर जाईतोपर्यंत उष्णता वाढत जाते आणि हवाही कमी होवू लागते. तेव्हा वरून मुठी भरभरून रेती जोराने खाली फेकली जाते. वाळवंटात जी हवा रेतीच्या टेकाडांना सुध्दा इथून तिथे अडवून देवू शकते, तीच हवा इथे कुंई च्या खोलांत मूठभर रेतीमुळे खेळू लागते आणि घामाने थबथबलेल्या चेलबांजी ला गारवा देते. काही ठिकाणी कुंई हनविण्याचं हे कठीण काम आणखीच कष्टप्रद होतं. काही ठिकाणी विटांचे बांधकाम करूनही मातीला रोखणं शक्य होत नाही, तेव्हा कुंई ला दोरखंडांनी बांधलं जातं.

पहिल्या दिवशी कुंई खोदायला घेतल्यावर त्या कामाबरोबरच 'खींप' नावाच्या गवताचे ढीग जमा केले जातात. चेजारो खोदाकाम सुरू करतात आणि बाकीचे लोक खींप च्या गवतापासून सुमारे तीन अंगुळे जाडीचा दोर वळायला घेतात. त्या दिवशीचं काम पुरं होता होता कुंई साधारण दहा हात इतकी खोल बनते. तिच्या तळाशी भिंतीला चिकटून दोरखंडाचा पहिला फेरा जातो, मग त्याच्यावर दुसरा - तिचसा - चौथा अशा तऱ्हेने वर वर येतात. खींप गवातापूसन वळलेला जाडा चरचरीत देरखंड (रस्सा) प्रत्येक घेरावर आपलं वजन टाकतो.... आणि वळलेल्या लडी कात दुसरी घुसून मजबूतपणे एकावर एक बसून जातात. दोराचं शेवटचं टोक वर असतं.

दुसऱ्या दिवशी पुन्हा काही हात माती खोदली जाते आणि दोराची पहिल्या दिवशी बनवलेली गुंडाळी दुसऱ्या दिवशी नव्याने खोदलेल्या जागी सरकवली जाते. वर राहिलेल्या रिकाम्या भिंतीमध्ये आता नवीन दोर बांधला जातो. दोराच्या गुडाळ्या तशाच राखण्याकरिता मध्ये मध्ये थोडी 'चिनाई' सुध्दा केली जाते.

सामान्यपणे पाच हात व्यासाचा कुंई मध्ये दोराच्या एका वेटाळ्याचा एक घेरा बनवण्यासाठी सुमारे पंधरा हात लांहीचा दोर लागतो. एक हात खोलीसाठई दोराचे आठ - दहा लपेटे खपतात आणि एवढ्याशा मध्येच दोराची एकूण लांबी दीडशे हातांपर्यंत जाते. आता जर तीस हात खोल कुंईची माती थोपवायची असेल तर ती बांधून काढण्यासाठी दोराची लांबी चार हजार हातांच्या आसपास बसते. नवीन माणसांना तर कळणारही नाही की इथे कुंई खोदली जातेय् की दोर वळले जात आहेत.

काही ठिकाणी ना दगडधोंडे सापडत ना खींपचं गवत मिळत. पण रेजाणी पाणी असेल तर तिथे कुंई मात्र अवश्य बांधल्या जातात. म्हणून मग अशा ठिकाणी कुंई च्या आतलं बांधकाम (चिनाई) लाकडाच्या लांब ओंडक्यांनी केलं जातं. हे ओंडके अरणी, बण (कैर), बाभूळ किंवा कुंबट ह्या झाडांच्या बुंध्यांपासून बनवले जातात. ह्या कामासाठी सगळ्यांत उत्तम लाकूड अरणीचंच.... पण उत्तम किंवा मध्यम प्रतीचं लाकूड मिळालं नाही तर 'आक' ने सुध्दा काम भागवलं जातं.

ओंडके खालून वर असे एकात एक अडकवून उभे ठेवले जातात. मग त्यांना 'खींप' च्या दोरीनं बांधले जाते. कुठे कुठे 'चग' ची दोरीही वापरतात. ही बांधाणीसुध्दा वाटोळा आकार घेते म्हणून तिला 'सांपणी' असे म्हणतात.

खाली खोदकाम आणि बांधकाम करणाऱ्या चेलवांजी ला मातीची फार चांगली पारख असते. खडीच्या दगडाची पट्टी लागली की सगळं काम लगेच थांबविले जातं... त्याच वेळी खाली खाली पाण्याची धार निघते. चेजारों वारती येतात.

कुंई ची साफलता म्हणजे सजलता ही 'उत्सवाची घडी' बनते. तसंबी पहिल्या दिवसापासून काम करणाऱ्यांवर विशेष लक्ष देणं ही इथली परंपरा आहे, पण काम पुरं झाल्यानंतर तर खास जेवणाचं आयोजन असतं. चेलवांजी ला निरोप देतांना तऱ्हेतऱ्हेच्या भेटी दिल्या जातात. चेजारो च्या बरोबर गावाचं नातं त्याच दिवशी नाही तुटत. आधीच्या प्रथेनुसार त्यांना वर्षभरातील सणासुदीच्या दिवशी तसेच लग्नकार्यासारख्या सोहळ्यांत भेट दिली जाई आणि धान्य पिकल्यावर खळ्यावर त्यांच्या नांवाने धान्याचा वेगळा ढीगही काढला जायचा. आता फक्त मजुरी देवूनच काम करून घ्यायची पध्दत आली आहे.

कित्येक ठिकाणी चेजारो च्या ऐवजी सामान्य माणसेही ह्या विशिष्ट कलेत पारंगत बनत. जैसलमेरच्या अनेक गावांमध्ये पालीवाल ब्राम्हण आणि मेधवाले (आतांची अनुसुचित जमात) यांच्या हातून शंभर - दोनशे वर्षांपूर्वी बनवलेले पार किंवा कुंईया अगदी आजही न थकता पाणी साठवून ठेवत आहेत.

कुंई चे तोंड लहान ठेवण्याची तीन मोठी कारणे आहेत. वाळूत जमा झालेल्या ओलाव्याने पाण्याचे थेंब अगदी हळूहळू झिरपतात. दिवसभरांत एक कुंई फारतर दोन - तीन घडे भरू शकतील एवढंच पाणी जमा करू शकते. कुंईच्या तळाशी पाण्याचे प्रमाण इतकं कमी असतं, की कुंईचा व्यास मोठा असेल तर पाणी (कमी प्रमाणातलं) जास्ताच पसरेल आणि मग ते वर काढणं शक्य होणार नाही.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2