Source
जलसंवाद, अप्रैल 2017
महाराष्ट्रात जलक्षेत्रात विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचा समाजाला जवळून परिचय व्हावा, त्यांचे कार्य समाजासमोर यावे या दृष्टीने काही प्रातिनिधिक संस्थांचा सत्कार कऱण्यात आला. त्यांना आपल्या कार्याचा परिचय करुन देण्याची संधी या निमित्ताने मिळाली. वॉटर, पुणे, ग्राम गौरव-पाणी पंचायत, सासवड, जीवित नदी, पुणे, नाम फाउंडेशन, बीड, आर्ट ऑफ लिव्हींग, लातूर, जल दिंडी पुणे, भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद, ग्रीन थंब, पुणे आणि लुपिन, सिंजेंटा व सिंडीकेट बँक यंचे सीएसआर फंड इत्यादी संस्थांनी आपला परिचय करुन दिला व त्यानंतर त्यांचा मेमेंटो देवून गौरव करण्यात आला.
पोलियो निर्मूलनानंतर रोटरीने आपले लक्ष दुसर्या महत्वाच्या प्रश्नाकडे वळविले आहे. तो प्रश्न म्हणजे सध्या समाजाला भेडसावत असलेला पाणी प्रश्न. हा प्रश्न निव्वळ ग्रामीण भागातच पडला आहे असे नाही तर नागरी भागातही समाज या प्रश्नामुळे भरडला जातो आहे. या पाठीमागील महत्वाचे कारण म्हणजे समाजातील जल निरक्षरता हे आहे. समाज शिक्षित असला म्हणजे तो आपोआप जलसाक्षर होईल या भ्रमात आता पर्यंत आपण होतो. पण आता आपल्या लक्षात आले आहे की सर्वसामान्य साक्षरता व जलसाक्षरता या दोन भिन्न गोष्टी आहेत. ही बाब रोटरीच्या धुरंधारांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी आपला मोर्चा जलसाक्षरतेकडे वळविला. समाज जलसाक्षर झाल्याशिवाय पाणी प्रश्न सुटू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक रोटरी क्लबने जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार करणे हा कार्यक्रम तातडीने राबवावयास हवा हा संदेश डिस्ट्रिक्ट 3131 ने आपल्या अखत्यारात असलेल्या सर्व क्लब्सना दिला. त्याची परिणती म्हणून ब-याच क्लब्सनी जलसाक्षरतेचा हा कार्यक्रम राबविला. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे प्रत्येक क्लबने आपापल्या परीने या कार्यक्रमात भाग घेतला. काहींनी शाळाशाळांमधे जाऊन विद्यार्थ्यांना जलसाक्षर केले तर काहींनी शाळांमधे किंवा गावात पेयजलाची सोय केली. काही क्लबनी जलस्त्रोत बळकट केले तर काहींनी सांडपाणी व्यवस्थापनात भाग घेतला. काहींच्या प्रकल्पांचा आवाका एवढा मोठा होता की त्यांनी ग्लोबल ग्रँटचा आधार घेवून या प्रश्नावर करोडो रुपये खर्च केले.डिस्ट्रिक्ट 3131 ने या कामची धुरा सर्व्हिस प्रोजेक्ट (वॉटर) चे प्रमुख रोटेरियन सतीश खाडे (सिंहगड रोड क्लब) यांचे वर सोपविली. त्यांनी विविध क्लबमधील पाणी प्रेमी सभासदांची निवड करुन 26 सभासदांची एक टीम तयार केली व त्या टीमच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट मधील विविध क्लबना या कार्यासाठी प्रवृत्त केले. होता होता 22 मार्चचा जागतिक जल दिन आला. या दिनाचे औचित्य साधून खाडेंनी टीमसमोर जल महोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली. ती सर्व सभासदांनी आनंदाने उचलून धरली. त्याची फल निष्पत्ती म्हणजेच 16 मार्च ते 23 मार्च 2017 दरम्यान साजरा करण्यात आलेला जलमहोत्सव.
या वर्षी डिस्ट्रिक्ट मधे महिला अध्यक्षांचे अमाप पीक आले आहे. हा जलमहोत्सव साजरा करण्याची जबाबदारी 14 क्लबच्या महिला अध्यक्षांवर सोपविण्यात आली. प्रत्येक दिवशी दोन क्लबनी ही जबाबदारी उचलावी असे ठरविण्यात आले. या साठी दररोज 4 तास या कार्यक्रमासाठी देण्यात यावेत असे ठरले. या चार तासात पाण्याच्या विविध पैलूंवर विचार मांडण्यासाठी मान्यवर विचारवंतांचे भाषण, ज्या रोटरी क्लबने पाण्यावर काम केले आहे अशी क्लबचे सादरीकरण व जल क्षेत्रात झोकून दिलेल्या संस्थांचा सत्कार व त्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे स्वरुप निश्चित करण्यात आले. सर्वांना सोयीचे जावे म्हणून पत्रकार भवन हे कार्यस्थल निवडण्यात आले.
उद्घाटन व समारोपासाठी दोन तोलामोलाच्या महनीय व्यक्तींची निवड करण्यात आली. भारताचे जलपुरुष स्टॅाकहोम पुरस्काराचे विजेते श्री. राजेंद्रसिंहजी राणा यांची उद्घाटनासाठी व महाराष्ट्रातील जल क्षेत्रातील आदर्श कार्यकर्ते श्री. पोपटराव पवार यांची समारोपासाठी निवड करण्यात आली. याशिवाय श्री. सुधीर भोंगळे, डॉ. सुनील पिंपलीकर, श्री. अभिजित घोरपडे, श्री. विवेक वेलणकर, श्री. व्ही. एम. रानडे, श्री. पराग करंदीकर, श्री. मिलिंद बोकील, श्री. विनोद बोधनकर, श्री. बी.बी. ठोंबरे, श्री. रावसाहेब बडे, डॉ. दि.मा.मोरे, श्री. पदीप आपटे, श्रीमती वंदना चव्हाण यांची विविध जल पैलूंवर भाषणे आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्रात जलक्षेत्रात विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांचा समाजाला जवळून परिचय व्हावा, त्यांचे कार्य समाजासमोर यावे या दृष्टीने काही प्रातिनिधिक संस्थांचा सत्कार कऱण्यात आला. त्यांना आपल्या कार्याचा परिचय करुन देण्याची संधी या निमित्ताने मिळाली. वॉटर, पुणे, ग्राम गौरव-पाणी पंचायत, सासवड, जीवित नदी, पुणे, नाम फाउंडेशन, बीड, आर्ट ऑफ लिव्हींग, लातूर, जल दिंडी पुणे, भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद, ग्रीन थंब, पुणे आणि लुपिन, सिंजेंटा व सिंडीकेट बँक यंचे सीएसआर फंड इत्यादी संस्थांनी आपला परिचय करुन दिला व त्यानंतर त्यांचा मेमेंटो देवून गौरव करण्यात आला.
रोटेरियन श्री. सतीश खाडे यांनी जलसंवादचे संपादक डॉ. दत्ता देशकर यांना या महोत्सवानिमित्त जलसंवादचा विशेषांक काढण्याची विनंती केली. ते स्वतः पाणी प्रश्नाचे अभ्यासक असल्यामुळे आणि ते रोटेरियनही असल्यामुळे त्यांनी ही विनंती तात्काळ मान्य केली. विविध रोटरी क्लबनी केलेल्या कामांचा आढावा या अंकात घेण्यात आला. रोटरी क्लब, भिगवण, रोटरी क्लब, शनिवारवाडा, रोटरी क्लब, पर्वती, रोटरी क्लब, एअरपोर्ट, रोटरी क्लब, गांधीभवन, रोटरी क्लब, कात्रज, रोटरी क्लब, महाड, रोटरी क्लब, डाउनटाउन, रोटरी क्लब पुणे इस्ट, रोटरी क्लब, निगडी, रोटरी क्लब, पुणे, रोटरी क्लब पुणे साउथ, रोटरी क्लब, मेट्रो, रोटरी क्लब, औंध, रोटरी क्लब पुणे रॉयल, रोटरी क्लब, दौंड,रोटरी क्लब, कोथरुड, रोटरी क्लब, पुणे सह्याद्री, रोटरी क्लब, लक्ष्मी रोड, रोटरी क्लब, सिंहगड रोड इत्यादी क्लबनी या कामात पुढाकार घेवून जलक्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या कामाचा परिचय या अंकात करुन देण्यात आला. या अंकाचे प्रकाशन माननीय श्री. पोपटराव पवार यांचे हस्ते करण्यात आले.
रोटरी क्लब, पुणे हिलसाइड, मगरपट्टा इलाईट, लक्ष्मी रोड, वारजे, शनिवार वाडा, डाउनटाउन, सह्याद्री, पनवेल खांदेश्वर, निगडी, पिंपरी, कोरेगाव पार्क, नॉर्थ, कँप आणि अपटाउन या क्लबनी हा जलोत्सव यशस्वी होण्यासाठाी खूप परिश्रम घेतले. दरवर्षी असाच जलोत्सव घेण्याचा संकल्प शेवटच्या दिवशी सोडण्यात आला.
डॉ. दत्ता देशकर, पुणे - मो : 9325203109