Source
जल संवाद
सर्व सरोवर संवर्धिनीच्या कार्यकर्त्यांनी आपले संशोधन, करित असलेले कार्य, अनुभव, अडचणी मांडल्या. उदयपूरला आलेले यश, अनिल मेहता व त्यांच्या सहकार्यांचे अथक परिश्रम उल्लेखनिय होते. चिल्का सरोवराची देखभाल सरकारी अधिकार्यांकडे आहे. तरीसुध्दा त्यांचे काम सरकारी न वाटता संशोधन संस्थेसारखे सृहणीय आहे. आयएएबी चे डॉ.साळसकर, डॉ.खोब्रागडे, डॉ.मुळे यांनी सरोवर संवर्धिनीची रचना समान असावी यासाठी एक कार्यशाळा घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर सक्रिय पाच सरोवर संवर्धिनीची एक वार्षिक बैठक होवून त्यास विस्तार करण्यासाठी प्रयत्नाची दिशा ठरेल.
जगभर सरोवर व जलाशयांच्या संरक्षणासाठी काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे अंतरराष्ट्रीय सरोवर पर्यावरण समिती कार्यरत आहे. सरोवर ही निसर्गनिर्मित किंवा कृत्रीमरित्या निर्माण केलेली एक स्वतंत्र परिसंस्था आहे. सरोवराची गुणवत्ता हा सर्वत्र काळजीचा विषय आहे. या गुणवत्तेचा संबंध त्यात जीवसृष्टी रहाणार की नाही याच्याशी आहे. अनेक सरोवरे नागरी जीवनाच्या लगत असल्याने मनुष्याने निर्माण केलेल्या प्रदूषणामुळे, अतिक्रमणामुळे, विस्तारामुळे त्यांचे अस्तित्व लोप पावण्याची शक्यता, भीती कायम असते. सजग नागरी समूहाने त्यासाठी जनजागरण केले नाही तर सरोवर संपून जाते अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सरोवराचे संरक्षण करण्यासाठी व त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी जागतिक स्तरावर एक वैज्ञानिकांचा गट (टास्क फोर्स) निर्माण करण्यात आला. डॉ.माधवराव चितळे त्याचे अनेक वर्ष सदस्य होते.इंडियन असोसिएशन ऑफ एक्वॉटिक बायॉलॉजी या संस्थेचा सरोवर परिसंस्थेशी निकटचा संबंध असल्यामुळे सरोवर संरक्षणाच्या कामासाठी या संस्थेची नेतृत्व करणारी अग्रेसर संस्था म्हणून निवड करण्यात आली. कै.डॉ.कोदरकर हे हैद्राबादला प्राध्यापक होते व या विषयातील वैज्ञानिक संशोधन प्रकाशित करणारे नियतकालिक संस्थेच्या वतीने नियमित चालवत होते. त्यांनी स्वत: हैद्राबाद शहरातील सरोवराच्या पुनरूज्जीवनासाठी अनेक संस्थांना बारेबर घेवून खूप प्रयत्न केले त्यात त्यांना यश ही आले त्या प्रयत्नांचे त्यांनी सर्व सामुग्री व परिणाम सीडी/लेखन स्वरूपात सर्वांना उपलब्ध केले. ही खर्या अर्थाने सरोवर संवर्धिनीची सुरूवात आहे. कै.डॉ.कोदरकर देशभर प्रवास करीत, सेमिनार मध्ये उपस्थित राहून ठिकठिकाणच्या संशोधकांना, प्राध्यापकांना सरोवराच्या गुणवत्तेच्या अभ्यासासाठी प्रवृत्त करीत. त्यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेवून वैज्ञानिक कार्यगटाचे ते सदस्य म्हणूनही नियुक्त झाले.
शंकर सागर सरोवर संवर्धिनी ही नांदेडला स्थापन झालेली दुसरी घटक संस्था. त्यांच्या स्थापनेसाठी कै.डॉ.कोदरकर व डॉ.चितळे नांदेडला आले होते. 22 मार्च 2005 ला या सरोवर संवर्धिनीचे उद्घाटन झाले. वैज्ञानिक, प्राध्यापक, विद्यार्थी, अभियंते, प्रशासक, नागरिक असे सर्व घटक यात सहभागी आहेत. एक वर्षापूर्वी शंकर सागर मध्ये 50 विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना घेवून एक जलदिंडी काढण्यात आली. त्यात 10 गावांमध्ये (जलाशयाच्या काठावरील) प्रबोधन करण्यात आले. गेली 7 - 8 वर्षे नियमितपणे हे उपक्रम चालू आहेत. यावर्षी पासून श्री. गुरूगोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय जलाशयाची गुणवत्ता मोजण्यास व विश्लेषण करण्यास सुरूवात करणार आहे.
डॉ. कोदरकरांच्या पुढाकारामुळे जागतिक सरोवर परिषद, पर्यावरण व वन मंत्रालयाने भारतात आयोजित केली. यजमान पद भूषविणे हा जसा सन्मान आहे तसेच जबाबदारीची जाणीव करून घेणे पण आहे. जागतिक स्तरावर सरोवर संरक्षणासाठी काही गोष्टी करायच्या म्हणून ठरले होते. त्या गोष्टी भारतातही लागू करू अशी घोषणा पुन्हा एकदा करण्यासाठी आणि मंत्रालयाच्या स्तरावर हालचाल करण्यासाठी या परिषदेचा उपयोग झाला. जपानमध्ये या संबंधात समितीचे (टास्क फोर्स) कार्यालय आहे. हे कार्यालय बिवा सरोवराच्या किनारी आहे. तिथे सरोवराच्या गुणवत्तेवर संशोधन चालते. जपानचे या संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.नाकामोरा मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये व या वर्षी सप्टेंबर मध्ये भारतात सरोवर संवर्धिनीचे काम वाढावे यासाठी विविध घटकांचे विचार ऐकायला, प्रगती समजून घ्यायला व मार्गदर्शन करायला आले होते. जागतिक सरोवर पर्यावरण समितीने भारताची सरोवर संवर्धिनी ही संकल्पना स्वीकारण्यात आली. या वर्षी डॉ.नाकामोरा व डॉ.चितळे यांच्या उपस्थितीत उदयपूर, पवई सरोवर, शंकर सागर, चिल्का सरोवर, उजनी जलाशय, हैद्राबादचा हुसैन सागर या सरोवर संवर्धिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नौशाद अली सरोवर संवर्धिनी ही पवई सरोवराचे संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेली संस्था, ज्यात हौसेने मासेमारी करणारे लोकही आहेत, त्यांच्या पुढाकाराने पवईला सरोवर संरक्षण, संवर्धन या विषयावर संशोधन पेपर्स सादरिकरणासाठी दोन दिवसांची अंतरराष्ट्रीय परिषद झाली. सर्व सरोवर संवर्धिनीच्या कार्यकर्त्यांनी आपले संशोधन, करित असलेले कार्य, अनुभव, अडचणी मांडल्या. उदयपूरला आलेले यश, अनिल मेहता व त्यांच्या सहकार्यांचे अथक परिश्रम उल्लेखनिय होते. चिल्का सरोवराची देखभाल सरकारी अधिकार्यांकडे आहे. तरीसुध्दा त्यांचे काम सरकारी न वाटता संशोधन संस्थेसारखे सृहणीय आहे. आयएएबी चे डॉ.साळसकर, डॉ.खोब्रागडे, डॉ.मुळे यांनी सरोवर संवर्धिनीची रचना समान असावी यासाठी एक कार्यशाळा घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर सक्रिय पाच सरोवर संवर्धिनीची एक वार्षिक बैठक होवून त्यास विस्तार करण्यासाठी प्रयत्नाची दिशा ठरेल. पुढील विस्तारामध्ये लोणार सरोवर, पुष्कर सरोवर, जगत्तुंग सागर (कंधार) अशा सरोवरांचा संरक्षणासाठी विचार होणार आहे. कार्यकर्त्यांचा गट, संशोधन संस्था जी जबाबदारी घेवू शकेल यांचा शोध चालू आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाने सहकार्य करण्याचे सप्टेंबर 2012 च्या परिषदेमध्ये मान्य केले आहे. पुढील वर्षी सरोवर संवर्धिनीचे राष्ट्रीय परिषदेच्या स्वरूपात एक महामंच (फेडरेशन ) म्हणून रचना अस्तित्वात येईल. जगाला आपण आपले प्रतिमान सरोवर जतन करण्यासाठी देवू शकू असा विश्वास वाटतो.