Source
जलसंवाद, जुलाई 2017
पर्यावरण आणि विज्ञानः
समाजकल्याण, पर्यावरण आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रूद्याग पर्यावरणासाठी सोमयाग पर्जन्य याग ह्यासाठी केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपायोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो. तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्नीकुंड बर्याच भूमिती आकृतीत वापरले जाते.
(या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु करीत आहोत. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत. चला तर, करु या सुरवात या मालिकेची.)यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही ऊर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या ऊर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी तो उपयुक्त व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे.
सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते. निसर्गाने जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्निद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेच करण्यास आपल्याला सांगितल्या आहेत व आपल्या जन्म ते मृत्यू या प्रवासात त्या समाविष्ट केलेल्या आहेत. त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत व आयुष्य होम हा यज्ञक होम मुलाच्या जन्मापासून ते पुढीस आयुष्य हा प्रवास निरोगी व्हावा या करता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंंत्री, होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, अल्पायुषी होवू नये ह्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जा होम संततीसाठी गर्भदान संस्कार, घरासाठी वास्तूशांती, साठी नंतर साठीशांत, सहस्त्रचंद्रदर्शन असे होय. दुर्गा व चंडी होम, आत्मविश्वास वाढवण्यासाठी गायत्री होम, सतत सकारात्मक स्वभावात येण्यासाठी विद्याहोम इ मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे ह्यासाठी करण्यास सांगितलेले आहेत पण हे झाले छोटे यज्ञ व प्रसंगानुरूप मोठे यज्ञ.
समाजकल्याण, पर्यावरण आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रूद्याग पर्यावरणासाठी सोमयाग पर्जन्य याग ह्यासाठी केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपायोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो. तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्नीकुंड बर्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. अग्नी पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून प्रज्वलीत करत असत त्या अग्नीची औषधी तत्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, साळीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदूंबर, देवदार वृक्षांच्या खाली पडलेल्या काड्या, दूर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देतांना मंत्र विशिष्ट स्वरात म्हणताच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास ३ ते ४ तासाचा अवधी व मोठ्या यज्ञास ३ ते ७ दिवस पूर्ण करण्यास अवधी लागतो.
आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता अग्निहोत्र ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधून घेतले. सर्व यज्ञ जागा, मनुष्यबळ, वेळ काळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात . ह्या सर्व यज्ञात, मन:शांती, आरोग्य पर्यावरण रक्षण होते. तेच सर्व उद्देश अग्निहोत्रात सुध्दा सामान्यातले सामान्य माणसाला लाभू शकतात. हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिमित करण्याचे काम आम्ही गेले ५-६ वर्षे करत आहोत, व त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यावर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यांपर्यंत देण्यासाठी हा लेखन प्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.
अग्निहोत्र हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीत एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेने अतिशय सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्राचे विधी सामान्यातल्या सामान्य माणूस, सर्व मानव जात सहज करू शकते. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावरती कार्यालयात अगदी १० मिनीटात करू शकता साधारण: खर्च रू. ३ ते ५ जास्तीत जास्त ह्या यज्ञाला लागतात. अग्निहोत्रास सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत. अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.
१. तांब्याचे पिरॅमिड पध्दतीचे हवन पात्र
२. गाईचे दुधाचे शुध्द तूप २-३- चमचे
३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे
४. हातसडीचे अख्खे तांदूळ अंदाजे ४-५ ग्रॅम
ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवर्यावर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे ज्यांना जमेल त्यांनी सूर्योदयाचे वेळी खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात ते असे.
सूर्याय स्वाहा:। सूर्याय इदम् न मम॥
प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये इदम् न मम॥
सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास हे मंत्र म्हणावे लागतात.
अग्नेय स्वाहा:। अग्नेय इदम् न मम॥
प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये इदम् न मम॥
हे सर्व आर्पल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्निसमोर बसणे. अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला. जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळले. तो भाग म्हणजे रमणबाग हायस्कूल शनिवार पेठ, अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी खालील गोष्टींचे पूर्वमापन करण्यात आले ते म्हणजे परिसरातील हवेचे विश्लेषण अग्निहोत्र प्रयोगांचे खालील उद्दिष्ट्ये ठरवण्यात आली ती अशी -
१. अग्निहोत्रामुळे होणारे प्रकाश व उष्णता उर्जेतील बदल
२. अग्निहोत्र धूराचा सभोवतालच्या सूक्ष्म जंतूवर परिणाम
३. अग्निहोत्र धूराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम.
४. अग्निहोत्र धूर व राखेचे रोपांचे / बी, बियाणे वाढीवर परिणाम.
५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म
६. पाणी शुध्दीकरण अग्निहोत्र राखते.
शाळेतील हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले त्यात शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेवूनच उत्तम साथ दिली.
तेथील प्रयोगाकरता फर्ग्युसन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत माझ्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. आर्थिक सहाय्य प्रज्ञा विकास मंचाचे FROST ह्या संस्थेने पुढाकार घेवून केले. व सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात यशस्वी ठरलो -
अग्निहोत्रामुळे प्रकाश उर्जेतील बदल हा लक्ष मिटरच्या साहाय्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सुक्ष्मजंतूवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूंची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ ९० टक्के सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबली असल्याचे सिध्द झाले.
प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फरडाय ऑक्साईडसे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिध्द झाले.
रोपांच्या वाढीसाठी अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेरच्या परिसरात ठेवण्यात आल्या. अग्निहोत्र वातावरणात राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात अग्निहोत्र परिसारत न ठेवलेल्या बियांपेक्षा होते हे आढळून आले. त्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे, हे ही सिध्द झाले.
अग्निहोत्राची राख जंतूनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही सप्रयोगानीशी सिध्द झाले.
अग्निहोत्र राखेमुळे पिण्याचे पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुध्दीकरणासाठी ही उपयोग होतो हे सिध्द झाले. वरील सर्व फायदे फक्त १० मिनिटात मिळू शकतात. ह्या विधीला रू. ३ ते ५ खर्च करून प्रत्येक घर प्रदूषणविरहित, जंतूविरहीत, पिण्याचे पाण्यासकट आपण करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून जागतिक वैज्ञानिक मासिकात ते प्रसिध्द करू शकलो व आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान जगात देवू शकलो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
ह्यापूर्वी मी पाणी शुध्दीकरणासाठी वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी Mineral Water इतकं शुध्द करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता आपल्याच ज्ञानावर बौध्दिक गुलामगिरी न बाळगता विश्वास ठेवणे सर्वांनीच अत्यावश्यक आहे.
या अभ्यासादरम्यान जर्मनी, ऑस्टे्रलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, झेकस्लोव्हाकिया, जपान, सिंगापूर, पेरू, इक्वाडोर, स्विर्त्झर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्विकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिध्द करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Homa Farming Technique असे नावही दिले आहे.
दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानाला अणूशास्त्र, रसायनशास्त्र, भैतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, वैमानिक शास्त्र, धातू शास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशातील शास्त्रज्ञांनी करून घेवून त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली, आपल्या झोपी गेलेल्या, शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत. प्राचीन विज्ञानावर अशा शास्त्रज्ञांचा विश्वास नव्हता पण तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य, धन्य म्हणून ते स्विकारणारे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण कथलाचा वाळा हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.
शेवटी वाचकाचे माहितीसाठी परवाच महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कोल्हापूरी लेप चढवण्यात आला तो लेप आपल्या पूर्वजांनी वज्रलेप म्हणून २००० वर्षांपूर्वी तयार केला होता. तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. मूर्ती संवर्धनासाठी इंग्लंड स्थित आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध पॅनगायिया निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याकरता आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला.
जय हिंद जय महाराष्ट्र !
डॉ. प्रमोद मोघे, पुणे, मो : ९३२५३८००९३