Source
जलसंवाद
मध्यपूर्व हे नाव युरोपियन लोकांनी प्रचलित केले. खर्या अर्थाने हा भाग म्हणजे पश्चिम आशिया ! ही व्याख्याही पुरेशी नाही. आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातले काही देशही त्यात समाविष्ट होतात. ह्यात समाविष्ट होणारे मुख्य देश म्हणजे इजिप्त, इराण, इराक, तुर्कस्तान, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन, सिरीया, युनायटेड अरब एमीरात (यु.ए.ई.) जॉर्डन, लेबनॉन, पॅलेस्टाईन, ओमान, बाहारीन आणि सायप्रस असे सतरा देश. खरे तर अठरावे राष्ट्र इस्राईल है भौगोलिक सलगतेचा विचार केला तर ह्यातच विचारात घेतले पाहिजे. परंतु इस्त्राईल हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळेच तो इथून वगळला आहे.
स्पष्टपणे मांडावयाचे तर ही सगळी स्वतंत्र राष्ट्रे आहेत. मध्यपूर्व ही त्यांची ओळख वेगळ्याच कारणांनी आहे. पण त्यामुळेच अफगाणिस्तान, तजाकीस्तान, उजबेकिस्तान इत्यादी सोविएत युनियन मधून फुटून निधालेली राष्ट्रे तसेच क्वचित प्रसंगी पाकिस्तान हेही आपण मध्यपूर्वेत असल्याचा दावा करतात. आपण मात्र वर उलेखलेल्या 17 राष्ट्रंचाच येथे विचार करणार आहोत.
नद्या :
ओमानचे आखात, पर्शियन गल्फ हे ह्या सलगभूमीचे दोन भाग करणारे तर पश्चिमेला लाल समुद्र व त्याचे वर भूमध्य समुद्र तर उत्तरेला (अंशत:) काळासमुद्र, रॅस्लॉन सी इ. सागर ह्या भूमीच्या अवतीभोवती आहेत. जगातला सगळ्यात मोठा वाळवंटी भाग म्हणजे सहाराचे वाळवंट. हे त्यातील अनेक राष्ट्रातून पसरले आहे. ह्यालाच जगातला सगळ्यात कमी पावसाचा प्रदेश म्हणूनही ओळखता येते. (हॉर्नस् ऑफ आफ्रिका ह्या भागाबद्दल आपण तिसर्या भागात वाचले आहेच. प्रचंड पाणी टंचाई, कुपोषण, भूकबळी वैगेरे असलेला सोमालिया इ. देशांचा गट. तिथेही ह्या प्रदेशापेक्षा थोडा जास्तच पाऊस पडतो. आणि तिथेही हे सहाराचे वाळवंट आहेच. जगप्रसिध्द सुवेझचा कालवा ह्याच भागात. जगातील सगळ्यात मोठी नदी नाईल ही ह्या भागातील (हॉर्नस् ऑफ आफ्रिकामधले तीन देश धरून) एकूण 10 देशातून वहाते.
मध्यपूर्वेतील सतरापैकी चार राष्ट्रातून ती वहाते. इजिप्तमधील त्या नदीवरील आस्वान धरण हे तिथल्या जलसंधारणाचे कामांचा एक आदर्श नमुना आहे. ही नदी शेवटी सभूमध्य समुद्राला (मेरिडियन सी) जाऊन मिळते.
नाईल खेरीज महत्वाच्या इतर नद्या म्हणजे टिग्रिस - युफ्राटिस ही नद्यांची जोडी. उत्तर आफ्रिकेत उगम पावणारी आणि भूमध्य सागराला मिणारी जॉर्डन मधील जॉर्डन नदी ही महत्वाची तर लेबनॉनमध्ये 16 बारमाही वहाणार्या नद्या आहेत. त्यातल्या ग्रोंटेस (Grontes) आणि लिटानी ह्या महत्वाच्या. बाकी इतर शेकडो छोटे ओहोळ व झरे आहेत.
जॉर्डन नदीचे खोर्यातच हुलाव्हॅली लेक, टिब्रियास लेक आणि डैड सी ही तीन मोठी सरोवरे आहेत. त्या परिसरातील भूजल पातळी राखण्यासाठी ह्या तिन्ही सरोवरांचा खूपच उपयोग होतो. तर अफगाणिस्तान, तजगिस्तानच्या सरहदीजवळ अमूदर्या नदी वहाते. तर तुर्कस्तानात युपारेस्ट ही नदी महत्वाची.
पर्वत :
ह्या राष्ट्रसमुहात इराणमध्ये झाग्रोस, अल्बुर्झ आणि तिहमाह पर्वत, लेबनॉनमध्ये लेबनॉन पर्वत, सौदी अरेबियामध्ये अशीर आणि हिर्ताज पर्वत हे मुख्य पर्वत असले तरीही उत्तर पश्चिमेला नागवे, उप्पर केस्टासियस आणि त्या भूभागातील सर्वात महत्वाचा आणि संपूर्ण पर्यावरणावर परिणाम करणारा भूभाग म्हणजे जॉर्डन रिफ्ट व्हॅली. सुमारे 375 कि.मी लांबी असलेली ही पर्वतरांग उत्तर दक्षिण दिशेत असून उत्तरेला भूमध्य सागर आणि दक्षिणेला मृतसमुद्र ह्या सीमा आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे येतांना ह्याची उंची कमी होत जाते. 1200 मी समुद्रसपाटीपासून उंच ते 400 मी समुद्रसपाटीखाली असा हा उंचीला पुरक होत जातो.
जॉर्डन रिफ्टच्या पश्चिम भागात जेवढा पाऊस पडतो त्यापैकी 70 टक्के पावसाचे बाष्पीभवन होते. 5 टक्के नदीतून वहाते तर 25 टक्के जमिनीत मुरते. मध्य पूर्व भागात जेवढा पाऊस पडतो त्यापैकी 90 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. 5 टक्के नदीतून वहाते तर 5 टक्के हे जमिनीत मुरते. पावसाचे स्वरूपही असेच विचित्रपणे बदलत जाते. उत्तर पश्चिम टोकाला (पर्वतावर) सुमारे 1200 मि.मी पाऊस पडतो. जसजसे पूर्वेला व दक्षिणेला सरकत जावे तसतसा पाऊस कमी कमी होऊ लागतो. अति पूर्वेच्या काही भागात 50 मि.मी ते 100 मि.मी इतका कमी पाऊस पडतो.
उन्हाळ्यात 50 डीग्री तापमान हे तर नेहमीचेच . हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंडी, उत्तर पश्चिम टोकावरील पर्वतराजींवर ह्या कालावधीत बर्फही पडतो. असे अतिविषम हवामान आणि अत्यंत कमी पाऊस ह्यामध्ये ह्या क्षेत्रातील माणसाचे जीवनमान अडकले.
मृतसमुद्र हा जसा चारही बाजूंनी भूमीने वेढला गेला आणि अडकला आहे ना तसाच. दक्षिण आणि पूर्व भाग हा पूर्ण वाळवंटी. संपूर्ण 17 देशांचे क्षेत्रफळ पाहिले आणि आकडेवारीचा एकत्र विचार केला तर सुमारे 70 टक्के भूभाग हा वाळवंटी आहे. पाण्याचे टंचाईचा आहे. भूपृष्ठावरून फारसे पाणी वहातच नसल्याने (एकूण पर्जन्यमानापैकी 5 टक्के एवढेच) तेथे जलसंधारणाचे अनेक वेगवेगळे मॉडेल्स विकसित आहेत. त्याचे बद्दल विचार स्वतंत्रपणे मांडणार आहेच. इथेही तेच... अडचण किंवा संकट म्हणजे यशाकडे पोहोचावयाची एक नवी संधी. तोच मार्ग ह्या देशांच्या वाटचालीचा आहे.
इथला भूगर्भ हा मुख्यत्वे जलजन्य अशा थराचा खडकांचा. ह्या खडकांमध्येच खोलवर पेट्रोलियम पदार्थ अथवा तेल सापडते. किंबहुना तेलानेच अर्थसंपन्न झालेला हा भूप्रदेश आहे. मात्र ह्या भागाला संपन्न असा इतिहासही आहे.
मुस्लिम धर्म स्थापनेपूर्वी (इ.स.आठवे शतक) तेथे अतिशय प्रगत आणि संपन्न अशी संसकृती नांदत होती. तिलाच नाईल संस्कृती अगर अरब संस्कृती असेही म्हणतात. पर्शिया (म्हणजे आजचा इराण) हा अत्यंत प्रगत होता. इ.स.पूर्व 300 ते इ.स.पूर्व 500 ह्या कालावधीत नाईलवर त्यांनी धरण बांधले होते. तर जलसंधारणासाठी अनेक छोटे बंधारे बांधण्याची पध्दतही विकसित केली होती. अशाच प्रकारचे दगडी बंधारे त्याच कालावधीत म्हणजे इ.स.पूर्व तिसरे शतक ह्यावेळी चीन, सिंधु सरस्वती संस्कृतीचा हराप्पा आदि भाग, बंगालात गंगेकाठी, महाराष्ट्रात तापीची उपनदी पांझरा वगैरे भागात तसेच श्रीलंकेत बांधले गेले. हे सगळे कसे ? मूळ तंत्रज्ञान कोणाचे आणि कुणाकडून कुणाकडे ते गेले ? कसे गेले ? हा सगळा तपशीलवार संशोधनाचा विषय आहे. जलसंपदेबरोबरच व्यापार, विज्ञान ह्या अनेक विषयात त्यांनी चांगली प्रगती केलेली होती. ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम ह्या तिन्ही धर्मांचे स्थापनास्थान येथेच. भारत आणि युरोप (रोमन व ग्रीकसंस्कृती) यांचे मधला हा दुवा. त्यामुळे वाङमय, गणित, खगोल ह्या सर्वच क्षेत्रात त्यांची प्रगती होती आपण पाणी ह्या विषयासंबंधी विचार करीत असल्याने इतर सर्व विषय बाजूला सारून मूळ विषयाकडे वळतो.
अत्यंत कमी पाऊस, वाळवंटी भूभाग, विषम हवामान ह्यामुळे इथले जीवनमान तसे खडतरच होते. नाईल असून आणि जलसंधारणाची व्यवस्था असूनही पाणी आणि अन्न ह्या दोन्ही बाबतीत ही देश स्वयंपूर्ण नव्हते. राजेशाही, धर्माचा पगडा, अंधश्रध्दा ह्यातून मुक्तता नव्हती. ’ ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ही सामान्य माणसाची भावना होती. धर्म हा दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग होता.
इथला भूगर्भ हा मुख्यत्वे थरांच्या खडकाचा. येथे भूगर्भातील भारतीय प्लेट, चायनीज प्लेट आणि इराणी प्लेट ह्या तिन्ही एकत्र येतात. ह्यामुळे जो कमकुवत पहाड तयार हातो त्याच भागात खोलवर खनिज तेल (पेट्रोलियम) सापडते. हे पेट्रोलियम हा ह्या राष्ट्रांच्या अर्थकारणाचा मोठा आधार आहे. तुर्कस्तान, बहारिन, पॅलेस्टाईन आणि सायप्रस हे चार देश सोडून इतर सर्व देशांमध्ये तेल सापडते. 1970 च्या दशकात इस्त्राईलशी युध्द झाले. ते आपल्या आजच्या विषयाच्या दृष्टीने महत्वाचे नाही. परंतु त्याचा एक परिणाम महत्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या जवळचे तेल हे शस्त्रासारखे वापरता येते. तेल पुरवठा अडविला तर जागतिक आर्थिक कोंडी होऊ शकते. ह्या जाणिवेतूनच ह्या राष्ट्रांनी ओपेक नावाची संघटना स्थापन केली. त्याद्वारे तेलाचे उत्पादन नियंत्रित केले. किंमतीवर स्वत:चा अधिकार जमविला आणि त्यातून एक श्रीमंती त्या राष्ट्रांमध्ये निर्माण केली. आज जगात जी श्रीमंत राष्ट्रे आहेत त्यात ह्या राष्ट्रांचा समावेश होतो. (ज्यांच्या जवळ तेल आहे अशी राष्ट्रे) अमेरिका. रशिया हे श्रीमंत ? त्यांचे जवळही तेल आहेच परंतु तेल हे त्यांच्या श्रीमंतीचे एकमेव कारण नाही.)
ह्या श्रीमंतीतून विकासमार्गावर एक घोडदौड सुरू झाली. शहरे चकाचक झाली. सुंदर रस्ते, बगीचे निर्माण झाले. काम अडले होते ते पाण्यासाठी.
कुवेतने पहिला प्रयोग केला. समुद्राचे पाणी नि:क्षारीकरण करून ते वापरण्याचा. तो प्रयोग यशस्वी झाला. त्यातूनच जगभर अशा प्रकारे समुद्राचे पाणी शुध्द करून वापरायला प्रेरणा मिळाली.
दक्षिण धृवावरील बर्फ हे पाण्याचे सगळ्यात शुध्द रूप. तिथले तुटलेले हिमनग साखळदंडाचे सहाय्याने जहाजांना बांधून आपल्या देशापर्यंत ओढून आणावयाचा प्रयोग सौदीने करून पाहिला. मात्र त्याला यश मिळाले नाही. हिमनग आणला गेला पण प्रवासात येई येई पर्यंत सुमारे 3/4 बर्फ वितळून गेला.
मध्यपूर्वेतली तेल श्रीमंत अरब मंडळी पाऊस पहायला भारतात येत असल्याचे अनेक किस्से सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. असे असले तरीही आपली अर्थसंपन्नता आणि कमी पाऊस असतांनाही पाणी संभाळावयाचे परंपरागत ज्ञान व कौशल्य याचे पाठबळावर त्यांनी हा प्रश्न चांगल्या पध्दतीने हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा मुद्दा तोच. फक्त 5 टक्के एवढाच पाऊस जमिनीवरून वहातो. त्यामुळे तो अत्यल्पच. ह्याच्या चौपट तरी पाणी जिरते. तेच विहिरी, विंधणविहीरी ह्या स्वरूपात सापडते आणि तिथल्या जीवनाचा मुख्य आधार बनते. पाणी हे दुर्मिळ असल्याने त्यांनी त्याचा तपशीलवार अभ्यास करून सर्व आकडेवारी गोळा केलेली आहे. सन 2000 मध्ये एकूण 3056 दलघमी एवढे पाणी त्यांनी जमिनीतून उपसले त्यात 56 टक्के वाटा हा विहिरींचा होता. तर सुमारे 54 टक्के भूजल हे झर्याच्या रूपाने पृष्ठभागावर आले त्याठिकाणी ते अडविण्यात आले व वापरले गेले.
पावसातून पडणारे पाणी आणि पाणी जिरविण्याची भूगर्भाची क्षमता यांचा विचार केला तर दरवर्षी 2400 दलघमी एवढे पाणी जमिनीत जुरू शकते. तो जास्तीतजास्त आकडा आहे. याचाच अर्थ दरवर्षी 650 दलघमी एवढे त्यावर्षी न मुरलेले, शेकडो वर्षे पूर्वी कधीतरी भूगर्भात गेलेले व तिथे साठून राहिलेले पाणी हे देश उपसून काढतात, वापरतात, तेवढ्या प्रमाणात भूजल पातळी दरवर्षी खाली खाली जात आहे.
ह्या सगळ्याचा दृश्य परिणाम म्हणजे मृतसमुद्र हे जे मोठे सरोवर ह्या देशांच्या समुहाचे मध्यभागी आहे त्याची खालावत चाललेली पातळी, त्या पाण्याची पातळी खालावत जाण्याचा परिणाम सर्वच इको सायकलवर (पर्यावरण चक्रावर) झाला आहे. ह्या सगळ्यांचा आधी थोडक्यात आढावा घेऊ आणि मग उपाययोजना ह्या विषयाकडे बळू म्हणजे दोन्ही गोष्टींचे मनातले चित्र स्पष्ट होईल. त्याचबरोबर दक्षिण, दक्षिण पूर्व आणि पूर्व (जार्डन रिफ्ट पासून दिशा मोजायला हव्यात) ह्या भागात सुमारे 70 टक्के भाग येतो. हा सगळा भाग पूर्णत: वाळवंट आहे. तसेच समुद्रात किंवा पाण्यात चारही बाजुंनी वेढलेली जमीन म्हणजे बेट ही संकल्पना स्पष्ट आहे. परंतु जमिनीने वेढलेला एखाद्या सरोवरासारखा परंतु तरीही समुद्र म्हणून ओळखला जाणारा हा बहुदा एकच.
ह्या मध्यभागी असलेल्या समुद्रामुळे व भूगर्भातील क्षारांमुळे विहीरींना कमी खोलीवर पाणी लागत नाही. आणि खूप खोल गेल्यावर जिथे पाणी लागते तिथे ते खारट असते. त्यामुळे ज्या थोड्याच विहीरींना गोड पाणी लागते किंवा ज्या अत्यल्प ठिकाणी गोड्या पाण्याची सरोवरे (अत्यंत लहान असली तरीही) तिथे खजुरासारखी झाडे वाढतात, माणसे वस्ती करून राहतात. आपल्या परंपरांमधून ते पाणी जपतात. ह्या क्षेत्राला ओयासिस (वाळवंटातील हिरवळ) अशा नावाने ओळखले जाते. उष्ण हवामान, हवेत लाटा निर्माण होऊन पाण्याचा भास होणे म्हणजे मृगजळ हेही ह्याच भागात जाणवते.
अति अल्प स्वरूपातला पाऊस 70 ते 90 टक्के बाष्पीभवन, खोल भूगर्भात क्षारयुक्त पाणी, गरम हवा, विषम हवामान अशा सर्वच बाबतीत विपरित असलेल्या परिस्थितीत ह्या देशांनी पाणी जपण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळेच नाईल, टायग्रिस, इफ्रायटीस आणि जॉर्डन ह्या तीन नदीखोर्यांबाबत तरपशीलवापरपणे माहिती घेऊ या.
1. नाईल :
भारतीय लोक जसे गंगेला पवित्र मानतात व तिला माता म्हणतात तसेच इजिप्तचे लोक हे स्वत:ला नाईलचे पुत्र म्हणवतात. त्यामुळे तिच्या काठावरच राहण्याचा प्रयत्न करतात. नाईलच्या आसपासचा प्रदेश आणि तिच्या काठावर असलेली कैरो सारखे नगरे सोडली तर इतर बहुतांश भाग हा वाळवंटी आणि त्यामुळे जवळजवळ निर्मनुष्य आहे मात्र ही नदी इजिप्तसाठी एवढी पवित्र असली तरीही ती त्या देशात उगम पावत नाही. ती उगवते दूरवर उत्तर आफ्रिकेत. तिथून सुमारे 5600 कि.मी प्रवास करून ती इजिप्त मध्ये येते. तत्पूर्वी इथलोपिया, युगांडा इत्यादी 9 देशातून प्रवास करून ती इजिप्त मध्ये येते. व्हाईट नाईल ही नदी देखील तिथेच तिला मिळते. सुदानमध्ये. खार्टूम ह्या राजधानीच्या शहराजवळ.
इजिप्तने हे पाणी वापरण्यासाठी बरेच प्रयत्न केले. संपूर्ण खोरे विकसित करण्यासाठी सर्व देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न केले परंतु सुदान खेरीज कुणीही त्या करारात सामील झाले नाही. सन 1902 मध्ये आस्वान धरण बांधले, त्यानंतर 1970 मध्ये आस्वानची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे एक प्रचंड मोठे जलाशय निर्माण झाले. त्यामुळे खरेतर इजिप्तला मोठा फायदा व्हायला पाहिजे होता, पण प्रत्यक्ष वेगळेच घडले.
अति उष्ण हवेमुळे बाष्पीभवन वाढले. पाण्याची उपलब्धता वाढलीच नाही. उलट सुपिक फार मोठी जमीन ही धरणात पाण्याखाली गेली उरलेल्या जमिनीतून पुरेसे पिक काढता यावे ह्यासाठी जास्त प्रमाणावर रासायनिक खते आणि जंतुनाशके यांचा वापर होऊ लागला. त्यामुळे जीवनदायी नाईलचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागले. तसेच धरण गाळाने भरू लागले आहे. आजतरी इजिप्त आणि काही प्रमाणावर सुदान हे पाणी वापरताहेत. हे पाणी उगमाच्या देशातून म्हणजे इथयोपियातूनच येते. मात्र इथयोपिसासकट उरलेली आठ राष्ट्रे जेव्हा आपापल्या देशाच्या हद्दीतील पाण्याचा वापर करू लागतील तेव्हा इजिप्तच्या पाण्याचे काय होईल व त्याचा इजिप्तच्या जीवनावर, अर्थकारणावर आणि समाजकारणावर काय परिणाम होईल हा विचार देखील अस्वस्थ करणारा आहे.
2. टायग्रिस - इप्रेटिस चे खोरे :
दक्षिण तुर्कस्तानातील उंच पर्वतराजीतून इप्रेटिस नदी उगम पावते. दक्षिणेकडे वहात जाते. सिरिया व इराक मधून वहात जात टायग्रीस नदी मिळते. ह्या दोन नद्यांचे मध्ये असलेला भाग हा एक सुपिक भाग म्हणून हजारो वर्षे ओळखला गेलेला आहे. मात्र पूर्व दक्षिणेकडील तुर्कस्तान हा कोरडा असून त्याला पाण्याची गरज आहे. त्यामुळे त्या देशाने दक्षिणपूर्व अॅनाटोलिप्रोजेक्ट हा 1966 मध्ये तर अतातुर्क डॅम 1982 मध्ये बांधून पूर्ण केला. हा जगातला 9 क्रमांकाचा मोठा प्रकल्प (अतातुर्क) तर 25 फूट व्यासाच्या दोन प्रचंड मोठ्या बोगद्यांमधून पाणी वाहून न्यायला सुरूवात केली. हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ह्या दोन नद्यांवर मिळून 25 धरणे व 17 जलविद्युत केंद्रे तयार होतील. एकूण सिंचित क्षेत्रापैकी 2/3 हे इप्रेटिस ह्या नदीखोर्यात 1/3 हे इटामग्रिस नदीच्या खोर्यात असेल. मात्र हे सगळे काम करतांना तुर्कस्तानने इराक आणि सिरिया यांचे बरोबर कोणताही पाणी करार केलेला नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी सर्व सनदशीर व कायदेशीर मार्गांनी आपला निषेध नोंदविलेला आहे. त्याची फलनिष्पती म्हणून सिरियाच्या वाटेला जेवढे पाणी आले असते तेवढे पाणी सिरियाचे सरहदीपर्यंत नेऊन देण्याचा प्रस्ताव तुर्कस्तानने सिरियाला दिला आहे. मात्र इराकच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत.
तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की ह्या प्रकल्पांमुळे सिरियातील जलस्त्रोत सुमारे 60 टक्के इराक मधील जलस्त्रोत सुमारे 40 टक्के कमी होतील. इराकमध्ये तर ही नदी एखाद्या छोट्या वाहत्या प्रवाहाच्या रूपानेच शिल्लक उरेल. शिवाय तिथपर्यंत पोहोचणारे पाणी हे पूर्णपणे खारट झालेले असेल. ह्या शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी. सिरिया आणि इराक ह्या दोन्ही देशांना काही मोठे जलसंधारण प्रकल्प हाती घेतलेले आहेत. तेही लवकरच कालौघात पूर्ण होतील.
टायग्रिस ही तुर्कस्तानात उगम पावत असली तरी तो प्रदेश डोंगराळ असून जलसंधारणाच्या कामांसाठी कठीण आहे. शिवाय त्या देशाची गरज इप्रेटिसच्या पाण्यावर भागविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे इराकला आजपर्यंत टायग्रिसचे जवळजवळ संपूर्ण पाणी मिळत आले आहे. जसजसे वरच्या भागात नवे प्रकल्प उभे राहतील, तसतसा पाणी पुरवठा तर घटत जाईलच शिवाय हे प्रश्न राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्यातील अनेक गुंते नव्याने निर्माण करील.
3. जॉर्डन नदी :
ही नदी म्हणजे लेबनॉन आणि पॅलेस्टाईन ह्या भागातील पाण्याचा मुख्य स्त्रोत. जॉर्डन पर्वतराजी हा ह्या भागातला भरपूर पाऊस पडणारा विभाग. तिथून ही निघते आणि गॅलिली समुद्रात जाऊन मिळते. यामनुक नदी हा दुसरा तर लिटानी हा तिसरा स्त्रोत. आवली नदी हा लिटानीच्या पणलोटाचाच भाग.
इस्त्राईलच्या निर्मितीनंतर आणि अरब राष्ट्रे व इस्त्राईल ह्यामध्ये जी तीन युध्दे झाली त्यानंतर पॅलेस्टाईनचा बराचसा भाग इस्त्राईलने व्यापला आणि तिथले पाणी वापरायला सुरूवात केली. इस्त्राईलच्या स्थापनेच्या वेळीच (सन 1950) भूपृष्ठावरील पाणी कसे वाटून घ्यावयाचे याबद्दल 1953 मध्ये जॉर्डन व्हॅली डेव्हलपमेंट प्लॅन हा करार झाला होता. मात्र भूगर्भातील पाण्याबद्दल ह्या करारात काहीही लिहिले नव्हते. मात्र युध्दानंतर जो भाग इस्त्राईल व्याप्त प्रदेश म्हणून त्यांचे ताब्यात आला त्यानुसार त्यांना यामनुक आणि लिटानी ह्या दोन्ही नद्यांपर्यंत पाणी उचलण्यासाठी पोहोचता आले.
खरेतर जॉर्डन नदीचे पाणी वापरता यावे अशी भौगोलिक स्थिती ही फार मोठ्या प्रमाणावर जॉर्डन मध्ये नाही. पाणी अडविता येईल अशा जागाही फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हे पाणी शेवटी गॅलिली सागराला जावून मिळते. इस्त्राईलने हे पाणी विकत घेण्याचा प्रस्तावही जॉर्डनला दिला होता. मात्र एका टेबलावर बसून असे करार करण्याचे मानसिकतेत अद्याप तो देश नाही. उद्याची वाढती पाण्याची मागणी हा प्रश्नही त्यांच्या समोर आहेच. पण ह्या सगळ्याचे फलित असे की पाण्याची प्रचंड टंचाई असलेले हे देश आज फार मोठ्या प्रमाणावर पाणी वापरू शकत नाहीत. सरळ समुद्रात वाहून जाऊ देत आहेत.
यामनुक नदीचे पाणी अडविणे व वापरास पॅलेस्टाईन क्षेत्रात उपलब्ध करून देणे ही मुख्य जबाबदारी जॉर्डनची होती. मात्र युध्दात हा प्रदेश इस्त्राईलने जिंकून घेतला व स्वत:चे ताब्यात ठेवला. इतर अनेक कारणांबरोबरच तिथे उपलब्ध असलेले ह्या तिन्ही नद्यांचे पाणी हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता. इस्त्राईलने ह्या क्षेत्रात वसाहती केल्या ह्याच बरोबर तिथले भूगर्भजल उचलून आपले देशात घेऊन जाण्याचा प्रयोगही यशस्वीपणे केला. पाईपलाईन द्वारा पंपाने जॉर्डन नदीचे पाणी उचलून नेले.
आता पॅलेस्टाईनबरोबर शांतीवार्तेच्या दरम्यान ह्या पाण्यावरचा पॅलेस्टाईनचा हक्का त्यांना तो तसा परत देणे हा इस्त्राईलसमोरचा मोठा प्रश्न आहे. पहिल्या महायुध्दानंतरच ज्यू लोकांनी ह्या भागात येऊन शेती करायला आणि आपल्या उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाणी अडविणे व वापरणे ह्या कार्यक्रमाला सुरूवात केली होती आणि लीग ऑफ नेश्न्स (युनो सारखी महायुध्दानंतरची संघटना) ह्या संस्थेने त्याला परवानगी दिली होती. आता पॅलेस्टाईनचा भूप्रदेश ताब्यात घेतल्यानंतर इस्त्राईल तिथल्या अरब लोकांना विहीर देखील खोदू देत नाही. मात्र इस्त्राईलने ज्या वसाहती तिथे वसविल्या तेथे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
जॉर्डन हा मुख्यत्वे डोंगराळ, खडकाळ असा वाळवंटी प्रदेश आहे. त्याला हे खोरे एवढाच आपवाद. मात्र तेही युध्दजन्य स्थिती आणि युध्द ह्यामुळे त्या देशाला पाण्यासाठी फारसे उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे जॉर्डनची सुमारे 97 टक्के लोकसंख्या ही त्या नदी खोर्याचे परिसरात केंद्रित झाली असून जी जमीन पिके घेण्यासाठी वापरली जायला हवी तिथे नागरी वस्त्या वाढत आहेत आणि देशाच्या अन्नधान्य उपलब्धतेवर त्याचा परिणाम होत आहे. त्याचबरोबर नागरी आणि औद्योगिक सांडपणी आणि मैलापाण्यामुळे जॉर्डन नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागले आहे. जलसंधारणाचे अनेक छोटे छोटे कार्यक्रम सर्वदूर राबवूनही त्यांच्या पाणी प्रश्नावर फारसा सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही.
लेबनॉन :
ह्या देशात सोळा नद्या आहेत. लेबनॉन पर्वतातून त्या उगम पावतात पूर्व लेबनॉनमधील बेक्का दरीतून त्या निघतात. पूर्व लेबनॉन मधील ओरोंटेस आणि लिटानी ह्या पूर्वनाहिनी नद्या महत्वाच्या. ओरोंटस उत्तरेकडे सिरिया आणि नंतर तुर्कस्तान मधून वहाते आणि मोठ्या प्रमाणावर त्या देशांना पाणी पुरवते. लिटानी ही दक्षिणेकडे वहाते तिथून जवळजवळ काटकोनात पश्चिमेला वळते आणि भूमध्य समुद्रात जावून मिळते. ह्या सर्व नद्यांनुळे आपल्या देशाला आवश्यक ते पाणी साठवून, अडवून, राखून ठेऊन उरलेले पाणी विकून आपली अर्थव्यवस्था बळकट करणे हे लेबनॉनला शक्य आहे. परंतु युध्दजन्य स्थिती आणि युध्दामुळे तुटलेली मने ह्यामुळे हे घडत नाही.
केवळ जॉर्डन नदी खोर्यापुरता मर्यादित विचार मांडावयाचा तरी प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे वाढणारी पाण्याची मागणी आणि पाण्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे घटत जाणारा पुरवठा हे प्रश्न अधिकाधिक प्रमाणावर भेडसावू लागले आहेत. ह्या नदी परिसरातील सर्व देशांनी एकत्र येऊन, एकात्मिक स्वरूपाचे प्रयत्न केले नाहीत तर हे प्रश्न दिवसेंदिवस अधिकच उग्र स्वरूप धारण करू लागणार आहेत.
अर्थात ह्यातही आशेचे किरण आहेतच. तेलामुळे अर्थसंपन्नता आली. त्याबरोबर हे देश विकासाची स्वप्ने पाहू लागले. पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसित केल्या.
भूजल :
वाळवंटी प्रदेश असल्याने मुख्यत: भूगर्भ हा चिकणमाती, शिस आणि बारीक वाळू ह्यांचे मिश्रणाचा आहे. त्यामुळे त्यात फारसे पाणी मुरत नाही. त्याशिवाय अनेक भागात खोलवर विंधण विहीरी घेतल्या तर तिथे खारट पाणी लागते. त्यामुळे काही ठराविक क्षेत्रेच अशी आहेत की त्या भागात भूजलसाठा आहे तो वापरता येईल अशा खोलीवर आहे. भूगर्भातील अंतर्गत हालचाली व फेरबदल ह्याचा परिणाम ह्या जालसाठ्यावर होतो आणि ते सहज शक्यही आहे. मात्र ते एकात्मिक होणारे फेरबदल नाहीत. आणि ह्या सर्व राष्ट्रांची पाण्याची आजची गरज ही महत्वाची आहे. दीर्घकालीन उपाययोजना हा विषय त्यानंतर येतो.
भूजलात खालीलबाबींमुळे फरक पडू शकतो व त्याचे दृष्य परिणामही लगेच लक्षात येतात. पाणी उपशामुळे, पाणलोटाच्या हद्दी आणि भूजल वहाण्याच्या दिशा बदलतात. किमान 20 ठिकाणी असे बदल नोंदविले गेले आहेत. भूजल पातळी खालावणे ही बाब नित्याचीच झालेली आहे.
झरे :
भूजलाचे रूपांतर झर्यात होऊन ते प्रकटणे ही महत्वाचा पाणी उपलब्धतेचा स्त्रोत आहे हे मागेच लिहिले आहे. इथले खडक हे मुख्यत: खरांचे खडक असल्याने दोन स्थरांमधून हे पाणी झिरपून झर्यांचे रूपाने बाहेर येते. ह्या मध्यपूर्वेतील देशांच्या एकूण पाण्याचा हिशोब तपासला तर त्यांना मिळणार्या पाण्यापैकी सुमारे 35 टक्के पाणी हे झर्यांच्या माध्यमातून मिळते. झर्यांचे प्रमाण हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असतांना लक्षणीय प्रमाणात कमी होतांना आढळते.
मृतसमुद्र :
चाळीस हजार चौरस कि.मी पेक्षाही जास्त क्षेत्रात पसरलेला हा समुद्र म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्यात खोलगट भाग असे समजावयाला हरकत नाही. (उत्तरेला सुमारे 370 मी, तर दक्षिणेला सुमारे 400 मी. समुद्रा सपाटीचे खाली) जसजशी पाणी अडविण्याची आणि नदीचे पाणी वापरून घेण्याची पध्दत रूढावू लागली, तसतशी ह्या समुद्राची पातळी घटू लागली. 1930 ते 1997 ह्या कालावधीत ही पातळी 21 मी. पेक्षाही जास्त प्रमाणात घटली आहे. ही पातळी वाढावी म्हणून प्रयत्न केला तर पाण्याची उपलब्धता मात्र त्या प्रमाणात वाढली नाही केवळ बाष्पीभवन वाढले व तो प्रयत्नही असफलच ठरला.
मात्र जलसंधारणाची कामे करून भूजल पातळी वाढली तर आपोआप ही मृतसमुद्राची पाण्याची पातळी कायम राखली जावू शकते. तसेच मर्यादित उपशाचे तत्व काटेकोरपणे पाळले गेले तर समुद्राचे खारटपाणी भूजलात शिरणे व तिथून उपसले जाणे यावरही नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे.
देशोदेशीचे पाणी इस स्टोरी को एक जगह पढ़ने के लिये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करें | |
1 | |
2 | |
3 |