एक परिपूर्ण पाणी व्यवस्थापन योजना

Submitted by Hindi on Thu, 08/10/2017 - 12:43
Source
जलसंवाद, मे 2017

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान


चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान राबविण्यात आले ते सन २०१२ मध्ये. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी २०१५ पर्यंत थांबावे लागले. या कामाचे दृष्य परिणाम दिसण्यास प्रारंभ झाला आणि हे काम पाहण्यासाठी मान्यवरांची रीघ लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे, जलपुरुष राजेंदसिंह, पंकजा मुंढे आदि मान्यवरांनी चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची पाहणी केली.

दुष्काळ आणि मराठवाडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का? असा समज दृढ व्हावा अशी परिस्थिती गेल्या काही वर्षात निर्माण झाली हे खरय. परंतू दुष्काळाच्या या आपत्तीतून काही इष्टापत्ती देखील समोर आल्या आहेत. यातील एक ठळक सकारात्मक बदल म्हणजे पाण्याच्या वापरासंदर्भात सर्वच स्तरावर निर्माण झालेली जागरुकता ! याशिवाय आपलं गाव आणि आपलं नदी खोरं दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन झटणारी तरुण कार्यकर्त्यांची निर्माण झालेली फळी. ही उपलब्धी उमेद वाढविणारी आहे. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या ही बाब सातत्याने पुढे येत असते. परंतु दुष्काळी परिस्थितीला पुरुन उरण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी झटणार्‍या जलक्रांतीकारकांच्या प्रेरणादायी गाथा फारशा समोर येत नाही. त्यामुळे या जलक्रांतीकारकांना रसद पुरविणारे देखील बव्हुंशी अज्ञातवासातच राहतात.

दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरसावणार्‍या जल कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय तसेच या कार्यात आर्थिक सहयोग देण्यासाठी औद्योगिक संस्था देखील पुढे येत आहेत. जलसंधारण विषयक कार्यातील सहभागाचा औद्योगिक जगताचा सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दिवसेंदिवस वाढत जाणारा टक्का देखील हुरुप वाढविणारा ठरतोय. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेलं जलसंधारणाचे काम केवळ घोषणा करुन पूर्ण होत नाही, त्यासाठी निधीची आवश्यकता असते. अर्थात शासनास्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. प्रत्यक्षात मात्र गरज आणि निधीचा पुरवठा यात नेहमीच तफावत असते.

त्यामुळे उपलब्ध होणार्‍या तुटपुंज्या अनुदानातून अपेक्षित भरीव व ठोस काम होत नाही. दुष्काळाची दाहकता कायम राहते. टँकरच्या फेर्‍या थांबत नाहीत. मूठभर राजकारणी कम ठेकेदार आणि अधिकारी यांना अशी नेहमी निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती पर्वणी ठरत असते. अशा वेळी एखाद्या औद्योगिक समुहाकडून उपलब्ध झालेला निधीच दुष्काळ मुक्तीच्या कामाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरतो. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाचे अर्ध्वयू नरहरी शिवपुरे यांचा अनुभव यापेक्षा वेगळा नाही. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानात सकाळ वृत्तपत्र समुह, मुंबईची केअरिंग फ्रेंडस् संस्था आणि महामार्गाची उभारणी करणारी के.व्ही. देशमुख कंपनी या तीन घटकांचा सहभाग अतिशय मोलाचा ठरला. त्यामुळेच शाश्वत काम उभे राहू शकले.

मराठवाड्याला ग्रासणार्‍या दुष्काळाची छाया सन २०१२ मध्ये अधिकच भयावह झाली होती. ढगाळलेलं आकाश एवढी एकच मृगाची साक्ष उरली होती. सन १९९८ पासून जलसंधारणविषयक कार्याशी निगडित असलेले नरहरी शिवपुरे अस्वस्थ होते. कायम स्वरुपी दुष्काळ निवारणासाठी पाणलोट क्षेत्र विकासाचे नेमके कोणते तंत्र कुठे व कसे वापरावे यासंदर्भात विविध प्रयोग राबविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. याआधी त्यांनी सन २००८ मध्ये ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून जागतिक बँक व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने औरंगाबाद जिल्हयातील अंजनडोह व परिसरातील २९ गावात भूगर्भातील जल साठा वाढविण्यासाठीही काम केले होतं. शाश्वत विकासासाठी पाणी या नैसर्गिंक संसाधनांचा गाव पातळीवर विचार न करता नदी खोरे पातळीवर विचार केला पाहिजे. खोरे आधारभूत ठेऊन नियोजन केलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

औरंगाबादच्या दक्षिणेला १२ किमी अंतरावर असलेलं चित्ते नदी खोरं त्यांना खुणावत होतं. सिंदोनजवळ उगम असलेली चित्ते नदी १७ किमी अंतर कापीत आपद् गाव जवळ सुकना धरणाच्या जलसाठ्यात समर्पित होते. सिंदोन-भिंदोन, एकोड, पाचोड, चित्तेगाव अशा १२ गावांचा समावेश चित्ते नदी खोर्‍यात होतो. या खोर्‍याचे क्षेत्रफळ ६ हजार ४२७ हेक्टर असून सुमारे पंधरा हजार लोकसंख्येची चित्ते नदी जीवनरेखा आहे. चित्ते खोर्‍यात १९ लघु पाणलोटाचा समावेश आहे. या खोर्‍याची भौगोलिक परिस्थिती संमिश्र आहे. कुठे तीव्र उतार तर कुठे पडीक व वन जमीन.

चित्ते नदी खोर्‍यातील परिस्थिती खरोखरच आव्हानात्मक होती. नैसर्गिक साधन संपत्तीची अनुकुलता असूनही जलव्यवस्थापनाचा व संघटितपणाचा अभाव असल्यामुळे दुष्काळचा फटका मोठ्याप्रमाणावर बसत असे. एकेकाळी औरंगाबाद शहरावासीयांना लाकडाच्या मोळ्या व गवताचे भारे पुरविण्यात या खोर्‍यातील स्थानिक मंडळींना धन्यता वाटत असे. महानगराजवळ असूनही दळणवळणाच्या सोयींची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. सततच्या पाणी टंचाईमुळे महिलांची ससेहोलपट नित्याची झाली होती. मुक्या जनावरांची व्यथा यापेक्षा वेगळी नव्हती. रोजगारा अभावी तरुणांचे शहराकडे स्थलांतर आणि उजाड फळबागा ही चित्ते नदी खोरे परिसराची नवी ओळख झाली होती.

काम करण्यासाठी आणि कामाची यशस्विता दाखविण्यासाठी काहीसे अवघड परंतू आव्हानात्मक असलेले काम करण्याचा निर्णय या परिसराच्या अभ्यासाअंती नरहरी शिवपुरे यांनी घेतला. दुष्काळ मुक्तीसाठी चित्ते नदी खोर्‍यात जलसंधारण विषयक विविध योजनांची अमलबजावणी करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला. पाणलोट क्षेत्राचा पूर्ण विकास करण्याच्या उद्देशाने वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरु झाले. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची मूहूर्तमेढ रोवण्यात आली. सुमारे १७ किमी अंतर असलेल्या चित्ते नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, त्यावर साखळी पध्दतीने बंधारे उभारणे शिवाय चित्तेनदीला येऊन मिळणार्‍या उपनाल्यांवर बांधबंदिस्तीची कामे करणे इत्यादी कामांचा या आराखड्यात समावेश होता.

चित्तेनदी खोर्‍यातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ यांचे प्रबोधन, त्यांचा सहभाग असे टप्पे पार करीत चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान सुरु झाले. प्रारंभी ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. ग्रामस्थांपुढे चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाचा दहा कलमी कार्यक्रम ठेवण्यात आला . नरहरी शिवपुरे यांच्या आंतरिक इच्छेनुसार या अभियानास लोकचळवळीचं स्वरुप आलं. त्यामुळे प्रारंभी असलेलं दडपण नंतर कमी झालं. मात्र प्रांरभी ज्या वसुंधरा योजनेंतर्गत या अभियानाची अमलबजावणी सुरु झाली त्यामध्ये केवळ कपार्टमेंट बंडिंग, शेततळी,डीप सीसीटी, सिमेंट बंधारे इत्यादी कामांचा अंतर्भाव होता. चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाचा गाभा असलेल्या नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण , साखळी पध्दतीचे बंधारे उभारणे आणि उपनाल्यांची बांधबंदिस्ती या कामांसाठी काहीच तरतूद व्हती.

दुष्काळ मुक्तीचा तात्काळ निकाल देणारी कामे होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थ हिरमुसले. तथापि नरहरी शिवपुरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी निधी उभारणीसाठी काही औद्योगिक संस्थांशी तसेच नागरिकांशी संपर्क सुरु केला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. चित्ते नदी खोरे परिसरात हायवे उभारणीचे काम करणार्‍या कंपनीने त्यांच्या कामासाठी लागणारा मुरुम स्वखर्चाने चित्ते नदी पात्रातून वाहून नेला. त्यामुळे खोलीकरण व रुंदीकरण चांगल्या पध्दतीने झाले. या अभियानास मोठा हातभार लागला. याशिवाय सकाळ पेपर्स प्रा.लि. तर्फे उभारण्यात आलेल्या रिलीफ फंड व लोकवर्गणीतून सुमारे दीड कोटी रुपयांचा हातभार या अभियानास लागला.

वसुंधरा प्रकल्प, जलयुक्त् शिवार अभियान या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीचा वाटा सर्वाधीक होता. चित्ते नदीच्या पुनरुज्जीवनातच आपली समृध्दी आहे याची महती पटलेल्या ग्रामस्थांनी तन मन धनाने या अभियानास साथ दिली. सुमारे पन्नास लाखाची कामे लोकसहभागातून झाली. यात प्रामुख्याने शेतकर्‍यांनी स्वखर्चाने वाहिलेला गाळ, तनिष्का महिलांची साथ, देवगिरी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिलेला एक दिवसाचा पगार या सहभागाचे मोल देखील अधिक आहे. यातून उभारलेले काम परिसराचा कायापालट करणारे ठरले.

 

सी.सी.टी

१६५ हेक्टर

कंपार्टमेंट बंडींग

२५०० हेक्टर

साखळी सिमेंट बंधारे

१६

चित्ते नदी रुंदीकरण व खोलीकरण

७ किमी

पाझर तलावातील गाळ काढणे

६५००० घ.मी.

शेततळे

३१

 

चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाचे दृष्य परिणाम साधारण सन २०१५ पासून दृष्टीपथास येऊ लागले. सिंचन क्षेत्रात १५०० हेक्टरने वाढ झाली, सरासरी हेक्टरी उत्पादन वाढले, फळबाग, भाजीपाला लागवड वाढली, दूध उत्पादनात साधारण तीस हजार लिटरने वाढ झाली. मुख्य म्हणजे या खोर्‍यातील सहा गावांमध्ये टँकर येणे बंद झाले. अंशत: थांबलेले स्थलांतर आणि स्थानिक भूमीहिनांना गावातच उपलब्ध झालेला रोजगार या काही जमेच्या बाजू आहेत. विशेष म्हणजे पिचलेल्या आणि खचलेल्या ग्रामस्थांमध्ये दुष्काळी परिस्थितीला पुरुन उरण्याची क्षमता निर्माण झाली ही बाब महत्वाची.

चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान राबविण्यात आले ते सन २०१२ मध्ये. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी २०१५ पर्यंत थांबावे लागले. या कामाचे दृष्य परिणाम दिसण्यास प्रारंभ झाला आणि हे काम पाहण्यासाठी मान्यवरांची रीघ लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे, जलपुरुष राजेंदसिंह, पंकजा मुंढे आदि मान्यवरांनी चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची पाहणी केली. नरहरी शिवपुरे आणि ग्राम विकास संस्थेचा लौकिक वाढला. चांगल्या स्वयंसेवी संस्थांच्या शोधात असलेल्या औद्योगिक संस्थांपर्यंत ग्राम विकास संस्थेचे नाव पोहोचले. वाळूंज एमआयडीसीमधील बजाज प्रा.लि. कंपनीने नरहरी शिवपूरे यांच्या ग्राम विकास संस्थेवर आता औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव, कचनेर आणि कचनेर तांडा येथे जलसंधारणाची कामे करण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी ३० लाख रुपये संस्थेस प्राप्त झाले असून या तीन गावांमध्ये नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे आणि सिंमेट बंधार्‍यांची उभारणी करणे अशी कामे सुरु आहेत. यापुढील काळात बजाज कंपनी तसेच अन्य औद्योगिक संस्थांच्या मदतीने चित्ते नदी खोर्‍यांचा सर्वांगीण विकास, पाणी वापरबद्दल जलजागृती या अनुषंगाने योजना राबविण्याचा नरहरी शिवपुरे यांचा मानस आहे. याशिवाय चित्ते नदी खोर्‍यातील कृषी मालाचे ब्रॅण्डींग करण्याच्या ते विचारात आहेत.