Source
जल संवाद
जंगल हा पाण्याचा पिता आणि नदी ही पाण्याची माता अस आपण बोलतो. पण हा विचार फक्त बोलण्यामध्ये आणि साहित्यामध्येच अडकून राहिलेला आहे. मानवाची वागणूक मात्र याच्या उलट आहे. मानवी संस्कृतीचा आधार जलसंस्कृती आहे. जल म्हणजे जीवन. नारीबद्दल देखील हीच पवित्र भावना आहे. नारीला सन्मान देण्याचे वचन आपल्या संस्कृतीमध्ये वदवलं गेलं आहे. भुमीला पण आपण भु-माता म्हणतो.
दिनांक 18 व 19 डिसेंबर 2010 ला 'भारतीय जलसंस्कृती मंडळा'चे 'सहावे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन' राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग रिसर्च अॅण्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे संपन्न झाले. अनेक महत्वाचे विषय चर्चेला आले. विदर्भातील वैनगंगा खोरे तलाव आधारीत शेतीसाठी प्रसिध्द आहे. गौंड राजाच्या कालावधीत हजारो तलावाची निर्मिती या भागात झालेली आहे. याच तलावांना 'गौंड कालीन तलाव' असे संबोधले जाते. काळाच्या ओघात हे तलाव नुतनीकरणाची वाट पाहत आहेत. या तलावावरच्या पीक पध्दतीस, सिंचन पध्दतीसपण वेगळी दिशा देण्याची गरज आहे. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या पारंपारिक पध्दतीस फाटा देण्याची वेळ जवळ आलेली आहे. चाकोरी सोडल्याशिवाय नवीन वाट तयार होणार नाही. या पार्श्वभूमीवर तलावाचे जलव्यवस्थापन हा विषय बराच काळ चर्चेमध्ये राहीला. याबरोबरच भारताची व महाराष्ट्राची जलनिती आणि राज्यातील नद्यांच्या दुरावस्थेवर पण साधक बाधक चर्चा झाली.डॉ. माधवराजी चितळे आणि राजस्थानचे मा. राजेंद्रसिंगजी यांचे या विषयावरचे भाष्य उद्बोधक ठरले. अनेक मंडळींनी आपले विचार व्यक्त करुन पाणी हाताळण्यातील दुरावस्थेत बदल होण्याची निकड प्रतिपादीत केली. नद्या कोरड्या पडत आहेत. शहराजवळच्या नद्या बारमाही झाल्या आहेत पण त्या प्रदुषीत पाण्याच्या वाहक बनलेल्या आहेत. पाणी उपभोगाचं साधन म्हणून त्याला ओरबाडलं जात आहे. नद्याचं शोषण होत आहे. नद्याचं आरोग्य बिघडल्यामुळे एकूणच निसर्गाचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे. मानव व एकूणच प्राणी जगतांला आरोग्याची समस्या भेडसावत आहे. कोणत्याही नदी, नाल्यामध्ये हात घालून ओंजळभर पाणी तोंडात घालण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? हा प्रश्न भेडसावत आहे.
जंगल हा पाण्याचा पिता आणि नदी ही पाण्याची माता अस आपण बोलतो. पण हा विचार फक्त बोलण्यामध्ये आणि साहित्यामध्येच अडकून राहिलेला आहे. मानवाची वागणूक मात्र याच्या उलट आहे. मानवी संस्कृतीचा आधार जलसंस्कृती आहे. जल म्हणजे जीवन. नारीबद्दल देखील हीच पवित्र भावना आहे. नारीला सन्मान देण्याचे वचन आपल्या संस्कृतीमध्ये वदवलं गेलं आहे. भुमीला पण आपण भु-माता म्हणतो. या तीन्ही पुजनीय घटकांवर अत्याचार करण्यात आपण कुठेही कसर ठेवत नाही. या घटकावर मानवाने विज्ञानाचा गैरवापर करुन अतिक्रमण केले आहे. भावना आणि विज्ञान याची फारकत झालेली आहे असा भाव चर्चेतून पुढे आला. 'पाणी आणि शिस्त', 'पाणी आणि विवेक', 'पाणी आणि भावना' आणि 'पाणी आणि विज्ञान' याचा एकात्मिक विचार करण्यापासून आपण फार दूर जात आहोत.
नद्यांना तीन प्रश्नांनी विळखा घातलेला आहे. प्रदुषण, शोषण आणि अतिक्रमण हे ते प्रश्न आहेत. नद्या नदीपण हरवून बसलेल्या आहेत. जलनितीमध्ये नद्याचे अस्तित्व टिकवण्याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. म्हणून जलनितीमध्ये सुधारणा होण्याची नितांत गरज आहे, हा विचार मांडण्यात आला. महाराष्ट्राची जलनिती 2003 मध्ये अस्तित्वात आली, तर देशाच्या जलनितीचा जन्म 1987 साली झाला. त्यामध्ये 2002 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. या दोन्ही जलनितीमध्ये ʅनदीनितीʆचा अंतर्भाव केला गेला नाही असेच म्हणावे लागेल. अशीच परिस्थिती तलावाची आहे. देशामध्ये लाखो ऐतिहासिक तलाव आहेत. जगामध्ये हा देश तलावाचा देश म्हणून ओळखला जातो. वैनगंगा खोऱ्यातच 40 हजाराच्या जवळपास गौंड कालीन तलाव असल्याचे इतिहास वाचनातून दिसून येते. त्यापैकी लहान मोठे 10 हजाराच्या जवळपास तलाव आजपण विस्कळीत झालेल्या अवस्थेत तग धरुन आहेत.
' उदक चालवावे युक्तीने 'असे समर्थानी सांगितले आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर ' मुल-सिंचन ' या शब्दातून सिंचनाचं विज्ञान बोलतात. पण या दोन्ही विचारांना आपण जवळ केलं नाही असच म्हणावं लागेल. वैनगंगा खोऱ्यात अनेक संसाधनांची विपूलता आहे. सुपीक जमीन, विपुल पाणी, आणि कोळशासारखं इंधन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कोळशापासून वीज निर्मिती आणि त्यासाठीच्या खाणी आणि यासाठी पाण्याचा वापर याही बाबी त्या भागाचं पर्यावरण रक्षण करण्यात हानिकारक ठरत आहेत. हाही विचार स्थानिकांच्या मनाचा ठाव घेतलेला. भारतीय जलसंस्कृती मंडळाने अनेक विषयांचा पाठपुरावा करण्याचे मनावर घेतलेले आहे. त्यासाठी पाच व्यासपीठे निर्माण करण्यात आलेली आहेत. इतिहासातलं जलव्यवस्थापन, साहित्यातून जलाच्या विविध प्रश्नांच दर्शन, जल जागरण, पाण्याची निती, कायदे, पाण्याच्या वाटपातील प्रश्न, पाण्याच्या व्यवस्थापनातील समस्या, इत्यादी पाणी व्यवहारातील बाबी आणि पाण्याचे प्रदूषण, भूजलाचा उपसा, पर्यावरण, भूसंपादन, विस्थापन, इत्यादी पर्यावरणीय घटकांना कवेत घेणाऱ्या विविध पैलुंवर वैचारिक जागरण, मंथन करुन लोकसहभागातून, प्रयत्नातून जलसंस्कृतीचं संगोपन करण्याचा मंडळाचा निर्धार आहे.
जलनितीमध्ये अशा सर्व पैलूंना कितपत स्थान देण्यात आलेलं आहे या अनुषंगाने पण संमेलनामध्ये विचार मंथन झाले. अशा बाबींचा उल्लेख जलनितीमध्ये दिसून येत नाही. ही पण वस्तुस्थिती समोर आली. या दिशेने अभ्यास करुन जलनितीमध्ये या सर्व घटकांचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचा आणि सुधारित जलनितीमध्ये या बाबीला स्थान देण्यासाठीचा प्रयत्न करण्याचा पण विचार पुढे आला. जगातील काही देशांनी पाणी हाताळण्यामध्ये ʅशिस्तीचाʆ उच्चांक गाठलेला आहे. फ्रान्समध्ये नदीखोऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ' वॉटर पार्लिमेंट ' निर्माण करण्यात आली आहे. नद्या या बारमाही असतातच असं नाही. अनेक नद्या हंगामी वाहणाऱ्या आहेत. पण तलाव हा बारमाही पाणी पुरविणारा घटक आहे आणि म्हणून वैभवाचा आधार हा तलाव होत असतो. तलावाच्या आधारावरच बारमाही विकास व्यवस्था बसू शकते. जलनितीमध्ये तलावाच्या व्यवस्थापनाबद्दल पण उल्लेख सापडत नाही. ʅएकपिकीʆ व्यवस्था ही वैभवाकडे घेऊन जात नसते.
विदर्भात तलावाचं जाळ निर्माण झालं, बारमाही विकास करण्यासाठी. ऊसासारखे पिक वाढवून त्यावर प्रक्रिया करुन ʅगुळʆ हा मूल्यवर्धक पदार्थ तयार करुन त्याभागाला समृध्दी देण्यात आलेली होती. आज हे वैभव दिसत नाही. बारमाही विकासाचं स्वरुप पालटून गेलेलं आहे आणि भाताची ' एक पिकीय ' हंगामी व्यवस्था गेल्या काही वर्षापासून या भागात रुजलेली आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. निसर्गत: नदीखोरे हे वैविध्याने नटलेले आहेत. एकाच प्रकारचे कायदे, नियमावली सर्व भागासाठी सार्वत्रिकपणे लागू करता येत नाही. त्या त्या भागातील गरजा पण वेगळया असतात. वनस्पती जीवन पण वेगळ असतं. आणि म्हणून या वैविध्याने नटलेल्या खोऱ्याच्या व्यवस्थापनाच गणित सारख्याच फुटपट्टीने सोडविता येत नाही. ही वस्तुस्थिती आजच्या जलनितीत नाही.
तलाव, भूजल, नदी हे एकमेकांवर आधारलेले घटक आहेत. याचा सुटा सुटा विचार हा घातक ठरतो आणि तो ठरलेला आहे. नद्याला पाऊस - कालानंतर ʅवाहतʆ ठेवण्यास भूजल कारणीभूत ठरतं. भूजलाची क्षमता वाढविण्यात तलाव कारणीभूत ठरतं. या सर्व घटकांचा विचार नदी खोरे निहाय, पाणलोट निहाय, करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या नदीखोऱ्यात पडणारा पाऊस, वाहणारे पाणी हे पण वेगवेगळे राहणार आहेत. पाऊस हा दोलायमान असतो. वेगवेगळया खोऱ्यातील दोलायमानता पण सारखी नाही. याचा पण आवाका जलनितीत येण्याची गरज आहे. या वैविध्यतेमुळे, दोलायमानतेमुळे पाण्यावर आधारीत विकासाचं माप हे सर्व भागासाठी सारखं राहणार नाही. हे देखील जाणून घेण्याची गरज आहे.
प्रश्न वेगवेगळे राहणार आहेत याची उत्तरं पण वेगवेगळी राहणार आहेत. याचं सार्वत्रिकरण होवू शकत नाही. सर्व प्रश्न कायद्यानेच सुटतील असंही नाही. कायदा टाळू पण शकत नाही. कायद्याचा आंतरीक आवाज समजून घेण्यासाठी समाज प्रबोधनाची देखील फार मोठी गरज आहे. लोकशिक्षणातून, साहित्यातून, प्रबोधनातून, पाणी या क्षेत्रातील लोकचळवळ पुढं घेवून जाण्याचा भारतीय जलसंस्कृती मंडळाचा मानस आहे. पाण्याचा प्रश्न जेव्हा मनाला शिवतो तेव्हा तो साहित्यातून उमटतो आणि त्यालाच आपण जलसाहित्य ही उपमा देतो.
या विचारमंथनातून काही महत्वाचे निष्कर्ष पूढे आले ते खालील प्रमाणे आहेत.
1. राष्ट्रीय तसेच महाराष्ट्राच्या जलनितीमध्ये नद्यांची संस्कृती, आरोग्य, व्यवस्थापन इत्यादी बाबींचा अंतर्भाव होण्याची गरज आहे. राष्ट्रीय जलनितीच्या पुनर्विलोकनाची प्रक्रिया चालू झालेली आहे. महाराष्ट्राच्या जलनितीचा पण पाच वर्षाचा काळ लोटला आहे. आणि म्हणून जलनितीतील अंतर्भूत तत्वाला अनुसरुन त्वरीत पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. सुधारित जलनितीमध्ये ही बाब प्रकर्षाने अंतर्भूत होणे आवश्यक आहे.
2. मानवी संस्कृतीच्या वैभवाचा आधार तलाव आहे. तलाव व्यवस्थापनाच्या नितीचा पण अंतर्भाव जलनितीमध्ये होणे आवश्यक आहे.
3. पाण्याला अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, न्यायिक, पर्यावरणीय पैलू आहेत. जलविकासाच्या दिशादर्शक तत्त्वांमध्ये अशा सर्व पैलूंचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे. जलनितीमध्ये हा विचार अंतर्भूत व्हावा.
4. नदी, तलाव, भुजल हे एकमेकांवर अवलंबून असणारे पाण्याचे घटक आहेत. यांचा सुटा सुटा विचार हा जलविकासाला प्रतिकुल ठरतो. एकात्मिक विचारातूनच नद्या पुनरुज्जीवीत होण्याची प्रक्रिया जलदपणे होईल.
5. वैनगंगा खोऱ्यातील ऐतिहासिक तलावांवरील पारंपारिक पीक आणि सिंचन पध्दतीत काळानुरुप आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. आधुनिक पध्दतीच्या, विचाराच्या स्विकृतीतूनच जलविकासातून समृध्दीची फळे मिळू शकतील. त्या दिशेने लोकमानस तयार होणे गरजेचे आहे.
6. नदीखोरे हा विकासाचा घटक आहे. खोऱ्यामध्ये वैविध्यता आहे. याला अनुरुप विकासाचा आराखडा पर्यावरणाची जपणूक करत बसवावा लागणार आहे. हा विचार जलनितीमध्ये यावा. मानवाच्या गरजा भागविण्यासाठी जलविकास करत असताना नद्यांच्या अस्तित्वाचे, आरोग्याचे न भरुन येणारे नुकसान होत आहे. वेळीच यावर विज्ञान, संशोधन, लोकव्यवहार इत्यादीच्या माध्यमातून उपाययोजना करुन नद्यांना नदीपण देण्याची गरज आहे. भारत हा गणतंत्र देश आहे. चांगल्या उद्दिष्ठासाठी लोकसहभाग, जनरेटा, लोकविचार इत्यादी आयुधांच्या माध्यमातून विकासाभिमूख आणि पर्यावरण पुरक जलव्यवस्थापनाचा पाठपुरावा सातत्याने होण्याची गरज आहे.
7. जलव्यवस्थापनातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, तांत्रिक, सांस्कृतिक, न्यायिक प्रश्नाला, आव्हानाला वाचा फोडणाऱ्या साहित्याला जलसाहित्य ही उपमा द्यावी. अशा साहित्याने वरील विचाराला, निष्कर्षाला वाचा फोडून यंत्रणेला, उपभोक्त्यांना अंमलबजावणीपर्यंत आणण्यात वेगवेगळ्या साहित्य प्रकारांच्या माध्यमातून हिरिरीची भूमिका बजावावी हा संदेश या संमेलनाने सर्वदूर पोहोंचविला आहे आणि ही या संम्मेलनाची फलश्रुती ठरावी.
डॉ. दि.मा.मोरे, पुणे, अध्यक्ष भारतीय जलसंसकृती मंडळ - (भ्र : 9422776670)