पाणी- बदल घडवून आणण्याचे माध्यम

Submitted by Hindi on Sat, 09/09/2017 - 16:00
Source
जलोपासना, दिवाली विशेषांक, 2014

जलोपासक

१९९० मध्ये सामान्य खेडेगावासारखे मागासलेले गाव एकदम जगाच्या नकाशावर कसे काय येवू शकले ? तिथे काय परदेशी मदतीचे डबोले सापडले काय ? की तेलाच्या खाणी सापडल्या ? की युरेनियमचे नवीन साठे सापडले ? यापैकी काहीही घडले नाही, फक्त स्वत:जवळ आधीच असलेल्या पाण्याचा नव्याने शोध लागला. असे हे गाव आहे हिवरे बाजार. १९७२ साली हे गाव इतर गावासारखेच आळसावलेले, शांत, सुस्त असे. काही घडामोडी नाहीत की नवीन हालचाली नाहीत. पण १९७२ सालचा मोठा दुष्काळ पडला व गावाची स्थिती एकदमच ढवळून निघाली. गावातील शांती भंगली. कलागती वाढल्या, गाव व्यसनाकडे झुकले. मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले. नोकरी व्यवसायानिमित्त लोक जवळपासच्या शहराकडे ओढले जावू लागले. गावातील सरपंच हा नावालाच होता. वयामुळे तो काम करण्यास सक्षम नव्हता. गावात ३२ दारूचे गुत्ते होते. शेतासाठी घेतलेले कर्ज फेडले न गेल्यामुळे गाव कर्जबाजारी झाले होते. गावात पोपटराव पवार नावाचा तरूण होता. जवळच्याच अहमदनगर गावातून एम.कॉम पर्यंत शिक्षण घेवून आला होता. इतके शिकलेला गावात तो एकमात्र होता. घरचे लोक त्याच्यामागे शहरात जावून चांगली नोकरी कर म्हणून मागे लागले होते. तसे पाहिले तर गावात त्याच्या लायकीचे कामही नव्हते.

पण त्याने गाव सोडून जायचे नाही असा निर्णय घेतला. गावातील इतर तरूण त्याच्यामागे तू सरपंचाची निवडणूक लढव असे सांगू लागले. पण त्याची कोणतीही राजकीय आकांक्षा नसल्यामुळे त्याने स्पष्ट नकार दिला. क्रिकेट हा त्याचा आवडीचा खेळ. या खेळात प्राविण्य मिळवायचे हे त्याचे स्वप्न होते. पण जेव्हा मित्रांचा दबाव वाढायला लागला तेव्हा त्याने नाईलाजाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आपल्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा असे त्याचे स्वप्न होते. ग्रामसभा बोलवून त्याने गावासमोर आपले विचार मांडले. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, बाबा आमटे, अण्णा हजारे हे त्याचे आदर्श होते. त्यांच्या विचारांनी व तत्वांनी तो भारावून गेला होता. सर्वप्रथम ग्रामसभेत सर्वांचा विचार घेवून त्याने गावासमोर कोणकोणते महत्वाचे प्रश्‍न आहेच याची यादी केली. गावाला खालील प्रश्‍न महत्वाचे वाटत होते -

१. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न
२. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न
३. जमिनीचे सिंचन
४. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न
५. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न
६. गावातील रस्त्यांचा प्रश्‍न
७. विजेचा प्रश्‍न
८. ग्रामीण रोजगारीचा प्रश्‍न
९. सामाजिक व सांस्कृतिक चळवळींचा विकास

या कामांना वेग यावा यासाठी यशवंत Agriculture अँड वॉटर डेव्हलपमेंट या संस्थेची त्याने स्थापना केली व या संस्थेमार्फत आपले विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पाणी प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने खालील कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला -

१. गावात ५२ मातीचे बंधारे व पाझर तलाव बांधण्यात आले.
२. वेगवेगळ्या ठिकाणी ३२ दगडी बंधारे बांधण्यात आले.
३. ९ ठिकाणी चेक डॅम्स बांधण्यात आले. विकासासाठी राळेगणसिध्दी चा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यात आला.
४. सरकारच्या विविध योजना राबविण्यावर विशेष जोर देण्यात आला.
५. सिंचन करण्यासाठी सर्वत्र ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला.
६. ऊस व केळी या पिकांवर त्यांना जास्त पाणी लागते म्हणून गावात बंदी घालण्यात आली.
७. टेकड्यांवर उतारावर पाणी जमा करण्यासाठी समतल चर खोदण्यात आले.
८. जंगलविकासावर जोर देण्यात आला. ९,००,००० झाडांची लागवड करण्यात आली.
९. परिसरात चारा बंदी व कुर्‍हाड बंदी अंमलात आणली.
१०. पाणी वाया जावू नये म्हणून वॉटर ऑडिटची संकल्पना राबविण्यात आली.
११. पाणी साठवण करण्यासाठी विहीरी खोदण्यात आल्या, त्यांची संख्या ९० वरून २६४ वर गेली.
१२. गावाने स्वत:ची पंचवार्षिक योजना तयार केली. १९९५ ते २००० या कालखंडात डोंगरावर समतल चर व झाडी लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
१३. बोअरमध्ये पाणी जास्त जिरावे म्हणून रॉक फ्रॅक्चरिंग प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला.
१४. शेतामध्ये कोणती पिके घ्यायची हे गावकरी सार्वमतांने ठरवितात.
१५. गावातील जमीन गावाबाहेरील माणसांना विकायची नाही असे ठरविण्यात आले.

वरील सर्व योजना अंमलात आणल्यामुळे गाव जलसमृध्द झाले. गावाची तुलना अहमदनगर जिल्ह्यातील इतर गावांशी करण्याचा प्रयत्न केल्यास असे लक्षात येते की अहमदनगर जिल्ह्यातील इतर गावात भूजलाची पातळी सरासरीने २०० ते २५० फुटांपर्यंत खोल आढळते. पण हिवरे बाजारात तीच पातळी सरासरीने १५ ते २० फूट खोल आढळते. हे निव्वळ जलसंधारणाची कामे केल्यामुळे शक्य झाले. याचाच अर्थ असा की ग्रामीण विकासाची गुरूकिल्‍ली गावातच असून आपण मात्र ती इतरत्र शोधत बसतो. तुझे आहे तुजपाशी पण तू जागा चुकलाशी असे म्हणायची पाळी आपल्यावर येते. हिवरे बाजार परिसरात सरासरी पर्जन्यमान हे ४०० ते ४५० मि.मी च्या दरम्यान आहे. अहमदनगर जिल्ह्याची गणना महाराष्ट्रात दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून केली जाते. इतके असूनही मिळालेले यश अचंबा करणारे आहे. इतर गावातील तरूणांनी यापासून बोध घेण्याची खरे पाहिले असता आवश्यकता आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास जलसमृध्दी ही आर्थिक व सामाजिक समृध्दीची गुरूकिल्‍ली आहे असे म्हणावेसे वाटते. एकदा पाण्याची सोय झाल्यावर बाकीची समृध्दी मागोमाग आली हे खालील प्रगतीवरून लक्षात येईल -

१. गावाचे प्रश्‍न गावच सोडवू शकते हा विश्वास गावकर्‍यांत आला.
२. गावात दारूबंदी करण्यात आली.
३. कुटुंब नियोजन करण्याचे सर्व ग्रामस्थांनी ठरविले व अंमलात आणले.
४. एड्स व एचआयव्ही चाचणी लग्नाआधी करून घ्यावयास सुरूवात झाली.
५. परतीचे स्थलांतर सुरू झाले. जे लोक रोजगारासाठी बाहेर जात होते त्यांना गावातच रोजगार मिळायला लागला.
६. काम सुरू होण्याआधी गावात १८३ कुटुंबे गरीबी रेषेच्या खाली होती. आज गावात एकही कुटुंब या रेषेखाली आढळत नाही.
७. गावातील ५० च्या वर लोक लक्षाधीश बनले आहेत.
८. पूर्वी गावात १०० टन चारा तयार होत होता. आता तो ६००० टन होतांना दिसतो.
९. पूर्वी गावात १५० लिटर दूध जमत असे. आता ते ४००० लिटरच्या वर जमायला लागले आहे.
१०. पूर्वी गावाचे सरासरी उत्पन्न ८३० रूपये होते. आता ते वाढून ३०,००० रूपयांच्या वर गेले आहे.
११. गावातील कर्जबाजारीपणा कमी झाला.
१२. गाव व्यसनमुक्त झाले.
१३. हिवरे बाजार हे आता आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. या गावाचे आता अनुकरण होत आहे.
१४. गाव हागणदारी मुक्त झाले आहे.
१५. गावात स्वच्छता कामगार नसतांनासुध्दा गाव स्वच्छ झाले आहे.
१६. गावात मुलांनी लोकसभा स्थापली आहे. मुलांमधील शिक्षण मंत्री घरोघर जावून शिक्षणाचा प्रचार करतो.
१७. गावात जातीय तणाव नाही. एकमेव मुस्लिम कुटुंबासाठी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येवून मशिदीचे बांधकाम केले.
१८. केंद्र व राज्य सरकार यांनी एकत्र येवून National Level Centre for Training in Panchayatraj for Watershed Development, Sanitation and Capacity Building ही संस्था १२ कोटी रूपये खर्च करून उभारली आहे.
१९. राज्य सरकारचा आदर्श ग्राम पुरस्कार या गावाला मिळाला आहे.
२०. त्याचबरोबर नॅशनल ग्राउंड वॉटर काँग्रेसने भारतीय जल पुरस्काराने सुध्दा या गावाला गौरविलेले आहे.

सामान्य माणसे असामान्य कार्य केल्यामुळे असामान्य बनतात. एका खेडेगावातील पोपट पवार आज संपूर्ण देशात पोपटराव पवार या नावाने ओळखला जावू लागला आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांनी स्थापन केलेल्या विविध समित्यांवर त्यांची नियुक्ती झाली आहे. हिवरे बाजारला तीर्थक्षेत्राचे स्थान प्राप्त झाले असून जिल्ह्याच्या नकाशावर एके काळी पुसट असलेले गाव आज जगाच्या नकाशावर तळपते आहे.

तुमच्या कृतीमुळे तुम्ही दुसर्‍यांना मोठी स्वप्ने दाखविता काय ? त्यांना तुमच्यापासून काही नवीन शिकायला मिळते काय ? नवीन व जास्तीचे काही करायला मिळते काय ? मग तुम्ही नेते आहात, तुम्ही इतरांसाठी आदर्श आहात व तुम्ही जागाला नवीन दृष्टी निश्‍चितच देवू शकाल. अर्थात तुमचे यश तुम्ही किती अनुयायी निर्माण करू शकाल यावर आहे हे मात्र विसरू नका.

तरूण मित्रानों, या वरून काही बोध घ्याल की नाही ? गावोगाव आज हेच चित्र आढळेल. प्रत्येक गावात त्या गावाला आवश्यक असणारी नैसर्गिक साधन संपत्ती आहेच आहे. निसर्गाने त्यात काही कृपणता दाखविलेली नाही. पण आपलीच झोळी फाटकी आहे. आपल्यात व पोपटराव पवारांत काय फरक आहे ? तेही माणूस आहेत. आपणही माणूस आहोत. फक्त उणीव आहे ती इच्छाशक्तीची. कृपया एक चक्कर हिवरे बाजारात मारा. काय केले गेले ते पहा. आपण आपल्या गावासाठी ते करू शकणार नाही का ? नोकरीच्या मागे लागून वेळ दवडू नका. ती आपल्याला मिळणार नाही याची खात्री बाळगा. गावात बदल घडवून आण्याची शक्ती आपल्यातच आहे. फक्त निखार्‍याला फुंकर मारा. त्याच्यावरील राख झटकून टाका व बना पोपटराव पवार आपल्या गावाचे. गावोगाव पोपटराव पवार निर्माण करण्याचा आज आपण संकल्प करू या.