पाण्याचा सर्वात मोठा अपव्यय होतो तो टॉयलेटमधील कमोड किंवा मोरीमध्ये. प्रत्येक वेळी नुसती लघवी केल्यावर प्रत्येकजण फ्लशिंग सिस्टम रिकामी करतो. एका झटक्यांत 10 ते 18 लिटर पाणी वाया जाते - त्याची जरूर नसतांनाही ! प्रत्येक फ्लॅट, बंगला किंवा सार्वजनिक इमारतीमधल्या टॉयलेटमध्ये हे घडत असते. दुसरी काही पर्यायी व्यवस्था नसल्याने हे अटळच वाटते. हे टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या बिल्डिंग बायलॉज् म्हणजेच बांधकाम नियमांमध्ये प्रत्येक संडासात वा बाथरूममध्ये एक एक यूरिनल स्टॉल म्हणजेच लघवीचे भांडे बसवण्याचे सक्तीचे करावे. ते कोपऱ्यात वा बाजूला बसवता येते. प्रत्येक उपयोगानंतर म्हणजेच साध्या मूत्रविसर्जनानंतर एक मग वा तपेलीभर पाणी ओतून स्वच्छता राहील. 15-16 लिटरऐवजी दीड-दोन लिटरवर काम भागेल.
कुठेतरी माझ्या वाचनात आलेलं एक वाक्य माझ्या मनावर खोल उमटले आहे - जगांतील तिसरे महायुध्द पाण्यावरून होणार - असे ते वाक्य. हल्ली वृत्तपत्रांतल्या बातम्या वाचून ते अगदी खरे वाटू लागते. घरा-घरांत, चाळीत, कॉलनीज्मध्ये, छोट्या गावात, मोठ्या शहरात इथपासून ते राज्या-राज्यात, राष्ट्रा - राष्ट्रांत होणाऱ्या पाणीपुरवठा, पाणीवाटप, मोर्चे - चळवळी इत्यादी इत्यादी. सर्वांच्या मुळाशी पाणीच आहे हे लक्षात येते. जगाच्या पाठीवरचा खूपच मोठा भाग, जमिनीच्या मानाने बराच जास्त जरी पाण्याने व्यापलेला असला तरीही वाढत्या लोकसंख्येला उपयुक्त, धान्यनिर्मितीसाठी योग्य असे पाणी कायमच कमी पडत आहे. पावसावर अवलंबून असलेला हा उपयुक्त पाण्याचा पुरवठा दरवर्षी कुठे ना कुठे अवर्षणामुळे अजिबात होत नाही. केवळ मनुष्यजातीलाच नव्हे तर सर्व प्राणीमात्र, पक्षी, वृक्ष या सर्वांनाच तो प्रश्न भेडसावत आहे आणि पर्यावरण चक्रावर फार मोठा ताण आणत आहे. या पाण्याला म्हणूनच संस्कृतमध्ये जीवनम् असा समर्पक अर्थगर्भ शब्द वापरला आहे! या जीवनाला धक्का बसून पडलेल्या ठिणगीचा जागतिक महायुध्दाच्या रूपात भडका व्हायला मुळीच वेळ लागणार नाही.म्हणूनच आपण सर्वांनी आपल्याला मिळते तेच पाणी कसे जपून वापरता येईल याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. पाणी वाचवाल तरच वाचाल! यासाठी दोन प्रकारचे उपाय करता येतील. एक म्हणजे व्यक्तिगत किंवा कुटुंबीय पातळीवरचा व दुसरा कॉलनी, गाव, शहर या पातळीवरचा. यापैकी व्यक्तिगत पातळीवरच्या उपाययोजनेचा या लेखात विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने प्रश्नांचे गांभीर्य जाणून अमलांत आणला तर तो फार मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरेल.
आज अशी परिस्थिती दिसून येते की गावेच्या गावे, मोठ - मोठे प्रदेश असे आहेत की तिथे पिण्यापुरते सुध्दा पाणी मिळत नाही. याउलट कित्येक ठिकाणी पाण्याची वारेमाप उधळपट्टी चाललेली दिसते. हा अपव्यय टाळण्यासाठी काही मार्ग पुढे सुचवीत आहे.
1. आपल्या संस्कृतीमध्ये धर्माच्या नावाखाली एक पध्दत प्रचलित आहे. त्यानुसार आपण सर्वजण काल भरून ठेवलेले पाणी ʇशिळेʈ झाल्यामुळे आज सकाळी मोरीत वा रस्त्यावर ओतून देतो आणि आज नवे ʇताजेेʈ पाणी भरून ठेवतो. वापरून यातून उरलेले पुन्हा सकाळी ओतून देतो व पुन्हा ताजे उद्या भरून ठेवतो! खरं म्हणजे पाणी हे काही दूध, भाजी यांसारखे शिळे होऊन बिघडत नाही, नासत नाही. पण लक्षात कोण घेतो? पिढ्यान् - पिढ्या चालत आलेली रूढी कशी बदलायची? आज आलेलं ताजे पाणी नळात कुठून आले - वर्षभर साठवलेल्या गावाच्या टाकीतून किंवा रिझर्वायझरमधून किंवा धरणाने अडवलेल्या वर्षाच्या सांठ्यातूनच! पण एवढा विचार कोण करणार ? कालचे ओतून आज नवे भरले म्हणजे ताजे भरले ही आपली भोळी समजूत. हे आपण पूर्णपणे बंद केले पाहिजे. काही ठराविक दिवसांनी साठवणीचे पिंप वा घडा स्वच्छ विसळून भरावे. (सुदैवाने हल्ली पिण्याचे बाटलीतील पाणी सहा-सात महिने जुने म्हणजे शिळे असले तरी आपण पिऊ - वापरू लागलो आहोत. हे जुन्या मंडळींना सांगितले तर ते लोक नाके मुरडतातच !)
2. ज्या ज्या घरात वॉश बेसिन किंवा सिंक अथवा मोरी असते तिथे आपण नळ सतत उघडा, वाहता ठेवून तोंड, हात धुतो. ब्रश करतांना, दाढी करतांना दहा-दहा मिनिटे नळांतून पाणी वहातच रहाते. अशा नळांमधून लाखो घरांतून लक्षावधी लिटर चांगले पाणी वाया जाते. हा पाण्याचा नाश वाचवण्यासाठी बेसिन, सिंक किंवा मोऱ्यामधील सध्याचे सतत वाहणारे नळ (तोट्या) काढून त्यांच्या जागी रेल्वे स्टेशनवरच्या किंवा रेल्वे टॉयलेटमधल्या नळांसारखे दाबा आणि उघडा म्हणजेच पुश् ओपन पध्दतीचे नळ बसवावेत. त्यामुळे जेवढा वेळ पाहिजे तेवढाच वेळ नळ एका हाताने दाबून धरून मोजके पाणी मिळेल. हात काढला की पाणी बंद ! इलेक्ट्रॉनिक पध्दतीचेही असे नळ मिळतात, खाली हात धरला तरच पाणी चालू, हात काढला की पाणी बंद ! ज्यांना शक्य त्यांनी असे नळ बसवावेत. सरकारतर्फे सार्वजनिक इमारतीत, शाळा - कॉलेजेस्, सिनेमागृहे, नाट्यालये इ.इ. ठिकाणी कायद्याने हे असे नळ बसवण्याची सक्ती व्हावी. यातून लक्ष - लक्ष लिटर पाणी वाचेल.
3. आपण सर्वांनीच नळाखाली तोंड, हात, चेहरा, पाय, भांडी इ.इ. धुण्याची सवय सोडून पाणी मगमध्ये किंवा तपेलीमध्ये घेऊन ती कामे करावी. मोठ - मोठ्या पंचकारांकित हॉटेलमध्येही लोकांना ही नम्र सूचना केलेली असते. एका हाताने मग वा चंबू धरल्याने आपोआपच मोजक्या पाण्याचाच वापर होतो.
4. पाण्याचा सर्वात मोठा अपव्यय होतो तो टॉयलेटमधील कमोड किंवा मोरीमध्ये. प्रत्येक वेळी नुसती लघवी केल्यावर प्रत्येकजण फ्लशिंग सिस्टम रिकामी करतो. एका झटक्यांत 10 ते 18 लिटर पाणी वाया जाते - त्याची जरूर नसतांनाही ! प्रत्येक फ्लॅट, बंगला किंवा सार्वजनिक इमारतीमधल्या टॉयलेटमध्ये हे घडत असते. दुसरी काही पर्यायी व्यवस्था नसल्याने हे अटळच वाटते. हे टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या बिल्डिंग बायलॉज् म्हणजेच बांधकाम नियमांमध्ये प्रत्येक संडासात वा बाथरूममध्ये एक एक यूरिनल स्टॉल म्हणजेच लघवीचे भांडे बसवण्याचे सक्तीचे करावे. ते कोपऱ्यात वा बाजूला बसवता येते. प्रत्येक उपयोगानंतर म्हणजेच साध्या मूत्रविसर्जनानंतर एक मग वा तपेलीभर पाणी ओतून स्वच्छता राहील. 15-16 लिटरऐवजी दीड-दोन लिटरवर काम भागेल. हल्ली पूर्ण वॉटरलेस म्हणजेच पाण्याचा एक थेंबही न लागता स्वच्छ रहाणाऱ्या यूरिनल स्टॉल्सची बाजारांत उपलब्धता आहे. त्यांची योजना केल्यास फारच मोठी क्रांती होईल ! परदेशात सार्वजनिक इमारतींमध्ये त्यांचाच वापर केला जातो. या एका उपायाने किती पाणी वाचेल त्याचा सोपा हिशेब पुढे दिला आहे.
पुण्यासारख्या 40 लाख लोकसंख्येच्या शहराचे उदाहरण घेऊ. 40 लाखांपैकी निम्मे फ्लॅट, अपार्टमेंट वा बंगल्यात रहातात असे समजू. म्हणजे 20 लाखांसाठी कुटुंबात 5 या हिशेबाने 4 लाख फ्लॅटस् असतील. सरासरी प्रत्येक फ्लॅटमध्ये 2 संडास - बाथरूम गृहीत धरल्यास त्यांची संख्या 8 लाख होते. तेवढ्याच फ्लशिंग सिस्टीम असणार. प्रत्येक व्यक्ति सरासरी दिवसांत 8 वेळा (उन्हाळ्यात कमी, पण पावसाळ्यांत जास्त ) लघवीला जाते व प्रत्येक वेळी 10 ते 18 लिटर पाणी फ्लश करते. म्हणजे 5 जणांचे एक कुटुंब दिवसांत 5 X 8 = 40 वेळा सरासरी 15 लिटर पाणी म्हणजेच एकूण 600 लिटर पाणी घरटी वाया घालवणार. असे 4 लाख घरात 4 लाख X 600 = 24,00,00,000 लिटर अथवा 240 मिलियन लिटर पाणी वाया जाते. मुंबईची वस्ती चौपट, म्हणजे तिथे 1000 मिलियन लिटर पाणी वाचू शकेल - एका दिवसात! हाच आकडा एका वर्षाचा म्हणजे 365 दिवसांचा काढल्यास प्रचंड असेल ! हे सर्व शक्य आहे. लोकांनी आणि सरकारने निर्धार केला तर हे सहज घडून येईल. (काही लोक शंका काढतील की काही फ्लशिंग सिस्टर्नमध्ये अर्धेच पाणी वापरण्याचीही सोय असते. पण लोक ते अज्ञानापायी किंवा मोडल्यामुळे वापरत नाहीत. दरवेळी पूर्ण टँकच रिकामा करतात.)5. मोटारी, स्कूटर, अंगण इ. धुण्यासाठीही बऱ्याच पाण्याचा वापर होतो. पण ते सर्व पाणी सरळ ड्रेनेजमध्ये किंवा रस्त्यावर वाहून जाते. त्याऐवजी ते पाणी बागेतील वा मोकळ्या जागेतील फुलझाडे, वेली, वृक्ष यांच्याकडे वळवल्यास सत्कारणी लागेल. बागेसाठी वेगळे पाणी खर्च करावे लागणार नाही व पाण्याची मोठी बचत होईल. यासाठी अंगण किंवा इमारती बाजूची मोकळी जागा विशिष्ट प्रकारे झाडांच्या बाजूस उतार देऊन किंवा सोईस्कर छोट्या नाल्या किंवा पाट बागेच्या दिशेस जाणारे बांधून तयार करून घ्यावी लागेल. यासाठीही बिल्डिंग रेग्युलेशनमध्ये योग्य ती सुधारणा करावी.
मला चटकन सुचलेल्या कल्पना वर दिल्या आहेत. याखेरीज आणखी कित्येक सूचना कुणास सुचल्यास त्यांनी जरूर त्यांचा प्रसार व प्रचार करावा. हे झाले वैयक्तिक पातळीवरील उपाय. याशिवाय वस्ती, कॉलनी, उपनगरे, गावे इ. च्या पातळीवर मोठ्या भांडवली खर्चाचे उपाय योजावे लागतील. परदेशात ते कित्येत वर्षांपासून अंमलात आणलेले आहेत. आपणही ते वापरण्याची वेळ आली आहे. वॉटर हार्वेस्टिंग (गच्चीवर पावसाचे पाणी सांठवणे) आपल्याकडे थोड्या प्रमाणात सुरू झाले आहे. त्यासाठी गच्ची पूर्णत : जलनिरोधक असली पाहिजे, नाहीतर रोगांपेक्षा इलाज महाग आणि तोट्याचा व्हायचा. सैंपाकघर, बाथरूम, वॉशबेसिनमधील पाण्याचे रिसायक्लिंग म्हणजे शुध्द करून पुनर्वापर करणे हा एक आवश्यक उपाय सर्व नव्या इमारत संकुलांना सक्तीचा केला पाहिजे. यासाठीची यंत्रसामग्री व आवश्यक ते नैपुण्य आपल्याकडे उपलब्ध आहे. या शुध्दीकृत पाण्याचा वापर मोटारी धुणे, बागा, अंगण इ. धुण्यासाठी निर्धास्तपणे करता येतो. हे सर्व केले तरच जीवनम् म्हणजे पाणी आपणास जीवनदायी ठरेल.
प्रा. राजेंद्र कोल्हटकर, पुणे - (भ्र : 9823311839)